राख होऊन मेला : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 30 January, 2011 - 09:57

राख होऊन मेला : नागपुरी तडका

हप्ता थकला म्हूनशान, वसुलीले गेला
हप्ता गेला भाडमंधी, राख होऊन मेला ....॥१॥

पंचीस पेट्या महिनेवारी, सेटींग जमून व्हते
तारखेवार भेटेस्तोवर, काईबी प्राब्लेम नोते
कायच्यातबी काईबी मिसळा, देल्ली व्हती हमी
साधेसिधे समिकरन; अर्धे तुमी, अर्धे आमी
हप्त्यापायी जीव जाईन, माहित नोयतं त्येला ....॥२॥

महिना उलटून गेला बैन, हप्ता नाई आला
मंग जीव सायबाचा, कालवाकालव झाला
सायेब म्हने श्याम्या तुह्या, मनात बद्दी आली?
हप्ता नाय तं धंदा नाय, कायढीन तुह्या साली
हप्त्यासाठी सांग तुनं, उशीर काहून केला? ....॥३॥

श्याम्या म्हणे उशिर कारन, मेली माही बायकू
सायेब म्हने, तुह्या बाह्यना, मी कायले आयकू?
माय मरन, पोट्टं मरन, उद्या मरन तुहा भाऊ
आमी किती दिवस मंग असे, हप्त्याबिना राहू?
एकटा मीच खात नाय, वर्तून आडर आला ....॥४॥

"पोट्टं मरन" म्हनल्यावर, झकापकी झाली
तळपायाची आग मंग, मस्तकात गेली
गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागला
अध्धर उचलून सायबाले, भट्टीमंधी फ़ेकला
कोनी अभय ह्यो देस, भलतीकडं नेला?
हप्ता गेला भाडमंधी, भट्टीमंधी मेला ....॥५॥

गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------
भाड = भट्टी, लोहाराचा भाता
पेट्या = दोन नंबरच्या आर्थिक व्यवहारात पेटी म्हणजे लक्ष व खोका म्हणजे कोटी
बाह्यना = बहाणा, खोटी सबब
अध्धर = हवेत अधांतरी
--------------------------------------------------------------------------
@ ही केवळ कविता आहे. या कल्पनाविलासाला कसलेच संदर्भ नाहीत.
--------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

Thanks

मस्त
हे कोनी बोलत नाही
एक ईमानदार पोलिस एका गुंडा कडुन जाळला हेच लिहीतात

मी पहीले बातमी वाचली तेव्हा हाच विचार आला
ईतका सराईत व मुरले ला पोपट असे का करेल????
Something else pushed him over the Edge. What does he care about raids etc etc Ha Ha....

ह्या कविते ला संदर्भ नाही, असे म्हणताच येणार नाही मुटे जी. प्रखरतेने लिहिले आहे तुम्ही. खूप आवड्ले.. मी सध्या कविता ह्या विषया चा विद्यार्थिच आहे...त्या मुळे अजुनच आवड्ली ही कविता.. नवीन काही जे कुठ्ल्याही पुस्तकात वाचवयास मिळणार नाहे असे. - अभारी आहे.

खूप वास्तव. आणि एकदम झकास जमलीय.

पंचीस पेट्या महिनेवारी, सेटींग जमून व्हते
तारखेवार भेटेस्तोवर, काईबी प्राब्लेम नोते
कायच्यातबी काईबी मिसळा, देल्ली व्हती हमी
साधेसिधे समिकरन; अर्धे तुमी, अर्धे आमी
हप्त्यापायी जीव जाईन, माहित नोयतं त्येला ....॥२॥

खूपच छान ...!!

मूटेजी कविता चांगली आहे
परंतु त्या व्यक्तीची २ री बाजु पहायला पाहिजे होती
दोन्ही बाजु मांडुन कविता उत्तम वाटली असती
व्यक्ती प्रामाणिक नव्हती हे आपण एकदम सांगु शकत नाही

पड्द्यामागे असेहि काही असु शकते आश्चर्य वाट्ते
कदाचित खरेहि असेल
बाकी कविता वास्तववादी आणि एकदम झकास.
चालु ठेवा........

परंतु त्या व्यक्तीची २ री बाजु पहायला पाहिजे होती

या कवितेच्या नायकाची/खलनायकाची "दुसरी बाजू" सर्वांनाच माहीत आहे. बालवाडी पासून विद्यापिठापर्यंत हेच शिकविले जाते,
पण मी जी बाजू लिहिण्याचा प्रयत्न केलाय त्याचे शिक्षण मला तरी कॉलेज/विद्यापिठातून नव्हे तर अनुभवातून मिळाले आहे.

व्यक्ती प्रामाणिक नव्हती हे आपण एकदम सांगु शकत नाही

आपण सांगू शकत नसलो तरी परिस्थितीजन्य पुरावे लपून राहत नाहीत आणि आपण नाही म्हणाल्याने वास्तव बदलत नाही.
त्यामुळे आता आपण वास्तव स्विकारले पाहिजे.

राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराचा नेहमीच गलबला होतो.
पण प्रशासकिय व्यवस्थाही एवढी किडली आहे की ते आता प्राणवायुशिवाय जगेल पण भ्रष्टाचाराशिवाय ते जगूच शकत नाही.
प्रशासनामध्ये स्वच्छ आर्थिक चारीत्र्याचा माणूस हजारामध्ये एखादाचं.
एवढा रोग बळावला आहे.

गंगाधर , एकदम सही लिहीलेस .
सुरुवातीला ती बातमी वाचतांना माझे मनात विचार आलेला की प्रशासनात बरेच खैरनार तयार झाले की काय Happy ,

प्रशासनात बरेच खैरनार तयार झाले की काय

टी एन शेषन किंवा खैरनार यांनी राजकारण्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न केलेत. हे प्रयत्न त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांना यश मिळाले नाही आणि राजकारणीही वठणीवर आले नाहीत.
फक्त टी एन शेषन किंवा खैरनार यांच्यासारख्यांना प्रसिद्धीचे वलय तेवढे लाभले.

त्याऐवजी टी एन शेषन किंवा खैरनार यांनी राजकारण्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात शक्ती वाया घालवण्याऐवजी प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न केले असते तर त्यांना नक्कीच काही प्रमाणात तरी अवश्य यश लाभले असते.