बाहुलीची टोपी

Submitted by आनंदयात्री on 9 December, 2010 - 11:45

बाहुली म्हणे टोपी हवी
घालायला पण सोप्पी हवी
त्यावर माऊचे कान हवे
छोटे गोरेप्पान हवे
आणखी हवंय बदामी फूल
त्यावर सुंदर मोत्यांची झूल
रंगीत डोक्यावर चांदण्या फुले
टोपीच्या गोंड्यावर चांदोमामा डुले
टोपीच्या भवती सोनेरी नक्षी
इवल्याशा पंखांचा पिटुकला पक्षी

टोपी घालून भूर गेली
ढगांमधून दूर गेली
तिथे होत्या पऱ्याच पऱ्या
चॉकलेटचे डोंगर आणि आईसक्रीमच्या दऱ्या
मिठाईच्या जंगलात बर्फीचे रस्ते
झाडा-झाडांवर केशर-पिस्ते
बाहुलीच्या डोक्यावर माऊची टोपी
दिसायला सुंदर घालायला सोपी
पऱ्यांच्य़ा राज्यात एकच गडबड
टोपीसाठीच सगळी धडपड

पऱ्या म्हणाल्या बाहुलीला
"टोपी दे ना आम्हाला!
आमच्याकडे कमी नाही,
पण आमच्याकडे टोपीच नाही
आम्हाला घालावा लागतो मुकूट
त्यातून नाही कसलीच सूट
मागशील ते तुला देतो
जादूचा झूला देतो
झुल्यात बसून फ़िरता येईल
हवं तिथं जाता येईल"...

बाहुलीला पण टोपी प्यारी
पऱ्यांचाही हट्ट भारी
बाहुली म्हणे,"विचार करते,
आधी झुल्यात बसून तर बघते!"
झुल्यात बसून निघाली भूर
पऱ्यांच्या गावातून भलतीच दूर
वाटेत सुटला वारा मध्येच
उडाली टोपी लागली ठेच
बाहुली बिचारी हिरमुसली
टोपीसाठी आसुसली
शोधून शोधून दमून गेली
तळ्याकाठी निजून गेली
रात्री देवबाप्पा आला
हळूच टोपी ठेवून गेला

टोपी मिळताच खुदकन हसली
बाहुलीच्या टोपीची गोष्टच संपली

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2010/12/blog-post.html)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प-यांनाही jealous feel करायला लावणारी ही बाहुली आवडली नच्च्या! गेल्या दहा हजार बालपणात इतकं गोड बालगीत वाचलं नसेल कुण्णी! हे गाणं म्हणून ऐकायला अजून आवडेल. जियो! Happy

कर्णिकसाहेब, दक्षिणा, झाडा, धन्यवाद! Happy

गेल्या दहा हजार बालपणात इतकं गोड बालगीत वाचलं नसेल कुण्णी! >>>
कसंच कसंच!!!!
Blush

भुंगा, रैना, मेरा कुछ सामान,(id ने तुम्हाला संबोधणे अवघड आहे.. Happy आणि नावही माहित नाही. क्षमस्व! ), कविता
thanks!! Happy

अतिशय गोंडस कविता आहे ही....
मुलांचं विश्व समजून घेऊन ते शब्दांत पकडणं अतिशय अवघड असतं असं नेहमीच वाटतं!
ही गोडच झालीये कविता Happy
धन्स!
मी प्रिंट करून घेतली असून माझ्या शानूल्या पुतण्याला ऐकवणार आहे!

आनंद, कित्ती गोड कविता आहे. सुपर्ब ! काय काय येतं रे तुला.... तु ट्रेकिंगवाला टफ, तु गझलेत गुंग, तु कवितेत कल्पक आणि आता बडबडगीत पण? एकदम All rounder हां! Happy

तिथे होत्या पऱ्याच पऱ्या
चॉकलेटचे डोंगर आणि आईसक्रीमच्या दऱ्या
मिठाईच्या जंगलात बर्फीचे रस्ते
झाडा-झाडांवर केशर-पिस्ते >>> सानिका बरोबर मला या ट्रेकला यायला नकीच आवडेल ! Happy लव्ककर !! अरेन्ज कर प्लीज ! Happy

अरेच्चा! बरीच जुनी कविता वर आली!

बागेश्री, पेशल ठांकू! Happy

धन्स दोस्तहो!

मनिमाऊ, :लाजलेला बाहुला:

विश्वेश, नक्कीइइइइइइइइइ!!
एक पाऊस होऊन जाऊदे! मग सह्याद्रीत कवितेमधलं पर्‍यांचंच राज्य येतं!
Happy

Pages