आवडत्या कविता: अर्थ आणि रसग्रहण

Submitted by नानबा on 19 January, 2011 - 13:03

माहित असलेल्या किंवा हव्या असलेल्या कवितांचे अर्थ, गुढार्थ, रसग्रहण - सगळं इथं टाकता येईल...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे फक्त कविता लिहू नका. बर्‍याच कविता या प्रताधिकारमुक्त नसल्याने त्यांचा संग्रह इथे करता येणार नाही. पण त्यांचा अर्थ किंवा रसग्रहण करणारे प्रतिसाद चालतील.

नानबा- धन्यवाद.
'उंट', 'आततायी अभंग' - हे सर्व 'ध्रुपद' या संग्रहात आहेत. किंमत रुपये ९०. पॉप्युलर प्रकाशन.

कुणी कुसुमाग्रजांची "माताजी" टाकाल का? रसग्रहणासकट?
मला कवितेचं नाव नक्की आठवत नाहीये - पण सार असं: "एखाद्या माणसाचे कितीतरी पैलू असतात जे आपल्याला ":माणूस कळला" असं आपण म्हणतो तेव्हाही कळालेले नसतात."
खूSSSप पूर्वी वाचलेली.. त्यानंतर सापडलीच नाही शोधली तरी..

मस्त धागा,नानबा.
नियमित हजेरी लावणार इथे. रसग्रहण करण्याइतका माझा दांडगा अभ्यास नाही, पण नुसतं वाचायला, आणि आवडत्या कविता मला का आवडल्या, हे लिहायला तरी नक्कीच येईन ! Happy

भरत मयेकर,
प्रताधिकार कायद्यानुसार स्वतः केलेलं रसग्रहण अपेक्षित आहे. इथे तुम्ही कविता देऊन इतर कोणी केलेलं रसग्रहण देऊ शकत नाही. Happy

नानबा,
'थोडंफार रसग्रहण' याला कायद्याच्या दृष्टीनं अर्थ नाही. रसग्रहणात मूळ कलाकृती किती आहे, याचीही मोजदाद केली जाते.

प्रताधिकार कायद्याला गांभीर्याने घेतलं नाही तर कधीतरी कार्यवाही होऊ शकते, हे कृपया लक्षात घ्या. Happy

चिन्मयला पूर्ण अनुमोदन. धाग्याचा उद्देश अत्यंत स्तुत्य असला तरी त्यासाठी कायदा मोडणे बरोबर ठरणार नाही.

पोसवलेली केळ म्हणाली
...........काय तुला ते?
जेव्हा घेउन आधार तिचा
चुकवलीस तू पहिली भोवळ.
...............तेव्हापासुन
नाही हसलीस
..............हिरवळीतले
होउन पाणी;
हळवी झालिस सर्व ठिकाणी;
ओठांवरची पहाट उडली,
...............गुलबक्षीची.
पोसवलेली केळ म्हणाली
काय तुला ते मौनमोकळे?
.............जेव्हा दिसला,
मदिरक्षणाचा दुसरा डोळा
वटारलेला अन् अनपेक्षित,
उठता उठता.
............कळेल का ते?
सत्य भाबडे अनुभवलक्षी,
लक्ष घातला स्वप्नांचा जर?

- विंदा करंदीकर.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

मला जाणवलेला अर्थ :

केळीचा घड काढतांना केळीचं आयुष्य संपतं. स्त्री माता झाली की तिचं स्वतःचं बालपण, स्वप्नं ही अशीच दुय्यम होतात. हिरवळीतल्या पाण्यागत स्वच्छंद कुठेही वहात जायचे दिवस आता संपले. आयुष्याला एका दुसर्‍या आयुष्याचा योगक्षेम वाहण्याचं वळण लागलं. हे सगळं ज्या एका मदिरक्षणामुळे घडलं, तोच क्षण जगण्याचे सगळेच संदर्भ बदलून टाकणारा ठरला. (म्हणून 'उठता उठता'च.)

नव्या जीवाचा जन्म म्हणजे नवीन शक्यतांचा जन्म. शक्यता प्रत्यक्षापेक्षा नेहमीच भव्यदिव्य आणि आकर्षक असतात - म्हणून तो सोहळा मोठा. हे चक्र सुरू राहतं ते त्या शक्यतांच्याच आसेने. 'अंतिम सत्य' सापडत नाही तोवर आणि एका अर्थी सत्य सापडत नाही म्हणूनच.

अगदी नेमकं हेच रूपक कुठल्याही सृजनाच्या बाबतीत लागू पडतं.

रॉय किणीकर म्हणाले तसं
'पण लिहावयाचे लिहून झाले नाही.. पण सांगायाचे सांगुन झाले नाही'

- असं वाटत राहतं तोवरच नवनिर्मितीचे 'डोहाळे' असतात. तोवरच असतो अमूर्ताला मूर्त माध्यमात (शब्द / रंग / सूर / ताल इ.) अभिव्यक्त करण्यातला 'रोमान्स'. शब्द लिहून झाला की अमूर्ताभोवती शब्दार्थांची, संदर्भांची चौकट आखली, नव्हे आवळली गेली. मग सहसा उरते ती केवळ न पेलता आलेल्या जबाबदारीची जाणीव. कारण There is more to the truth than the facts stated! हा तो मदिरक्षणाचा दुसरा डोळा. लेखणी किंवा ब्रश खाली ठेवता ठेवताच झालेली जाणीव.

आणि चौकट केवळ सर्जकाची नाही. मग आस्वादकाची त्याची त्याची आणखीन निराळी चौकट. कारण ज्याला त्याला जाणवणारं सत्य हे ज्याच्या त्याच्या अनुभूतीवर अवलंबून (अनुभवलक्षी!) आणि त्यापलिकडे जाण्याची पात्रताच नसलेलं - भाबडं.

लक्ष लक्ष अमूर्त स्वप्नं, कल्पना, विचार यांचा परिपाक म्हणजे ही 'बोलणे मिनिटा मिनिटा विसंवादी' हीच जाणीव अखेर?! अशा किती स्वप्नांची लाखोली (लक्ष) वाहिली की जे मुळात मांडायचं होतं ते सत्य 'जागृत' करता येईल? (गणपतीच्या वगैरे पूजेत एक भाग मूर्तीत तिच्या निरनिराळ्या अवयवांना दूर्वेने स्पर्श करून प्राण भरण्याचा असतो - तसं या शब्दांच्या पार्थिवात तो आशयाचा प्राण भरण्याचा हा सोहळा सुरू आहे - अशी एक दृश्यात्मकता या 'लक्ष वाहणे' कल्पनेला आहे.

मला जाणवलेली सौंदर्यस्थळं :

शब्दकळा - 'मनमोकळं' आपल्याला माहीत होतं, पण 'मौनमोकळं'? केवळ मौनातूनच अभिव्यक्त होणारं असं काहीतरी भरभरून सांगितलं गेलं इथे.

कल्पनाविलास - 'मदिरक्षणाचा दुसरा डोळा वटारलेला अन् अनपेक्षित!', वर म्हटल्याप्रमाणे लक्ष वाहण्याच्या कल्पनेतून उभी केलेली इमेजरी.

तंत्र - संपूर्ण कविता पद्मावर्ती आहे. दर आठ मात्रांनंतर यती घेत घेत मोठ्याने वाचून बघा त्याची गोडी!

पोसवलेली | केळ म्हणाली | काय तुला ते?
जेव्हा घेउन | आधार तिचा | चुकवलीस तू | पहिली भोवळ.... अशा लयीत.

तसंच उच्चारशास्त्र (phonetics) कसं वापरलं गेलंय बघा. कवितेची सुरुवातीची सगळी वाटचाल बिन आघाताच्या शब्दांतून होते. यात त्या पद्मावर्तनाचाही भाग आहे. पहाट, ठिकाणी हे शब्द अशा वजनात उच्चारले जातात की ते 'टोचत' नाहीत. वाचता वाचता धक्का देणारा शब्द कुठला? 'वटारलेला!' जिथे अर्थाचाही धक्का बसतो! हा योग जुळून येणं म्हणजे दुग्धशर्करा! Happy

ईबा विपुमध्ये दिलीय कविता
वर दिलेला अर्थ विजयाबाईंनी लिहिलेला...आदिमायाच्या प्रस्तावनेत.
पण तुम्ही सांगितलेला अर्थ जास्त पटला. विशेषतः केळ पोसवली की संपते याच्याशी पुढल्या ओळी नाही हसलिस्.इ.इ त्याच्याशी मेळ जुळतो.
पुढल्या काही ओळी हे त्या जाणिवेतून सावरण्याचे भान आहे का?(उठता उठता)
शेवटच्या दोन ओळी (कळेल का ते....) सत्य स्वप्नांच्या पलीकडले असे आहे का?
गर्भवती ही सृजनाचे प्रतीक हे जाणवते. पण ते प्रतीक न घेता ती कविता किती हळुवार आहे. अगदी पहिल्या दोन ओळीतच काळजाला भिडते.
*************
धृपदातली 'हे ब्रह्मदत्ता' ही कविता कुणा विशिष्ट व्यक्तीला उद्देशून आहे का?

धन्यवाद, मयेकर. Happy
समोर कविता असल्यामुळे सविस्तर लिहिता आलं.

'हे ब्रह्मदत्ता' नाही मी वाचलेली आणि तिच्या प्रेरणेबद्दल काही कल्पना नाही मला.

विंदाची 'उंट' ही कविता कळायला इतकी सोपी नाही. वर अरभाटनी जो अर्थ लावला खरे तो अर्थ मुळीचं नाहीये त्या कवितेचा पण त्याच्या प्रयत्नाचे मात्र कौतुक आहे. मी 'विंदाचे देणे' असा एक लेख लिहितो आहे त्यात पुर्ण अर्थ देईन. तिथे वाचा.

ईबा अप्रतिम!

हा एक परिच्छेद टाकावासा वाटला. मुक्तच्छंदातल्या कवितांना त्या कविताच नाही म्हणणार्‍यांना विंदा कळत नाहीत, आवडत नाहीत तर मग त्यांच्या पुढे हे कोलटकरबिलटकर, चित्रेबित्रे मच्छरच असतील. तरी पण हा लेख वाचावा असाच. यातलं 'गोष्ट जशी मुळात आहे तशी ती जाणून घ्यायची, स्वतःला पार वगळून..' हे निव्वळ ग्रेट आहे.

तथागत कवी - अशोक शहाणे

नाहीतरी प्लेटोनं आपल्या मनातल्या प्रजासत्ताकात कवींसाठी जागा ठेवलीच नव्हती. कवी मंडळी अत्यंत कुचकामी व बेभरवशाची असतात, असं कारण देऊन. या आक्षेपाला तडाखेबंद उत्तर भवभूतीनं दिलं होतं, की कविताबिविता तुमच्यासारख्यांसाठी लिहिलेलीच नाही मुळी. ती समजणारा आत्ता कुणी नसला तरी पुढं कधीतरी निपजेल. इथं नाही तर आणखी कुठंतरी. माझा 'समानधर्मा' कुणीतरी कधीतरी निपजेलच निपजेल. कारण काळाला काही मर्यादाच नाहीत अन्‌ जगसुद्धा खूप मोठ्ठं आहे.
कवितेसाठी 'धर्म' शब्द वापरणारा बहुधा भवभूतीच पहिला. जरी का तुकोबांना तेच अभिप्रेत असावं त्यांच्या या ओळीत 'माझीया जातीचे मज भेटो कोणी.' ही जात कोणती? तर अर्थातच कवीची. कारण तसा तर तमाम कवीमंडळींचा जाहीरनामा त्यांनीच तर लिहून टाकला होताः 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने.'
हे सगळं भारुड आत्ता आठवायचं कारण म्हंजे कैक वर्षांपूर्वी अरुणनं दिलीपला (चित्रे) टीव्हीवरल्या मुलाखतीत दिलेलं मासलेवाईक उत्तर. दिलीपनं कोणत्याही मुलाखतीत शोभण्याजोगा मामुली प्रश्‍न विचारला होताः 'तू कविता कसा लिहायला लागलास?' यावर अरुणचं उत्तर होतं: 'देवानं मला सांगितलं, अरुण,पृथ्वीतलावर जा अन्‌ कविता लिही.' यातला देव अर्थात उगाच. प्रश्‍न करणा-यानं आणखी खोलात शिरू नये म्हणून त्याच्या वाटेत एक भलीथोरली धोंड म्हणून वापरलेला. पण त्याचबरोबर आपली कवितेबद्दलची समज भवभूती-तुकोबांशी जोडणारा. या तुकोबांबद्दल पण मागं बोलताबोलता अरुण म्हणाला होता, विठोबाची न्‌ आपली डायरेक्‍ट ओळख नाही, तुकारामाची न्‌ आपली आहे, अन्‌ तुकाराम विठोबाला ओळखत होता.'
तुकोबांबद्दल आणखीसुद्धा त्याचं एक बिनछापील विधान मोठं मार्मिक होतं: साक्षात मरण पुढं उभं ठाकलेलं असताना माणसानं मोठ्ठ्यानं हसावं अशी तुकारामाची कविता आहे. हे कुणा समीक्षकाला सुचणं दुरापास्त आहे. तिथं जातिवंत कवीच हवा. आमच्या मित्रमंडळींपैकी अरुणनं अन्‌‌‌ दिलीपनं आपापल्या परीनं मराठी माणसाला तुकारामाची कवी म्हणून ओळख करून दिली. तुकाराम जाऊन साडेतीनशे वर्षं उलटून गेल्यावर. एरवी तुकारामाला थोर करून, संत करून, टिळेबिळे लावून, त्याच्या नावानं चमत्कारांची कुभांडं रचून त्याच्या कवितेचा विसर पाडण्यासाठी काय कमी खटपटी-लटपटी झाल्या होत्या का? दिलीपनं लोकांना समजावणीच्या सुरात, जवळजवळ त्यांची मनधरणी करत, तुकारामाची कविता लावून धरली. अरुणनं त्याचा रोखठोकपणा लावून धरला. इतका,की अरुणच्या बहुतेक कविता प्रत्यक्ष घटनांवर किंवा प्रत्यक्ष माणसांवर रचलेल्या आढळतात. मग ती अगदी पहिल्या पुस्तकातली 'मुंबैनं भिकेस लावलं' असो, की इस्पितळाच्या कवितांची मालिका असो, की 'चिरमिरीत'ल्या तर सगळ्याच कविता, अन्‌‌‌ 'भिजक्‍या वही'तला यच्चयावत्‌ मजकूर. ही सगळीच माणसं खरीच आहेत, या सगळ्याच घटना पण खऱ्याच आहेत. अन्‌ तरी त्यांची कविता बनू शकते. जशी तुकारामाची बनली, जशी त्याच्याआधी नामदेवाची बनली. अरुणला वस्तुस्थितीच वेगळी दिसायची. कवीच्या चष्म्यामुळंच हे होत असेल.
एका बंगाली कवीनं समजून सांगितल्याप्रमाणं: कवीच्या लेखी देशाला काहीच खरेपणा असत नाही; त्याच्या लेखी एक नदी, एक झाड, एक फूल, एक दगड, एक बाई. या गोष्टी कितीतरी जास्ती खऱ्या आहेत किंवा तुकारामानं म्हटल्याप्रमाणं 'देश वेष नव्हे माझा, सहज फिरत आलो.' हे अरुणमध्ये जोरदार होतं. 'चिरमिरी'त बळवंतबुवा 'त्यापेक्षा ती नाहीच मरत' म्हणतो ते त्यातनंच.हे कोण म्हणतं? बळवंतबुवा की अरुणच? मरायच्या अठ्ठेचाळीस तास आधी पण तो म्हणत होता, "ह्या गोष्टी मी मुंबईला परतल्यावर आपण बोलून ठरवू.' म्हंजे मरण त्याच्या लेखी नव्हतंच. तेव्हा तरी. ते प्रत्यक्ष येईल तेव्हाच खरं होणार होतं. त्याच्याआधी ती आपली निव्वळ एक कल्पना. काल्पनिक गोष्ट. हे म्हंजे बुद्धाच्या 'तथात्व' सिद्धांतासारखं झालं. गोष्ट जशी मुळात आहे तशी ती जाणून घ्यायची. स्वतःला पार वगळून. तिच्या 'तथा'पणाला धक्का न लावता. बुद्धाला ही हातोटी जमून गेली होती. म्हणूनच तर त्याला 'तथागत' नाव पडलं. दुसरा तथागत मी पाह्यला तो अरुण...

(हा लेख ३. १०. २००४ च्या सप्तरंगात प्रसिद्ध झाला आहे.आभार- निरंजन भगुरकर, भूषण रक्षे.)

शर्मिला, तुमचा लेख फार आवडला.
कवितांचे रसग्रहण हा उपक्रम सुद्धा फारच छान आहे.

Pages