चलतचित्र

Submitted by विनायक_पंडित on 22 January, 2011 - 08:37

एकोणचाळीसाव्यावर्षी तिला तिच्या बारावीच्या सर्टिफिकीटची गरज लागली.एका डिप्लोमासाठी.अर्हता बारावी.पुढे पदवी मिळवली असली तरी बारावीचं सर्टिफिकीट मस्ट. विद्यापिठाचा नियम.पदविकेची दोन वर्ष होत आलेली.पुढचं वर्ष शेवटचं.आत्ता संस्थेनं सांगितलं, आणून द्या लवकर नाहीतर खरंच प्रॉब्लेम होईल.एफ वायचं आहे,एस वायचं आहे,टी वायचं तर आहेच पण बारावीचंच पायजे!आणि ते तर नाही! गेलं कुठे? त्याच्या छायांकित प्रति आहेत. पण त्या नाही चालत. ओरिजनलच पाहिजे!

ते आहे.कुठे आहे ते ही आठवतंय.फाईलचा रंग, तिचं टेक्च्शर, ते तिथेच का आहे, त्याबरोबर आणखी काय आहे, काय नाही सगळं तिला आठवतंय.पण मग सुरू झाला भुंगा. इतर अनेकवेळी डोक्यात अखंड सुरू होतो, संपतो - पुन्हा दुसरा सुरू होण्यासाठी- तसाच. काय करावं? मूळ हरवलंय डुप्लीकेट द्या म्हणून अर्ज करावा? कॉलेजकडे? तिकडे नाही मिळालं तर उच्च माध्यमिक शालांत परिक्षा मंडळाच्या कार्यालयात? देतील ते वीस वर्षापूर्वीचं? किती पैसे भरावे लागतील? पैश्याचं काय एवढं महत्वाचं नाही म्हणा- कुठे असतं ते मंडळाचं कार्यालय? ते तिथेच असेल अजून? नाहीतर कुठे असेल? कॉलेजमधे मिळेल सहज? की ओळख लागेल कुणाची? कुणाची? कुणाची काढता येईल? बाबा असते तर चुटकी वाजवून चटाचट नावं सांगितली असती दहापंधरा.
असते तर-तर काय इथे आल्यावर गाडी अडत होती तिची.अडत होती, फाटे बदलत होती.नसते फाटे आणि नसते फराटे,आठवणींचे.

मग नेहमीच असह्य होत होतं सगळं.भडकाच उडायचा.त्यात तेल ओतायला वास्तव होतंच.सगळयांचं असतं तसंच पण तरीही बोचतं प्रत्येकाला, तसंच.मग त्या भडका उडण्याचाही कंटाळा आला.काय होईल ते जाईल.स्वाभिमान, स्वतःवरचा विश्वास, खरेपणावरचा विश्वास सगळं जागं झालं.

का नाही जायचं आपल्या घरी? तिनं- तिनं सगळं आपल्या ताब्यात ठेवलंय म्हणून? कोण ती? या पुढच्या विचारांच्या प्रवासात कचाकचा दात चावणंच प्रामुख्याने होत राहिलं. असहायता आणि खंत.खर्यां बाजूचं काहीही न चालू शकल्याची.

जे चालवू शकले असते व्यक्तिशः आणि सगळे मिळून तर सहजच, ते ही गप्प बसले.गप्प म्हणजे गप्पच.थोडीफार कुजबुज आपापसात.अन्याय झालाय असं कुठेतरी पुसटसं मतप्रदर्शन केल्यासारखं.त्यातल्याच कुणालातरी कधीतरी आलेली अन्यायाची चीड.स्व चं भान काहीवेळ तरी सुटल्यामुळेच.बस्सं!
मग तिनं स्वतःला व्यवस्थित गोळा केलं.अशाप्रकारच्या प्रसंगात नेहमी स्वतःला करत असे तसं.मग तिनं दिवस ठरवला.वार ठरवला.घरच्याना आपण त्यावेळी बाहेर असण्यामुळे काही त्रास होणार नाही असा.का नाही जायचं आपल्या घरी? जायचंच!

ते सगळं पूर्वीचं नेहमीच स्वप्नात येई.आता आठ वर्षांनी त्या आपल्या घरी जाण्याचं पक्कं झाल्यावर तिला नव्यानं स्वप्नं पडू लागली.स्वप्नं पडणं - कुठल्याही स्वरूपाची- तिला नेहमीच आवडतं.भीतीदायक स्वप्नं पडली तरी जागं झाल्यावर हे आता तरी खरं नाहीये हे जाणवून मनोरंजन होतंच.आपल्या त्या घरी गेल्याची, वावरल्याची, रमल्याची ती स्वप्नं तिला पडत राहिली.वर्तमानातली आणि भूतकाळातली.इतकी की प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावरही हे एक स्वप्नंच आहे असंच तिला वाटत राहिलं.बराच काळ.

हे केवळ स्वप्नं बघितल्यामुळेच होत नव्हतं तर मधे फार मोठा काळाचा टप्पा पार पडला होता.सगळयाच अर्थांनी फार मोठा.मुख्य म्हणजे तिथे पाऊल ठेवायचंच नाही हे पक्कं ठरलं होतं.तेव्हा- आठ वर्षांपूर्वी.आणि आता असं कारण समोर आलं की जाणं भागच पडलं. का नाही जायचं?असं वाटलं उलट.

तिनं जायचं ठरवलं आणि ती शांत झाली.जाण्याच्या दिवसाच्या आदली रात्र काही उलट सुलट स्वप्नांची गेली.उठल्यावर मागे पुढे असं झालं थोडं.निव्वळ शांतता कुठे असते जगात.शेवटी असत असेल कुणास ठाऊक.पण तेंव्हाही उरलेल्या वासनांचं तांडव रहातंच म्हणे.मग ठीक आहे असं मनाशी म्हणत बाहेरच्या दिवाणावर पायावर पाय घेऊन चेहेरा लपवलेल्या बुजगावण्याकडे बघितलं न बघितल्यासारखं करत ती व्यवहार्य शांती बरोबर घेऊन बाहेर पडली.

ती बाहेर पडल्यापडल्या बुजगावण्यानं पायांची मिठी जराशी एका बाजूला झुकवत दुसर्‍याच बाजूनं टाळकं बाहेर काढलं.ती गेली त्या दिशेनं.नंतर बुजगावणं दिवाणावरून उतरेल,आवडत्या अश्या स्वैपाकघरात घुसेल,उचक पाचक करत गिळायला केलंय की नाही आणि केलं असल्यास काय ते बोळकं विचकत पाहील.जास्त करून बोळक्यावर घृणाच आणत.बोळक्यातले खोटे दात चावतचं गुणगुणणं सोबतीला असणारंच.

हल्ली तिनं जेवायला केलंय आणि ते काय काय केलंय हे सांगणं, त्याची यादी वाचणं पूर्णपणे बंद करून टाकलं होतं.बाहेर पडल्या पडल्या हे सगळं तिच्या डोळयासमोर फिरून गेलं. मनःशांती आणि ऑटोरिक्षा कोपर्या वरच असणार होती.तिनं तिकडे लक्ष एकाग्र केलं.

सकाळची वेळ असल्यामुळे थांबण्याच्या खुणा धुतकारत उलटया दिशेने जाणारे रिकामे रिक्षावाले बरेच होते पण गरजू ही अनेक होते त्यामुळे रिक्षा लगेच मिळाली. त्यावेळची तिला सवय नव्हती म्हणून ती जरा चलबिचल झाली पण मग तिचा तीन रूपयाचा शेयर शेजारच्याच्या सुपुर्द करत ती दोघा शेजार्‍यांच्या बेचक्यात बसली.शेजारीण चांगलीच होती तब्येतीने आणि शेजारी कोवळा होता म्हणून अंग चोरून बसला होता.तिनं दोघांना नीट बघून घेतलं. खड्डयांवरून उधळत रिक्षावाला निघाला.

आज निघताना वेगळंच वाटत होतं.असं काही वेगळंच करण्यासाठी घराबाहेर पडण्याचे अनेक प्रसंग आयुष्यात वेळोवेळी येतात तेव्हा वाटतं तसं.बाहेर सगळं तसंच असतं.आत आपण रूटिनपेक्षा वेगळं काही करायला निघालोय असं सतत वाटत असतं.बाहेरचं सगळं वातावरण मग वेगळाच प्रकाश परावर्तित करतंय असं वाटायला लागतं.मृगजळासारखा काहीसा परिणाम.पण हे नेमक्या कुठल्या भावना देणारं असतंच असं नाही.बर्‍याच वेळा कोरं म्हणावं असं असतं पण वेगळं.कदाचित हे वेगळं वाटणं एकसारखं कोरं असू शकेल.

रिक्षाच्या एका गचक्याला तिची तीच सावध झाली.हे काय चालू असतं आपल्या आत हल्ली? रिक्षा नेहेमीप्रमाणे स्टेशनच्या अगदी जवळ आली होती आणि नेहेमीप्रमाणेच वाहतुक कोंडीत अडकली होती.तिनं आळीपाळीनं दोघाही शेजार्यांतकडे बघितलं. दोघांनाही घाई होती.घाईचीच तर वेळ होती.उलट तिला घाई नव्हती.मस्टर वगैरे गाठण्यासाठी असते तशी.त्या दोघांनाही घाई होती पण उठायचं नव्हतं.पूर्ण पैसे वसूल करायचे होतेच आणि स्टेशनच्या पायरीजवळच उतरायचं होतं.आपल्या निर्णयावर दोघे ठाम होते.घाई नसूनसुध्दा तिला कंटाळा आला.या प्रसंगातून जात असल्याचा अनुभव गाठी असल्यामुळे तिनं व्यवहार्य शहाणपण जवळ केलं.त्या दोघांना जराही न दुखवता तिनं रिक्षावाल्याला बहिणीच्या मायेनं 'भैया, रोक दो उतरना है' म्हणून आर्जवलं.तो वाहनांच्या कोंडीत थांबल्यासारखा होताच. त्यानं पडत्या फळाची आज्ञा प्रमाण मानली आणि दोन्ही हात मोकळे करून जोरदार आळस झाडला.शेजारी च्यक च्युक करत रागारागाने तिच्याकडे पहात झक मारत उतरताहेत ह्याची डोळयाच्या कोपर्‍यातून जाणीवपूर्वक नोंद करत ती ऑटोरिक्षातून उतरून स्टेशनमधे शिरली.

गर्दीच्या जिन्यातून लोंबकळत वर आली.वर आल्यावर धक्के खात कुठली लोकल पकडायची ते ठरवू लागली.ही तिची नेहेमीची वेळ नसल्यामुळे किंवा नेहेमीची अशी तिची कुठलीच वेळ नसल्यामुळे इथे वर येऊन उभं राहून ते ठरवणं प्राप्त होतं.तिनं त्यातल्यात्यात गर्दी होणार नाही अशी त्यावेळेतली अगदी शेवटची गाडी नक्की केली.पुन्हा गर्दीला लोंबकळणं आणि जिन्याचा कडा जेमतेम शोधणं आणि तो उतरणं.अंग, अंगावरचं, अंगातलं, पायातलं, हातातलं आणि खांद्यावरचं असं सगळं सांभाळत.

ती तो लांबलचक जिना उतरून हव्या त्या फलाटावर पोहोचली.घशाला कोरड पडली आहे, निघताना बुजगावण्याच्या नादात पाण्याची बाटली भरून घेण्याचं तर राहिलंच पण पाणी नुसतं पिऊन निघण्याचंही राहिलं.तिनं आठवून डोळयासमोर आलेल्या बुजगावण्याबरोबरच स्वतःवरही दातओठ खाल्ले.स्वतःच्या बाई असण्यावरही मग ते घसरले.तासभर किंवा त्यापेक्षाही जास्तवेळाचा प्रवास करायचा असताना आणि पोचून योग्य असं टॉयलेट सापडेपर्यंत असह्य त्रास होणार नाही यासाठी घरातून निघताना नेमकं किती पाणी प्यायचं? तोच मूलभत सवाल कुणास ठाऊक कितव्यांदा स्वतःला विचारत ती रेल्वे स्टॉलजवळ आली.नेहेमीप्रमाणे कुठलं पेय मागायचं ते ठरवण्यात आणि ते लवकर ठरवता येत नाही म्हणून चिडण्यात काही वेळ गेला.मग नेहेमीचं तेच नको म्हणून तिनं वेगळं पेय ऑर्डर केलं. पण ते त्या स्टॉलवरच्या अनाडी दगडयाला समजलं नाही.त्यानं दुसरंच काही समोर ठेवलं, तिचं आजुबाजूच्या गोंगाटावर मात करून हवं ते नाव त्याच्यापर्यंत पोचवलं, त्याला ते कधी एकादा समजलं आणि ते समोर येऊन तिला ते कधी एकदा घटळायला मिळालं.

ते प्यायलावर मात्र तिच्या चेहेरा नेहेमीसारखा समाधान पावला.या घडामोडीमुळे असेल किंवा फारसं लॉजिक नसलेल्या लोकल ट्रेन्स च्या येण्याजाण्याच्या वेळापत्रकामुळे असेल लोकल लगेच आली असं तिला वाटलं.त्याच प्लॅटफॉर्मवर आली.गर्दी होतीच पण महिला डब्यात कमी.अजिबात घाई करायची नाही असं ठरवूनही महानगरीय स्वभावाला अनुसरून थोडी घाई केली गेलीच.समोर जागा दिसतेय आणि ती पकडायचा प्रयत्न करायचा नाही? पकडून पकडून मिळते ती खिडकीपासूनची तिसरी जागा.उलटया खिडकीपासूनची तिसरी.हवेची दिशा नसलेली पण उन्हाची दिशा बरोब्बर असलेली खिडकी.अशी जागा मिळाली म्हणून ती स्वतःवर चरफडायला सुरवात करतच होती पण तिनं स्वतःला आवरलं.

हल्ली असं होत असे.अशावेळी स्वतःला आवरावं असं वाटून प्रतिक्षिप्तपणे तसा प्रयत्न होत असे.कधीकधी तो जमूनही येत असे.यालाच परिपक्वता येणे असं म्हणतात असं तिला वाटू लागलं होतं.तिसरी जागा- ती बसतेय न बसतेय तोच एक बुरखेवाली चौथ्या सीटवर येऊन आदळलीच जवळ जवळ.तोंडातून 'मच' असा रागीट उदगार येऊन तिनं बुरखेवालीला झापायला तिच्याकडे बघितलं आणि तिला दिसलं बुरखेवालीच्या कुशीतलं तान्हं बाळ. 'बैठो बैठो' असं पुटपुटत तिनं त्यातल्या त्यात सरकून तिला जागा करून द्यायचा प्रयत्न केला.खिडकीजवळच्या पहिल्या दोघी ढिम्म होत्या.त्यानीही सरकावं आणि बुरखेवालीला निदान थोडावेळ तरी स्वास्थ्यं लाभावं म्हणून नेहमीप्रमाणे तिनं आशेनं 'त्या' दोघींकडे पाहिलं.

एकीनं खिडकीला टेकून झोपल्याचं सोंग केलं होतं किंवा चढत्या उन्हामुळे कालवा झाल्याचं.दुसरी सुजरट चेहेर्याकची समोर टक लावून एकाग्र होती, तिच्या समोर बसलेलीच्याही मागे प्लायवूडच्या भिंतीवर कुठेतरी.तिला थायरॉईडचा त्रास असावा किंवा तिच्या स्त्रीत्वावर नुकताच कसलातरी आघात झाला असावा, नेहमीचाच. नेहमीतल्याच माणसांनी केलेला.त्यावर आजवर काहीच जालीम उपाय न निघालेला.तो अनुभवून आणि त्यातून सो कॉल्ड तावून सुलाखून निघतानाचा त्रास रूटिन असला तरी तो सहन करावा लागतोच तसा.बंडाबिंडाच्या सीमारेषेला स्पर्श करून करून परत आलेला.चमत्कारिकपणे विस्फारलेले डोळे प्रोफाईलमधूनही ठळकपणे जाणवत होते.तिच्या सुजरट चेहेर्याफकडे बघत असताना ती बुरखेवालीला क्षणभर विसरली. या परिक्वतेच्या वगैरे नादात आपण फार वहावत तर जात नाही आजकाल? तिला वाटलं.मग उजवी-डावीकडे बघत ती स्वतःला त्या परिस्थितीत ऍडजेस्ट करत राहिली.तसं करताकरताच कधीतरी तिचा हुकमी डोळा लागला.

लोकलला जर्क बसून ती चालू झाल्यावर तिचं मस्तक छातीच्या दिशेने झुकलं आणि 'होय होय - नाही नाही' अश्या अर्थानं डोलू लागलं.आता ऍडजस्ट करण्याची पाळी इतर तिघींची होती.पण त्यांच्याही 'होय - नाही' सदृष्य हालचाली चालू होण्याच्या मार्गावर होत्या.टक लावून बसलेलीला अर्थात सोडून.तिचं ऍडजस्ट करण्याचं भानही संपलं असावं.महिलांना सक्तीची विश्रांती बहाल करण्याचं आणि त्या द्वारे उर्वरित गाडा हाकण्याला बळ प्रदान करण्याचं काम रेल्वेखातं अनाहुतपणे करत होतं.लोकल जिथे मिळेल तिथे थांबत पुढे पुढे धावत होती.तिच्या मस्तकाचा झोल जा-जाऊन शरीरही त्या प्रमाणे प्रतिक्रिय होऊ लागलं.ते ऍडजस्ट करून झोपलेल्या स्थितीतच राहण्याचं कसब तिला साधलं होतं.तिच्या सारख्या अनेकींना त्याशिवाय पर्यायच नव्हता

तिचं स्थानक आलं, लोकल थांबली आणि बाबा दारातच उभे.तिच्या हातातलं सामान घेण्यासाठी.दोन्ही हात पुढे करून.नेहमीसारखे हसत-
''काय? कसं काय?कसा झाला प्रवास?''
''मस्तं!!'' त्यांचा चेहेरा बघताच तिचा मूड जमून आला.
''चला!'' दिलखुलास हसण्याचा टेंपो आणखी वाढवत बाबा चालू लागले.चार पावलं पुढे गेल्यावर तिच्या लक्षात आलं.
''बाबा अहो,सगळं तुमच्याच हातात- माझ्याकडे-''
''असू दे! असू दे!तिथून तूच उचलून आणलंस नं सगळं?'' दोन पावलं पुढे गेल्यावर काहीतरी महत्वाचं सांगत असल्याच्या सुरात म्हणाले,
''मी काय म्हणतो'' ती एकदम गंभीर झाली.घसा खाकरत ते पुढे म्हणाले,
''कोपर्‍यावरचा ओंकारनाथ दूध आटवत होता आत्ता येत होतो तेव्हा.मागेच लागला, म्हणाला, चार जिलेबी खाके जाव भौनी करके! गरम दूध के साथ! आता माझी पंचाईत. म्हटलं,आत्ता येतो! लडकीको लेने जा रहा हूं स्टेशनपर- तिला घेऊनच येतो म्हणालो- तेव्हा- आता- मला खोटं पाडू नकोस म्हणजे झालं!'' असं म्हणत ठहाका मारत ते हसले.

तिला खुदूखुदू हसू येतच होतं ते सगळं ऐकत असताना.डोळे मोठे करून हसत ती म्हणाली,
''हे चांगलंय तुमचं हं बाबा! खायचंय तुम्हाला आणि-''
''तुला खायचं नाहीये? राहिलं!-''
''नाही-नाही खायचंय खायचंय तर!''
''पाणी सुटलंय तोंडाला हाऽहाऽहाऽ''
''तुमच्या नाही सुटलेलं?-''

कोणीतरी ओळखीचं भेटलं आणि बाबा उत्साहात त्याचं स्वागत करून आपुलकीनं त्याची चौकशी करायला लागले.असंख्य ओळखींच्या वाटेतल्या थांब्यांमधला हा पहिला थांबा होता.हे नेहमीचंच होतं.तिला याची सवय होती.असं थांबायला तिला बरंही वाटे.लहान असताना कंटाळा यायचा तसा आता येत नसे.भेटलेल्या वृध्दं बाई होत्या.त्यांचं कुठलंतरी महत्वाचं सरकारदरबारी सहज न होणारं काम बाबांनी करून दिलं होतं.

तिला माहित होतं की असं थांबून राहून हातातलं तिचं जड सामान धरून बाबा अवघडले आहेत.तरीही ती त्यांच्या हातातलं सामान घ्यायला गेली तर ते तिला नाही म्हणतील. मगाशी ती दूधजिलबी नको म्हणाली असती तरी तो बेत त्यानी रद्द केला असता.स्वतःला असं सगळं प्रचंड आवडत असूनही.म्हणून ती लगेच हो म्हणाली.तिलाही खावसं वाटत होतं, भूक लागलेली होती पण त्यांचं खाणं असं एकदम आपल्या पटकन नाही म्हणण्यामुळे- टचकन तिच्या डोळयात पाणीच आलं.ते थोपवणं तिला फार जड जात होतं.

समोरच्या वृध्द बाई, बाबा, सगळं दृष्यच धूसर होऊ लागलं.तोपर्यंत त्या दोघांचा संवाद संपला असावा किंवा त्या बाईंचं तिच्याकडे लक्ष गेलं असावं.बोलणं तिच्या ओळखीवर घसरलं.डोळयातलं पाणी थोपवत ती आपल्या ओळखीला सामोरी गेली.बाबांनी ती नेहमीसारखी जरा जास्तच कौतुक करत करून दिली.त्या बाईही बाबांची मुलगी म्हणून खूप कौतुकाने तिच्याकडे बघत राहिल्या.हा क्षण तिच्या परिक्षेचा.तिच्यातली लहान मुलगी जागी झाली.त्या बाईंकडे बघून आभाराचं हसत तिनं बाबांच्या सामान धरल्या दणकट, केसाळ पण मऊ गुलाबी पंजाभोवती आपली लडिवाळ नाजूक बोटं लपेटली.बाईंनी हसत, कौतुक करत निरोप घेण्याची परवानगी दिली.बाबाही मार्दवयुक्त हसले, निरोप घेऊन निघाले.निघाल्यानंतर बाबांनी हळूच सामान दुसर्‍या हातात घेत रिकामा हात तिच्या खांद्यावर अलगद ठेवला.

''काय गं, काय झालं!''
''कुठे काय! काही नाही'' मगासचा ओघ ओसरल्यामुळे हे असं उत्तर देणं तिला अमंळ सोपं जातंय असं तिलाच वाटलं.
''तुम्ही कसे आहात बाबा?'' उतरल्यापासून मनात सतत घोळत राहिलेला प्रश्न तिनं शेवटी विचारलाच आणि पुन्हा मगासच्याच ओघाची पुनरावृत्ती होतेय की काय असंच तिला वाटलं. आपोआप तिची मान खाली झाली.त्यांचा हात तिच्या खांद्यावर होताच. त्यांच्यापासून काय लपणार होतं?
''मी बरा आहे.मस्त आहे. मजेत. परवाच आलो, सांगवडयाला गेलो होतो.मजा बघ-''

बाबांना कशी गाडी योग्य त्या दिशेने वळवता येते? त्याना हव्या त्या दिशेने हे तर झालंच पण वातावरण सेफली हलकं करत.ती तिच्या विचारात हरवली आणि त्यांच्या दौर्‍यावरच्या सुरस आणि चमत्कारिक हकीकतीत तिचे त्यांच्याबद्दलचे विचारही कधी वाहून गेले ते तिला कळलंच नाही.इतकं की जिलबीवाला ओंकारनाथ जवळ आलाय हे ही त्यानी सांगितल्या-दाखवल्यावरच तिच्या लक्षात आलं.

मग ओंकारनाथचा म्हणजे त्या जिलेबीवाल्याचा आत बसण्याचा आग्रह.तो मोडवत नसूनही कधी नव्हे ते वेळेचं भान ठेवत बाबांनी तो विनोद करून त्याला न दुखावता मोडला.पानावर दिलेली जिलबी उभं राहूनच हाणली.तिला पहिल्या दोन जिलब्यांतच गुंगी चढायला लागली.सरतेशेवटी तो भय्या पैसे घेईना.बाबांनी त्याचंही काही महत्वाचं काम जाता जाता करून दिलं होतं.बाबांना पैसे न देणं पटेना.नोट या हातातून त्या हातात घुसत फाटते की काय असं वाटेपर्यंत चुरगळत राहिली.तिची नजर त्या नोटेच्या हालचालीनुसार नाचनाचून थकली.

''भैय्याऽऽ ले लो अभीऽऽ'' तिच्या नकळतच ती चिडून ओरडली आणि मग तिनं आपल्या तोंडावर हात ठेवला.तो मौका बाबांनी साधला, 'तेरा भी नही मेरा भी नही' चा नेहमीचा व्यवहारी हतकंडा काढला आणि भैय्यानं पैसे घेतले.

मग ओंकारनाथची कथा.पटकथा, संवाद अर्थातच बाबांचे.तिच्या खांद्यावर हात ठेऊन घरापर्यंत येईपर्यंत ती त्या सिनेमात रंगून गेली.इतकी की जिने चढून प्रत्यक्ष घरात प्रवेश करेपर्यंत तिला घरातल्या तप्त वातावरणाचा, तशी नेहमीचीच ठळक कल्पना असूनही वाससुध्दा आला नाही.

तिनं घरात येऊन बाबांकडचं सामान योग्य जागी ठेवलं.मोकळं होण्यासाठी म्हणून ती पुन्हा बाहेर चाळीच्या कॉमन टॉयलेटच्या दिशेने गेली.परत येऊन बघते तर स्वैपाकाचा तापलेला कुकर, बाबांच्या छातीवर रेटलेला, बाबा तो हाताने दूर लोटायचा प्रयत्न करताहेत.तिला मधे पडायलाच लागलं.

तिचे डोळे खाडकन उघडले.चक्करल्यासारखं झालं तिला क्षणभर.कळत नव्हतं आपण कुठे आहोत.ती लोकलमधे होती.समोरचे चेहेरे, बरेच बदललेले, काही तेच.चेहेर्यांावरचे भाव- त्यांत एकूण फारसा फरक नाहीच.मग दचकून ती लोकलची खिडकी-दार शोधू लागली, आपलं स्टेशन गेलं तर नाही? अजून स्मरणात सगळं तसंच आहे.काल परवाच घडल्यासारखं असं मनाशी म्हणत तिनं लांबलचक सुस्कारा टाकला.स्टेशन अजून यायचं आहे असं मनाशी म्हणून एक निश्वाःस तिच्यातून आपोआप बाहेर आला.

आपण वर्तमानात आहोत या जाणीवेने तिला हायसं वाटलं.मग जरा वेळ ती तशीच बसून राहिली.निर्विकार.निर्विचार.मनानं स्वतःच घेतलेलं एक मध्यंतर.
मग मनानं घेतलं तेव्हा दुसरा अंकही आपोआप सुरू झाला.सावकाश.आणखी कुठल्यातरी उच्च वा परमोच्च बिंदूकडे नेणारा.कदाचित त्याआधीच फसणारा...

गुलमोहर: 
शब्दखुणा: