आर्थरायटिस- एक लढाई

Submitted by ठमादेवी on 22 January, 2011 - 05:38

आर्थरायटिस हा सांध्याशी संबंधित एक आजार आहे जो ऑटो-इम्युन म्हणजे शरीरातल्या प्रतिकारशक्तीशी संबंधित आहे. आर्थरायटिसचे मुख्य तीन प्रकार आहेत.
1. रूमाटाइड आर्थरायटिस (आमवात)
2. ऑस्टिओ आर्थरायटिस
3. गाऊट

यातला ऑस्टिओ आर्थरायटिस हा आजार मुख्यत्वे वाढत्या वयात होतो आणि त्यात गुडघ्यामधलं वंगण कमी होऊन हाडं एकमेकांवर घासली जातात. या घर्षणामुळे गुडघे खराब होऊन त्यांचं ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते. गाऊट हा मुख्यत्वे पुरुषांना आणि रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या स्त्रियांना होऊ शकतो. याची लक्षणं आमवातासारखीच असली तरी तो थोडा वेगळा प्रकार आहे.

आमवात- हा अत्यंत गंभीर आणि कोणत्याही वयात होणारा आजार आहे. आयुर्वेदानुसार आपलं शरीर वात, पित्त आणि कफ अशा तीन प्रवृत्तींचं असतं. त्यातली वातप्रधान पित्तप्रकृती वाढली की हा आजार होतो, असं डॉक्टर्स सांगतात. आपलं शरीर अनेक गोष्टी अन्नाद्वारे स्वीकारत असतं आणि काही गोष्टी बाहेर फेकत असतं. या बाहेर फेकल्या जाणार्‍या गोष्टी पचन न होत्या शरीरात साचल्या की सांध्यांमध्ये साठून राहतात आणि शरीर सुजतं. सर्वसाधारणपणे प्रसूतीनंतर नीट काळजी न घेतल्यास, सतत जास्त टेन्शन घेतल्यास हा आजार होतो. अनेक स्त्रियांमध्ये वर्षानुवर्षं एकच हात दुखतोय आणि मग आजाराने डोकं वर काढलं असं होऊ शकतं. शिवाय एकदा तो झाला की अनेकदा फोफावत शरीरभर पसरतो आणि माणसाला कळतच नाही की काय होतंय. जगभरात जवळपास 70 टक्के लोकांना हा आजार आहे आणि प्रसूती झालेल्या महिला याला जास्त बळी पडल्या आहेत.

माझा आजार 2007 मध्ये पायाच्या बोटापासून सुरू झाला. अंगठा आणि बोट यांच्यामधला सांधा सुजायचा आणि असह्य दुखायचा. एक्सरेत काहीही आलं नाही. आधी काहीच कळलं नाही. 2008च्या जून-जुलै महिन्यात माझा एक खांदा दुखू लागला. उसण भरली असेल म्हणून दुर्लक्ष केलं. मग ऑगस्टमध्ये एक गुडघा दुखू लागला. असं करत करत सप्टेंबरमध्ये माझ्या शरीरातले सर्व सांधे असह्य दुखू लागले. आज हात दुखतो तर उद्या पाय, परवा मान मग मनगट, बोट असं सर्व काही आळीपाळीने दुखू लागलं. एक्सरे काढावेत तर काहीही नाही. जे. जे. मध्ये डॉ. सचिन जाधव, डॉ. चंदनवाले यांच्याकडे सतत जात होते. डॉ. सचिनला शंका आली. मग आम्ही आरए टेस्ट केली. पहिली टेस्ट पॉझिटीव्ह आणि दुसरी निगेटिव्ह. परत केली. ती मात्र वेगळ्या पद्धतीने केली. त्यात आरए दिसून आला. तिथल्याच एका डॉक्टरने सल्ला दिला, ‘सरळ आयुर्वेदिक ट्रीटमेंट कर.’

डॉ. वहीद- पोद्दार रुग्णालयाचे डीन - यांनी मला आठ दिवस केवळ मध आणि गरम पाणी पिण्याचा (मधुचर्या) सल्ला दिला. रोज पाव किलो मध संपवायचा आणि दुसरं काहीही घ्यायचं नाही. ते केलं. मग त्यांनी आयुर्वेदिक औषधं सुरू केली. काही दिवसांनी पोद्दारमध्येच डॉ. सकपाळ यांच्याकडे माझे पंचकर्मसाठी उपचार सुरू झाले. त्यांनी मला पथ्य सांगितलं आणि तीन टप्प्यांत उपचार सुरू केले. त्यात वजन कमी करणं, आजारावर औषधं आणि मग प्रतिकारशक्ती वाढवणं. पुढील पथ्य होतं-

1. टोमॅटो, दही, दूध, केळी, चिंच, इडली, डोसा, पाणीपुरी, बिस्किट, ब्रेड, पिझ्झा, मटण, अंडी यांना बंदी- अगदी कमी प्रमाणात चिकन आणि मासे चालतील.
2. दोन जेवणांच्या मध्ये काहीही खायचं नाही. खायचंच असल्यास चुरमुरे, पॉपकॉर्न, राजगिरा लाडू असं खावं. जेवताना डाळीचं वरण भरपूर प्यायचं, पोटभर जेवायचं.
3. फक्त आणि फक्त गरम पाणी प्यायचं. आंघोळीलाही गरम पाणीच.
4. दिवसा झोपायचं नाही
5. कुठल्याही परिस्थितीत ऑफिस, नित्याचं काम चुकवायचं नाही. कितीही त्रास झाला तरी उठून जायचंच.
6. हाता-पायाचे, मानेचे व्यायाम. पण आजाराचा जोर कमी होईर्पयत इतर व्यायाम बंद. प्राणायाम करावा.
7. समुद्रावर मिळणार्‍या वाळूने सर्व सांधे दिवसातून दोन तीनदा शेकायचे- कोरडा शेक. ओला शेक (गरम पाण्याने-तेलाने) चालणार नाही उलट दुखणं वाढवेल.
8. तेलाने किंवा बामने चोळायचं नाही. फक्चत डॉक्टरांनी दिलेलं तेल सांध्यांमध्ये हलक्या हाताने जिरवायचं.
9. घरी असताना सुंठीचा काढा प्यायचा. सुंठीचा, आल्याचा आणि लसणीचा जास्तीत जास्त वापर.
10. दिवसातून तीन-चार चमचे एरंडेल तेल प्यावंच लागेल. (ते नुसतं जात नसल्यास चहासोबत किंवा पोळीला लावून खाल्लेलं चालेल.)
11. ट्रेन, बसने प्रवास बंद. बाईकवर बसायचं नाही. टॅक्सीने जाऊ शकता. (तसंही दुखणं इतकं असतं की तुम्हाला ट्रेनचे धक्के आणि बसचे जर्क सोसवतच नाहीत.)
12. पंखा, एसी या गोष्टी वर्ज्य एसीत बसायची वेळ आलीच तर स्वेटर घालावा. थंडीत सांधे लोकरीने, सॉक्सने झाकून ठेवावेत. सुंठ-गूळ, आलं गूळ एकत्र करून रोज सकाळ-संध्याकाळी खावं.

उपचारांमध्ये मला काही आयुर्वेदिक औषधं दिली. त्यात सिंहनाद गुग्गुळ, महा वातविध्वंस, निरनिराळ्या प्रकारचे जेवणाआधी आणि नंतर घ्यायचे काढे असं सर्व काही होतं. ते सर्व इथे देणं शक्य नाही. पण वरचे उपाय स्टॅण्डर्ड आहेत. ते कुणीही करू शकतं.

पंचकर्मासाठी त्यांनी मला वैतरण बस्ती आणि लेखन बस्ती दिली होती. वैतरण बस्तीमध्ये चिंचेच्या कोळाचा काढा आणि लेखन बस्तीमध्ये एक दिवस तेलाचा बस्ती आणि एक दिवस त्रिफळाच्या काढ्याचा बस्ती असे दोन प्रकार होते. हे दोन्ही बस्ती मी आठ दिवसांच्या अंतराने प्रत्येकी 16 दिवस केले. त्यासाठी मी रोज सकाळी आठ वाजता पोद्दार रुग्णालयात जात होते. 12 वाजेपर्यंत घरी यायचे. जेवायचे आणि ऑफिसला जायचे. संध्याकाळी घरी आलं की थोडा आराम आणि मग जेवून झोपणं, असा माझा दिनक्रम होता. डॉक्टरांचं बारीक लक्ष होतं. रात्रीतून असह्य कळा यायच्या पायात. मी खूप रडायचे. एक-दोनदा डॉक्टरला म्हटलंही- एकतर मला ताबडतोब यातून बाहेर काढ नाहीतर विष दे. डॉक्टर योगेशने (सकपाळांचा उजवा हात) खूप मानसिक आधार दिला. औषधांमुळे केस प्रचंड झडले. पण टक्कल पडलं नाही, हे नशीब. केवळ छोट्या मुलीकडे बघून मला धीर यायचा. तिला जवळ घेता येत नाही, उचलण्याची ताकद नाही या मुळे अपराधी वाटायचं. एक तांब्याही उचलता यायचा नाही. चालायला, जिने उतरायला, चढायला खूप वेळ लागायचा.

याच दरम्यान डॉ. उदय कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली अ‍ॅक्युपंक्चर करून घेतलं. माझ्या पायाची टाच प्रचंड दुखत होती. असह्य कळ यायची. पाय टेकवत नव्हता. डॉ. योगेशने एकदा सहकार्यांच्या मदतीने माझ्या टाचेला चांदीचा चटका दिला. (याला आयुर्वेदात दाहकर्म असं म्हणतात.) अवघा एक मायक्रोसेकंद असेल पण त्याचा मानसिक धक्का इतका होता की मी चक्कर येऊन पडले. पण आजवर माझी टाच कधीही दुखली नाही. (त्याचा डाग अजूनही पायावर आहे.)

डिसेंबर 2008 मध्ये महिनाभर बस्ती घेतल्यावर मी सप्टेंबर 2009 मध्ये पुन्हा 16 दिवस बस्ती घेतला. वजन 12 किलो कमी झालं होतं. (आता ते पुन्हा वाढलंय. आजार बरा झाल्याचं लक्षण म्हणून.) औषधं सुरूच होती. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने मी सतत कुठल्यातरी इन्फेक्शनला बळी पडायचे. माझा आरए ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये परावर्तित झाला. डॉक्टर त्याची लक्षणं विचारतच होते. ते लक्षात आल्याबरोबर त्यावर उपचार झाले. त्यातच लिम्फन्जायटिस सुरू झाला. यात दर 15 दिवसांनी मला रात्रीचा ताप यायचा आणि माझ्या उजव्या हाताची लसिका (लिम्फ नोड) सुजून असह्य वेदना व्हायच्या. ती सुजत गेलेली दिसायची. फायलेरिया झाला होता. त्यासाठी ट्रीटमेंट घेतली.

माझ्या आजाराचं मूळ होतं टेन्शनमध्ये. ते कमी करण्यासाठी आम्ही शिरोधारा केली. त्याचाही फायदा झाला. शेवटच्या टप्प्यात मात्र प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मी हिंदुजा रुग्णालयात डॉ. बालकृष्णन यांच्याकडे गेले. त्यांनी मला व्हिटॅमिन डी-3, आयर्न, कॅल्शियम सुरू केलं. त्यामुळे सुमारे दीडेक महिन्यात माझं दुखणं पूर्णपणे थांबलं. लक्षात आल्यानंतर जवळपास दोन र्वष मी न थकता अव्याहतपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहिले, उपचार केले, कडक पथ्य पाळलं आणि माझा आर ए फॅक्टर निगेटिव्ह आला. दर तीन महिन्यांनी या सर्व तपासण्या आम्ही करायचो. (आरए हे निदान असलं तरी कित्येकदा हा आजार त्यात दिसतोच असं नाही. डॉक्टर क्लिनिकली तपासून सांगतात- हे डॉ. बालकृष्णन यांचं मत. ते आर्थरायटिसच्या क्षेत्रात सर्वोत्तम मानले गेलेल्या डॉक्टरांपैकी एक आहेत. मुंबईत केवळ हिंदुजा रुग्णालयात आरएचं वेगळं डिपार्टमेंट आहे.) आता डॉक्टरांनी सर्व औषधं बंद केली आहेत. केवळ गरम पाणी आणि पथ्यच पाळायला सांगितलं आहे. पथ्य आता खूप पाळलं जातं असं नाही. पण स्ट्रेस येऊ द्यायचा नाही आणि पचनक्षमता कमी होऊ द्यायची नाही, या दोन गोष्टी पाळल्या की झालं!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठमादेवी, तू ह्या दुखण्यातून सहीसलामत बाहेर पडलीस म्हणून तुझं अभिनंदन!! आणि तुझ्या तीव्र मनोबलाबद्दल, तुझ्या घरच्यांनी तुला ह्या आजारात जी साथ दिली त्याबद्दल तुझं आणि तुझ्या घरच्यांचं कौतुक!

तुमच्या सहनशक्तिस शतशः प्रणाम.
तुमच्या तुलनेत मला २ टक्केही त्रास नाही पण मी वेळोवेळी हताश झालेल्याची आठवणच लज्जास्पद आहे.
तुसी ग्रेट हो.
आता यापुढे उर्वरित आयुष्य आनंदात जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
Happy

ठमे, खरच कौतुक तुझे. माझ्या एका मैत्रिणिला नुक्ताच झालय. अधि चिकुन गुन्या म्हणुन दुर्लक्शा केले तिने पण शेवटी हाच आजार निघला. मी तीला हा लेख नक्की वाचायला सान्गेन.

ठमे....______/\_____
खरंच मानलं तुझ्या जिद्दीला. डॉक्टर लाख उपाय करतील, रुग्णाने मनावर घेतलं तरच यश येतं.
खूप खूप शुभेच्छा. काळजी घे.

ठमे, अतिशय सुंदर माहिती दिलीस. शेवटचे वाक्य तर अगदी लक्षात ठेवण्यासारखे >>स्ट्रेस येऊ द्यायचा नाही आणि पचनक्षमता कमी होऊ द्यायची नाही, या दोन गोष्टी पाळल्या की झालं!>> तुझ्या ह्या लेखनाची लिंक माझ्या अनेक मैत्रिणिंच्या उपयोगी पडणारे आणि मलाही. धन्यु.

ठमादेवी, किती छान त-हेने तुम्ही हा सामना केलात!! कौतुकच आहे. मला नेहमी वाटते की आपण एखाद्या आजारातून बरे झालो की नव्यानेच घडलो असतो. अनुभवाने शहाणे झालो असतो. तसच वाटत हा लेख वाचून. आणि हे वाचून इतरान्च्याही मनात जागरुकता निर्माण होते.. आणि सगळ्यात छान म्हणजे त्याचा स्वमदत गट सुरू केलात!! मला गटाच्या मीटिन्ग ला यायला नक्की आवडेल. पुण्यात आमचा "सेतू" नावाचा एक गट आहे, तो गट म्हणजे सर्व स्वमदत गटान्चा मैत्री मन्च आहे. विविध व्याधीन्चे स्वमदत गट एकत्र अजून आम्ही एकमेकान्ना मदत करतो.

पुन्हा एकदा तुमचे कौतूक.

ठमे बै लै उड्या नको मारु. आता निट झाली ना. तब्य्र्त सांभाळ. नाहीतर परत पाठवावे लागेल तुला सोलापुरच्या वैद्याकडे काढा घ्यायला. मग होईल तुझा टांगा पल्टी. Proud

स्फूर्तीदायक उदाहरण. नाहीतर छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करणारेच पुष्क्ळ.

ठमा, खरंच खुप कौतुक वाटले तुमचे. आजारातुन पुर्ण रिकव्हर झाल्याबद्द्ल अभिनंदन आणि ही माहिती इथे शेअर केल्याबद्द्ल खुप आभार.

छत्रपती महाराज (छ म्हटलं की म आपसूक येतंच. ) Biggrin
यशोदा, सध्या तरी तो फार प्रोफेशनल झालेला नाहीये... मी करेन संपर्क... आणि हो, या आजारातून उठल्यावर मला गेले सहा महिने पुनर्जन्मच झाल्यासारखं वाटतं... स्वत:चा नव्यानेच शोध लागल्यासारखं... हे नवंपण मी एंजॉय करतेय खूप!!! Happy

ठमादेवी,

कौतूक आहे तुमचे. खूप आरोग्य आणि आनंद मिळणार तुम्हाला आता. सर्व भोगून झाले. God's blessings are with you.

ठमादेवी, स्वमदत गट हा कधीही प्रोफेशनल नसलेलाच चान्गला!! त्यात आपलेपणा रहातो आणि कामा मधे एक जिव्हाळा रहातो. Happy

माझ्या आईला दुसर्या बाळंतपणानंतर हाच त्रास झाला होता. तिव्रता इतकी, तिला चालताही येत नसे.
तिलाही आयुर्वेदीक उपचारांनी बरं वाटलं. आणि ती सांगायची की, फक्त २ औषधं दिलेली तिला. नंतर तिलाही नावं आठवली नाहीत आणि डॉ. ना ही.
तुम्ही इतकं सविस्तर लिहिलत, खूप माहितीपूर्ण झाला आहे लेख. तुमच्या जिद्दीला, चिकाटीला सलाम!
पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.

लेख आधीच वाचला होता, प्रतिक्रिया द्यायची राहून गेली. चांगला आणि माहीतीपूर्ण लेख आहे.
तुमच्या जिद्दीचे खूपच कौतुक वाटले. शिकण्यासारखे आहे रोगाशी चिकाटीने लढणे.
तुम्हाला शुभेच्छा.

धन्यवाद माहिति बद्दल!!

ठमादेवी, तुमचं खरच कौतुक आहे. किती सहन केलं तुम्ही, कल्पना करु शकते.
तुमच्या घरच्यांच्या आणि तुमच्या जिद्दीला सलाम आणि तुम्हाला शुभेच्छा!!!

माझ्या बहिणीला हा आजार आहे, खुप त्रास होतो, होमिओपथिची ट्रिट्मेंट चालु आहे. फारसा फरक नाहि, तिला या ट्रिट्मेंट बद्दल सांगते.

मीरा, सांगा जरूर तुमच्या बहिणीला... आणि कुणालाही काही मदत लागली तर मी इथेच आहे...
यशोदे, मी मेल करेन तुला... अरे हो, आणि सगळ्यांचे आभार. तुमच्या शुभेच्छांनी माझा हुरूप वाढलाय... Happy

अरे हो, आणि सगळ्यांचे आभार. तुमच्या शुभेच्छांनी माझा हुरूप वाढलाय.. >>> आणी तुझ्या लेखामुळे माझा हुरूप वाढलाय Happy धन्यवाद परत एकदा.

नमस्कार,
तुमचे नाव "कोमल" असले तरी इतक्या कणखर, खंबीर आहात की हॅट्स ऑफ तुमच्या जिद्दीला, खंबीरपणाला.
फारच उपकारक लेख या प्रकारच्या रुग्णांना - तुम्ही स्वतः या दिव्यातून पार झाल्यामुळे कोणाही इतर रुग्णामधे हा लेख नक्कीच बरे होण्याची जिद्द निर्माण करु शकेल इतका प्रभावशाली आहे.
शतशः, सहस्रशः आभार.
परमेश्वर कृपेने तुम्हाला "समाधान" प्राप्त होवो.
"समाधानाएवढे थोर काहीच नाही"- समर्थ रामदास स्वामी.

Pages