घर - ६

Submitted by बेफ़िकीर on 27 January, 2011 - 07:39

नातेवाईक या प्रकारासारखे खरे तर वाईट काही नाही. जितके चांगले तितकेच वाईट!

सणासुदीला, लग्नकार्यांना, मयतीला अगदी झाडून सगळे हजर! एकमेकांशी इतके हसून खेळून की असे वाटावे की एकत्रच राहतात.

आणि पाठी फिरल्या की द्वेष सुरू, गॉसिपिंग सुरू, टीका सुरू!

असेच असते असे नसेलही, पण अनेक ठिकाणी असेच असते.

कर्तव्य पार पाडावी लागणे हा नातेसंबंधांमधील एक अप्रिय प्रकार होऊन बसलेला आहे. म्हणजे 'या या चुलत बहिणीला इतकी इतकी भाऊबीज घातली' तर त्याच नात्याने 'त्या त्या चुलत बहिणीलाही तितकीच ओवाळणी घालायला हवी' ही अपेक्षा किंवा हे कर्तव्य! का असे? एखाद्या भावाला एखादी बहीण जास्त जवळची वाटणे शक्य नाही का?

पण हे झाले दूर दूर राहणार्‍यांच्याबद्दल!

एकाच घरात सगळे असले तर??

आणि पटवर्धनांच्या सदाशिव पेठेतील घरात सगळे एकत्रच राहात होते. अगदी त्या दिवशीही! आणि त्या दिवशीही सगळ्यांनाच चेहरे असे करावे लागले होते जणू आजवरच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाची घटिका हीच आहे.

रजिस्टर्ड लग्न करून गौरी आणि वसंता घराच्या दारात आले आणि त्यांना ओवाळण्यापासून सर्व काही अंजली वहिनी व तारका वहिनींनी केले. आईंनीही कौतुक केले. इतकेच काय तर वेदा आणि उमेशही या नवीन डेव्हलपमेन्टचे स्वागतच करत होते. आजवर ते जिला गौरी ताई म्हणायला शिकले होते तिला अचानक काकू म्हणायला लागणार होते त्यांना! बाबा, कुमारदादा आणि शरद अजूनही काहीसे सावधपणेच सर्व प्रसंगांमधून वावरत होते. गौरीच्या आई म्हणजे अक्का यांच्या डोळ्यांचे मात्र पाणी थांबत नव्हते.

आपल्या मुलीला तिच्या विवाहानंतर सोसाव्या लागलेल्या अत्यंत दुर्दैवी प्रकारांची झळ अलगद बाजूला होत होती. एक नवीन आयुष्य, एक नवीन नाते सहजच निर्माण होत होते. तेही ज्या कुटुंबाबरोबर आजवरचे सर्व सण, उत्सव साजरे केले त्या समोरच्याच पटवर्धनांच्याच घरात!

या गोष्टीचा किती आनंद मानावा आणि किती अपराधीपणा हे अक्कांना समजत नव्हते. अपराधीपणा यासाठी की गौरीच्या आधीच्या सासरच्यांनी मोठ्या मनाने या विवाहाला मान्यता दिलेली होती. ते म्हातारे दांपत्य बिचारे स्वतःच्या मुलाच्या आणि नातवांच्या निधनाच्या शोकातच इतके बुडालेले होते की त्या भरात आपल्या सुनेला तिचे आयुष्य सुरू करायलाच हवे ही बाब त्यांनी अगदी सहज स्वीकारलेली होती. आणि अक्कांना नेमके याचेच दु:ख होत होते. सद्सद्विवेकबुद्धीमुळे!

आणि गौरी स्वतः??

तिचा चेहरा शरमिंदा होता. त्या चेहर्‍यावर दिसणारे भाव समजायची कुणाचीही मानसिक पात्रता नसावी. आपण एका घरात लग्न करून गेलेलो होतो. आपल्याला दोन मुले झाली होती. त्यानंतर शिर्डीहून येतानाचा तो भयानक अपघात! त्यात आपल्याव्यतिरिक्त आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा झालेला भयानक अंत! दोन्ही मुलांच्या निधनामुळे आजही तितक्याच तडफडीने आक्रोशणारे हृदय, सगळे संपल्याची भावना निर्माण करणारी अंतहीन पोकळी, अवलक्षणी म्हणून हिणवण्यात येण्याची भावना, सासरी निर्माण झालेले भकासपण, आईच्या मनावर पुन्हा आलेला आपला भार, एक क्षणही असा नाही की आपल्यापोटच्या गोळ्यांच्या स्पर्शासाठी आसूसलेला नसेल, आपल्या नवर्‍याच्या आधारासाठी विलाप करत नसेल!

आणि हे सगळे सहन करून वर्ष, सव्वा वर्ष काढलेले असतानाच एक दिवस पटवर्धनांच्या घरी काही कारणाने जाणे होणे! नेमके त्या दिवशी वसंताशिवाय घरात कुणी नसणे! आणि वसंताने म्हणणे..

"गौरी... मला... तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं.. मन मोकळं करून ऐकणार असलीस तर.. इथे बोलू की... आपण कुठे भेटू शकू??"

घराच्या फरशीला खिळलेले पाय, थिजलेले शरीर, डोक्यात विचारांची भयावह वादळे, काय ऐकायला मिळणार या भीतीयुक्त कुतुहलाने मन पोखरून निघणे आणि समाजाची लज्जा इतकेच म्हणायला प्रवृत्त करणे..

"..... भेटणे... शक्य नाही..."

'भेटणे शक्य नाही' याचा अर्थ 'आत्ता बोलणे शक्य आहे' हे वसंताला समजायला लागलेली दोन मिनिटे, तेही, ती तिथेच, त्याच्याकडे पाठ करून उभी राहिल्यामुळे त्याच्या लक्षात येणे... आणि नंतर त्याने म्हणणे..

"आयुष्यात... इतकी तीव्र आणि कोलमडवणारी वळणे असू शकतात यावर तुझा विश्वास बसू शकत असेल तर आणि तरच मी हे वाक्य बोलतो गौरी... मला... मला तुझ्याशी .... या... या आत्ताच्या परिस्थितीत लग्न करायची फार इच्छा आहे..... खूप खूप विचार कर... मी जमेल तितके खूष ठेवेनच.. पण एक नक्की सांगतो... निदान मी जिवंत असेपर्यंत... तुझ्या आयुष्यात 'तुला कुणीच नाही' ही भावना कधीही निर्माण होऊ देणार नाही... खूप विचार कर.. हवं तर.. एक वर्षभर विचार केलास तरी चालेल.. नकार दिलास तरी चालेल... मला तू हवी आहेस म्हणून मी हा प्रस्ताव मांडत आहे..... आणि... "

वसंताच्या त्या 'आणि' नंतरची गॅप असह्य झाल्याने आणि आत्तापर्यंतच्या मन पिळवटून टाकणार्‍या वाक्यांनी हतबुद्ध झाल्याने निर्जीवपणे मान वळवून गौरीने वसंताकडे पाहिले....

वसंताने मान खाली घातली... प्रेम किंवा प्रेमासंदर्भात भावना व्यक्त करताना पुरुष स्वतःही लाजतात...

"आणि... ज्या दिवशी तुझा होकार ठरेल... त्याच दिवशी ... ती खिडकी उघड... कृपया.... आणि.. तोवर उघडू नकोस.. मी.. मी रोज रात्री शक्य तितका वेळ त्या खिडकीकडे पाहात बसेन.. झोप अनावर झाली तरच झोपेन... जा तू...."

'जा तू'! 'जा तू' असे म्हणून जाता येते की 'ये तू' असे म्हणून येता येते?? मन म्हणून काही असते की नाही?? दैवाने तरी काय काय दिवस दाखवावेत??

गौरीमधील जुनी कुमारिका जागृत झालेली होती. अभ्यासाचे पुस्तक वाचून झोपायच्या आधी उगाचच पडदा हालवल्यासारखे करून वसंता अजून पाहतोय का याची शहानिशा करणारी गौरी!

कुठल्या कुठे पोचले होते सगळे! लग्न करून सासरी जाताना या घराकडे, त्या खिडकीकडे पाहावेसेही वाटत नव्हते. लग्नात हा आला तेव्हाही इतका कोरडा कोरडा वागत होता! स्टेजवर आपल्याला भेटायला आला तेव्हा आपल्याशी एक शब्दही बोलू शकला नाही. यांच्याशीच बोलून पटकन निघून गेला.

आणि मग ती मीलनाची रात्र, त्या आणाभाका, ते मधुर क्षण, दिवस, महिने आणि वर्षे, मुलांचे जन्म, वसंताला विसरण्याची हातोटी साधलेली, माहेरी आलो तरी जणू मानलेला भाऊच असावा अशी वागणूक आपण त्याला देणे..

... आणि आज... आज आपण उद्ध्वस्त झाल्यावर ... फक्त... फक्त वसंताने साथ देण्याची तयारी दाखवणे.. तेही... आपल्यावर उपकार म्हणून नव्हे.. तर त्याची गरज म्हणून... आणि तेही... आपण विचार करायला कितीही वेळ घेतला आणि नकार दिला तरी चालेल याची तयारी दाखवून.. म्हणजे अजूनही निर्णय आपल्यावरच अवलंबून... आणि आता म्हणतोय... 'जा तू???????'

धावत धावत आपल्या घरी जाऊन आईच्या मांडीवर डोके ठेवून हमसून हमसून रडली गौरी! आईला वाटत होते त्याच जुन्या दु:खाचा उमाळा आला. पण... जवळपास पंधरा मिनिटे आईच्या मांडीवर डोके तसेच ठेवून आपले रूदन आटोक्यात आणणार्‍या गौरीने शेवटी उठून आईकडे बघत ते वाक्य उच्चारले...

"वसंता... मला विचारतोय लग्न करतेस का माझ्याशी..."

इतकी तीव्र उलथापालथ अक्कांच्या मनात यापुर्वी कधीही झालेली नव्हती. काहीच कळत नसल्याप्रमाणे त्या नुसत्याच बघत राहिल्या गौरीकडे!

"म... मग??? ... मग काय म्हणालीस???? ... असा गाढवपणा कसा केला त्याने???"

"म्हणाले काहीच नाही आई... पण.. "

"पण काय?? मला माहीत आहे गौरी... तुला तुझा संसार कधीच नाही विसरता येणार... काळजी करू नकोस.. मी कुमारच्याईंशी बोलेन.. त्या समजावतील त्याला.. तू नको घाबरूस..."

"मी.. मी लग्न करणार आहे त्याच्याशी..."

सहा तास! सहा तास त्या घरात प्रचंड वादावादी चाललेली आहे हे बाहेरून कुणालाही कळणे शक्य नव्हते.

आणि सगळा स्वयंपाक केलेला असूनही एक घासही न खाता दोघी आपापल्या खोलीत झोपण्याच्या प्रयत्नात जाग्याच असताना...

.... तब्बल पहाटे अडीच वाजता ... गौरीने तिच्या खोलीची खिडकी.. खाडकन उघडली तेव्हा...

.... ती नजरानजर वर्णन करण्याच्या पलीकडची होती.. खिडकीतच झोपलेल्या वसंताला गौरीच्या खिडकी उघडण्यामुळे जाग आली होती आणि दोघे एकमेकांकडे पाहातच राहिले होते... कित्येक वर्षांपुर्वी जमलेल्या त्या अव्यक्त प्रेमाला आज व्यक्त होता आले होते... पण दु:खांचे हजारो आवंढे गळ्याच्या आत गेल्यावरच...

जे हवे होते तसे झाले
जे नको ते सर्व झाल्यावर

आणि दोनच महिन्यांनंतर आज गौरीचा पटवर्धनांच्या उंबर्‍यातून आत प्रवेश झाला होता... मात्र यावेळेस..

मिसेस गौरी वसंत पटवर्धन म्हणून!

=======================================

"तुला वाटत असेल की घरच्यांची तुझ्याबाबत नेमकी काय भूमिका असेल.. नाही आवडलेले कुणाला.. खोटे बोलून आणखीन नको ते गैरसमज निर्माण करण्यापेक्षा मला असे वाटते की... काय ते खरे बोलून टाकावे गौरी... मला आणि मलाच तू आवडतेस... या घरातील लोकांपैकी... इतरांना न आवडण्याचे कारणही फार विचित्र आहे.. तू अवलक्षणी आहेस असे त्यांचे म्हणणे आहे... तुझ्या पत्रिकेत कडक मंगळ आहे त्यामुळे तुझ्यावर ते सर्व ओढवले... आणि तू ज्या घरात पत्नी म्हणून जाशील तिथेही हेच होईल असे त्यांचे म्हणणे आहे..

... गौरी... किती नवलाईची बाब आहे नाही?? ज्या पहिल्या रात्रीची स्वप्ने नवरे वयात आल्यापासून पाहतात.. त्या आजच्या रात्री मला तुला अत्यंत अप्रिय बाबी सांगायची इच्छाच होत आहे असे नाही तर मी सांगतही आहे... त्याला कारणही तसेच आहे गौरी.. एक स्त्री म्हणून, एक पुन्हा एकदा नवविवाहीत झालेली स्त्री म्हणून.. एक पुन्हा एकदा आपले आधाराचे माहेर सोडून परक्या घरी आलेली स्त्री म्हणून तू आजही गप्पच बसशील, संकोचाने, लज्जेने, सोशिकपणे आणि काहीशी बावरून.. कारण मी नवरा आहे.. नवरा... ज्याच्या हातात बायकोला मिळू शकणारा सामाजिक सन्मान, मातृत्व आणि राहणीमान असते असे सगळे समजतात... असा नवरा.. पण आज तू घाबरू नकोस.. हा तुझा पहिला विवाह नाही.. आणि हे तुला पुन्हा सांगण्यात तुला हिणवण्याचा माझा हेतूही नाही.. पण गौरी... तू तुझ्या लहानश्या आयुष्यात ते चढ उतार पाहिलेले आहेस जे मोठ्या वयाची माणसेही पाहात नाहीत.. एका क्षणात सर्व स्वप्नांचा चक्काचूर झाला तुझ्या... तुला होऊ शकत असलेल्या मानसिक वेदनांना शब्दात बांधण्याचे कसब असायला मी एखादा वक्ता किंवा लेखक नाही गौरी... पण इतकेच सांगतो की आयुष्यभर मी हे लक्षात ठेवेन की आता जरी तू माझी झालेली असलीस तरी काहीश्या अगतिकपणातून तू माझी झालेली आहेस... तुला एक वेगळे विश्व मिळालेले होते जे कदाचित खूप खूप सुंदर असेलही.. पण जे नष्ट झाले.. आणि त्यामुळे तू हा माझा होण्याचा मार्ग स्वीकारलास.. पूर्णपणे त्याचमुळे असेही नसेल.. तुझी इच्छाही असणारच.. पण.. ती परिस्थिती कारणीभूत तरी आहेच..

.. अशा या टप्यावर तुला बेसावध ठेवणे, तुझ्या मनात काही नवीन स्वप्ने निर्माण करायचा प्रयत्न करणे.. हे एक नवरा म्हणून जरी कदाचित मला शोभत असले तरी मित्र म्हणून नक्कीच शोभणार नाही.. आणि.. आणि आपण सर्वात प्रथम एकमेकांचे अत्यंत चांगले मित्र आहोतच ना?? .. आधीपासूनच आहोत..

तेव्हा.. या टप्यावर तू ज्या वास्तूत आलेली आहेस... तेथील लोकांचा तुझ्याबाबतीतला दृष्टिकोन काय आहे, अपेक्षा काय असतील, हे मी अगदी आजच सांगायला हवे आहे असेही नाही म्हणा... पण खरं सांगू?? मी फार अधीर आहे हे सगळे तुला आजच सांगण्याबाबत.. त्यातही माझाच स्वार्थ आहे म्हण.. कारण मला तुला एक दृष्टिकोन द्यायची अत्यंत घाई झालेली आहे गौरी.. अत्यंत घाई.. उद्या सकाळी जेव्हा तू पहिला चहा ठेवण्यासाठू स्वयंपाकघरात हालचाली करू लागशील त्या क्षणापासूनच तुला त्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल..

एक लक्षात ठेव.. की मी म्हणतो इतकी काही भयंकर परिस्थिती अजिबातच नाही आहे.. पण जेथे बघण्यातच दोष असतो ना? तेथे सगळ्यातच दोष दिसतो.. गौरी तुला आश्चर्य वाटेल.. जगातील कोणता नवरा लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या बायकोला आपल्याच घरातील लोकांबाबत काहीबाही सांगेल??

मी सांगण्याचे कारण इतकेच की.. तू माझ्यासाठी आणि त्यांच्याहीसाठी अत्यंत वाईट शकुनाची आहेस हे त्यांचे मत अगदी ठाम आहे.. आणि ते माझे मत अजिबातच नाही.. यामुळे.. तुला आणि मला... सतत सिद्ध होत राहावे लागणार आहे.. सर्वच आघाड्यांवर.. स्वयंपाकघरात मारल्या गेलेल्या टोमण्यांपासून ते आर्थिक सामर्थ्यावर केल्या गेलेल्या कोट्यांपर्यंत! फोडणी कशी करावी या गोष्टीच्या शैलीपासून ते कमीत कमी बोलून नम्र कसे राहावे या कसोटीपर्यंत..

तुझा हा नवरा त्याच्या सर्व भावंडांमध्ये सर्वात गरीब व सर्वात कमी शिकलेला आहे.. प्रेम हाच या घराचा पाया असला तरीही.. जे व्हायचे ते सर्व होतच असते येथेही.. हेवेदावे आहेतच, कुत्सित टोमणे, छद्मी सुस्कारे आणि रागवारागवी आहेच, प्रेमही आहेच.. पण काय असते गौरी.. की 'प्रेम आहे' हे सिद्ध होण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती निर्माण व्हावी लागते.. या उलट 'राग आहे' हे सिद्ध करणारी परिस्थिती चोवीस तास निर्माण होत असते.. जगाचा न्यायच म्हंटला पाहिजे हा..

याचवेळेस आणखीही काही गोष्टी मला तुला सांगाव्याश्या वाटतात... तुला वैवाहिक आयुष्याचा अनुभव आहे.. मला नाही.. नवर्‍याने बायकोला कसे वागवावे, कसे वागवतो, काय केल्यास तो योग्य वागवेल या सर्व बाबींवर तुझी आधीच काही मते असतील... ती मते तू मला बिनदिक्कतपणे सांगत जा.. नवरा आणि बायको यातील कुणालाच मी अधिक श्रेष्ठ मानत नाही गौरी.. आणि हे पुस्तकी वाक्य बोलण्यापेक्षा अंमलात आणणे मला अधिक महत्वाचे वाटते.. तेव्हा... आपल्य दोघांमधील संवाद हा अत्यंत बोलका, मैत्रीयुक्त आणि प्रामाणिक असावा अशी माझी इच्छा आहे...

तिसरी गोष्ट.. मी अजून दारू प्यायलेली नाही.. पुढे प्यायची आहे वगैरे मनात नाही.. पण नाहीच प्यायची असेही काही नाही.. मी स्मोक करतो हे तुलाही माहीत आहेच.. तेवढे मात्र मोठ्या मनाने विसरून जा.. त्यावर आपण अधिक वाद घातल्यास माझ्या मनात तुला फसवून स्मोक करण्याची इच्छा प्रबळ होऊ शकेल.. त्यामुळे वारंवार तुझ्यापासून दूर राहण्याचे प्रसंग मला निर्माण करावे लागतील.. त्यापेक्षा ते तू मान्य करावेस अशी माझी विनंती...

चवथी बाब... मी तुझ्यावर खूप पुर्वीपासून प्रेम करतो.. तुला नुसते पाहूनही माझा दिवस आनंदात जायचा.. तुझे लग्न झाले तेव्हा माझ्या मनाची तडफड जगातल्या कुणालाही समजली नाही.. कदाचित ती तुलाच समजलेली असेल.. पण मी तुला दोष देणारच नाही कारण एक तर मी तुझ्याकडे माझे प्रेम व्यक्तच केलेले नव्हते.. अशा परिस्थितीत तू पुढाकार घ्यावास असे आपले संस्कार नाहीत.. तेव्हा.. त्या काळाइतकेच माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे यावर विश्वास ठेव.. हा लग्नाचा प्रस्ताव मी तुझी कीव येऊन दिलेला नसून माझी मानसिक गरज म्हणून मांडलेला होता यावर विश्वास ठेव..

पुढे.. आपल्या दोघांमध्ये पती पत्नी असण्याची भावना पुरेशी बळकट होईपर्यंत मी तुझा आणि तुझ्या मनात असलेल्या अपार दु:खाचा अपमान करणार नाही.. यातूनही गैरसमज होऊ नयेत.. त्याचा अर्थ असा समजू नकोस की मला तुझ्यात इन्टरेस्ट नाही.. ती एक तडजोडही नाही.. मात्र .. एक नक्की की.. जेव्हा तू स्वतःहून माझा पती म्हणून स्वीकार करशील तेव्हाच आपल्यात तसे संबंध असावेत असे मला वाटते.. तू फक्त डोळ्यासमोर असणे हीच माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे... आता तर तू कायमच 'माझी' असणार आहेस.. त्यामुळे त्या आनंदानेच गुदमरायची वेळ आलेली आहे माझ्यावर..

गौरी.. मी तुला कोणत्या प्रकारचे राहणीमान देऊ शकेन, या घरात इतर मोठ्यांच्या तुलनेत कितपत सन्मान प्रदान करू शकेन याबाबत मी पोकळ बढायाही मारणार नाही आणि निगेटिव्हही बोलणार नाही. माझे प्रयत्न तरी हेच असतील की अधिकाधिक चांगले जीवन दोघांना जगता यावे..

एवढे सगळे बोलून झाल्यावर शेवटच्या दोनच गोष्टी बोलतो गौरी..

... माझे आत्तापर्यंतचे बोलणे हे केवळ बोलणेच आहे.. ते कृत्यात आणण्याचा प्रयत्न करताना मी कुठे कमी पडलो तर तूच मला मार्गावर आण.. मला तू अवलक्षणी वाटत तर नाहीसच.. पण.. उलट शुभशकुनी वाटतेस.. कारण तुझ्यावरतीच जीव जडलेला होता आणि केव्हाही आणि कोणत्याही परिस्थितीत का होईना, पण तू मला प्राप्त झालीस..

आणि शेवटचे.. शेवटचे जे सांगायचे आहे ते हे की...

.... आता मी शांत बसून तुझे बोलणे ऐकणार आहे.. नवर्‍याने एकट्यानेच भाषण ठोकण्याच्या मी विरुद्ध आहे... तुला जे काही बोलायचे असेल ते बोल.. मी फक्त ऐकणार आहे... "

वसंताचे बोलणे संपले तेव्हा दोन्ही गुडघ्यांवर आपले दोन्ही हात ठेवून त्यावर आपली मान टेकवून पलंगावर बसलेली गौरी त्या खोलीच्या खिडकीतून आपली खिडकी कशी दिसते हे पाहात होती आणि वसंताचे शब्द मनात साठवत होती.

वसंताने अचानक बोलायला सांगीतले तशी ती काहीशी बिचकून सावरलीच! पण 'काहीच बोलायचे नाही' अशा सलज्ज भूमिकेत ती आता राहिलेली नव्हती. एक दु:खाचा समुद्र पार करून ती या टप्यावर आलेली होती. येथे आज न बोलणे हेच चुकीचे ठरले असते कदाचित!

"आता आपलं लग्न झालेलं आहे म्हणून विचारतीय... मी तुला.. ए म्हणायचं की अहो?????"

"पुर्वीप्रमाणेच हाक मार.. "

"पण.. घरात सगळे??"

"मी गीतावहिनीला ए च म्हणतो..."

"हो पण.. कुणीच आपल्या यजमानांना ए म्हणत नाही..."

"तुला वाटेल तसं.. हवं तर त्यांच्यासमोर अहो म्हण.. माझे काहीच म्हणणे नाही... बोल... "

कितीतरी वेळ गौरी तशीच बसलेली होती. वसंता घरात स्मोक करायचा नाही. त्याने उठून खिडकी बंद केली. जगाला समजायला नको की यांची खिडकी पहिल्या रात्री उघडीच होती.

अजूनही गौरी अबोलच होती. वसंताही हळूहळू आपल्या विचारांमध्ये गढू लागला होता.

अचानक गौरीने शांततेचा भंग केला.

"मी... लग्नाला का तयार झाले माहीत आहे वसंता?? "

दचकलाच वसंता!

"का?? ... नाही माहीत मला..."

"आईसाठी... "

वसंताने मान खाली घातली.

"माझी आई म्हातारी झाली आहे.. माझ्याशिवाय तिला कुणी नाही आहे.. अशा परिस्थितीत आपली विधवा मुलगी कशी जगेल ही काळजी करत तिला मरण येऊ नये असं मला वाटत होतं.. सासू सासर्‍यांनी मला घरात ठेवलं नसतं असं नाहीच आहे.. ते दोघेही प्रेमळ आहेत.. पण.. शेवटी मी एकटीच आहे ही भावना तिला कायम छळत राहिली असती..."

"पण.. तू तर... तू तर म्हणत होतीस की तुझ्या आईंचा आधी विरोध होता म्हणून???"

"तो विरोध वेगळ्या गोष्टीमुळे होता वसंता... आपली अशी 'अवलक्षणी' मुलगी आपल्या समोर वर्षानुवर्षे राहणार्‍या पटवर्धनांकडे देणे याची लाज वाटत होती तिला.. विश्वासघात वाटत होता तिला तो.. स्वार्थ समजला जाईल असे वाटत होते.. "

"मागणी मीच... "

'मीच मागणी घातली होती ना' हा प्रश्न वसंताने अर्धाच सोडला. या मागणीला मागणी म्हणता येणार नव्हते. या प्रस्तावाला मागणी असे संबोधून गौरी दुखावेल असे वसंताला वाटले होते.

गौरीने मात्र तोच धागा पकडला आणि बोलायला सुरुवात केली.

"मागणी... किती छान... सुखद.. रोमॅन्टिक शब्द आहे.. सगळं व्यर्थ असतं वसंता.. माझं पहिलं लग्न होण्याआधी आपलं एकमेकांकडे बघणं व्यर्थ असेल असं आज वाटत नसलं तरी तेव्हाच्या, त्या काळातल्या संदर्भांमध्ये ते व्यर्थच ठरलेलं होतं.. मी दुसर्‍या घरात गेलेले होते.. आणि आज इथे आलेली आहे तर... माझ्याकडे आता दोन मने आहेत वसंता.. दोन मने.. एक मन पहिल्या लग्नाआधीचे आपले दोघांचे खिडकीतून एकमेकांना पाहणे कसे होते याची आठवण काढत बसलंय तर... दुसरं मन.. "

गौरीला हुंदका फुटला. वसंताने तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवून थोपटले. त्या स्पर्शात वासनाही नव्हती आणि नेमके प्रेमही नव्हते. त्यात होती फक्त दया! तिच्या भावविश्वात झालेल्या पराकोटीच्या तीव्र आघातांमुळे निर्माण झालेली दया!

"विपुल.. विपुलचे प्रेत तर बघण्याच्याही लायकीचे नाही राहिले रे वसंता.. दोन वर्षाचा होता.. वर्षा चार वर्षांची.. पुढच्या सीटवर हे ड्राईव्ह करत होते अन शेजारी ही दोघे... मी दोन मिनिटासाठीच विपुलला वर्षाकडे दिले.. तो एक क्षण... तो एक क्षण मी कोणत्या जन्मात विसरेन वसंता???

तुला सांगू??? तुझे माझ्यावर अनंत अनंत अनंत उपकार आहेत.. की मला तू अशा परिस्थितीत स्वीकारलेस.. माझ्या आईवर केले आहेस हे उपकार तू..

वसंता.. वेळ काहीही असो.. तुझ्या या संसारात, तुझ्या या घरात आणि घरच्यांच्या बाबतीत.. मी अगदी तुला हव्वी तश्शीच वागेन... काहीही अपेक्षा ठेवणार नाही त्या उप्पर.. तुला आणि सगळ्यांना विश्वास ठेवायला लावेन की तुझा निर्णय तुम्हाला वाटतो त्यापेक्षाही खूपच योग्य होता..

पण वसंता... नाही रे... मी.. मी माझ्या मुलांना.. नाही विसरू... शक..."

गौरीचे ते ओक्साबोक्शी रडणे मधुचंद्राच्या रात्रीला शोभणारे नसले तरीही... सच्चे होते... सच्चेपणाला शोभेलसे होते...

वसंता - माझ्या मनात मध्यंतरी... म्हणजे आपले लग्न नुसतेच ठरले तेव्हा.. एक विचार आला होता... पण तो चुकीचा होता..

गौरी - ..... कसला..... काय विचार??

वसंता - माझ्या मनात आलं की आपल्या दोघांना जर मूल झालं तर कदाचित तुझं ते दु:ख काहीसं हलकं होऊ शकेल... पण... पण तो चुकीचा विचार आहे गौरी.. तुझंच बरोबर आहे... असलं दु:ख कधी कमी होऊ शकेल का???

गौरी - वसंता.....

वसंता - ......

गौरी - ........

वसंता - ... काय????

गौरी - माझ्या... माझ्या आईने ... तुझ्या आईंना सांगीतलेले होते... हे... तुला माहीत नाही????

वसंता - ..... काय????

गौरी - .........माझे ऑपरेशन झालेले आहे....

खट्टकन मान खाली घातली वसंताने! पण निमिषार्धात वरही घेतली.

वसंता - मग प्रॉब्लेम काय?? मूल तर काय... दत्तकही घेता येईल.. आणि तेही.. हवं असलं तरच..

गौरीने वसंताच्या चेहर्‍यावर अनेक भावना परतून गेलेल्या पाहिल्या आणि मनोमनच त्याच्या संभाषण चातुर्याला दाद दिली.

वसंता - तू... तू झोप...

गौरी - अन तू??

वसंता - हे काय?? ... इथे झोपणार मी...

गौरी - मी झोपते तिथे... तू इथे झोप..

वसंता - छे छे...

गौरी - छे छे काय छे छे..

गौरी बोलेपर्यंत वसंता आडवाही झालेला होता. मधुचंद्राची रात्र वांझ जाणार असली तरीही इतका पवित्र मधुचंद्र कुणाचाच झाला नसेल.. नुसत्या संवादांमधून एकमेकांबद्दलचे अतीव प्रेम आणि भावनांचा आदर व्यक्त झालेला होता...

आणि आठ दिवसांनी सकाळी वसंता चितळ्यांच्या दुकानात पोचला तेव्हा..

"पटवर्धन.. हे तांबे म्हणून आहेत.. हे आजपासून कॅश बघणार आहेत... आमच्याच लांबच्या नात्यातले आहेत.. गरीब आहेत... तुम्ही काउंटरवर या..."

".. प... पण.. आता.. पुन्हा मी काउंटरवर???"

"म्हणजे काय?? कामाची लाज आम्ही बाळगत नाही.. "

"पण.. मग माझा.. कॅशियर अलाऊन्स..."

"नाही नाही.. आता काउंटरप्रमाणेच पेमेंट... "

"................"

"बघा.. जमतंय की कसं???"

"साहेब... मी अकरा वर्षे इथे काम करतोय... हे तुम्ही म्हणताय ह्याला काही अर्थ आहे का?? "

"सॉरी हो सॉरी.. आता काय करू?? ... जाहीर माफी मागू???"

"सरळ काढतोय नोकरीवरून म्हणा की???"

"आम्ही कुणालाही नोकरीवरून काढत नाही.. कधीही..."

"पण पगार कमी करता..."

"काम तसा पगार.."

"अहो पण उद्या तुमचे दहा नातेवाईक आले तर या सगळ्या पोरांना जायला सांगणार का??"

"अलबत??.. प्रश्नच नाही.. आपली काय लिमिटेड कंपनी आहे का?? का सरकारी ऑफीस आहे??"

" मी रिक्वेस्ट करतोय.. की दोन महिने तरी मला द्या... माझं नुकतंच लग्न झालंय..."

"माफ करा.. पण आमच्याकडे जे काम आहे ते हे आहे.. काउंटरवचं.. "

वसंताने बराच वाद घालून शेवटी काउंटरवरचं काम मान्य केलं!

त्या रात्री मात्र खोलीत आल्यावर त्याने गौरीला निराश मनाने सांगीतलं..

"गौरी... आज... आज मला काम बदलून दिलं अगं.. पुन्हा काउंटरवर आलो मी... पगार चारशेने कमी झाला माझा..."

सुनसान शांतता असलेल्या त्या खोलीत अनेक क्षणांनी गौरी उद्गारली...

"जाउदे रे... ऐक ना?? चित्रशाळेपासच्या दुकानाला रोज उपासाचे दाण्याचे लाडू लागतात... मी करायचे घरी माहेरी असताना.... करायला लागू का पुन्हा?? तेवढेच अडीचशे सुटतील...."

वसंताने खाली मान घालून होकार दिला... मूकपणे..

त्या रात्री वसंता झोपल्यानंतर गौरी त्याच्यापाशी आली आणि म्हणाली..

"वसंता... तुला तर नाही नं रे असं वाटत?? की... मीच अवलक्षणी आहे म्हणून???"

"बावळट आहेस... मला नोकरीवरून काढत होते... मन मोठं करून काउंटरवर घेतलं मला.... झोप आता..."

'दाण्याचे लाडू' यावरून रामायण होईल याची मात्र दोघांनाही कल्पना नव्हती.

गुलमोहर: 

बेफिकीरजी,
एका दमात वाचला हा भाग. आवड्ला. कसे सुचते तुम्हाला, मानवी मनाचे बारकावे टिपणे, आणी ते पण सहज शब्दात ? घर परत चालु केल्याबद्द्ल आभार.

मस्त.
हा भागही आवडला.
कथा पटापट पुढे सरकली तर छानच होईल.
वसंताच भाषण आवडलं. Happy
गौरी आपल्या ऑपरेशनचे वसंतापासून लपवून ठेवेल असे वाटत नाही, तसेच त्याची आईही या गोष्टीचा उल्लेख लग्न होईस्तोवर करणार नाही हे पट नाही.

या कथनकात वाचक गुंतायला जर वेळ लागला. पण अता हि कदम्बरी छान पकड घ्यायला लागलि आहे. आता बद करु नका. आता सगळे वाट बघतिल पुढच्या भागाचि.
मोना मधे वाचक पहिल्या वाक्या पसुन गुंतले. हिला थोडा वेळ लागला एवढ्च.

त्रिवार धन्यवाद. भाग वाचायच्या आधि मी कधि हि प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आज लॉग इन केल्यावर घर भाग ६ पाहिले आणी खुप खुप आनंद झाला. तुम्ही लिहित राहा बास. वाद्-विवादात पडु नका. मी एक प्रामाणिक वाचक म्हणुन केलेली विनंती आपण ऐकलीत त्याबद्द ल आभार!!!

तुमचे लिखान प्रेरणा देणारे असते. त्यातुन काही शिकण्यासारखे असते................ तुमच्या प्रत्येक कथेतुन काही तरी बोध घेतला पाहीजे. येथे नवरा-बायको मधले विचार खुप छान मा॑डले आहे. प्रत्येक स्त्री-पुरुष जर या विचाराने चालला तर या जगातले घटस्फोटकाचे प्रमाण कमी होईल. कोणामध्ये ही भा॑डणे होणार नाही आणि त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीवर चा॑गले स॑स्कार होतील.

कुपा करुन तुम्ही अशा कथा सादर करत रहा त्या था॑बवु नका. पुढे चालत रहा मागे वळुन पाहु नका.
All The Best

गौरी आपल्या ऑपरेशनचे वसंतापासून लपवून ठेवेल असे वाटत नाही, तसेच त्याची आईही या गोष्टीचा उल्लेख लग्न होईस्तोवर करणार नाही हे पट नाही.>>> अगदी अगदी.... माझ्या मनातलं...त्याच्या आईसाठी हा खरं म्हणजे मोठ्ठा इश्शू असायला हवा... ती कसा तो बोलायचे सोडेल?

निमिशाच्या प्रतिसादाला अनुमोदन! तसेच विधवेचा विवाह हा आजही न स्वीकारला जाणारा विचार. ही १९८० सालातली कथा आहे, हे विचारात घेता, धाडसी निर्णय... वसंताची वैचारिक बैठक फार आवडली... छान खुलवला आहे हा भाग.

आजचा भाग जास्त आवड्ला.. बरे झाले घर परत चालु झाली. इथे प्रामाणीक मते देणारे किती आहेत, माहीत नाही. म्हणूनच, आपण लिहीत जा. तुमच्या प्रत्येक कथे मधून खुप काही शिकता येते.

पुन्हा घर चालु केल्याबद्दल धन्यवाद >>>> प्लिज अस लिखान थांम्बवायच बोलु नका हो.

वसंता चे विचार ग्रेट.. म्हणजे हा जो सवाद मांडलाय ना त्याला तोड नाहि. हा म्हणजे असा आशयाचा नाहि पण अश्या स्वरुपाचा संवाद प्रत्येक नात्यात गरजेचा असतो असे माझ मत...

आता वसंताचि नोकरि हया वरुन ऊद्या सकाळि काय होणार देव जाणे, आणि दाण्याचे लाडु तर रामायण घडवणार ... बिच्चारो गौरी ह्या प्रसंगाला कसे सामोरे जानार....

'प्रेम आहे' हे सिद्ध होण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती निर्माण व्हावी लागते.. या उलट 'राग आहे' हे सिद्ध करणारी परिस्थिती चोवीस तास निर्माण होत असते.. जगाचा न्यायच म्हंटला पाहिजे हा..

मधुचंद्राची रात्र वांझ जाणार असली तरीही इतका पवित्र मधुचंद्र कुणाचाच झाला नसेल.. नुसत्या संवादांमधून एकमेकांबद्दलचे अतीव प्रेम आणि भावनांचा आदर व्यक्त झालेला होता...

तब्बल पहाटे अडीच वाजता ... गौरीने तिच्या खोलीची खिडकी.. खाडकन उघडली तेव्हा...

.... ती नजरानजर वर्णन करण्याच्या पलीकडची होती.. खिडकीतच झोपलेल्या वसंताला गौरीच्या खिडकी उघडण्यामुळे जाग आली होती आणि दोघे एकमेकांकडे पाहातच राहिले होते... कित्येक वर्षांपुर्वी जमलेल्या त्या अव्यक्त प्रेमाला आज व्यक्त होता आले होते... पण दु:खांचे हजारो आवंढे गळ्याच्या आत गेल्यावरच...

बेफिकिरजी खरं खरं सांगायचं तुम्ही आयुष्यात खूप सोसलं आहे हे खरं आहे ना?
त्याशिवाय हे अम्रूत स्त्रवणारच नाही. खरं ना?

' बेफिकीर '

प्रथ्म धन्यवाद....

तुम्चि "घर" हि कादंबरी पण छान चालली आहे अशिच चालु राहु दे.....हि विनन्ति ...

सम