तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे...

Submitted by सेनापती... on 6 January, 2011 - 22:16

स्वराज्यावरील संकटे काही थांबायचे नाव घेत नव्हती. १६५९ च्या अफझलखान स्वारीपासून सुरू झालेली ही सत्वपरीक्षा राजे प्रत्येक वेळी निभावून नेत होते. कधी स्वतःच्या जीवावर उदार होऊन तर कधी स्वतःच्या अतिशय प्रिय आणि जवळच्या माणसांचा त्याग भोगून. १६६४ साली राजांनी कोकणात यश प्राप्त केलेले असले तरी १६६५ च्या सुरवातीला 'ती' बातमी मराठा हेरांनी राजांपर्यंत पोचवली. मुघलांचा सेनापती मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येत होता. पुढे ३ महिन्यात मराठा - मुघल तह घडला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते. हे संपूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."

'हे श्रेष्ठ सरदारा, तुझ्यामुळे राजपुतांची मान उन्नत आहे. तुझ्यामुळे बाबरवंशाची राज्यलक्ष्मी अधिक प्रबळ झाली असून तुझे सहाय तिला मिळत आहे. हे प्रबळ आणि प्रौढ जयशहा! सीवाचा प्रणाम व आशीर्वाद स्वीकार. परमेश्वराने तुझे रक्षण करून तुला धर्माचा व न्यायाचा मार्ग दाखवावा. मी असे ऐकले आहे की, मजवर हल्ला करण्यासाठी व दख्खन जिंकण्यासाठी तू आला आहेस. हिंदूंचे हृद्य व रक्त यांच्या रक्ताने तू जगात यशस्वी होऊ पहात आहेस. पण तुझ्या हे लक्ष्यात आलें नाही की याने तुझ्या तोंडास काळोखी फासली जात आहे, कारण तुझ्या या कृत्याने देशावर व धर्मावर आपत्ती ओढवली आहे. जर तू क्षणमात्र अंतर्मुख होऊन आपल्या हाताकडे आणि झग्याकडे विवेकदृष्टीने पाहशील तर हा रंग कोणाच्या रंगाचा आहे व या रंगाचा रंग इहपरलोकी काय होणार हे तुला समजेल.

जर तू आपणहून दक्षिण देश जिंकण्यास आला असतास तर माझे शीर व डोळे तुझ्या रस्त्यावर बिछान्याप्रमाणे पसरले असते, मी तुझ्या घोड्याबरोबर मोठी सेना घेऊन आलो असतो आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची भूमी तुला जिंकून दिली असती. पण तू सज्जनांना फसविणाऱ्या औरंगजेबाच्या थापास भूलुन इकडे आला आहेस. तेंव्हा यावेळी तुझ्याशी कोणता डाव खेळावा हे मला समजेनासे झाले आहे. जर तुला सामील व्हावे, तर त्यात मर्दपणा नाही, कारण मर्द लोक प्रसंगाची सेवा करीत नाहीत. सिंह कधी भित्रेपणा दाखवत नाही. बरे, जर मी तलवार व कुऱ्हाड यांचा उपयोग केला तर दोनही बाजूंनी हिंदुंचीच हानी होणार. मोठ्या दु:खाची गोष्ट ही आहे की, मुसलमानांचे रक्त पिण्याखेरीज इतर कामासाठी माझ्या तलवारीस म्यानातून बाहेर पडावे लागेल! जर या लढाईसाठी स्वतः: तुर्क आला असता तर आम्हा वीरपुरुषांना घरबसल्या शिकार साधल्यासारखे झाले असते. पण जेंव्हा अफझलखान न शाईस्ताखान यांच्या हातून काम झेपत नाही असे दिसले तेंव्हा तुला आम्हाशी युद्ध करण्याकरीता नेमले आहे. कारण स्वतः: औरंगजेब आमचा मारा सोसण्यास समर्थ नाही. हिंदूलोकांत कोणी बलशाली राहू नये आणि सिंहांनी आपसांत लढून घायाळ व शांत व्हावे आणि गिधाडांना जंगलाचे स्वामित्व प्राप्त व्हावे, अशी औरंगजेबाची इच्छा आहे. ही गूढनीती तुझ्या ध्यानात येत नाही ह्यावरून त्याच्या जादूने तुला भूल पडली आहे असे प्रत्ययास येते.

तू जगात बरेवाईट पुष्कळ प्रसंग पहिले असशील. बागेत तू फुले आणि कंटक या दोघींचाही संचय केला असशील, पण आम्हा लोकांशी युद्ध करून हिंदूंचे शीर धुळीत मिळवण्याचे काम मात्र तू करू नये. प्रौढ वयात अल्लडपणा न करता सादीच्या त्या वचनाचे स्मरण कर, "सर्वच ठिकाणी घोडा फेकता येत नाही. कधी कधी ढाल फेकून पळून जाणे योग्य असते." व्याघ्र मृगादि प्राण्यांवर व्याघ्रता करतो, पण सिंहाबरोबर गृहयुद्ध करण्यास प्रवृत्त होत नाही. जर तुझ्या तीक्ष्ण तलवारीत पाणी असेल व घोड्यात दम असेल तर हिंदू धर्माच्या शत्रूंवर हल्ला करून इसलामाचे जड मूळ खोडून टाक.

जर या देशाचे राज्य दारा शिकोह (१) यास मिळाले असते तर आम्हा लोकांवर त्याने कृपा, अनुग्रह केला असता पण तू जसवंतसिंहास दगा दिलास व उच्चनीच याची पारख तुला करता आली नाही. आजवर किरकोळ शत्रूंशी गाठ पडल्यामुळे तुझा दम कायम राहिला आहे. परंतु तू आता सिंहाशी युद्ध करण्याची धिटाई करून आला आहेस. एवढ्या धावपळीने तुला काय मिळत आहे? तू मृगजळाच्या मागे धावत आहेस. एखाद्याने फार परिश्रम करून एखादी सुंदरी हस्तगत करावी आणि ती आपल्या शत्रूच्या स्वधील करावी, अशा तूच्छ व्यक्तीसारखा तू आहेस! तू या निचाच्या कृपेचा काय अभिमान धरतोस? जुझारसिंहाच्या (२) कामाचा परिणाम तुला लक्ष्यात नाही? कुमार छत्रसाल (३) यावर तो (औरंगजेब) कशाप्रकारची आपत्ती आणू पाहत होता, हे तू जाणतोस. याखेरीज इतर हिंदू लोकांवर या दृश्ताच्या हाताने काय काय अनर्थ आली आहेत हेही तुला माहित आहे. इष्ट हेतू साधण्यासाठी तो बापाचा व भावाचा खून पाडण्यास भीत नाही. राजभक्तीची सबब संगत असशील तर तू शहाजहानशी कसे वर्तन केलेस याचे स्मरण कर.

जर विधात्याने तुला अकलेचा अंश दिला असेल व मार्द्पानाची चाड असेल तर तू आपल्या जन्मभूमीच्या संतापात आपली तलवार तापीव व अत्याचाराच्या दु:खाने पडणार्या आसवांनी तिला पाणी दे. हा प्रसंग आम्ही लोकांनी आपसांत लढण्याचा नाही. कारण हिंदू लोकांवर यावेळी मोठे कठीण कार्य येऊन पडले आहे. आमची पोरेबाळे, देश, धन, देव व पवित्र देवपुजक या सर्वांवर त्याच्यामुळे पराकाष्ठेचे दु:ख कोसळले आहे. आणि हाच क्रम आणखी काही दिवस चालेल तर आम्हा हिंदू लोकांचे चिन्ह देखील पृथ्वीवर राहणार नाही! मुठभर मुसलमानांनी आमच्या एवढ्या देशावर प्रभुत्व गाजवावे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे प्रभुत्व त्यांच्या पराक्रमाचे फळ नव्हे. जर तुला अकलेचे डोळे असतील तर पहा. आम्हाबरोबर तो कशा गोड गोष्टी बोलतो व चेहऱ्यावर कसे कसे रंग आणितो, आमच्या पायात आमचीच बेडी अडकीवितो व आमच्याच तलवारीने आमची शिरे कशी कापितो ते लक्ष्यात घ्या. आम्ही लोकांनी ह्यावेळी हिंदू, हिंदुस्थान आणि हिंदूधर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. तलवारीस पाणी देऊन तुर्काचा जबाब तुर्कीतच दिला पाहिजे.

जर तू मारवाडचा राजा जसवंतसिंह व मेवाडचा राजा राजसिंह यांच्याशी ऐक्य करशील, तर फार मोठे काम होईल अशी अशा आहे. चोहीकडून उठावणी करून तुम्ही या सर्पाचे डोके दगडांनी ठेचून टाका. म्हणजे काही काळापर्यंत तरी त्याला दक्षिण प्रांतात आपले जाले पसरता येणार नाही. तेवढ्यात मी व माझे भालेबहाद्दर वीर विजापूर व गोवळकोंडा येथील दोन्ही बादशहांना जिंकतो. मेघासारखी गर्जना करणाऱ्या सैन्यानिशी मुसलमानांवर तलवारीचा पाउस पाडीन आणि सर्व दक्षिणदेशाच्या पटावरून इसलामाचे नाव किंवा चिन्ह धुवून टाकीन. त्यानंतर कार्यदक्ष वीर व भाला चालविणारे घोडेस्वार यांना बरोबर घेऊन प्रचंड लाटा व कोलाहल माजविणाऱ्या नदीप्रमाणे दक्षिण देशातील पहाडातून बाहेर पडून मैदानात येईन, आणि अत्यंत जलदीने तुम्हा लोकांच्या सेवेस हजर होईन व तुम्हास हिशेब विचारीन. चोहीकडून भयंकर युद्ध उपस्थित करून रणांगणात दंगल माजवून आम्ही लोक आमच्या सेनेच्या लाटा दिल्ली येथील त्याच्या जर्जर झालेल्या घरात पोहचवू. म्हणजे त्याच्या नावाचे औरंगहि राहणार नाही न जेबहि राहणार नाही. तसेच त्याची तलवार राहणार नाही व कपटाचे जाळेही राहणार नाही. शुद्ध रक्ताने भरलेली नदी वाहवून आम्ही आमच्या पितरांच्या आत्म्याचे तर्पण करू. हे काम काही फार कठीण नाही. फक्त हृद्य व डोळे व हात यांची आवशक्यता आहे. दोन अंत:करणे (शिवराय व जयसिंह) एक होतील तर पहाड तोडता येईल व मोठ्या सैन्याच्या समूहाच्या ठीकरया उडविता येतील. या विषयासंबंधी मला तुझ्याशी फार बोलणे चालणे करावयाचे आहे, ते पत्री लिहिणे संयुक्तिक नव्हे. तू म्हणशील तर मी समक्ष तुझ्या भेटीस येईन, माझा बेत तुला कळवीन. तलवारीची शपथ, घोड्याची शपथ, देवाची शपथ व धर्माची शपथ घेऊन मी सांगतो की, असे करण्याने तुझ्यावर आपत्ती येणार नाही.

अफझलखानाचा शेवट कसा झाला हे लक्षत आणून तू शंकित होऊ नकोस. त्याने बाराशे लढवय्ये हबशी माझा घात करण्यासाठी ठेविले होते. त्याच्यावर मी प्रथमच हात चालविला नसता तर यावेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते? मला तुझ्यापासून अशी भीती नाही. कारण तुझ्यात माझ्यात काही शत्रुत्व नाही. जर मला माझे उत्तर अनुकूल आलें तर रात्री मी एकटा तुझ्या भेटीस येईन. शाहस्तेखानाच्या खिशातून मी जे पत्र काढून घेतले आहे ते गुप्त पत्र मी तुला दाखवीन, तुझ्या डोळ्यावर संशयाचे पाणी शिंपडून तुझी सुखनिद्रा नाहीशी करीन. तुझ्या स्वप्नाचा खरा फलादेश करून नंतर तुझा जबाब घेईन.

जर या पत्राचे उत्तर माझ्या मनजोगे न येईल तर मी आणि माझी तीक्ष्ण तलवार आहे व तुझी सेना आहे. उद्या सूर्य आपले मुख संध्याकाळात लपवील तेंव्हा माझा अर्धचंद्र (तलवार) म्यानातून बाहेर पडेल. बस्स. कल्याण असो.

*****************************************************************************************************************
(१) दारा शिकोह हा शहाजहानचा मोठा मुलगा आणि औरंजेबाचा वडीलबंधू होता. शहाजहान मागून गादीवर तो बसू नये म्हणून औरंगजेबाने जयसिंहमार्फत जसवंतसिंहाला पत्र पाठवून त्याचे मन कलुषित केले आणि दारा यास कुठलेली सहाय्य मिळू दिले नाही. पुढे औरंगजेबाने त्याचा पराभव केला आणि त्याला ठार मारले.

(२) जुझारसिंह बुंदेला हा शहाजहानचा एकनिष्ठ जहांगीर होता. पुढे मात्र औरंगजेबाने त्याचे संपूर्ण राज्य काढून घेतली, त्याला पदच्युत केले आणि जुझारसिंहाला अक्षरश: जंगलातून वणवण फिरावे लागले.

(३) छत्रसाल बुंदेला यावर औरंगजेबाने मोठी आपत्ती आणली होती. छत्रसालचे वडील चंपतराय यांनी खरेतर औरंगजेबाला खूप सहाय्य दिलेले होते. पुढे आपले राज्य परत घेण्यासाठी चात्रासाल शिवरायांना राजगडी येऊन भेटले.
*********************************************************************************************************************

मायबोलीवर पूर्वप्रकाशित इतर ऐतिहासिक पत्रे :
हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे
ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?
सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...
बदअमलाबद्दल कड़क शासन...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

limbutimbu | 7 January, 2011 - 23:13
मी या लेखाची प्रतिक्रियान्सहित एक पीडीएफ करुन मित्रान्मधे पाठवली आहे!
बाकिच्या वाचकान्नी देखिल जमल्यास तसे करावे
{साला नेटवर इमेलमधुन नै नै ते गार्बेज सर्क्युलेट होत अस्ते, त्यापेक्षा असे लेख सर्क्युलेट करायला सुरुवात झाली तर बरे होईल}

हा लेख वाचुन काय हांडगे पुरुष होतील ?

धन्यवाद प. भ. (रोहन) , इतिहास नजरेसमोर जसाच्या तसा उभा केलास.
मला आजही हा प्रश्न पडतो आपल्यासारख्या प्रचंड लोकसंख्या , साधनसामग्री असलेल्या देशावर नेहमी मुठभर उपर्‍यांनीच का राज्य केलं असेल ? ज्याची उत्तर तुझ्या लेखात सापडतात.
जय शिवाजी , जय भवानी.

पक्का भटक्या आमच्या पर्यंत हे लिखाण आणल्या बद्दल धन्यवाद, आज वेळ काढून हा लेख वाचून काढला.
महाराजांना शिरसाष्टांग नमस्कार.

धन्यवाद दोस्तांनो... काही कारणाने बरेच दिवस मायबोलीपासून दूर होतो... Happy पण आता थोडे अधिक लिखाण करायचा मानस आहे..

गजानन... दुरुस्ती केली आहे.... Happy

छत्रपती शिवाजी महाराज - पत्ररूप व्यक्तिदर्शन...
- डॉ. रामदास.

प्रथम आवृत्ती - १९४२. माटुंगा इस्ट.

हे पत्र वाचुन आनंद झाला.अशी शिवकालिन पत्रे किंवा महाराजे विषयी इतर लेखन वरील पद्ध्तीत वाचावयास मिळाले तर मा.बो.वर असणारे समस्त हिंदू मराठे आपले श्रुणी होतील. कारण इतरत्र अशा लेखनात अवघड भाषा जी सहज समजत नाही. कींवा शिवकालिन बखरीतील काही मुद्दे वेगळ्या भाषेमुळे लवकर समजत नाहीत.आपले काम खरच स्तुत्य आहे. राजांनी सांगितले आहेच "मराठा तितुका मिळवावा"

मित्रा सेनापती,
जे पत्र अनेक वर्षांपासून मला पुन्हा पुन्हा वाचायची इच्छा होती, ती आज आपल्यामुळे सफळ झाली म्हणून धन्यवाद.
तरुणपणी हे पत्र मी वाचून त्यातला भाग लक्षात ठेवला होता. नंतरच्या हवाईदलातील सेवेच्या काळात या पत्रातील मसूदा मी अनेक सेनेतील मित्राना एक ऐतिहासिक पत्र, महान (Visionary) दृष्टा सेनाधिकाऱ्याच्या राजकारणी बुद्धिमत्तेचे सुंदर मिश्रण आहे. त्यातून दूरदृष्टीचा धुरंधर सेनानी कसे Geopolitical परिस्थितीचे विष्लेषणाने विचार करतात याचा हे पत्र उत्तम नमुना आहे. जगाच्या इतिहासात फार कमी अशी पत्रे लिहिली गेली आहेत. हे पत्र कावेबाज नसून एक तळमळीची हाक देणारे आहे. त्यात जयसिंहाची स्तुती ही आहे. पण त्याला जरबेत इशारा आहे. मुत्सुद्देगिरी व डावपेच करून जयसिंहाला आपलेसे करायला हवे, पण हे पत्र चुकीच्या व्यक्तिच्या हाती पडले तर त्यामुळे जयसिंहाचे व्यक्तिशः नुकसान न व्हावे अशी सावधानीही त्यातील वाक्य रचनेत आहे.
या पत्रावर जयसिंहाने काय मत व्यक्त केले होते? त्याला महाराजांचे विचार ग्रहण करायची कुवत होती का? आदि प्रश्न उपस्थित होतात. जयपुरच्या कपाटद्वारा मधून यावर प्रकाश टाकला जावा म्हणून ही प्रयत्न केले गेले असतील तर मला तरी ज्ञात नाहीत. हे पत्र सुज्ञ नेत्यांच्या धोरणी विचारसरणीचा अत्यंत बोधप्रद नमुना आहे, या पत्राच्या विविध कंगोऱ्यांचे राजनीतिक व सैन्याधिकारी विचाराने विष्लेषण व्हावे अशी फार कळकळीची इच्छा होती पण कोणी तसे चर्चा करायची देखील तसदी घ्यायला तयार नाहीत असे पाहून मी यावर बोलणे हळू हळू बंद केले. आज अनेक वर्षांनी हे पत्र पुन्हा वाचनात आले अन मनातील अनेक शब्द आपल्याला सांगावेसे वाटले.

Pages