उस्ताद आमिर खां - पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करणारे गायक

Submitted by षड्जपंचम on 6 December, 2010 - 00:19

टीप : ह्या लेखातील खां साहेबांच्या शिक्षणाबाबतचे, त्यांच्यावरील इतर गायकांच्या प्रभावाबाबतचे संदर्भ कधी आंतरजालावरून वाचलेले, कधी मोठ्या लोकांकडून ऐकलेले असे आहेत.. त्यांच्या गायकीचे विश्लेषण मात्र माझे आहे. फोटो आंतरजालावरून ..

जगात ज्या काही कला आहेत त्यामध्ये संगीत ही सर्वश्रेष्ठ कला मानली गेली आहे. भारतीय शास्त्रीय संगीत ऐकणारा वर्ग तसा कमीच आहे. पण भारतीय शास्त्रीय संगीतात असणारी खोली, भावपूर्णता, वातावरणनिर्मितीची क्शमता ह्यान्ना तोड नाही. भारतीय संगीत हा संगीताचा अतिशय विकसित असा आविष्कार म्हणता येईल. आणि त्यामुळेच बरेच गायक-वादक, संगीतकार, जाणकार आणि संगीतरसिक शास्त्रीय संगीताला अतिशय मानाचा दर्जा देतात. अशा शास्त्रीय संगीतातील थोर गायक आमिर खां साहेबांबद्दल आज थोडेसे लिहितोय..

मला शास्त्रीय संगीताची आवड (माझ्या मित्रांच्या मते ’वेड’) तशी अलीकडच्या काळात निर्माण झाली. मी जुनी गाणी, भावसंगीत आधीपासून ऐकतोय पण शास्त्रीय संगीताची आवड तशी अलीकडची. तीही अशीच आपोआप. गायला वाजवायला शिकायचं असं ठरवून नाही. ज्यावेळी गाणे ऐकायला सुरूवात केली तेव्हा माझ्या 3-4 जाणकार परिचितांना विचारले होते. कुणाचे गाणे-वाजवणे पहिल्यांदा ऐकावे, कुणापासून सुरूवात करावी इत्यादी. गायनाच्या बाबतीत अनेकांची नावे कळाली. आणि आमिर खां हे नाव प्रत्येकाच्या तोंडून मी ऐकले...

USTAD-AMIR-KHANSAHEB.jpg

आमिर खां साहेबांना मी ज्यावेळी पहिल्यांदा ऐकले ती आठवण मी कधीही विसरणार नाही. तेव्हा शास्त्रीय संगीताच्या बाबतीत मी शून्य होतो.. (ह्या वाक्यातील शास्त्रीय हा शब्द वगळला तरी चालेल). शास्त्रीय वादन मी थोडे-थोडे ऐकू लागलो होतो आणि आवड ही निर्माण झालेली.. पण शास्त्रीय गाणे म्हणजे काहीतरी 'आ आ उ ऊ' असणार असा स्वत:शीच समज करून मी गायन फारसे ऐकत नव्हतो. जाणकारांच्या आदेशानुसार मी आमिर खां साहेबंचे एक-दोन राग मिळवले होते आणि माझ्या मोबाईल वर कॊपी करून ठेवले होते. ते ऐकायचा योग मात्र बरेच दिवस येत नव्हता. शेवटी तो योग आला. मी असंच निवांत खुर्चीत बसलो होतो. कानाला हेडसेट लावले, आणि त्यांचा दरबारी सुरु केला. थोडीशी आलापी झाल्यावर त्यांनी स्थायी ला सुरुवात केली .... 'ऐरी बीर की ..... ' .... ते 'की ' वर आले आणि माझ्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला. हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो.. त्यावेळी मला सम-बिम हा प्रकार अजिबात माहित नव्हता. स्थायी म्हणजे काय हे पण माहित नव्हते. सम ह्या प्रकारचे तालाच्या पहिल्या मात्रेशी काही नाते आहे ह्याची पुसटशी सुद्धा कल्पना मला नव्हती. तरीही खां साहेबांनी घेतलेल्या समेला जो अनुभव आला तो मी कधीच विसरणार नाही. कुणाच्या गाण्यामुळे असं काही होऊ शकतं हेच माझ्यासाठी नवल होतं. शास्त्रीय गायनाकडे आकर्षण निर्माण होण्यास खां साहेबांची ती 'हाय-टेक' मैफिल कारणीभूत ठरली. अजूनही खां साहेबांना ऐकताना असा अनुभव येतो. शब्दांच्या पलीकडला..

आमिर खां साहेबांचा जन्म १९१२ साली अकोल्यात झाला. त्यांनी त्यांचे बालपण मात्र इंदोर मध्ये व्यतीत केले. खां साहेबांचे वडील उस्ताद शाहमीर खां हे सारंगिये होते . त्यामुळे घरात लहानपणापासून संगीताचे वातावरण होते. आमिर खां साहेबांचे वडील हेच त्यांचे प्रथम गुरु होत. आमिर खां साहेबांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यामुळे घरापासूनच सुरु झाले. आमिर खां साहेबांचा रियाझ मेरुखंड पध्दतीवर आधारलेला असायचा.. रागविस्ताराच्या दोन पद्धती . एक उपज पद्धत आणि दुसरी मेरुखंड पद्धत. एखाद्या रागाच्या स्वरांच्या शक्य असतील त्या सगळ्या स्वरसामूहांचा रियाझ करण्याची ही मेरुखंड पद्धत. आमिर खां साहेबांच्या आधी ही पद्धत फारशी नावाजलेली किंवा बऱ्याच जणांनी अंगिकारलेली अशी नव्हती . उपज अंगाचे गाणेच जास्त गायले जायचे. खां साहेबांनी मेरुखंड पद्धतीचा बरेच वर्ष रियाझ केला, आणि त्यावर प्रभुत्व मिळवले..

खां साहेबांच्या गाण्यावर मुख्यत: तीन जणांचा प्रभाव मानला जातो. त्यांच्या वेगवान तानांच्या बाबतीत रजब अली खां, सरगम गायनाच्या बाबतीत अमान अली खां , आणि त्यांच्या 'ट्रेड-मार्क' विलंबित खयाल गायनशैली बाबत उ. अब्दुल वाहीद खां (किराणा घराण्याचे दिग्गज अब्दुल करीम खां ह्यांचे भाऊ ). ह्याच तीन गोष्टी नंतर त्यांच्या गायकीतील मुख्य घटक बनल्या.. खां साहेबांनी संगीत समारोह केव्हा द्यायला सुरुवात केली ह्याबद्दल नक्की माहिती माझ्यापाशी नाही. परंतु १९५२ च्या आसपास आमिर खां हे भारतातील सर्वोच्च दर्जाच्या गायकांमध्ये गणले जाऊ लागले होते.

शास्त्रीय संगीतात ज्या गायन-प्रकारांना सर्वात मान दिला जातो ते प्रकार म्हणजे धृपद आणि खयाल. ठुमरी, टप्पे इत्यादी प्रकार उप-शास्त्रीय समजले जातात व खयाल आणि धृपादापेक्षा हलक्या दर्जाचे समजले जातात. आधी धृपद गायन जास्त प्रचलित होते. विसाव्या शतकात (किंवा थोडं आधीच म्हणा) खायालाने धृपादाची जागा घेतली. आजकालच्या कुठल्याही शास्त्रीय गायनाच्या मैफिलीत मुख्य घटक म्हणजे खयाल. सव्वा तास जर मैफिल असेल तर एक तासभर मनसोक्त खयाल गायन ऐकवल्यावर कलावंत समारोपाला पाच दहा मिनिटे एखादी ठुमरी, टप्पा, भजन वगैरे गाऊन मैफिल संपवतो.. आमिर खां साहेब हे सर्वार्थाने पक्के खयालीये होते. त्यांनी सार्वजनिक समारंभात कधीही ठुमरी, टप्पा गायला नाही. कधी कधी खाजगी मैफिलीत ते ठुमरी गायचे असे काही लोक म्हणतात . नक्की माहिती उपलब्ध नाही. त्यांची एकाच ठुमरी रेकॉर्ड झाली आहे ती म्हणजे 'पिया के आवन की '.. ही त्यांनी 'क्शुदितो पाषाण' ह्या बंगाली चित्रपटात गायली होती..

खयाल आणि तराना गायकी हाच त्यांच्या आवडीचा भाग होता. त्यामुळे त्यांच्या खयाल, तराना गायकी विषयीच जास्त लिहेन.

947498742_bcfdd6ac09.jpg

खयाल गायनाच्या पद्धतीत विलंबित खयाल (बडा खयाल) आणि त्यानंतर द्रुत खयाल (छोटा खयाल) हे प्रकार गाऊन राग संपूर्णपणे उलगडायचा प्रयत्न करतात. स्थायी, अंतरा ह्याव्यतिरिक्त आमिर खां साहेबांच्या खयालात तीन घटक प्रमुख मानले जाऊ शकतात. बढत, सरगम आणि ताना. आमिर खां साहेब विलंबित ख्याल गाण्यासाठी अति-विलंबित लयीचा वापर करायचे. ताल शक्यतो नेहमी विलंबित झुमरा असायचा. (मी तरी त्यांना विलाम्बितासाठी दुसऱ्या तालाचा वापर केलेलं फारसे ऐकलेले नाही). खां साहेबांची स्थायी गाऊन झाली की सुरु व्हायची त्यांची संथ, आलापीयुक्त जादूमय बढत. त्यांची बढत ऐकणे हा अक्षरश: स्वर्गीय अनुभव म्हणावा लागेल. रागाचा एक एक सूर उलगडत पूर्ण राग ते अतिशय सुरेखपणे उघडत जायचे. त्यांचे विलंबित लयीवर जबरदस्त नियंत्रण होते. इतक्या संथ लयीत राग विस्तार करणे ही अवघड गोष्ट म्हणावी लागेल. त्यांना मुळातच धीरगंभीर, मनात आपला एक ठसा निर्माण करणारा आवाज लाभला होता. इंग्रजीत 'स्प्रिरिचुअल' म्हणतात तसा. गाताना पूर्ण आकारातच गातील असे नाही. त्यांचा स्वरलगाव अतिशय चांगला होता. एखाद्या रागात एखादा स्वर कसा लावला किंवा उच्चारला जावा हे त्यांच्या मनात व्यवस्थित ठसले गेले होते. एकदा राग व्यवस्थित उलगडला की मग ते सरगम गायचे. त्यांची सरगम ऐकताना त्यांनी मेरुखंड पद्धतीवर केलेल्या तयारीची कल्पना येते. त्या रागात चालणारे असे स्वरांचे अनेक सुरेख patterns ते सरगमे च्या द्वारे रसिकांपर्यंत पोहोचवायचे. विलंबित गाऊन झाल्यावर ते द्रुत खयाल सुरु करायचे.. त्यांच्या ताना अतिशय सुरेख असायच्या.. कितीही वेगवान ताना घेतल्या तरी त्यातील स्वर स्पष्ट लागायचे. गमकयुक्त स्वच्छ, स्पष्ट ताना. त्यांचे छूट तानांवर जबरदस्त प्रभुत्व होते.( एखाद्या स्वरानंतर त्याच्याच जवळचा दुसरा स्वर गाण्याऐवजी मधले काही स्वर वगळून एखाद्या स्वरावर थेट उडी घेण्याच्या तान-पद्धतीला छूट तान म्हणतात). त्यांच्या तानांमधील सुस्पष्टता, सुरेख patterns, छूट तानांचा सुरेख उपयोग ही त्यांच्या तानांची वैशिष्ट्ये म्हणता येतील. मध्य आणि द्रुत लयीत ते शक्यतो झपताल आणि तीनतालाचा वापर करायचे. सुरूवातीपासून शेवटपर्यंत रागाचा भाव कायम राखण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते.

खां साहेबांचे बंदिशेच्या शब्दांचे उच्चारण ही चांगले होते.. ते बंदिश शक्यतो रागाला साजेशी अशीच निवडायचे. ते संगीत समारंभात स्थायी पुष्कळ वेळा दोनदा गात असत. कधीकधी विलंबित गाताना ते अंतरा मात्र सोडून द्यायचे. द्रुत लयीत मात्र अंतरा ते शक्यतो गायचे.. त्यांनी तराना लोकप्रिय करण्यात ही महत्वाचे योगदान बजावले. तराना गाताना ते पुष्कळ वेळा फारसी भाषेतल्या शब्दांचा उपयोग करायचे. अनेक गायक तराण्यात पुष्कळ वेळा तबल्याच्या बोलांचा उपयोग करतात. परंतु आमिर खां साहेब शक्यतो तबल्याचे बोल कधी वापरत नसत. त्यांचे ताराण्याचे बोल आणि सुरेख ताना ह्यामुळे त्यांचा तराना ऐकणे हा एक संस्मरणीय अनुभव असतो.

आणि एका गोष्टीबाबत लिहिणे आवश्यक आहे ते म्हणजे खां साहेबांची ताल आणि लयकारी विषयीची मते. आमिर खां साहेबांच्या गाण्यात तालाचा वापर शक्यतो फक्त ठेक्यासाठीच असायचा. तिहाया ते कधी फारसे घेत नसत. तसेच त्यांच्या गायकीत लयकारी फारशी नव्हती. बोल-बनाव, बोलताना इत्यादी लयकारी संबंधीचे प्रकार त्यांच्या गाण्यात दिसत नाहीत. ह्याबाबत काही लोक खां साहेबांवर टीका करतात. ह्याबाबतीत खां साहेबांना लोकांनी जेव्हा विचारणा केली, तेव्हा लयकारी ही माझ्या गाण्याची प्रकृती नाही असे ते उत्तर देत. खां साहेबांचे म्हणणे पटतेही.. कारण हा प्रत्येकाच्या गायनशैलीचा प्रश्न आहे. उदा . जयपूर घराण्यात स्वर व ताल ह्या दोन्हीना किंमत दिली जाते. त्यामुळे जयपूर घराण्याच्या गायक-गायिकांकडून सुरेख लयकारी ऐकायला मिळते. पण आमिर खां साहेबांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, त्यांचा धीरगंभीर आवाज, त्यांची विलंबित गायनशैली ह्यात लयकारीचा भाग किती चांगला लागला असता हाही प्रश्नच आहे. खां साहेबांची गायकी ही मुख्यत: स्वरावर आधारलेली होती. त्यामुळेच ज्या गोष्टी त्यांच्या मते त्यांच्या गाण्यात व्यवस्थित बसल्या नसत्या त्या त्यांनी बाजूला केल्या.

खां साहेबांची अंधपणे भक्ती करावी असे मी म्हणणार नाही. कारण एखादी गोष्ट अशी असते की मनाला खटकल्यागत होते . मलासुद्धा कधी कधी त्यांच्या एखाद्या रेकॉर्डिंग मध्ये सरगमेचा वापर थोडा जास्त झाल्यागत वाटतो. असे चुकूनच एखाद-दुसरे रेकॉर्डिंग असते. पण हे माझे वैयक्तिक मत आहे. खां साहेब इथे चुकले असे म्हणण्याचा बावळटपणा मी करणार नाही. हे म्हणजे काजव्या इतकेसुद्धा तेज नसताना सूर्याची मापे काढण्याचा प्रकार आहे.. आणि माझे संगीताचे ज्ञान खां साहेबांच्या एक अब्जांश सुद्धा नाही...

आमिर खां साहेब एखादा राग गाताना त्याच्याशी पूर्ण समरूप होऊन जायचे. डोळे मिटून फक्त स्वत:साठी म्हणून गायन. लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी गाणे , स्वत:ची तयारी दाखवायचा प्रयत्न करणे असले प्रकार अजिबात नाहीत. उगाच पोकळ gimmicks करून लोकांना आ वासायला लावून रागाच्या चिंधड्या उडवायचे प्रकार नाहीत. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना साथीला म्हणून कधीही घेत नसत. अनेक वेळा तर ते सारंगी, हार्मोनियम ची साथ सुद्धा घेत नसत. बस तानपुरा आणि तबला! त्यामुळे रागाची भाव-निर्मिती ही पूर्णत: त्यांच्यावर अवलंबून असायची. रागाची भाव-निर्मिती हे त्यांचे ध्येय होते आणि ते स्वत: एक माध्यम बनून गायचे. आणि त्याचा परिणाम त्यांना ऐकले की कळतोच! स्वर्गीय ! ते हयात नसले तरी त्यांचे जुन्या काळाचे काही व्हिडिओ यू-ट्यूब वर पाहायला मिळतील. त्यात त्यांची ती मुद्रा पाहायला मिळेल.. ह्याबाबत आमिर खां साहेबांचे एक वाक्य आहे .. 'नगमा वही, जो रूह सुनाये और रूह सुने' !!

आमिर खां साहेबांनी बरेच राग गायले. शक्यतो ते त्यांच्या गायनशैलीला अनुरूप असे राग गायचे. मारवा, दरबारी, मालकौंस, ललत, मेघ, बागेश्री, हंसध्वनी अशा काही रागांना तर त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. अहिर भैरव, बिलासखानी तोडी, श्री, अभोगी, चारुकेशी, मल्हार, यमन असे अनेक राग त्यांनी सुरेख गायले. त्यांचे अनेक राग भारतीय शास्त्रीय संगीतात मैलाचा दगड ठरले आहेत. त्यांच्या गायनशैली ला अनुरूप न वाटणारे देस, दुर्गा, पहाडी, खमाज असे राग शक्यतो ते सार्वजनिक समारंभात तरी गात नसत. अपवाद फक्त त्यांनी गायलेल्या ठुमरी चा (पिया के आवन की)! तीही त्यांनी सुरेख गायली... भैरवी त्यांनी सार्वजनिक समारंभात कधी गायली नाही. हे राग खासगी बैठकीत क्वचित कधीतरी ते गायचे असे मी इंटरनेट वर वाचले आहे. पण रेकॉर्डिंग नाहीये, आणि खात्रीलायक माहिती सुद्धा नाही. आमिर खां साहेबांनी चित्रपटातही गायन केले आहे. बैजू बावरा मधील ’तोरी जय जय करतार’ हे पुरिया धनश्री रागातील गाणे, शबाब मधील ’दया करो गिरिधर गोपाल’ हे मुलतानी मधील गाणे.. अशी अनेक.

आमिर खां साहेबांनी आपल्या गायकीला 'इंदोर घराणा' असे नाव देत नवीन घराणे स्थापन केले. ह्या महान गायकाचा प्रभाव इतरांवर पडला नाही तरच नवल! गायन काय, वादनावर सुद्धा आमिर खां साहेबांचा प्रभाव पडला. तो सुद्धा घराण्याच्या मर्यादा ओलांडून. महान सितारवादक पंडित निखील बनर्जींवर त्यांचा प्रभाव होता. निखीलजींच्या काळजाला भिडणाऱ्या भावपूर्ण आलापात, सुरेख छूट तानांमध्ये ह्या प्रभावाची झलक दिसते. निखील बनर्जींनी त्यांच्या मुलाखतीतही खां साहेबांचा प्रभाव आपल्यावर पडल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. साहजिकच, गायकांमध्ये तर प्रभाव असणारच! गायकांमध्ये पण पंडित भीमसेन जोशी आमिर खां साहेबांना अतिशय-अतिशय मानत असत. मी वसंत पोतदार ह्यांचे 'भीमसेन' नावाचे पुस्तक वाचले आहे. वसंत पोतदारांनी नमूद केले आहे की भीमसेन जोशी आमिर खां साहेबांच्या फोटोकडे सुद्धा पाय करून झोपत नसत. त्या पुस्तकात आणखीही काही प्रसंग आहेत. प्रभा अत्रे आमिर खां साहेबांकडून शिकल्या नाहीत तरी त्या यांना आपल्या गुरु-समान मानतात.. असे अनेक कलावंत आहेत ... सर्व काही लिहिणे शक्य नाही.

अशा ह्या महान देवदूताचा अंत मात्र मनाला चटका लावून जाणारा झाला. ते १३ फेब १९७४ ला एका कार अक्सिडेंट मध्ये कलकत्त्यात स्वर्गवासी झाले. शास्त्रीय संगीत-रसिक पृथ्वीवर स्वर्ग अनुभवायच्या काही क्षणांना मुकले. परंतु त्यांची सी-डी रेकॉर्डिंग्ज तसेच मैफिलींची रेकॊर्डिंग्ज आज बाजारात, आंतरजालवरील संगीत शेअर करणाऱ्या कम्युनिटीज वगैरे मध्ये पुष्कळ उपलब्ध आहेत. त्यांचे संगीत आज सहजपणे उपलब्ध आहे..

मी बऱ्याच गायकांना-वादकांना ऐकतो. आमिर खां साहेबां प्रमाणेच इतरही काही गायक वादक माझ्या 'favourite list' मध्ये आहेत.. त्या सर्वांचे भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे असे म्हणालो तर ते वाक्य अर्धवट ठरेल. त्यांचे माझ्यासारक्या अनेक रसिकांच्या वैयक्तिक जीवनात पण फार मोठे योगदान मानावे लागेल. पु. ल. म्हणायचे की 'आपल्याला एका तरी कलेचे वेड असणे आवश्यक आहे . रोजचा धंदा हा जगण्यासाठी रोजी रोटी मिळवून देईल पण, हे कलेचे वेड हे का जगायचे हे सांगेल.' अगदी पटतं.. दिवसभर की-बोर्ड बडवून मी जेव्हा ऑफिस मधून बाहेर येतो तेव्हा ह्या सर्वांच्या स्वरांमुळेच मनाला प्रसन्नता, शांती प्राप्त होते. मला तर वाटते खां साहेबांसारखे कलाकार नसते तर कदाचित मी आत्तापर्यंत ठार वेडा झालो असतो.

आजसुद्धा सूर्य मावळती नंतरच्या अंधारात, ज्यावेळी नुकतेच काही तारे उगवले असतात.. त्यावेळी सहजपणेच आय-पॉड कानाला लावला जातो .. त्यांचा मारवा सुरु होतो.. एकेका स्वराबरोबर खां साहेब आजूबाजूच्या वातावरणात मिसळतात.. मारव्याचा कोमल ऋषभ कसा लावावा ही जणू जगाला खां साहेबांनी दिलेली शिकवणच असते.. पूर्ण वातावरण मारवा-मय होऊन जायला लागते. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी ती अवस्था असते. त्यांचे रेकॉर्डिंग संपल्यावर आजूबाजूचे वातावरण पूर्ण बदललेले असते. माझ्यासाठी सृष्टीत फक्त त्यांचा मारवा उरलेला असतो. रेकॉर्डिंग संपल्यावरही मनात त्या मारव्याचेच स्वर अनेक तास घोळत असतात. खां साहेब काही क्षणासाठी पृथ्वीवर अवतरलेले असतात. त्यांच्या मारव्याचे रूप घेऊन. त्यांचेच वाक्य जगाला समजावून सांगण्यासाठी .. 'संगीत रूह से निकलती है.. और रूह उसे सुनती है'....

गुलमोहर: 

वा, वा...... खाँसाहेबांवरचा इतका उत्तम लेख सकाळी सकाळी वाचायला मिळणे म्हणजे आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखेच आहे .....
हे असे सारे दिग्गज कलाकार म्हणजे भूलोकींचे गंधर्वच आणि सगळी हयात गाण्याकरता खर्चली असल्याने ते गाणे बावनकशी न झाले तरच नवल ....

फार फार सुरेख लिहिलंय .... या लेखाकरता मनापासून धन्यवाद...

मा बो वर असे अनेक संगीतज्ञ आहेत - त्या सगळ्यांना एक विनंती की एक अशी लेखमाला येऊंदेत की ज्यात फक्त शास्त्रीय संगीतावर लेख असतील, त्या दिग्गजांच्या आठवणी असतील व त्यांच्या गायन्/वादनाच्या लिंक्स असतील ...... बस्स ..... अशा लिखाणाने डोळे निवतील व ते गायन -वादनाने कान, पर्यायाने आत्मारामदेखील शांत, तृप्त होऊन जाईल .....

पुढील लिखाणासाठी अनेकानेक शुभेच्छा .... (खाँसाहेबांचे स्वर जणु कानात गुंजन करीत आहे इतका सुरेल लेख...)

श्री.शशांक पुरंदरे यांचे मनापासून मी आभार मानतो. त्यानी खास वि.पू. करून मला या अतिशय अभ्यासपूर्ण लेखाची लिंक दिली....अन्यथा मी नक्कीच वाचनानंदाला हुकलो असतो.

उस्ताद आमीर खाँच्या संदर्भात इतकी विस्तृत माहिती लिहिताना षडजपंचम यानी जो विनम्रपणा दाखविला आहे तो स्पृहणीय तर आहेच पण त्यांची स्वत:ची रागदारीबद्दलची आसही त्यातून प्रकट होते. उ.आमीर खाँ यांच्या आठवणींचा खजिना त्यानी उलगडून दिला आहे....त्यात भर घालायची झाल्यास मला उस्ताद अमजद अली खाँच्या मुलाखतीतील त्यांची आदराची एक आठवण स्मरते. कलकत्यातील तानसेन समारोहात भाग घेण्यासाठी सरोदवादक उ.अमजद खाँ दिल्लीहून निघाले पण ते उड्डाण काहीसे उशीरा झाले. रात्रभर चालू राहून पहाटे संपणारी ती मैफल होती. बुजुर्ग कलाकाराच्या गायनाने मैफीलीचा समारोप होत असे आणि त्यावेळी उ.आमीर खाँ हे बुजुर्ग असल्याने संयोजकांनी उ.अमजद खॉं यांची वाट पाहून शेवटी उ.आमीर खाँ याना गायनाची विनंती केली ती त्यानी मानली. त्यांचे गायन सुरू झाले आणि हॉलमध्ये उ.अमजदअली पोचले. संयोजकांना त्यानी अगदी नम्रपणे सांगितले की "उ.आमीर खाँ यांच्यानंतर सरोदवादन करू शकणार नाही." संयोजकांनी त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण उ.अमजदखाँ यानी नकारच दिला. इकडे आमीर खॉसाहेबांचे गायन संपले आणि ते निघाले संयोजकांनी एक युक्ती केली आणि त्यांनाच उ.अमजद अली यांच्या नकाराबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी प्रेमाने तसेच वडिलकीच्या हक्काने म्हणाले “ माझ्यानंतर तू नाहीतर कोण वाजवणार ? जा. वाजव !”. अमजद खाँ यानी नकार न देता ती आज्ञा मानली....स्टेजवर गेले, तर सुरुवात करण्यापूर्वी समोर पाहिले तर घरी जायाला निघालेले उ.आमीर खाँ पुढच्याच रांगेत वादन ऐकण्यासाठी बसले होते. नम्रपणे अमजद अलीनी त्याना विनंती केली की "तुमच्यासारख्यांच्या गायनानंतर मलाच सुचेनासे झाले आहे की मी आता काय वाजवायचे....तेव्हा तुम्ही कृपया घरी जावा आणि आराम करा...." पण उ.आमीर खाँ यानी त्याना धीर देवून वादन सुरू करण्यास सुचविले....आणि अखेरपर्यंत हॉलमध्ये थांबले.....एक सच्चा कलाकारच हे करू शकतो.

उ.आमीर खाँ यांच्या जीवनपटावर "भारतीय चित्र समाचार" तर्फे १९७५-७६ च्या दरम्यान एक डॉक्युमेन्टरी तयार करण्यात आली होती. बर्‍याच सिनेमा टॉकिजमधून ती मुख्य चित्रपटापूर्वी दाखविण्यात येत असे. सहा फूट उंचीचे, अत्यंत साध्या राहणीचे, मुलांना घेऊन बाजारात अगदी भाजीपाला, खेळणी खरेदी करत, त्या त्या विक्रेत्याबरोबर आपुलकीने बोलत चाललेले....रियाझ करत बसलेले....प्रवासातील उ.आमीर खॉं.....अशा अनेक प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर आजही लखलखीत आहेत. दुर्दैव हेच की अशाच एका प्रवासात या स्वरसूर्याचा अस्त झाला.

एका चांगल्या लेखाचा आनंद इथल्या सदस्यांना निश्चित्तपणे मिळाला असणार याची खात्री आहेच.

शशांक जी.... आता या क्षणालाही मला त्या डॉक्युमेन्टरीतील साधेसुधे उस्ताद आमीर खाँ नजरेसमोर दिसत आहेत. ३०-३५ वर्षे होत आली....काय सुंदर काळ होतो तो "फिल्म्स डिव्हिजन" चा, जिथून अशा दिग्गज कलाकारांच्या जीवनाविषयीच्या चित्रफिती काढल्या जात.

मला स्मरते "साधना" नामक ती सीरिअल होती.....दर महिन्याला एक याप्रमाणे थिएटरमध्ये अवतरत असे. पं.रविशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, पं.ओंकारनाथ ठाकूर, श्रीमती हिराबाई बडोदेकर आणि उस्ताद आमीर खाँ... यांच्या लखलखीत कारकिर्दी आमच्यासमोर जादूमयरितीने उलगडत होत्या....त्यावेळी रागदारीमध्ये विशेष गती नव्हती....शास्त्रीय अभ्यासही नव्हता...पण या दिग्गजांच्या नामोल्लेखाने कानाच्या पाळीकडे चटकन हात जात असे.

तुम्हाला कधीतरी कुठेतरी ती सीरिअल पाह्यला मिळाली तर जरूर त्याचा लाभ घ्या.

आता या क्षणालाही मला त्या डॉक्युमेन्टरीतील साधेसुधे उस्ताद आमीर खाँ नजरेसमोर दिसत आहेत. ३०-३५ वर्षे होत आली....काय सुंदर काळ होतो तो "फिल्म्स डिव्हिजन" चा, जिथून अशा दिग्गज कलाकारांच्या जीवनाविषयीच्या चित्रफिती काढल्या जात. >>>

अशोकराव, तुम्ही तरी याबद्दल लिहायचे मनावर घ्याच - कारण तुम्ही वरती प्रतिसादात ज्या प्रेमाने, आदराने यासर्वांबद्दल लिहिले आहे त्यातून तुमचीही याबद्दलची कळकळ जाणवते आहे - तेव्हा लिखाणाचे मनावर घ्याच कसे ... Happy (प्रेमाची पण आग्रहाची विनंती)

खुप अप्रतिम लेख आहे! आपण फार सुरेख आढावा घेतला आहे त्यांच्या गायकीचा.
शशांक, लिंक पाठवल्याबद्दल प्रचंड धन्यवाद. मीही मोठ्या आनंदाला मुकले असते.

डीडी भारती आणि आता इनसिंकमुळे खाँसाहेबांचे गाणे वरचेवर प्रत्यक्षही ऐकायला मिळते आहे आता.

डीडी भारतीवर खाँसाहेबांच्याच एका कार्यक्रमादरम्यान शाहबाझ खानांच्या तोंडून मी असे ऐकले की त्यांच्या मातोश्रींनी त्यांना सुरुवातीची बरीच वर्षे गाणे शिकू दिले नाही कारण वडिलांच्या तोडीचे गाणे मुलाकडून होईल याची त्यांना खात्री नव्हती. ज्यामुळे खाँसाहेबांच्या लौकिकाला आणि मेहनतीला कमीपणा येईल अशी कोणतीही गोष्ट करायला परवानगी नव्हती.

शशांक जी....अहो विनंती कसली करता तुम्ही माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला ? एक काम आहे सध्या... त्याकडे सारे लक्ष लागून आहे....त्यातही संगीत क्षेत्रातील दिग्गजांवर वरील धाटणीचा लेख लिहायचा झाल्यास मला वाचन भरपूर करावे लागणार आहे....ते प्रथम सुरू करतो.

@ सई... तू म्हणतेस तो डीडी भारतीचा शहाबाझच्या उपस्थितीचा कार्यक्रम पाह्यला मिळाला नाही मला... पण डीडी वर नेहमी असे कार्यक्रम प्रसृत होत असतात ही आनंदाची गोष्ट आहे....फक्त वेळ जमून यायला हवी.

शाहबाझ गायन शिकला नाही....आणि दुर्दैवाने उस्ताद अमीर खाँ यांच्या कोणत्याच मुलाने वा मुलीने शास्त्रीय संगीताला जवळ केले नाही....पहिली मुलगी मुंबईत डॉक्टर झाली....दुसरा मुलगा इंजिनिअर होऊन कॅनडात स्थायिक झाला....तर शाहबाझने चित्रपटसृष्टी आपली मानली.....असो.

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.. बर्याच दिवसांनंतर लॉगिन केलं. अजून काही वाचण्याजोगे असेल तर नक्की शेअर करा.

षड्जपंचम.
फार अप्रतिम लेख.

मला तर वाटते खां साहेबांसारखे कलाकार नसते तर कदाचित मी आत्तापर्यंत ठार वेडा झालो असतो.>> अगदी अगदी.
माझीही सुरुवात वाद्यसंगीताकडून व्होकलकडे (ऐकण्याच्या बाबतीत) झाली.
माझे बासरीचे गुरुजीही बर्‍याचवेळा आमीर खाँसाहेबांच्या गायकीचा आणि विशेष करून त्यांनी गायिलेल्या दरबारी रागाचा उल्लेख करत असतात. त्यांच्या गायकीबद्दल दिग्गजांच्या मनात केवळ आदरच आहे.

उ. अमीर खाँ साहेबान्चे गायन ऐकणे म्हणजे एका अथान्ग महासागराचा प्रवास. द्रुश्टीच्या अन्ता पर्यन्त पसरलेला गम्भीर स्वरसागर.
उ. अमीर खाँ साहेबान्चा बरवा माझी विशेष आवड. एकदा ऐकला कि तोच ३-४ दिवस कानात आणी मनात रुन्जी घालत राहतो.

Pages