टु द लास्ट बुलेट

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

टु द लास्ट बुलेट
अशोक कामटे यांची जीवनकहाणी
२६/११ अतीरेकी हल्ला, लोकेशनः कामा हॉस्पिटल परिसर.. एक शोधयात्रा..

लेखकः विनीता कामटे, विनीता देशमुख
मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवादः भगवान दातार
अमेय प्रकाशन, पुणे.
पहिली आवृत्ती: २२ डिसेंबर २००९.

२६/११ च्या घटनेला तब्बल दोन वर्षे पुरी झाली तरी अजूनही हे सर्व काल परवाच घडले असावे असे वाटत रहाते- निमित्त काही का असेना- पुन्हा त्याच श्रध्धांजल्या, नेत्यांची पोकळ भाषणे, वृत्तपत्रातील रकाने, या घटनेत ज्यांचे सर्वस्व गेले त्यांचे गहीवर, लेख, कविता, चर्चा, वगैरे वगैरे. आपले कुणीही जिवा भावाचे या जगातून गेले की एक पोकळी कायमची रहाते. २६/११ या काळरात्री शहीद हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे (खेरीज तुकाराम ओंबळे, मेजर ऊनीक्रीश्णन, आणि पोलिस दलातील ईतर व लष्करातील लढवय्ये) यांना शौर्यमरण आले तेव्हा या तीघांच्या जीवलग आणि कुटूंबातील ईतर व्यक्तींच्या आयुष्यात अशीच एक पोकळी निर्माण झाली असणार पण त्याही पेक्षा एक प्रचंड मोठी पोकळी राष्ट्रीय सुरक्षेत निर्माण झाली असे म्हणावेसे वाटते अन "टु द लास्ट बुलेट" हे पुस्तक वाचल्यावर दुर्दैवाने या मताला दुजोरा मिळतो.

खरं तर अशोक कामटे यांच्याबद्दल या घटनेपूर्वी आणि नंतरही वाचलेले, ऐकलेले, या सर्वातून निर्माण झालेली एक उत्सुकता यापोटी हे पुस्तक विकत घेतले होते. पण पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर हे पुस्तक वाचले नसते तर किती महत्वाच्या माहिती, गोष्टींना आपण मुकलो असतो याची जाणीव झाली.

पुस्तकातील पहिलेच प्रकरण २६/११ च्या "त्या" काळरात्री बद्दल आहे. ते वाचता वाचता जणू पुन्हा सर्व काही टिव्ही वर लाईव्ह बघत आहोत असा भास होत होता अन त्या रात्री काय घडले हे आता सर्व जगाला एव्हाना माहित असले तरी पुस्तक वाचताना पुढे काय घडले असेल अशी एक विचीत्र जीवघेणी उत्सुकता लागून रहाते. या पहिल्याच प्रकरणातील एका पानावर मी थबकलो तो थबकलोच त्यानंतर पुढील पाने वाचायला प्रयत्नपूर्वक हिम्मत केली ती तब्बल दोन दिवसांनी. आयुष्यात प्रथमच ईतकी चलबिचल, तगमग मी अनुभवली.

ज्या अशोक कामटेंबरोबर आयुष्याची तब्बल १८ वर्षे पत्नी, सहचारिणी, मैत्रीण म्हणून काढली, ज्यांच्याशी रोज त्या फोन वर बोलत असत, ज्यांच्याशी "त्या" रात्री ११.२५ वाजता त्या फोन करून आपल्या लहान मुलाचा निरोप अशोक कामटे यांना देतात की "मम्मा, प्लिज डॅडांना बुलेटप्रूफ जॅकेट घालायला सांग ना..", त्या विनीता कामटे म्हणजे अशोक कामटे यांच्या पत्नीला तासाभरात "ती" वाईट बातमी कळते तेही टिव्ही वरून निव्वळ तीन शब्द "अशोक कामटे शहीद"!

ते तीन शब्द अन ते पान कितीही प्रयत्न केले तरी डोळ्यापुढून हलत नाही. कारण त्या वाक्या आधी विनीता कामटे यांनी पुस्तकात त्या रात्रीबद्दल अन मुंबईत कारवाई होत असताना, ईकडे पुण्यात त्यांच्या मनात ऊठलेले शंका, कुशंका यांचे काहूर, काळजी, आपल्या दोन लहान मुलांना धीर देताना स्वता: मनातून घाबरलेली आई, एकीकडे अशोक च्या शौर्याबद्दल निश्चींत तर दुसरीकडेच या थेट शौर्यापायी ते अडचणीत तर येणार नाहीत ना ही भिती, हे सर्व लिहील्याने या प्रसंगाआधीची तगमग, काळजी आपल्याला अस्वस्थ करते अन नंतर वरील तीन शब्द वाचल्यावर आपलेही मन सुन्न होते. नियती किती क्रूर असू शकते, अन ते कळूनही आपल्या हातात काहीच नसतं या जाणिवेतून येणारं वैफल्य अन नैराश्य एखाद्याला पार ऊध्वस्त करू शकतं. वास्तविक तीन डीसेंबरला आपल्या लहान मुलाच्या वाढदिवसानिमीत्त त्याला सरप्राईज म्हणून अचानक मुंबईहून पुण्याला यायचा कामटे यांचा प्लॅन असतो. पण नियतीचा प्लॅन काही वेगळाच असतो.

पण त्याही वेळी आपल्या लहान मुलांकडे पाहून, अशोक च्या आई वडील अन ईतर आप्तजनांच्या जाणिवेने स्वताचे दु:ख आत लपवू पाहणार्‍या, आतल्या आत क्षणाक्षणाला उध्वस्त होणार्‍या अन शेवटी एकवार निव्वळ आपल्या पतीच्या थंड देहाला कवटाळून रडणार्‍या विनीता कामटे यांना मी तरी दोनच दिवसांनी महत प्रयासाने पुस्तकात सामोरे गेलो.

त्यापुढील "अखेरचा प्रवास" या प्रकरणात अशोक कामटे यांच्या अतींम यात्रेचे अत्यंत हृदयद्रावक वर्णन आहे. विनीता कामटे लिहीतात-
" माझे सासरे तर दु:खाने पूर्ण कोलमडले होते. पण तेही एक लष्करी अधिकारी होते. अखेरच्या क्षणी त्यांच्या मनातला सैनिक जागा झाला आणि अखेरची मानवंदना चालू असताना त्यांनीही खाडकन सॅल्यूट ठोकत वीरमरण प्राप्त केलेल्या आपल्या पुत्राला अखेरची सलामी दिली. देशासाठी प्राणार्पण करणार्‍या एका पुत्राला त्याच्या पित्याने केलेले ते अभिवादन होते. पुत्रवियोगाचे दु:ख तर होतेच पण तो देशासाठी धारातिर्थी पडला याचा अभिमान त्याहून मोठा होता...."
"तो जसा जगला तसच त्याला बघणं मला आवडेल. त्याचा निष्प्राण देह मला बघवणार नाही. मला अजूनही असच वाटतं की कोणत्याही क्षणी अशोक येईल, दारावरची बेल तितक्याच अधीरतेने वाजवेल आणि दार उघडताच 'हाय मॉम' म्हणत माझ्या कुशीत शिरेल. त्याच्या त्या मिठीने माझ्या जीवनात नवं चैतन्य सळसळायला लागेल. त्याचं तेच चित्र मला माझ्या डोळ्यांपूढे कायम ठेवायचं आहे, त्याचा अंत्यविधी मला बघवणार नाही..." कामटेंच्या आईंचं मन असाहय्यपणे बोलत होतं.

पुस्तकातील हे पहिले प्रकरण अक्षरशः अंगावर येते, या एकूण घटनेतील तपशील अनेक वेळा टिव्ही वर पाहिलेला असून देखिल. ईथे लेखीकेच्या लिखाणाला दाद देण्याचा व्यावहारीक मूर्खपणा आपल्या हातून होणार नाही याची काळजी घेताना मात्र त्या अनुशंगाने पुढील अधिक तपशिलातील लिखाण लेखिकेने कसे केले किंवा "का" केले याचे उत्तर म्हणजेच हे अख्खे पुस्तक आहे.

२६/११ च्या घटनेत एकंदर कामा हॉस्पिटल परिसरात नेमके काय घडले याबाबत वृत्तपत्रे, टिव्ही व ईतर मिडीया यात कुठेही ठळक तपशील नाही. किंबहुना अनेक वेळा "ईतक्या अनुभवी अन हुषार अधिकार्‍यांनी एकाच जागी एकत्र जायची चूक केली कशी"? असे निव्वळ संतापजनक अकलेचे तारे लोकांनी तोडलेले आपण ऐकलेले आहेत. नेमकी याचेच ऊत्तर शोधायचा ध्यास या पुस्तकातून समोर येतो.
विनीता कामटे लिहीतात-
"अशोकची साथ आता कायमची संपल्याचं दु:ख्ख आता माझ्या काळजात सलत होतं पण त्याहीपेक्षा ही घटना का घडली याची बोच माझ्या मनात अधिक होती. सात्वनाला येणारे सुध्धा अगदी सहजपणे, नकळत बोलून जात होते, "करकरे, कामटे, आणि साळसकर यांना स्थितीचं गांभीर्य कळलच नाही." या अशा वाक्यांनी मी मनातल्या मनात पेटून ऊठत होते. हे कसं शक्य आहे? हा प्रश्ण माझा पिच्छा सोडत नव्हता. एकीकडे हे तिन्ही अधिकारी एका रात्रीत सगळ्या देशाचे हिरो झाले होते. चौकाचौकात लोक त्यांचे फोटो लावून त्यांना अभिवादन करत होते. माझ्या मनात मात्र विचारांचं रणकंदन चालू होतं.
हे तीनही अधिकारी एकाच वाहनात बसले अन अचानक झालेल्या गोळीबारात ठार झाले- असच चित्रं मुंबई पोलिसांकडून माध्यमांपुढे रंगवलं जात होतं. मला ते मान्य नव्हतं. करकरे- त्यांची अत्यंत काटेकोर कार्यपध्धती आणि दूरदृष्टी यासाठी प्रसिद्ध होते. साळसकर एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. तर, तातडीने प्लॅनिंग करणे हा अशोकचा लौकीक होता आणि शस्त्राचा वापर करण्यात तो कमालीचा तरबेज होता असं असताना हे तिन्ही अधिकारी कुठलिही योजना न आखता किंवा थोडाही संघर्ष न करता मृत्त्यू स्विकारायला तयार होतील यावर विश्वास ठेवायला मी तयार नव्हते. मुंबई पोलिसांकडून मात्रं तसच भासवलं जात होतं"..
..
त्यावेळी मी मनाचा निर्धार केला "मी वाट्टेल ते कष्ट घेईन, पण या प्रकरणातलं सत्त्य शोधून काढीनच". देशासाठी वीरमरण पत्करणार्‍यांच्या बलिदानाचं पावित्र्य कायम राखण्यासाठी हे सत्त्य शोधून काढणं हे आपलं एकमेव कर्तव्य आहे असं माझं मन मला सांगत होतं."

या नंतर या "सत्त्यशोधन" मार्गावरील विनीता कामटे यांचा प्रवास "सत्य कोणी सांगेल का" या पुस्तकातील पुढील प्रकरणातून समोर येतो.

पहिल्या प्रकरणातून आपण सतत बिलगणारा हळवेपणा, दु:ख्ख, वैफल्य हे अनुभवतो तर या सत्यशोधन प्रकरणातून आपल्या सडलेल्या सिस्टीम चा अत्यंत संतापजनक अन उद्गेवजनक चेहेरा समोर येतो. तपास करणार्‍या संस्थांकडून एकंदर याबद्दल दिली जाणारी विरोधी, संशय वाढवणारी माहिती, अशोक कामटे यांचे वरिष्ठ अधिकारी (नावे ईथे नमूद करत नाही) मंडळींनी माहिती देण्याबाबत केलेली टाळाटाळ, कसाबला नक्की कुणी गोळी मारली याबाबत तीन वेळा बदललेला तपशील, सुरूवातील अशोक कामटे यांना "ट्रायडंट ला जा" अशा सूचना असताना ते कामा हॉस्पिटल कडे का गेले? या प्रश्णावर सर्वांनी बाळगलेलं मौन, विनीतांच्या प्रयत्नात पोलिसांकडूनच वारंवार आणले गेलेले अडथळे, अन या सर्वात कळस म्हणजे अशोक च्या पोस्ट्मार्टेम रिपोर्टची प्रत देण्यास देखिल दिला गेलेला नकार!

एखादी स्त्री या प्रचंड दु:ख्खातून ऊभे रहाणे सोडाच साधा तर्कसुसंगत विचार करण्याची क्षमता देखिल काही काळ गमावू शकते अशा वेळी विनीता कामटे यांनी महिन्याभरातच म्हणजे थेट २४ डिसेंबर ला "घटनास्थळी" जावून, तेथिल रचना, रस्ते, ईमारती ई, चे आराखडे बघून, स्थानिक लोकांशी बोलून "कामा हॉस्पिटल परिरसात घडलेल्या घटनेचा नकाशा" (कोण कुठे लपले होते, करकरेंचे पथक कुठून आले वगैरे या बारकाव्यांसकट) बनवून पुस्तकात दिला आहे- त्यांच्या या सहनशीलतेला, धैर्याला अन कधीही हार न मानण्याच्या वृत्तीला काय म्हणावे हेच कळत नाही.

पुढे "सत्त्याची ऊकल" या प्रकरणातून विनीता कामटे यांनी अक्षरशः मिनीट बाय मिनीट त्या रात्रीचा थरार समोर ऊभा केला आहे. आणि तसे करायला या "अशोक चक्र" प्राप्तं पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीला चक्क सामान्य माणसाप्रमाणे "माहिती अधिकार कायद्याचा" आधार घ्यावा लागतो यावर विश्वास बसत नाही. विनीता लिहीतात-

"मीही एका पोलीस परीवारातील सदस्य होते. त्या शेवटच्या काही तासात नेमकं काय घडलं होतं ते कळल्याशिवाय माझ्या मनातील उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती. पोलीस अधिकार्‍यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता नेमकं काय घडलं ते मला सांगावं असं मला वाटत होतं.. ते मला अधिकृतपणे सांगितलं जाईलच असं मी गृहीत धरलं होतं. काय घडलं ते मलाच शोधून काढावं लागेल आणि त्यासाठी मला माहितीच्या अधिकाराची मदत घ्यावी लागेल असं मला त्या क्षणी वाटलही नव्हतं. शासनाला आपल्या 'हिरों' विषयी विशेष आदर असतो असच मला तोपर्यंत वाटत होतं. पण नियतीची ईच्छ मी मान्य केली आहे आणि माझ्यावर नियतीनं सोपवलेली जबाबदारी मी स्विकारली आहे असं काही दिवसांनी मी माझ्या नातेवाईक, मित्रपरीवाराला सांगून टाकलं."

या कायद्याच्या आधारावर विनीता कामटे यांनी त्या रात्री कामटे (व करकरे) व कंट्रोल रूम यामधिल झालेल्या संवादाच्या, संभाषणाच्या ध्वनिफिती, कॉल रेकॉर्ड्स च्या मूळ प्रती, प्रधान कमिटीच्या अहवालात वापरलेले पुरावे ई. माहिती ऊपलब्ध करून दिली जावी असा अर्ज त्यांच्या वकीलामर्फत केल्यावर तो अर्ज कसा वेगवेगळ्या सरकारी कचेरीतून नुसता फिरत राहिला अन शेवटी जवळ जवळ तब्बल सहा ते आठ महिन्यांनी त्यातील थोडीशीच माहिती त्यांना ऊपल्ब्ध केली जाते याचे तपशीलवार वर्णन दिले आहे. पण पोलिसांसाठी असलेले काही विशेष अधिकार वापरून व हितचिंतक अन कारवाईत सामिल असलेले पोलिस यांच्याशी संभाषण करून सर्व माहिती, एरिकसन मोबाईल चे रेकॉर्ड्स, संभाषणे एकत्र करून विनीता कामटे यांनी त्या रात्री ११ वाजल्यापसून ते १ वाजेपर्यंतचा सर्व घटनाक्रम दिला आहे, रात्री ११.१३ ते मध्यरात्र १२.५६ पर्यंत.

त्यातून खालील अनेक प्रश्णांची ऊत्तरे थेट समोर येतात किंवा अधिक प्रश्ण पडतातः
१. मुळात पूर्व विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त असलेले अशोक कामटे दक्षिण मुंबई विभागात कसे जातात? ते ट्रायडेंट हॉटेल कडे जात असताना अचानक कामा हॉस्पिटल कडे का व कुणाच्या सांगण्यावरून जातात?
२. सर्व घटना घडत असताना नेमके हे तीनही अधिकारी काय करत होते?
३. तीनही ज्येष्ठ अधिकार्‍यांनी एकत्र त्या गल्लीत जायचे आणि एकाच गाडीतून जायचे धाडस का केले?
४. नेमकं काय घडलं, कसं घडलं?
५. या तीनही अधिकार्‍यांवर काय प्रसंग ओढवला होता याची कप्लना कंट्रोल रूम ला होती का?

या सर्व प्रश्णांची उत्तरे स्पष्ट आहेत. आश्चर्य म्हणजे वेळोवेळी बाजूच्या जागरूक नागरीकांनी ज्यांनी प्रत्त्यक्ष त्या अतीरेक्यांना गल्लीत फिरताना पाहिले, नव्हे तर प्रत्त्यक्ष या तीघांच्या गाडीवर झालेला गोळीबार पाहिला, त्यांनी कंट्रोल रूम ला तसे सांगीतले. (जवळ जवळ १०० कॉल्स आहेत) असे असताना देखिल अतीरेकी गल्लीत खुशाल फिरत आहेत हे कंट्रोल रूम ने या तीनही अधिकार्‍यांना सांगितले नव्हते- असा निश्कर्ष वरील सर्व तपशीलातून निघतो असे विनीता म्हणतात- जे प्रचंड धक्कादायक आहे. किंबहुना हे तीनही अधिकारी गल्लीत गेले तेव्हा अतीरेकी गल्लीत आहेत याची पूर्वसूचना त्यांना दिली गेली नव्हती? असे अनुमान निघते.

तर खालील प्रश्णांची ऊत्तरे अजूनही सापडत नाहीत असे पुस्तकात नमूद केले आहे:

१. करकरे यांनी परिस्थितीचा घेतलेला अचूक आढावा अन त्या अनुशंगाने केलेला प्लॅन हे संभाषणावरून अगदी स्पष्ट होते. मग ज्यादा कुमक पाठविण्याची अन "आर्मी ला त्वरीत पाचारण करा" या त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष का केले गेले?
२. कामा हॉस्पिटल हे दक्षिण विभागाच्या मुख्ख्य कंट्रोल रूम पासून जेमेतेम ५ मिनीटांच्या अंतरावर असताना पोलिसांची जादा कुमक तिथे का पोचू शकली नाही? या दोन्ही गोष्टी या हेतुतः दाखवेलला निष्काळजीपणा आहे का निव्वळ अकार्यक्षमता?

अन सर्वात मह्त्वाचा प्रश्ण म्हणजे या तीनही अधिकार्‍यांचे प्राण वाचू शकले असते का? यावर विनीता लिहीतात-
" संवेदनशील नागरीकांनी घटना घडण्यापूर्वी आणि त्याही नंतर तीनही अधिकार्‍यांवर झालेल्या गोळीबाराची माहिती पोलिसांना वारंवार फोन करून दिली. गोळीबारानंतर हे तीनही अधिकारी सुमारे ४० मिनीटे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. साळसकर तर हॉस्पिटल मध्ये नेईपर्यंत जिवंत होते.
करकरे, कामटे, आणि साळसकर हे तिन्ही अधिकारी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले असताना बाजूने पोलिसांची गाडी भरधाव गेली (प्रत्यक्ष घटना पाहिलेल्यांच्या जबानीनुसार, कंट्रोल रूम च्या संभाषण टेप नुसार). त्यावेळी अशोक युनिफॉर्म मध्ये होता. किमान पोलिस अधिकारी रस्त्यावर पडले आहेत एव्हडे तरी या गाडीतल्यांना कसं कळलं नाही?"

या प्रकरणाच्या शेवटी विनीता कामटे लिहीतात-
"करकरे यांनी मदत पाठविण्याबाबत अगदी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तशी मदत पाठवली असती तर या तीघांचेच काय पण सबईंस्पेक्टर धुरगुडेंचेही प्राण वाचू शकले असते. २०० पोलिसांना कामा हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. हे पोलिस कुठे होते? वरील सर्व प्रश्ण अद्याप अनुत्तरीत आहेत. या घोडचुकांबद्दल प्रधान समिती का मौन बाळगून आहे? पुन्हा एखादा हल्ला झाला तर याच दर्जाच्या कार्यक्षमतेने आपण त्याला तोंड देणार आहोत का?
कामा हॉस्पिटलच्या समोरच्या भागात काय स्थिती आहे याचे योग्य "ब्रिफींग" करकरेंच्या पथकाला केले गेले असते तरीसुध्धा त्या रात्रीचे चित्र बदलले असते. त्या दुर्दैवी कहाणीला वेगळच वळण मिळालं असतं. आपल्यावर हल्ला झालेला असतानाही करकरेंच्या पथकानं कसाबला जखमी केलं होतं.
तीन अधिकारी आणि त्यांचे सहकारी अतीरेक्यांच्या गोळ्यांना निष्कारण बळी पडले. खरं तर त्यांनीच अतीरेक्यांना यमसदनाला पाठवले असते. बाजू बरोबर उलटी झाली असती.
हीच गोष्ट अजूनपर्यंत माझ्या काळजात सलत आहे."

२६/११ च्या मुख्ख्य घटनेनंतर पुस्तकातील पुढील प्रकरणांतून विनीता कामटे यांनी अशोक कामटे यांच्या वेगवेगळ्या पोस्टींग्स मधील कारकीर्दीचे अनुभव अन आढावा घेतला आहे. त्यात मुंबईतील दंगल (२०००), सोलापूर मध्ये अशोक कामटे यांनी एका महिन्यात प्रस्थापित केलेले कायदा सुव्यवस्थेचे राज्य (२००६-२००८), खैरलांजी प्रकरणातून ऊठलेली दंगल कौशल्याने हातळण्याची केलेली कामगिरी, भंडारातील लग्नानंतरचे पहिले पोस्टींग (१९९२) तेथे नक्षलवाद्यांविरुध्ध कारवाईत अशोक कामटे यांनी केलेल धाडसी नेतृत्व, युनो च्या शांतीपथकात भारतातर्फे प्रतिनिधीत्व करताना बोस्नीयामध्ये केलेली यशस्वी कामगिरी (१९९९-२०००), २००१ मध्ये मेधा पाटकरांनी कामटे यांची विनंती/सल्ला न जुमानता केलेले आंदोलन, तेव्हा पोलिसांच्या कामात वेळोवेळी होणारा राजकीय हस्तक्षेप, २००८ मध्ये राज ठाकरे यांना अटक करताना कामटे यांनी हाताळलेली परिस्थिती, ई. सर्वाबद्दल तपशीलात माहिती दिली आहे. या सर्वच पोस्टींग्स बद्दल प्रत्त्येकी एक प्रकरण आहे. शिवाय त्यात अशोक ने जोडलेले मित्र, पोलीस परीवारातील ईतर कुटूंबीयांशी जडलेले संबंध, काही स्थानिक गुंडगिरी, कारवाया याबाबत तपशील, ई. सर्व घटनाक्रमातून अशोक कामटे यांची वेगवान अन यशस्वी पोलीस कारकीर्द समोर येते.

या सर्वातून अशोक कामटे यांच्यातील निधडा, शूर, अतीशय कर्तव्यतत्पर, सर्व शस्त्रात निपुण, कठीण प्रसंगी ठोस निर्णय घेणारा, धडक कृती करणारा, पोलिस दल, सेवा, आपले सहकारी, वरीष्ठ या सर्वांबद्दल अत्यंतीक प्रेम , आदर असणारा, तर व्यायाम, शरीर सौष्ठव, क्रीडा यात सर्वात अव्वल स्थानावर असणारा, टेनीस, क्रिकेट, गोळाफेक, अ‍ॅथलेटीक्स या सर्व खेळात नैपुण्य, पदके मिळवलेला, कायम कुठल्याही प्रसंगात स्वतः पुढे राहून नेतृत्व करणारा एक हुषार, दक्ष, अन लोकप्रिय पोलिस अधिकारी आपल्या समोर येतो.

कमावलेली शरीरयष्टी (अशोक कामटे यांचा व्यायाम कधीही चुकला नाही. रोज सं ६ वाजता ते सुसज्ज अशा जिम मध्येच असत.. त्यांचे सहकारी सांगतात अशोक १४० किलोची वजने घेवून सहज व्यायाम करत.. मुंबईत १० कीलोचे लोखंडी जॅकेट घालून मैदानाला अर्धा तास राऊंड मारत असत.. व्यायाम, शरीरसौष्ठव, खेळ याबद्दल त्यांना भयंकर आकर्षण आणि ज्ञान होतं..) उंचपुरे, अत्यंत देखणे व्यक्तीमत्व असे कामटे यांना सोलापुर मध्ये लोकं "डॉन" म्हणून संबोधत असत. अक्षरशः पूर्वीच्या मारधाड चित्रपटातून दाखवायचे तसे निव्वळ कामटेंच्या छायाचित्राचे कॅलेंडर दुकान, हॉटेल ई. मध्ये टांगते ठेवलेले पाहून गुंड, दादा, ई. लोकं काही त्रास द्यायला कचरत असत. कॉलेज युवक युवतींनी स्वताच्या मोबाईल्स वर सेव केलेले कामटे यांचे छायाचित्र असो वा, स्कूटर, रिक्षा च्या मागे लावलेले त्यांचे चित्र असो वा ईतर सार्वजनिक ठिकाणी राजकीय नेत्यांपेक्षा अशोक कामटे यांना दिला जाणारा मान असो, अशोक कामटे हा एकमेव पोलिस अधिकारी सर्व लोकांचा हीरो होता.

५०० च्या जमावाला, बेफाम झालेल्या माथेफीरूंना, दंगल करू पाहणार्‍या समाजकंटकांना निव्वळ एक लाठी, पिस्तुल, अन हेल्मेट घेवून सामोरा गेलेला, अन त्या दंगलीला फक्त १२ काँस्टेबल घेवून काबूत ठेवणार्‍या अशोक कामटे यांच्या पोलीस कारकीर्दीतील घटना त्यांच्या या वरील पोस्टींग्स मधील तपशीलातून पुढे यतात.

या खेरीज अशोक कामटे यांच्याशी विनीता यांची झालेली पहिली भेट, जुळलेले संबंध, अशोक च्या घराण्यात पणजोबांपासून चार पिढ्या लष्कर आणि पोलिस दलात सेवा केलेले अन तेच रक्त अन जीगर मनात अन मनगटात बाळगून असलेले त्यांचे "पोलीस कुटूंब" या सर्वावर पुढे पुस्तकात अनेक सुंदर, छोटे अनुभव आहेत- ज्यात प्रसंगी आपला ऊर अभिमानाने फुलतो तर कधी डोळ्यात टचकण पाणी आल्याशिवाय रहात नाही.

पत्नी विनीता, आपली दोन्ही मुले, आई, वडील, अन त्याच बरोबर लाडक्या कुत्र्यांबरोबर असलेले अशोक कामटे यांचे जीवा भावाचे संबंध, नाते, त्यांच्या मित्रपरिवार, पोलिस दलातील शिपाई ते अधिकारी या सर्वांनी त्यांच्याबद्दल सांगीतलेले अनुभव या सर्वातून अशोक कामटे अन त्याचबरोबर विनीता कामटे यांच्याही जीवनातील अनेक पैलू आपल्या समोर येतात.

सुरुवातीच्या प्रकरणांतून या पुस्तकाला असलेली हळवेपाणाची, व्याकूळतेची, अन मन हेलावून टाकणारी हृदयद्रावक प्रसंगांची गडद किनार पुढील या व्यावसायिक, खाजगी अन कौंटूंबीक प्रकरणातून थोडीशी फिकी होते अन अशोक कामटे यांच्या नसण्याची पोकळी काही खुसखुशीत, विनोदी, थरारक, तर कधी एखाद्या चित्रपटातील नायकाला शोभेल अशा कौतूकाच्या प्रसंगांनी थोडीफार भरून निघते.

अशोक कामटे यांसारखे अत्यंत कुशल पोलिस अधिकारी किंव्वा जागरूक नागरीक तयार होण्याच्या प्रक्रीयेत कोणत्या घटनांचा, विचारांचा, अन व्यक्तींचा मोठा वाटा असतो याचे एक संपूर्ण दर्शनच जणू या पुस्तकाच्या रूपाने होते. त्या सर्वाचा विचार करता, ईतक्या मेहेनतीने, कष्टाने, दिवस रात्र एक करून, अन प्रसंगी रक्ताचे पाणी करून वाढवलेल्या, घडलेल्या कामटेंसारख्या कर्तबगार, थोर समाजसेवी अन राष्ट्राभिमानी वीरांचा शेवट वा त्यांचे बलीदान काही अकार्यक्षम वा अनेक तृटींनी युक्त अशा ईतर गोष्टींमूळे व्हावे याची बोच मात्र एक वाचक म्हणून कायम मनात रहाते.

पुस्ताकाच्या पाठच्या कव्हर वर लिहील्याप्रमाणे "२६/११ च्या रात्री अतीरेक्यांशी लढताना वीरमरण पत्करणारे मुंबईच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांची ही जीवनकहाणी. भारतीय पोलिस दलातल्या एका अत्यंत साहसी आणि कार्यक्षम अधिकार्‍याची ही प्रेरणादायी जीवनकहाणी त्यांची पत्नी विनीता यांनीच सांगितली आहे. आपल्या पतीच्या मृत्त्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी विनीता कामटे यांनी केलेले प्रयत्न काळजाला भिडणारे आहेत. २६/११ च्या संदर्भात निर्माण होणार्‍या अनेक प्रश्णांची ऊत्तरं या पुस्तकात सापडतील पण त्याच बरोबर अनेक नवे प्रश्णही या पुस्तकातून उपस्थित होतील. केवळ कार्यक्षम अधिकारीच नव्हे तर एक उमदा माणूस असलेल्या अशोक कामटे यांची ही जीवनकहाणी नक्कीच हृदयाला भिडणारी आहे."

"दंगली आणि चकमकी" या प्रकरणाच्या शेवटी विनीता कामटे लिहीतात-
"वास्तविक पाहता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळी तुम्ही आयएएसला का जात नाही?" असं परीक्षकांनी त्याला विचारलं होतं त्यावर "जिथे काही अ‍ॅक्शन असेल तिथेच मला काम करायला आवडेल म्हणूनच मला आय्.पी.एस. हवे आहे" असं उत्तर त्याने दिलं होतं. या 'अ‍ॅक्शन' साठीच तो जगला आणि या 'अ‍ॅक्शन' साठीच त्यानं मरण पत्करलं.

पुस्तकाच्या शेवटी अशोक कामटे यांचा जीवनपट अन त्या अनुशंगाने कामटे यांचे अगदी बालवयातील फोटो, कुटूंबाबरोबरचे फोटो, कारवाई करतानाचे फोटो, या सर्वामूळे या पुस्तकाला एक पूर्णत्व आले आहे.

२३ फेब्रुवारी १९६५- २६ नोव्हेंबर २००८ अशी आयुष्याची ४३ वर्षे अन ऊमेदीची अन सौख्याची तब्बल १८ वर्षे पोलिस दल अन देशसेवेसाठी अर्पण केलेल्या शहीद अशोक मारूतीराव कामटे यांना मानाचा मुजरा!

तयांचे व्यर्थ न हो बलीदान......

-----------------------------------------------------------------------------------
टु द लास्ट बुलेट हे पुस्तक लिहायला विनीता कामटे यांना "पुणे ईंटेलिजंस" च्या संपादिका व ज्येष्ठ पत्रकार विनीता देशमुख यांनी मदत केली आहे. तसेच भगवान दातार यांनी अनुवाद करायला सहाय्य केले आहे. या पुस्तकाला शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांची अतीशय प्रामाणि़क, संवेदनशील अन नेमकी प्रस्तावना लाभली आहे. तर स्वतः विनीता करकरे यांनी लिहीलेल्या "हृदगत" या प्रस्तावनेत आपली किमान अपेक्षा वाचकांसमोर मांडली आहे- " वस्तुस्थितीचा विपर्यास होवू नये आणि सत्त्य दडपले जावू नये एव्हडीच माझी अपेक्षा आहे. हे पुस्तक म्हणजे देशासाठी वीरमरण पत्करणार्‍या हुतात्म्यांना माझी श्रध्धांजली आहे."

संपूर्ण पुस्तक वाचताना एकंदर पोलीस दल, कारवाई पध्धती, पोलीस कुटूंबे यांबद्दलही बरीचशी माहिती समोर येते. अशोक कामटे यांचा संपूर्ण जीवनपट १९ प्रकरणातून या पुस्तकात साकारला गेला आहे. पुस्तक वाचताना चीड, संताप, दु:ख्ख, अभिमान अशा एखाद्या भावनिक रोलरकोस्टरवर बसल्यागत सर्वांग अनुभव येतो. पुस्तकाच्या नावातूनच सुरू झालेला एक वेग शेवटपर्यंत कायम रहातो. मनात अनेक प्रश्ण येत राहतात. काही ऊत्तरे पुस्तकात सापडतात काही अनुत्तरीत तर काही ऊत्तरे आपण स्वताच शोधायची असतात.

प्रत्त्येक जागरूक अन देशाभिमानी नागरीकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. कमकुवत मनाच्या अन आपली जबाबदारी कायम दुसर्‍यावर टाकू पाहणार्‍यांसाठी हे पुस्तक नाही.

छान परीक्षण, योग! पुस्तक वाचण्याची इच्छा झाली आहे!>>>>> अजून एक द्रुष्टीकोन म्हणजे....साहित्यात/analysis मधे पडण्यापेक्षा अशोक कामटे सारखा एक तरी अधिकारी होता यात मला जास्त समाधान वाटतं.....हेच rare झालय आज काल....I have met him and believe me....he was a great personality to feel proud of..........हे खरं!!.....विंग्रजी मधे टाईपल्या मुळे माफी....

मीपण हे पुस्तक वाचले. खुप तळमळीने लिहिलेय हे पुस्तक आणि खुप परिश्रम घेतलेत विनिता कामटे यानी ह्या पुस्तकासाठी हे जाणवतं आणि पटतंही.

Pages