फिरुनी पुन्हा

Submitted by शुभांगी. on 20 December, 2010 - 23:25

सोनुला तिने तापाच औषध दिल आणि मांडीवर घेवुन तिला झोप येइपर्यंत हलकेच थोपटत राहिली. तोंडाने अंगाईगीता ऐवजी मोठीचा अभ्यास, तिच्या मॅथ्समधल्या सम्स चालू होत्या. पुन्हा उद्याची तयारी आहेच तिच्या सकाळच्या शाळेची. तरी बर राहुलला रात्रीची शिफ्ट आहे नाहीतर सकाळी ४ वाजता उठायचं अगदी जीवावर येत. मनातले विचार झटकुन तिने सोनुला बेडवर टाकल. मोठीला झोपायला पिटाळल आणि पुन्हा ती स्वयपाकघरात आली. भराभर फ्रीजमधुन भाजी काढुन चिरुन ठेवली उद्या दुपारची आणि सकाळच्या डब्याची. कणीक तिंबुन ठेवली. सगळी झाकपाक करुन, लाईट बंद करुन ती बेडकडे वळली तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते.

अरेच्च्या! राहिल की बघायच, आज टीव्हीवर कुठला तरी सिंधु संकपाळांचा सिनेमा होता पण ह्या कामाच्या गडबडीत टीव्ही कुठे बघायला वेळ मिळावा? उद्या सकाळचे विचार डोक्यात घोळवत ती झोपेच्या अधीन झाली. हे एक बरय, झोप येण्यासाठी अजीबात कष्ट करावे लागत नाहीत. पाठ टेकली की झोप लागते. मधे कधीतरी सोनुच्या कण्हण्याने तिला जाग आली. उठुन तिला औषधाचा एक डोस देवुन ती झोपायला वळणार इतक्याच पहाटे पावणेपाचचा गजर वाजला.

आता कुठली झोप? उठुन चहाच आधण ठेवल. सासर्‍यांच्या बेडरुमवर टकटक केली. हॉलमधे जावुन टीव्ही बंद केला. कधीतरी रात्री उशिरा आल्यावर राहुल टीव्ही बघताबघताच झोपला होता. तिने त्याच्या अंगावरचे पांघरुण सारखे केले. तोंडात ब्रश आणि एका हातात झाडु घेवुन तिने केरवारे केले. चहा घेताघेता सासर्‍यांच्या सकाळच्या नाष्ट्याची तयारी व एकिकडे गॅसवर मोठीच्या डब्याची भाजी टाकली फोडणीला. सासर्‍यांनी चहा घेताघेता फर्मान सोडलच, अजुन अंघोळ नसेल तर मला नाष्टा नको.

गिझर लावल्यापासुन शॉवरखाली तासभर उभ राहण्याची इच्छा तिने परत एकदा मनामधेच दाबली व दोन तांबे घाईघाईत अंगावर घेवुन ती पुन्हा स्वयंपाक घराकडे वळली. मोठीचा डबा भरुन तिने सासर्‍यांसाठी कुकर लावला, पालकाची भाजी करुन ठेवली. आणि मोठीला उठवण्यासाठी बेडरुमकडे वळली.

"मम्मा, थोडा वेळ झोपु दे ना ग अजुन प्लीज"

"नाही पिल्ला, सहा वाजलेत आता बस येइल ग इतक्यात"

"खुप थंडी आहे ग, पाचच मिनिटे झोपते ना" अस म्हणुन ती परत रजईत गेली.

इथं थांबुन उपयोगच नव्हता. तिने स्वतःच्या कपाटातुन प्रोजेक्ट रिपोर्ट्स काढले जे तिने चार दिवसापासुन मेहनतीने केले होते. आज तिचं प्रेझेंटेशन होत कंपनीच्या सी ई ओंसमोर. तयारी झाली होती सगळी पण वेळेत पोचतोय की नाही ही एकच शंका होती.

परत एकदा मोठीला हलवुन आणि थोडस चिडुनच तिने उठवले. ती बिचारी आता निमुटपणे उठली स्वतःच्या चिमुकल्या हातांनी एवढ्या मोठ्या रजईची वेडीवाकडी घडी घातली व बाथरुमकडे वळली. साडेसहा वाजले तरी मोठी अजुन बाथरुममधुन बाहेर आली नाही म्हणुन तिने दारावर दोन तीन थापा मारल्या हलकेच दार ढकलले तर बाईसाहेब गरम पाण्याखाली निवांत झोपल्या होत्या. सकाळची थंडी तिला काही गरम पाण्यातुन बाहेर येवु देत नव्हती. कसतरी तिच्या मागे लागुन तिने मोठीला शाळेसाठी तयार केल व गेटजवळ सोडुन आली.

बापरे तोपर्यंत ७ वाजले होते आता १५ मिनिटात स्वत:चे आवरुन छोटीला पाळणाघरात सोडुन तिला बसस्टॉप गाठायचा होता. सकाळी कितीही लवकर उठा वेळच पुरत नाही अस पुटपुटत तिने भराभर स्वतःच आवरल एका हातात स्वत:ची पर्स प्रोजेक्टची फाईल दुसर्‍या हातात छोटीची बास्केट, कडेवर सोनु असा लवाजमा घेवुन ती गाडीकडे पार्कींगमधे आली. ओह थंडीमुळे हल्ली गाडी लवकर सुरु होत नाही. तिने चालतच देशपांडे काकुंच घर गाठल. तोपर्यंत कंपनीची बस स्वारगेटवरुन निघाल्याचा मिस कॉल येवुन गेला होता. तिने दारातुनच सोनुला देशपांडे काकुंच्या हवाली केल. ती बिचारी झोपेतच होती आणि थोडी ग्लानीतसुद्धा.

काय राहिल, काय विसरल याचा विचार करायला सुद्धा वेळ नव्हता. तशीच घाईघाईत गाडीत शिरली. ड्रायव्हरने आज परत एकदा रागाने बघितल. पण त्याच्याकडे लक्ष देण तिला महत्वाच वाटल नाही. लगेच शेजारचीने तिच्या सासुच्या कंप्लेंटस करायला सुरवात केली. तिने हसुन प्रतिसाद दिला. थोड समजावल. डोक गाडीच्या सीटवर टेकताच डोळे मिटले व आजच्या प्रोजेक्टची रिव्हीजन केली.

हा एकमेव अर्धा तासाचा वेळ तिचा हक्काचा होता. या अर्ध्या तासात ती बर्‍याचदा मुलींचा, स्वत:चा, घराचा, भविष्याचा विचार करायची. स्वप्न रंगवायची प्रोजेक्ट लीड करण्याची. आजपर्यंत खुप संधी आल्या पण काही ना काही कारणाने तिला पाणी सोडाव लागल त्यावर. पण आता नाही यावेळी नाही हार पत्करायची. मनाची पक्की तयारी झाली होती तिच्या. आयुष्यभराच स्वप्न पुर्ण व्हायची वेळ आल्यावर माघारी फिरणार नव्हती ती. राहुलशी बोलुन झाल होत, तो तयारही झाला होता. एक सुस्कारा सोडला तिन विश्वासाने.

शेजारणीने हळुच धक्का देवुन उठवल्यावर तिने डोळे उघडले पटकन बसमधुन उतरली. देसाई सरांना भेटायलाच हव या प्रोजेक्टमधे खुप मदत केलीय त्यांनी. देसाई शांतपणे चहा घेत होते. तिच्या चेहर्‍यावरची उत्सुकता बघुन त्यांनी तिला डोळ्यांनीच आश्वस्त केल. ती हसली व कॉन्फरंसकडे वळली.

खरतर पहिल प्रेझेंटेशन नव्हत तिच पण हुरुप आणि उत्साह पहिल्यासारखाच होता. आजपर्यंत आत्मविश्वासाने डिझाईन केलेली सगळी प्रोजेक्टस कुणीतरी दुसर्‍यानेच एक्झिक्युट केली होती. पण यावेळी तीच एक्झिक्युट करणार असं तिन देसाईंना सांगीतल होत. त्यांना कोण अभिमान वाटला होता तिचा. त्यांची खुप आवडती विद्यार्थिनी होती ती. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा जपणारी.

खुप छान प्रेझेंट केले तिने रिपोर्टस स्लाईडसच्या सहाय्याने स्वतःच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने. देसाईसरांची कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर तिने मोबाईल पाहिला. बापरे राहुलचे ६ मिसकॉल. तिने बाहेर येवुन लगेच त्याला कॉल केला.

"मुर्ख कुठे तरफडली होतीस इतका वेळ?? केव्हाचा फोन करतोय मी"

"राहुल अरे ऑफिसात आहे ना मी"

"माहितिये, खुर्चीवर बसुन कॉम्पवर बडवायला काय अक्कल लागते ग??"

"काय झालय?" तिने स्वतःचा अपमान गिळत विचारल.

"अरे वा, आहे की आठवण घराची" तो कुत्सितपणे म्हणाला.

"फोन का केला होतास?"

"सोनुला ताप असताना तू गेलीसच का ऑफिसला?? तिला कोण सांभाळणार??"

"अरे मी दिलय औषध तिला"

"आणि देशपांडे काकुंना कोण सांगणार?? त्यांचा दोनदा फोन येवुन गेला" राहुलने रागाने फोन आपटला.

तिला आठवल काय विसरल होत ते, प्रोजेक्टच्या नादात आणि सकाळच्या घाईत ती देशपांडेकाकुंना सोनुच्या तापाच सांगायचच विसरली होती. तिने लागलिच त्यांना फोन केला. सोनुच्या तब्येतीची चौकशी केली. सोनु रडुन झोपली होती. मोठीच्या शाळेतुन प्रोजेक्ट पुर्ण न केल्याने नोटीस आली होती. तिने देशपांडे काकुंना हे राहुलला न सांगण्याचे कबुल करुन घेवुन फोन ठेवला.

राहुलचा परत एकदा फोन आला.

"हातातल काम सोडुन लगेच घरी ये, बाबांचा पाय मुरगाळला आहे आणि मला आता सेकंड शिफ्टला जायच आहे."

"पण राहुल" पुढच ऐकायला राहुल लाईनवरच नव्हता.

प्रोजेक्ट मिळाल्याचा आनंद, देसाईसरांची पाठीवरची थाप, इतरांनी केलेल कौतुक, मुलीच आजारपण, नवर्‍याचा त्रागा, मैत्रीणीची सासु, मोठीचा शाळेतला प्रोजेक्ट सगळ डोक्यात मोठा पिंगा धरुन नाचायला लागल.

का सगळ मी सहन करायच?? मुली काय माझ्या एकटीच्याच का?? कुणी कुणी मदत करत नाही. किती किती फ्रंटवर लढायच?? नवरा म्हणुन तो करतो ते कष्ट मग मी काय करते?? मुलींचा अभ्यास मीच घ्यायचा का? सगळ्यांची दुखणी खुपणी मीच करायची का? घर आणि संसार फक्त माझाच आहे का?? मला माझा विचार करायचा अधिकारच नाही का?? मी आकाशात भरारी मारायची नाहीच का? मला कायम दुसर्‍यांसाठीच जगाव लागणार का?

कितीतरी प्रश्न आणि फक्त प्रश्न उत्तर माहित असलेले नसलेले किंवा ज्यांच्या उत्तरांची कवाड आपणच बंद केलेले. न संपणारे प्रश्न.

तिने मनाचा निश्चय केला यासगळ्यातुन बाहेर पडण्याचा, स्वत:च आयुष्य परत एकदा स्वतःच्या पद्धतिने जगण्याचा. ती देसाईसरांच्या केबीनकडे वळाली.

घरी गेल्यावर सासर्‍यांच्या रुममधे डोकावली. ते कण्हत होते 'आई ग, फार दुखतय ग'. तिच्यातली आई लगेच जागी झाली. तिने त्यांना हाताला धरुन उठवल दवाखान्यात नेल. तिथुनच देशपांडे काकुंना फोन करुन उशिरा येतेय थोडी, तुमच्याकडेच दोघींना खिचडी खायला घाला अस सांगीतल. सासर्‍यांना घेवुन घरी यायला बराच उशिर झाला. मग त्यांना गरम गरम उपमा करुन दिला खायला व ती मुलींना आणायला देशपांडे काकुंच्या पाळणाघराकडे गेली.

मुलिंचे कोमेजले चेहरे पाहुन पोटात तुटल तिच्या. सोनुला जवळ घेताना तिने मोठीशी तिच्या प्रोजेक्टबद्दल डिस्कस केल. तिची कळी खुलली. आई पुन्हा एकदा वाट्याला आली होती त्यांच्या १२ तासांनंतर.

घरी आल्यावर तिने सोनुसाठी डॉ. मानकरांच्या हॉस्पिटलमधे फोन करुन दुसर्‍या दिवशीची अपॉईंट्मेंट घेतली. सोनुला परत औषध दिल. तिच्या डोक्यातुन हात फिरवताना तिला सुद्धा दिवसभराच्या थकव्याने झोप लागली.

पहाटे कधीतरी राहुलने तिच्या मानेखाली उशी दिली, अंगावर पांघरुण टाकल, सोनुला गादीवर ठेवल. तिच्या कपाळावर येणार्‍या केसांना बाजुला सारुन तो हलकेच पुटपुटला,

"मी खुप वाईट आहे ना, बट स्टील आय लव्ह यु गार्गी"

हसली ती सुद्धा आणि बर्‍याच गोष्टींची आखणी केली मनातल्या मनात, मोठीच्या प्रोजेक्टला लागणारा मायक्रोसॉफ्ट वर्ड्चा स्क्रीनशॉट, सासर्‍यांच इंजेक्शन, सोनुची अपॉईंटमेंट, राहुलचा आवडता बदामाचा शिरा आणि देसाई सरांना प्रोजेक्ट एक्झिक्युट करत नसल्याचा इमेल.

गुलमोहर: 

Best....

छान वर्णन्...मला वपुंची "धर्म" ही कथा आठवली...असच् एका स्त्रीचं life चितारलं आहे त्यात्..

बाकी तुमची कथा छानच् आहे...फक्तं घाई करु नका...छान मस्त सावकाशपणे फुलवायची कथा....

especially यासारख्यां विषयांमध्ये वाचनीयता खूप लागते...आणि तुम्ही right track वर आहात...

keep it up...all the best Happy

लिहिण्याची शैली आवडली पण तेच ते टिपीकल बायकांनी सुपव वुमन असल्याचा आव आणत सगळ्यांच्या खस्ता खायच्या, नवर्‍याने केलेले अपमान ऐकून घ्यायचे, एकदा सॉरी म्हटलं की विसरुन जायचं, स्वतःचं करियर कायमच बॅक सीटवर टाकयचं वगैरे अजिबातच आवडलं नाही.

अप्रतिम. मनाला एकदम भिड्ली. थोडी अजुन खुलवता आली असती. गार्गी च्या मनातील भावनांचे युद्ध दाखवता आले असते. राहुल ला तिच्या स्वत्वाची जाणिव करवुन देता आली असती. संसार एकाचा नसतो, दोघानी एकमेकांना सांभाळायचे असते.

सायो ला अनुमोदन. कथा छान आहे आणि लिहिण्याची शैलीही. तरी अशा टीपिकल आधुनिक स्त्री रडकथा वाचून वाचून कंटाळा आलाय.

कथा अजून फुलवता आली असती,ह्याला अनुमोदन.
राहुल अज्जिबात नाही आवडला :रागः .....अर्थात असले खरे राहुल अगदी जवळच्या घरांमध्ये बघितले आहेत. प्रत्येकवेळी चिड्चिड झालीये. माझा प्रत्यक्ष काही संबंध नसताना.
आणि ते आंघोळ झाली नसेल तर मला नाष्टा नको म्हणणारे सासरे सुद्धा पाहिलेत.:रागः
सगळी कथा वाचल्यावर खरंच सुन्नता आली. अजूनही बर्‍याच बायका पिचतायेत अशा. ज्यांनी नाकारलं त्या मोकळ्या झाल्या !

धन्स सगळ्यांना.
परिक्षीत, तुमच्या सुचनांचा आदर आहे. पुढच्यावेळी जरुन लक्षात ठेवीन.
सायो, डेलिया, स्वाती२, चैत्रगंधा - तुमच्या सगळ्यांशी सहमत. कदाचित मी गार्गी असते तर चित्र वेगळ असत.
पण कथेतील गार्गी किंबहुला बर्‍याच स्त्रिया मी बघितल्यात आसपास ज्यांना सगळं कळत असत पण त्यातुन बाहेर पडायची तयारी होत नाही मनाची. मनात चाललेल्या द्वंद्वात नेहमी भावनिकता, मुलांचा निरागसपणा, त्यांच अवलंबुन असण या गोष्टी बाजी मारुन जातात.
असो.

मस्त

कथा आवडली. शैली चांगली आहे लिहायची. सायो, डेलिया म्हणताहेत ते जरी बरोबर असलं तरी अश्या गार्गी आहेतच समाजात.

शुभांगी, सगळं सगळं आवडलं... "माहितिये, खुर्चीवर बसुन कॉम्पवर बडवायला काय अक्कल लागते ग??" आणि देसाई सरांना प्रोजेक्ट एक्झिक्युट करत नसल्याचा इमेल. ह्या दोन गोष्टी सोडून.

पुलेशु.

माझापण हाच अनुभव आहे. मनातिल मि आणि प्रत्य़क्शातलि मि ह्या दोघिन्मधील अन्तर कधि कमी होणार? हा dilema मनात थेउनच जगत रहायच का पूर्ण आयुश्य ?

मला आवडली कथा.

ज्याना सगळे सहज मिळत गेले , सगळे अगदी व्यवस्थित होत गेले त्याना नायिका न आवडणे किंवा ही "रडकथा" वाटणे साहजिक आहे पण दुर्दैवाने भारतात तरी हे वास्तव आहे आणि इतक्या वर्षानंतरही यात काही फरक पडलेला नाही.

शुभांगी कथा आवडली पण अजूनही स्त्री कडून अशाच अपेक्षा आहेत हे तितकेसे पटले नाही. राहुलला जरा समंजस दाखवायला हवे होते.

ज्याना सगळे सहज मिळत गेले , सगळे अगदी व्यवस्थित होत गेले त्याना नायिका न आवडणे किंवा ही "रडकथा" वाटणे साहजिक आहे पण दुर्दैवाने भारतात तरी हे वास्तव आहे आणि इतक्या वर्षानंतरही यात काही फरक पडलेला नाही.>>>>>>>>>>>> भारतात हे वास्तव आहे हेच दुर्दैव आहे.
आणि फारच कमी नशीबवान बायकांना सगळं व्यवस्थित मिळतं,बाकिच्यांना झगडावं लागतं सगळं व्यवस्थित करण्यासाठी.

खुप छान...माझापण हाच अनुभव आहे. एक दिवस घरुन काम करते. तर नवरा म्हणतो, आज घरीच आहेस तर चान्गल काहीतरी खायला कर आणि इतरही कामाच्या अपेक्शा असतात.

सायोला अनुमोदन (जरी अशा गार्गी आजुबाजुला बघितल्या आहेत तरी) .

ज्याना सगळे सहज मिळत गेले , सगळे अगदी व्यवस्थित होत गेले त्याना नायिका न आवडणे किंवा ही "रडकथा" वाटणे साहजिक आहे >>> कथा न आवडलेल्या वाचकांविषयी हे गृहित धरायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ? तुम्हाला कथा आवडली न आवडली तर तसे लिहा. इतरांना का नाही आवडली ह्याची कारणमिमांसा कशासाठी ?
(हे लिहितेय कारण मला पण सायो, स्वाती आणि इतर जणींसारखेच वाटले.)

तुम्हाला कथा आवडली न आवडली तर तसे लिहा. इतरांना का नाही आवडली ह्याची कारणमिमांसा कशासाठी ?
>>

सिंडरेला,

मला जे काय लिहायचे आहे ते मी लिहितोच. त्यासाठी मला तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही.
मी काय लिहावे आणि काय लिहु नये हे सांगायचा अधिकार मीतरी तुम्हाला दिला नाही. कृपया यापुढे मला उद्देशुन नाही लिहिलेत तर बरे! मला तुमच्याशी वाद्/संवाद करण्याची इच्छा नाही.

सायोला अनुमोदन..
सगळया गोष्टी आरामात मिळतात हा प्रतिक्रियांमधला सूर पटला नाही.. आपल्या प्रायोरिटीवर असतं..
चुकलं तर सांगायचा अधिकार नवर्‍याकडे(स्पाऊसकडे) नक्कीच आहे - पण गाढवात काढायचा अजिबात नाही.
जर कुणी तसं करत असेल तर we have to put our foot down..If we dont do that तर कथेच्या नायिकेसारखं होतं...

सायोशी सहमत. सुपरवुमनगिरीचे तेच ते तेच ते प्रसंग असे वाटले वाचून.

अश्या गार्गी नसतात असे मी म्हणत नाही. पण नसाव्यात असे म्हणते आहे.

मला स्वतःला गार्गी आवडली नाही याचे कारण मला सगळे आयते मिळाले हे निश्चितच नाही. माझ्या स्वतःच्या आयुष्यात मला कुठलीच गोष्ट न झगडता मिळाली नाहिये- अगदी माझ्या नवर्‍याबरोबर एकत्र रहाणे, माझे स्टे अ‍ॅट होम मॉम असणे, माझ्या कुटुंबाची आर्थिक घडी बसवणे यासाठी मलाही झगडावे लागले.
मला गार्गी आवडली नाही याचे कारण-
ज्या मुलींसाठी गार्गी छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी मन मारत जगतेय त्या मुलींसाठी ती काय चित्र उभे करतेय. कळत-नकळत मुलांच्या वागण्यावर घरातल्या माणसांच्या वर्तनाचा परिणाम होत असतो. तसेच असे मन मारुन जगणे तिच्या स्वास्थ्यासाठीही योग्य नाही. उद्या ऑफिसमधे आख्ख्या डिपार्टमेंटची सगळी कामे तुमच्या एकट्यावर लादली गेली तर तुम्हाला किती काळ झेपणार आहे? मग तोच न्याय संसारासाठी का नाही लावायचा. नवर्‍याला, सासर्‍यांना समजत नसेल तर त्यांच्याशी चर्चा करुन उपाय शोधायला हवा. वेळ पडल्यास मध्यस्त म्हणून फॅमिली काउंसेलरची मदत घ्यावी. बाहेर प्रोजेक्ट लिड करण्याइतपत कुवत असलेल्या गार्गीचे कुठलाच प्रयत्न न करता पड खाणे मलातरी खटकले. अर्थात हे माझे मत.

Pages