जित्याची खोड

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

जित्याची खोड
लमाल - भांडण - ११ डिसेंबर २०१०

"भांडणं अगदी पाचव्या वर्षापासुन जणुकाही माझ्या पाचवीलाच पुजली होती. आजुबाजुच्या मुलांबरोबर ट्रक सारख्या खेळण्यांवरुन, बगीच्यातील घसरगुंडी वापरण्यावरुन, आणि तत्सम इतर कारणांवरुन. जसा थोडा मोठा झालो आणि शाळेत जाऊ लागलो तसा इतर प्रकारच्या भांडणांमध्ये ओढल्या जाऊ लागलो. आतापर्यंतची भांडणे भौतीक पातळीवर असायची. शाळेतील टग्यांशी बरोबरी करायची शक्यता नसल्याने त्यांनी केलेल्या खोड्यांचा राग घरच्यांवर काढल्या जायचा."

येवढे वाचुन मी जरा थबकलो. तशी त्याची पत्रे असत पॉल एअरडीश (Paul Erdos) च्या पत्रांसारखी, म्हणजे तुमच्या माझ्या प्रमाणे सुरुवातीचे 'काय, कसे आहात' वगैरे पोकळ शब्द वगळणारी, पण या माझ्या गणितज्ञ मित्राच्या standard नुसार देखिल सुरुवात जरा विचीत्र होती. मी पुढे वाचु लागलो.

"भरपुर अवांतर वाचनामुळे थोडी शिंगे फुटली होती, ती शाळेत परजल्या जात - गणिते मधल्या पायऱ्या सोडुन करणे, निराळ्या पद्धतीने करणे ईत्यादी. मग त्यावरुन कधिकधी गुरुजनांशी २-४ शब्दांची देवाण-घेवाण. पण या जलदप्रगतीमुळे एक-दोन वर्गांवरुन मात्र उड्या मारता आल्या. कॉलेज देखिल एक वर्ष आधीच संपविले. चांगल्या प्रबंधामुळे विद्यापीठात हुद्दा पण वरचा मिळाला - त्यामुळे पण काही लोकांचा रोष पत्करला व नंतर काहि शितयुद्धांना सामोरे जावे लागले."

"तिथेच आपण भेटलो." हे वाक्य वाचुन आधिच्या माझ्या शंकेवर शिक्कामोर्तब झाले. चक्क वैयक्तिक उल्लेख? नक्कीच काहितरी भानगड आहे.

"भांडणे, युद्धे सुरुच होती, पातळी बदलली होती. वैज्ञानीक प्रबंधांवर पंचांशी व वैज्ञानीक नियतकालीकांच्या संपादकांशी व इतर वैज्ञानिकांशी विविध प्रमेयांवरुन. पण सत्यशोधनात ही विघ्ने नगण्य वाटायची. The show must go on. तुला आठवतय ग्योडेल समजावुन घेतांना आपल्या किती चर्चा आणि वाद झाले होते? कोणत्याही आणि कितीही गृहितिकांवर आधारलेली प्रणाली अपुर्णच असते. सत्याला गणितात पकडता येत नाही हे तेंव्हाच उमगले होते."

"पण आपण अमर होतो. भाषांबद्दल, पेंटीगसारख्या अमुर्त विषयांबद्दल हिरिरीने बोलायचो, भांडायचो. खरे स्वारस्य होते अर्थातच आपापल्या विषयांमधील संशोधनात. त्यात प्रगती होत होती. एक एक पाऊल पुढे पडत होते. पण आधी जे विश्वाच्या अनंत, अमर्याद असण्याबद्दल सहजी बोलायचो त्याची प्रचिती स्वत:च्या संशोधनातुनच येऊ लागली. वीश्व एका मोट्ठ्या कांद्यासारखे भासु लागले. फरक येवढाच की कितिही पाकळ्या भेदुन बाहेर पडायचा प्रयत्न केला तरी अजुन आहेतच. आपल्या ऋषी-मुनिंना हे म्हणे आधीच जाणवले होते. म्हणुन त्यांनी मोर्चा आत वळवला. बाहेर पडता नाही येत तर थेट गर्भापर्यंत पोचु या. त्यांचे अर्थातच Gedankenbericht किंवा मनाचे प्रयोग होते. मनात आणले की काहिही (मनातल्या मनात) करता येते. तो माझा मार्ग नव्हे. अतिउच्च उर्जेच्या भौतिकशास्त्राच्या शाखेने दाखवले आहेच की जितकी जास्त उर्जा तुम्ही हाताळाल तितक्या खोल जाणाऱ्या पातळ्या तुम्हाला सापडतील. इतक्यातच LHC (Large Hadron Collidor) ने क्वार्क ग्लुअॉन प्लाझ्मा बनवुन बिग बॅंग च्या जवळ नेल्याचा भास निर्माण केला. पण अमुर्त शुन्य अजुन अफाट दूर आहे. त्या छोट्या-छोट्या विश्वांमध्ये Mandelbrot ला लाजवतील अशी अगणीत विश्वे असतात."

"माझी पत्रे वाचायची सवय असुनही तुला हे माहित असतांना मी पुन्हा का सांगतोय हा प्रश्न नक्कीच पडला असणार. कदाचीत तु तुझ्याच प्रश्नाचे उत्तर देखील ताडले असणार."
मी मुकपणे पुढे वाचत राहिलो.

"तुम्ही धुंडाळु शकता त्यापेक्षा विश्व जास्त वेगाने बदलते, प्रसरण पावते. कधिकधी आपण आहोत त्याच पाकळीवर बागडणे शहाणपणाचे ठरते. डाओइस्ट आणि चार्वाकपंथी तेच सांगत आले आहेत. पण तोही माझा मार्ग नाही. प्रत्यक्षात रमणे जरी मला आवडत असले तरी ते म्हणतात तशी दिशाशुन्यता मला मान्य नाही."

"पण जिवन सिमीत आहे. निदान आपल्यातला 'मी'-पणा तरी. मोठे प्रश्न अजुनच मोठे बनत राहतात. त्यांच्याबाबत असहाय्य वाटु लागते. हिरिरी नाहिशी होऊ लागते. नाही, असहाय्यता योग्य शब्द नाही. सत्य उमगु लागते. ('खरे' सत्य?) ग्योडेल तुमच्याकडे पाहुन हसत असतो. यावर मात करण्याचा एकच मार्ग उरतो. अमार्ग खरेतर."

"माझा जिवनापरोक्ष भौतीक विश्वावर विश्वास नाही, आणि परविश्व जर असेलच तर तुम्ही तिथे काही नेऊ शकत नाही. उल्लेखनीय अशी माझ्याजवळ भौतीक संपत्ती नव्हतीच. थोडीफार जी होती ती मी Institute of Math ला दान केली आहे. गणीतच सर्वोत्तम पळवाट आहे. माझे विचार, तर्क, त्यांच्या गुंतागुंतीसहित, जे काही मी लिहु किंवा खरडु शकलो नाही, ते माझ्याबरोबर जातील."

मधल्या इयत्तांवरुन उडी मारून तो पूर्वी थेट पुढील इयत्तेत जात असे. आता आयुष्यातून थेट अनंताकडे त्याने काळझेप घेतली होती.

विषय: 
प्रकार: 

कोणत्याही आणि कितीही गृहितिकांवर आधारलेली प्रणाली अपुर्णच असते. सत्याला गणितात पकडता येत नाही हे तेंव्हाच उमगले होते." >>>
तुम्ही धुंडाळु शकता त्यापेक्षा विश्व जास्त वेगाने बदलते, प्रसरण पावते. कधिकधी आपण आहोत त्याच पाकळीवर बागडणे शहाणपणाचे ठरते. डाओइस्ट आणि चार्वाकपंथी तेच सांगत आले आहेत. >>>

खल्लास आहे हे.