साधारण २००७ च्या शेवटी मी घरी इंटरनेटची सुविधा घेतली. प्रोजेक्ट पूर्ण करताना सतत लागेल म्हणून. आणि मग बाकीचा अभ्यास करताना सहज एकदा पुलंबद्दल काही माहिती मिळते का ते बघायला म्हणून गूगल केलं आणि पुलंच्या साइटबरोबरच मायबोलीचा शोध लागला. व्यक्ती आणि वल्ली मधून अनेक व्यक्तींच्या छान साइट्स मिळाल्या, पण खुद्द मायबोलीवरचं लेखन सुद्धा सापडलं. आणि "प्रथमग्रासे नवनीतप्राप्ती" व्हावी तशी दाद यांचं "नावात काय्ये!" हे विनोदी लेखन मिळालं. मग रोज एक(च) काहीतरी वाचायचं असं ठरवून शोध चालू झाला. त्या वेळी मराठी महिन्यांचे अर्काइव्ह्ज होते. त्यामुळे मूळ लेखन मिळायला थोडा वेळ लागे. पण रोमात राहून वाचन चालू होतं. मग काही दिवसांनी समजलं की मायबोलीचं नूतनीकरण होत आहे....थोडी निराश झाले. यासाठी, की पुन्हा काहीही अडचण न येता ही साइट नक्की उघडेल ना? पण सुदैवाने मायबोली नवीन रूपात सुरू झाली.
सुरुवातीला कळेना, की कोण कोणाला उद्देशून काय बोलतंय! पण तरी नुसतं समजून घेणं चालू होतं. बरेच दिवस खातं नव्हतं उघडलं. मग एक दिवस रत्नागिरीच्या एका आयडीने केलेलं लिखाण वाचलं, आवडलं आणि ओळख नाही, पण आपलाच गावकरी आहे
तर चांगला प्रतिसाद द्यावा म्हणून खातं चालू केलं. अर्थात रोम मोड सुटला नाही. पण मग माझाही एक अनुभव इथे शेअर केला. फार प्रतिसाद येतील अशी अपेक्षा नव्हतीच! स्वान्तःसुखाय केलेलं लिखाण ते, लोकांना नाही आवडलं तर न का आवडेना!!
आणि नेमकी हीच सीमारेषा आखून घेतली मी स्वतःसाठी. खूप वाचत होते. म्हणजे माझा BE चा अभ्यास आणि प्रोजेक्ट वगैरे सांभाळून जमेल तेवढंच. कारण ती शेवटची सेमिस्टर होती. पण मराठी वाचायचा वेग बर्यापैकी चांगला असल्यामुळे १५-२० मिनिटं वाचलं तरी बरंच वाचून होई.
पुढे उत्तम प्रकारे रिझल्ट लागून मी नोकरीला लागले. थर्ड यिअर ला असतानाच कॅम्पस सिलेक्शन झालं होतं, त्यामुळे ते टेन्शन नव्हतं.
पुण्यात येउन नोकरी सुरु झाली. मधल्या काळात मायबोलीवरचा वावर खूपच कमी झाला. २००९ मधे लग्न ठरलं. नवरा उसगावात होता. त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी पुन्हा एकदा रूमवर नेट घेतलं. मग उरल्या वेळात पुन्हा मायबोलीवर डोकावायला सुरुवात झाली. पण तरी जास्त नाहीच.
मधून मधून गटग वृ वगैरे वाचून वाटायचं की जावं एकदा काय असतं ते बघायला, पण दरवेळी काही काम निघे आणि बेत बारगळे. ववि, गटग वगैरे खास शब्द सुरुवातीला पचनी पडत नसत. मग आपोआपच समजले. खरं तर मायबोलीला असंच समजून घेण्यात जास्त मजा आहे.
त्यानंतर डिसेंबर २००९ मधे लग्न होउन मीही उसगावात आले. (तरी वावर इकडे कमीच होता म्हणायचा!) रोमात राहून मात्र खूप प्रगती केली होती. पाकृ, कोकण, आरोग्य वगैरे गृप्स्मधे सामील झाले. एखादी पाकृ अडली की इथे येउन शोधायची, कंटाळा आला की इथे यायचं, योगामाधलं काही विसरायला झालंय असं वाटलं तर इथे येउन चेक करायचं वगैरे सवयीचं झालं.
मधल्या काळात नीधप यांचा "श्वास" वरचा लेख वाचला, आणि कुठेतरी खूप बरं वाटलं. कितीही आभासी जग म्हटलं तरी ही भावना सुखाची होती माझ्यासाठी. याच मधल्या काळात दाद, नंदिनी२९११ (माझ्या लक्षात राहिलाय हं वाढदिवस!
) दक्षिणा, विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर, साजिरा, चाफा, राफा, झक्कीकाका, लिंबूकाका, पल्ली, चिनूक्स, अशा अनेक जाणत्या लोकांशी आभासी ओळख झाली. (अजून खूप आयडी आहेत, सगळ्यांचा उल्लेख झाला नाही..)
कोणी कथांमधून भेटलं, कोणी लेखमालांमधून, कोणी हसवलं, कोणी नकळत डोळ्यांत पाणी आणलं. काहीही असो, त्या क्षणी माझं असलेलं एकटेपण दूर केलं.
असं एकदा जुन्या हितगुजवर बागडताना बापुंचा बीबी सापडला. त्या बीबी ने करमणूक केलीच, पण अनेक लोकांशी खास ओळख झाली. म्हणजे आभासीच. मायबोलीचं अनोखं आणि जास्त कौतुकास्पद रूप दिसलं. त्या बीबीबद्दल अधिक काही इथे नाही सांगत. पुन्हा नको ते सगळं.
पण हल्ली ४-५ महिन्यांत, जेव्हा मी वर्क परमिट काढून नोकरी शोधायला सुरुवात केली तेव्हा मला पहिली मदत मायबोलीची घ्यावीशी वाटली. अजूनही शोध संपलेला नाही नोकरीचा, पण काहीतरी नव्याने लिहावंसं वाटलं. अर्थात त्यालाही काही कारणं आहेत.
गेल्या ४-५ महिन्यांत जुन्या विषयांअरच्या अनेक चर्चा वाचल्या. अगदी कंपूबाजीच्या आरोपापासून गटग वृ पर्यंत जमलं तेवढं नजरेखालून घातलं आणि गरज लागली तिथे समजून घ्यायचा प्रयत्न केला. खरंतर मला इथे कोणताच जुना वाद उकरून काढायचा नाही, नवीन वादाला सुरुवात करायची नाही (हे असं हल्ली फार लिहावं लागतं इथे याचं खरं दु:ख आहे.
)
पण इथे नवीन येताना काही गोष्टी जपल्या जाव्यात असं जे प्रकर्षाने जाणवलं ते सांगायचा प्रयत्न आहे. पटलं तर ठीक, नाहीतर सोडून द्यावा.
जेव्हा आपण अशा आभासी जगात येतो तेव्हा सगळं आपल्याला समजलंच पाहिजे, आणि तेही लवकरात लवकर, असा आग्रह का? आणि ते समजत नसेल तर ज्यांना समजतं, ते आपसात बोलतात म्हणून कंपूबाजी म्हणायचं का? त्यापेक्षा, थोडे दिवस इथे नुसतं येउन बघावं. वाचावं. आपला पिंड काय आहे, आवडी काय आहेत, त्यासंबंधी इथे काय लिखाण, चर्चा झाल्या आहेत, त्या चर्चा ज्यांनी केल्या आहेत, त्यातल्या कोणाचं मत आपल्याला पटतं ते बघावं. आपण मत व्यक्त करताना त्यामुळे कोणी व्यक्तिशः दुखावलं जातंय का हे बघणं कठीण आहे का?
कथा किंवा इतर वाङमयावर प्रतिक्रिया देणं आणि प्रत्यक्ष घटनेवरच्या एखाद्या लेखाला प्रतिक्रिया देणं वेगळं हे भान ठेवायला हवं. वाङमय आवडू शकतं किंवा नाही. पण घटना घडताना आपल्याला चॉइस नसतो. मग त्यावर बोलताना तरी सांभाळून बोली शकतो आपण. उदा. शिवाजी महाराज, राजकारण वगैरेंबद्दल बोलताना आपण स्वतःवर संयम ठेवू शकतो.
इथे आलो म्हणजे सगळे आपली वाटच बघत होते, आणि आता आपण काही लिहिलं नाही तर तो गुन्हा ठरेल अशा थाटात काही लिहायचं, आणि प्रतिक्रिया आली नाही/ अप्रिय प्रतिक्रिया आली की चिडायचं हे योग्य नाही. मुख्य म्हणजे इथे आपण आलो ते कोणी सांगून नाही, स्वतः आलोय हे लक्षात ठेवायला हवं. आणि जे करू ते सुरुवातीला तरी स्वत:साठी असायला हरकत नाही. मग इथे त्याला कसा प्रतिसाद मिळतोय ते बघून सुधारणा करता येतेच की!
माझा तरी अनुभव असा आहे, की एखादी बाब जर आवडली नाही, तर इथे तसं सरळ सांगतात. त्यामुळे आपण स्वतः बदलायचं की वाट बदलायची हे निवडणंही आपल्या हाती असतं.
"कालोह्ययम् निरवधिर्विपुला च पृथ्वी" हे वचन मला नेहेमी पटतं. "हा काळ अनंत आहे, आणि ही पृथ्वी विपुल- अमर्याद आहे. तस्मात, माझे विचार पटणारा कोणीतरी जा पृथ्वीवर कधी ना कधी नक्की येइल" हा विश्वास असला की बर्याच गोष्टी सोप्या होतात. फारच तत्त्वज्ञानी वाटेल हे, पण यातलं १/१० जरी आचरलं तरी निम्मा त्रास कमी होतो!
खरंतर एकमेकांशी बोलावंसं वाटणं ही सगळ्यांचीच गरज असते. त्यामुळे शेअर करायला काहीच हरकत नसते. पण आपण सांगू तेच बरोबर अशी भूमिका घेतली की सगळंच बिनसतं. आणि मग वाद सुरु होतात.
मायबोली हे विसाव्याचं ठिकाण आहे, हेच विसरलं जातं.
एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात तसं मायबोलीच्या प्रेमात पडावं. सुरुवातीला नुसतं बघणं, नजरानजर....
हळूच काही निमित्ताने ओळख्...मैत्री..मग प्रेम...
हे टप्पे झाल्यावर जर काही रुसवाफुगवा झाला तर गोडच वाटतो तो!"अनुभवावं" असं आहे हे सगळं. कारण फूल कसं फुंकर मारून फुलवता येत नाही तसं नातंही फुलवता येत नाही. मग आपण नातं जोडतोय हे विसरून कसं चालेल? सगळंच इंस्टंट मिळालं की किंमत नाही राहात.
आणि जर नातं जोडायचंच नसेल, तर मग सगळं माहिती असावं, आपल्या मतांची दखल घेउन त्याचा आदर केला जावा वगैरे सगळयाच अपेक्षा कशासाठी?
खरंतर "माझा काय संबंध" म्हणून मी दुर्लक्ष केलं असतं पण मायबोलीवर असं होउ नये ही कळकळ आहे म्हणून हा उपद्व्याप. काही दिवसांपासून वेगवेगळ्या बीबींवर काही ना काही वाद चालू असलेले बघितले, त्यांचा खास उल्लेख करायची गरज नाही वाटत.
मी काही लेखिका नाही, किंवा खूप जुनी माबोकर नाही. पण सूर जुळलेत इथे. खुस्पटं काढायला असलेल्या जागांपेक्षा मोहक वाटतील, लोभस वाटतील अशा खूप जागा आहेत इथे. या सुरेख अनुभवासाठीच हे सगळं लिहावंसं वाटलं.
पोरकट म्हणण्याने
पोरकट म्हणण्याने कुण्णाकुण्णाचंही मन दुखावलं बिखावलं जात नाही. नाही का?
हि चर्चा फक्त आधीच्या
हि चर्चा फक्त आधीच्या प्रतिसादावर आहे,पोरकट ही प्रतिक्रिया होती.
----
हे प्रज्ञा९ ह्यांच्या आधीच्या प्रतिसादावर हि पोस्ट त्यांनाच उल्लेखून आहे. त्यांनी जे गोड्ड कसे वागवे लिहिले आहे ना त्या आदर्शवादाचे(?) काय झाले?
इतका जर कुणाचा लेख वाचून त्रास होत असेल तर, लेखात म्हटल्याप्रमाणे दुसरी स्थळं आहेत की वाचायला... ते इतकं जड जातं का?
दुसर्याला इतकी टोचक प्रतिक्रिया देताना त्या विचार करत नाहीत लेखात लिहिल्याप्रमाणे.
गुड्डी गुड्डी प्रतिमा संपलेली दिसतेय.. किती दिवस सांभाळणार.. कठिण जात असेल म्हणा...:फिदी:
तुमच्या लेखावर अप्रिय प्रतिक्रिया आली की चिडलेले दिसता आहात....
मी_गौरी, हो, अहो काळ बदला ना आता..
प्रज्ञा छान लिहिलयसं . अर्थात
प्रज्ञा छान लिहिलयसं .
अर्थात 'त्या' लेख / ललितावरची प्रतिक्रिया तुमच्या लेखाशी विसंगत आहे. नाही पटली ती प्रतिक्रिया.
Pages