एकला दारी उभा मी

Submitted by निशिकांत on 25 January, 2011 - 23:40

एकला दारी उभा मी वृक्ष, फांद्या वाळलेल्या
वेदना गत आठवांच्या अंतरी घोंगावलेल्या

कैक पक्षांचा, पिलांचा राबता तो सांजवेळी
आजही कानात घुमती किलबिली त्या ऐकलेल्या

गात होत्या कोकिळाही आड पानांच्या दडूनी
विव्हळते मन आठवूनी मैफिली त्या रंगलेल्या

ऊन रखरख झेलले मी सावली देण्या जगाला
त्या जगा कळती न माझ्या भावना हेलावलेल्या

पान नाही फूल नाही मी कफल्लक आज आहे
सावल्या सूर्यास्त होता पाहिल्या ना थांबलेल्या

भैरवी रागात गातो गीत अस्ताचे सुखाने
मज समाधी, ऐकताना मीच ताना छेडलेल्या

वाटते माझ्या असावी रात्र काळोखी उशाला
ना दिसो जगतास माझ्या पापण्या ओलावलेल्या

वाटते काहूर यावे उन्मळुन खाली पडावे
बाद मृत्यूच्या बघू दे वेदना मम संपलेल्या

पूस ते "निशिकांत" डोळे ईश पाठीशी तुझ्या रे !
"श्री" कसा विसरेल वेड्या चार दुर्वा वाहिलेल्या

निशिकांत देशपांडे मो. न. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा

गुलमोहर: 

मतल्यातील काफिया मध्ये सूक्ष्म बदल हवाय.तेवढी तंत्रिक चूक वगळता फार छान गझल.

स्वागत निशिकांतजी. Happy

शेवटच्या शेरात वाहिलेल्या असे हवे आहे .

शेवटून दुसर्‍या शेरात कहूर ऐवजी काहूर असा बदल हवा आहे.

पान नाही फूल नाही मी कफल्लक आज आहे
सावल्या सुर्यास्त होता पाहिल्या ना थांबलेल्या

हा शेर फार आवडला. Happy

वाटते माझ्या असावी रात्र काळोखी उशाला
ना दिसो जगतास माझ्या पापण्या ओलावलेल्या

अप्रतिम शेर!

सर्व रसिकांना सकरात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. शुद्धलेखनातील चुका बद्दल दिलगिरी व्यक्त करतो. दुरुस्त्या केल्या आहेत.
कैलासजी, आपल्या मार्गदर्शनामुळेच मी मायबोलीवर हजेरी लावू शकलो. तुमचे व्यक्तिशःअभार.

अप्रतिम! पुर्ण कविता/गझल जे काय असेल ते सुंदर उतरलय. तंत्राच्या नादी नका लागु देशपांडे. सहज आहे तुमच लिहिणं.

छान व शुभेच्छा! काहीवेळा वृत्ताच्या सौंदर्यानेच काहीशी मजा येऊ शकते. आपण यातील प्रत्येक द्विपदी वेगवेगळी काढून वाचावीत व संदर्भयुक्त वाटते की नाही हे तपासावेत असे वाटले. तसेच, 'बाद' वगैरे शब्द टाळता येतात. कैलासराव म्हणाले त्या प्रमाणे मतला सैल घेतल्याशिवाय जमीन सिद्ध होणार नाही. सफाई वगैरे येत जाते असा अंदाज आहे.

गझलेत खरे तर मध्यवर्ती कल्पना कधी नसतेच पण आपल्या या 'गझलेत' आपण 'वृक्ष' ही मध्यवर्ती कल्पना घेतल्याप्रमाणे झाले आहे. त्यामुळे भाव बराचसा कवितेचा झालेला असावा. पण स्वतंत्ररीत्या कविता म्हणून त्या द्विपदींना अस्तित्व आहे की नाही हे तपासलेत की भागावे.

आपल्याला मनापासून शुभेच्छा व अधिक उणे बोलल्यास दिलगीरी!

-'बेफिकीर'!

आणखीन एक!

तंत्राच्या नादी नका लागु देशपांडे. सहज आहे तुमच लिहिणं>>> हे नतद्रष्ट यांचे मत स्फुर्तीदायक व स्पष्ट आहेच. तरीही, जर रचनेला गझल म्हणून कन्सिडर करायचे असले तर तंत्र आवश्यक आहे हे आपणही जाणताच असे आपण रचलेल्या गझलेवरून दिसत आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी,
मतला थोडा सैल केला आहे. दुरुस्तीनंतर दोष दूर झाला आहे असे मला वाटते.
गझलेत मध्यवर्ती कल्पना नसतेच म्हणण्याऐवजी मी " मध्यवर्ती कल्पना असावीच असे नाही " असे म्हणेन. आपला य क्षेत्रातील अधिकार मोठा आहे याची मला जाण आहे. पण माझी वरील गझल "मुसलसल" या सदरात येवू शकते. प्रत्येक गजल गैरमुसलसल असावी असा अग्रह नसावा.

माझा अधिकार मोठा मुळीच नाही निशिकांतराव, मी ही शिकतो आहेच!

मध्यवर्ती कल्पना - याबाबत मला असे म्हणायचे होते की शेर वेगळा काढला तर सुस्पष्ट वाटायला हवा. मुसलसल गझल असते हे खरे आहेच.

गात होत्या कोकिळाही आड पानांच्या दडूनी
विव्हळते मन आठवूनी मैफिली त्या रंगलेल्या>>>

आपला हा शेर मला संदिग्ध वाटला. त्या वेळेस कोकिळा गात असतील तर आज ' का गात नाही आहेत' याचे स्पष्टीकरण या शेरात दिसत नाही. पण तेच जर मतला वाचून पुन्हा पाहिले तर संदर्भ लागतो.

आशा आहे की हे मत आपल्याला पटेल!

धन्यवाद !

-'बेफिकीर'!

तंत्राच्या नादी नका लागु देशपांडे. सहज आहे तुमच लिहिणं >>>
आणि तंत्रातही सहज लिहिता येणार असेल तर???
Lol Lol

नतद्रष्ट, चिडू नका... पण comment आवडली...