द डे ऑफ जॅकल

Submitted by रंगासेठ on 28 January, 2011 - 11:05

दुसर्‍या महायुध्दाच्या वरवंट्यातून फ्रान्स सावरत असतानाच १९५०-५१ दरम्यान फ्रान्सची वसाहत 'अल्ज्सीर्स' येथे मुक्तीचे वारे बाहायला लागले होते. १९५४-१९६२ या आठ वर्षात अल्जीर्स ने फ्रान्सला गनीमी युध्द्दाने व अहिंसक चळवळीने बेजार केले होते. (संदर्भ : 'बॅटल ऑफ अल्जीर्स') शेवटी या लढ्याचा फ्रान्सवर होणारा परिणाम पाहता , तत्कालीन राष्ट्रपती 'जनरल द गॉल' यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अल्जीर्सला स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले. बहुतांश फ्रेंच नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पण सैन्यातील काही असंतुष्ट आधिकार्‍यांना हा निर्णय पसंत पडला नाही. त्यांच्या मते 'द गॉल' यांनी फ्रान्सशी दगलबाजी केलीय व फ्रेंच नागरिकांचा विश्वासघात केलाय. अशा आधिकार्‍यांनी OAS हा गट स्थापन केला आणि 'द गॉल' यांना देशद्रोही मानून त्यांना शासन म्हणून त्यांची हत्या करायचे ठरवले होते. या सत्यघटनेवर आधारीत संपूर्ण घटनाक्रमाचा वेध 'द डे ऑफ जॅकल' या चित्रपटात घेतलाय.

फ्रेडरिक फोरसीथ यांनी लिहिलेल्या 'द डे ऑफ जॅकल' या कादंबरीवरुन हा चित्रपट घेतलाय. फ्रेड झीनमन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. चित्रपटाची सुरुवात फ्रेंच संसदेत राष्ट्रपती व मंत्र्यांची बैठक सुरु आहे या द्रुश्याने होते. बैठक संपताच एकेक मंत्री परतायला लागतो आणि सर्वात शेवटी स्वतः राष्ट्रपती निघतात. ते स्वतः एका गाडीत मागे आणखी एक गाडी सुरक्षारक्षकांची आणि दोन मोटरसायकलीवरुन एकेक सैनिक एवढ्याच व्यवस्थेवर ते निघतात, कुठलाही डामडौल नाही की सुरक्षेचा डामडौल नाही. गाड्या पॅरीसच्या रस्त्यांवरुन जात असताना एक स्कूटरस्वार हळूहळू त्यांचा पाठलाग करतो. त्याच वेळी काही अंतरावर OASचे काही आक्रमक दबा धरुन बसले असतात. 'द गॉल' यांची गाडी त्यांच्या टप्प्यात येताच अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात होते, पण गाड्या न थांबता पुढे सटकून जातात. केवळ ७ सेकंदात ११४ गोळ्या झाडल्या गेल्या पण चमत्कारिकरित्या कुणीही दगावले नाही, केवळ छोट्या जखमांवर काम भागते. हा हल्ला फसल्यामुळे OAS चे कर्तेधर्ते जिनिव्हात पळून जातात तर या घटनेमागे OAS आहे हे कळाल्यावर फ्रान्स मध्ये जोरदार नाकेबंदी व धरपकड सुरु होते.

हल्ला निष्फळ झाल्याने OAS चे मनोधैर्य खचलेले असते , त्यांची आर्थिक नाकेबंदी व पकडले जाणारे कार्यकर्ते यामुळे संघटना विस्कळीत होते. अशावेळी एखाद्या परदेशी 'काँट्रॅक्ट किलर' ला सुपारी देऊन 'द गॉल' यांची हत्या करण्याचे OAS ठरवते. बर्‍याच शोधानंतर त्यांना हवी असलेली व्यक्ती मिळते व त्याच्यासह जिनिव्हात एक गुप्त बैठक केली जाते. बर्‍याच घासाघीशीनंतर अर्धा मिलियन पौंड आणि त्याच्या मर्जीने आणी योजनेने काम करण्याच्या अटीवर ती व्यक्ती काम स्वीकारते. ही व्यक्ती म्हणजेच 'जॅकल'. योजनेनुसार जॅकल आपल्या कामाला सुरुवात करतो. तर त्याला देण्याची रक्कम गोळा करण्यासाठी OAS बॅंका, दागिन्यांची दुकाने लुटायला सुरुवात करते. या लुटालिटीने हैराण होऊन पोलीस माग काढायला सुरुवात करतात. संशयाची सुई अर्थातच OAS कडे वळते. आणि गुप्तहेरांच्या मदतीने OAS प्रमुखांचा ठावठिकाणा लागतो. ते तिघे रोममध्ये एका हॉटेलात राहत असतात. त्यांची स्वतःची अशी कडक सुरक्षाव्यवस्था असते, पण त्यांच्यातील एकच माणूस आत-बाहेर येजा करत असतो, त्याच्याव पाळत ठेवून फ्रान्सचे पोलीसखाते त्याला इटलीतून पळवून पॅरिस येथे आणते व त्याच्च्याकडून काही माहिती मिळते का याचा प्रय्त्न केला जातो. त्याच्याकडून फक्त 'जॅकल' हे नाव कळते.

आत्ता मधल्या काळात १४ जुलैला जॅकल फ्रान्समध्ये दाखल होतो. अर्थातच पासपोर्ट नकली असतो. ओळखीने एक स्नायपर बंदुका बनवण्यात तज्ञ अशा व्यक्तीकडे , या कार्यासाठी आवश्यक असणारी बंदुक बनवण्याची ऑर्डर देतो तर एका भुरट्या चोराकडून बनावट फ्रेंच कागदपत्रे तयार करुन घेतो. इकडे फ्रेंच मंत्रीमंडळाची आणिबाणीची बैठक भरते व त्यात कमिशनर 'क्लॉडी लीबल' यास जॅकल यास पकडण्यास पाचारण करण्यात येते व त्याला विशेष आधिकारही दिले जातात. मग सुरु होतो चोर-पोलीसाचा खेळ, कमिशनर लीबल दररोज धावपळ करत, परदेशातील पोलीस खात्यांशी सुसंवाद राखत जॅकल कोण आहे याचा शोध सुरु करतो तर ;जॅकल' आपल्या वाटेत येणारे अडथळे दूर करत हल्ल्ल्याच्या तयारीला लागतो. शेवटी जॅकलला शोधण्यात पोलिसांना यश येते का अथवा जॅकल त्याच्या कामात यशस्वी होतो का हा पुढचा घटनाक्रम प्रत्यक्ष पाहणेच उत्तम.

या चित्रपटात आवडलेल्या गोष्टी म्हणजे १९६२-६३ काळातील फ्रान्सचे दर्शन, कलाकारांची कामे, पटकथा, दिग्दर्शकाने शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंगवत ठेवणे, उत्कंठावर्धक शेवट इ.इ. कमिशनर लिबेल ८ -९ दिवस जवळपास न झोपता जेव्हा १०व्या दिवशी घरी झोपलेला असतो आणि त्याची पत्नी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हाची त्याची गाढ झोप, जॅकल एका लंगड्या म्हातार्‍याचे सोंग करुन एका इमारतीत घुसतो आणि बांधून ठेवलेला पाय मोकळा केल्यानंतर त्याच्या पायाला आलेल्या मुंग्या आणि काही क्षण चालताना झालेला त्रास, बंदुकीचे डिटेलिंग आणी ती बंदूक लपवण्यासाठी केलेली क्लृप्ती, जेव्हा पोलीसांना कळते की हा खरा कोण आहे तेव्हा बचावण्यासाठी वापरलेली शक्कल लाजवाब. एखादा काँट्रॅक्ट किलर आपल्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी जी तयारी करतो जसे की 'लोकेशन स्काउटिंग' (स्थळ दौरा), हत्याराची निवड आणी त्याचे परिक्षण, स्वता:चे बनावट नाव सिध्द करण्यासाठी बाळगली जाणारी कागदपत्रे तसेच संकटकाळातून बचावण्यासण्यासाठी सदैव तयार असणारा 'प्लॅन बी' या चित्रपटात मस्त दाखवलयं. तर सर्व यंत्रणा पणाला लावून एखाद्याचा शोध घेणे, त्यासाठी करावी लागणारी अविरत धावपळ, अविश्रांत मेहेनत, योग्य वेळी योग्य माहिती न मिळाल्याबद्दल तसेच वेळोवेळी जॅकलने दिलेल्या चकव्यामुळे पोलीसांची झालेली चरफड व त्रागा अतिशय उत्तम दाखवलयं.

कादंबरी वाचली नसेल आणि या सत्य घटनेबद्दल विशेष माहिती नसेल तर हा चित्रपट अवश्य बघा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगासेठ, मस्त वर्णन. पुस्तक आणि चित्रपट दोन्हीबद्दल खूप ऐकलेले आहे - आता पाहतो हा चित्रपट. साधारण अशाच कथेवर ब्रूस विलीस चा "द जॅकल" आला होता. तो बरा होता. पण त्याच्या रिव्यूज मधे सर्वांनी या मूळ चित्रपटापेक्षा बराच फिका आहे लिहीले होते.

द डे ऑफ जॅकल अत्यन्त नयनमनोहर चित्रपट आहे. या चित्रपटाला अजिबात संगीत नाही . शेवटचे १०-१२ मिनिटे डायलॉग नाहीत. घड्याळाचे ३१ इन्सर्ट शॉट्स आहेत (आयेम्डीबी)

रंगाशेठ सिनेमाच्या परीक्षणाबद्दल धन्यवाद. इतके सुंदर परीक्षण लिहीलय की लगेच बघावासा वाटला. मी नेटफ्लिक्सच्या यादीत टाकलाय माझ्या.

मी द डे ऑफ जॅकल ही कादंबरी वाचलेली. एकदम खिळवुन ठेवणारे कथानक आहे. संपल्याशिवाय खाली ठेववतच नाही. चित्रपट पाहिला पण दुर्दैवाने विसीडी मध्ये खुप कट होते त्यामुळे लिंकच लागेना आणि म्हणुन चित्रपट फसला असे माझे मत झालेले. इथले परिक्षण वाचुन आता कुठे मिळाला तर पाहावेसे वाटायला लागले Happy

अतिशय सुर्रेख परीक्षण - काय जबरदस्त घेतलाय हा सिनेमा - शेवटपर्यंत खिळवून ठेवतो ....

कथानक, मांडणी, अभिनय इतके सारे जमून क्वचितच येते असे माझे मत ...

वन ऑफ माय मोस्ट फेवरिट मूवी ....

चित्रपट बघीतलेला नाही पण विसेक वर्षापूर्वी कादंबरी नक्की वाचली आहे. कर्लोस द जॅकल- रॅमीरेझ सँचेझ Happy कथानक जबरदस्त आहे. जेसन बोर्नच्या एका चित्रपटात हाच जॅकल येतो अशी मला शंका आहे. Proud

चित्रपट शोधुन बघायला हवा.

अरे, हा धागा नजरेतून निसटलाच होता की!
माझ्या सार्वकालिक आवडत्या थ्रिलर्समधलं एकदम वरती असलेलं पुस्तक. फॅक्ट आणि फिक्शनचं इतकं बेमालूम सत्य वाटणारं मिश्रण करून लिहिणे एक तो फोर्सिथच जाणे. अफाट कादंबरी आहे. त्यामानाने (साहजिकच) सिनेमा थोडा उणा आहे. विशेषतः शेवटची वेषांतरे कमी केली आहेत. पण एडवर्ड फॉक्स अफलातून आहे जॅकल म्हणून (हा म्हणजे गांधी सिनेमातला जनरल डायर)

कांदेपोहे - तू नक्की कुठलं पुस्तक वाचलं आहेस? रामिरेझ सॅन्चेझ वर नाहीये हे पुस्तक. खरंतर या पुस्तकावरून त्याला हे जॅकल नाव मिळालं. बोर्न आयडेन्टीटी त येणारा जॅकल हा रामिरेझ सॅन्चेझ असावा. त्याचा फोर्सिथच्या जॅकलशी काही संबंध नाही.

एडवर्ड फॉक्सने दाखविलेला जॅकलचा थंडपणा....प्रत्येक प्रसंगात...अशी ती व्यक्तिरेखा उभी करतो की ज्या कामासाठी त्याने होकार दिला आहे ते काम तो पूर्ण करणारच. रस्त्यावरून चालणे, दुकानातील विक्रेती मुलीशी हसत बोलणे, चेक नाक्यावर बॅग्ज तपासायला मागितल्यानंतर त्या शांतपणे देणे, ब्रिटिश लायब्ररीतून संबंधित कागदपत्रे पाहात बसणे, नोट्स काढणे, घेतलेल्या कामासाठी विशेषकाकडून हवी तशी बंदूक तयार करून घेणे, ती तपासत असताना त्या तंत्रज्ञाचे अगत्याने कौतुक करणे, अतिशहाणपणा दाखविणार्‍या फोटोग्राफरला एका क्षणात यमसदनाला पाठविणे.....इत्यादी दृश्ये एकापाठोपाठ एक नजरेसमोर आणली म्हणजे कळून चुकते की जॅकलचे मुख्य काम आणि ते करताना कायम ठेवायचा सहज वावर याची सांगड या गुणी अभिनेत्याने किती वेधकपणे घातली आहे....

....शिवाय प्रवासादरम्यान ग्रासे हॉटेलच्या लाऊंजमध्ये कॉफीपानाच्यासमयी भेट्लेल्या कॉलेट्टी या उमराव दर्जाच्या स्त्री समवेत एका रात्रीपुरते जुळलेले प्रेमसंबंध....आणि अत्यंत अपरिहार्यता आल्यामुळे तितक्याच थंडगारपणे तिच्या वाड्यावर येऊन तिचा त्याने दाबलेला गळा.....हे सारे पाहाताना नकळत अंगावर शहारे येतात.

डे ऑफ द जॅकल.....सर्वार्थाने जॅकलचा हा चित्रपट आणि कादंबरीदेखील...४२ वर्षे होऊन गेली चित्रपटाला, पण आजही प्रत्येक फ्रेम जशीच्यातशी डोळ्यासमोर येते....आठवणीमुळे.

ही कादंबरी वाचली होती पण त्यावर सिनेमा आहे हे माहिती नव्हतं.. सिनेमा बघणारच आता हा. रंगासेठ धन्स ह्या रिव्हिवु बद्दल..

शशांक जी....

खुद्द माझ्याही वाचनातून रंगासेठ यांचा हा देखणा लेख हुकलाच होता. परवा अचानकच समोर आला आणि अगदी अधाशाप्रमाणे वाचत गेलो. वर म्हटल्याप्रमाणे ४०+ वर्षे होऊन गेल्यावरसुद्धा आपण पुन्हा "जॅकल" पाठोपाठ गेलो तर प्रत्येक क्षणी तो थरार पुनश्च अनुभवता येतो. ही करामत आहे जितकी फ्रेडरिक फोर्सिथची तितकीच दिग्दर्शक फ्रेड झिनेमन याच्या कल्पकतेची (१९५२ च्या हाय नून चित्रपटापासून हे नाव पक्के वसले आहे मनी)....त्यातही चित्रिकरणासाठी निवडलेल्या स्थळांसाठीही दिग्दर्शकाला जादाचे गुण द्यावे लागतील. अगदी दोनचार मिनिटे काम असलेल्या प्रत्येक कलाकाराकडून त्यानी असे काही काम करवून घेतले आहे की ते कलाकार जणू काही ती भूमिका जगतच आहेत.....द गॉल यांच्या व्यक्तिमत्वाला साजेल असाच कलाकार शोधण्यामागील त्यांचे प्रयत्न किती सुयोग्य आहेत ते पडद्यावर पाहाताना लक्षात येतेच.