मी काय करायला हव ? हव होत ?

Submitted by विस्मया on 17 December, 2010 - 15:16

माझं काय चुकलं अस न म्हणण्याच कारण म्हणजे माझ काय चुकलय ते मला चांगलच माहीत आहे. त्याबद्दल संबंधितांकडे मी दिलगिरी देखील व्यक्त केली. पण मला आलेला अनुभव इतका विचित्र आणि मनःस्ताप देणारा ठरला कि तो शेअर करावासा वाटला..

तर याची सुरूवात माझ्या कथेमुळं झाली. तीच ती कॉस्चुम !!!
पूर्वी मी ऑर्कूटवर ब-याच कम्युनिटीज जॉईन केलेल्या होत्या. त्यात कवितांच्या अर्थातच जास्त होत्या. या कम्युनिटीमधे एक वेगळ्या पद्धतीच्या कविता लिहीणारा कवी होता. क्रिप्टीक कोड्यासारख्या अशा त्या कविता असत. मधे काही काळ चमकून तो नंतर दिसेनासा झाला. नंतर तो विस्मरणातही गेला. आपण त्याच नाव तापेश ठेवूयात. इतर कुठही असतात तसे इथेही ग्रुप्स, सबग्रुप्स होतेच. माझ आपल . पूर्वीपासून थोडंसं दुरूनच हाय हॅलो करण्याच धोरण होत. ते चूक कि बरोबर हे मला सांगता नाही येणार. पण आहे तो व्याप सांभाळण यालाच प्राधान्यक्रम द्यायच ठरवल्यान नवा व्याप वाढवून घेऊ नये असा माझा विचार होता.

काही महिन्यांपूर्वी माझ ऑर्कूट अकाऊंट मी डिलीट केल. पण ब-याच जणांच्या आग्रहास्तव काही लिखाण केल तर त्यांना पाठवायच मी मान्य केल होत. प्रत्येकाला वेगवेगळी इमेल पाठवण्यापेक्षा एकाच वेळी इमेल केली तर बरेचसे कष्ट वाचतील असा सूज्ञ विचार मी केला. इनबॉक्स चेक करताना मला एका कम्युनिटीच्या संगीतबद्ध कवितांच्या सीडीच्या अनावरणाच्या आमंत्रणाचा ईमेल दिसला ज्यात सर्वांचे इमेल अ‍ॅड्रेसेस दिलेले होते. फारसा विचार न करता ते अ‍ॅड्रेस वापरून मी माझी कॉस्च्युम ही कथा जुन्या दोस्तांना पाठवली. यात आपला तापेशही होता. हा पूर्वी माझ्या फ्रेंडलिस्ट मधे देखील होता.

एक दिवस माझ्या या मेलला उत्तर आल्याच मला दिसून आल. खर म्हणजे मलाच उशीर झाला होता पहायला. उत्तर वाचून चांगलाच धक्का बसला.

नमस्कार,

मैत्रीयी भागवत सरळ मुख्य मुद्यावर येतो.मी तुम्हाला ओळखत नाही व तुम्हीही मला ओळखत नाहीत.त्यामुळे तुम्ही मला कविता वैगरे काही पाठवू नका."---------कम्युनिटी" आणि तिथल्या लोकांशी माझा (आमचा) काहीही संबंध नाही.तुमच्या कविता वाचण्यात मला(आम्हाला) काहीही रस नाही.कृपया कविता सेंड करु नये.(हे कायम लक्षात राहू द्या.)

मला काही सुचेनाच. एखाद्याला न विचारता मेल पाठवण ही चूक माझ्याकडून नक्कीच झाली होती. त्याची प्रतिक्रिया चूक कि बरोबर हा माझ्या दॄष्टीने प्रश्नच नव्हता. दुर्लक्ष करून चालण्यासारख नव्हत कारण चूक माझी होती त्यामुळ दिलगिरी व्यक्त करण जरूरीच आहे अस मला वाटल. त्याला राग कशाचा आहे हे मात्र स्पष्ट होत नव्हत. कविता पाठवल्याचा हा राग होता कि कुणाशी संबंधित आहे याचा तो राग होता हे समजत नव्हत. त्याचा तो संशय देखील उगाचच होता.

मी त्याला उत्तर लिहील.

नमस्कार,

माझा --------- कम्युनिटीशीच काय ऑर्कूटशी देखील कसलाच संबंध नाही. नेटवरच्या कुठल्याही ग्रूपशी संबंध नाही. कथा आवडली नाही तर स्पष्ट सांगितले तरी हरकत नाही. मेलमधे कथादेखील नको असल्यास त्या मताचा नक्कीच आदर केला जाईल.

ता.क. : मी कथा पाठवली होती. कविता पाठवलेली नाही. तसदीबद्दल क्षमस्व

या मेलला पुन्हा रिप्लाय आला. हा रिप्लाय मात्र त-हेवाईक होता. तो कॉपी पेस्ट करतेय.

प्रश्न कथा किंवा कवितेचा नाही तर ----- कम्युनिटिशी आहे आणि तिथल्या लोका-----. तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड आहात हे तुम्हाला सुध्दा माहिती आहे
> आणि मला सुध्दा माहिती आहे.
>
> जर तुमचा आणि त्यांचा काही संबंध
> नाही तर माझा ई-मेल आयडी तुमच्या कडे कसा आला?
> ईथे प्रश्न कथा किंवा कवितेचा नाही तर तिथे असलेल्या (हलकट) लोकांचा आहे. ज्या व्यक्तींचे संबंध त्या लोकांशी आहेत त्यांनी माझ्याशी संबंध जोडू
> नयेत.
>
> माझा ई-मेल आयडी तुमच्याकडे कसा आला? तुम्ही मला कश्याकाय
> ओळखता?

> आणि तुमचा संबंध ------ कम्युनिटी किंवा ------ ह्याच्यांशी नाही
> ह्यावर माझा विश्वास नाही.
>
> बाकी कथा
> चांगली होती.कथेला कवितेचं स्वरूप देऊ शकता एक उत्तम कविता तयार
> होईल.

पुन्हा पुन्हा तेच आरोप आणि सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडून केलेले. ते ही दिलगिरी व्यक्त केल्यावर. ज्या लोकांशी या साहेबांचं काही वाजलेल असाव त्यांच्याशी माझा कसलाच संबंध नाही. कदाचित त्यांच्याकडून वितरीत होणा-या काही नियतकालिकांकडे त्यांचा रोख असावा. या मेल वरून ही व्यक्ती पराभूत मानसिकतेतून जात असावी हे स्पष्ट होत होत. ही वेळ खर तर दुर्लक्ष करण्याची होती. पण एकेकाळी इतक्या चांगल्या कविता लिहीणारा तापेश असे आरोप का करतो हे ही समजत नव्हत. त्याच्या भाषेचा मला चांगलाच त्रास होत होता. मी पुन्हा रिप्लाय दिला.....

> मूळ
> विषय आपल्या परवानगीशिवाय मेल पाठवल्याचा होता ज्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त
> केलेली
> आहे. पुन्हा करत आहे. यापुढे माझे संबंध कुणाशी जोडत बसू नये आणि विनाकारण आरोप
> करू
> नयेत ही नम्र विनंती.
>
> नाही तर माझा ई-मेल आयडी तुमच्या कडे कसा आला?
> या प्रश्नाच उत्तर देण माझ कर्तव्य आहे. अनेक जणांना पाठवलेले मेल असतात त्यातून ते कॉपी पेस्ट केलेल आहे. तुमची मेल उघडून पाहू शकता.
>
आपल्याशी
> सर्व प्रकारचा पत्रव्यवहार थांबवण्यात येत आहे.

मला अपेक्षाही नव्हती कि या मेललाही उत्तर येईल.... पण ते आल. आणि चांगले दोन दोन ईमेल इनबॉक्स मधे येऊन पडलेले.

पहिला..

नमस्कार,

ही अशक्यातली अशक्य गोष्ट आहे की तुम्हाला माझा ई-मेल आयडी सहज मिळाला.

किंवा तुम्ही माझा ई-मेल आयडी कॉपी पेस्ट करुन घेतलात.

हा तुमचा वैयक्तीक प्रश्न आहे की समोरच्या व्यक्तिशी खर बोलायच का खोटं बोलायच.

पत्र व्यवहार थांबवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

दुसरा..

आणि हो एक गोष्ट सांगायची राहिलीच तुम्हाला की (संबंध) ह्या शब्दाचा अर्थ फार वेगळ्या पध्दतीने लावलात.(तुमची आकलन शक्ती कळाली मला).

मी आता काय करायला हव ? पत्रव्यवहार तर थांबवलेला आहे. पण केवळ संशयावरून एखादी व्यक्ती इतक्या खालच्या थराला कशी जाऊ शकते हे सारखं मनात येतय. समोरच्याच्या सभ्यतेच्या मर्यादा म्हणजे त्याचा दुबळेपणा असा अर्थ या व्यक्ती काढत असाव्यात का ?

मी उत्तर द्यायला हव का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या व्यक्तीचं तोंड कधी बघितलं नाही त्याला उत्तर द्यायची गरजच काय ? मनस्ताप करुन घेणे किंवा इथे येऊन आता काय करु विचारणे तर खूप पुढची गोष्ट आहे. इगनोअर करा.

सिंडरेलाला अनुमोदन. तुम्ही त्याला पुन्हा उत्तर देणार, त्यावर तो माणुस परत आरोप करणार, हेच चालू राहील. त्यापेक्षा त्याचा आयडी डिलीट करा, ब्लॉकही करा नी विसरुन जा.

असल्या मानसिकतेचे लोक मूर्ख असतात किंवा कसलातरी बेसिक प्रॉब्लेम असतो...
त्याला बहुतेक भांडायची खुमखुमी असेल म्हणूच तुमच्याकडून पत्रव्यवहार थांबवल्यावर त्याने इतक्या घाणेरड्या भाषेत उत्तर दिले...सरळ त्याचा ID ब्लॉक करून टाका...उगाच मूर्खाच्या नादी लागू नये...त्याच्या पातळीवर न उतरलेले बरे...खासकरून कधीही त्याचे तोंड पाहावे लागणार नाही तर उगाच का डोक्याला शीण करून घ्या.

तापेश नावाच्या माणसाचा एवढा ताप करुन घेउ नका, तो तापला तर तापु दे!
काही लोक आणि मेल्स एवढी महत्वाची नसतात. तुम्हीच म्हणालात ना तुम्हाला व्याप वाढवायचा नाहीये.

शिल्पाला अनुमोदन ,
भांडणाची खुमखुमी असलेल्या मुर्ख माणसांच्या नादी अजिबात लागु नये , त्रास आपल्याला होतो. सरळ दुर्लक्ष करावं.

मैत्रेयी... ओर्कुट डिलीट मारलेस तसे मेल पण डिलीट मारायचे... काय तू कशावर पण बुद्धी खर्च करतेस काय... चांगले लिखाण कर ना त्याच्यापेक्षा...

तू लिहिलेला धागा पाहून काही चांगला विषय असेल असे बघून आलो होतो... Proud

भटक्याला अनुमोदन..
मैत्रेयी तुझ्या सारख्या प्रगल्भ व्यक्तीला अश्या मेल्स ना पहिलं सुद्धा उत्तर द्यायची गरज न्हाय.. डोक्यातून सरळ ही गोष्ट डिलीटून टाक Happy

धन्यवाद मित्रांनो..

सुरूवात माझ्याकडून झाल्यान जरा गिल्टी फीलिंग होत इतकच. शेअर केल्यान बर वाटल. शिल्पा म्हणतेय तेच मला वाटत होत. फक्त माणस अशी का वागतात हे मात्र न उलगडणारं कोडं आहे...

रोहन Happy

वर्षूला अनुमोदन.
सोशल नेटवर्किंग साईट्सवर वावरताना 'दुर्लक्ष करणे' यासारखा सहज-सोपा उपाय हाताशी असताना चिंता कसली? जी व्यक्ती प्रत्यक्ष भेटलेली नाही किंवा भविष्यात भेटण्याची शक्यताही नाही त्या व्यक्तीच्या असल्या कुठल्याही ई-मेलला उत्तर द्यायचेच कशाला? अनुल्लेखाने मारा ना त्याला...

मैत्रेयी, तपेशच्या पहिल्याच पत्रावरून तुझ्या लक्षात यायला हवं होतं ...... पुढचा पत्रव्यवहार करण्याचीही काही गरज नव्हती. असो. झाले ते झाले. मनुष्यस्वभावाचा आणखी एक चमत्कारीक नमुना म्हणून सोडून दे. त्याच्यावर तुझा वेळ विचाराकरता सुध्दा घालवण्याची गरज नाहीये, नाही का?

खरंच सरळ डिलिट कराव्यात अशा मेल न वाचता. उत्तर देणं दूरच.
इथे आणखी एक सुचवावेसे वाटते , जे मला जाणवले आहे. बरेच लोक आपल्या मित्रपरिवारांच्या इमेल्सची यादी करून त्यांना नियमित काही ना काही इमेल्स पाठवत असतात (जशी तुम्हाला आली, आणि तुम्ही पण पाठवली). म्हणजे ज्याला ज्याला ही इमेल मिळेल त्याला बाकी लोकांचे पण इमेल आयडीज मिळतात.
समजा तुमच्या ओळखीच्या कुणा क्ष व्यक्तीचा फोन नंबर किंवा पत्ता कुणा तिर्‍हाइताने (ज्ञ) मागितला तर तुम्ही तो द्याल का? किमान आधी त्या क्षला विचाराल की ज्ञला तुमचा नंबर पत्ता देऊ का? किंवा 'ज्ञ'ला सांगाल की तुमचा नंबर मी 'क्ष'ला देतो, ते त्यांना वाटल्यास तुमच्याशी संपर्क साधतील. (अर्थात आजकाल हेही शिष्टाचार न पाळणारे लोक आहेत, आणि एका गप्पांच्या कार्यक्रमात सगळ्या लोकंच्या साक्षीने अशी तिसर्‍या व्यक्तीच्या पत्त्याची देवाणघेवाण झालेली मी पाहिली आहे!)
आपल्या फेसबुक/ऑर्कुट इत्यादी प्रोफाइल्समध्ये आपली खाजगी ओळख जपायची सोय आहे. (ज्यांना आपला फोन नंबर, पत्ता सगळ्या जगाला, कुणीही न मागता सांगायची हौस असते असेही लोक असतात- मायबोलीवर पण आहेत).
तर ग्रुप इमेल्स बद्दल. असे केल्याने तुमचा इमेल तुमच्या इच्छेशिवाय अन्य व्यक्तींना मिळू शकतो. तेव्हा अशा इमेल पाठवताना bcc ही सोय वापरली जायला हवी.

तर ग्रुप इमेल्स बद्दल. असे केल्याने तुमचा इमेल तुमच्या इच्छेशिवाय अन्य व्यक्तींना मिळू शकतो. तेव्हा अशा इमेल पाठवताना bcc ही सोय वापरली जायला हवी >>> याला १००% अनुमोदन. आपण ई-मेल पाठवताना to च्या समोर आपलाच ई-मेल आयडी टाकावा आणि bcc मधे इतरांचे ई-मेल आयडी लिहावेत.

मूर्खपणा आहे. दुर्लक्ष हा एकमेव उपाय.
आपण जेवढे स्वतःला जस्टीफाय करायला जातो तेवढे आरोपांचे डोंगर वाढत जातात.. तेव्हा फाट्यावर मारणे हेच बरे.

तेव्हा अशा इमेल पाठवताना bcc ही सोय वापरली जायला हवी >>>

to च्या समोर आपलाच ई-मेल आयडी टाकावा आणि bcc मधे इतरांचे ई-मेल आयडी लिहावेत >>

१००% मान्य !

मायबोलीवर जरा उच्च दर्जाचा अनुभव आपल्याला येउ शकतो. एका मायबोलीकराला मी चुकुन माझ्या एका कथेची लिंक पाठवली होती. त्याबाबत अत्यंत चांगल्या भाषेत माझी हेटाळणी करण्यात आली होती. दुर्दैवाने हिच चुक पुन्हा घडली. मग मात्र माझी हेटाळणी आणखी उच्च दर्जाची झाली.

मायबोलीवर सुध्दा कुणाच्याही विपुत आपल्याला त्यांच्या परवानगीशिवाय लिहायला परवानगी नसते हा साक्षात्कार त्या निमित्ताने झाला.

हाही अनुभव मायबोलीकरांनी लक्षात घ्यावा.

खरेच त्याबद्दल ताप करुन घ्यायचे काहि कारणच नाही. मला वाटते कविता / कथा / लेख असे घाऊक रित्या पाठवू नयेत. जिथे योग्य वाटेल तिथे ते प्रसिद्धच करावेत.
भरत ने लिहिल्याप्रमाणे निवडक लोकांनाच मेल कराव्यात. त्यासाठी ग्रुप वापरु नये. असे पत्ते शोधताना, आपल्याला पण लक्षात राहते, ती व्यक्ती. जर फार काळ संपर्क नसेल तर, तो पत्ता वगळावा.

मलाही असे विचित्र अनुभव आलेत, त्यातून शिकलेले शहाणपण.

काही इमेल आयडी ह्या कामाच्या ठिकाणच्या असतात तिथे अश्या अनसॉलिसिटेड मेल्स पाठवू नये. रोज २०० मेल्स येणार्‍या माणसास असल्या मेल्स डिलीट करण्याचा फार त्रास होतो. कथा चांगली असली तरी वाचली जाईलच असे नाही. मी माझ्या एका मैत्रीणीस व चुलत भावास वर्क आय्डीला क्रुपया फॉरवर्डस पाठ्वू नये अशी समज दिली होती. पण त्यांनी तुमच्या वर वैयक्तिक हल्ला करणे बरोबर नाही. त्यात एका स्त्रीशी कसे बोलावे ते न समजणारा हा तापेश कुमार याचा अनुल्लेखच केला पाहिजे.

अतिसभ्य असणं हाच गुन्हा आहे. समजा पाठवली चुकून मेल.. काय बिघडल ? इग्नोर करता आलं असं कि. पण जस काही .घरात दरोडा घालायला आला आहात अशा प्रकारे जेव्हा प्रतिक्रिया मिळतात तेव्हा समजून घ्यायच कि ही व्यक्ती विक्षिप्त आहे. खरतर यांच्या नादाला कुणी लागत नाही म्हणून ते शेफारलेले असतात इतकच. आपल्यापेक्षा सवाई भेटला कि हे लोक शेपूट घालतात. एक दोन वेळा समोरच्याने दुर्लक्ष केल कि यांना वाटत जग मला घाबरत. लोक का नादाला लागत नाहीत हे समजण्याइतकीही अक्कल यांच्याकडे नसते. मी असा आहे ही जाहीरात देखील काहीजण करताना दिसतात.

यशस्वी व्हायच असल्यास सर्व प्रकारच्या व्यक्तींना तोंड देता आल पाहीजे. योग्य त्या ठिकाणी दुर्लक्ष आणि योग्य त्या ठिकाणी दोन शिव्याही देता आल्या पाहीजेत. एरव्ही सभ्यता आहेच कि.... सांगायचं इतकंच कि गुडी गुडी इमेजचा मोह टाळावा. प्रत्येकाला विकार आहेत. नाहीतर नि:संग, निर्मोही, निर्वाणावस्थेस पोहोचलेला असल्यास नेटवर काय काम ?

विपु मधे लिंक दिली म्हणून त-हेवाईक उत्तर देणारेही याच टाईपातले. झोपमोड होते कि काय त्यांची ?

नितिनचंद्र, झंडू- विपुत स्वतःच्या लेखाची लिंक देणे ह्यालाच मायबोलीवर 'रिक्षा फिरवणे' असं म्हणतात. इथे नवीन लेखनात काय नवीन आहे हे वाचण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली असताना सगळ्यांनाच आपल्या विपुत रिक्षा आलेल्या आवडत नाहीत (मी धरुन) किंवा त्याची गरज वाटत नाही. रिक्षा फिरवणार्‍या आयडीचं नी तुमचं परस्पर सामंजस्य असेल तर गोष्ट वेगळी.

मैत्रेयी,
आपल्याला तापेश च्या वागण्याचा त्रास झाला हे आपण ''अतिसंवेदनाशील'' असल्याचं लक्षण आहे. आपण ओळखत नसलेल्या तापेश ने आपल्याशी वाईट वागावं याचा आपल्याला अतोनात त्रास झालेला दिसत आहे..... ''एखादी व्यक्ती आपल्याशी अकारण इतकं वाईट का वागते?'' हा विचार संवेदनाक्षम मन करतं आणि अजून त्रास होत रहातो. आपल्याला दिले ली वाईट वागणूक आपण दुर्लक्षित करु शकत नाही ... आणि त्यातून तुमचे अजून तापेश ला इ-मेल्स करणे वगैरे प्रकार झाले आणि त्यातून अजूनच हा त्रास झाला..... असो...

सगळ्यांकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा करण्यात अर्थ नसतो..... कित्येक जण आपण चांगले वागलो तरीही वाईटच वागतात.....

त्यामुळे वर सगळ्यांनी सुचविल्या प्रमाणे अनुल्लेख आणि इग्नोरास्त्र वापरा.... भरत यांनी सांगितल्याप्रमाणे बीसीसी मध्ये इतर मेल आयडी टाकावेत.

सायो

मला असा अनुभव आलेला नाही. मी, त-हेवाईक उत्तरांबद्दल बोलतोय.

नवीन लिखाण दिसण्याची सोय आहे हे कदाचित प्रत्येकाला माहीत नसाव किंवा काहीजणांची सवय असू शकते. माबो सोडून द्या इतरही अनेक संस्थळांवर असे अनुभव येतात. पण पहिल्या वेळी समजावून सांगण हाच योग्य मार्ग अस वाटत.एकदा तुम्हाला आवडत नाही हे समजल कि कोण कशाला त्रास देईल पुन्हा ? दुर्लक्ष करणे हा ही मार्ग असू शकतोच कि.....!

मात्र, काहींचा स्वभावच त-हेवाईक उत्तर देण्याचा झालेला असतो आणि त्याच ते समर्थन करतात. रस्त्यावर, चौकात ब-याच ठिकाणी हा अनुभव येतो. जी गोष्ट गोडीने होऊ शकते त्यासाठी तिरसटासारखी दुरूत्तर कशाला ?

ओपन फोरममधे किंवा पब्लिक प्लेसमधे थोडफार सामंजस्य असायलाच हव. तिरसिंगरावांना जसे इतरेजन सांभाळून घेतात तसच तिरसिंगरावानीही समजावून घ्याव हा मुद्दा आहे. ( मला अशा तिरसिंगरावांना सरळ करायला आवडत..:) )

भिबरा काय केलेत हे तुम्हि ? दुसर्याच ओळित त्यांनी " तर याची सुरूवात माझ्या कथेमुळं झाली. तीच ती कॉस्चुम !!! " असे म्हणले आहे हो! Proud

आता आहे परत महाभारत - कॉश्च्युम , कॉस्टयुम आणी कॉस्चुम Proud

त्या वेळी मी इथं काय मतं व्यक्त केली असतील ती असतील. पण आज पुन्हा वाचताना असं वाटलं कि माणसाला सगळ्या प्रकारचे अनुभव येत रहावेत..