सोकावलेल्या अंधाराला इशारा

Submitted by अभय आर्वीकर on 28 December, 2010 - 11:44

सोकावलेल्या अंधाराला इशारा

सोकावलेल्या अंधाराला, इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण, हा दीप आज जळला पाहिजे

आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे?
डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा वाद टळला पाहिजे

गाय इकडे आणि कास तिकडे, चारा मी घालायचा कुठवर?
कधीतरी इकडे; या बाजूस, दुधाचा थेंब वळला पाहिजे

प्रवेशदाराचा ताबा घेत, का उभा ठाकला आहेस तू?
माझा प्रवेश नाकारणारा, इरादा तुझा ढळला पाहिजे

आता थोडे बोलू दे मला, ऐकणे तुही शिकायला हवे
हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे

निर्भीडतेने 'अभय' असा तू, यज्ञकार्य असेच चालू ठेव
ग्रहणापायी झाकोळलेला, चंद्र आता उजळला पाहिजे
.
.
गंगाधर मुटे
..................................................................

गुलमोहर: 

व्वा... सुरेख.. Happy

शेवटच्या शेर मध्ये चन्द्रा ऐवजी सुर्य कसा वाटेल? की चन्द्र लिहिण्यामागे काही खास प्रयोजन आहे?
मी इथे नविन आहे,अगदीच मन्द प्रश्न असेल तर माफ करा...

http://merakuchhsaman.blogspot.com/

छान Happy
मतला मस्त..
माझा प्रवेश नाकारणारा, इरादा तुझा ढळला पाहिजे
इथे टायपो आहे का?
नाकारणार्‍या पाहिजे ना?

हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे
इथे थोडी वयाकरणाची गल्लत झाली आहे, तूच च्या पुढे पाहिजे असं हवं.

बाकी मस्तच Happy

देवाजी,
शिकायला हवे(स), बरळला पाहिजे(स)
येथे व्याकरण सुट घेतलीय.

पण नाकारणार्‍या आणि नाकारणारा हे दोन्ही बरोबर आहेत, असे वाटते.

१) माझा प्रवेश नाकारणार्‍या माणसा तुझा जो काही इरादा आहे तो ढळला पाहिजे.
२) अरे माणसा, माझा प्रवेश नाकारणारा तुझा जो काही इरादा आहे/नाकारण्याचा तू जो इरादा केला आहेस तो तुझा इरादा ढळला पाहिजे.

आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे?
डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा वाद टळला पाहिजे

मुटेजी,
लई भारी !
Happy

आता थोडे बोलू दे मला, ऐकणे तुही शिकायला हवे
हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे>>>

गंगाधर मुटे,

ओळी लयीत वाचता येत नाही आहेत. स्पष्ट प्रतिसादाबद्दल क्षमस्व!

(हे मी बरळलो आहे असे वाटणार नाही अशी आशा - हा हा हा हा)

-'बेफिकीर'!

श्री मुटे,

आपण म्हणालात त्याप्रमाणे मी ही रचना वृत्तात बसवलेली आहे. आशयात फारसा बदल होणार नाही याची काळजी घेतली असली तरी काही ठिकाणी कदाचित आपल्याला अभिप्रेत अर्थ येणार नाही, त्याबद्दल क्षमस्व!

सोकावला अंधार हा, याला इशारा आज कळला पाहिजे
येवोत लाखो वादळे पण दीप हा थाटात जळला पाहिजे

आंब्यास कांदा मानणे चालायचे हे कोठवर याच्यापुढे?
उघडून डोळे वाग तू आता जरा, हा वाद टळला पाहिजे

ही गाय इकडे, कास तिकडे, कोठवर घालायचा चारा अता?
केव्हातरी माझ्याकडे ताज्या दुधाचा थेंब वळला पाहिजे

येऊ नये मी आत यासाठी असा दारात का होशी उभा?
बंदी मला घाले असा भुरटा इरादा आज ढळला पाहिजे

आता मलाही बोलुदे, तूही जरासे बाण अंगी ऐकणे
नाही जरुरी की कुणी ज्ञानीच दरवेळी बरळला पाहिजे

निर्भीडतेने तू अभय हा यज्ञ जारी ठेव, जावो आहुती
ग्रहणामुळे झाकोळलेला चंद्र बाकी हा उजळला पाहिजे

(गागालगा गागालगा गागालगा गागालगा गागालगा)

गझल सहसा गणवृत्तातच रचावी असे म्हणतात. कारण त्यामुळे ती कर्णमधुर होते. (अधिक)

मात्रावृत्तात रचली तरीही लय मात्र पाहिजे. उदाहरण म्हणून माझी एक गझल येथे देत आहे, जी मात्रावृत्तात आहे.

http://www.maayboli.com/node/16434

चु.भु.द्या.घ्या.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

.

व्वा! व्वा!

भूषणजी, आशयात बिल्कुल बदल न करता बदललेली गझल आवडली.

धन्यवाद मुटेजी, भूषणजींना बदल करावयास सांगितल्याबद्दल आणि तशी मात्रावृत्तातली गझल रचल्याबद्दल!!

भुषणजी सुंदर.

पण मला हवा तसा 'रिझल्ट' येत नाहीये. म्हणून मी मात्रावृत्तात रचण्याचा प्रयत्न केला होता. समाधान झाले नाही.
तुम्ही जे गणवृत्त वापरले, त्यातून जी लय तयार होते, त्यातून पण मला हवा तसा 'परीणाम' मिळत नाही.
याच गझलेचा मतला मी आणि डॉक्टर कैलासजींनी अक्षरवृत्तात करून बघितला होता, पण तोही मला हवा तसा परीणामकारक वाटला नव्हता.

त्याचे कारण असे की जसा आशय, त्यानुरूप लय असायला हवी.
उदा. भक्तीगीतांना एक वेगळी लय असते. भावगीत गाण्याचा वेगळा ढब असतो.
प्रेमगीतात मिलनासाठी वेगळी लय असते तर विरहगीतासाठी अजून वेगळी.

गझल वृत्तात हवीच. पण गझल रचताना कोणत्याही आशयाची गझल कोणत्याही वृत्तात चपखल बसेलच असे नाही, असे मला आज तरी वाटते.

सध्या तरी याबाबत माझा गोंधळच आहे, कालांतराने यातून दिशा गवसेल अशी आशा आहे. Happy