चाकोरीबाहेरचं-’कोबाल्ट ब्लू’

Submitted by मणिकर्णिका on 4 February, 2011 - 03:46

सचिन कुंडलकर हे नाव प्रायोगिक नाट्यकर्मींना सुपरिचित आणि ’गंध’मुळे जगाच्या काना-कोपरयात पोहोचलेलं. लघुपट-’द बाथ’, छोट्याशा सुट्टीत, चेतन दातारच्या ’१, माधवबाग’चं रुपांतर ’ड्रीम्स ऑफ़ तालिम’, ’पूर्णविराम’ अशा अनेक प्रायोगिक नाटकांमधून त्याने आपला ठसा उमटवलेला आहे. पण त्याने लेखनातून केलेल्या प्रयोगाबद्दल लोकं अजून अनभिज्ञ आहेत असं दिसतं. सचिन कुंडलकरची २००६ मध्ये प्रकाशित झालेली ’कोबाल्ट ब्लू’ ही अशीच एक अत्यंत छोटेखानी अशी ९० पानांची कादंबरी आहे. आजच्या इंस्टंट जमान्यात इंस्टंटली वाचून होईल अशी. प्रकाशन गॄह- मौज. गौरी देशपांडे, चि.त्र्यं, पु.ल यासारख्या दिग्गजांची पुस्तकं प्रकाशित केलेल्या ’मौज’ प्रकाशनाने ’कोबाल्ट ब्लू’ प्रकाशित करावे यात कादंबरी दर्जेदार असणार असं वाचकांनी समजायला हरकत नसावी.

कोबाल्ट ब्लू आहे तनय-अनुजा या भावंडांची आणि त्यांच्या घराच्या मनोरावजा खोलीत राहायला आलेल्या मुलाची (आपण याला ’नि’ म्हणूयात). आणि मग या तिघांच्या अनुषंगाने आलेल्या त्यांच्या कुटुंबांची, दोस्तांची, वैयक्तिक लढ्यांची सुद्धा.

या ’नि’च्या प्रेमात तनय-अनुजा आपापल्या पातळीवरुन पडतात.
तनयला आपल्या वयांच्या मुलांप्रमाणे मुली न आवडता मुलं आवडतात. कळायला लागल्यापासून तनयला आपल्यातलं वेगळेपण छळतंय आणि त्यातून तो एकाकी होत गेलाय. या एकाकीपणातून, आपण आहोत तसे स्वीकारलं जाण्याच्या डेस्परेशनमधून मैत्रीचा हात पुढे करणारया ’नि’मध्ये आणि त्याच्यात चटकन मैत्रीचे, मग पुढे शारिरीक-मानसिक बंध तयार होतात. आणि मग पुढे त्याच्या कित्येक छोट्या छोट्या गोष्टींच्या प्रेमात पडत ’नि’मय हो‌ऊन जातो. तर अनुजाला भावतो तो ’नि’चा सहजभाव, कसलेही प्रश्न न विचारणारं-कसल्याही बदल्यात कुठलीच उत्तरं न मागणारं त्याचं तुटक वेगळेपण.

तनय आणि ’नि’ यांनी वरच्या खोलीत यांनी घालवलेले दिवस, रात्रींमधून ’नि’च्या स्वभावातल्या बारीक बारीक बारकाव्यांना तोलत-जोखत आपण दोघे कधीतरी एकत्र राहायला लागूच अशी स्वप्नं तनय बघतो आहे तर अनुजाला त्याचा बेफ़िकीरपणा, कलंदरपणा आवडलाय. पण या दोन्ही भावंडांना एकमेकाच्या मनोव्यापारांची कल्पनाच नाहीये. आणि त्याचमुळे अनुजा ’नि’बरोबर निघून जाते तेव्हा "आपल्याला कधीच कसं कळलं नाही?" हया धक्क्याने खचलेल्या तनयचं फ़सवले गेल्यासारखं वाटणं जेन्यु‌ईन वाटतं. पुढे ’नि’ अनुजालाही एकटंच टाकून निघून जातो, अनुजा विचित्र मन:स्थितीत परत घरी येते तेव्हा तिच्याही बाबतीत ’नि’ने तेच केलं जे आपल्या बाबतीत केलं हे जाणवून आपल्याला कळल्यासारखा वाटणारा ’नि’ आपल्याला मुळात तेव्हढासा कळला नव्हता हे तनयला कळतं.

अनुजा आणि तनय मग आपापल्या कुवतीनुसार ’काय चुकलं असावं?’ (त्यांचं-’नि’चं नाही. एव्हढं सगळं होऊनही तनय काय आणि अनुजा काय, थेट ’नि’ला दोष देताना आढळतच नाहीत.), ’काय सुटून गेलं असावं?’ याचा भूतकाळात डोकावून मागोवा घ्यायचा प्रयत्न करतात, आपल्यापुरता उत्तरं मिळवतात, जुनीच नाती नव्याने कळल्यासारखी वाटून त्यांचा क्वचित आधारही घेतात. अनुजाला फ़क्त ’नि’बरोबर दिवसाचे अखंड चोवीस तास घालवून मिळवायचा आनंद, किंवा तनयचं ’नि’वरचं प्रेम हे तनय-अनुजाच्या घरचे जरासुद्धा समजून घेतील अशी अपेक्षा नसते. विस्कटलेल्या मन:स्थितीत घरी परतलेल्या अनुजाला मानसोपचारतज्ञाचे उपचार सुरु असताना कुठेही बभ्रा होऊ नये, झाल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये याकरता मावशीच्या घरी ठेवले जाते तेव्हाही अनुजाच्या "गॅरेजमध्ये गाडी न्यावी तसं मला ठिकठाक करुन इथून घेऊन जाणार." या उद्गारांनी तनय-अनुजाच्या सोवळ्यात बांधून ठेवलेल्या लोणच्याच्या छानशा बरणीसारख्या कुटुंबाविषयी पूर्ण कल्पना आपल्याला तोपर्यंत येऊन चुकलेली असते. पण कोणी दखल घेवो ना न घेवो- आयुष्य तर चालू राहणारच असतं-मग ते आता जरा एकटं जगून बघूयात म्हणून नंतर तनय-अनुजा आपापले मार्ग निवडून चालती होतात.

या कादंबरीतलं तनय-अनुजाचं निवेदन थेट आहे, प्रामाणिक आहे आणि कुठलाही आडपडदा न ठेवता आलेलं आहे. तनय विमनस्क मन:स्थितीत असताना आलेल्या निवेदनात त्याच्या डोक्यात काहीकाही विचार-अतिप्रिय प्रसंगांची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यातून प्राथमिक शारिरिक गुंतवणूकीला पार करुन आलेली तनयची भावनिक आणि मानसिक गुंतवणूक खूप खोलवरुन आल्याचे जाणवते.
पण ’नि’?
या दोघांच्याही निवेदनातून वजा करुन तो उरतोच आहे. दाट धुक्याच्या पलीकडे, अस्पष्ट, धूसर, ज्याच्यापर्यंत पोहोचायला डोक्यापयंत कळ आणणारया ठोकरा खातच पोहोचायला हवं. कोणत्याही चाकोरीत स्व्त:ला अडकवून न घेणारा, कॅन्व्हासवर ओढलेल्या निळ्या रंगाच्या एकच फ़टकारयात (ज्याने या पुस्तकाचं मुखपृष्ठ सजलंय) गराड्यातलं एकटेपण- सगळं असूनही काहीच नसल्याचं चितारणारा, आपली स्पेस हक्काने मागून घेणारा ’नि’. ’नि’ला खरंच प्रिय असणारया दोन व्यक्तींना सोडून तो का निघून जातो, त्यांना मनावेगळं करु शकत नसताना? तो गुंतलेला असतोही आणि नसतोही- हे कसे काय, त्याचं बायसेक्शुअल असणं हे जाणून घ्यायला ’नि’च्या मानसिकतेत डोकावण्याची ओढ लागून राहते.

अनेकदा आपण नात्याला अपेक्षांनी, गृहितकांनी भाग द्यायचा प्रयत्न करतो. बाकी शून्य आली की मग सर्वकाही आपल्या ताब्यात, आपल्या मनासारखं होतंय असा छानछान फ़ील येतो. पण बाकीच जास्त उरत असेल तर मग असुरक्षित वाटायला लागतं, अनिश्चिततता येते, घुटमळ वाढते. पण या अनिश्चितेतही ’मी’, ’माझं’, ’कायमचं’ हा विचार मनाबाहेर ढकलता येत नाही.अतिउत्साहात म्हणा किंवा प्रेमाबरोबर आपल्याही नकळत ओघाने येणारया गृहीत धरण्याच्या सवयीमुळे बरयाचदा आपण जे शोधतोय, आपल्याला जे हवंय ते समोरच्याला वेगळ्या पद्धतीने हवं असू शकतं, याचा विचार आपल्याकडून होत नाही. समोरच्याला बांधून घातल्यासारखं वाटू शकतं. कोणा एकाच्या आनंदात दुसरयाची फ़रफ़ट होऊ शकते.मग सहजीवनातल्या ’सह’ ला फ़ार केविलवाणा अर्थ उरतो. ’नि’ला कदाचित तनय आणि अनुजा बरोबर राहताना असंच वाटलं असावं. पण ’नि’ तनय अणि अनुजाच्या निवेदनातून जेव्हढा उमटतोय, मूर्त होतोय तेवढ्यावरुनच अंदाज बांधायला लागतात.

स्त्री आणि पुरुष यांच्यामधल्या नात्यांच्या खूप वेगवेगळ्या त~हा असतात, वेगवेगळे कंगोरे असतात. डिक्शनरीत बघून सांगीतल्यासारखे एकेक बारकावे उकलून नाही दाखवता येत-कितीही दाखवायचे म्हटले तरी. आणि दोन मनुष्यमात्रांमधलं प्रेम हे इतक्या प्रतीचं असतं की चाकोरीतून येणारया प्रेमाच्या फ़ूटपट्टीत त्याला नाही मोजता येणार. ते पुरुषाने स्त्रीवरच केलं पाहिजे किंवा स्त्रीने पुरुषावर अशा ठोकळेबाज चौकटीत त्याला बसवायचा प्रयत्न केला की ते अनाकलनीय रहायचीच शक्यता जास्त. या कादंबरीचे नायक भलेही गे, बायसेक्शुअल असतील पण त्यांचं तसं असणं ही पूर्ण कादंबरीची ओळख ठरत नाही किंवा फ़क्त त्यावरुन कादंबरी वाचणं-न वाचणं ठरणं योग्य ठरत नाही. त्यामुळे या पुस्तकाची संभावना सरसकट ’Queer Literature’मध्ये करून या पुस्तकाच्या वाटेला न जाणे हा या पुस्तकावर शुद्ध अन्याय आहे. २ जुलै, २००९ नंतरही जर आपल्या विचारसरणीत थोडाफ़ार बदल व्हायची शक्यता नसेल तर याहून मोठे दुर्दैव ते काय.

राहता राहिलं पुस्तकाचं शीर्षक- कोबाल्ट ब्लू. का?

शुद्ध निळा- त्यात काळ्या-पांढरयाची भेसळ नसते. जशी त्यात काळ्या-पांढरयाची भेसळ होते तसा तो होतो कोबाल्ट ब्लू! प्रशियन ब्लू, रॉयल ब्लू या आपल्या प्रतिष्ठीत भावंडांमध्ये काहीशा उपेक्षित राहिलेल्या या रंगाला प्रतिष्ठा मिळवून दिली व्हिन्सेंट व्हॅन गॉगने.
शुद्धतेच्या बाबतीत परिपूर्ण नसला तरी कोबाल्ट ब्लू अपूर्णत्वातच किती परिपूर्ण वाटतो, अलगरित्या डिफ़ा‌ईन होतो, स्वतंत्र स्पेस निर्माण करतो. पण हे सर्व असूनही त्या शुद्ध निळ्याशी नाळ जोडून असतो.

तनय आणि अनुजा आपल्या परिने परिपूर्ण नाती उभी करु पाहतात. पण एकाच माणसाकडून नाकारली गेलेली ही माणसं आपापली आयुष्य़ गोळा करतात, सावरुन जगू पाहतात. पण हे करताना ती त्याचं अस्तित्व नाकारत नाहीत. आपण आज जे आहोत त्यात त्याचाही वाटा आहेच हे प्रांजळपणे मान्य करुन आपापल्या वाटा चालायला लागतात, त्याच्या निळ्याशार अस्तित्वाचा ठसा मनात वागवतच.

म्हणून कोबाल्ट ब्लू!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम परिचय, धन्यवाद!
मी तरी सध्या कुंडलकरच्या लेखनाचा फॅन आहे. लोकसत्तामधे त्याने गुलजारवर आणि रोमभेटीवर एकदम वेगळे, रिफ्रेशिंग लिहिले होते.

@आगाऊ
त्याचं 'फ्रिजमध्ये ठेवलेलं प्रेम पूर्णविराम' पण वाचा. आवडेल. त्याने दिग्दर्शित केलेली, लिहीलेली नाटकं, लघुपट बघितले आहेत का तुम्ही?

@दिनेशदा
कोबाल्ट ब्लूचं माहीत नाही पण या 'फ्रि.ठे.प्रे.पू' वर प्रयोग केला आहे त्याने. यंदाच्या सुदर्शन महोत्सवात दाखवलं ते नाटक.

@अश्विनीमामी
पुण्यात असाल तर रसिक, पाथफाईंडर इथे मिळून जाईल.
मुंबईत असाल तर गेल्या आठवड्यात Majestic मध्ये दोन कॉपीज होत्या.

मलाही खूप आवडलं होतं पुस्तक. कुंडलकरची स्टाईल तशीही आवडतेच मला. भिन्न तर्‍हांच्या नातेसंबंधांतले तणाव, तरलता खूप छान व्यक्त केलीय त्याने कोबाल्टब्लू मधे. पण पुस्तक निदान दोनतीन वर्षं तरी जुनं आहे. प्रदर्शनांमधे किंवा मॅजेस्टीक, आयडीयल सगळीकडे मिळतं.
परिक्षण चांगलं केलय.

पराग,
कोबाल्ट ब्लू लेण्डमार्कला आहे. बरंच जुनं पुस्तक आहे हे. चार वर्षं झाली बहुतेक प्रकाशनाला.

शर्मिला
तू म्हणते आहेस तर खरंच चांगलं असणार हे परीक्षण. रसिकच्या साईटवर तुझं या पुस्तकाचं परी क्षण वाचलंय मी

पराग,चिंगी
धन्यवाद

राज, अरे, तू 'मी मराठी'वाला ना?.

शुभांगीताई,
मी अक्षरधारा मधूनच घेतलं होतं. तिथे नक्की मिळेल असं वाटतं. बुकगंगावर पण आहे.

माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक.
ह्या पुस्तकाने "coastal element of maharashatra" हा नवीन वाक्यप्रचार वापरात आणला .
या कादंबरीचे नायक भलेही गे, बायसेक्शुअल असतील पण त्यांचं तसं असणं ही पूर्ण कादंबरीची ओळख ठरत नाही किंवा फ़क्त त्यावरुन कादंबरी वाचणं-न वाचणं ठरणं योग्य ठरत नाही.>>अगदी खरय.

फारएण्ड, डुआय, रैना, रंगासेठ, रुनी,
धन्यवाद

arc
माझा फेव्हरिट वाकप्रचार.
कोणालाही पहिले कळत नाही, कळेपर्यंत आपण धूम ठोकलेली असते.
Happy

कोबाल्ट ब्लू वाचलं. छोटसं पुस्तक असल्याने एका बसणीत वाचून संपलं.
दोन भावंडांची मनोगतं ह्यात येतात त्यातलं मला बहिणीने लिहिलेलं जास्त आवडलं. ते चॅरॅक्टर खूप प्रॅक्टीकल आहे. त्या मनोगतातून जोशी कुटूंबाचं चित्र खूप प्रभावीपणे उभं रहातं. 'त्याच्या'बद्दलचं गुढ शेवटपर्यंत उकलत नाहीच आणि ओपन एंड चांगला वाटतो.
एकंदरीत नक्की वाचण्यासारखं पुस्तक आहे.

मला पण वाचायचंय हे पुस्तक. बुकगंगा वरून अमेरिकेत पुस्तकं मागवता येतात का? तिथे फक्त इंडियातले शिपिंग वगैरे असं दिसतंय Sad

अतिशय आवडलं पुस्तक.

समलिंगी संबंध, बायोसेक्शुअल लोक- याबद्दल इतकं थेट तरीही सुंदर लिहिलेलं असल्यामुळेच हे पुस्तक खाली ठेववत नाही. त्या ही व्यतिरिक्त एक टिपिकल मध्यमवर्गीय आई-बाबा त्यांच्या धारणा, साधी नॉर्मल राहणी, त्यांचे विचार याबरोबरच अनेक छोटे कंगोरे यातून इतके पर्फेक्ट लिहीले आहेत- हॅट्स ऑफ टु सचिन कुंडलकर. पुस्तकाचा शेवट येत जातो, तसतसा 'तो' कळतो असंही वाटतं आणि धूसरही वाटतो. ओपन एन्ड अगदीच चपखल.

मणिकर्णिका- सुरेख लिहिलं आहेस हे परिक्षण. पुस्तकाला न्याय देणारं!