मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग विज्ञान रंजन स्पर्धा २०११

Submitted by anudon on 2 February, 2011 - 23:43

Hello all,
We are forwarding a circular in marathi received from Maharashtra Vidnyan Parishad about an interesting Quiz in view of the International Year of Chemistry-2011. Solve it and forward it to many more people like you.
Thanks,
Col. Anand & Dr. Swatee Bapat.

सप्रेम नमस्कार
२०११ हे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष आहे. मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विज्ञान रंजन स्पर्धा होत आहे. या स्पर्धेची प्रश्नावली सोबत पाठवत आहे. आपल्याला आवडेल, मजा येईल.त्यासाठी आपणाकडून पुढील पैकी एक वा अनेक प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

  1. आपण ही प्रश्नावली स्वत: सोडवावी.
  2. जास्तीत जास्त मित्र मंडळींपर्यंत ती पोचवावी.
  3. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इतरांना प्रवृत्त करावे.
  4. आपल्या ओळखीच्या प्रसार माध्यमातून तिचा प्रसार होईल असा प्रयत्न करावा.
  5. प्रश्नावली सोडविण्याचा उत्तम प्रयत्न करणा-यांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन पाळण्यासाठी आर्थिक मदत करावी अथवा उपलब्ध करून द्यावी
  6. शक्य असल्यास आपल्या अन्य भाषिक मित्रांना त्यांच्या प्रादेशिक भाषेत भाषांतर करून प्रसार करायला सांगता येईल.

मी आपल्याकडे बरेच सहकार्य मागितले आहे. तुम्ही कराल ते ते सहकार्य वैज्ञानिकतेच्या संवर्धनासाठी मोलाचेच असणार आहे.

विनय र. र.
कार्यावाह, मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग

विज्ञान रंजन स्पर्धा २०११
नियमावली:

  • ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
  • प्रवेशमूल्य नाही.
  • खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनाने, कोणालाही विचारून, पुस्तकात पाहून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील
  • जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या हस्ताक्षरात फुलस्केप कागदावर लिहून २० फेब्रुवारी २०११ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४१११०३०.
  • उत्तम प्रयत्नांना आकर्षक बक्षिसे.
  • २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनी विजेत्यांची नावे महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे ३० येथील कार्यक्रमात जाहीर केली जातील
  • शिक्षण आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना पुढील प्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.
  • शिक्षण: पाचवीपर्यंत(१०), सातवीपर्यंत(९), दहावीपर्यंत(७), बारावीपर्यंत(५), पदवी(३) शास्त्रशाखा(०).

    वय वर्षे: १३ पर्यंत(६), १४ ते १६(४), १७ ते २०(२), ४१ ते ६०(२), ६१ ते ८०(४), ८१ हून जास्त (६)

  • आपल्या उत्तरपत्रिकेसोबत स्वतंत्र कागदावर पुढील माहिती लिहून पाठवावी- १. संपूर्ण नाव, २. पत्ता, ३. दूरध्वनी, ४. ई-मेल, ५. जन्मतारीख, ६. शिक्षण, ७. व्यवसाय, ८. पुढावा गुण.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर संपर्क करावा. कार्यवाह, म. वि. प., पुणे - विनय र. र., ९४२२०४८९६७, ई-मेल mavipa.pune@gmail.com

प्रश्नावली:
प्र. १ निरीक्षण करून उत्तरे लिहा . (गुण १० )

  1. भारतीय चलनाच्या नाण्यावर इसवी सनाच्या आकड्याखाली आढळणारी चिन्हे कोणती ?
  2. रात्री पाने मिटून घेणा-या दोन वनस्पती कोणत्या?
  3. तुमच्या घरात दरमहा दर माणशी किती मीठ खाल्ले जाते?
  4. जीन प्रकारचे कापड आणि हातरुमालाचे कापड यांच्या वीणीत कोणता फरक दिसून येतो?
  5. भारतातील सर्वात पूर्वेकडचे आणि सर्वात पश्चिमेकडचे स्थानांची नावे काय?
  6. ओल्या हाताला साबण लागलेला असताना त्यावर हळद टाकली तर कोणता रंग येतो?
  7. २६ ते ९६ या क्रमवारीत एकंस्थानच्या ६ या अंकासाठी कोणकोणते उच्चार केले जातात?
  8. तुम्ही इंग्रजीत ७६ ही संख्या लिहिलीत तर तुमच्या समोर बसलेल्या व्यक्तीला मराठीतली कोणती संख्या दिसते?
  9. गावठी बैलाला संकरीत बैलापेक्षा कोणता अवयव अधिक असतो?
  10. ५ फेब्रुवारी २०११ ला सूर्यास्तानंतर दिसलेल्या चंद्राचे वर्णन करा.

प्र. २ थोडक्यात उत्तरे लिहा. (गुण १० )

  1. हापूस आंबा कोणी शोधून काढला?
  2. अंकांसाठीची रोमन चिन्हे वापरून ३६६ ही संख्या लिहा.
  3. पृथ्वीवरील हवेत सर्वाधिक प्रमाणात असणारा वायू कोणता?
  4. उन्हाळ्यात विणीचा हंगाम असणा-या तीन पक्ष्यांची नावे लिहा.
  5. शंभर सहस्त्र म्हणजे एक लक्ष, तसे किती कोटी म्हणजे एक शंख?
  6. जिब्रालिक आम्लाचा उपयोग काय?
  7. बहुरंगी छपाई करताना कोणकोणत्या रंगांच्या शाई वापरतात?
  8. कोणत्या ग्रहावर हरितगृह वायूंचा प्रभाव जास्त दिसून येतो?
  9. खताच्या गोणीवर असणा-या २:४:६ या आकड्यांचा अर्थ काय?
  10. भर दुपारी एका देशात रविवार असताना त्याच्या सर्वात जवळच्या देशात सोमवार असतो असे
    दोन देश कोणते?

प्र. ३ चूक की बरोबर ते लिहा (चुकीचे असेल ते दुरुस्त करून लिहा) (गुण १० )

  1. आई आपल्या बाळाला दुधाबरोबर जीवाणू पाजते.
  2. एक लिटर डबाबंद आईस्क्रिममध्ये अर्धा लिटर हवा असते.
  3. उंदीर झाडावरून तोडून नारळ खातो.
  4. आपल्या चेहे-याची उजवी बाजू डाव्या बाजुच्या प्रतिबिंबासारखी असते.
  5. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सारे जग झोपलेले होते.
  6. धुण्याचा सोडा तापविला की खाण्याचा सोडा होते.
  7. मधुमेही रुग्णांना आंधळेपण येण्याचा धोका अधिक असतो.
  8. केळीच्या झाडाची वाळलेली पाने काढून टाकणे उपयुक्त असते.
  9. चारोळीच्या पिकल्या फळाचा रंग लाल असतो.
  10. उड्डाण पुलावरून जाणा-या वाहनाला कमी इंधन लागते.

प्र. ४ शास्त्रीय कारणे द्या (गुण २०)

  1. हिवाळ्यात अनेकांची त्वचा फुटते.
  2. साप नागमोडी चालतो.
  3. केक, ब्रेड, इडली सच्छिद्र असतात.
  4. उकळत्या पाण्यात साखर टाकल्यास उकळी क्षणभर थांबते.
  5. थंडीत खोबरेल तेल गोठते मात्र शेंगदाणा तेल गोठत नाही.
  6. नुसते ओतण्यापेक्षा बाटली हलवून घेतल्यास केचप सहजपणे ओतता येते.
  7. हरब-याच्या झाडावर आंब येते.
  8. झोपडपट्टीवासियांमध्ये 'स्वाईन फ्लू'चे प्रमाण कमी आढळले.
  9. कोणत्याही संख्येला शून्याने भाग देता येत नाही.
  10. संगणकामध्ये स्क्रीन सेवर वापरतात.

प्र. ५ मी कोण? (गुण १0)

  1. माझ्या डोक्यावर सफरचंद पडले आणि मी त्यातून एक शोध लावला.
  2. मी, माझा नवरा, माझी मुलगी, माझा जावई सर्वच नोबेल पारितोषिक विजेते आहोत.
  3. माझा शोध एका सूर्यग्रहणाचे वेळी सिंधुदुर्ग येथे केलेल्या प्रयोगात लागला.
  4. ट्यूब रेल्वेतून प्रवास करताना मला एक स्वप्न पडले की एक साप स्वत:चीच शेपूट गिळत आहे.
  5. गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाशही ओढला जातो असे मी सांगितले. एका सूर्यग्रहणात काहींनी ते फोटो काढून सिद्ध केले. मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.
  6. मुळे नसली तरी फांद्यांतून पाणी वर चढते हे मी सिद्ध केले.
  7. झाड, त्यावरचा मोर, जमिनीवरचा साप यांच्याकडे पाहून मी एक गणिती प्रमेय सांगितले.
  8. माझ्या मृत्युनंतर तेरा वर्षांनी माझ्या कल्पनेतील 'मोल'ची संख्या मोजली गेली.
  9. मी बनारसचा रहिवासी, मी आठ प्रकारच्या तीनशे शस्त्रक्रियांविषयी ग्रंथ लिहिला.
  10. पारा माझा फार आवडता. त्यापासून बनलेल्या पदार्थांचा अभ्यास करून मी रसायनशास्त्राचा पाया रचला.

प्र. ६ करून पहा आणि निरीक्षणे नोंदवा. (गुण २०)

  1. एका फुलस्केप कागदावर तुमचा हात पाचही बोटे सुटी सुटी राहतील असा ठेवा. एक पेन घेऊन टेकलेल्या हाताची बाह्याकृती काढा. आता करंगळी आहे तिथेच ठेऊन हात वीतभर ताणा. एक पेन्सील घेऊन त्याची बाह्याकृती काढा. हात कागदावरून काढून घ्या. मूळ जागेवरून कोणते बोट किती अंश सरकले?
  2. १ महिना, ३ महिने, ६ महिने, १ वर्ष, ३ वर्ष, ६वर्ष, १२ वर्ष आणि १८ वर्ष या वयाच्या व्यक्तींच्या डोक्याचा घेर आणि शरीराची उंची मोजून त्या दोन्ही मापांची गुणोत्तरे काढा.

प्र. ७ अनेक उत्तरे द्या (गुण १५)

  1. "द्राक्ष आणि बेदाणा" अशा प्रकारच्या किमान पाच जोड्या लिहा.
  2. चार समभुज त्रिकोण वापरून बनविता येणा-या भौमितिक आकृत्या काढा.
  3. मराठी भाषेतील अवैज्ञानिक म्हणी, वाक्प्रचार सांगून तुमचे उत्तर स्पष्ट करा. (उदा. जिभेला हाड असणे चांगले मानतात वास्तवात कोणाच्याच जिभेला हाड नसते.)

प्र. ८ पारख कशी करतात? (गुण २०)

रोजच्या जगण्यात आपण अनेक अन्न-धान्य, भाज्या-फळे, कागद-कापड, मसाल्याचे पदार्थ, खाद्य पदार्थ, वस्तू, जिन्नस, साधने, उपकरणे वापरतो. त्यांचा दर्जा तपासण्यासाठी कोण कोणती परीक्षणे सहजपणे करता येण्यासारखी आहेत? अशा किमान वीस परिक्षणांची खुलासेवार माहिती द्या.

--
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! मस्त उपक्रम.... आता ही लिंक सर्व मित्रमंडळी व भाच्चे कंपनीला फॉर्वर्ड करते! Happy धन्यवाद.