घर - ७

Submitted by बेफ़िकीर on 28 January, 2011 - 03:05

मानवी स्वभावाची गुंतागुंत क्लिष्ट असतेच! आपली प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक मुद्दा हा आपल्यावर वर्षानुवर्षे झालेल्या संस्कारांमुळे निर्माण होत असतो. हे माणसाला कळत असले तरी संतांप्रमाणे अलिप्त राहणे अंगवळणी पडणे अशक्य असते. माणूस अधिकाधिक गुंततच जातो या गुंत्यात!

तसे पाहायला गेले तर अंजली वहिनी किंवा तारका वहिनी मुळात वाईट नव्हत्याच! पण आपले चष्मे जसे तसे दिसते हे खरे!

गौरीचे त्या घरात येणे यात त्यांच्यादृष्टीने अनेक फायदेही होते. एक तर ती सर्वात लहान दिराची बायको! त्यामुळे तिच्यावर वरचष्मा ठेवणे सहज शक्य होणार होते. त्यात ती नवीन! नव्याची जुनी होईपर्यंत ती या दोघी म्हणतील तसेच वागणार होती. त्यातच तिच्य आयुष्यात झालेल्या उलथापालथींना तिची ग्रहदशा जबाबदार आहे असे मत पसरलेले होते. त्यामुळे तिच्या स्वतःच्याच मनात एक न्युनगंड निर्माण झालेला होता. आणि या सगळ्याच्या वर पुन्हा ती लहानपणापासून समोरच राहणारी! त्यामुळे तिच्या स्वभावातील बारकावे आधीच माहीत होते.

अंजली आणि तारकावहिनी या सर्व घटकांचा 'आपले मोठेपण वाढवण्यास व सिद्ध करत राहण्यास' उपयोग करून घेणार यात काहीच नवल नव्हते.

आज पंधरा दिवस झाले पण गौरीने अजून स्वैपाक केलेला नव्हता. कारण तो बालेकिल्ला त्या दोघींनी तिच्यावर सोडलेलाच नव्हता. न जाणो चांगला वगैरे स्वयंपाक झाला तर उगाच कुणीतरी स्तुती करायचे आणि आपण आजवर केलेली मेहनत वाया जायची!

पण आज सासूबाईच म्हणाल्या..

"गौरी... अगं फक्त वरची कामं नको करत जाऊस... अजली अन तारकाला स्वयंपाकातही मदत कर"

पडत्या फळाची आज्ञा प्रमाण मानून गौरीने ओट्याकडे पाऊल टाकले. तशा त्या दोघी काही ना काही कारण काढून तेथेच खोळंबून राहायला लागल्या. गौरीच्या ते लक्षात येत होते, पण ते ती मनावर घेत नव्हती.

अंजली वहिनी उगाचच काही भाम्डी घासू लागल्या. तारका वहिनींनी ओट्यावरच विळी ठेवून कोथिंबीर आणि इतर काही भाज्या चिरायला सुरुवात केली. दोघींचे लक्ष मात्र होते गौरी काय काय आणि कसे कसे करते!

"तुमच्याकडे तिखट जास्त लागतं वाटतं"

तारका वहिनींचे ते वाक्य गौरीच्या कानावर पडले तशी ती म्हणाली..

"कमी घालू का जरा?? विचारायला हवं होतं मी... सवयीप्रमाणे घातलं आपलं"

"नाही नाही.. तसं काही नाही... सहज विचारलं"

गौरीचा तो नम्रपणा खराखुरा नम्रपणा आहे की उपरोधिक नम्रपणा आहे हे काही दिवस त्या दोघींना समजतच नव्हते. आत्ताही तसेच झाले होते. तारका आणि अंजली या दोघींनी पटकन एकमेकींकडे पाहिले. गौरीला नजरेच्या कोपर्‍यातून ते जाणवत होतं!

आज एकदाचं सिद्ध होणार होतं की ही नेमका कसा स्वैपाक करते! आणि त्यावर पुढच्या अनेक गोष्टी ठरणारही होत्या. एकीकडे दोघींना वाटत होतं की जास्तीतजास्त काम तिला पडाव, आणि दुसरीकडे हेही वाटत होतं की ओट्यापाशी तिचा काहीही हस्तक्षेप नसावा.

"हे काय?? दाण्याचं कूट एवढं??? .. कशाला???"

अंजली वहिनींचा तो प्रश्न त्यांनी नाही विचारला तरी कुणीतरी विचारणारच हे गौरीला माहीत होते. स्वयंपाक करताना मधेच तिने दाण्याच्या कुटाचा मोठा डबा उचलून एका कोपर्‍यात नेऊन ठेवला होता.

"लाडू करणार आहे दाण्याचे..."

आता यावर काय भूमिका घ्यावी हे त्या दोघींना समजत नव्हते. पण काहीतरी भूमिका घ्यावीच लागणार होती.

अंजली वहिनी अगदी हासत हासत म्हणाल्या..

"माझी ताई सासरी गेली ना?? तेव्हा तिला स्वतःच्या इच्छेने चहाही करू द्यायचे नाहीत.. म्हंटलं आमच्याकडे किती स्वातंत्र्य आहे बघ... काय छळलं होतं तिला बाई.. "

'आपण आत्ता दाण्याचे लाडू करताना सासूबाईंना विचारायला हवे' ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे हे गौरीला समजलेले होते. पण आता जाऊन विचारणे म्हणजे या दोघींच्या समोर तिरकस स्टॅन्ड घेण्यासारखे होते. त्यापेक्षा यांनाच मान देऊन विचारले तर यांना बरे वाटेल असे तिला वाटले.

"चालतील न केले तर???.. मी विचारलंच नाही तुम्हाला..."

अंजलीने अगदी दिलखुलास परवानगी दिल्याच्या थाटात सांगीतलं...

"कर की??.. यांनाही आवडतातच लाडू.. त्यात काय विचारायचंय.. तुझंच घर आहे..."

काही असले तरी हे विधान खूप आवडले गौरीला! चक्क थोरली जाऊच म्हणतीय 'तुझंच घर आहे' म्हंटल्यावर काय!

त्या आनंदातच ती बोलून गेली.

"चित्रशाळेपाशी दुकान आहे ना? त्यांना लागतात लाडू! आठ आण्याला एक घेतात आपल्याकडून.. बारा आण्याला विकतात..."

"म्हणजे??"

सर्व कामे सोडून तारकाने शेजारी उभ्या असलेल्या गौरीला चकीत होऊन विचारले.

अंजली वहिनीही भांडी घासायच्या थांबल्या.

"दररोज पंचाहत्तर लाडू करून विकणार आहे.. रोजचे आठ रुपये सुटतात..."

आपण अत्यंत उत्साहाने कानावर घातलेला हा प्रस्ताव तितक्याच निरुत्साहाने स्वीकारला जाईल याची गौरीला कल्पना नव्हती.

"हे आईंना सांगीतलंस का??"

"हे सांगतो म्हणाले..."

"मला वाटते तू सांगायला हवेस.. भावजी काय.. विसरतीलही..."

"मी.... आत्ता सांगू का??"

"सांग की?? ... "

अंजली वहिनींनी सांगीतल्याबरहुकूम गौरी मधल्या घरात आली. आई बाबा दोघेही तिथेच बसलेले होते. अंजली आणि तारकाही गौरीच्या मागोमाग आल्या.

गौरी - .. आई..

आई बाबांनी गौरीकडे पाहिले. मुळातच त्यांना तिच्याशी फारसे बोलायची इच्छा नसायची. त्यात ती आत्ता असा चेहरा करून आली होती की जणू काहीतरी अप्रिय सांगणार असावी.

वास्तविक पाहता गौरीला थोडेसे टेन्शन आलेले होते. तिला वाटत होते की काही कारणाने यांनी परवानगी नाकारली तर उगाचच आपले पैसे मिळण्याचे एक साधन जाईल.

गौरी - मी... दाण्याचे लाडू करून विकले तर चालेल ना??

आई - कशाला??

गौरी - .. म्हणजे.. सहजच.. थोडा हातभार...

आता हा हातभार कशाला लावला जाणार आहे यावर खरे तर कुणी भाष्य करायची गरज नव्हती. पण गप्प बसतील त्या तारका वहिनी कसल्या?

तारका - झालंच! तू भावजींना हातभार लावायला लागलीस की हे आणि दादाभावजी आम्हाला दोघींना म्हणणार... शिका जरा धाकट्या जावेकडून...

हासत हासत जरी तारका वहिनी असे म्हणाल्या असल्या तरीही त्यातून 'दाण्याचे लाडू विकणे' या प्रस्तावाचा विरोध व्हावा अशी त्यांची इच्छा असावी हे जाणवू लागले होते.

आई - हो पण म्हणजे प्रॉब्लेम काय आहे?? काही आर्थिक अडचण आहे का वसंताला??

गौरी - अं?? नाही नाही.. तसं काही नाही.. ते.. जरा पगार थोडासा कमी झालाय...

हे आपण यांना सगळ्यांना सांगावे की नाही, यांना आधीच वसंताने सांगीतलेले आहे की नाही याबाबत गौरीला काहीही अंदाज नव्हता.

मात्र ते ऐकून बाबा चिंताक्रान्त झालेले दिसले.

बाबा - कमी झाला म्हणजे?? असा कसा कमी झाला??

गौरी - ते.. काहीतरी काउंटरवरचं काम दिलं पुन्हा.. आधीच्या कामावर कुणा नातेवाईकाला नेमलं म्हणे..!

बाबा - किती देणार आहेत आता पगार??

गौरी - मला नीट नाही माहीत, पण चारशे रुपये कापणार असावेत..

बाबा - म्हणजे आठशेच!

आपल्या नवर्‍याची आर्थिक परिस्थिती सर्वात कमी आहे याची योग्य जाण गौरीला होती.

गौरी - म्हणून.. मला वाटलं की हेच लाडवाचे थोडे दोन अडीचशे मिळतील.. तेवढीच मदत..

अंजली - पण मग दाण्याचं कूट तू वेगळं आणणार का रोज??

गौरीने होकारार्थी मान हालवली आणि त्याच क्षणी तिच्या डोक्यात प्रकाश पडला. आत्ता घरात असलेलं कूट कदाचित दादा किंवा अण्णाने आणलेले असेल. वसंताशी लग्न व्हायच्या आधी ती या चौघांना 'अरे'च म्हणायची. दादा, अण्णा, राजूदादा आणि वसंता! पण आता ते चालत नव्हते.

पण हे दाण्याचे कूट कुणीतरी आणलेले असणार आणि आपण त्याचे लाडू करणे योग्य नाही हे तिच्या लक्षात आले.

गौरी - मी असं करू का?? आत्ता कूट घेऊन येते.. म्हणजे मग घरात अडचण नाही व्हायची..

आता 'काही अडचण वगैरे नाही गं.. एखादा दिवस घेतलंस तर काय बिघडतंय' इतका महान विचार बोलावा लागेल या भयाने अंजली आणि तारका शांतच बसल्या.

बाबा - पण.. मग तो दुसरी नोकरी शोधतोय की नाही??

गौरी - प्रयत्न करतायत..

बाबा - घरात काही सांगत नाही.. का बोलत नाही कळतच नाही मला.. कुमारला तरी सांगायचं..

गौरी - ... मला वाटलं की... कदाचित सगळ्यांना काळजी नको म्हणून नसतील बोलले..

बाबा - हो पण शेवटी आपलेच लोक असतात ना मदतीला?? ..

आई - पण हे लाडवांचं काय आहे?? तू इतकी खपणार आणि किती मिळणार असे त्यात??

गौरी - दोन अडीचशे सुटतील..

अंजली - पण त्रास किती ... नाही??

हा प्रश्न 'फारच प्रेमाने' विचारला आहे असे कुणालाही वाटले असते. पण तारकाकडे पाहून अंजलीवहिनींनी विचारलेल्या या प्रश्नाच्या मुळाशी असलेला खरा प्रश्न हा होता की 'तू दिवसभर लाडू करून पैसे कमवणार म्हणजे घरकाम पुन्हा आम्ही दोघींनीच करायचे का??'

गौरी - नाही नाही... पटपट उरकेन पहाटेच.. दहा वाजता द्यावे लागतात नेऊन...

तारका - दहा वाजता?? म्हणजे घरातली घाईची वेळ...

अंजली - हो न! ... त्यात आणखीन हे लाडू ...

गौरीला समजले. दोघींनाही लाडू हा प्रस्ताव अजिबात मान्य नाही आहे. मात्र आईंच्या खांद्यावर बंदुक ठेवतायत. खूप राग आला तिला! पण नेमके हेच होईल असे वसंताने सांगीतलेले असल्यामुळे ती गप्प राहिली.

आई - अक्का मदत करतील की तुला...

'माझीच आई मला मदत करेल' हे सांगायला तुम्ही कशाला हव्या आहात असा विचार गौरीच्या मनात मुळीच आला नाही. ती मनाने चांगली होती. उलट तिला ती कल्पना फारच आवडली.

गौरी - अय्या हो की.... आदल्या दिवशीच आईकडे करून ठेवत जाईन लाडू...

प्रस्ताव कसाबसा थ्रू झाला आणि वाक्य कानावर आदळलं!

अंजली वहिनींनी अगदी गौरीला जवळ घेत वगैरे म्हंटलं!

"किती किती प्रसंग आले गं तुझ्या आयुष्यात... कधी संपायची ही साडेसाती काय ठाऊक.. पण त्यातल्या त्यात एक बरं आहे.. निदान माहेर समोरच आहे.. आईची मदत तरी आहे... "

यात 'आम्हाला आमच्या माहेरची कधी मदतही घेता आली नाही' हे छुपं वाक्य होतं! बायकांचं बायकांना बरोब्बर कळत असावं बोलणं! कारण लगेचच गौरी म्हणाली.

गौरी - इथे घाईच्या वेळी सकाळी अडचण नको म्हणून म्हणाले आईकडे करीन असे... नाहीतर आमच्याच खोलीत करू का??

'आमची खोली' हा आणखीन न आवडणारा उल्लेख!

अंजली - कुठेही कर गं... सगळं घर आपलंच आहे.. पाहिजे तर आमच्या खोलीत केलेस तरी चालेल..

'आमची खोली' हा उल्लेख मलाही करता येतो हे दाखवून दिले गेले. पण प्रेमळ शब्दांच्या मुलाम्यातून! असे शब्द ऐकल्यावर 'आपण मागे राहिलो असे वाटू नये' म्हणून तारकावहिनी लगेचच म्हणाल्या..

तारका - आणि मलाही सांगत जा हक्काने... लाडू करायला या म्हणून.. संकोच करू नकोस...

खुष झालेली गौरी दाण्याचे कूट घेऊन वर तिच्या खोलीत गेली. ती ते फक्त तिथे ठेवून येणार होती. या दोघींना वाटले की स्वैपाक सोडून ती आता लाडू करणार!

जिना उतरताना गौरीच्या कानांवर कसलीशी चर्चा आली तशी ती त्यांना दिसणार नाही अशा पद्धतीने तिथेच उभी राहिली.

अंजली - चल बाई तारका.. आपल्याला काय चुकलेत का भोग कामाचे?? एक बदली झाली म्हणून कानपूरला जाणार अन दुसरी नवर्‍याला मदत म्हणून लाडू करणार.. तू आणि मीच सगळं करायचं आहे.. आवर पटापटा..

तारका - पटलं मला वहिनी तुमचं.. आधीपासूनच तुम्ही म्हणत होतातच..

अंजली - ... काय????

तारका - शेवटी आपण दोघीच एकमेकांना..

अंजली - ते तर आहेच.. थोरले पडलो ना?.. पण एक बघितलंस का तू??

तारका - .... काय??

अंजली - त्या ज्योतिष्याने सांगीतले त्यात तथ्य वाटते मला तरी...

तारका - ... काय??

अंजली - थोडसं असतंच तसं.. लाभणं .. न लाभणं...

तारका - म्हणजे??

अंजली - आता ही आली आणि लगेच वसंताभावजींचा पगार...

तारका - ............ खरच की हो?? ... हे लक्षातच नाही आलं माझ्या..

अंजली - मी चांगले रत्नागिरीचे स्थळ सुचवत होते... पण ऐकणार कोण??

तारका - आईंना...

अंजली - ....... ???

तारका - आईंनाही हे जाणवले असेल का हो??? लाभणं न लाभणं...

अंजली - त्यांचा तर फार विश्वास आहे...

तारका - एकदा... बोलून बघूयात का??

अंजली - नको... बाबा डाफरतील आपल्यावर... त्यांना घरात वाद किंवा गैरसमज होत आहेत असे वाटेल..

तारका - हो पण मला एक सांगा... आता ही अशी रोज लाडू करणार म्हणजे मग कामाचं काय??

अंजली - आम्ही गरीब आहोत... आम्हाला कष्ट करावेच लागतात... म्हणून लाडू वळतो आहोत..

तारका - कधी सुटणार आपण कुणास ठाऊक यातून??

अंजली - तू सुटशीलच गं चार महिन्यांणी.. तुम्ही शिफ्टच होताय म्हंटल्यावर काय..

तारका - पण... मला तिकडे सुचणारच नाही वहिनी.. तुमच्याशिवाय..

अंजली - आणि माझंही मन नाही लागणार इथे.. तू नसलिस की..

तारका - मी रोज येईन..

अंजली - तू येशील गं रोज.. पण.. मला वाटलं की उठून तुला भेटायला नाही येता यायचं..

तारका - जबाबदारीच नसते या मुलींना.. गीता काय अन ही काय गौरी..

अंजली - चालायचंच...

तारका - वहिनी... मी एक मनातलं बोलू??

अंजली - काय?

तारका - तुम्ही दोघेपण... शिफ्ट का नाही होत?? शेवटी आपापले संसार करायचे कधी माणसाने??

इतपर्यंत ऐकून गौरी तशीच वर निघून गेली.

तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं! दाण्याच्या कुटाकडे बघताना तिने मनाशी ठरवले. गरीबीत तर गरीबीत राहू. पण घरातल्या प्रत्येकाला खुष ठेवायचाच प्रयत्न करत राहू.. अगदीच काही बिनसले तर माहेर समोरच आहे... तसेही आपल्या आयुष्यात आता आहे काय? ना मूल ना बाळ! वसंता मोठ्या मनाचा आहे.. त्याची प्रामाणिकपणे साथ देणे इतकेच कार्य आहे आपले..

गौरी अर्ध्या तासाने खाली आली.

अंजली - झाले इतक्यात वळून??

गौरी - नाही..

अंजली - मग??

गौरी - अजून घेतलेच नाहीयेत वळायला...

अंजली - मग?? काय करत होतीस वर?

गौरी - आवरलं सगळं.. पसारा खूप होता... द्या.. मी करते बाकीचं..

अंजली - झालंच आहे आता सगळं.. बस जरा... दमली असशील आवराआवर करून...

शब्द जरी वरवर प्रेमळ होते तरीही त्यात एक जहरी उपरोध होता. गौरीने मात्र कामाला लागण्यातच शहाणपण मानले.

तारका - मलाही केव्हाची आवरायचीय माझी खोली..

गौरी - मी येऊ मदतीला??

तारका - नाही आवरीन की मी.. त्यात काय इतकं.. भावजींचं असं कसं झालं गं पण??

गौरी - जायलाच सांगत होते.. शेवटी कमी पगारावर मान्य केले..

गौरीने एक पॉईंट सर करायचा प्रयत्न केला. मी शुभलक्षणी आहे म्हणून निदान नोकरी गेली नाही असे सांगायचा विचार होता तिचा!

तारका - ह्यांनाही इतका त्रास झाला ना सुरुवातीला नोकरीत.. वैतागलेलेच असायचे सारखे..

अंजली - खरंय तुझं.. आपल्याला घरात बसून समजत नाही.. पण बाहेर फार त्रास होत असेल सगळ्यांना.... नाही का??

तारका - नैतंकाय? .. मी आलेच हं...

काहीतरी कारणाने तारका वर गेली त्याला पाच सहा मिनिटे झाली तश्या अंजली वहिनी गौरीला म्हणाल्या..

अंजली - बरं झालं बाई तू आलीस या घरात ते... नाहीतर माझं एकटीच नुसतं...

गौरी - ........ म्हणजे??

अंजली - काय सांगायचं तुला... गीता गेली कानपूरला.. आणि ही अशी..

गौरी - ???

अंजली - एक काम पूर्ण करत नाही.. सगळं मलाच बघावं लागतं..

गौरीला या वाक्याचा भयंकर संताप आला. मगाशी ती इथे नसताना दोघी तिच्याबद्दल बोलत होत्या. आता तारकावहिनी वर गेल्यावर अंजलीवहिनींनी त्यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली.

काय माणसं आहेत ही! नुसती टीका आणि गॉसिपिंगच?? चांगले का नाही बोलत कुणीच कुणाबाबतच?

गौरी अबोल झालेली पाहून अंजली वहिनींना भीती वाटू लागली. ही सांगते की काय तारकाला?

अंजली - का गं? बोलत नाहीस??

गौरी - बोलतीय की?? मला काही माहीत नाही अजून घरातलं..

अंजली - एकेक कळलं की थक्क होशील तू.. अण्णाभावजींना फ्लॅट मिळतोय बॅन्केकडून.. तर सगळं लक्ष तिकडेच हिचं.. तिथे हे करायचंय तिथे ते करायचंय.. आता निदाम मला तू तरी आहेस सोबतीला..

गौरी - तुमच्यावर खूप प्रेम आहे पण त्यांचं.. त्यांना घर बदलताना फार त्रास होईल..

अंजली - माझं काय कमी प्रेम आहे? पण.. किंमत नसते गं अश प्रेमाची..

गौरी वैतागलेल्या मनाने काम करत होती. या घरात फक्त 'जो उपस्थित नाही' त्याच्याबद्दलच्या कागाळ्या करण्यात सगळ्यांना दिलचस्पी आहे की काय असे तिला वाटत होते.

रात्री जेवताना मात्र भडका उडाला.. वसंताच्या नोकरीबाबत पुरेशी चर्चा झाल्यानंतर...

वसंताने डायरेक्ट सगळ्यांसमोरच गौरीला विचारले..

वसंता - ते दाण्याचं कूट आपल्या खोलीत कशाला ठेवलंय??

गौरी - अं?? .. लाडू करायचे होते ना...

वसंता - मग .. केलेस का??

गौरी - नाही...

वसंता - ... का?

गौरी - मी म्हंटलं घरातलं आधी बघायला हवं.. वेळ मिळाला तर लाडू करायचे..

वसंता - घरात करतीच आहेस की काम??

वसंता अजून नॉर्मलच होता. त्याच्या 'करतीच आहेस की काम' या वाक्यात इतर कुणी दुखावले जावे असा हेतूच नव्हता. पण अंजली वहिनी भडकल्या.

अंजली - घरात सगळेच काम करतात भावजी... आणि घरातलं बघायला हवं म्हणजे काय गं?

गौरी - अं?? नाही नाही... म्हणजे तुम्हाला मदत तर करायला हवी ना दोघींना..

अंजली - भावजी... हिला लाडवाचा धंदा करायचा असला तर खुश्शाल करूदेत ... आम्ही पाहू घरातलं..

वसंता - .. हो पण.. ही पण आहेच की घरातलं पाहायला.. इतका काही वेळ लागत नाही लाडवाला..

अंजली वहिनींनी नाक मुरडलेले पाहून वसंता अधिक खोलात गेला.

वसंता - काय झालं वहिनी?? नाराज दिसताय...

अंजली - काही नाही... नाराजी काय... आयुष्यालाच पूजलेली आहे...

वसंता - काय झालं काय पण??

दादा - काय रे तुम्ही सगळे जेवताना असेच विषय काढता?? गप्प बसा दोघे...

वसंता - हो पण माझं इतकच म्हणणं आहे की गौरीचं काही चुकलं तर सांभाळून घ्या...

अण्णा - आता भाजीत मीठ जास्त झालं तर कसं सांभाळून घ्यायचं?? साखर घालून??

अण्णाची थट्टामस्करी करण्याची वृत्तीच होती. कुमारदादा हासला.

अंजली - अण्णाभावजी... भाजीत मीठ जास्त झालं तर साखर घालता येते...

अण्णा - ... मग??

अंजली - ... संसारात ... झालं तर???

सगळेच गप्प झाले. काहीतरी झालेले असावे असे वसंताला सारखे वाटत होते. गौरी सगळ्यांना वाढत होती.

वसंता - गौरी?? काय झालं??.. सांगशील का मला??

गौरी - क...कुठे काय??.. काहीच नाही झालं..

अंजली - वसंता भावजी... आपण एक शांत करून घेऊ... तुमच्या लग्नानंतर लगेच नोकरीचा हा प्रॉब्लेम झाला..

'वहिनी' म्हणून ताडकन ओरडला वसंता! गौरीने त्याच्याकडे धावत त्याच्या तोंडावर हात दाबला. कुणालाच हे वाक्य तसं आवडलेलं नव्हतंच! बाबा तर घास हातात घेऊनच बघत बसले होते पानाकडे!

पण वसंता भावजी सगळ्यांच्या समोर ओरडल्यामुळे अंजलीवहिनींनी तो स्वतःचा अपमान मानला.

अंजली - माझ्यावर ओरडता?? तुम्ही माझ्यावर ओरडता??

अंजली वहिनींचा तापलेला आवाज पाहून वसंताने मान खाली घातली. गौरीच्या डोळ्यांना धारा लागलेल्या होत्या.

तेवढ्यात तारकावहिनी म्हणाल्या...

तारका - एवढं कुणी काही बोललं की रडण्याचे आमच्यावर नाहीत बाई संस्कार झाले माहेरी..

या वाक्याने आणखीनच रडू लागली गौरी! कारण नसताना हे सगळे चाललेले होते. त्यातच आई उद्गारल्या..

आई - एवढं कुणी बोललं म्हणजे काय गं? तुला कोण बोलतंय इथे??

अण्णा - आई.. अगं तू कशाला उगाच ओढवून घेतीयस...

आई - तू गप्प बस.. काय गं तारके??

तारकावहिनींना डायरेक्ट सासूच बोलत असल्यामुळे आता बोलण्याचे धाडस उरलेले नव्हते.. आई बोलतायत पाहून अंजलीवहिनीही गप्प झाल्या... उगाच नव्या सुनेसमोर सगळ्यांचाच उद्धार व्हायचा..

पण वसंता कसा गप्प बसेल?

वसंता - मी आधीच सगळ्यांना एक सांगून ठेवतो.. ते पत्रिका वगैरेवर माझा काहीही विश्वास नाही.. आणि त्या कारणावरून हिला कुणीही बोलत जाऊ नका पुन्हा.. हिला आधीच दु:खं आहे आयुष्यात..

आता मात्र तारका कडाडली.

तारका - तुम्ही सगळ्यात लहान आणि सगळ्या मोठ्यांना बोलताय??? आज तुमची ही लाडाची बायको कामं सोडून लाडू करायला वर निघून गेली... लग्न झाल्याला पंधरा दिवस नाही झाले तर लाडवाचा धंदा करण्यापर्यंत यांना स्वातंत्र्य.. आणि आम्ही नुसते इतक्या वर्षांनी शिफ्ट होणार म्हंटल्यावर 'एकत्र कुटुंब आहे, असा निर्णय कशाला घेताय' म्हणून बोलणार.. वा रे वा...

झाला प्रॉब्लेम असा की 'असा निर्णय कशाला घेताय' हे वाक्य मागे कुमारदादा अण्णाला म्हणाला होता. त्याला तारकावहिनींनी या वादात उगाचच ओढले. पण तो शांत स्वभावाचा होता.

दादा - वहिनी... तो वेगळा विषय आहे.. मी ते फक्त प्रेमाने म्हणालो होतो.. मला काय तुमची प्रगती पाहवणार नाही का??

दादांनीच शाब्दिक मार दिल्यावर तारकाने मान खाली घातली. पण अंजली वहिनींनी त्या मुद्याचे भांडवल केले.

अंजली - भावजी तुमच्यासमोर मला अन हिला म्हणतायत .. गौरीला असे वागवा अन तसे वागवा.. आणि असे असे केलेत तर चालणार नाही.. इतक्या वर्षाच्या आपल्या संसारात कधी लहान भावाला तरी तुम्ही असे म्हणाला होतात का?? यांचे लग्न झाले म्हणजे आमच्याच डोक्यावर मिरे वाटणार.. लाडू वळून हे श्रीमंत होणार आणि दाण्याचं कूट घरातल?? वा??

गौरी स्फुंदत होतीच! वसंता नेहमीप्रमाणे अन्न अर्धेच ठेवून बाहेर निघून गेला. गौरीने आवराआवर एकटीनेच केली सगळी!

पण तिला खूप आश्चर्य वाटावे असा एक प्रकार झाला. ओट्यापाशी बेसीनमध्ये सगळी भांडी ठेवत असताना तिला मागे कुणाची तरी चाहुल लागली. सगळे बाहेरच्या खोलीत बसलेले असतना इथे कोण आलं म्हणून तिने दचकून पाहिले तर कुमारदादा!

कुमारदादाने गौरीला एवढ्याची एवढी होताना पाहिलेले होते. तीही त्याला 'ए दादा'च म्हणायची.

पण आता नाते वेगळे होते.

गौरी - .... तुम्ही??

दादा - गौरी.. बेटा.. या दोघी जरा... जरा.. म्हणजे.. थोड्याश्या वादावादी करणार्‍या आहेत... तू.. लहान असलीस तरी... तू... समजून घे हां?????

आज घरात एक मोठाच आधार गौरीला मिळाला होता. कुणी पाहिले तर काय वाटेल याचा विचारही न करता लग्नापुर्वी तिचे कुमारदादाशी जसे नाते होते त्याची आठवण होऊन तिने स्फुंदत स्फुंदत कुमारदादाच्या छातीवर आपले डोके टेकवले. दादानेही तिला थोपटले.

आणि हा इतका मोठा आधार मिळाल्याच्या आनंदात ती आपल्या खोलीत झोपायला निघून गेल्यावर.. तिथे आणखीन दोन मोठे आनंद तिची वाट पाहात होते...

वसंता तिला हळूच सांगत होता..

".... चितळ्यांकडचे आम्ही तिघे चौघे मिळून .... एक हॉटेल टाकणार आहोत... आजच जागा बघून आलो.. भिकारदास मारुतीपाशी आहे.. "

वसंताच्या डोळ्यातील ती उमललेली स्वप्ने पाहून गौरीला खूप खूप आनंद झाला.. पण तितक्यातच.. तो आनंदही विसरावा लागला कारण त्याच्या पुढचा आनंद लगेचच झाला..

तिच्या बाबतीत ते जवळपास दिड पावणे दोन वर्षांनी घडत होते...

वसंता आपला हात पुढे करून म्हणत होता...

"या हॉटेलचा शकुन चांगला व्हावा म्हणून.... मी... तुझ्यासाठी ही.. वेणी आणली होती... गैरसमज करणार नाहीस अशी आशा आहे... नाहीये ना काही गैरसमज???? "

गुलमोहर: 

धन्यवाद बेफिकिरजी!!!!!!!!!!!!!!
पुढचा भाग लवकर टाकल्याबद्द्ल खुप खुप खुप खुप आभारी आहे.

धन्स

धन्स

धन्स

मस्त...

हाण तेजायला

बेफिकीर, एकदम झकास .....
हीच कादंबरी चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद , एका दिवसात दोन भाग, मस्त

खरंच! पटकन नवीन भाग वाचायला मिळाल्यामुळे लिंक तुटली नाही. मस्तच चाललीये कादंबरी... विषय घरगुती वादविवाद असा असला, त्यात नावीन्य नसले तरीही त्याचे कंगोरे छान पद्धतीने मांडले आहेत. प्रसन्नला अनुमोदन! हिच कादंबरी चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद! आता कृपया ही संपल्याशिवाय दुसरीकडे वळू नका... तुमची लिहितांना तुटलेली लिंक कथेमध्ये परावर्तीत होते आणि मग ती कथा कंटाळवाणी वाटायला लागते. ही आपली माझी एक विनंती... बाकी तुमची मर्जी.

सानी ला अनुमोदन.
आता कृपया ही संपल्याशिवाय दुसरीकडे वळू नका... तुमची लिहितांना तुटलेली लिंक कथेमध्ये परावर्तीत होते आणि मग ती कथा कंटाळवाणी वाटायला लागते. ही आपली माझी एक विनंती... बाकी तुमची मर्जी.
अगदी खरय सानी म्हणते. हि माझी पण विनंती

सहि.... छान जमलाय हा भाग....
कुमारदादाचि हि तिला साथ आहे हे वाचुन अजुनच चांगल वाटल.. बाकि अंजलि वहिति जरा म्हणजे शकुनि मामि च आहे.. हा हा हा हा Happy