फिरुनी पुन्हा

Submitted by शुभांगी. on 20 December, 2010 - 23:25

सोनुला तिने तापाच औषध दिल आणि मांडीवर घेवुन तिला झोप येइपर्यंत हलकेच थोपटत राहिली. तोंडाने अंगाईगीता ऐवजी मोठीचा अभ्यास, तिच्या मॅथ्समधल्या सम्स चालू होत्या. पुन्हा उद्याची तयारी आहेच तिच्या सकाळच्या शाळेची. तरी बर राहुलला रात्रीची शिफ्ट आहे नाहीतर सकाळी ४ वाजता उठायचं अगदी जीवावर येत. मनातले विचार झटकुन तिने सोनुला बेडवर टाकल. मोठीला झोपायला पिटाळल आणि पुन्हा ती स्वयपाकघरात आली. भराभर फ्रीजमधुन भाजी काढुन चिरुन ठेवली उद्या दुपारची आणि सकाळच्या डब्याची. कणीक तिंबुन ठेवली. सगळी झाकपाक करुन, लाईट बंद करुन ती बेडकडे वळली तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते.

अरेच्च्या! राहिल की बघायच, आज टीव्हीवर कुठला तरी सिंधु संकपाळांचा सिनेमा होता पण ह्या कामाच्या गडबडीत टीव्ही कुठे बघायला वेळ मिळावा? उद्या सकाळचे विचार डोक्यात घोळवत ती झोपेच्या अधीन झाली. हे एक बरय, झोप येण्यासाठी अजीबात कष्ट करावे लागत नाहीत. पाठ टेकली की झोप लागते. मधे कधीतरी सोनुच्या कण्हण्याने तिला जाग आली. उठुन तिला औषधाचा एक डोस देवुन ती झोपायला वळणार इतक्याच पहाटे पावणेपाचचा गजर वाजला.

आता कुठली झोप? उठुन चहाच आधण ठेवल. सासर्‍यांच्या बेडरुमवर टकटक केली. हॉलमधे जावुन टीव्ही बंद केला. कधीतरी रात्री उशिरा आल्यावर राहुल टीव्ही बघताबघताच झोपला होता. तिने त्याच्या अंगावरचे पांघरुण सारखे केले. तोंडात ब्रश आणि एका हातात झाडु घेवुन तिने केरवारे केले. चहा घेताघेता सासर्‍यांच्या सकाळच्या नाष्ट्याची तयारी व एकिकडे गॅसवर मोठीच्या डब्याची भाजी टाकली फोडणीला. सासर्‍यांनी चहा घेताघेता फर्मान सोडलच, अजुन अंघोळ नसेल तर मला नाष्टा नको.

गिझर लावल्यापासुन शॉवरखाली तासभर उभ राहण्याची इच्छा तिने परत एकदा मनामधेच दाबली व दोन तांबे घाईघाईत अंगावर घेवुन ती पुन्हा स्वयंपाक घराकडे वळली. मोठीचा डबा भरुन तिने सासर्‍यांसाठी कुकर लावला, पालकाची भाजी करुन ठेवली. आणि मोठीला उठवण्यासाठी बेडरुमकडे वळली.

"मम्मा, थोडा वेळ झोपु दे ना ग अजुन प्लीज"

"नाही पिल्ला, सहा वाजलेत आता बस येइल ग इतक्यात"

"खुप थंडी आहे ग, पाचच मिनिटे झोपते ना" अस म्हणुन ती परत रजईत गेली.

इथं थांबुन उपयोगच नव्हता. तिने स्वतःच्या कपाटातुन प्रोजेक्ट रिपोर्ट्स काढले जे तिने चार दिवसापासुन मेहनतीने केले होते. आज तिचं प्रेझेंटेशन होत कंपनीच्या सी ई ओंसमोर. तयारी झाली होती सगळी पण वेळेत पोचतोय की नाही ही एकच शंका होती.

परत एकदा मोठीला हलवुन आणि थोडस चिडुनच तिने उठवले. ती बिचारी आता निमुटपणे उठली स्वतःच्या चिमुकल्या हातांनी एवढ्या मोठ्या रजईची वेडीवाकडी घडी घातली व बाथरुमकडे वळली. साडेसहा वाजले तरी मोठी अजुन बाथरुममधुन बाहेर आली नाही म्हणुन तिने दारावर दोन तीन थापा मारल्या हलकेच दार ढकलले तर बाईसाहेब गरम पाण्याखाली निवांत झोपल्या होत्या. सकाळची थंडी तिला काही गरम पाण्यातुन बाहेर येवु देत नव्हती. कसतरी तिच्या मागे लागुन तिने मोठीला शाळेसाठी तयार केल व गेटजवळ सोडुन आली.

बापरे तोपर्यंत ७ वाजले होते आता १५ मिनिटात स्वत:चे आवरुन छोटीला पाळणाघरात सोडुन तिला बसस्टॉप गाठायचा होता. सकाळी कितीही लवकर उठा वेळच पुरत नाही अस पुटपुटत तिने भराभर स्वतःच आवरल एका हातात स्वत:ची पर्स प्रोजेक्टची फाईल दुसर्‍या हातात छोटीची बास्केट, कडेवर सोनु असा लवाजमा घेवुन ती गाडीकडे पार्कींगमधे आली. ओह थंडीमुळे हल्ली गाडी लवकर सुरु होत नाही. तिने चालतच देशपांडे काकुंच घर गाठल. तोपर्यंत कंपनीची बस स्वारगेटवरुन निघाल्याचा मिस कॉल येवुन गेला होता. तिने दारातुनच सोनुला देशपांडे काकुंच्या हवाली केल. ती बिचारी झोपेतच होती आणि थोडी ग्लानीतसुद्धा.

काय राहिल, काय विसरल याचा विचार करायला सुद्धा वेळ नव्हता. तशीच घाईघाईत गाडीत शिरली. ड्रायव्हरने आज परत एकदा रागाने बघितल. पण त्याच्याकडे लक्ष देण तिला महत्वाच वाटल नाही. लगेच शेजारचीने तिच्या सासुच्या कंप्लेंटस करायला सुरवात केली. तिने हसुन प्रतिसाद दिला. थोड समजावल. डोक गाडीच्या सीटवर टेकताच डोळे मिटले व आजच्या प्रोजेक्टची रिव्हीजन केली.

हा एकमेव अर्धा तासाचा वेळ तिचा हक्काचा होता. या अर्ध्या तासात ती बर्‍याचदा मुलींचा, स्वत:चा, घराचा, भविष्याचा विचार करायची. स्वप्न रंगवायची प्रोजेक्ट लीड करण्याची. आजपर्यंत खुप संधी आल्या पण काही ना काही कारणाने तिला पाणी सोडाव लागल त्यावर. पण आता नाही यावेळी नाही हार पत्करायची. मनाची पक्की तयारी झाली होती तिच्या. आयुष्यभराच स्वप्न पुर्ण व्हायची वेळ आल्यावर माघारी फिरणार नव्हती ती. राहुलशी बोलुन झाल होत, तो तयारही झाला होता. एक सुस्कारा सोडला तिन विश्वासाने.

शेजारणीने हळुच धक्का देवुन उठवल्यावर तिने डोळे उघडले पटकन बसमधुन उतरली. देसाई सरांना भेटायलाच हव या प्रोजेक्टमधे खुप मदत केलीय त्यांनी. देसाई शांतपणे चहा घेत होते. तिच्या चेहर्‍यावरची उत्सुकता बघुन त्यांनी तिला डोळ्यांनीच आश्वस्त केल. ती हसली व कॉन्फरंसकडे वळली.

खरतर पहिल प्रेझेंटेशन नव्हत तिच पण हुरुप आणि उत्साह पहिल्यासारखाच होता. आजपर्यंत आत्मविश्वासाने डिझाईन केलेली सगळी प्रोजेक्टस कुणीतरी दुसर्‍यानेच एक्झिक्युट केली होती. पण यावेळी तीच एक्झिक्युट करणार असं तिन देसाईंना सांगीतल होत. त्यांना कोण अभिमान वाटला होता तिचा. त्यांची खुप आवडती विद्यार्थिनी होती ती. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा जपणारी.

खुप छान प्रेझेंट केले तिने रिपोर्टस स्लाईडसच्या सहाय्याने स्वतःच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने. देसाईसरांची कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर तिने मोबाईल पाहिला. बापरे राहुलचे ६ मिसकॉल. तिने बाहेर येवुन लगेच त्याला कॉल केला.

"मुर्ख कुठे तरफडली होतीस इतका वेळ?? केव्हाचा फोन करतोय मी"

"राहुल अरे ऑफिसात आहे ना मी"

"माहितिये, खुर्चीवर बसुन कॉम्पवर बडवायला काय अक्कल लागते ग??"

"काय झालय?" तिने स्वतःचा अपमान गिळत विचारल.

"अरे वा, आहे की आठवण घराची" तो कुत्सितपणे म्हणाला.

"फोन का केला होतास?"

"सोनुला ताप असताना तू गेलीसच का ऑफिसला?? तिला कोण सांभाळणार??"

"अरे मी दिलय औषध तिला"

"आणि देशपांडे काकुंना कोण सांगणार?? त्यांचा दोनदा फोन येवुन गेला" राहुलने रागाने फोन आपटला.

तिला आठवल काय विसरल होत ते, प्रोजेक्टच्या नादात आणि सकाळच्या घाईत ती देशपांडेकाकुंना सोनुच्या तापाच सांगायचच विसरली होती. तिने लागलिच त्यांना फोन केला. सोनुच्या तब्येतीची चौकशी केली. सोनु रडुन झोपली होती. मोठीच्या शाळेतुन प्रोजेक्ट पुर्ण न केल्याने नोटीस आली होती. तिने देशपांडे काकुंना हे राहुलला न सांगण्याचे कबुल करुन घेवुन फोन ठेवला.

राहुलचा परत एकदा फोन आला.

"हातातल काम सोडुन लगेच घरी ये, बाबांचा पाय मुरगाळला आहे आणि मला आता सेकंड शिफ्टला जायच आहे."

"पण राहुल" पुढच ऐकायला राहुल लाईनवरच नव्हता.

प्रोजेक्ट मिळाल्याचा आनंद, देसाईसरांची पाठीवरची थाप, इतरांनी केलेल कौतुक, मुलीच आजारपण, नवर्‍याचा त्रागा, मैत्रीणीची सासु, मोठीचा शाळेतला प्रोजेक्ट सगळ डोक्यात मोठा पिंगा धरुन नाचायला लागल.

का सगळ मी सहन करायच?? मुली काय माझ्या एकटीच्याच का?? कुणी कुणी मदत करत नाही. किती किती फ्रंटवर लढायच?? नवरा म्हणुन तो करतो ते कष्ट मग मी काय करते?? मुलींचा अभ्यास मीच घ्यायचा का? सगळ्यांची दुखणी खुपणी मीच करायची का? घर आणि संसार फक्त माझाच आहे का?? मला माझा विचार करायचा अधिकारच नाही का?? मी आकाशात भरारी मारायची नाहीच का? मला कायम दुसर्‍यांसाठीच जगाव लागणार का?

कितीतरी प्रश्न आणि फक्त प्रश्न उत्तर माहित असलेले नसलेले किंवा ज्यांच्या उत्तरांची कवाड आपणच बंद केलेले. न संपणारे प्रश्न.

तिने मनाचा निश्चय केला यासगळ्यातुन बाहेर पडण्याचा, स्वत:च आयुष्य परत एकदा स्वतःच्या पद्धतिने जगण्याचा. ती देसाईसरांच्या केबीनकडे वळाली.

घरी गेल्यावर सासर्‍यांच्या रुममधे डोकावली. ते कण्हत होते 'आई ग, फार दुखतय ग'. तिच्यातली आई लगेच जागी झाली. तिने त्यांना हाताला धरुन उठवल दवाखान्यात नेल. तिथुनच देशपांडे काकुंना फोन करुन उशिरा येतेय थोडी, तुमच्याकडेच दोघींना खिचडी खायला घाला अस सांगीतल. सासर्‍यांना घेवुन घरी यायला बराच उशिर झाला. मग त्यांना गरम गरम उपमा करुन दिला खायला व ती मुलींना आणायला देशपांडे काकुंच्या पाळणाघराकडे गेली.

मुलिंचे कोमेजले चेहरे पाहुन पोटात तुटल तिच्या. सोनुला जवळ घेताना तिने मोठीशी तिच्या प्रोजेक्टबद्दल डिस्कस केल. तिची कळी खुलली. आई पुन्हा एकदा वाट्याला आली होती त्यांच्या १२ तासांनंतर.

घरी आल्यावर तिने सोनुसाठी डॉ. मानकरांच्या हॉस्पिटलमधे फोन करुन दुसर्‍या दिवशीची अपॉईंट्मेंट घेतली. सोनुला परत औषध दिल. तिच्या डोक्यातुन हात फिरवताना तिला सुद्धा दिवसभराच्या थकव्याने झोप लागली.

पहाटे कधीतरी राहुलने तिच्या मानेखाली उशी दिली, अंगावर पांघरुण टाकल, सोनुला गादीवर ठेवल. तिच्या कपाळावर येणार्‍या केसांना बाजुला सारुन तो हलकेच पुटपुटला,

"मी खुप वाईट आहे ना, बट स्टील आय लव्ह यु गार्गी"

हसली ती सुद्धा आणि बर्‍याच गोष्टींची आखणी केली मनातल्या मनात, मोठीच्या प्रोजेक्टला लागणारा मायक्रोसॉफ्ट वर्ड्चा स्क्रीनशॉट, सासर्‍यांच इंजेक्शन, सोनुची अपॉईंटमेंट, राहुलचा आवडता बदामाचा शिरा आणि देसाई सरांना प्रोजेक्ट एक्झिक्युट करत नसल्याचा इमेल.

गुलमोहर: 

बर्‍याच दिवसांनी उत्तम कथा वाचली. अगदी विचार करायला भाग पाडणारी.

बाप्रे आता हे विचार दिवसभर डोक्यात असणार.

र च्याक्?म्हन्जे? मी मा बो वर जव ळ्पास दहा अकरा वर्शान्नि आलेय्.तेन्व्हा आम्हि इन्ग्रजि मधे टायपायचो. त्यामुळे आत्ता हे नवे अवघ ड वाट्तेय्.असो. आपट्लेल्या दाराचे काय्?बाप्रे ! हे जरा डेन्जर वाट्ले. शुभान्गी माफ करा या सुन्दर चर्चेत हे लिहावे लागले.

वेल, ही कथा प्रातिनिधिक आहे, जी शेजारच्या, आजूबाजूच्या, ओळखीच्या कोणाही बाईच्या बाबतीत घडू शकते, घडते. आता मागे प्रत्येकाने असं माझ्याबाबतीत झालं असतं तर काय? अशा रितीने मतप्रदर्शन केलेलं आहे. पण त्यातूनही फ़ार सुंदर मुद्दे पुढे आलेत. वादच नाही.

मला एक कळत नाही, गोष्टी एवढ्या थराला येईपर्यंत गोष्टीची नायिका काय करत होती? गोष्टीवरून तर हे जाहीरच आहे की हिचा नवरा हिला प्रचंड गृहीत धरतोय.याचा अर्थ अशा सिच्युएशन्स या आधीही आल्या होत्या आणि त्या त्या वेळी तिने मागे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे ’सुपरवुमन’ अबिलिटीने निभावून नेल्या असतील. या गोष्टीत फ़क्त तिचा संयम संपलाय. या आधी किंवा खूप आधीपासूनच जर तिने स्पष्ट शब्दात हा डोलारा एकट्याने निभावून न्यायला नकार दिला असता, सांसारीक, प्रापंचिक जबाबदारया तिच्याइतक्याच नवरयाच्यासुद्धा आहेत हे त्याला समजणारया भाषेत समजाऊन सांगीतलं असतं तर कदाचित..अर्थात यात तिचाही दोष आहे अशातला भाग नाहीए. कोणी तिचा संयम संपलाय याला ती कारणीभूत आहे का? असंही विचारेल. तर नाही का?
वेल, काही नवरयांबरोबर संवादही शक्य नसतो (सुसंवाद susceptible सर्व नवरयांना शिरसाष्टांग). पण करु पाहिला तर शक्य आहे असं मला वाटतं. आणि मागची मतं-मतांतरं ही राहुल बोलून गोष्टी सोडवता येतात यात विश्वास ठेवणारा असावा अशा विश्वासाने झाली आहेत. What if not? राहुल अशा अ-संवादीय लोकांपैकी असेल, तर आलिया भोगासी न्यायाने तडजोडी करत गाडं रेटणं किंव अगदीच असह्य झालं तर काडीमोड हे दोनच पर्याय शिल्लक राहतात. त्यातला दुसरा तरी कोणतीही बाई आपल्या मुलांपायी उचलत नाही. निभतंय ना? मग निभू देत म्हणत तडजोडी करत राहते. जे या गोष्टीतली नायिका करते आहे.

कोण गिल्टी आहे याबद्दल ही कथा नाहीच आहे. ’आहे हे असं आहे’ अशा आशयाची. यात कोणाला गुन्हेगार, मतलबी ठरवण्याचा प्रश्नच येत नाही. विचार व्हावा, आरोप नकोत.

अतिशय वास्तवपूर्ण कथा, उत्तम मांडणी.
सर्व कष्टकरी स्त्रिया - शहरी अथवा ग्रामीण - वंदनीयच.
पुरुषांनी इगो सोडून त्यांना मदत करणे -कामे वाटून घेणे हे सगळ्यात महत्वाचे व कृतीत आणण्याचे.
वर्षातून फक्त एक स्त्री दिन साजरा करण्याऐवजी स्त्रीच्या माणुस म्हणून भावना समजावून घेण्यासाठी -"अनुराधा सचिन म्हापणकरांच्या ब्लॉग" वरील कविता सर्वांनी जरूर वाचावी.
खूप धन्यवाद.

गोष्ट छान लिहीलीय शुकू. शिवाय चर्चाही उत्तम.
हे खूप रूड वाटेल पण कुठलीही वस्तू घेताना आपण व्हॅल्यु फॉर मनी असा विचार करतो. तसाच नात्यांबद्दलही नकळत होतच असतो. माणूस सहन करतं ते काहीतरी कमकुवत बाजू असते म्हणूनच. प्रेम ही जनरली सगळ्यात कमकुवत बाजू असायला हवी नात्यांमधे. पण त्यापेक्षा इतर गोष्टी दुर्दैवाने महत्वाच्या ठरतात.
बाई बहुतेकदा निर्णय घेण्याला कचरते. मग त्याऐवजी ती शाब्दिक, शारिरिक मार खाईल. नको त्या माणसांबरोबर जुळवून घेत मन मारत राहील पण कुठलाही निर्णय स्वतः घेऊन मग येईल ते फेस करायची तिची तयारी नसते. उद्या हे सगळं फसलं तर किंवा न जाणो आहे यापेक्षा वाईट वेळ आली तर या भितीने ती धाडकन निर्णय घेत नाही. मग प्रत्येक वेळी होणार्‍या अपमानाला किंवा द्याव्या लागणार्‍या इच्छांच्या बळीला ती "बाप रे एवढ्यासाठी इतकं सगळं सोडायचं किंवा इतकं झगडायचं?" हा विचार क र ते च. प्रत्येक एपिसोड वेगळा काढून पाहिला तर तो "त्या तेवढ्या सगळ्या" पेक्षा कमीच ठरतो.
आणि नवरा जर तिच्याबाबतीत इतका केअरलेस असेल तर त्याची तिला गमावण्याची भीती संपली आहे हे सरळ आहे. आणि ही भीती बाईच स्वतःच्या वागण्यानं मोडून काढते. प्रेमासाठी. पण हवी तेंव्हा ती परत वापरता यायला हवी. नखं गळालेल्या सिंहासारखं होऊन उपयोग नाही. हवी तर त्यांची धार कमी करा पण पाहिजे तेंव्हा पुन्हा धार करून घेता यायलाच हवी.
बायकांची अजून एक सवय म्हणजे कुणी मला नावं ठेवायला नकोत ही धारणा. त्यासाठी हा सुपरवुमन पणा. कुठल्याही क्षेत्रात काहीही कर्तृत्व न दाखवता सासू सासर्‍यांना आणि एकूणच आक्ख्या घराला आपल्या तालावर नाचवणार्‍या बायकाही असतातच. पण बहुतेक बायकांना (मी पण त्यात आहेच) मी कशी कामसू आणि सगळं सांभाळणारी हे दाखवायची हौस असते. त्यासाठी मग त्या करSSSSSSSSSSSSSत रहातात आणि मग आतल्या आत कुढत रहातात.
या गोष्टीत ते सासर्‍यांचं वागणं गार्गीसारखी बाई का सहन करतेय कळत नाही. हे मात्र मी वर्किंग बायकांमधे पाहिलेलं नाही.
दोन मुली असलेली वर्किंग बाई हवं तर घ्या नाहीतर उपाशी रहा हे तोंडानं नाही तर कृतीनं तरी दाखवेलच. नाहीतर मग सासरे पैसेवाले असतील बहुतेक. Happy
खरं तर असं सहन करणारे कित्येक पुरुषही असतात. मुलांसाठी सगळं सहन करणारे.
तुम्हाला काय हवंय आणि त्याबदल्यात तुम्ही काय देताय किंवा काय सोडताय हा साधा हिशोब आहे इथे पण. एकतर सरळ वही घेऊन बसा किंवा मग काहीतरी झोल करा. Happy

कथा, चर्चा वाचली. या कथेच्या निमित्ताने ही साधकबाधक चर्चा झाली हे बरेच झाले. जर डोक्यात प्रॉयोरिटीज क्लीयर असतील तर बर्‍याच गोष्टी सुकर होतात.

लग्न झाल्याझाल्या आतापर्यंत मनमोकळेपणे हुंदडणार्‍या तरूण मुलीने सासरघरच्या सगळ्या सगळ्या जबाबदार्‍या आपल्या मानून अंगावर घ्याव्यात आणि वर त्या कौशल्याने हाताळाव्यात, कोणाची मने दुखवू नयेत, स्वतःच्या आवडीनिवडींना मुरड घालावी, सासरघरचे नियम पाळावेत या-आणि-अशा अपेक्षा करणे जितके चुकीचे तितकेच या अवाजवी अपेक्षा पूर्ण करण्याकरता स्त्रीने धडपडणे चुकीचे. 'I also have only one life and I have every right to be happy' हे वाक्य स्त्रीयांनी सतत लक्षात ठेवावे.

'I also have only one life and I have every right to be happy' >> अगदी अगदी!

कथा आणि चर्चा वाचली. त्यावरून कवयत्री पद्मा (गोळे) यांची 'मी घरात आले', ही नुकतीच वाचलेली कविता आठवली...त्या कवितेतल्या या काही ओळी.....

मी घरात आले
उंबर्‍यावरचं माप सांडून
मी घरात आले,

सून झाले, बायको झाले
आई झाले, सासू झाले
माझी मला हरवून बसले

आता सोंगं पुरे झाली
सारी ओझी जड झाली
उतरून ठेवून आता तरी
माझी मला शोधू दे;
तुकडे तुकडे जमवू दे.
विशाल काही पुजू दे.
मोकळा श्वास घेऊ दे.
श्वास दिला, त्याचा ध्यास
घेत घेत जाऊ दे!
...........................पद्मा

संघमित्रा, मामी, भरत सगळ्यांच्याच पोस्ट मस्त.

'I also have only one life and I have every right to be happy' ---- हे वाक्य तर अगदी प्रत्येकक्षणी लक्षात ठेवण्याजोगे

कथा फार उत्तम आहे. बरोबर चित्राण केले आहे गार्गीचे. तिने ( किंवा मी ही) ते च केले असते. पोटात तुटले हे वाचुन.
पु.ले.शु.

'I also have only one life and I have every right to be happy' >>> मामी लाख मोलच वाक्य.....प्रत्येकाने प्रत्येकक्षणी लक्षात ठेवण्याजोगे Happy

बायकांची अजून एक सवय म्हणजे कुणी मला नावं ठेवायला नकोत ही धारणा. त्यासाठी हा सुपरवुमन पणा. कुठल्याही क्षेत्रात काहीही कर्तृत्व न दाखवता सासू सासर्‍यांना आणि एकूणच आक्ख्या घराला आपल्या तालावर नाचवणार्‍या बायकाही असतातच. पण बहुतेक बायकांना (मी पण त्यात आहेच) मी कशी कामसू आणि सगळं सांभाळणारी हे दाखवायची हौस असते. त्यासाठी मग त्या करSSSSSSSSSSSSSत रहातात आणि मग आतल्या आत कुढत रहातात.
या गोष्टीत ते सासर्‍यांचं वागणं गार्गीसारखी बाई का सहन करतेय कळत नाही. हे मात्र मी वर्किंग बायकांमधे पाहिलेलं नाही.
दोन मुली असलेली वर्किंग बाई हवं तर घ्या नाहीतर उपाशी रहा हे तोंडानं नाही तर कृतीनं तरी दाखवेलच. नाहीतर मग सासरे पैसेवाले असतील बहुतेक.
खरं तर असं सहन करणारे कित्येक पुरुषही असतात. मुलांसाठी सगळं सहन करणारे.
तुम्हाला काय हवंय आणि त्याबदल्यात तुम्ही काय देताय किंवा काय सोडताय हा साधा हिशोब आहे इथे पण. एकतर सरळ वही घेऊन बसा किंवा मग काहीतरी झोल करा.

>> २७ वेडिंग ड्रेसेस मुव्ही आठवला. गार्गीचे अमेरिकन व्हर्जन यात झाली आहे हेल. सर्वांसाठी चांगले म्हणावे म्हणुन ती त्यात धावपळ करते आणि मग मध्येच स्फोट होतो शेवटी तिला बहीण सुनावते की हे सर्व लोक तुझी जबाबदारी नाहीत. असे कुढत रहाण्यापेक्षा तेव्हाच सुनावत जा.
सासरे बुवांना म्हणायचेकी आज जरा उशीर झाला पाव आणि चहा घ्या.
नवरा चिडुन बोलला तर माझी आयडिया काही न बोलता फोन कट करायचा लगेच सॉरी चा फोन येईल पण नेहेमीच नाही असे वागायचे काही वेळा आपली खरीच चुक असते Happy

सायोला अनुमोदन.

पण हेच वास्तव आहे. किती पुरुष आप्ल्या आईवडिलांची काळजी घेतात? किती जण मुलांकडे लक्ष देतात? किती जण घरातल्या कामात हातभार लावतात. खूप कमी, खूपच कमी. आजकालचे शिकलेले पुरुष सुद्धा आई घरी असेल तर बायकोला मदत करत नाहीत, आई करते ना म्हणून.

मला एक नेहमी प्रश्न पडतो. पुरुषांचं हे वागणं दिसत असून बायका, नोकरी, करियर करणार्‍या बायका दुसर्‍या मुलासाठी तयार का होतात? एका मुलाला द्यायला वेळ नसतो, दुसर्‍याला कुठून देणार असता ह्या वेळ? का मुलांनी वाढायचं पाळणाघरात कारण आम्हाला लाईफ स्टाईल जगायची आहे? स्वतःचं घर हवं आहे - २-३-४ खोल्यांचं. आणि मुळात न॑वर्‍याची दादागिरी, अस व्हर्बल अब्युझ का सहन करतात ह्या नोकरी करणार्‍या बायका? मुलांची पूर्ण जबाबदारी एक वेळ ठीक आहे बायकांनी - आयांनी घेणं पण नवर्‍याच्या आगाऊ, आरडाओरडा करून स्वतःच महत्त्व वाढवणार्‍या आईवडिलांची जबाबदारी का घ्यायची?

का ह्या समाजात बायकांनी नेहमीच पड खायची?

Pages