घननीळा लडिवाळा ............

Submitted by पुरंदरे शशांक on 11 February, 2011 - 01:52

घननीळा लडिवाळा ..........

१९८० चा जानेवारी महिना. कॉलेजमधील आम्ही मुले -मुली बेंगलोर -म्हैसूर -ऊटी अशा ट्रीपसाठी पुण्याहून निघालो. त्याकाळात पुणे ते मिरज ब्रॉडगेज व तेथून गाडी बदलून मिरज - बेंगलोर मीटर गेज असा प्रकार होता. काही कारणाने आमची ट्रेन मिरजला उशीरा पोहोचली. पुढील कनेक्टिंग ट्रेन तर निघून गेलेली. झालं ! पॅसेंजर ट्रेन नशीबी आली आमच्या ! तरी पण, एवढा मोठा ग्रुप व सगळे तरुण असल्याने हा बोअर प्रवास करू कसाही टाइमपास करून, असा विचार करून बसलो एकदाचे त्या गाडीत. सामान हलवाहलवी आम्ही सर्व पोरं करीत होतो आणि आमच्या ग्रुप मधील सर्व वर्गभगिनी मात्र हे जड़ सामान आम्ही व्यवस्थित हलवतो ना हे अगदी बारीक -सारीक सूचना देत पहात होत्या.
ज्या डब्यात आम्ही बसलो त्यात एक मोठे महाराष्ट्रीय कुटुंबही सहप्रवासी म्हणून लाभले. स्त्रिया -पुरुष -मुले अशी बरीच मंडळी होती. पण सगळे सुसंस्कारीत दिसत होते.
प्रवासाच्या सुरवातीला आमच्या ग्रुपने गप्पा - गाणी - भेंड्या -टाकाटाकी (पुण्याची पोरं म्हटल्यावर हे सांगायला नकोच ) करून चांगलाच टाईमपास (इतरांचाही) केला. दुपारची जेवणं झाल्यावर मात्र दोन -तीनच्या सुमारास असा काही कंटाळा आला की कुठून झक मारली आणि हा प्रवास निवडला असे सगळयांना झालं. गप्पा - गाणी - भेंड्या -टाकाटाकी इतकी झाली होती की त्यात कोणालाही रस उरला नव्हता. उकाड्यात झोप येणेही शक्य नव्हते.

आणि अशात

एकदम सीन चेंज झाला................

चक्क "घननीळा लडिवाळा" चे सुमधुर, लडिवाळ सूर कानावर आले. क्षणभर विश्वासंच बसेना.
मग लक्षात आले की त्या महाराष्ट्रीय कुटुंबातील एक मध्यमवयींन गृहिणी गात होत्या.
एकही वाद्य साथीला नसताना रेल्वेच्या खडखडाटात त्यांनी असे काही सूर लावले होते...... की बस्स.........
ती पेंगुळती दुपार, तो कंटाळवाणा प्रवास सर्व जणू अदृश्य झाले व तिथे फ़क्त "घननीळा लडिवाळा" चे सूर भरून राहिले. त्या गाण्याची मोहिनी अशी जबरदस्त होती की गाणे संपल्यावर टाळ्या वाजवायचे भानही कोणाला राहिले नाही.

अजून एक चमत्कार बाकी होताच..........

त्या गाण्याची मोहिनी संपते न संपते, त्या सुरांच्या धुन्दीतून ज़रा बाहेर येतो न येतो तोच त्या जादूई सुरांच्या मालकीणीने पुढे सुरु केले ............"का धरिला परदेस ........सजणा......"

आम्ही त्यांना दुसरे एखादे गाणं म्हणायचा आग्रह करण्या आधीच......

जणू आमच्या मनातलं उमजल्यासारखं .........

आमच्या झोळीत दुसरे रत्न पडत होतं ......

क्षणार्धात तेथे "का धरिला परदेसचे" सूर भरून राहिले. हे सूरही असे होते की त्या कंटाळवाण्या उकाड्यात आम्हा सर्वांवर कोणी शीतल सुगंधित पाण्याचा शिडकावा करीत आहे.....आमची मने निववीत आहे................
पुढे कितीतरी वेळ ही दोन्ही गाणी व ते मन भरून टाकणारे सूर सर्वांच्या मनात रेंगाळत होते.........
माझ्या मनावर ती मोहिनी अजून आहे ....यातील कुठलेही गाणे ऐकताना ते जग विसरायला लावणारे सूरच आठवतात......
अगदी आता हे लिहितानादेखील ............

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कुणीही न सांगता, असे गायले जाते ते निव्वळ आंतरीक ओढीने. त्यातले भाव अलौकिक असतात.
माणिक वर्मांनी प्रत्यक्ष गायलेले गाणी मी दूरदर्शन वर ऐकले आहे. त्या आणि ज्योत्स्ना भोळे अशी जुगलबंदी होती. (काश दूरदर्शनने हे सगळे कार्यक्रम जतन केले असते तर !!)
भारती आचरेकर पण हे गाणे छान म्हणत असे.
बकुल पंडीत पण आमच्या कॉलेजमधे गायल्या होत्या.

>>कुणीही न सांगता, असे गायले जाते ते निव्वळ आंतरीक ओढीने. त्यातले भाव अलौकिक असतात.

अगदी अगदी दिनेशदा, 'अभिमान' मध्ये जया भादुरी अमिताभला हेच सांगते ना?

व्वा ! खूप सुंदर अनुभव.
दिनेशदांना १००० मोदक !!!

घननिळा.. माझे एकदम फेव. गाणे..!

चंद्र निघे बघ झाडामागे, कालिंदीच्या जळी खेळतो गोपगणांचा मेळा....

'जीवनातली आकस्मिकता सुंदर असते,कलेतली अपरिहार्यता..' असे म्हणणार्‍या एकाची आठवण झाली. हे आकस्मिक क्षणच जगण्याला कथानक बहाल करतात. गूढता देतात.जीओ!

का धरिला परदेश....

शांताबाईंचे शब्द अभिषेकींच संगीत आणि त्याला मारुबिहागचा बकुळगंध...... और क्या चाहिये जिंदा रहने को.... !!!

सुंदर.. Happy ! कंटाळवाण्या प्रवासातच न्हवे तर अनेक अशा काळीजवेळी ही गाणी आपल्याला साथ देतात. तुम्ही भाग्यवान आहात, लेख चांगला लिहीला आहे. पण अजुन वाढवा.

पुलेशु..