फिरून शैशव यावे...!

Submitted by के अंजली on 28 January, 2011 - 07:29

मेघांच्या कापुसलाटा
धारांना देती वाटा
मी अलगद चिंब भिजावे
लाटांत हरवुनी जावे..

वार्‍याचा निर्मळ पोत
अन मऊ मखमली झोत
मी तयामागुती जावे
वार्‍याहुन हलके व्हावे..

झाडांचे हिरवे हसणे
कानात गोड कुजबुजणे
मी पान तयांचे व्हावे
मनमुराद झोके घ्यावे..

किरणांचे अवखळ खेळ
अन दवबिंदुंची ओळ
मी तिथेच नित्य रमावे
दवबिंदु इवला व्हावे..

मग नभात चंद्र दिसावा
चांदण्यांत वेढुन यावा
मी त्यांना मोजित जावे
अन फिरून शैशव यावे...

गुलमोहर: 

अप्रतिम...!!
अगदी "वाटते सानूली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर फिरावे"ची आठवण झाली.

उल्हासजी, हंसा, मुटेजी आणि अलका.. धन्यवाद!
>>टायपो दुरुस्त करावा म्हटलं पण सफारी मध्ये वार्याला किंवा वारयाला असेच लिहिता येतेय,त्यामुळे तसेच लिहावे लागले..!

कुणाला माहिती असेल तर नक्की सांगालच Happy

भरतजी..
फुलराणी..:)

मग नभात चंद्र दिसावा
चांदण्यांत वेढुन यावा
मी त्यांना मोजित जावे
अन फिरून शैशव यावे.>>>

सर्वच कविता नादमय पण शेवट आशयाच्याहीदृष्टीने मस्तच!

आपले अभिनंदन!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

वा अंजली - काय एकाहून एक सुंदर कविता आहेत तुमच्या.......... फारच छान, गोड, गेय, नादमय, आशयपूर्ण..........

खूपच छान. अभिनंदन.
[ <<कुणाला माहिती असेल तर नक्की सांगालच >> 'शिफ्ट' दाबून 'आर' व मग 'वाय' आणि दोनदा 'ए' ].