असेच कांही रहावयाला

Submitted by निशिकांत on 2 February, 2011 - 04:35

बकाल वस्ती विरान घरटे असेच कांही रहावयाला
हजार खड्डे कसे पुरावे ? अपूर्ण स्वप्ने पुरावयाला

दिवा घरी तो जुना पुराना गुलाम आहे परिस्थितीचा
नको नकोसा उजेड त्याला अधीर असतो विझावयाला

उधार जगणे उधार मरणे दिवाळखोरी घरात माझ्या
भुकेस कोंडा, निजेस धोंडा कुठेत स्वप्ने दिसावयाला ?

मते मिळवण्या झुकून येता शकून शुभ तो जनास वाटे
नवीन मृगजळ, विशाल स्वप्ने जनास मिळती बघावयाला

सलाम करण्या उगाच फिरलो उदात्त कोणी कुठे न दिसले
अपार खोटे खराब सिक्के अयोग्य होते पुजावयाला

इमान रस्त्यावरी जळाले खुशीत जल्लोष पाहिला मी
नराधमांना कुरण मिळाले यथेच्छ चारा चरावयाला

कुणी फसवले ? कुणा फसवले ? करोड आले करोड गेले
बनून डॉलर हळूच आले हिशोब अवघड कळावयाला

नका म्हणू मज जुनाट शायर जुनीच दु:खे जुनेच रडणे
पुरून उरले उदास जीवन बसून गजला लिहावयाला

कठोर "निशिकांत" सत्य आहे कुणी न असते कधी कुणाचे
कुडीत तगमग, विरक्त आत्मा अतूर आहे उडावयाला

ता.क. ६वा शेर (इमान रस्त्यावरी---) डे. कलेक्टर श्री. सोनवणे यांना जाळल्याच्या संदर्भात आहे.

निशिकांत देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३
E Mail :- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा

गुलमोहर: 

सुंदर गझल... ओघवती झाली आहे...
अभिनंदन...
यथेश्च म्हणजे? यथेच्छ म्हणायचंय का?

दिवा घरी तो जुना पुराना गुलाम आहे परिस्थितीचा
नको नकोसा उजेड त्याला अधीर असतो विझावयाला

नका म्हणू मज जुनाट शायर जुनीच दु:खे जुनेच रडणे
पुरून उरले उदास जीवन बसून गजला लिहावयाला

हे दोन शेर आवडले Happy

पाटीजी, आनंद यात्री़जी,
धन्यवाद प्रतिसादा बद्दल. आनंदजींनी निदर्शनास आणून दिल्या प्रमाणे चूक दुरुस्त केली आहे.

व्वा... मस्त गझल.. अतिशय ओघवती..

दिवा घरी तो जुना पुराना गुलाम आहे परिस्थितीचा
नको नकोसा उजेड त्याला अधीर असतो विझावयाला

हा विशेष आवडला.. आपण मुरलेले गझलकार दिसता.. Happy