धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 23 January, 2011 - 04:59

धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

मारखुंड्याच्या घरामंधी पारखुंडा गेला
धोतर फ़ाटेपाव्‌तर सोटे खाऊन आला ...॥१॥

गाढवाम्होरं भगवद्‌गीता वाचून काय होते?
माणसाची अक्कल तरी भायच उतू जाते
राखडीमंदी लोळू नको, सांगासाठी गेला
उसण उतरेपाव्‌तर लाथा खाऊन आला ...॥२॥

मुद्दे आटून गेले की, हातघाईवर येणार
शिवीगाळ करता करता, गुद्दे हाणून देणार
माणुसकीच्या गोष्टी त्याले समजवाले गेला
येता येता ढोरावाणी, रट्टे खाऊन आला ...॥३॥

पोशाखाच्या आधाराने, पारख होत नसते
कपड्याच्या आतमंदी, नंगे लपून बसते
मांडी उघडी दिसली म्हणून, झाकासाठी गेला
होती नव्हती थेय आपली, अब्रू देऊन आला ...॥४॥

अरधकच्चं ग्यान लई, खतरा असते भाऊ
नको अभय कोणाच्याबी, झाशामंदी जाऊ
कावरल्या कुत्र्यासाठी भाकर घेऊन गेला
येता येता बोम्लीवर, सुया घेऊन आला ...॥५॥

गंगाधर मुटे
------------------------------------------------------------
मारखुंडा = मारकुडा, पारखुंडा = पारखी, पारख करणारा
------------------------------------------------------------

गुलमोहर: 

मस्त मुटेजी,

भावना पटल्या...नेकी कर दरीया मे डाल असे काहीसे म्हणायचे...दुसरे काय?

मुटेजी,
वाह ! जबरदस्त !
तडका हो तो ऐसा हो !
Happy

मुद्दे आटून गेले की, हातघाईवर येणार
शिवीगाळ करता करता, गुद्दे हाणून देणार
माणुसकीच्या गोष्टी त्याले समजवाले गेला
येता येता ढोरावाणी, रट्टे खाऊन आला ...

शेतकर्‍यांनी जिथे जिथे एकत्र येऊन आपल्या योग्य आणि रास्त मुद्द्यावर जाब विचारण्याचा प्रयत्न केला,आंदोलने केली त्या-त्या वेळी राज्यकर्त्यांकडुन बहुतेक वेळा त्यांना 'गुद्द्यांनीच' उत्तर मिळाल्याच दिसुन येतं ....
त्यावर कोटी ,कहर म्हणुन सरकारला वाटतं कि हे सगळं राजकारणातुन केलं जातयं असं म्हणून पुन्हा त्यांना चिरडुन काढण्याचा प्रयत्न केला जातो

कालची एक घटना, सोलापुर जिल्यातल्या सांगोल्याजवळ एका साखर कारखान्यात आपल्या थांबवुन ठेवलेल्या ऊसाच्या, नंबरासाठी जाब विचारण्यार्‍या शेतकर्‍याला कामगार्,सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केली त्यात त्याचा मृत्यु झाला.

मुटेजी, खुपच छान !

वा गंगाधर धोतर फाटेपावतर छान लिहीलस
आता याच्यात तरी काही येडवाकड पाहू नका म्हणा लोकाईले Happy
तुमच्या कविता वाचतांना 'मी सोटे बोलतोय' आठवतो.
कविता संग्रह नक्की बनवा .

अरधकच्चं ग्यान लई, खतरा असते भाऊ
नको अभय कोणाच्याबी, झाशामंदी जाऊ
कावरल्या कुत्र्यासाठी भाकर घेऊन गेला
येता येता बोम्लीवर, सुया घेऊन आला>>> हा हा हा हा!

भारी!