व्हेलेंटाईन डे..

Submitted by मी मुक्ता.. on 9 February, 2011 - 23:35

दिवस १:
आता लग्नाला २ वर्षे झाल्यावर हे स्वाभाविकच आहे.. बायको एकदम ४-५ दिवस घरी नाही म्हणजे पर्वणीच की.. दोघांचीही घरं पुण्यातच, त्यामुळे दिवसेंदिवस न भेटण्याचा काही प्रश्नच नव्हता.. घरी गेले तर सोबतच जायचे किंवा एकटे गेले तरी संध्याकाळच्या आतच परत यायचे.. त्यामुळे तिने जेव्हा सांगितलं की सगळ्या मैत्रीणी मिळुन ४-५ दिवस फिरायला चालल्या आहेत तेव्हा नाही म्हटलं तरी या.....हू केलंच त्याने मनात.! तिलाही हे काही अनपेक्षित नव्हतं त्यामुळे तिनेही हसुन मान डोलवली फक्त समजुतदारपणे... मग एके सकाळी आवरा-आवरी आणि वीस हजार सुचना देवुन झाल्यावर तिने घर सोडल.. पहिल्या रात्री सेलेब्रशन होणं सहाजिकच होतं. मित्र जमले, पार्टी झाली.. बॅचलर लाइफच्या आठवणी झाल्या.. त्यावेळच्या प्रेमप्रकरणांची उजळणी आणि साला आताचं लाइफ कसं च्...गिरी आहे हे कोणी इंग्लिश मधुन बोललं तर कोणी गाण्यातुन.. पण एकुण मजा आली... मध्येच तिचा फोन आल्यावर अगदी आनंदाने miss you वै. पण म्हणुन झालं..
दिवस २:
दुसर्‍या दिवशी सगळी जनता आपापल्या वाटेने गेल्यावर मात्र घर एकदम अंगावर आलं त्याच्या... पण, "जाऊ दे! अजुन वेळ आहे तिला परत यायला.. नंतर आवरता येइल असं म्हणुन तो घाईघाईने ऑफिसला पळाला..."
आज ऑफिस मधुन निघायची घाई नव्हती. आरामात निघाला, घरी एक चक्कर टाकली. तिकडेच जेवण झालं. घरी परतायला नाही म्हटलं तरी उशिर झालाच होता पण ओरडणारं कोणी नव्हतं. अर्थात वाट बघणारं पण नाहीच.. अंमळ बोरच झाला तो आज. फोन आला तेव्हाही miss you वै.म्हणायची मनःस्थिती राहिली नव्हती. जुजबी बोलुन फोन लवकरच ठेवला त्याने आणि चॅनल बदलायचासुद्धा कंटाळा आला तेव्हा सोफ्यातच आडवा झाला.
दिवस ३:
आज मात्र उठल्यावर त्यालाच घर बघुन शिसारी आली. त्यात ते आवरायला लागतय याचं दु:ख जास्त होतं की तिच्या आठवणींची तीव्रता जास्त होती हे काही त्याला अजुन समजत नव्हतं. घर आवरलं, स्वतःचं आवरलं. तिने त्याला गिफ्ट म्हणुन दिलेला पण त्याने रंग आवडला नाही म्हणुन घालायचा टाळलेला शर्ट आज मुद्दाम कपाटातून काढून घातला. मग स्वतःशीच हसुन घराबाहेर पडला. दिवसभरात काही ना काही कारण काढुन आज तिला ३-४ फोन झाले. पण उगीच तिच्या आनंदात कशाला विरजण म्हणुन उत्साहात बोलायचा त्याने आपल्या परिने पुर्ण प्रयत्न केला. तरी तिने तिनतीनदा "काय झालं, ठिक आहेस ना!" म्हणुन विचारलच.. रात्री कोणाकडे जायचा पण मूड नव्हता. घरी येवुन उगीच पोटात काहीतरी ढकलायच म्हणुन मॅगी खाल्ली. इतर वेळेस, बॅकस्ट्रीट बॉयीज आणि मायकेल जॅक्सनचा आग्रह धरणारा आणि तिला संदिप खरे ऐकते म्हणुन चिडवणारा तो उगाचच 'नसतेस घरी तू जेव्हा' ऐकत होता आणि वर अधुन मधुन चेंज लागतोच माणसाला म्हणत स्वतःचीच समजुन घालत होता. गाणी ऐकता ऐकता एकेक जुन्या आठवणी डोळ्यासमोर फेर धरायला लागल्या त्याच्या. किती दिवसांत तिच्यासोबत निवांत वेळ घालवलाच नाहीये याची अगदी चुटपुट वाटली त्याला. आता आल्यावर या वीकेंडला मस्त फक्त दोघांनीच वेळ घालवायचा एकत्र असं ठरवुनही टाकलं त्याने.
दिवस ४:
आजची सकाळ मात्र असह्य झाली त्याला! बास्स.. आता पुरे! बोलवुन घ्यावं तिला परत असाही विचार आला त्याच्या मनात पण निकराने तो झटकुन त्याने ऑफिसची वाट धरली. आज कामातही मन रमेना, तिला फोनही करावासा वाटेना. संध्याकाळी घरी येताना लिफ्टला होणार्‍या उशिरावर, पार्किंग स्पेस मधल्या वॉचमॅनवर, वाटेतल्या सगळ्या सिग्नलवर, सगळ्या बाइक आडव्या घालणार्‍यांवर, इतकच काय तिच्यावरही तो मनातल्या मनात ज्जाम चिडला होता.. घरी जाऊन करायचं काय हा प्रश्न होताच.. पण त्यातुनही उद्या सकाळी ती येणार म्हणुन तिच्या आवडीची फुलं घेतली त्याने. ४ दिवस गेले पण आता १२ तास खूप वाटतं होते. थकलेल्या शरीराने आणि उदास मनाने घरी पोहचला. पहातो तर घरचे लाइट लागले होते. आई आली की काय अचानक, स्वतःशीच बोलला. बेल वाजवली. दार उघडलं तर समोर प्रत्यक्ष ती.. त्याला चटकन काही बोलायचं सुचलच नाही. हातातली फुलं पण हातातच राहिली. खरंतर त्याला इतका आनंद झाला होता, पण खुदकन हसला फक्त..! "जरा चार दिवस लवकर घरी येवुन दिवा लाव म्हटलं तर तेही जमत नाही ना तुला?" पण हे वाक्य ऐकु कुठुन जायला त्याला.. तिच्या डोळ्यात तिच्याही नकळत तरारलेलं पाणीच बघत होता तो.. आणि तिच्याकडे बघता बघता तीच धुसर दिसायला लागली..

गुलमोहर: 

मस्त..

आवडलं.......:-)

Pages