रत्ननगरी "रत्नागिरी" – (९) चिपळुण परीसर

Submitted by जिप्सी on 30 December, 2010 - 12:35

=================================================
=================================================
आजच्या रत्नागिरी सफरीत आपण आज भेट देणार आहोत ते चिपळुण परीसरातील हेदवी, वेळणेश्वर, श्री परशुराम मंदिरांना. (सदर फोटो माझ्या दोन वर्षापूर्वीच्या रत्नागिरी भटकंतीतले आहेत. महाराष्ट्रातील या ठिकाणांची माहिती व्हावी म्हणुन पुन्हा या चित्रमालिकेत देत आहे.)
=================================================
वशिष्ठी नदी आणि परीसर (परशुराम घाटातुन)
श्री परशुराम मंदिर
जयगडची खाडी
गणपतीपुळ्याहुन गुहागरला जायचा राई–भातगाव पूल

=================================================
=================================================
हेदवीचा श्री दशभुज लक्ष्मीगणेश

महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिर आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातेल हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन भव्य अशी हि वास्तु. मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते. मंदिर परिसरात असलेली गर्द आमराई, शांत व मन प्रसन्न करणारे वातावरण, विविध फळा फुलांच्या बागा यामुळे येथे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज लक्ष्मीगणेश मंदिराच्या व येथल्या परिसराच्या प्रेमात न पडला तर नवलच. गुहागर तालुक्यापासून अंदाजे २०-२१ किमी अंतरावर वसले आहे हे हेदवी गाव. पूर्वी हे गाव जास्त प्रसिद्ध नव्हते मात्र दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे.

(श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर)

श्री दशभुज गणेशाचे हेदवी गावात आगमन कसे झाले त्याबद्दल असे सांगण्यात येते कि, पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे एक गणेशभक्त येथे राहत होते. त्यांनी पेशवे यांची पुणे येथे भेट घेतली. केळकर स्वामींनी पेशव्यांच्याबाबतीत वर्तविलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना मंदिराच्या उभारणीसाठी त्याकाळी १ लाख रुपये दिले. त्या पैशातून केळकर स्वामींनी हेदवी येथे हे मंदिर उभारले.मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढर्‍या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते असे म्हटले जाते. अशी हि भक्तांच्या हाकेला धावणारी वैशिष्यपूर्ण मूर्ती संपूर्ण भारतात एकमेव आहे. अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती पुजायचा अधिकार केवळ सेनेचे अधिपत्य करणार्‍यांनाच असतो असा पूर्वापार संकेत आहे. त्यामुळे पेशवेकाळात अशा मूर्त्या फार कमी तयार केल्या गेल्या. मंदिराच्या उजव्या कोनाडयात असलेली लक्ष्मी विष्णुची मूर्ती हि विशेष रुपातली आहे. मूर्तीच्या बाजुला जय-विजय असून मूर्ती गरुडारुढ आहे. याचा अर्थ असा कि श्री विष्णू भगवान भक्ताची हाक ऐकताच त्याच्या मदतीला जाण्यास सिद्ध आहे. टप्याटप्याने जिर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिरात भाद्रपद व माघी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. अशा या निसर्गरम्य हेदवी गावास स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. येथे आपल्याला पर्यटन व तिर्थाटन या दोन्हीचा लाभ घेता येतो.

अशा या हेदवी गावात श्री दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिराव्यतिरीक्त अजुनही बरेच काही बघण्यासारखे आहे.

हेदवीचा सुंदर समुद्रकिनारा
श्री उमा महेश्वर मंदिर – हेदवीच्या समुद्रकिनारी डोंगराच्या पायथ्याशी उमा महेश्वराचे मंदिर आहे. १७७० ते १७८० दरम्यान अहिल्याबाई होळकरांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते. समुद्रकिनारी खडकाळ भागात थोड्या उंचीवर असलेल्या या मंदिरापर्यंत भरतीचे पाणी येते. गाभार्‍यात एक शिवलिंग असून मंदिराजवळच एक गोड्या पाण्याचे कुंडदेखील आहे.

बामणघळ – हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरक्षित आहे. उमा महेश्वर मंदिराच्या बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते. ऐन भरतीच्या वेळेस येथे उंच उसळलेली लाट आपले स्वागत करते. डोंगरावर वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी आदळून एक अरुंद घळ तयार झाले आहे. हिच ती सुप्रसिद्ध "बामणघळ". येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे जरा जपुनच!

बामणघळ

असे हे लक्ष्मीगणेशाचे सुंदर मंदिर समुद्राजवळच असल्याने समुद्राची गाज ऐकत आपल्या मनातील भक्तीभावाला साद घालण्याचा आनंद अवर्णनीय असतो आणि तो अनुभवण्यासाठी एकदा तरी हेदवीला अवश्य भेट द्या.

जायचे कसे?
१) मुंबई ते गुहागर ( ३१३ किमी)
गुहागर - पालशेत - अडुर - हेदवी (२४ किमी)

२) मुंबई ते गुहागर ( ३१३ किमी)
गुहागर - पालशेत - साखरीआगार - वेळणेश्वर - हेदवी (३० किमी)

=================================================
=================================================
श्री क्षेत्र वेळणेश्वर
=================================================श्री वेळणेश्वर
वेळणेश्वरच अप्रतिम समुद्रकिनारा

=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================

गुलमोहर: 

दापोलिला पडघवलिला जा
अनुमोदन. आणि जायच्या आधी, गोनीदांचं "पडघवली" पुस्तक वाचलं नसाल तर वाचून जा.
(म्हणजे मी अजून गेलेली नाही, पण वाचलंय म्हणून जायचंय एकदा.)

पडघवली नावाचे गाव नाही, ते फक्त कादंबरीत आहे. गावाचे नाव गुडघे आहे. खरोखरीच जायला निघालात तर सापडणार नाही पडघवली. दापोली स्टँडवरून उंबरघर एस.टी. पकडली तर ती गुडघ्याला थांबते. मी दोन आठवड्यापूर्वीच जाऊन आले. चिपळूणहून गुहागर रस्त्याला लागलो. वेलदूर फाटा पकडला व खाडीतल्या फेरी बोटने दाभोळला गेलो. तिथून ओणनवसेवरून गुड्घ्याला आलो. दत्तजयंतीचा मुहूर्त साधला आणि पालखीला आपोआपच नमस्कार घडला.

योग, फोटो पाहून प्रत्यक्षच गेल्यासारखे वाटले, फारच छान!

Pages