भलताच क्लायमॅक्स आणि नाटक

Submitted by विनायक_पंडित on 25 January, 2011 - 11:00

भलताच क्लायमॅक्स माझ्या आयुष्यात आला! माझी आई आता काही दिवसांचीच सोबती आहे हा विचार गिधाडासारखा माझ्या मानगुटीवर स्वार झाला.माझं काय? आईवरच्या जबाबदार्‍या आता माझ्यावर आल्या, त्या कशा निभावू? अनेक ताण ठाण मांडून बसले.मी काय काय करणार होतो? माझ्या हातात किती गोष्टी आहेत? मी स्वत:विषयीच्या अवाजवी सहानुभूतीमधे गुंतवून घेऊ लागलोय स्वत:ला? अनेक विचार तेव्हा आणि नंतर कितीतरी काळ माझ्या मनाचा कब्जा घेऊन बसले.
आई तीन महिनेच जगली.अतिशय सुरक्षित वातावरणात जगलेल्या मला या तीन महिन्यात जगानं स्वत:चं नवं आणि क्लेशदायक रूप दाखवलं.हे जग आपल्या घरातूनच सुरू होतं ही पराकोटीची वेदना होती.घरातल्या एखाद्या मत्यूसंदर्भात माझ्यासकट इतर सगळेच संबंधित कसे प्रतिक्रीय होतात ते बघून मी खचत चाललो.
आई गेल्यानंतर वर्षभर मी रिता होतो.सुनंसुनं रितेपण म्हणजे एक वेडाच्या सीमेवरचा प्रवास वाटायला लागतो.
आई गेली आणि तिनं ज्या बिछान्यावर शेवटचे दिवस काढले त्या बिछान्यावर खोलीच्या दाराकडे पाठ करून मी अर्धवट वाचून बाजूला टाकून दिलेलं ’अभिनयसाधना’ वाचून संपवलं. कॉन्स्टटिन स्तॅनिस्लॅवस्की या रशियन रंगकर्मीच्या An Actor Prepares या इंग्रजी भाषांतरीत पुस्तकाचा के.नारायण काळे ह्या जुन्याजाणत्या रंगभूमी अभ्यासक, पटकथालेखकाने केलेला मराठी अनुवाद.मी कधीतरी उत्साहाने तो मिळवला होता.यातले पायदिवे-footlights, डोयदिवे-spots अशा मला माहित असलेल्या इंग्रजी शब्दांच्या मराठी अनुवादाने मी बिचकलो.नटानं नाटक आणि त्याची विविध अंग हा अभ्यास करताना शिजवलेल्या टर्की कोंबड्याचे वेगवेगळे तुकडे आणि संपूर्ण शिजवलेल्या कोंबडा असं उदाहरण वाचून मी बाचकलो.माझ्याकडून ते पुस्तक कधी बाजूला पडलं मला समजलं नाही.यातले शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी, त्यांनी एकमेकांना विचारलेले प्रश्नं, विद्यार्थ्यांना सरावासाठी मिळालेला प्रत्यक्ष रंगमंच, नेपथ्य, शिक्षकानी विद्यार्थ्यांना कृती करायला लावून, कल्पनाबीज विस्तारीत- improvisations करायला लावून शिकवलेली नाट्यमाध्यमातली तत्वं हे सगळं सगळं माझ्या दृष्टीने खूप लांबचं होतं.पुस्तकात रस वाटता वाटता ते दूर लोटलं जाई.ते कधी बाजूला पडलं समजलंच नाही.
आईच्या जाण्यानंतरच्या ’दिवसां’ मधे मी ते झपाट्यात वाचून संपवलं.मी पुस्तकात पूर्ण एकाग्र झालो होतो.मला त्यावेळी वेगळ्याच कुठल्यातरी पण मला बांधून टाकणार्‍या विश्वात स्वत:ला गुंतवून घ्यायचं होतं.माझ्या संदर्भात हे विश्व नाटक या माध्यमाचं होतं.
नंतर कधीतरी मी Bulding A Character स्तॅनिस्लावस्की ह्यांच्या मूळ रशियन लेखनाच्या इंग्रजी अनुवादाचा के.नारायण काळे यांनी केलेला मराठी अनुवाद ’भूमिकाशिल्प’ हे पुस्तक मिळवलं.या दोन पुस्तकांची मी पारायणं करत होतो.माझं अत्यंत सुरक्षित आयुष्य त्या घटनेने असुरक्षित झालंय असं वारंवार जाणवत होतं.ही असुरक्षितता वेढून टाकत होती.मी लोकल प्रवासातसुद्धा या पुस्तकांमधली टिपणं काढत होतो.
त्याही नंतर मला स्तॅनिस्लॅवस्की या थोर रंगकर्मीच्या रशियन लेखनाची इंग्रजी भाषांतरं सापडली. ‘An Actor Prepares’, ‘Bulding A Character’ आणि Creating A Role इंग्रजी वाचनाचा सराव नसताना मी या पुस्तकांशीही झटू लागलो.ही पुस्तकं इंग्रजीतून वाचताना मजा येत होती अर्थात मी त्यातल्या दोन पुस्तकांचे मराठी अनुवाद वाचले होते ही माझ्या दृष्टीने जमेची बाजू होती.
नाटकासारखी रंगमंचावर प्रत्यक्ष सादर करण्याची कृती पुस्तकं वाचून कितपत साध्य होते हा रंगकर्मींमधे चर्चिला जाणारा महत्वाचा प्रश्नं आहे हे मला कालांतराने समजलं.मी माझ्या पद्धतीने नाटकाविषयी जे जे काही मिळत होतं ते मिळवत होतो आणि अभ्यासण्याचा प्रयत्नं करत होतो.
पुन्हा प्रत्यक्ष रंगभूमीवर काम करायला मिळणार नाही असं मला त्या घटनेनंतरच्या काही दिवसा-महिन्यांमधे ठाम वाटत होतं.दुसरीकडे भविष्यातले खर्चं डोळ्यासमोर दिसत होते.
माझ्याबरोबरचे मित्र, सहकारी शेअर्समधे पैसे गुंतवत होते.प्रमोशनसाठी जीव तोडून प्रयत्न करत होते.त्यांची लग्नं होत होती.संसार थाटले जात होते.ते कधीच मार्गाला लागले होते.सेटल झाले होते.
नाटकाच्या अभ्यासाबरोबर काही उत्पन्नही मिळायला पाहिजे असं माझ्या मनाने याच दिवसात घेतलं.नाटक माध्यमाशी संबंधित एका वेगळ्या माध्यमाकडे वळायचं माझ्या मनानं घेतलं.यात कदाचित माझा वेळ वाचणार होता.आई असताना घरादाराचा विचार न करता नाटकच डोक्यात होतं.तसं पूर्णपणे गुंतून रहाणं यापुढे कितपत शक्य आहे? हा विचार बळावला आणि मी या नव्या माध्यमाकडे वळलो.
पूर्वप्रकाशन:
http://vinayak-pandit.blogspot.com/2011/01/blog-post_24.html

गुलमोहर: 
शब्दखुणा: