पारिभाषिक शब्दप्रयोग

Submitted by ladtushar on 11 April, 2008 - 00:00

मराठी भाषेत वापरले जाणारे इंग्रजी व इतर भाषीय शब्द व नव नवीन वैज्ञानिक संज्ञा यांचे मराठी समान अर्थी व नाविन्य पूर्ण शब्द प्रयोग प्रचलित करण्या साठी हा उपक्रम सुरु करावा अशी कल्पना (झक्की यांच्या प्रेरणेने) सुचली. खरे म्हणजे नेहमी सारखे सारखे प्रतिक्रिया आणी उपहासात्मक बोलण्या पेक्षा काही तरी उपक्रमातुन क्रिया करणे गरजेचे आहे. ते प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रयत्न.

आपल्या मायबोलीवर सर्व क्षेत्रातील व्यक्ती येतात, तर प्रत्येकाने थोडासा हातभार लावून आपल्या रोजच्या व्यवहारातील पारिभाषिक शब्दांना मराठी शब्द सुचवून या समुहा ची शोभा वाढवावी अन आपली मराठी बोली भाषा वृद्धिंगत करावी ही विशेष विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द
२८ मे २००८
- अमेय गोगटे (म.टा.)

महापौर, अर्थसंकल्प, दूरदर्शन या शब्दांची निर्मिती सावरकरांनी केली आहे, हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. पण याव्यतिरिक्त अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. त्यांची ही भाषाशुद्धी चळवळ खूपच गाजली. त्यांच्या या शब्दसंपदेबद्दल...
...............................

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे असंख्य खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।।

असं सुरेश भटांनी सांगितलं असलं तरी आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ‘ यू नो ’ , ‘ यू सी ’ हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं. अशा परिस्थितीत, काही राजकारणी मंडळी मराठी माणसामधलं मराठीप्रेम जागवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या भाषाशुद्धीच्या विचाराचा आज विचार व्हायला हवाय...

संवादाचं माध्यम आणि अभिव्यक्त होण्यासाठीचं साधन, म्हणजेच भाषा का ? तर, नाही. भाषा ही संस्कृतीचं द्योतक असते, संस्कृतीची वाहक असते. संस्कारातून संस्कृती घडत असते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होत असतात. पण अनेक शतकं मराठी भाषेवर आक्रमणं होत होती. त्या काळात अनेक परकीय शब्द मराठी भाषेत समाविष्ट झाले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा, हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारशी भाषेतून आलेत हे आज सांगितल्याशिवाय अनेकांना कळणारही नाही. या संकरामुळे मराठी भाषा समृद्ध झाली, असं अनेकांना वाटतं. आजही इंग्रजी शब्द मराठीत आल्यानं मराठी संपन्न झाली, असंच भाषातज्ज्ञही म्हणतात.

पण, सावरकरांना हे मत मान्य नव्हतं. १९२४ मध्ये केसरीतून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे. ‘ परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले, ही आमची विजय-चिन्हंच नाहीत का ?’ , असा प्रश्न दत्तोपंतांनी सावरकरांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘ ती काही आमची विजय-चिन्हं नाहीत ; ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत .’ सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थानं योग्यही आहे. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतानाही दुस-या भाषेचा आधार का घ्यावा ?

‘ आपण बहुधा हयगय करून कधी कधी निरुपाय म्हणून आणि इतर वेळी ऐट म्हणून आपल्या बोलण्यात-लिहिण्यात परकीय शब्द वापरतो. ते जितके अधिक वापरले जातात , तितके त्या अर्थाचे आपले शब्द मागे पडतात . पुढे पुढे तर त्या शब्दांवाचून तो अर्थ व्यक्‍तच होत नाही , असे वाटू लागते. ते परशब्द आपलेच झाले , असे खुळे ममत्व वाटू लागते आणि पर-शब्द आपल्या भाषेच्या हाडीमाशी रुतून बसतात ' , असं विश्लेषण सावरकरांनी केलंय.

‘ स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं , हे औरस मुलांना मारून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे. तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नव्हे , तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही. आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी , फारशी इत्यादी परक्या भाषांमधून शब्द घेणे , म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीचे कप हाती घेण्यासारखे नाही का ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि अनेक पर-शब्दांना मराठमोळे प्रतिशब्द सुचवले. हे शब्द किचकट होते, संस्कृतप्रचूर होते आणि समजायला परभाषी शब्दांपेक्षाही कठीण होते अशी टीका काहीजण करतात. पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आज ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं.

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.

किती सहज रूळलेत हे शब्द, नविन आहेत असे अजिबात वाटत नाहीत.

तुषार, खूप खूप धन्यवाद. मस्त माहिती लिहिली आहेस. असेच लिहित रहा मित्रा..

असे बरेचदा ऐकण्यात येते की वरील शब्द माहित असूनही वापरल्या जात नाहीत. नुकत्याच बघितलेल्या एका मराठी चित्रपटात एका बाजूची वकील न्यायाधिशांना म्हणते' ... परवानगी द्यावी.' एक मिनिटाने लगेच प्रतिपक्षाचा वकील न्यायाधिशाला म्हणतो ' ... permission द्यावी'. काही गरज आहे का उगीचच इंग्रजी शब्द घुसडण्याची? पण नाही. इंग्रजीत बोलायचे!

माझ्या मते, निदान आमच्या काळात तरी असा दृढ समज होता की इंग्रजीत बोलणे म्हणजे सुशिक्षितपणाचे लक्षण आहे, त्याने दुसर्‍यावर चांगली छाप पडते. आताच्या जागतिकीकरणानंतरहि तो समज कमी झालेला दिसत नाहीये. परदेशात जाऊन आल्यावर तरी लक्षात यायला पाहिजे होते की इंग्रजीत बोलणारे लोक किती मूर्ख असू शकतात. मला तर आजकाल वाटते की निदान मायबोलीवर, इतर मराठी मित्रांशी मी मराठी बोललो नाही तर ते मलाच बावळट अमेरिकन म्हणतील.

सावरकरांनी इतके सारे शब्द मराठीमध्ये आणले ह्याची कल्पना देखील नव्हती. नगरपालिका, महापालिका, नेपथ्य, प्राचार्य इत्यादी शब्द शंभर वर्षांपूर्वी अस्तित्त्वात नव्हते असे वाटत देखील नाही. धन्यवाद तुषार ही माहिती पुरवल्याबद्दल

दुरदर्शन हा शब्द त्यांनी आणला नसावा. तेव्हा हे माध्यमच न्हवते.

सावरकर १९६९ ला वारले. दूर दर्शन भारतात १९५२ की १९५८ की आले होते. त्यामुळे सावरकराना दूरदर्शन माहीत असणे शक्य आहे. तसे त्यांचे समकालीन घटनांचे वाचन असणारच असे वाटते .तसेच क्रिकेटमधले यष्टी, फलन्दाज गोलन्दाज, क्षेत्ररक्षण असे बाळ पन्डीतीय शब्दही त्यांचेच आहेत असे म्हणतात....

परदेशात जाऊन आल्यावर तरी लक्षात यायला पाहिजे होते की इंग्रजीत बोलणारे लोक किती मूर्ख असू शकतात.

झक्की साहेब, इंग्लन्डातले आणि अमेरिकेतील अशिक्षीत लोकही चक्क इन्ग्रजी बोलतात. नाही तर आपले सुशिक्षिताना देखील धड इन्ग्रजी येत नाही....

'फर्निचर' साठी 'काष्ठसज्जा' असा शब्द माझ्या वाचण्यात आला आहे. अर्थात तो संस्क्रुतप्रचुर वाटतो.

अहो माझे धन्यवाद कशाला.. एवढे काही महान काम नाही हे.....धन्यवाद तर सावरकरांचे मानायाला हवेत. खरच किती धन्य आहे ती अजरामर वक्ती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांना शतशः नमन! (मे २८ , १८८३ – फेब. २६ , १९६६ )"स्मरण त्या क्रांती घडवणार्‍या क्रांतीकारीचे"

मला १९८३ साली पु.ल.देशपांडे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग इथे टाकावासा वाटतोय्

सावरकरांचे विचार आणि उच्चार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे.मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक घटक असतो.सामर्थ्याच्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राजवटीच्या गुलामगिरीतुन ,अवलबिद्वातुन वाचवण हा विवेक सावरकरांच्या भाषाशुध्दीच्या चळवळीमागे होता.वास्तविक इंग्रजीवर त्यांच चांगलच प्रभुत्व होत.मराठी भाषणाच्या ओघात एखादा मुळचा इंग्रजी उतारा ते स्मरणाने घडाघड म्हणायचे.कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रह्मण्यम मानले नाही.त्यांना अमान्य होत ते दुबळेपणाच्या भावनेने विदेशी भाषेतील शब्दांची घुसखोरी चालू देण.सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजवुन घेतली नाही,त्यांनी त्यांच्या भाषाशुध्दीची चेष्टा केली.हे शब्द रुढच होणे शक्य नाही असे म्हणायला सुरुवात केली.पण ते सरकारी शब्दांच्या टाकसळीत तयार केलेले शब्द नव्हते.एका प्रतिभावंत कवीची ती निर्मिती होती.सरकारात मोले घातले रडाया (का खरडाया) या भावनेने भाषाशुध्दीचे पगारी कर्मचारी जेंव्हा बसतात तेंव्हा 'घे इकडची इंग्रजी डिक्शनरी अन कर त्याचा मराठी शब्दकोष'असा व्यवहार चालतो.सावरकरांना तो शब्द कोशात पडुन रहाणारा नको होता.तो कवितेसारखा लोकांच्या तोंडी रुळायला हवा होता.त्यांनी रीपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला.वार्ता खेचुन आणणारा.इथे इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द असे न होता एक कविनिर्मित प्रतिमा तयार झाली.प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले.हे शब्द सावरकरनिर्मित आहेत याचादेखील लोकांना विसर पडला.आज महाराष्ट्रात लोकांना मेयरपेक्षा महापौरच जास्त परीचित आहे.वृत्तपत्राच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक शब्द त्यांनी दिले आहेत.तीच गोष्ट चित्रपटसृष्टीची. दिग्दर्शक,संकलन्,ध्वनीमुद्रण,पटकथा ही त्यांचीच निर्मिती.मराठीला त्यांच हे स्वत्व जागवण्यासाठी दिलेले एक मोठ देण आहे.शिवाय ते एक उत्तम वक्ते असल्याने शब्दनिर्मिती करताना उच्चारातील सोपेपणाही त्यांनी सांभाळला.पुष्कळदा मला वाटत की भाषेचे सामर्थ्य म्हणजे काय ,ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडुन सावरकरांचे 'माणसाचा देव्,विश्वाचा देव',दीन शब्दात संस्कृती हे निबंध मोठ्यानी म्हणुन घ्यावेत.

काही वर्षांपुर्वी मी सांगलीमधे म्हैसाळ म्हणुन एक गाव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा एक प्रयोग आहे तो पहायला गेलो होतो.भारताच्या उत्तम शेति प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे .एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रीयांच्या अंगावर लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नसायची म्हणुन त्यांच झोपडीच्या बाहेर पडण मुश्किल होतं. त्या समारंभाला आम्ही गेलो तेंव्हा त्या दलित वस्तीतील सर्व स्त्रीपुरुष आपल्याकडे लग्नसमारंभाला जावे तसा पोषाख करुन तिथे जमली होती.सहकारी शेतीने त्यांच्या आयुष्यात आर्थिक परीवर्तन घडवुन आणल होत आणि ते केवळ आर्थिक परीवर्तन नव्हत हे लगेच माझ्या लक्षात आलं.त्या स्त्रीया समारंभाला गाणे म्हणनार होत्या.हल्ली कुठेही सभेला गेलो की गाणी ऐकावी लागतात. ती बहुदा सिनेमातली अथवा प्रसंगाला साजेशी अशी तिथल्याच शाळेतल्या गुरुजींनी कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करुन जुळवलेली स्वागतपर पद्द्य.आणि येथे पेटीवाल्यांनी सुर धरला,तबलजींनी ठेका सुरु केला आणि अस्खलीत वाणित त्या दलित भगिनींनी गाणे सुरु केले ' जयोस्तुते,श्री महन्मंगले श्रीवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती' . माझ्या अंगावर सर् कन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारण्यासाठी,त्यांना मोकळेपणानी गाता याव ,बागडता याव म्हणुन सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करीत ज्या सावरकरांनी जीवाच रान केल त्या सावरकरांनी रचलेल हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रीया बिनचुकपणे उत्तम सुरतालात गात होत्या.एखाद्याच पुण्य फळाला जाण म्हणजे काय याचा मला त्याक्षणी अनुभव आला.

चिन्या१९८५ -- छानच माहिती मिळाली. धन्यवाद..

'माणसाचा देव्,विश्वाचा देव',दीन शब्दात संस्कृती हे निबंध मोठ्यानी म्हणुन घ्यावेत>> मला हे नक्की काय आहे ते कळलं नाही. खरचं सावरकरांचा असा काही निबंध आहे का?...

खूप धन्यवाद चिन्या हा उतारा टाकल्याबद्दल. सूर्यही दिपेल असे प्रखर बुद्धीवैभव ते.

  • *** The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine, and probably not necessary. ***

चिन्या, सही रे....अनुमोदन!

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे.
हे गाणे खुपच सुरेल आहे...यशोयुतां वंदे हा स्वर लता नी खुप छान लावला आहे.
हे ऐकले कि नेहमिच भरभरुनयेते....जेव्हा त्यांना हे सुचले असेल तेव्हा ते त्यांनी किती भरभरुन लिहिले असेल हे जाणवते. हा थोर कवी त्याच्या बाल्यातच कवीता अन पोवाडे रचत होता म्हणे...या वरुन त्यांच्या कवी मनाची अन काव्यात्मक प्रतीभेची कल्पना येते.

स्लार्ती,बी,तुशार हे भाषण इंटरनेटवर आहे. पुर्ण भाषणात अनेक छान मुद्दे लिहिले आहेत. पुलंनी हे भाषण बहुतेक अंदमानच्या सेल्युलर जेलच्या बाहेर केले होते.बी ते निबंध सावरकरांनी लिहिले असतीलच ना. नाहीतर पुल तस कशाला म्हणतील??

"त्यांना अमान्य होत ते दुबळेपणाच्या भावनेने विदेशी भाषेतील शब्दांची घुसखोरी चालू देण." >> हे एकदम पटलं.
"एखाद्याच पुण्य फळाला जाण म्हणजे काय याचा मला त्याक्षणी अनुभव आला." >> वा !
छान उतारा.

खुप छान माहिती मिळाली.

चिन्या कृपया लिंक देतोस का?

अरे निबंध असेलच.. पण् कुठल्या पुस्तकात मिळेल असे मला विचारायचे होते.

चिन्या, तुषार मस्तच बरं!!
तुषार छान बा.फ. चालु केला आहेस.

सावरकरान्चे नाव घेतले की त्यान्चा स्वातन्त्र्य सन्ग्रामातील सहभाग आठवतो.पण मराठी भाषेला त्यानी दिलेले योगदान फार थोड्या लोकाना माहित असेल.तुषार धन्यवाद , आणि चिन्या१९८५ उतारा खुपच छान आहे

रॉयल्टी' साठी 'स्वामित्वरक्कम' हा शब्द वाचनात आला.

स्वामित्व धन हा बरोबर शब्द आहे. रक्कम हा शब्द फारसी आहे

मी गंमत म्हणून मागे लिहिलं होतं भाषा याच विषयावर मा़झ्या ब्लॉगमध्ये. वाचाल? तुमच्या कॉमेंट्स नक्कीच आवडतील.

- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

प्रिफेक्चर (prefecture) ला मराठीत काय म्हणतात? (उदा. जपानमधील ओकिनावा प्रिफेक्चर)