परतीचा प्रवास ...!!

Submitted by प्रकाश१११ on 8 February, 2011 - 23:23

प्रवास छान व्हावा
छान असते कल्पना
टू -टायर ए.सी. ची तिकिटे
[मन श्रीमंत करण्यासाठी कधीतरी खर्च करावारे ..
उद्याची काळजी त्या गजाननाला ]
मस्त थंड डबा
सोबत आपलीच माणसे
त्यांच्यां मनात दाटून येत असतो भक्तीचा उमाळा
रात्री छान झोप
पहाटे पहाटे आलेली जाग
दिसत असतात शेताचे हिरवे गार तुकडे
झाडाला लोंबत असतात शिंपी पक्षाची घरटी
पाखरांचे आवाज
मी विसरून जात असतो
त्या महानगरातले जगणे
किडामुंगी होऊन ...!!

कोठ्ल्याशा गावात देवळाच्या कळसावरती लाऊड स्पीकरचा भोंगा
नि गळत असते भीमसेन जोशीची अभंग वाणी
बाबा असतो सोबत खूप वर्षांनी
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद
त्याच्या डोळ्यातून ओघळत असतो

आम्ही सायकल रिक्षाने जातो
भाडे न मागता बाबा टिकवतो पन्नास रुपयाची नोट
त्याच्या हातावर.....
रिक्षावाल्याच्या.
सकाळी सकाळी डोळ्यात अश्रू ......!!

मग असाच अचानक गेलो
तोच डबा तसेच वातावरण
तेच शिम्पिपक्ष्याची
लोंबकळणारी घरटी
शेताचे चौकोनी तुकडे
तेच आभाळ
सायकल रिक्षावाला कोण कुणास ठाऊक .?
मीपण काढून देतोय त्याला पन्नास रुपयाची नोट
त्याच्या हातावर
पण देणारा मी होतो
[बाबाच्या आठवणीसाठी ]
बाबा मागच्या प्रवासा नंतर हरवून गेलां होता.
परतीचा प्रवास
संपून गेला होता ...!!

मी मुका ..!
विषन्न ...!!
केविलवाणा ....!!!
हरवलेला बाबा नि मी असा
मी न शोधता त्याचा चेहरा समोर येतोय सारखा
शिंपी पक्ष्यांची लोंबकळणारी घरटी
टांगून फांदीला
वटवाघळासारखी
मी तसाच लोंबत आठवणींना ...!!

गुलमोहर: 

मी विसरून जात असतो
त्या महानगरातले जगणे
किडामुंगी होऊन ...!!>>> व्वा प्र.१११, अगदी नैसर्गिक, छान वाट्ली कवीता आणि आशयही.