आहाराने रोग हरा !

Submitted by नरेंद्र गोळे on 29 January, 2011 - 22:55

प्रस्तावना: वयपरत्वे येणार्‍या अवनतीकारक रोगांची आणि त्याच्या उपायांचीही अवस्था 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी आहे. आज ना त्या रोगांविषयी पुरेशी जाग आहे, ना त्यांवरील उपायांविषयी. मात्र त्यांचा मुकाबला करण्याकरता 'सम्यक जीवनशैली परिवर्तना’ची आवश्यकता भासते. याचा अर्थ काय आहे ते समजून, ह्या लेखाच्या आधारे 'सम्यक जीवनशैली परिवर्तनास' सामान्यजनांनी सिद्ध व्हावे, कर्मठपणे ते आचरावे आणि हृदयरोगच नव्हे तर इतरही अवनतीकारक रोगांना आपल्यापासून दूरच ठेवण्यात यश मिळवावे अशी माझी अपेक्षा आहे. सम्यक जीवन शैली अंतर्गत ’आहार’ या घटकाचा विचार या लेखात करायचा आहे. ह्या लेखनाचा आपल्या सार्‍यांच्याच आरोग्यस्थितीवर सत्‌प्रभाव पडू शकेल तेंव्हाच ते यशस्वी झाले असे समजता येईल.

योग्य आहाराचे महत्त्व: असे म्हणतात की आहाराने रोग हरा. हे खरेच आहे. कुठल्याही वयपरत्वे येणार्‍या अवनतीकारक विकाराकरता हे लागू आहे. आहाराने केवळ रोगहरणच साधते असे नसून रोगप्रतिबंधनही अवश्य साधते. मात्र आहारात स्थायी स्वरुपाचे बदल केल्यास, त्या बदलांचा शरीरप्रकृतीवर परिणाम दिसून येण्यास किमान तीन सप्ताहांचा कालावधी लागतो, असे आढळून आले आहे. कुठले बदल करावेत हा अभ्यासावर आधारित तज्ञ सल्ल्याचा भाग आहे.

ह्यामुळे, ज्यांची शारीरिक अवस्था तीन सप्ताहांपर्यंत कुठलाही धोका न पत्करता टिकाव धरू शकेल अशी असेल, त्यांनी आहाराने रोगाचे हरण करणे तत्त्वतः शक्य आहे. मात्र वर्तमान रोगाच्या अवस्थेमुळे ज्यांना तीन सप्ताहांच्या आतच लक्षणीय धोका संभवतो, त्यांनी वेळीच औषधे वा शस्त्रक्रियांचा आधार वैद्यकीय सल्ल्यानुरूप घ्यावा हेच योग्य. हृदयविकाराच्या बाबतीत, हृदयाघात, पक्षाघात, मूत्रपिंडदोष, दृष्टिदोष इत्यादींचे धोके विनाऔषध व विना शस्त्रक्रिया अनावर होऊ शकतात. मात्र, औषधे वा शस्त्रक्रियांच्या आधारे धोका टाळण्यात यशस्वी होता आले, तरीही रोगनिवारण होतेच असे नाही. रोगनिवारणाचा अंतिम इलाज आहार हाच असतो.

त्यामुळे औषधे वा शस्त्रक्रियांच्या आधारे धोका टाळण्यात यशस्वी झाल्यावरही आणि रोगाची अवस्था गंभीर नसल्याने त्वरित औषधे वा शस्त्रक्रियेची गरज न भासल्यावरही, आहार हाच रोगनिवारण आणि प्रतिबंधाचा रामबाण उपाय बाकी उरत असतो. हे एकदा मान्य केल्यावर सम्यक जीवनशैलीगत परिवर्तनांचा स्वीकार करण्याचा निर्णय घेता येतो. असे केल्यास त्याअंतर्गत आहार कसा असावा हा विषय इथे बघायचा आहे.

आहारातील रंजक द्रव्यांची कळीची भूमिका: जे द्रव्य काळ्यापांढर्‍या पृष्ठभूमीवर रंग चढवते त्यास रंजक द्रव्य म्हणतात. आहारातील पदार्थ जितके रंगीत असतील तेवढेच ते जास्त संजीवक असतात.

रक्तरंजक द्रव्य (हेमोग्लोबिन) रक्तास लाल रंग देते. त्यामुळे रक्ताची प्राणवायूधारणक्षमता वाढते. लाल रक्तातून, रक्ताभिसरणादरम्यान, जास्त प्राणवायू बारीक बारीक केशवाहिन्यांच्या महाजालाद्वारे शरीराच्या कानाकोपर्‍यात पोहोचवला जाऊन, चयापचय शक्तीत वाढ होते. शरीरास उत्साह मिळतो. जीवनशक्ती वधारते. शरीरातून अपानवायू (कर्ब-द्वि-प्राणिल, उच्छवास) फुफ्फुसात पोहोचविण्याचे कामही रक्तरंजकद्रव्यच करत असते. याशिवाय रक्तरंजकद्रव्य, प्रतिप्राणिलीकारक (अँटिऑक्सिडन्ट) म्हणूनही कार्य करत असते. त्यायोगे ते पेशीविनाशक प्राणिलीकारकांपासून शरीराची मुक्तता करते. या सर्व कारणांमुळे शरीरातील रक्तरंजकद्रव्याचे प्रमाण वर्धिष्णू असायला हवे, हे उघड सत्य आहे. पालक, खजूर, जर्दाळू इत्यादींच्या नियमित सेवनाने रक्तरंजकद्रव्यात वाढ होते.

पीतरंजक द्रव्य (कॅरोटिन) पिवळ्या रंगाचे असते. रताळे (विदर्भाकडचे रताळे पांढरे असते, ते नव्हे), गाजर, भेद्रं (टोमॅटो) इत्यादी पदार्थांच्या सेवनाने ते शरीरास प्राप्त होते. यात जीवनसत्त्वे असतात, जी शरीराच्या पोषणात मोलाची भर घालतात. प्रकाशातील ऊर्जा अन्नात साठवण्याकरता या द्रव्यांचा उपयोग होतो. कोळंबीतील पीतरंजक द्रव्याच्या सेवनाने पांडवपक्षी गुलाबी होतात.

हरितरंजक द्रव्य (क्लोरोफिल) म्हणजेच हिरव्या भाजीपाल्यातील हिरवाई. हिच्याच आधारे वनस्पती जीवनावश्यक अन्नद्रव्यांचे उत्पादन करतात. कर्ब-द्वि-प्राणिलाच्या प्रकाश-संश्लेषणाद्वारे हरितरंजकद्रव्य, वनस्पतींचे अन्न तयार करत असते. यामुळे वातावरणातील कर्ब-द्वि-प्राणिलाचे प्रदूषण घटते, सौर ऊर्जेचा उत्तम उपयोग होऊन वनस्पतींच्या व पर्यायाने मानवजातीच्या अन्नपदार्थांची निर्मिती होत असते. अशा या सर्वगुणसंपन्न हरितरंजकद्रव्याच्या सेवनाने मनुष्यास जीवनसत्त्वांचा लाभ होतो. पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषाक्त द्रव्यांचा व्यवस्थित निचरा होऊ शकतो. सर्व प्रकारचा हिरवा भाजी-पाला (घास-फूस), हिरव्या वनस्पती इत्यादींतून आपल्याला हरितरंजकद्रव्य मिळू शकते.

जिवंत, कच्च्या आणि अजिबात प्रक्रिया न केलेल्या अन्नपदार्थांचे महत्त्व: जिवंत (ताज्या) अन्नपदार्थांत जीवनसत्त्वे असतात. शिळ्या, सुकलेल्या, सडलेल्या अन्नपदार्थांतील जीवनसत्त्वे नाहीशी झालेली असतात. त्यामुळे आहारात ताज्या अन्नपदार्थांना अतोनात महत्त्व आहे. चवीच्या शोधात मनुष्य कच्च्या अन्नपदार्थांना तापवतो, या प्रक्रियेत जीवनसत्त्वांचा र्‍हास होतो. कच्च्या अन्नपदार्थांना, स्वच्छ करणे, दळणे, उकडणे, शिजवणे, तापवणे, भाजणे या सर्व प्रक्रियांतून जावे लागते. दरम्यान त्यांच्यातील जीवनसत्त्वे कमी होत जाऊन ते शरीरास अपायकारक होत जातात. म्हणून ताज्या, ओल्या (न सुकवलेल्या) अन्नपदार्थांवर शक्य झाल्यास कुठलीही प्रक्रिया न करता त्यांचे सेवन केल्यास अन्नपदार्थातील जास्तीत जास्त पोषणमूल्ये शाबूत राहून त्यांचा शरीरास उपयोग होतो.

अशा ताज्या पदार्थांत रसनारंजनाखातर, स्वाद-वधारक असे मानवनिर्मित संहत पदार्थ मिसळवले जातात. ते आहेत तिखट, मीठ, तेल, तूप, साखर इत्यादी. ही सर्व संहते मानवनिर्मित आहेत. त्यांच्या सेवनार्थ मानवी शरीराची घडण झालेली नाही. म्हणूनच, ते पचायला अवघड, आणि शारीरिक चयापचयावर विपरित परिणाम करणारे असतात. शक्य झाल्यास त्यांचे सेवन पूर्णतः बंद करायला हवे. वस्तुतः केवळ स्वादाखातर वापरले तरीही त्यांचे प्रमाण एकूण अन्नसेवनाच्या किरकोळ प्रमाणात राहायला हवे. मात्र तसे होत नाही. स्वादनिर्मितीकरता निर्माण केलेले पदार्थ मूळ अन्नऐवज म्हणून वापरण्याकडे माणसांचा कल होत जातो. त्यामुळे अवनतीकारक रोगांचे फावते.

माणसाला उपजीविकेकरता, त्याच्या वजनाच्या सुमारे २.५% अन्नपदार्थ, दररोज सेवन करावे लागतात. त्यातील किती अंश आज आपण अशा मानवनिर्मित संहत पदार्थांनीच केवळ पुरवतो, याचा विचार ज्याचा त्यानेच करावा. दरमहा माणशी सहा किलो तांदूळ खरेदी करणारे कुटुंब आज दरमहा माणशी किमान दोन किलो गूळ-साखर इत्यादी खरेदी करते. एकूण अन्नसेवनाच्या जास्तीत जास्त ०.२५% असू शकतील, अशा संहत पदार्थांचे प्रत्यक्षातील सेवन ०.८% हूनही जास्त झालेले आहे. हे झाले गूळ-साखरेबाबत. तेल-तूप-तिखट-मीठ यांचे प्रमाणही बेदखल वाढतच आहे.

माणसाचा नैसर्गिक आहार काय आहे?: मुळात माणसाचा नैसर्गिक आहार काय आहे, काय असावा, ह्याची अनेक उत्तरे संभवतात. दगड, काच, पत्रा यांसारखे असेंद्रीय, टिकाऊ पदार्थ कुणीच अन्नपदार्थ म्हणून वापरत नाही. तरीही अनेकविध क्षार, खनिजे आणि धातुंची संयुगे मानवी जीवनास आवश्यक ठरतात. हे सारेच असेंद्रिय पदार्थांत मोडतात. सेंद्रीय, नाशिवंत अन्नपदार्थ, नाश होण्यापूर्वीच सेवन करणे हा माणसाचा खरा आहार होय. सेंद्रीय अन्नपदार्थांत सजीव आणि निर्जीव दोन्हीही पदार्थ असतात. सजीवांमध्ये वनस्पती आणि प्राणी दोन्ही येतात. मात्र माणसाची शरीररचना वनस्पतिजन्य आहाराकरता घडलेली असल्याने, माणसाने प्राणिजन्य आहार घेणे अनैसर्गिक व म्हणूनच अपथ्यकर ठरते. तेव्हा माणसाने वनस्पतिजन्य आहार, शक्यतोवर वनस्पतीच्या मुळावेगळा करण्याच्या वेळेपासून लवकरात लवकर, मुळीच प्रक्रिया न करता अथवा कमीत कमी प्रक्रिया करून सेवन करावा. निर्जीव पदार्थांत पाण्याचा समावेश होतो. मानवी शरीरातील बहुतांश हिस्सा पाण्याने व्यापलेला असल्याने, त्याच्या भरण-पोषण आणि चयापचयाकरता पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आरोग्यपूर्ण आणि स्वस्थ जीवनाकरता, दिवसाला किमान दीड लिटर पाणी प्रत्येकाने सेवन करावे असे सांगितले जाते. विशेषतः थंडीच्या दिवसांत पाण्याचे सेवन खूप घटत असते. तेव्हा ही काळजी घेणे जास्त महत्त्वाचे ठरते.

प्रक्रियाकृत अन्नपदार्थ: प्रक्रिया दोन कारणांनी केल्या जातात. चव वाढविण्यासाठी आणि अन्नपदार्थ टिकविण्यासाठी. दोन्हीही कारणांनी लागणार्‍या मीठ, साखर, संरक्षके (प्रिझर्वेटिव्हज) इत्यादी पदार्थांची त्यात भरच केली जाते. अशी भर करणे आरोग्यास खरोखरीच अपायकारक असते. माणसाने नाशिवंत पदार्थ विनाश पावण्याआधीच सेवन करून उपजीविका चालविल्यास सर्वात अधिक आयुरारोग्य लाभू शकेल.

माणसाने जिव्हालौल्याखातर रस, अर्क, आसवे, अरिष्टे व इतर संहत पदार्थ (तेल, तूप, साखर, मीठ इत्यादी) मुबलक प्रमाणात सेवन करण्याची प्रथा पाडली आहे. कायम संहत पदार्थांचे सेवन अनारोग्यकारक ठरते. त्यांचा त्याग करण्यासाठी मनाची तयारी करावी. बहुतांश नैसर्गिक अन्नपदार्थ स्वभावाने गोड लागतात. मात्र, कायम संहत पदार्थांचे सेवन करण्याच्या प्रथेमुळे निसर्गात सापडणारे अनेक सकस पदार्थही आपल्याला गोड लागेनासे झालेले आहेत. आपण आमरसातही साखर घालतो. केळ्यातही साखर घालतो. साखरेचा अनिर्बंध वापर आजच्या जीवनशैलीतील मूलभूत समस्या आहे. बैठ्या जीवनशैलीत, भरपूर साखर पचवून तिचे सममूल्य ऊर्जेत रुपांतर करण्याची क्षमता राहत नाही. म्हणून साखरेचा वापर शक्य झाल्यास बंद करावा. निदान कमीत कमी तरी अवश्य करावा. 'मला मधुमेह आहे काय?' हा प्रश्न विचारू नये. शरीर वापरू न शकलेली आणि शरीरातून काढूनही टाकता न आलेली साखर, शरीर मेदात रूपांतरित करून शरीरात साठवत जाते.

कोलेस्टेरॉलचे कर्तव्य: शरीराच्या बाह्य जखमा बुजविण्याकरता शरीर, रक्त साखळण्याची प्रक्रिया वापरते. त्याचप्रमाणे अंतर्गत जखमा बुजविण्याकरता, शरीर मेदाचा (कोलेस्टेरॉलचा) उपयोग करीत असते. हृदयधमन्यांतील जखमा भरून येण्यासाठी वापरला जाणारा मेद, जेव्हा मुबलक प्रमाणात रक्तात उपलब्ध असतो, तेव्हा हृदयधमनीस आतून पुटे चढतात. अशाच पद्धतीने रक्तात उतरणारे अतिरिक्त (खरे तर हाडांतील) कॅल्शियम, अशी पुटे कठीण करते. ही प्रक्रिया मानसिक तणावाच्या अवस्थेमुळे गती प्राप्त करते. त्यामुळे धमनीकाठिण्य येते. हृदयधमनीचा अवरोध होतो, आणि हृदयाघाताचा धोका निर्माण होतो. शरीरातील ७५ टक्के कोलेस्टेरॉल शरीरनिर्मित असते. शरीर ते साखरेपासून निर्माण करू शकते. ही प्रक्रिया मानसिक तणावाच्या अवस्थेमुळे गती प्राप्त करते.

[कोलेस्टेरॉल तीन प्रकारचे असते. चांगले (सघन), वाईट (हलके) आणि ओंगळ (हे सूक्ष्मदर्शकाखाली ओंगळ दिसते). ओंगळ कोलेस्टेरॉल म्हणजे ट्राय-ग्लिसेराईड. हे आपले शरीरच तयार करत असते. याकरता कच्चा माल म्हणजे साखर आणि उत्प्रेरक म्हणजे मानसिक तणाव. रक्ताच्या लिपिड-रूपरेषेत ह्याचा आकडा पाहावा. मग नियंत्रणाची गरज लक्षात येईल.]

स्निग्धसेवनात किती घट केल्यास उपयोगी ठरू शकते?: तेल, तूप, लोणी, चीज इत्यादींचे आजकालच्या आहारातील अपरिमित परिमाण, केवळ अनारोग्यकारकच राहिलेले नाही, तर विनाशक पातळ्यांपर्यंत पोहोचलेले आहे. हृदयधमनीविकार आणि कोलेस्टेरॉल यांचा अन्योन्य संबंध प्रस्थापित झाल्यापासून कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, या पदार्थांचा वापर कमीत कमी करण्याकडे कल असतो. मात्र संशोधनात असे सिद्ध झालेले आहे की केवळ मेदाद्वारे बव्हंशी ऊर्जा मिळविणार्‍या लोकांनी, जरी मेदाद्वारे मिळणार्‍या ऊर्जेत ३० टक्केपर्यंत घट घडविली तरीही, आधीच विकारग्रस्त झालेल्यांना ते मुळीच पुरेसे ठरत नाही. हृदयधमनीतील काठिण्याची माघार घडवून आणण्यासाठी मेदाद्वारे मिळणार्‍या ऊर्जेत ३ टक्केपर्यंत घट घडवावी लागते. याकरता आपण आपली सारी ऊर्जा प्रथिनांद्वारे मिळविणे उत्तम, कर्बोदकांद्वारे मिळविल्यास शरीरातील साखर व म्हणून पुढे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका उरतोच. मात्र, मेदाद्वारे ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्नही करू नये. अर्थातच हे सर्व पदार्थ शक्यतोवर पूर्णतः बंद करावेत.

असे म्हणायचाच अवकाश की काही लोक म्हणतात की यंत्रेसुद्धा वंगणाविना चालत नाहीत मग शरीरे कशी चालतील? तुम्ही तेल, तूप यांच्याशी फारकत घ्याल आणि मग सांधेदुखीशी झगडत बसाल! ह्यात मुळीच तथ्य नाही. गाय गवत खाऊन दुध, तूप निर्माण करते. आपल्याही शरीरात स्वतःला लागणारे सारे पदार्थ नैसर्गिक अन्नांतून निर्माण करण्याची उपजत क्षमता असते. ती जर आपण गमावून बसलो तर मात्र आपली धडगत राहत नाही.

माझी ऍन्जिओप्लास्टी झालेली असल्यामुळे मला दोन चमचे (१० ग्रॅम) स्निग्ध पदार्थ दोन चमचे साखर आणि दोन चमचे मीठ दिवसाकाठी चालवून घेतल्या जाईल असा उःशापही मिळालेला होता. पण मूळ शापाप्रमाणे, सतत तीन सप्ताहांपर्यंत निष्तेल, निष्तूप, निर्मीठ (सार्‍याच जणांना हे आवश्यक असतेच असे नाही) आणि निर्साखर राहिल्यास हृदयधमनीविकाराची पिछेहाट निःसंशय सुरू होते. वजन कमी होऊ लागते. हा स्वानुभव आहे. कुठले पदार्थ खावेत ते 'हृदयविकार निवारण- शुभदा गोगटे' ह्या मेहता प्रकाशनाच्या पुस्तकात भारतीय पाकक्रियांसकट सविस्तर दिलेले आहेच. मात्र तसे का खावे ह्याची मीमांसा इथे दिलेली आहे.

मग खायचे काय?: आता प्रश्न हे उद्‌भवतात की, “मग खायचे काय? आणि हे काही खायला मिळणार नसेल तर जगायचे कसे?” फारच सोपे आहे. निसर्गतः त्याशिवायच जगायचे असते. मागे एकदा सरकारी कर्मचार्‍यांचा संप होता. 'वर्क टु रूल!' आता 'नियमाप्रमाणे काम करणे' म्हणजे जर संप होऊ शकत असेल तर नक्कीच नियमांमध्ये काहीतरी गोची आहे असे होत नाही का? तसेच 'निष्तेल, निष्तूप, निर्मीठ आणि निर्साखर' जगण्याबाबत आहे. आपण ह्या केवळ मानवनिर्मित, कृत्रिम आणि अर्कस्वरूप आहारांना एवढे सरावलो आहोत की 'मग जगायचे कसे?' हा प्रश्न सहजच उद्‍भवला. तेव्हा हे स्पष्ट करायला हवे की हे पदार्थ नव्हते, तेव्हाही जीवन समृद्ध होते. चांगदेव चौदाशे वर्षे जगले असे म्हणतात. जर 'निष्तेल, निष्तूप, निर्मीठ आणि निर्साखर' असे जगले तर ते साध्य होऊ शकेल असे मला वाटू लागले आहे.

आता कुणी असेही म्हणू शकेल की, "हे अर्कस्वरूप आहार, आपण ते चांगले लागतात, आणि जिभेला आनंद देतात म्हणूनच निर्माण केले आहेत ना? कुणी मला शास्त्राचा आधार देऊन जर सांगेल की रोज तूप खाल्ले तर तुझ्या आयुष्यातली २ वर्षे कमी, तेल खाल्ले तर ३, साखर खाली तर ४ आणि मीठ खाल्ले तर ५. तर अशी मी १४ वर्षे माझ्या आयुष्यातून वजा करायला आत्ता तयार आहे. उरलेल्या वेळात चांगले जगून घेईन, हे सगळे खात खात”. अर्कस्वरूप पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. मात्र, प्रमाणाबाहेर सेवन केल्यास, त्यांच्यामुळे आयुष्यरेखा घटते एवढेच नव्हे तर आयुष्याची गुणवत्ता घटते, हेही वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे.

खरे तर आपण ज्याला आपले अन्न समजत आहोत ते आपले नैसर्गिक अन्न आहे का? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. नरभक्षक वाघ, माणसे खातो. त्याचे कारण तो त्याचे नैसर्गिक भक्ष मिळविण्यास असमर्थ झालेला असतो हे आहे. मात्र त्याला माणूस हे त्याचे भक्ष नाही हे कळत असावे. निरोगी अवस्थेत तो माणसाकडे भक्ष म्हणून पाहतही नाही. आपण अर्करूप पदार्थांकडे भक्ष म्हणून पाहत आहोत, तर आपण निरोगी आहोत ना हे तपासून पाहायला हवे आहे.

अगदी २००४ सालच्या नोव्हेंबरापर्यंत, मी सायसाखर मोठ्या थाटात खात असे, खमंग चकलीवर ताज्या लोण्याचा गोळा ठेवून भरपूर चकल्या हादडत असे. मात्र ह्या सार्‍यांचा माझ्या आरोग्यावर काय परिणाम होत आहे ह्याबद्दल मी पूर्णतः अनभिज्ञ होतो. आणि ज्याला मी आयुष्य जगणे समजत असे ते मनःपूत जगत होतो. जेव्हा माझा रक्तदाब प्रमाणाबाहेर गेल्याने ऍन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला गेला तेव्हाही डॉक्टर लोकांचाच हा काहीतरी अनोखा कावा आहे. माझ्या धट्ट्य़ाकट्ट्य़ा प्रकृतीला अशी अचानक काय धाड भरणार? अशा प्रकारच्या स्वप्नरंजनात मी तल्लीन असे. नंतर माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, मी माझ्या खर्‍याखुर्‍या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधली, तेव्हा अनोखीच तथ्ये सामोरा आली. त्यावेळी ज्या प्रश्नांची माझ्याजवळ उत्तरे नव्हती त्यांची उत्तरे आज माझ्याजवळ आहेत.

काय करायला हवे आहे?: आपण सात पिढ्यांना पुरेल एवढी कमाई करण्यासाठी आटापिटा करतो. जन्म आणि मृत्यू मानवाधीन नाहीत. दरम्यानचे आयुष्य मानवाधीन आहे. ते आरोग्यपूर्ण आणि दीर्घ असावे, आयुष्याच्या शेवटल्या क्षणापर्यंत स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण असावे, तोपर्यंत आपण आपल्या पायांवर चालत असावे, बोलत, ऐकत, संवेदत असावे ह्यासाठी आपण काय करतो? काय करायला हवे आहे?

आहारात सेवन करावयाच्या पदार्थांची काळजीपूर्वक निवड केल्यास, आहार नियमनाची, आहार नियंत्रणाची आणि स्वतंत्रपणे वजन कमी करण्याची आवश्यकताच राहत नाही. म्हणून आहारातील पदार्थांची निवड काळजीपूर्वक करायला हवी आहे. माझ्या ’जीवनशैली-परिवर्तना’ दरम्यान मला वाचनातून, सल्ल्यांतून आणि गरजेपोटी मिळालेल्या माहितीतून लक्षात आलेल्या आहारविषयक निवडीकरताच्या काही सूचना पुढे देत आहे.

आहार निवडीबाबत काही सूचना:

१. वनस्पतिजन्य: सेवनाकरता वनस्पतिजन्य पदार्थ पहिल्या पसंतीने निवडावेत. म्हणजे अंड्यांपेक्षा फळे चांगली. दुधापेक्षा शेंगदाणे चांगले. इत्यादी इत्यादी.
२. कच्चे: ताजे, कच्चे आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ पसंतीने निवडावेत. म्हणजे तुपापेक्षा लोणी चांगले. तेलापेक्षा दाणे चांगले. तापवलेल्या तेलापेक्षा कच्चे तेल चांगले (आठवा, अंबाडीची भाजी आणि त्यावर लसणीची फोडणी!).
३. संहत नसलेलेः संहत पदार्थांपेक्षा नैसर्गिक पदार्थ (किंबहुना अधिक विरल केलेले पदार्थ: म्हणजे मध अथवा लिंबूरस थेट प्राशन न करता पाण्यात मिसळून घेतलेले) पसंतीने निवडावेत. फळांचे रस, अर्क, अरिष्टे, मुरंबे यांपेक्षा ताजी फळेच सेवन करणे चांगले. संहत पदार्थांची सवय लागल्याने रसना, निसर्गनिर्मित पदार्थांतले स्वाद संवेदतनाशी होते. बरेच दिवस साखर बंदी अंमलात आणल्यावर, दुधीचा रसही गोड असल्याचे जाणवू लागते. काही वर्षे युरोपात राहून आलेल्या व्यक्तीस भारतीय जेवण जळफळित वाटू लागते याचे कारण तेच आहे. या सूचनेचेच अंतिम पर्यवसान म्हणजे, तेल, तूप, साखर, मीठ, दारू यांसारखे मानवनिर्मित संहत पदार्थ संपूर्णतः वर्ज्य करावेत.
४. निम्नतम अन्नप्रक्रिया केलेलेः कमीत कमी प्रक्रिया केलेल्या पदार्थास प्रथम पसंती द्यावी. म्हणजे मैद्याच्या पावापेक्षा पोळी चांगली. पोळीपेक्षा फुलके (बिना तेलाची पोळी) चांगले. या सूचनेनुसार गुलाबजामसारखा निषिद्ध पदार्थ तर शोधूनही सापडणार नाही. कारण आधीच दूध आटवून आटवून घट्ट केलेला खवा. त्यात मैदा घालून तळणे. मग साखरेच्या पाकात घोळवणे. त्यामुळे गुलाबजामसारखे पदार्थ आयुष्यात एखाद वेळीच काय ते खावेत. केवळ चवीकरता.
५. निम्नतम ताप-प्रक्रिया केलेलेः पूर्णशीतित (deep frozen), तळलेले, तापवलेले, भट्टीत घडवलेले पदार्थ टाळावेत. त्यातील जीवनसत्त्वांचा बव्हंशी र्‍हास झालेला असतो. तेला-तुपांचे कमी-अधिक प्रमाणात संपृक्त मेदात रूपांतरण झालेले असते. आणि चव-वर्धनाच्या प्रयासात पोषणमूल्यांचाही र्‍हास झालेला असतो. म्हणून उसळ खाण्याऐवजी मोड आलेली धान्येच चांगली समजावी. तळलेल्यापेक्षा भाजलेले चांगले. भाजलेल्यापेक्षा उकडलेले चांगले समजावे.

आता हा प्रश्न उद्भवतो की, “अशा विचित्र आणि विक्षिप्त स्वरूपाच्या सूचना केल्या तर मग, गुरूजी, आता हेही सांगा की मग खायचे काय?” जे आवडेल ते, उपलब्ध असेल त्यातील (वरीलप्रमाणे) निवडीत बसेल ते, यथाशक्ती आणि मनसोक्त सेवन करावे. उपाशी मुळीच राहू नये. खालील गोष्टी अवश्य सेवन कराव्यात.

आहारात कशाचा समावेश आवर्जून करावा?

१. उषःपान: रोज सकाळी एक पेला कोमट पाणी, त्यात थेंब दोन थेंब लिंबाचा रस आणि चमचाभर मध घालून पिणे. हे प्रति-प्राणिलीकारक समजले जाते.
२. मुखशुद्धी: चार वाट्या आळशी (जवस), दोन वाट्या बडीशोप, एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी ओवा (केवळ दमट राहू नये इतपत) तापवून ठेवणे आणि दर जेवणानंतर दोन दोन चमचे मुखशुद्धीकरता चावून खाणे. यामुळे चांगले कोलेस्टेरॉल वाढते.
३. कॅल्शियम सेवन: रात्री झोपतांना एक पेला गायीचे (कमी स्निग्धांशाचे दूध असणे आवश्यक आहे) दूध थोडीशी हळद घालून (मात्र साखर/गूळ न घालता) पिणे. यामुळे शरीरातील कॅल्शियम अवशोषण सुयोग्य होऊन अस्थिघनता वाढते. (आता व्हेगन लोकांनी काय करावे असा प्रश्न विचारू नका! त्यांनी शरीरात कॅल्शियम अवशोषण सुयोग्य होऊन अस्थिघनता वाढेल अशा प्रकारच्या वनस्पतीजन्य आहारांची निवड स्वतःच करावी!)
४. आहार संतुलनः दिवसात चार-पाच वेळा खाणे/जेवणे. कुठलेही खाणे/जेवणे दोन चपात्यांपेक्षा किंवा तत्सम ऐवजापेक्षा जास्त नसावे. सकाळचा नास्ता राजासारखा भरपूर असावा. दुपारचे जेवण सामान्यासारखे मध्यम असावे. रात्रीचे जेवण भिकार्‍यासारखे जुजबी असावे. शक्यतोवर सूर्यास्तानंतर खाऊ नये. सूर्यास्तानंतर फार उशीरा जेवू नये. जेवल्या/खाल्यानंतर लगेचच झोपू नये. किमान दोन तास शतपावली, वा तत्सम हालचाली करत रहाव्या. मगच झोपावे. यामुळे वातांचा त्रास होत नाही. दुपारची वामकुक्षी अर्ध्या तासापेक्षा जास्त घ्यायची गरज पडू नये.
५. चघळचोथा-सेवन: प्रत्येक जेवणापूर्वी एक संपूर्ण गाजर, काकडी, कांदा, मुळा अशासांरखी एकतरी फळभाजी, पूर्णपणे चावून व्यवस्थितपणे खावी. जमतील तितकी मोड आलेली कडधान्ये खावीत. मगच जेवणास सुरूवात करावी. आहारातील पक्व अन्नांपेक्षा कच्चे अन्नपदार्थ जास्त व्हावेत. असे झाल्यास आहार जास्त योग्य होईल. जमिनीखालील भाज्यांना रॉकेलचा/कीटकनाशकांचा वास येत असल्यास ती खाऊ नयेत. केवळ ताजे भाजीपाले व फळेच खावीत. ती कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. बाहेरच ठेवावीत. खराब झाली असल्यास सेवन करू नयेत.
६. फलाहार: रोज एकतरी फळ सेवन करावे. राष्ट्रीय दूरदर्शन प्रसारण, हल्ली, दर कुटुंबाने, दररोज किमान अर्धा किलो फळे खावीत अशी जाहिरात करत असते. फळे नुसतीच खावीत. रस काढून, तापवून, साखर, मीठ मिसळून खाऊ नयेत. खूप दूरून येणार्‍या फळांची साले काढून टाकावीत. आपल्याच बागेतील फळे स्वच्छ धुवून सालांसकट खाल्लेली चांगली. यांतून जीवनसत्त्वे आणि क्षार मिळवायचे असतात. ते केवळ ताजेपणावरच अवलंबून असतात.
७. कवचधारी फलाहारः उंच वृक्षावर लागणार्‍या कवचधारी फळांचा (उदाहरणार्थ अक्रोड, बदाम इत्यादी) गर आरोग्यवर्धक समजला जातो. यांच्या तेलांमुळे चांगले कोलेस्टेरॉल वाढत असते. असे गर दिवसांतून किमान काही फळांचे तरी सेवन करावेत. एक वा दोन खारीक वा खजूरही सेवन केल्यास पोटॅशियम, लोह इत्यादींची सोय होते.
८. पोटभरीचे खाद्यः आहारविषयक सवयींत परिवर्तन करत असतांना खरी उणीव जाणवते ती पोटभरीच्या खाद्य-पदार्थांची. त्याकरता लाह्या, पोहे, चुरमुरे, मोड आलेली कडधान्ये, हरभर्‍याची भिजवलेली डाळ, राजगिरा, खजूर इत्यादी गोष्टींची रेलचेल उडवून द्यावी. मात्र तिखट मीठ लावून, लिंबू-मिरची घालून, तेला-तुपाच्या फोडण्या देऊन मजा किरकिरा करू नये. त्यांच्यामुळे शारीरिक गरजेपेक्षा जास्त अन्नाचे विनाकारण सेवन केले जाते व म्हणूनच ते अपायकारक ठरते. संहत स्वाद नसलेले अन्नपदार्थ तोंडातून पोटात सरकण्यास दीर्घकाळ घेतात. दरम्यान जास्त लाळेत घोळवले जातात. म्हणून त्यांचे पचन सुलभ होत असते.

आहारनियोजन हे एक व्रतच मानावे

आता ही अशी आहार-प्रणाली अंमलात आणायची तर ती आज अंमलात आणली, उद्या सोडली असे करून अपेक्षित परिणाम साधत नाहीत. हे एक व्रतच असते. आयुष्यभराचे. तेव्हा उतायचे नाही मातायचे नाही घेतला वसा टाकायचा नाही. मात्र, व्रत काटेकोरपणे पाळल्यास फळ अपेक्षेबाहेर निरामय निपजते. चेहर्‍यावर आरोग्याचे तेज झळकू लागते. त्वचा कांतिमान होते. दिवसभर उत्साही वाटत राहते. अगदी चिरतरूण होता आले नाही तरी दीर्घ आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याचा तो राजमार्ग आहे. तेव्हा वाट कशाची बघता. करा सुरू.

श्रेयअव्हेरः हे लेखन वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. हा लेख औषधोपचार अथवा आहारविषयक मार्गदर्शक सल्ला देणारा लेख नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. मात्र इथे हे नमूद करायला हवे की हे लिखाण निराधार नाही. ही माझीच अभिव्यक्ती आहे. ही माहिती कुठल्याही पुस्तकाचे आधारे लिहावी असे प्रयोजन नाही. हे लेखन कुठल्याही पुस्तकाचे भाषांतर नाही. मौलिक आहे. बखरनुमा आहे. हे केवळ अनुभवातून/ वाचनातून आलेले शहाणपण आहे. हे संदर्भलेखन नाही.

“जीवनशैली परिवर्तन” या विषयाशी संबंधित मायबोलीवरील माझे यापूर्वीचे काही लेख खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत.

http://www.maayboli.com/node/23083 माझे हृदयधमनीरुंदीकरण
http://www.maayboli.com/node/23013 हृदयविकार का होतो?
http://www.maayboli.com/node/21579 एकाकीपणा आणि त्यावरचे उपाय
http://www.maayboli.com/node/12307 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-४
http://www.maayboli.com/node/12306 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-३
http://www.maayboli.com/node/12291 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-२
http://www.maayboli.com/node/12263 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-१
http://www.maayboli.com/node/12231 हृदयोपचार घेत असताना मी वाचलेली पुस्तके
http://www.maayboli.com/node/11009 आरोग्य आणि स्वस्थता यांचे निकष
http://www.maayboli.com/node/12061 हृदयधमनी रुंदीकरण
http://www.maayboli.com/node/10982 आंतरिक शक्तीचा शोध

याशिवाय,
http://aarogyasvasthata.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोळेकाका, चांगली माहिती. धन्यवाद. तुमचे इतरही लेख वाचायचं चालू आहे.

(गुरुजींना विचारलेला प्रश्न लिहायला घेतलाच होता. पण तुम्हीच लिहिलात.)

अरे वा छान माहिती. बर्‍याच वेळी हे नको ते घातक अशी माहिती देतात शेवटी वाचणार्‍याला प्रश्न पडतो की खायचं काय? पण हाही प्रश्न तुम्ही सोडवला आहे. पाहू असा आहार ठवता येतो का!
छान मार्गदर्शन.

'श्रेयअव्हेर' या परिच्छेदासाठी धन्यवाद. तो लेखाच्या सुरवातीला टाकल्यास जास्त बरे होईल.

मस्त लेख ! आजार झाल्यावर धावाधाव करण्यापेक्षा आधीच सावध राहिलं तर नक्कीच उत्तम. बाकीचे लेखही वाचते आता.
एवढ्या छान माहितीबद्दल धन्यवाद.

छान आणि उपयुक्त माहिती.

मालती कारवारकरांचे "डॉक्टर, मी काय खाऊ?" नावाचे पुस्तक आहे. त्यातही लेखिकेने हेच म्हणणे मांडलेय की योग्य आहारामुळे आजारांना दूर ठेवणे शक्य आहे.

ओंगळ कोलेस्टेरॉल म्हणजे ट्राय-ग्लिसेराईड हे माहिती नव्हते. गोळेसाहेब अतिशय छान उपयुक्त अशी माहिती मिळाली.

एक प्रश्न: वजन कमी असले म्हणजे खरचं कोलेस्टेरॉल कमी राहते का शरिरातले? आणि शरिरातील ब्लड प्रेशर का वाढते? ते वाढू नये म्हणून काय करावे वा करु नये याबद्दल पण लिहा न? धन्यवाद.

नरेंद्रजी,
अतिशय छान उपयुक्त अशी माहिती मिळाली !
Happy

मला नेहमी वाटतं, गावाकडे जे खायला फुकट उपलब्ध आहे,जस,दुध्,लोणी,भाज्या, फळे ते मोठ्या शहरात महिन्याला हजारो रुपये खर्च करुनही अस्सल मिळेल याची खात्री नाही ..

गावाकडचे लोक जसे शहरात येऊन राहिले तसा पैसा,जागेचे भाव वाढले पण बहुतेक माणसांची (सगळ्यांची नाही) तब्येत,ताकत,ऊर्जा नक्कीच खुप कमी झालेली दिसते, हा तर खरा र्‍हास आहे अस वाटतं,याला पर्याय तरी काय आहे ?

बित्तुबंगा, हबा, मामी, स्वाती२, डॅफोडिल्स, जुयी प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

साधना, अरुंधती माझं मराठी तुम्हाला समजलं आवडलं याचं मला अप्रूप आहे.
त्याखातर हार्दिक धन्यवाद!

गजानन इतरही लेख अवश्य वाचा! आणि हो प्रतिसादही अवश्य द्या. ह्याही प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

मानुषी,
शेवटी वाचणार्‍याला प्रश्न पडतो की खायचं काय? पण हाही प्रश्न तुम्ही सोडवला आहे. >>>>
हे रसग्रहण आवडले. त्याखातर हार्दिक धन्यवाद!

आगाऊ, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.
यापूर्वीच्या लेखात श्रेयअव्हेर सुरूवातीसच घातलेला आहे.
मुळात हे लेखच खूप लांबलचक झालेले आहेत. ते वाचायला मोठे वाटत असतांनाच तोंडावर श्रेयअव्हेर आला तर कदाचित लोक वाचायलाच धजावणार नाहीत, म्हणून अखेरीस टाकला इतकेच.
त्याचे तुम्ही स्वागत केलेत ह्यातही मला आनंदच आहे.

पौर्णिमा, भ्रमर तुम्हाला ह्या लेखाबद्दल इतरांना सांगावेसे वाटले ह्यातच मला आनंद आहे.
अवश्य दुवे द्या. प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.

रुणुझुणू, मनःपूर्वक दाद दिल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

निंबुडा, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.
मालती कारवारकरांच्या त्याच पुस्तकात एका जागी "प्रत्येकाने दररोज एक वाटी डाळ खावी" असे एक वाक्य वाचल्याचे मला आठवते. त्यावेळी मला वाटले होते की एका वाटी डाळीत सगळ्या कुटुंबाची दिवसाची आमटी होईल! असो. तेही पुस्तक चांगलेच आहे.

बी, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.
एक प्रश्न: वजन कमी असले म्हणजे खरचं कोलेस्टेरॉल कमी राहते का शरिरातले? आणि शरिरातील ब्लड प्रेशर का वाढते? ते वाढू नये म्हणून काय करावे वा करु नये याबद्दल पण लिहा न? धन्यवाद.>>>>
याचे उत्तर आधीच इथे उपस्थित आहे. वरच्या यादीतला "हृदयविकार का होतो" हा लेख वाचा!
अर्थात इतरही लेख वाचाच, अशी मी विनंती करेन.

अनिल, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.
मला नेहमी वाटतं, गावाकडे जे खायला फुकट उपलब्ध आहे,जस,दुध्,लोणी,भाज्या, फळे ते मोठ्या शहरात महिन्याला हजारो रुपये खर्च करुनही अस्सल मिळेल याची खात्री नाही ..>>>>
अगदी. अगदी.

मालती कारवारकरांच्या त्याच पुस्तकात एका जागी "प्रत्येकाने दररोज एक वाटी डाळ खावी" असे एक वाक्य वाचल्याचे मला आठवते. त्यावेळी मला वाटले होते की एका वाटी डाळीत सगळ्या कुटुंबाची दिवसाची आमटी होईल! >>>
अहो, काही जणांकडे वरणाला डाळ असे म्हणण्याचा प्रघात असतो. माझ्या ब्राह्मणेतर मित्र-मैत्रिणींकडे मी वरण-भाताला डाळ-भात असे म्हणण्याचा प्रघात असल्याचे पाहिले आहे. त्यामुळे मालतीबाईंच्या पुस्तकातील १ वाटी डाळ म्हणजे १ वाटी वरण (शिजवलेली डाळ) किंवा आमटी असा घ्यायला हवाय.

अतिशय माहितीपूर्ण लेख. धन्यवाद Happy
तुमचे सगळे लेख मधे मधे रेफर करुन नेहेमी वाचण्यासारखे आहेत.

दिनेशदा,
तुम्हाला आवडली असल्याने तुम्ही त्यापैकी काय काय सुरू करताय ते वाचायला आवडेल!

धन्यवाद सावली,
तुमचे सगळे लेख मधे मधे रेफर करुन नेहेमी वाचण्यासारखे आहेत.>>>> त्याकरताच तर त्यांची निर्मिती झालेली आहे.

आम्हीही डाळभातच म्हणतो. Happy डाळ म्हणजे साधे मिरचीच्या फोडणीचे वरण. बिन्फोडणीच्या डाळीला मात्र वरण म्हणतो.

मालतीबाईं ब-याच वर्षांपुर्वी दुरदर्शनवर नियमीत येत असत. त्यांचे पदार्थ आरोग्यपुर्ण असतात पण दृष्टीला आणि चवीला ब-यापैकी मार खातात Happy त्यामुळे त्यांचे पदार्थ करायचा धीर कधी केला नाही. केला तर मलाच सगळे खावे लागेल. त्यांचे वंशवेल हे पुस्तक त्या काळात माझ्याकडे होते. अतिशय सुंदर माहिती आहे त्यात. आता कुटूंबात मुल हवे हा विचार करणा-या लोकांनी पुढचे पाऊल उचलण्यापुर्वी एकदा ते पुस्तक अवश्य वाचावे.

गोळेसाहेब, तुमच्या लेखातल्या गोष्टी पाळण्याचा मी ब-यापैकी प्रयत्न करत असते. हल्लीच मेडीकल चेकप केलेले त्यात सगळे नीट, प्रमाणाच्या ब-याच आत आहे. रेग्युलर व्यायामही आहे. तरीही माझे वजन वाढतेय आणि याचे कारण मला गोड खायचा मोह टाळताच येत नाही. प्रचंड गोड खाल्ले जाते. चहात साखर घालणार नाही पण लाडू, बर्फी, हलवा मात्र भरपुर हादडणार. Sad त्यामुळे होते काय की जेवढ्या कॅलरीज व्यायामाने जाळते त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज जेवणात खाते. तुमचा लेख वाचुन परत एकदा मनाची तयारी करतेय आणि अमुक एवढे वजन खाली उतरेपर्यंत गोड पदार्थांच्या आजुबाजुसही फिरकणार नाही अशी मानसिक तयारी करतेय.

<<<अतिशय सुंदर माहिती आहे त्यात. आता कुटूंबात मुल हवे हा विचार करणा-या लोकांनी पुढचे पाऊल उचलण्यापुर्वी एकदा ते पुस्तक अवश्य वाचावे.>> हो अगदी १०० % साधना .
वंशवेल पुस्तक जरूर वाचावे.

हे प्रति-प्राणिलीकारक समजले जाते.

हे कळले नाही... सोप्या मराठीत काय म्हणतात???

मात्र संशोधनात असे सिद्ध झालेले आहे की केवळ मेदाद्वारे बव्हंशी ऊर्जा मिळविणार्‍या लोकांनी, जरी मेदाद्वारे मिळणार्‍या ऊर्जेत ३० टक्केपर्यंत घट घडविली तरीही, आधीच विकारग्रस्त झालेल्यांना ते मुळीच पुरेसे ठरत नाही. हृदयधमनीतील काठिण्याची माघार घडवून आणण्यासाठी मेदाद्वारे मिळणार्‍या ऊर्जेत ३ टक्केपर्यंत घट घडवावी लागते
हेही कळले नाही. ३०% उर्जा घटवुनही फरक पडत नाही तर मग ३ टक्क्यांनी काय फरक पडणार?

साधना,
हे प्रति-प्राणिलीकारक समजले जाते. हे कळले नाही... सोप्या मराठीत काय म्हणतात???>>>>

अँटि-ऑक्सिडन्ट

Pages