घर - भाग २

Submitted by बेफ़िकीर on 10 January, 2011 - 04:38

"नाताळ हा आपला सण नाही, त्यामुळे साजरा करणे योग्य नाही"

एक दिवसही शाखेत जायला न चुकणार्‍या राजूकाकाचे हे वाक्य ऐकून वेदा वैतागली.

"केक आणायला काय हरकत आहे??"

"केक जरूर आणा, पण नाताळसाठी आणला असे म्हणू नका"

रविवारी दुपारी सगळे एकत्र जेवताना राजूकाका उमेश आणि वेदाला नाताळ या सणापासून परावृत्त करण्याच आटोकाट प्रयत्न करत होता.

चार भावांपैकी राजू या तीन नंबरच्या भावाचे काम कडक असायचे. अण्णा म्हणजे शरद, म्हणजे दुसर्‍या क्रमांकाचा भाऊ सगळ्यांचीच टिंगल करायचा. कुमार म्हणजे दादा सगळ्यांना सांभाळून घेण्याकडे अधिकाधिक लक्ष पुरवायचा. आणि वसंता हा वेदा आणि उमेशचा सर्वात आवडता काका होता. कारण तो एकटाच त्यांना बाहेर खायला, कधी पिक्चरला वगैरे न्यायचा. आणि त्यामुळेच राजेशचे आणि वसंताचे टिंगलयुक्त खटके उडायचे. पण आता बिगुल मोठा व्हायला लागला आणि त्यालाही वसंताच आवडतो म्हंटल्यावर राजेशची बोलती बंद व्हायच्या मार्गावर आली होती.

पण आज घरात नवीनच खूळ निर्माण केले होते पोरांनी! म्हणे केक आणायचा, आकाशकंदील लावायचा आणि फटाके उडवायचे! 'हे सगळे का' असा प्रश्न राजूकाकाने विचारल्यावर उमेशने चाचरत चाचरत 'ख्रिसमस' असे उत्तर दिले आणि हा भडका उडाला.

राजू - म्हणे ख्रिसमस! जानवं तरी घालतोस का??

उमेश - अरे ते बनियन काढताना निघतं... मग पडतं सारखं.. म्हणून काढून ठेवलं..

राजू - असं कसं बनियन काढताना निघतं?? वहिनी.. आमटी वाढा.. असं कसं निघतं??

उमेश - मला काय माहीत??

राजू - आपण सारे भारतीय आहोत... नाताळ हा पाश्चात्यांचा सण आहे..

उमेश - हल्ली दिवस बदललेत..

राजू - तुला जन्माला येऊन जेमतेम ११ वर्षे झाली आहेत.. तू काय सांगतोयस दिवस बदललेत म्हणून??

उमेश - बाबा.. सांगा ना तुम्ही...

दादा - आकाशकंदील वगैरे नाही हं लावायचा..??

उमेश - का??

राजू - बाटलोयत का आपण?? वसंता.. तू भलते लाड करू नकोस पोरांचे..

वसंता - माझा काय संबंध??

राजू - तूच ही थेरं डोक्यात घालत असशील..

वसंता - बघा.. काही झालं की आपला लहान म्हणून मीच सापडतो...

राजू - लहान कसला?? शाखेत यायला लाग उद्यापासून..

अंजली वहिनी - भावजी... सगळे शाखेत जायला लागले तर आपला सगळ्यांचा एक खर्च वाचेल..

राजू - कसला??

अंजली - पँटी शिवायचा.. सगळ्यांना खाकी चड्या एकाच ताग्यात शिवून मोकळे होवू..

तारका आणि गीता खुसखुसू लागल्या.

वसंता - वहिनी.. मी पहिल्यापासून पाहतोय.. तुमचा त्या आर एस एस वर डोळाच आहे आधीपासून..

अंजली - करता काय शाखेत?? देशावर गप्पा मारायच्या अन येताना कोथिंबीर विसरायची..

वसंता - आणली तरी घालतंय कोण आमटीत...

अण्णा - गीता वहिनी... हा तुझ्या माहेरच्यांना टोमणा आहे...

उगाचच अण्णाने राजू आणि गीतामध्ये जुंपून द्यायचा उद्योग केला.

गीता - कसा काय??

अण्णा - तुमच्याकडे आमटीत कोथिंबीर घालत नाहीत असं हा कायम म्हणतो..

गीता - बचकभर घालतात.. कोण म्हणतं घालत नाहीत??

अण्णा - काय रे राजू?? मागे तूच म्हणाला होतास ना??

राजू - अण्णा... तू उगाच पेटवू नकोस.. एक तर शाखा सोडलीस ती सोडलीस...

अण्णा - पण मत भाजपलाच देतो ना??

राजू - आणि मुलगी घरात केक आणतीय नाताळचा..

अण्णा - दादा, आधीपासून माझ्या मनात एक विचार यायचा..

दादा - कसला??

अण्णा - तू आणि मी जन्माला आल्यानंतर आई बाबा थांबले का नसतील??

आता आई आणि बाबा मधे पडायची वेळ आली होती.

आई - आम्ही थांबलो नाहीत कारण तुमच्या दोघांच वागणं पाहून वाटायचं नाही की तुम्ही आम्हाला सांभाळाल...

तीनही वहिन्या हसायला लागल्या.

राजू - बघ... आपल्या पालकांनाच जेथे तुझा भरोसा नाही तेथे इतर कुणाला काय असेल??

अण्णा - न थांबण्याचे आणखीनच भीषण परिणाम भोगावे लागले..

वेदा - बाबा, आणू ना आकाशकंदील??

अण्णा - छे... काहीतरी काय... हिंदू आहोत आपण..

उमेश - बाबा.. तुम्ही सांगा ना..

आता सगळेच दादाकडे पाहू लागले. कारण त्याचा शब्द अंतीम ठरणार होता.

दादाची झाली पंचाईत!

दादा - आपण शांतपणे विचार करून निर्णय घेऊ!

उमेश - अहो एकच दिवस असतो नाताळ.. कधी करणार विचार??

दादा - हे तुमचं आजच्या नाताळसाठी चाललंय???

उमेश - मग??

दादा - आपण ज्या पेठेत राहतो तेथे आपल्याला ताठ मानेने जगायचे असले तर असे प्रकार करून चालणार नाही...

उमेश - असे प्रकार म्हणजे??

दादा - कंदील, फटाके वगैरे!

उमेश - नातूंनी आणलाय की कंदील..

दादा - त्यांची अजून दिवाळीच चालू आहे... तो कंदील नाताळचा नाही...

उमेश - ह्या! दिवाळीत हिरवा लावला होता... हा पिवळा आहे..

राजू - उमेश, मी सांगतोय ना...?? काहीही भलतेसलते करायचे नाही... फार तर केक आणा खायला..

मुले जेवणे उरकून निघून गेली तरी मोठ्यांच्या गप्पा चालूच होत्या.

बाबा - कुमार?? कधी होणार रे बिल्डिंग बांधून??

दादा - म्हणतायत दिड वर्ष लागेल...

बाबा - पण मग दुकान??

दादा - दुकान आता बंदच होणार... बिल्डिंग झाली की चालू होईल..

बाबा - पर्यायी जागा नाही??

दादा - पर्यायी जागा बिर्‍हाडकरूंना आहे... दुकानांना नाही..

बाबा - मग आता??

दादा - काय??

बाबा - करणार काय आहेस तू??

दादा - तेच चाललंय डोक्यात... मला वाटतं माल घरात आणावा आणि इथून विकावा..

अंजली वहिनींना ही कल्पना पसंत नव्हती. आपल्या नवर्‍याने आपल्याच घराच्या गल्लीत दुकान मांडावे असे त्यांना वाटत नव्हते.

अंजली - मला नाही हे पटत..

दादा - अगं मग करायचं काय? दिड वर्षाऐवजी अडीच वर्षे लागली तर??

अंजली - दुसरी घ्या की जागा भाड्याने..??

दादा - आप्पा बळवंत चौकासारखी विक्री कुठे होते इतर ठिकाणी??

अंजली - डेक्कनच्या पुढे घ्या.. तिकडे भरपूर वस्ती व्हायला लागलीय... जागा पण स्वस्त आहेत..

आता राजेशच्या डोक्यात एक आयडिया आली.

राजू - दादा.. मी बोलू का??

दादा - काय???

राजू - आमच्या ऑफीसमध्ये स्टेशनरीचं कॉन्ट्रॅक्ट तीन जणांना देतात... त्यातला एक आता सप्लाय करणार नाही आहे... तू भरतोस का फॉर्म?? बसल्या बसल्याच विक्री होईल..

दादा - ब्राह्मणांना कोण देणार कॉन्ट्रॅक्ट..??

राजू - फॉर्म तर भर??

बाबा - फॉर्म भर की कुमार?? बघू तरी काय होतंय??

राजू - बाबा.. तुमचे ते चिन्मुळगुंद नाहीत का?? ते अजून आहेत पर्चेसला.. त्यांना टाका शब्द...

बाबा - हो?? बोलतो की?? उद्या येऊ का भेटायला??

राजू - ऑफीसमध्ये नको.. घरी जाऊन भेटा....

बाबा - चालेल की?? भवानी पेठेत राहतात ना?

राजू - हं... मी आधी उद्या त्यांच्याशी बोलतो.. मग तुम्ही संध्याकाळी जा..

बाबा - चालेल..

अंजली - तुम्हाला बरीच लागत असेल ना स्टेशनरी??

राजू - अहो आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर दुकान चालवायचं कसं हा प्रश्न पडेल.. इतक्या ऑर्डर्स!

अंजली - बाई! असं झालं तर प्रश्नच सुटला..

दादांन अंजलीकडे पाहिले. राजेशने पस्तीस हजार दिले होते, वसंताचे पैसे कुणीच घेतले नव्हते, बाबांनी वीस हजार दिले होते, दादने स्वतः पंचेचाळीस हजार दिले होते आणि अण्णाने एक लाख लोन काढलेले होते. त्याचे हप्ते दादाच भरणार होता अर्थात! पण सर्वांनी मिळून दोन लाख जमा केले होते आणि दुकान वाचवले होते. पण आता निराळाच प्रश्न निर्माण झालेला होता. दादाला वाटले तसे दुकान जवळपास हालवणे अशक्य झालेले होते. ते फारच लांब हालवायला लागणार होते. आणि मालाची विक्री पुर्ववत होईतोवर हप्ते कुठून भरायचे हा एक मोठाच प्रश्न निर्माण होणार होता. अर्थात, दादा काही नुसता घरात बसणार नव्हता. काही ना काही करणार होताच! पण काही काळ तरी अवघड जाणार होता. त्यात जर हे सरकारी कंत्राट मिळालं तर सोन्याहून पिवळं होण्याची शक्यता निर्माण होणार होती.

सगळे 'घर' मिळून एकेकाला तारत होते, सांभाळत होते आणि पुढे नेत होते. बाराच्या बारा जण जणू एक आत्मा आणि बारा शरीरे होती. कुणालाही कसलीच हरकत नव्हती. कुमारदादाचे डोळे काहीसे पाणावले. ते पाहून अंजली वहिनीही गहिवरल्या आणि म्हणाल्या..

अंजली - मोठे मोठे म्हणून नेहमी मान मिळवतो... राजूभावजींच्या लग्नात तर अगदी मिरवत होतो आम्ही दोघं... शेवटी काय.. लहान काय अन मोठे काय... आज बिकट प्रश्न आला तर लहानात लहान माणूसही पाठीशी आहे...

तारकावहिनींना वाईट वाटले. काही झाले तरी दोघी बरोबरच्या होत्या. गीतावहिनी बरीच नंतर आलेली होती. तारकावहिनींनी आपला डावा हात अंजलीवहिनींच्या पाठीवरून फिरवला आणि म्हणाल्या..

तारका - काय बोलताय?? राजू भावजींना तीन वर्षं नोकरी मिळत नव्हती... दादांच्याच शब्दाने सरकारी नोकरी मिळाली ना?? आणि यांना तरी काय? पर्मनंट कुठे करत होते बॅन्केत?? तेही दादांच्याच शब्दाने पर्मनन्ट झाले. एकमेकांसाठीच आहोत ना आपण??

आजवर दादा आणि अजली वहिनींनी नुसता मोठेपणाच घेतलेला नव्हता तर आर्थिकदृष्ट्याही ते इतर सर्व भावांपेक्षा अधिक सक्षम होते. पण दादांचे मध्यतरी झालेले ऑपरेशन, उमेशची मुंज आणि दुकानाचा अचानक उद्भवलेला खर्च या सर्वाचा ताळमेळ घालताना मोठ्या अडचणी आल्या होत्या.

तारकावहिनींचे बोलणे ऐकून 'आपण काहीच भावना व्यक्त केल्या नाहीत असे वाटायला नको' या उद्देशाने गीता म्हणाली..

गीता - आमच्याकडचे तर नेहमी म्हणतात... पाठीशी दादा आणि अण्णाभावजी आहेत.. त्यामुळे आम्हाला काही काळजी वाटत नाही...

वसंता हात धुवून बाहेर पडला. सगळ्यांना माहीत होते हा आता सिगारेट ओढायला जाणार! पण कुणी त्याला बोलायचे नाही. आता बोलण्याचे कुणाचे वय नव्हते. कुणालाही काहीही न सांगता वसंता बाहेर पडला.

नागनाथपारापाशी पनामा पेटवल्यानंतर नेहमीप्रमाणेच त्याची तंद्री लागली.

एकी! एकी महत्वाची आहे... सगळेच म्हणतात... बरोबरही आहे म्हणा!

याला काही लागले तर तो धावतो, त्याला काही हवे असले तर हा पुढे होतो!

आपणही लग्न करावं का? काय करायचं या हातात असलेल्या आयुष्याचं? लग्नाच्या बंधनात त्याला अडकवायचं की मुक्त ठेवायचं?? दादा, अण्णा, राजेश, सगळ्यांचा एक आपापला संसारही आहे आणि वर परत ते सगळे एकत्रही आहेत. पण.. आपण ... आपण 'नुसतेच' एकत्र आहोत. घराबाहेर पडताना 'लवकर ये रे' म्हणायला आज तरी फक्त आई बाबा आहेत. उद्या?

हक्काचं माणूस! नेहमी लोक म्हणतात. कुणीतरी हक्काचं माणूस पाहिजे. हक्काचं म्हणजे काय? समाजाने स्वतःच्या डोळ्यांनी ज्यांना एकमेकांना वरमाला घालताना पाहिलेलं असतं ती एकमेकांची हक्काची माणसं होतात. आणि मला आजही कित्येकदा असं वाटतं की खिडकी उघडून पहावं, कदाचित गौरी आलीच असली माहेरी तर तीही बघत असेल... हे हक्काचं असू शकत नाही. ही अनैतिकता झाली. अर्थात, अनैतिकता आपणही करत नाही आणि गौरीही! पण...

... परवाही ती घरी आलेली असताना अगदी आवर्जून आपल्यासाठी खांडव्या करून आणल्या आणि म्हणतानाही आईला म्हणाली...

"वसंता आहे का घरी?? खांडव्या केल्यात... "

हे का?? यात काय आहे?? बहीण भावाचे प्रेम?? मित्र मैत्रिणीचे प्रेम?

या समाजाने निर्माण केलेल्या सर्व व्याख्या इतक्या तकलादू कशा काय? तकलादू नसतीलही कदाचित, पण मनाच्या व्यापारांपासून इतक्या हटकून, इतके अंतर ठेवू कशा काय?

का असे म्हणता येत नाही की 'मला याच या व्यक्तीशी लग्न करायचे आहे'??

मी काय शिकलो आहे, कसली नोकरी करतो आहे या सर्व प्रश्नांचा विचार 'दोन मने एकत्र यायला तयार असताना' का व्हावा?

ते जाऊदेत! आता जे व्हायचे ते झालेले आहेच!

पण हा आजचाच प्रसंग!

दादासाठी राजूदादा शब्द टाकणार, बाबा शब्द टाकणार! सगळं योग्यच आहे. मीही शक्य असतं तर तेच केलं असतं! इतकंच काय, त्या दिवशी मोजलेले पैसे चक्क चौदा हजार भरले. कल्पनाच नव्हती आपल्याकडे इतके पैसे आहेत. पण ते ऑफर केल्यावर सगळे घ्यायला नाहीच म्हणाले. म्हणाले 'सोय तर झालीच आहे, आता हे तू तुझ्या भवितव्यासाठी जपून ठेव'! हे सगळे अगदी योग्यच आहे. मी मोठा असतो तरी हेच म्हणालो असतो. पण....

.... पंण अण्णादादासाठी दादा कॉसमॉस बॅन्केत शब्द टाकतो, राजूदादाला सरकारी नोकरी मिळवून देतो... मग आपलं काय??

माझ्यासाठी काही गंभीर विचार का नाही करत कुणी??

असो! आपण तरी आपल्या स्वत:च्या बाबतीत कुठे गंभीर आहोत?? नाही लग्नं करत, नाही शिक्षण घेतलं पुढचं, नाही सिगारेट सोडत आणि नाही गौरीचा विचार सोडत!

पण... आपण निदान सर्व घरच्यांच्या बाबतीत तरी गंभीर आहोत ना? मग ते पुरेसे नाही?

का कुणी असे म्हणत नाही की हा चितळ्यांकडे कॅशियर आहे, त्यापेक्षा याला कॉसमॉस बॅन्केत निदान प्यून म्हणून तरी लावा, पुढे परीक्षा देईल आणि होईल क्लार्क!

छे! आपल्याला सवय झालीय! बाकी काही नाही. आपल्याला ही सवय झालीय की जे आहे त्याबद्दल तक्रार करत बसणे! काय वाईट आहे आपले? एक लग्न झाले नाही ही काही इतकी भयंकर बाब नाही. सगळे आहेत घरातले! आपण काही एकटे नाही आहोत. आपण आता सकारात्मक विचार करायला हवा आहे. फक्त तक्रार तक्रार आणि तक्रार हे चांगले नाही.

आणि मुख्य म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी आपण स्वतः तरी काय करतोय? काहीच नाही. अख्खी दुपार मोकळी असते, संध्याकाळी आठ नंतर आपण मोकळे असतो. एखादा स्टॉल टाकावा, काहीतरी काम करावे, ते नाही. आपण बसणार झोपत आणि बिगुलला खेळवत! आयुष्य चितळ्याकडेच काढणार आपण!

हा पानवाला! साला एका पनामाचे पंचवीस पैसे घेतले आत्ता! दिवसात दोनशे कमवत असेल. आपल्यापेक्षा कितीतरी जास्त! भांडवल काय? एक टपरी, पान, विड्या, माचिस असला स्टॉक, कधीच न झालेले शिक्षण आणि मिठ्ठास बोली! आपल्याला साधे गोड बोलायचे म्हंटले तर दोन आवंढे गिळावे लागतात. हा आपल्याला साहेब म्हणणार, आपण याच्याकडून पनामा घेऊन याच्याच माचिसने पेटवून याच्याच कट्यावर बसून तत्वज्ञानाचा विचार करणार! आणि महिन्याच्या शेवटी आपण खिशात टाकणार बाराशे आणि हा सहा हजार कमवून बायकापोरांना खंडाळा दाखवायला घेऊन जाणार!

प्रयत्नपुर्वक जीभ गोड करण्याचे क्लासेस असतात का कुठे? तिच्यायला कुणीतरी काढायला हवेत. पहिला त्या चितळेंना क्लास लावायला सांगू! नंतर आपणही जाऊ!

हे चितळ्यांच टायमिंगही विचित्रच आहे. दुपार मोकळी! काय करणार दुपारी? पापड लाटायचे बायकांबरोबर?

माझा नवरा असा आहे अन तिचा नवरा तसा आहे.

आपल्याला तर या गप्पाही जमणार नाहीत.

चला! घरी जाऊन झोप काढू! संध्याकाळी आहेच, तीन किलो चक्का आणि अर्धा किलो साजूक तुपातले मोतीचूर! किती झाले?? इतके इतके! हं... हे घ्या... ! सुट्टे द्या.. ! नाहीयेत..! आमच्याकडेही नाहीयेत... !

आयुष्यभर सुट्टे मागणार आपण! आणि बंदे घेऊन गल्ला भरणार! ती सगळी मिठाई बघून वाटतं, काहीतरी घरी आणावं! लगेच नियमावली पुढे येते. कर्मचार्‍यांना दहा टक्के सवलत मिळेल. आयुष्य त्या दुकानात घालवल्यानंतर दहाच टक्के सवलत!

काही काही वेळा असं वाटतं की आपण फक्त आहोत म्हणून आहोत! बाकी काही नाही. पण मग सगळे तसेच आहेत हे लक्षात आलं की उगाचच आपलं स्वतःच्या जीवनाला अर्थ बिर्थ देत बसायचं!

वसंता घरी पोचला तेव्हा त्याच्या मनात आलेला हा शेवटचा विचार होता. 'आहोत म्हणून आहोत' हे माहीत असूनही 'असायलाच पाहिजे होतो अशा आविर्भावात जगणे' म्हणजे मानवी जीवन!

आणि या सर्व विचारांवर खाडकन बोळा फिरावा असे दृष्य समोर होते.

सहा पेटारे खोलून पुढच्या खोलीत भाऊ काका बसलेले होते.

बाबांचे चुलतबंधू! अविवाहीत, वय वर्षे पासष्ट, खणखणीत शरीरयष्टी, शिक्षकी पेशात आयुष्य काढल्यामुळे समोर येईल तो विद्यार्थीच आहे असे समजून उपदेशामृत पाजण्याची जातिवंत हातोटी आणि बाबा पटवर्धन या व्यक्तीचे सख्खे असे एकच माणूस 'हयात' असल्याच्या भांडवलावर वर्षातून किमान दिड महिना अमरावतीहून पुण्यात येऊन तळ ठोकून बसण्याचा अधिकार प्राप्त केलेला माणूस! विदर्भात राहूनही कोकणस्थपणा न सोडता नेहमी नाकातच बोलणे! आणि तेही 'स्पष्ट' या शब्दाच्या अनेक मर्यादा आहेत असे वाटावे इतके स्पष्ट! हे भाऊ काका तारकावहिनींचेही लांबचे नातेवाईक होते. भाऊकाकांचा जन्म आणि बालपण याच घरात गेलेले होते. मात्र आता त्यांचा या घरावर कायदेशीर हक्क काहीही नव्हता.

वसंत उंबर्‍यातच ते दृष्य पाहून खिळला. आणि भाऊकाकांचे लक्ष गेलेच!

"पोस्टखात्याचा संप होता की लिहाय-वाचायला शिकला नाहीस????"

"काय झालं??"

"साडे अकराला गाडी फलाटावर लागली तेव्हापासून तासभर उभा आहे मी स्टेशनावर... काळं कुत्रं ढुंकून बघत नव्हतं माझ्याकडे... पत्र पाठवून हीच गैरसोय होणार असेल तर ते पंधरा पैसे शिलकीत नाही का टाकता येणार मला??"

"पत्र आलं कुठे पण??"

"कसं येईल?? पोस्टमनची मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आलेली, पोस्टमास्तरच्या बापाचा तेरावा होता, मग पत्र कसं येईल??"

"पोस्टमन"

दारात वसंताच्या मागे पोस्टमन उभा राहिला तसे वसंताने पोस्टकार्ड हातात घेतले आणि सर्वांसमोर वाचले.

"प्रती रामकृष्ण पटवर्धन उर्फ बाळू...

अनेक शुभाशीर्वाद...

श्री गजानन कुशल मंगल पाहायला समर्थ आहेच. यमाईचा हात पाठीवर आहेच. तरी जातीने आम्ही येण्याचे कारण असे की येथे भर डिसेंबरात अचानक उन्हाळा उद्भवलेला असून अशा वातावरणात राहण्यापेक्षा जातीने तेथे राहून आपल्या संसारावर आमचे कृपाछत्र ठेवणे हे आमच्या ज्येष्ठतेला अधिक शिभा देते.

तेव्हा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी सकाळी साडे अकराला चार चिरंजीवांपैकी दोघांना पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर उभे करणे! बाकी प्रत्यक्ष भेटीत बोलूच!

- महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कारातील तृतीय विजेते नीळकंठ पटवर्धन उर्फ गुरुजी! "

"हे पत्र आत्ता आलं???"

"हे काय... तुमच्यासमोरच आलं की??"

"त्या पोस्टमनला बोलाव तर जरा??"

"गेला तो.."

"यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे सामान्य नागरिकांचे पंधरा पैशांचे नुकसान होते हे आपल्या देशाच्या सद्यस्थितीचे प्रभावी चिन्ह मानावे लागेल.."

"कधी आलात??"

"कधी आल्यासारखा वाटतोय?? पेट्या उघडतोय दिसतंय ना??"

वसंता गोल करून बसलेल्या इतरांप्रमाणेच एक जागा पटकावून बसला. मधे भाऊ काका आपली एकेक पेटी खोलत होते. ते जेव्हा पहिल्यांदा आले होते तेव्हा घरातील सगळ्यांना वाटले होते की यातील एकच पेटी त्यांची स्वतःची असणार आणि बाकी सर्व पेट्यांमध्ये आपल्यासाठी काही ना काही आणलेले असणार! पण तो समज ठार खोटा ठरला होता. भाऊ काका वाट्टेल ते घेऊन यायचे. त्यात अगदी त्यांचा तांब्या वगैरेही असायचे.

"हमाल म्हणाला पंधरा रुपये... "

"मग?? दिलेत??" - तारकावहिनी

"बाळाजी विश्वनाथांचा वारस आहे मी?? "

"मग आणल्यात कशा या पेट्या??"

"एकेक एकेक बाहेरच्या फलाटावर आणली.."

"आणि चोरीला गेल्या असत्या तर??"

"दोन पोरांना दोन दोन रुपये देऊन दोन ठिकाणी उभे केले होते... त्यांनी सांभाळल्या"

"अजब आहेस तू भाऊ" - बाबा पटवर्धन!

"मी येऊन बारा मिनिटे होत आली... कुणी चहा टाकतंय का मी ठेवू आधण सगळ्यांचं???"

गीता वहिनी पटकन उठून स्वयंपाकघरात गेली. तिच्या अनुभवात आजवर भाऊ काका दोनदाच आलेले होते. पण तोही अनुभव कमी नव्हता.

एका खोलीत सगळं सामान लागलं. देवासमोर नमस्कार करून भाऊकाका पुन्हा आपल्या खोलीत आले. आता सगळेच तिथे होते.

"हा धवल नाही?? किती मोठा झाला... आता किती वर्षाचा आहे हा??"

गीतावहिनींनी कौतुकाने सांगीतले..

"तीन"

"बरोबर... मागच्या वर्षी येणे जमलेच नाही .. नाही का???.. सगळेच एक वर्षाने मोठे झालेले असतील"

बाबा पटवर्धनांनी मात्र विषय काढलाच.

बाबा - कसं काय येणं केलंस भाऊ??

भाऊ - पत्र वाचलं ना तुझ्या शेंडेफळाने?? पुन्हा काय विचारतोस??

बाबा - बरं! राहा आता चार आठ दिवस!

भाऊ - चार आठ दिवस?? फेब्रुवारी महिन्यात जाणार आहे मी... म्हणे चार आठ दिवस...!

बाबा - राहा राहा!

भाऊ - हं! तू काय नोकरी बिकरी करतोस की मुलांच्याच जीवावर??

इतर सगळे दचकले असले तरी आई आणि बाबा काही दचकले नाहीत या प्रश्नावर!

बाबा - मुलांच्या जीवावर राहण्यात काय प्रॉब्लेम आहे? आपणच जन्माला घातलेली मुलं, आपणच शिकवलं त्यांना, मोठं केलं, कामाला लावलं, लग्नं करून दिली... आता आपल्याला त्यांनी सांभाळलं तर बिघडलं काय??

काय बिघडलं ते भाऊकाकांना माहीत होतं! त्यांचं कुणीच नव्हतं! त्यामुळे 'कुणीतरी प्रेमाने आपले करते' ही भावना त्यांना हवीहवीशी असूनही मिळत नव्हती. त्यामुळेच आपल्या चुलत भावाचं जसं चाललेलं आहे तसं आपलं चालत नाही याचं वैषम्य होतं.

आणि हे कळत असूनही बाबा काही बोलायचे नाहीत कारण भाऊ काका ज्येष्ठ होते. आणि बाबा बोलत नाहीत म्हणून दादापासून धवलपर्यंत कुणी शब्द उच्चारायचे नाही. पण या अटीतून आईंनी स्वयंभू सुटका घेतलेली होती. त्या बोलायच्या भाऊकाकांना!

भाऊकाका - आता एकावरच थांबा... का दुसर्‍याचा पण विचार आहे??

हा प्रश्न एकदम कानावर आदळल्यामुळे गीतावहिनी गोरीमोरी झाली. धवलनंतर मूल पाहिजे असे जरी दोघांनाही वाटत नसले तरीही या विषयावर सर्वांसमक्ष व तेही भाऊकाकांशी बोलावे अशी तिला मुळीच इच्छा नव्हती. आई कडाडल्या.

आई - ते त्यांचं ते बघतील... आपण कशाला करायच्या चौकश्या?

भाऊ - तुला विचारलंय का?

आई - मला कशाला विचारायला हवंय?? माझी नात वयात आलीय आता..

भाऊ - हयातभर समाजकार्य केलंय त्यामुळे दोन चांगल्या गोष्टी तोंडात येतात हो? आपलं आपलं घर बघत बसलो असतो तर शासनाने पुरस्कृत केलं नसतं!

आई - आम्ही आपलं आपलं घरच बघत बसलो हो? आल्यागेल्याचं करावं हे त्यातनंच उमगलं आम्हाला!

बाबांनी हात केल्यावर आई गप्प बसली. पण भाऊ काका कशाला गप्प बसणार आहेत?

भाऊ - ज्येष्ठतेचा आदर पुढची पिढी राखत नाही याची कल्पना होतीच, आमच्याही पिढीस ही लागण झाली हे एकप्रकारे ब्येसच झालं म्हणा! आता मोक्ष मिळवायला मोकळे आम्ही! का हो थोरल्या सूनबाई? जेवायला वाढा असे पत्राने कळवू काय?

अंजली वहिनी लगबगीने उठल्या तशा तारकावहिनी अन गीतावहिनीही उठल्या. आत जाऊन तिघी कुजबूजत पान वाढू लागल्या. त्यात गीतावहिनींचे 'एकदम असं कसं काय विचारतात?' हे म्हणणं वारंवार बाहेर पडत होतं!

पान आत आलं!

भाऊ - स्वयंपाकघरात पान वाढायची सवय बंद झाली वाटतं इथे?

अंजली - चला की आत... आत वाढते...

भाऊ - चला...

सर्व कुटुंबीय आता भाऊकाकांचे निरीक्षण करण्यासाठी स्वयंपाकघरात आले.

'वदनी कवल' झालं, हात जोडून पितरांचे स्मरण झाले, चित्रावती झाल्या आणि साधं वरणाची वाटी एकदाची भाताच्या मुदीवर उलटी झाली.

मोजून पाच पोळ्या आणि दोन भात असं जेवण केलं भाऊकाकांनी! तेही एक शब्द न उच्चारता! दादा आणि अण्णा एकमेकांकडे पाहात होते. सरळ होते, महिन्याचा किमान सातशे ते एक हजार खर्च आता वाढणार होता आणि तो चौघांना मिळून 'प्रो रेटा' बेसिसवर उचलावा लागणार होता. 'महिन्याचा' म्हणण्याचे कारण भाऊ काका जरी दिड महिना म्हणत असले तरीही ते नेमके किती दिवस राहतील हे सांगणे अशक्य होते. त्यातच अमरावतीला हिवाळ्यात उन्हाळा आला म्हणून ते इकडे आलेले! म्हणजे जाणार तेव्हा तर 'हक्काचा उन्हाळा' असणार! त्यामुळे अचानक व हक्काचा असे दोन्ही उन्हाळे ते पुण्यात काढतात की काय हा प्रश्न दादा आणि अण्णांच्या चेहर्‍यावर झळकत होता.

वामकुक्षीसाठी भाऊ काका टेकले आणि सर्व काळजीयुक्त चेहरे एकमेकांकडे बघत खाणाखुणा करत शेवटी आपापल्या खोलीत झोपी गेले.

रात्री जेवताना मात्र जोरदार चर्चा झाली.

भाऊ काका आलेले असल्याने त्यांच्यासमोर अंजली वहिनी जेवायला बसू शकत नव्हत्या. त्यामुळे तीनही वहिन्या वाढायला उभ्या होत्या. उभ्या म्हणजे बसलेल्याच, कारण सगळे खालीच जेवायला बसायचे.

भाऊ - काय कुमार, काय चाललंय तुझं?? दुकान व्यवस्थित चालू आहे का?

दादा - हो? ... आहे की??

भाऊ - तरी चाळीस पन्नासची विक्री होतच असेल नाही रोजची??

दादा - अं.... हो... होते ना..

भाऊ - की जास्त?? ए तारके... भाजी वाढ...

दादा - छे छे... हल्ली काय? जिकडे तिकडे दोघं नोकर्‍या करतायत.. ऑफीसमधेच स्टेशनरी मिळते.. ती घेऊन येतात घरी...

भाऊ - राजू... तुला बोलतोय बघ..

दादा - छे छे... राजू सरकारी नोकर आहे.. तो काहीही घरी आणत नाही.. आर एस एस चे कडक संस्कार आहेत त्याच्यावर...

भाऊ - कसलं आर एस एस अन कसलं भाजप... दोघं नोकरी करतातच ना पण??

दादा - हो पण वहिनी साध्या एका फर्ममध्ये आहेत.. मी या दोघांबद्दल नाही म्हणालो..

भाऊ - म्हणजे ही धाकटी सून घरात कामं करायला नसतेच तर..

दादा - असं कसं? गीतावहिनी आल्या आल्या सगळं करायला लागते.. बिगुलही लहान आहे अजून..

भाऊ - आल्या आल्या! हाच तर प्रश्न असतो ना? आमच्या अमरावतीला शेजारी डोमकुंडवारांचं घर आहे... दिवसभर सासू राबते.. संध्याकाळी मुलगा घरी आला की लगेच मात्र सून कामं करायला लागते अन नवर्‍याला कुजबुजत सासूच्या कागाळ्या सांगते... काय ती भांडणं ! मीच सोडवली शेवटी!

आता मात्र आई मधे पडल्याच!

आई - भांडणं करण्याची वृत्ती असली तरच भांडणं होतात. आमच्या घरात असलं कुणीही नाही आहे बरं??

भाऊ - आमच्या म्हणजे?? तू आत्ता आलीस... हा रामकृष्ण एवढासा असताना माझ्या मांडीवर बसून चिमण्या बघायचा.. म्हणे आमचं घर... आधी आम्ही थोरले... मग तुम्ही...!

आई - मी आत्ता आले? सदतीस वर्षे झाली मला पटवर्धन होऊन!

बाबा - भाऊ, जाऊदेत... तू मोठा आहेस ना? सोडून दे..

भाऊ - काय रे शरद? घर बिर घेतोयस की नाही?? बॅन्केत आहेस... बॅन्क काय.. कर्जबिर्ज देतेच की कर्मचार्‍यांना.. एखादं घर घेऊन टाक??

अण्णा - मग हे काय आहे??

भाऊ - हे घरच आहे... पण माणसाने एक घर करायलाच हवे आयुष्यात...

आई - तुम्ही भाड्याच्याच खोलीत राहता ना? की घेतलंत एखादं घर??

भाऊ - राम.. अरुणाला सांग.. ती जीभ सोडतीय...

बाबांनी आईंना गप्प केले.

भाऊ - तुझा तो चितळे आहे का रे अजून??

वसंताच्या हातातला घास हातात अन घशातला घशात अशी परिस्थिती झाली. चितळे हे पुण्यातील किती बडं प्रस्थ आहे हे जर या भाऊ काकांना समजलं तर असे बोलायची त्यांची हिम्मत होणार नाही हे त्याला माहीत होतं!

वसंता - आहेत की?? का??

भाऊ - का म्हणजे?? आहे की नाही एवढच विचारलं! आता जेवण झालं की बाहेर जा जरा... एक एकशे वीस तीनशे घेऊन ये... तू करतोस का काही शौक??

वसंता - छे??

अण्णा - तो काही कागदाच्या सुरनळ्या तेवढ्या जाळून त्यांचा धूर काढून बघतो...

भाऊ - म्हणजे??

वसंता अण्णाला दाबत असतानाच अण्णा म्हणाला.

अण्णा - त्यातच त्याची ब्रह्मानंदी टाळी लागते...

आई - वसंता.. माझ्याही कानावर आलंय... फार बिड्या ओढायला लागलायस तू..

वसंता - नाही ग बाई..

आई - नाही काय?? परवाच गौरीच्या आई म्हणत होत्या..

वसंता - गौरी येणार आहे का??

आई - येईल की.. का??

वसंता - सहज विचारलं...

भाऊ - याचं लग्न ठरत नाहीये का?

आई - ठरेल हो?? ठरलं की कळवू..

भाऊ - पण स्थळं बघताय की नाही??

आई - नाही... स्थळं बघायला चालू केली की कळवू...

भाऊ - किती रे वय तुझं??

वसंता - सत्तावीस...

भाऊ - मग आता काय टक्कल पडल्यावर लग्न करणारेस?? संसार फटाफट चालू व्हायला हवा...

वसंता - मी लग्नच करणार नाही आहे...

भाऊ - का?

वसंता - तुमच्या पावलावर पाऊल टाकणार आहे मी..

सगळे हसायला लागले.

भाऊ - चांगली गोष्ट आहे... सर्वांनीच टाकलं तर भलं होईल....

आई - आम्ही टाकलं असतं तर भल व्हायला कुणी जन्माला आलं असतं का??

सगळे आणखीनच हसायला लागले.

भाऊ - काय रे राजू?? सरकारी नोकरी म्हणजे भरपूर... आतला पैसा...

दादा - काका? अहो काय बोलताय?? हा तिथे गेल्यापासून लोकांचीच कुचंबणा होतीय..

भाऊ - आम्हालाही तेच अपेक्षित आहे...

आई - तुम्हाला म्हणजे काय?? आम्हालाही तेच अपेक्षित आहे...

भाऊ - कोशिंबीर कुणी केलीय??

गीता - म... मी...

भाऊ - लिंबू पिळायचं नेहमी कोशिंबीरीवर...

गीता - देऊ का??

भाऊ - जेवण होत आलं आमचं... तुमच्याकडे नाही वाटतं पिळत??

गीता - अं?? ... नाही..

भाऊ - देशस्थ की कोकणस्थ?? माहेर??

गीता - कोकणस्थच की.. भागवत...

भाऊ - मग पिळायला पाहिजे खरं म्हणजे...

गीता - सांगते आईला..

गीताचे ततपप पाहून दादा आणि अण्णा हसू लागले.

भाऊ - ही चिमुरडी बरीच मोठी झाली नाही?? कितवीत आहेस बेटा??

वेदा - तिसरी...

भाऊ - मराठी माध्यम की इंग्रजी??

वेदा - इंग्लीश...

भाऊ - का रे शरद??

अण्णा - आता काय... जगाबरोबर राहायलाच पाहिजे..

भाऊ - अरे पण आम्हाला काय इंग्लीश आलं नाही काय?? संपूर्ण शिक्षण मराठीत झालं तरी फर्डा इंग्लीश बोलतो आम्ही... अमरावतीत तुला सांगतो राम.. भाषांतराचे काम चालून आले होते... नाकारले मी..

बाबा - का??

भाऊ - साहेबाची भाषा.. जुन्या पिढीवर स्वातंत्र्यपूर्व काळात झालेले अत्याचार लक्षात असतात..

बाबा - अरे पण चांगले पैसे मिळाले असते की??

भाऊ - महिना शंभर रुपये... काय कामाचे ते??

बाबा - कसलं भाषांतर??

भाऊ - ते जाऊदेत... हा कितवीला आहे??

उमेश - सहावी..

भाऊ - तू पण साहेबी माध्यमात का??

दादा - नाही... हा मराठी मिडियमला आहे..

जेवणे होत आली होती. भाऊकाकांनी ताटातच हात धुतले. ती सवय घरात इतर कुणालाही नव्हती. सगळ्यांनाच कसेसे वाटले. पण पर्याय नव्हता.

अचानक भाऊकाकांनी आईंकडे वळत विचारले..

भाऊ - अरुणा... मी अचानक डिसेंबरात का आलो... माहीत आहे??

आई - ......????

भाऊ - राम तुला??

बाबा - .. का??

भाऊ - अरुणा तुला आठवतं तुझ्या सासूच्या गळ्यात एक... एक हार होता सोन्याचा??

अरुणा - .. हो?? हो आठवतं की? चोरी झाली आपल्याकडे अठ्ठेचाळीस साली.. तुमच्या आईही इथेच होत्या..

भाऊ - बरोबर... तुला नाही आठवत राम?

बाबा - मला कसं नाही आठवणार??

भाऊ - तर मी त्याच्यासाठीच आलोय..

बाबा - म्हणजे??

सर्वच चेहरे काळजीने त्रस्त झाले. हा माणूस आता कशाततरी वाटा मागणार म्हणून दादा आणि अण्णा या दोघांनीही हळूच एकमेकांकडे पाहून घेतले.

भाऊ - अरे मला माझ्या बाबांचं पत्र आत्ता मिळालं... आमच्या अमरावतीच्या घराच्या माळ्यावर...

बाबा - काय.... काय पत्र??

भाऊ - चोरी झालीच नव्हती...

बाबा - क्काय??????????

बाबांच्या चेहर्‍यावरील तीव्र आश्चर्य सगळेच पाहात होते. अठ्ठेचाळीस साली कुमार, म्हणजे दादाच एक वर्षाचा होता. त्यामुळे बाकी तिघे तेव्हा जन्मालाच आलेले नव्हते. आणि कुमारला काहीही आठवने शक्यच नव्हते. त्यामुळे चारही भाऊ, तीनही वहिन्या आणि उमेश आणि वेदा भाऊकाकांकडे आणि आईबाबांकडे पाहात होते.

आई आता डोळे रोखून भाऊंकडे पाहात होत्या.

भाऊ - अरे गांधीहत्येत सगळे सोने जाऊ नये म्हणून...

बाबा - ....

भाऊ - नुसतेच जाहीर केले.. चोरी झाली म्हणून...

आई - .. पण मग... मग सोने कुठे गेले??

भाऊ - आता तुम्ही गेल्या काही वर्षात घरात इतके बदल केलेले आहेत... की मी म्हातारा काय सांगणार??

आई - म्हणजे??

भाऊ - देव्हार्‍यामागचा कोनाडा बुजवलात ना??

आई - .. कोना... नाही... आहे की??

भाऊ - मग फोड की तो आता... पत्रात तेच लिहिलंय...

एक तास! अजिबात फारसा आवाज न होता एक तास सातत्याने वसंता आणि राजेश तो कोनाडा फोडत होते.

आणि... खण्ण!

छोटासा पितळ्याचा डबा निघाला ... आज त्या सोन्याची किंमत... तीन लाख नक्कीच झाली असती..

भारावलेले पटवर्धन कुटुंबीय एकमेकांकडे पाहात असतानाच भाऊ काका गरजले..

भाऊ - नथुराम... आमच्या शाखेत यायचा नथुराम.. तो असे करेल असे कधीच वाटले नव्हते... पण ते झाले.. त्याने गांधींना मारून वर पुन्हा हात वर करून उभाही राहिला तिथे... कारण काय तर म्हणे मला पळून जायचेच नव्हते... त्यातच... त्यातच काकासाहेब गाडगीळांनी सरळ सर्वांसमक्ष सांगीतले.. हा तर आमचा नथुराम आहे पुण्याचा... कुमार... तू तेव्हा फक्त एक वर्षाचा होतास रे.. ब्राह्मणांविरुद्ध असंतोष पसरलेला होता... उद्या किंवा फार तर परवा खांडोळी होणार हे स्पष्ट दिसू लागलेले होते... मी... आई बाबा, हा राम.. अरुणा.. सगळ्यांवर धावत सुटायची वेळ आलेली होती... पळण्याआधी बाबांनी इथे सोने पुरले.. त्यावर रंग लावला.. हे आम्हाला कुणाला माहीतच नाही... रामच्या वडिलांना माहीत असेलही... आणि तेवढ्यात..

शेजारच्या भालाकार भोपटकरांच्या घरावर आगीचे बोळे पडले.. ते लोक धावत मागच्या पत्र्यावरून आपल्याकडे उतरले.. तोवर गर्दी आपल्या घरासमोर जमली....आम्ही सगळे जीव मुठीत धरून आत बसलो होतो... कुणीतरी मसलत केल्याचे कळले.. ती गर्दी तशीच पुढे गेली..

बाबांनी तर पुणेच सोडले... काका इथेच राहिले... आणि हा डबा... बघतेस अरुणा??? हाच तो हार जो तुझ्या सासूबाईंच्या... माझ्या काकूच्या गळ्यात असायचा... हा डबाही इथेच राहिला.. "

ते लखलखतं सोनं पाहून लहानसा बिगुलही खिळल्यासारखा व्हायची वेळ आलेली होती.

बराच वेळ सगळ्यांनी निरखून झाल्यानंतर बाबांनी ते सोनं हातात घेतलं...

बाबा - अंजली.. तू, तारका, गीता आणि वसंता... सोनाराकडे जा... हे फार जुनं सोनं आहे... किंमती आहे.. याचे मूल्य काढा... आणि... आणि अर्धे भाऊकाकांकडे आणून द्या.. अर्धे... आईकडे द्या... आईला हवे तसे ती वाटे करेल.. शेवटी ही दौलत गृहलक्ष्मीचीच म्हणायची...

भाऊ - रामकृष्ण.. वाटे जरूर करा... पण पाच करा... तू, कुमार, शरद, राजू आणि वसंता... मी एकटा, मला काय करायचंय सोनं??

बाबा - म्हणजे?? तुझा हक्क आहे...

भाऊ - तुम्हाला सगळ्यांना मी खूप त्रास देतो ना???

भाऊंनी उद्गारलेले पुढचे विधान ऐकून प्रत्येकालाच गहिवरून आले... मात्र... भाऊंना मिठी फक्त बाबांनीच मारली..

भाऊ - कधीतरी... मी पण चांगला वागू शकतोच की रे...?????

गुलमोहर: