प्रसिद्ध वाक्ये व काव्यपंक्ती

Submitted by साधना on 27 January, 2011 - 01:04

माझी मुलगी येत्या मार्च मध्ये १०वीची परिक्षा देतेय. मराठीच्या परिक्षेसाठी निबंध लिहिताना प्रसिद्ध वाक्ये व काव्यपंक्तींचा आधार घेतला तर आपला निबंध जरा वेगळा वाटेल आणि त्यामुळे थोडे मार्क वाढतील अशी तिची अपेक्षा आहे. तिचे स्वतःचे वाचन आहे आणि त्यातले जे लक्षात राहते ते ती वापरतेच, पण सोबत तुला काही मिळाले तर पाठव अशी सुचना तिने मला केलीय. Happy

मी नेटवर आणि इतरत्र धुंडाळतेयच, पण कुठलीही मदत लागली की माबोवर धाव घ्यायची सवय लागलीय. म्हणुन ही विनंती - प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध लोकांची वाक्ये, काव्यपंक्ती किंवा इतर काही इथे दिलेत तर मदत होईल. इथे शोधताना सुभाषितांचा एक ब्लॉग सापडला तिथलेही काही घेतेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा, साधना Happy

सुगंध ही फुलांची भाषा. जे फूल ती भाषा बोलत नाही ते 'अबोली'.

- शं. ना. नवरे यांचं मला आवडलेलं वाक्य. Happy

माझ्याकडे आहेत बरीच वाक्ये लिहिलेली एका वहीत आम्ही त्या वहिला गोडाऊन म्हणायचो. मी तुला पाठवते वाक्ये Happy
* श्रद्धाहीन जीवन म्हणजे शीड नसलेले जहाज.
* माणूस पक्ष्याप्रमाणे हवेत उडायला शिकला, माश्याप्रमाणे पाण्यात पोहायला शिकला पण माणसाप्रमाणे माणसाशी वागायला नाही शिकला तर काय उपयोग?
*समर्पणाची हाक जयांच्या ह्रुदयाला कळली समर्थ झाले राष्ट्र तयांचे अभेद्य बलशाली
*इरादे नेक होतो सपने भी साकार होते है , अगर सच्ची लगन हो तो रासते आसान होतेहै
*विस्म्रुतीच्या अरण्यात माझ्या आठवणींचा घोडा उधळला

सध्या एवढेच आठवतेय तुझा पत्ता मला मेल कर माझ्याकडे रेडीमेड खूप सुंदर निबंध आहेत मी वहीच झेरॉक्स करून पाठवून देते (माझी आई शाळेत शिक्षिका होती तिने लिहून दिलेले आहेत ते ) तुला नक्की पाठवते.

" केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥ यत्न तो देव जाणावा । अंतरी धरितां बळें ॥ अचूक यत्न तो देवो । चुकणें दैत्य जाणिजे ॥"

" कष्टेविण फळ नाहीं । कष्टेविण राज्य नाहीं ॥ आधी कष्टाचे दु:ख सोसिती । ते पुढे सुखाचे फळ भोगिती ॥ आधी आळसें सुखावती । त्यांसी पुढे दु:ख ॥"

" आधी संसार करावा नेटका । मग घ्यावें परमार्थ विवेका । येथें आळस करु नका । विवेकी हो ॥"

-- संत रामदास

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।

-- तुकडोजी महाराज

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

-- संत ज्ञानेश्वर

आता परिक्षेला खूपच कमी वेळ असल्याने, नविन काही तरी तिला वाचायला सांगण्यापेक्षा रोज एक तास तिला
म.टा. / निबंध / पुस्तक वाचून दाखावावे. निबंध लिहिताना, प्रामाणिक पणा जरूर असावा व न समजणारी अलंकारिता टाळावी. स्वःतःच्या भावनेला प्राधान्य द्यावे,असे वाटते. तिच्या इतर भाषा चांगल्या असतील तर मनातल्या मनात भाषांतर करून लिहायला सांगावे- सविनय.

अरे बापरे.. कसला डांगेर धागा आहे.. मराठी निबंध लिहायचा म्हणजेच काटा येतो अंगावर.. पेपरमध्ये सगळ्यात शेवट लिहायचा निबंध... त्यच्यात आठवून वाक्य वगैरे म्हणजे तर कहरच...

हातवळणे भावंडांचं एक पुस्तक आहे मराठी निबंधांचं.. सुरेख निबंध आहेत त्याच्यात. त्यांनी त्यांच्या दहावीच्या परिक्षेच्या वेळेस तयारी म्हणून लिहिलेले..

गेल्या वर्षी माझा मुलगा दहावीला होता. त्यालासुद्धा मी असेच निबंधातील वाक्यांबद्दल सांगत असे.
१) कोणतीहि विद्या ही एखाद्या रोपासारखी असते. तिला निष्ठेचे खत व मनाच्या एकाग्रतेचे पाणी मिळाले तरच ती वाढते.
२)माणसाने राजहंसासारखे असावे. जे आपणाला पटेल तेच घ्यावे, नाही ते सोडून द्यावे.
३)वसंत म्हणजे निसर्गदेवतेची रंगपंचमी!
४)जगात अज्ञानाईतका मृत्यूहि क्रुर नसतो.
५) मानवाचं मोठेपण वयानं सिद्ध होत नसतं, ते त्याच्या कर्तुत्वाने सिद्ध होतं!
६) संयम आणि असूया एकाच ठिकाणी नांदत नाहीत.
७) त्रुषार्त असणं हे पुण्य, त्रुप्त होणं हे पाप!

मुळात अशी सगळी वाक्ये कुठुन तरी उचललेली आहेत हे परिक्षकांना कळल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे कृत्रिम मांडणी ना गुण मिळवुन देइल ना समाधान .

आणि हा सगळा अट्टाहास कशासाठी ? शर्यतीसाठी? त्यापेक्षा मुलीला स्वतःचे विचार स्वत:च्या शब्दात मांडायला प्रोत्साहन द्या. विचार करु द्या, तिचं तिला व्यक्त होउ द्या. विचारांच्या समृद्धीशी ओळख करुन द्या. तिची अभिरुची संपन्न करा. शब्दांचा आनंद घ्यायला शिकवा.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे आशय सुंदर हवा, मग तेच साधे साधे शब्द आपोआप सुंदर होतात.

असो. लय बरळलो ग्लानीत.

हातवळणे भावंडांचं एक पुस्तक आहे मराठी निबंधांचं.. >> अक्षरशिल्पे नाव आहे त्याचे. अजूनही कुठल्याही प्रदर्शनात मिळते. जरा पीळ आहे, पण मुलांना परिक्षेसाठी ठिक असावे.

अशी संदर्भ सोडून गोळा केलेली वाक्यं कशी लक्षात राहणार किंवा का पाठ करायची? तिचं तिला जे आवडल्यामुळे लक्षात राहिलंय / राहील ते परीक्षेतच काय, कायम राहील तिच्यापाशी.
मला हा एकूण उपक्रम पटला नाही.

साधना, अवांतर वाचनाची(वृत्तपत्रासकट) आवड/सवय सुरुवातीपासूनच असेल, तर ठीक.(तिचे स्वतःचे वाचन आहे आणि त्यातले जे लक्षात राहते ते ती वापरते, हे पुरेसं ठरावं) आता परीक्षेला महिनाभर शिल्लक असताना अशी वाक्य गोळा करून खूप फरक पडेल का?
निबंधांच्या विषयांचा पॅटर्न पण ठरलेला असतो. कदाचित काही काही विषय फिरून फिरून येत असतील. त्यांच्याशी संबंधित नेमकी वाक्ये/काव्यपंक्ति/सुभाषिते शोधून चपखलपणे वापरता येत असतील, तर तेवढे करावे.

इथे अनेकांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःचे विचार , स्वतःच्या शब्दात व्यक्त करता आले तर अधिक बरं.
नवीन परीक्षापद्धतीत इतका बाऊ करण्यासारखं काही वाटत नाही. मराठीसाठी तोंडी परीक्षेचेही गुण घेतात ना आता?

आज्-कालची मुलं इतकी काहि साधीभोळी नसतात. उलट पालकांचि सारखी आपल्यामागे भुणभुण नको म्हणून त्यांच्यामागे असे काहितरी उद्योग लावून देतात . आणि आम्हि बिचारे पालक आमचे दहावीचे दिवस आठवत कामाला लागतो.(!) तेवढीच आमचिहि उजळणी!!!!!!!!!!!!!! Happy

अशी स्टॉक वाक्ये पाठ करण्यापेक्षा तिच्या वाचनातली तिला आवडलेली वाक्य संदर्भासहित ( लेखक /संपादक /प्रकाशक , पृष्ठ क्रमांक इत्यादी ) एखाद्या वहीत लिहून ठेवायची सवय लावणे जास्त चांगले नाही का ?

जे तिला आवडेल, पटेल , मनाला भिडेल ते सहजच लक्षात राहील.

कितने आदमी थे हे कोणी पाठ केलंय का ? पण किती जणांना पूर्ण येतो तो डायलॉग ?

दो सरकार
वो दो और तुम तिन. फिरभी वापस आ गये. क्या समझकर आये थे. सरदार बहुत खुस होगा. शाबसी देगा.
दुर दुर तक जब कोई बच्चा रोता है तो उसकी मा कहती है. सो जा नही तो गब्बर आयेगा. और ये हमरा नाम पुरा मिट्टीमे मिलाय दे है. इसकी सजा मिलेगी बराबर मिलेगी.
- ओय सांभा कितनी गोली हैरे इसमे.
- छे सरदार
- आदमी तिन.. गोली छे. बहुत ना इन्साफी है
डिंक्च्याव, डिंक्च्याव डिंक्च्याव
- अब ठिक है. आदमी तिन और तिन गोली. अब हम इसे घुमाई दे रहे. अब किस खाने मे गोली है और कह गोली नही हमे कुछ नही पता.

हातवळणेंची तिनही अक्षरशिल्पे भाग आणून सरळ घोकून घे वेळ कमी आहे आणि नाही म्हणायला कागद काय बोलतो हेच खरंय आपल्या देशात ...कटू असलं तरी हे सत्य नाकारता येणं अशक्य आहे.

'हतवळणे चोर आहे'- संदर्भ:- 'गच्चीसह झालीच पाहिजे', बटाट्याची चाळ Proud
रच्याकने, ते 'अक्षरशिल्पे' रेफर्न्स म्हणून चांगले आहे.

हातवळणेंची तिनही अक्षरशिल्पे भाग आणून सरळ घोकून घे वेळ कमी आहे आणि नाही म्हणायला कागद काय बोलतो हेच खरंय आपल्या देशात ...कटू असलं तरी हे सत्य नाकारता येणं अशक्य आहे >>> काहीच्या काही.

साधना, तुझ्या लेकीने लिहिलेले पत्र आणि छोटे प्रवासवर्णन दोन्ही छान होते. तिला अजिबात उसनं काही लिहायची गरज नाही.

सगळ्यांचे अगदी मनापासुन आभार..... Happy

आता वेळ कमी आहे हे बरोबर आहे. तिची तयारीही झालीय बरीचशी, तरीही जेवढे जमेल तेवढे नजरेखालुन घालायचेच असे तिने ठरवलेय. जेवढे आठवेल तेवढे छापेल परिक्षेत.

भरत, आता परिक्षा ८० मार्कांचीच आहे, आपल्या वेळेसारखी १०० मार्कांची नाही. आणि वर तिन तास लिहायला मिळतात. २० मार्क तोंडी परिक्षेला.

रच्याकने, तिच्याकडुन काहीच घोकुन घेता येणार नाही. एकतर ती हॉस्टेलला आहे, तिच्या अभ्यासावर माझा काहीच कंट्रोल नाही आणि त्यात तिचा घोकंपट्टीला विरोध आहे. मार्क कमी मिळाले तरी चालतील पण घोकंपट्टी करुन परिक्षेला जाणार नाही हा तिचा निर्धार आहे.... मीच हातीपायी पडुन 'हे दहावीचे वर्ष आहे त्यामुळे तुझे आदर्श विचार जरा बाजुला ठेव आणि मिळतील तेवढे मार्क पदरात पाड' म्हणुन विनवले आहे. Happy

परिक्षांसाठीचे रेडीमेड निबंध, त्यांची पुस्तकं यांच्याइतकं शैक्षणिक दारीद्र्य दुसरं नाही. माफ करा.
मार्क त्यामुळेच मिळतात हे खरं असेल तर अजूनच मोठ्ठं दुर्दैव.
माणसाची स्वतः विचार करण्याची क्षमता, शक्यता सगळ्या मारून टाकायच्या आणि बंद डोक्याचे, चौकोनी, छापाचे गणपती बनवायची कामं आहेत ही.

साधना,
माफ कर इथलं बाकी डिस्कशन वाचलं आणि रहावलं नाही. बाकी सिंडीशी सहमत तुझ्या मुलीच्या बाबतीत. अशी वाक्ये पाठ करून आणि ती पेरून निबंध चांगला होतोच असं नाही. ते केवळ डेकोरेशन आहे.
तुमचा मुद्दा तुम्ही किती स्पष्टपणे, सुटसुटीतपणे मांडताय हे महत्वाचं. तेव्हा आता या वाक्यांच्या मागे वेळ घालवण्याची काहीही गरज नाही.
असं दिसतंय की तुझी मुलगी अतिशय स्पष्ट विचार करू शकते. तर त्याचं प्रतिबिंब पडेलच निबंधांमधे.
आणि सिरीयसली कणभरही जीव नसलेले, मोठी मोठी वाक्ये ठासून भरलेले, छापील निबंधच मार्क मिळवून देतात असं मलातरी वाटत नाही. पण तसं सांगणारे असतील तर त्यांना निबंध आणि शिक्षण दोन्हीचा अर्थ समजत नाही असं मला वाटतं.
अर्थात हे सगळं तुला माहीत असणारच आहे. Happy
घोकंपट्टी ही सनावळ्या, गणिताचे फॉर्म्युले, विज्ञानातले काही थिअरम्स इतपर्यंत ठीक आहे. तुझ्या मुलीच्या निर्धाराचे मला खरंच कौतुक वाटते. आवडलीच. Happy

बाकी हातवळणे प्रकार एकुणातच पीळ आहे. दोन्ही मुलांना बोर्डात आणण्यासाठी काय काय केले वालं एक महापीळ पुस्तक आहे त्या दोघांच्या आईवडिलांनी लिहिलेलं. मुलांची वैचारीक क्षमता, मेंदूचा सर्वांगीण विकास इत्यादी कसं मस्तपैकी मारून टाकावं याचं उत्तम उदाहरण आहे ते पुस्तक म्हणजे.
बाकी बोर्डात येऊन आणि पोत्याने मार्कं मिळवून हातवळणे बंधूभगिनी आता काय करतात हे बघणं किंवा एकुणातच बोर्डात आलेल्या जनतेचं आता काय चाललंय हे बघणं जरा डोळे उघडवणारं ठरेल.

नीधप, तुझे बरोबर आहे. मलाही ते पटते आणि माझ्या लेकीलाही ते पटलेले आहे.

पण १०वीचे पेपर कसे लिहायचे याचा आता एक फॉर्मॅट बनुन गेलाय. प्रश्नांची उत्तरे देताना एक लहान पॅरा धड्याचे,लेखकाचे नाव, सारांश यासाठी, मग खाली उत्तर इ.इ.करावेच लागते. तिच्या वर्गातल्या काहीजणींनी हे सगळे घोकुन ठेवलेय आणि ही घोकंपट्टी सगळ्या विषयांसाठी केलीय Sad मी हैराण झाले हे ऐकुन. ऐशु अशा मुलींची किंव करते, पेपर दिल्यानंतर ह्या मुलींना विषयातले काहीही आठवत नाही हे तिने पाहिलेय, पण काय करणार? परिक्षा तुम्हाला विषय किती समजलाय ह्याची नाहीय तर तुम्ही परिक्षेत कागदावर किती सेम टु सेम रांगोळी घालु शकता याची आहे...

या वर्षीच्या सुरवातीलाच या विषयावर आमचा मोठा संवाद आणि थोडा वाद झाला. इतकी वर्षे मी विषय समजण्यावर भर दिला आणि ह्या वर्षी मी अचानक कोलांटी उडी मारुन मार्क हा परवलीचा शब्द बनवला हे पाहुन ती थक्क झाली. पण माझाही नाईलाज आहे. ११वीला तिला आर्ट्सला अ‍ॅडमिशन पाहिजेय आणि आता त्यासाठीही पोत्यांनी मार्क लागतात... गुणवत्ता असुनही केवळ मार्कांमध्ये ती प्रतित न झाल्यामुळे मुलीने चांगल्या कॉलेजला मुकावे हे मला मान्य नाही (चांगले कॉलेज ही व्याख्याही आता खुप सापेक्ष झालीय... दु:खे प्रचंड वाढत चाललीत Happy ). त्यामुळे मनात नसुनही ह्या आचरट शर्यतीत धावावेच लागतेय.

या वर्षीपासुन अभ्यासक्रम बदलतोय. मार्च २०११ ही जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची परिक्षा. पुढच्या मुलांचे आयुष्य सुखकर जावो हीच अपेक्षा.

दोन्ही मुलांना बोर्डात आणण्यासाठी काय काय केले वालं एक महापीळ पुस्तक आहे त्या दोघांच्या आईवडिलांनी लिहिलेलं>>> 'यशवंत व्हा' नाव त्याचे! मी दहावीला असताना आईने आणलं होतं ते पुस्तक! ते मी वाचायच्या आधी बाबांच्या हाती लागलं, त्यांनी त्याची चांगलीच 'समिक्षा' केली आणि मी वाचलो.

मोठी मोठी वाक्ये ठासून भरलेले, छापील निबंधच मार्क मिळवून देतात असं मलातरी वाटत नाही.>>> नी, दुर्दैवाने हे खरे आहे. 'विचारातील नाविन्य' या कॅटॅगरीला काही मार्क नाहीत. मुळात तुम्ही कसाही लिहीलेला निबंध वाचायला त्या परिक्षकाकडे वेळ कुठे आहे? तो फक्त पहिल्या दोन, मधल्या दोन आणि शेवटच्या दोन ओळी वाचतो, शब्दसंख्या पुरेशी आहे का ते पाहतो आणि देतो मार्क. आता या ओळीत एखादे चमको वाक्य आले की मार्क जास्त.

बाकी हातवळणे प्रकार एकुणातच पीळ आहे. दोन्ही मुलांना बोर्डात आणण्यासाठी काय काय केले वालं एक महापीळ पुस्तक आहे त्या दोघांच्या आईवडिलांनी लिहिलेलं. मुलांची वैचारीक क्षमता, मेंदूचा सर्वांगीण विकास इत्यादी कसं मस्तपैकी मारून टाकावं याचं उत्तम उदाहरण आहे ते पुस्तक म्हणजे.
बाकी बोर्डात येऊन आणि पोत्याने मार्कं मिळवून हातवळणे बंधूभगिनी आता काय करतात हे बघणं किंवा एकुणातच बोर्डात आलेल्या जनतेचं आता काय चाललंय हे बघणं जरा डोळे उघडवणारं ठरेल.<< नी तुला १०० टक्के अनुमोदन पण मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही त्यामुळे माझ्या सामन्य बुद्धीला जे सुचलं ते ल्हिहिलं कारण एकच होतं कागद खूप नाचवावा लागतो या देशात :(..असो तुमचं चालू द्या ...कुणाच्या आदर्शांना धक्का पोहोचला असेल तर माफ करा

या धाग्यामुळे अनेक सुंदर वाक्य/कवितेच्या ओळी वाचायला मिळतील हे खरंच चांगलं आहे. परंतु,
’१० वीच्या परीक्षेच्या दृष्टीने मराठी निबंधाची तयारी’ हा या धाग्याचा महत्वाचा उद्देश दिसत असल्याने फक्त त्याच अनुषंगाने काही सांगू इच्छितो.

छान निबंध लिहावा, मार्क वाढतील असं जरी वाटत असलं तरी किती मार्क वाढतील याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अगदी प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला निबंधात १० पैकी जास्तीत जास्त ८ मार्क मिळत असावेत असा अंदाज आहे. (सद्ध्या निबंधाला किती गुण असतात ठाऊक नाही. म्हणून १० गुण गृहित धरले आहेत.) सर्वसाधारण विद्यार्थ्याला ४ ते ७ च्या दरम्यान गुण, आणि अति सामान्य निबंधाला ४ पेक्षा कमी गुण दिले जात असावेत असा कयास आहे. साधनाजी, तुमची मुलगी ४ ते ७ या गुणांच्या कक्षेत बसत असावी असे गृहीत धरतो. आता अगदी व्यावहारिक विचार केला असता, समजा जर निबंधाची खूप तयारी करून घेतली तर किती गुण वाढतील ? जास्तीत जास्त २ (किंवा दुर्मिळ शक्यतेने ३). मग या २ गुणांच्या संदिग्ध वृद्धीसाठी किती वेळ आणि शक्ती खर्ची घालायची याचा गांभीर्याने विचार करणं नितांत गरजेचं आहे.

निबंधाच्या तयारीत जेमतेम २ गुण (तेही अनिश्चित) वाढविण्यासाठी, जिवाचा आटापिटा करण्यापेक्षा जे निश्चित गुण मिळवून देणारे प्रश्न आहेत त्यांची पक्की तयारी केल्यास आपोआपच चांगले गुण मिळू शकतात. असे प्रश्न म्हणजे : ’व्याकरण विभाग’, ’पत्रलेखन’, ‘कहाणी लेखन’, ‘बाहेरच्या उतार्‍यावरील प्रश्न’, ’पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न’. यातला व्याकरण विभाग तर अधिक पक्का करावा यात पूर्ण गुण मिळण्याइतकी तयारी करावी. पत्रलेखनामध्ये ’मायना’, पत्राअखेरीस पत्रलेखकाचे नांव(स्वत:चे नव्हे) लिहिण्याची पद्धत, व्यावसायिक पत्रात अनिवार्य असलेला ’विषय’, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ’लिफाफ्याचं चित्र’ या सर्वांची उत्तम तयारी करावी.

आम्ही(मी आणि माझी पत्नी) काही वर्षांपूर्वी आमच्या घरगुती शिकवणी वर्गातील मुलांना वरील परिच्छेदात सांगीतल्याप्रमाणे मार्गदर्शन करायचो. अर्थात् निबंधाची देखील माफक प्रमाणात तयारी करून घेतली. इंग्लिश माध्यमातील त्या मुलांना मराठी विषयात उल्लेखनीय गुण मिळाले. (१०० पैकी ८० ते ८७ गुण) यातल्या बहुसंख्य मुलांची मातृभाषा मराठी नसून हिंदी, गुजराथी, मल्याळी यापैकी आहे. हा अनुभव, पूर्ण १०० मार्काचा पेपर असायचा तेव्हाचा आहे. सध्या तर २० मार्क तोंडी परीक्षा, years work करिता दिले जातात.

हातवळणेंची पुस्तकं मी वाचली आहेत. त्यातील निबंध चांगले असले तरी १० वीत शिकणार्‍या मुलांसाठी (मराठी तसंच इंग्रजी माध्यम) ते जडच वाटतात. हातवळणेंनी इतक्या लहान वयात एखाद्या साहित्यिकासारखे निबंध लिहिले. सर्वसामान्य किंवा हुषार मुलांमध्ये अशी साहित्यिक प्रतिभा विरळा असते. त्यामुळे तसे निबंध इतर मुलांनी लिहावेत ही अपेक्षा धरणं बरोबर वाटत नाही. असो ... हा एक वेगळा विषय आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निबंध आवडणं हे व्यक्तिसापेक्ष असतं. अर्थातच त्याला दिले जाणारे गुणही तसेच सापेक्ष असू शकतात. त्यामुळे जिथे निश्चित मार्क मिळतील अशा प्रश्नांची जोरदार तयारी करणं हेच श्रेयस्कर. ’हातचं सोडून पळत्याच्या पाठी’ धावू नये

टीपा :
१) वरील सर्व गोष्टी ’हिंदी’ या विषयासाठी देखील लागू आहेत.
२) ‘सविस्तर उत्तरे’ तसंच पाठ्यपुस्तकातील धडे दिवसातून थोडा वेळ (अर्धा/एक तास) मोठ्याने वाचावीत. यामुळे बघणं, वाचणं, आणि ऐकणं असा तिहेरी परिणाम (Triple Action) तेवढ्याच वेळात साधता येतो.
३) घोकंपट्टी अजिबात करू नये.
४) ’उत्तरं’ संक्षिप्त मुद्यांत परिवर्तित करून ध्यानात ठेवावीत.

फारच मोठी पोस्ट झाली......
यापेक्षा निबंध परवडला असं म्हणण्याची पाळी येण्याआधीच थांबलेलं बरं. Lol

साधना,
पटेश.

आगावा Happy
हातवळणे कन्या माझ्याच बॅचची आणि सुपुत्र दोन वर्ष लहान त्यामुळे ते पुस्तक येईतो मी १०-१२ वीच्या दुष्टचक्रातून निसटले होते. नशीब माझं.
पण मार्कांचं तू म्हणतोस ते वाचून खरंच आश्चर्य आणि वाईट वाटलं.
कसलीही घोकंपट्टी न करता लिहिलेल्या निबंधांमधेच मला सगळ्यात जास्त मार्क पडायचे. ते कसे काय कळत नाही.

>>मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही त्यामुळे माझ्या सामन्य बुद्धीला जे सुचलं ते ल्हिहिलं कारण एकच होतं कागद खूप नाचवावा लागतो या देशात<<
मी शिक्षण तज्ञ नाही, आणि तसा आवही मी आणलेला नाही. मी पण माझ्या अतिसामान्य बुद्धीला आणि अनुभवाला जे योग्य वाटलं तेच लिहिलंय. १०-१२ वीच्या मार्कांचा कागद पुढची हवी ती अ‍ॅडमिशन मिळाल्यानंतर कुठेच नाचवावा लागत नाही. १०-१२ वीच्या मार्कांवर अ‍ॅडमिशन शिवाय काहीही अवलंबून नसते. त्याला त्यापेक्षा जास्त उदात्त करायची गरज मला वाटत नाही.
असो....

Pages