योध्दा कवि नारायण सुर्वे (सरीता पदकी)

Submitted by परदेसाई on 10 December, 2010 - 10:49

**********
पुढील लेख हा सुप्रसिध्द लेखिका सरीता पदकी यांचा असून मायबोली पध्दतीच्या टायपिंगची मदत म्हणून मी टाकत आहे
**********

'कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतानो, थोडा गुन्हा घडणार आहे'

अशी ललकारी ठोकीतच कवितानारायण नारायण सुर्वे मराठी कवितेच्या मैदानात उतरले. आणि ते मैदान त्यांनी आयुष्यभर गाजवले. आताही मागे उरलेली त्यांची धगधगती कविता ते काम करतेच आहे हे त्यांच्या जाण्यानंतर प्रसिध्द झालेल्या अगणित आठवणींनी आणि धन्यवादांनी दाखवून दिलेले आहे.

गंगाराम सुर्वे हे मुंबईतले दरिद्री गिरणकामगार. सकाळी भोंगाकुत्री ओरडली की गिरणीत हजर व्हावं, दिवसभर राबून रात्री चाळीत परत यावं हा त्यांचा दिनक्रम. पण एक दिवस अघटित घडलं. संध्याकाळी घराच्या वाटेवर ते एका कचराकुंडीपाशी आले तर त्यांना तिथून तान्ह्या बाळाच्या टाहोचा आवाज ऐकू आला. जवळ जातात तर खरंच दुपट्यात गुंडाळलेलं एक तान्हं बाळ कुणीतरी तिथं टाकून दिलेलं होतं. हजारो जणांनी ते पाहिलेलं असणार, ते अंग चुकवून निघून गेले असणार पण आपलं भाग्य थोर की गंगारामांनी ते बाळ घरी आणलं, त्याला आपलं म्हटलं, त्याला नारायण हे नांव दिलं, चौथीपर्यंत शिक्षण दिलं. पुढे जेव्हा ते कोकणातल्या गावी कायमचे निघून गेले तेव्हा त्यांनी जाताना नारायणाच्या हातात दहा रुपये दिले. तेव्हा नारायण दहा वर्षांचा होता. गिरणीकामगार, खाटीक, नालबंस, वेश्या यांच्या सहवासात वाढलेला नारायण लहानमोठी घरगुती कामं करून शेवटी बालकामगार म्हणून गिरणीत लागला.

त्यावेळी गिरणीत कम्युनिस्ट चळवळ जोरात होती. डांगे, परूळेकर असे पुढारी तिथे कार्यरत होते. शाहिर अमर शेख, गवाणकर असे लोक कामगारांना स्फुर्ति देत होते. या वातावरणात नारायण सुर्वे भारले गेले, डाव्या चळवळीसाठी कामं करू लागले. पोस्टरं चिकटव, मोर्च्यात भाग घे, संपात सहभागी हो असं करू लागले. मध्येच गालिबचा अभ्यास झाला. आणि या सार्‍या अनुभवांतून सुर्व्यांच्या आगळ्यावेगळ्या कवितेला कंठ फुटला.

'ना घर होते ना गणगोत
चालेन तेवढी पायाखालची जमीन होती'

'घडवतो लोहार हातोड्याने, तसा घडवला गेलो' असं ते स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगतात.
'अश्या या नंग्यांच्या दुनियेत, चालायची वाट नारायणा, लक्षा ठेव सगळ्या खाणाखुणा,' असं ते स्वत:ला बजावतात.

जसा स्वतःच्या आयुष्याबाबत तसाच कवितालेखनाबाबत आगापिछा नव्हता. बरोबरच आहे, नारायण सुर्व्यांचं अनुभवविश्वच इतकं आगळंवेगळं होतं की 'मराठी सारस्वतांच्या कवितेत त्यांला उद्गार मिळालेला असणं' शक्यच नव्हतं.

मराठी कवितेचं भाग्य हे की सुर्व्यांनी प्रस्थापिक कवितेची सोयिस्कर, रुळलेली वाट पकडून प्रसिध्दि मिळवण्याचा हव्यास बाळगला नाही. 'फॅशनेबल फ्रस्टेशन आणि रोमँटिक रिव्होल्यूशनिझम' च्या वाट्याला आपण गेलो नाही असं ते स्वत:च सांगतात.

मराठी चौथी शिकलेल्या सुर्व्यांनी सुरूवातीची काही वर्षं म्युन्सिपल शाळेत शिपायाच्या नोकरीत वेळ घालवला. मग पत्नीच्या आग्रहावरून त्यांनी सातवीची परीक्षा दिली स्वत:च्या मुलाबरोबर! आणि गम्मत अशी की त्यांना स्वतःचीच कविता अभ्यासाला होती! सातवीनंतर त्यांनी शिक्षक नव्हे मास्तर होण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांची मास्तर म्हणून बढती झाली. एकाच शाळेत मुलगा विद्यार्थी, आई शिपाईण, आणि वडील मास्तर असा योग आला.

कृष्णाबाई - सुर्व्यांच्या पत्नी लग्नाआधी त्यांच्या शेजारीच रहात होत्या, अनाथ होत्या, आजोळी रहात होत्या. या दोघांनी लग्न ठरवलं पण ते मामांना पसंत नव्हतं कारण सुर्व्यांना ना जात होती ना घराणं. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. कॄष्णाबाईंनी नारायणरावांना जन्मभर साथ दिली. नंतर आत्मचरित्रही लिहीलं 'मास्तरांची सावली'. ते आवर्जून वाचण्यासारखं आहे.

सुर्व्यांनी जन्मभर कविता लिहीली - स्वत:च्या अनुभवांशी प्रामाणिक राहूनच. 'माझे विद्यापीठ', 'ऐसे गा मी ब्रम्ह' असे काही काव्यसंग्रह त्यांचे आहेत. त्यांनी स्वतःच्या काव्यविषयक भुमिकेविषयीही लिहिलेलं आहे.

अनेक मानसन्मानांनी त्यांना गौरवलं गेलं आहे. ते कामगार साहित्यसम्मेलन, कोकण साहित्यसम्मेलन, अखील भारतीय मराठी साहित्यसम्मेलन अशांचे अध्यक्ष झाले पण गेले तिथे साधेपणानेच वावरले. कबीरसन्मान, सोव्हिएतलँड पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांच्या पायावर लोळण घेतली. त्यांना 'पद्मश्री' पदवी देण्यात आली. त्यांच्यावर एक चांगला अनुबोधपटही निघाला आहे.

कुसुमाग्रजांसारख्या क्रांतीकविशी सुर्व्यांचं आगळं वेगळंच नातं होतं. सुर्व्यांच्या कवितांच्या इंग्रजी अनुवादाला कुसुमाग्रजांची प्रस्तावना होती. आणि सुर्व्यांच्या मुलीच्या लग्नात सोयर्‍यांनी जातीपातीच्या प्रश्न काढून अडचण आणू नये म्हणून कुसुमाग्रजांनी नारायण सुर्व्यांना दत्तक घेऊन टाकलं! प्रश्न मिटला की नाही?

नारायण सुर्वे आणि मी एकाच वेळी कविता प्रसिध्द करू लागलो. अर्थात दोघांची अनुभवविश्व वेगळी त्यामुळे कवितांचा बाज वेगळा. पण अनुभवाशी प्रामाणिक राहाण्याची पध्दत एकच. योगायोगानं एकदा एका संस्थेनं सुर्व्यांचा सत्कार माझ्या हस्ते करायचं ठरवलं. मला परमानंद झाला. सत्कारानंतरच्या भाषणात सुर्वे म्हणाले, 'सरिताबाईंनी मला कविता लिहायला शिकवलं' ते गौरवोद्गार अगदी अनाठायी होते हे कळूनही मला कायम आनंद देतात.

आपल्या एका प्रेमकवितेत सुर्वे पत्नीला सांगतात:-

जेव्हा मी या अस्तीत्वाच्या पोकळीत नसेन,
तेव्हा एक कर,
तू नि:शंक मनाने डोळे पूस,
ठीकच आहे, चार दिवस धपापेल, जीव गदगदेल
उतू जाणारे हुंदके आवर,
कढ आवर, नवे हिरवे चुडे भर
उगीचच चिरवेदनेच्या मागे लागू नको
खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर
मला स्मरून कर,
हवे तर मला विस्मरून कर

१६ ऑगस्ट २०१० रोजी नारायण सुर्वे खरोखरच अस्तीत्वाच्या पोकळीतून नाहीसे झाले. त्यांना माहीत नव्हतं का की एक एवढं महत्वाचं आवडीचं माणूस नाहीसं झाल्यावर त्याच्या जागी दुसरं माणूस आणणं एवढं सोपं नसतं?

मग तो त्यांच्यासारखा कवि असल्यावर काय.....

सरिता पदकी.

गुलमोहर: 

उगीचच चिरवेदनेच्या मागे लागू नको
खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर
मला स्मरून कर,
हवे तर मला विस्मरून कर
>>
बापरे , मला स्मरून कर म्हणायलाच किती हिंमत लागेल, विस्मरुन कर म्हणणे तर अशक्यप्राय! केवढी जिगर पाहिजे असं लिहायला !!