बाभूळ भाग २ - फोटोसहीत

Submitted by दिनेश. on 30 December, 2010 - 14:01

पहिला भाग इथे वाचा.. http://www.maayboli.com/node/22288#new

पूर्व आफ्रिकेतील जंगल हे आपल्या कल्पनेतील जंगलापेक्षा थोडे वेगळे असते. हा प्रामुख्याने गवताळ प्रदेश आहे, तरिही त्यात बाभळीसारखे वृक्ष उभे राहतात, (निदान काहि काळ तरी.)
या दोघांत स्पर्धा असते. म्हणजे असे कि बाभळीखाली, फारसा सुर्यप्रकाश पोहोचत नाही, आणि त्यामूळे तिथे गवत वाढू शकत नाही.
दुसरे असे कि इथले गवत, ढोपराएवढ्या उंचीचेच असते. त्यापेक्षा ते फार वाढू शकत नाहि. पण त्याचा जमिनीवरचा विस्तार इतका, दाट असतो, कि त्यात बाभळीचे रोप तग धरू शकत नाही.

तर या नाट्यात वणवा, सूत्रधाराची भुमिका बजावतो. जगभरातील वणवे नैसर्गिक कारणाबरोबरच, मानवी "हस्तक्षेपा"नेही लागतात, हे नवल नाही. तसे इथेही आहेच. पण इथले वणवे, मानवी हस्तक्षेपाने लावले गेले असले तरी निदान गेली २०,००० वर्षे ते लावले जात आहेत. इथली वनस्पतीसृष्टी आणि प्राणीसृष्टी त्यांना सरावलेली आहे, आणि त्यामूळे ती आता एक नैसर्गिक घटनाच मानायला हवी.

गॉड्स मस्ट बी क्रेझी, चित्रपटात अशी एक आग आपण बघितली आहेच. उन्हाळ्याच्या दिवसात इथले गवत अगदी सुकून जाते आणि त्यामूळे भराभर जळते, आणि त्यामूळेच इथली आग भराभर पसरत असली तरी एकाच जागी फार काळ जळत नाही. ती ओलांडणे सहज शक्य असते.

तूम्ही गणपतिसाठी दूर्वा खुडल्या असतील तर तूम्ही अनुभवले असेल कि, गवताचा एक सांधा नाजूक असतो, आणि त्याचे मूळ मात्र जमिनीला घट्ट चिकटून असते वा जमिनीखालीही असते. तूमच्या हातात केवळ दूर्वाच येते (अर्थात तूम्ही फार जोर लावला नाहीत तरच.)

तसेच इथले तृणभक्षी प्राणी चरताना, त्यांच्या दातात फक्त गवताचा वरचाच भाग येतो. जमिनीलगतचा भाग सुरक्षित राहतो. हा भाग आगीतही सुरक्षित राहतो, आणि नंतर ज्यावेळी पाऊस पडतो, त्यावेळी त्यातून नवीन अंकूर फूटतात.

पण या आगीत बाभळीच्या जमिनीवर पडलेल्या बिया मात्र जळून जातात आणि आगीनंतरही, गवताचेच प्राबल्य राहते. मग तिथे बाभूळ कशी उगवते ?

जसे आपल्याकडे नेमेचि दुष्काळ पडतो, तसाच इथेही पडतो. पावसाचे प्रमाण कमी जास्त होतच राहते. ज्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असते त्यावेळी गवताची जोमदार वाढ होते. अर्थातच तृणभक्षी प्राण्यांची प्रजा वाढते. त्यानंतरच्या उन्हाळ्यात मात्र, प्राण्यांच्या वाढीव संखेमूळे गवताचे पातेही शिल्लक रहात नाही. म्हणजे आग लागली तर ती पसरायला काही साधनच नसते. गवतच नसल्याने, तृणभक्षी प्राणी एकतर स्थलांतर करतात किंवा उपासमारीने मरुन जातात. आणि त्या वर्षी, बाभळीला सुवर्णसंधी मिळते.

आता जर बाभळीची रोपे उगवली तर गवत आणि प्राणी दोन्ही नसल्याने, त्यांची वाढ होऊ लागते(कशी ते आपण पहिल्या भागात बघितले आहेच) जर आणखी काही पावसाळे, हि झाडे तग धरु शकली, तर सगळीकडे त्यांचीच वाढ होते आणि गवत खुरटते. तूम्ही बघितले असेल, कि या भागात जी झाडे असतात, ति सहसा एकाच उंचीची (आणि वयाची ) असतात. याचे कारण त्या सर्व रोपांनी, त्या एकाच सुवर्णसंधीचा फायदा घेतलेला असतो.

मग तिथे पक्षी सुखाने नांदू लागतात. या काटेरी झाडांवर त्यांना जास्त सुरक्षित वाटते कि काय कोण जाणे. पण आपल्या डोळ्यांनाही खुपणार्‍या काटेरी फांद्यांवर पाखरे मात्र, मजेत झुलत असतात.

बहराच्या दिवसात हि झाडे अशी भरभरुन फूलतात.

हि फूले आपल्याइथल्या प्रमाणे पिवळी नसून पांढरी असतात. (आपल्याकडेही कुठे कुठे अशी झाडे आहेत.)

पण हा विजय काही कायम टिकणारा नसतो. (गवत सहसा हार मानणारे नसते, म्हणा ना.) उंच झाडे जरी, झेब्रा, हरणे यांच्या आवाक्याबाहेरची असली तरी जिराफ आणि हत्ती, यांच्यासाठी मेजवानीच असतात.

जिराफ तसा निरुपद्रवी. कारण तो फक्त कडेकडेची पाने खाणार. त्याचे चरणे तसे मर्यादितही असते. बाभळीला त्याच्यापासून बचाव करायचा असेल तर आपली उंची वाढवावी लागेल, पण मर्यादीत पाणी आणि पोषणात ते शक्य नाही. तसे झाले तर जिराफही आपली मान आणखी लांब करेल. पण तसे झाले तर त्याला जमिनीवरचे पाणी पिणे आणखी अवघड होईल. त्यामुळे सध्या दोघे एकमेकांना चालवून घेत आहेत.

हत्ती मात्र गुंडोबा. त्याचा धुसमुसळेपणाच जादा. तो नुसत्या पाना शेंगावर समाधान मानत नाही, डोक्याने ढुश्या देत तो ते झाड पाडतो. मग पाने, शेंगा इतकेच काय काटे, खोडाची साल आणि लाकूडही खाऊन टाकतो.
या धुसमुसळेपणाला टक्कर देण्यासाठी, बाभळीचे झाड काय तयारी करतेय माहीत नाही. कदाचित हा एक प्रयत्न असेल.

एरवी जून खोडाला अजिबात काटे नसतात. या झाडाला मात्र खोडालाच मोठे काटे होते.

अशा उत्पातानंतर सर्वच बाभळीची झाडे नष्ट होतात. सूर्यप्रकाश परत जमिनीवर पसरतो आणि परत एकदा गवताचे साम्राज्य पसरते. मग परत बाभळींना सुवर्णसंधीची वाट बघावी लागते.

बाभळी एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत. त्यांनी सैन्य बाळगायला सुरवात केलेली आहे. बुल्स हॉर्न असे नाव असलेल्या बाभळीचे काटे, बैलाच्या शिंगाप्रमाणेच जाडजूड असतात. या काट्यात पहिल्यांदा एक राणी मुंगी येते आणि तो काटा मूळाशी पोखरुन त्यात अंडी घालते. एकदा का कामकरी मुंग्यांची प्रजा निर्माण झाली, कि मग त्या झाडाचे संरक्षण करु लागतात.

हे सर्व झाड म्हणजे त्यांची अखत्यारी ठरते, त्या झाडावर कुठलाही किटक बसला कि त्या किटकावर जोरदार हल्ला करुन, त्या किटकाची शिकार केली जाते. इतकेच नव्हे तर या मुंग्या आजूबाजूला सतत नजर ठेवून असतात. त्यांच्या मालकीच्या झाडाजवळ उगवलेले कुठलेही रोप असेच चावून चावून नष्ट केले जाते. याशिवाय आजूबाजूच्या झाडाची एखादी कोवळी फांदी जर झाडाच्या जवळ आली तर तिचाही असाच खातमा केला जातो.

अर्थात हि सेवा काहि विनावेतन नसते. आपल्या सैन्याची काळजी घेण्यासाठी हे झाड पानांच्या बुडाशी एका खास ग्रंथीद्वारे मधुरस स्त्रवत असते. हा रस फूलातील रसांपेक्षा वेगळा असतो. कोस्टा रिका मधील एक झाड तर पानांच्या टोकाशी, तीळाएवढ्या गाठी निर्माण करते. या गाठी म्हणजे मुंग्यांच्या बाळांसाठी, प्रथिनयुक्त खाऊच असतो.

पण काहि झाले तरी, आपल्या सैन्याची राहण्याची सोय अशी काट्याकुट्यात कशी करायची ? म्हणून केनयामधली काही झाडे, मुंग्यांसाठी अशी सुबक घरे बांधून देतात.

या गाठी काही मुंग्यानी निर्माण केलेल्या नाहीत तर झाडांनीच तयार केलेल्या आहेत, हि फळेही नव्हेत. या पोकळीत, एखाद्या वारुळात असावी तशी रचना असते, आणि मुंग्या त्यात सुखाने राहतात, आणि आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडतात.

दोस्तानो, कुंपणापलिकडच्या असे म्हणत, आपण हेटाळत असलेल्या बाभळीचे विश्व हे असे अनोखे आहे.

गुलमोहर: 

सध्या सोप्या भाषेत अतिशय सुंदर ओघवते वर्णन असे मी ह्या माहितीचा उल्लेख करीन.. Happy

फोटोंनी अजूनच जान आणली.. Happy शेवटचा फोटो सहीच... Happy

हो.. सुबाभूळ नाही... इकडे ज्या रोपटास येडी बाभूळ म्हटलं जातं त्या बाभळीचा. Happy

लौकरच देतो.

आपल्याकडे कमी लेखल्या जाणा-या बाभळी बाबत इतके रोचक वर्णन
वाचताना जरा आश्चर्य वाटले,कारण आमच्या गावी बाभळी खूपच आहेत.आम्ही लहान असताना त्याचा वापर फक्त शेळ्यांना चारा खाण्यासाठी आणि सरपण म्हणूणच करायचो.याच्यातच एक प्रकार आहे तो म्हणजे वेडी बाभळ हीची वाढ पण आपल्या देशाच्या लोकसंख्येप्रमाणे होतीय...
खूपच अप्रतिम माहीती................

फोटो बद्दल सांगायचच राहील,
बाभळीसारख्या वृक्षाचे इतके सुंदर व अप्रतिम फोटो ............
तोडच नाही..........

दिनेशदा,
कोपरापासून ______/\______
अफलातून निरीक्षणं आहेत तुमची. खूप आवडला हा लेख.
<<तसे झाले तर जिराफही आपली मान आणखी लांब करेल.
<<बाभळी एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत. त्यांनी सैन्य बाळगायला सुरवात केलेली आहे.
<<या गाठी म्हणजे मुंग्यांच्या बाळांसाठी, प्रथिनयुक्त खाऊच असतो.
<<काही झाडे, मुंग्यांसाठी अशी सुबक घरे बांधून देतात.
Happy Happy किती सोप्या भाषेत सांगितलंय सगळं !
( आज मी ह्या लेखाच्या ट्रान्समध्ये असणार बहुतेक !)

सगळे श्रेय माझे नाहि, थोडे वाचन थोडे निरिक्षण असले तरी बरेचसे श्रेय त्या सर्वश्रेष्ठ निसर्गालाच.

झाडाने मुंग्यांकरता घरं बांधावीत म्हणजे अल्टीमेटच आहे. निसर्ग हा एक अजब किमयागार आहे आणि तो तुम्हाला इतका बारकाईने वाचता येतो ही एक छान देणगी आहे, दिनेशदा.

<<<<<<<निरिक्षण असले तरी बरेचसे श्रेय त्या सर्वश्रेष्ठ निस<<<<<<<>>>
आम्हीपण हाच निसर्ग बघतो पण आंम्हाला हे कसे काय सुचत नाही?
लेख आणि फोटो अर्थातच अ प्र ति म!!!!! Sad

हे सगळे वाचताना एकदम तल्लीन होतो.. काय ते अफाट निरीक्षण, बारकावे नि तो अभ्यास.. मस्तच नि धन्यवाद देणे आलेच.. Happy

दिनेशदा,
भन्नाट माहिती !
गावी गेलो कि बाभळीच झाड मी आता थोडा वेळ काढुन,जवळुन बघेन !
आतापर्यंत पायात अनेक काटे मोडलेल्या, आठवणी असल्यामुळे त्या झाडाकडे कधी प्रेमाने बघितलच नाही
या झाडावरील डिंक मात्र लहानपणी आवडीने खायचो आम्ही !
Happy