गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग १९

Submitted by बेफ़िकीर on 4 December, 2010 - 06:46

कालच तिने अ‍ॅनिमल प्लॅनेटवर तो प्रसंग अगदी सहज बघितला आणि आज सकाळीच त्याची आठवण झाल्यावर तिला एक महत्वाची बाब लक्षात आली.

रानगव्यांनी चारही बाजूंनी घेरलेला चित्ता शेवटी सगळ्यांवर अकस्मात हल्ला चढवतो आणि त्यातील किमान दोन ते तीन गव्यांच्या नरडीचा घोट घेतो आणि बाकीचे शेपूट घालून पळत सुटतात.

मोनालिसाला मात्र एकही गवा पळायला नको होता. प्रत्येकाच्याच नरडीचा घोट घ्यायचा तिने ठरवले होते.

प्रसंगच तसा बाका होता. एकीकडे सुबोध आणि लोहिया यांचा बझटमध्ये असलेला भयानक इन्टरेस्ट हा एक गवा होता. त्यात खरे तर मोनाला पडायचे काही कारण नव्हते. ते सरकारने पाहून घेतले असते. पण त्याच बझटच्या सहाय्याने तिची आई आणि वडील दोघेही वर पोचलेले होते. आणि त्याच बझटचा तिच्यावरही एक ना एक दिवस वापर करण्यात येणारच होता. फक्त डॅडकडे लोहियांना ब्लॅकमेल करता येईल असे जे काय होते ते लोहियांना मिळाले की झाले. मग मोनालिसा देवाघरी जायला मोकळी होणार होती.

दुसरा गवा म्हणजे अर्देशीर, लोहिया, जतीन आइ सुबोध या सर्वांना मिळून हेलिक्स घशात घालायची होती.

तिसरा गवा म्हणजे नाना सावंतला त्याचा कामगारांवरचा हक्क परत हवा असल्यामुळे तो कामगारांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे मन वळवत होता.

चौथा गवा म्हणजे मोनावर झालेली 'बझट बाळगण्याची' केस जगमोहन पुन्हा खणून काढायला बसला होता.

आणि हा पाचवा गवा! कालच निर्माण झालेला! 'सेल' म्हणजे स्टील ऑथोरिटी ऑफ इन्डियाने हेलिक्सला पत्र पाठवलेले होते. Your company is blacklisted.

काही काही लोकांना प्रॉब्लेम असला की पळ्न जावेसे वाटते. मोनाला हे सगळे प्रॉब्लेम्स ही एक प्रचंड मोठी संधीच वाटत होती.

आणि आज स्वतःच्या केबीनमधून ती कॉन्फरन्सकडे जाताना तिच्या मनात विचार येत होता. आपण लोहियांच्याबरोबर कॉन्फरन्स रूममध्ये गेलो नाहीत हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे आणि तोच स्टॅन्ड आजपासून टिकवायचा आहे.

प्रचंड मोठ्या कॉन्फरन्समधील प्रत्येक चेहरा अत्यंत टेन्स्ड होता.

मेहरा, लॉजिस्टिक्स आणि पर्चेसचे सर्वेसर्वा, त्यातल्यात्यात कमी ताणात होते कारण मुख्य प्रॉब्लेम सेल्सचा होता. लीगलच्या साहन्ला आपण इथे का असायला पाहिजे हेच समजत नव्हते. एच आर चा भसीन पेन्सिल दातांवर मारत भिंतीकडे बघत बसला होता. डिझाईनचा बिंद्रा सगळ्यांच्या चेहर्‍यांकडे आळीपाळीने पाहात होता. प्रॉडक्शनचा सिंघ नुसताच मान खाली घालून बसला होता. प्रकरण आपल्यावर भयानक शेकणार हे त्याला माहीत होते. फायनान्सच्या गांगुलींना साहनीसारखाच प्रश्न पडला होता. आपण इथे का आहोत??

आणि जोशी??? आज आपण गेलो इतकेच त्याला समजत होते. आजचा आपला हेलिक्समधला शेवटचा दिवस हे त्याला माहीत होते. एक्सेप्शनल परिस्थिती म्हणून रेजिनालाही पाचारण झालेले होते. आणि मोनाच्या खुर्चीच्या एका बाजूला तो आणि दुसर्‍या बाजूला लोहिया! लोहिया मात्र समोरच्या अनेक पेपर्सवर धावती नजर टाकत होते. कुणीच कुणाशी एक शब्दही बोलत नव्हते. मोनालिसाने गेल्या काही महिन्यात निर्माण केलेल्या स्वतःच्या प्रतिमेमुळे हल्ली तिची सगळ्यांना भीतीच वाटू लागली होती, एक्सेप्ट रेजिना!

आणि खाडकन दार उघडले.

लोहिया सोडून सगळे उभे राहिले. अगदी रेजिनासुद्धा!

ताडताड चालत अभिवादनांचा स्वीकार करत मिस एम एम गुप्ता आपल्या खुर्चीत येऊन बसल्या आणि मग लोहियांनीही अभिवादन केले. तिनेही त्यांना फॉर्मल अभिवादन केले आणि सगळ्यांनाच जतीन खन्नाची उणीव भासली. असल्या भयंकर महत्वाच्या मीटिंग्जचे सूत्रसंचालन नेहमी तोच करायचा. आणि समारोप मोहन गुप्ता! मधे अधिकाधिक बोलायचे अर्देशीर आणि अर्देशीर बोलत नसतील तेव्हा लोहिया! सुबोध फक्त आपला असायचा हेलिक्सच्या मीटिंगमध्ये! कारण तो हेलिक्सच्या रोलवरच नव्हता.

आज सूत्रसंचालन कुणी करायचे हेच कुणाला कळत नव्हते. मात्र तो प्रश्न सुटला. मोनालिसाने अत्यंत गंभीर आणि कर्ट आवाजात विधान केले.

"I want to know what all happened to us... in last few days.... Joshi, you start..."

हे वाक्य बोलताना आपण लोहियांना निदान विचारायला पाहिजे हेही मोनाला आवश्यक वाटले नव्हते. नाही म्हंटले तर लोहियांना त्यांची पोझिशन समजलीच!

जोशी हबकलेला होताच. त्याच्याकडे बघितलेही नव्हते मोनाने! टेबलवरील अनेक पेपर्सकडे नजर टाकत ती खाली बघूनच हे बोलली होती.

जोशी - अं... आपल्याला एक मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे मॅडम.. सेलकडून पत्र आलेले आहे की गिअरबॉक्सेसच्या डिलीव्हरीजच्या तारखा अनेकदा डिफर झाल्यामुळे हेलिक्सला ब्लॅकलिस्ट करणार आहेत.. त्या अनुषंगाने मी आज जी काही खरी परिस्थिती आहे ती मांडणार आहे... या आर्थिक वर्षात आपण एकंदर चोवीस गिअरबॉक्सेस त्यांना आजवर सप्लाय केलेल्या आहेत. अजून सोळा गिअरबॉक्सेसच्या ऑर्डर्स फायनल झालेल्या आहेत. त्यांच्या डिलीव्हरीबाबत तर आम्ही अत्यंत दक्ष आहोतच. पण आधी सप्लाय झालेल्या चोवीस गिअरबॉक्सेसच्या डिलीव्हरी डेट्स मात्र आपण अगदी परफेक्टली अ‍ॅचिव्ह नाही करू शकलो. सगळ्यात कमी झालेला विलंब बावीस दिवसांचा तर सर्वाधिक झालेला विलंब सदतीस दिवसांचा आहे. प्रत्येक गिअरबॉक्सच्या डिस्पॅचचा अभ्यास केल्यावर असे जाणवत आहे की आम्ही, म्हणजे सेल्सने तीन गिअरबॉक्सेससाठी ओव्हर कमिट केलेले होते. म्हणजे प्रत्यक्षात त्या बनायला जेवढा वेळ लागेल त्यापेक्षा कमी वेळात देऊ असे कमिट केलेले होते. त्याची कारणे आमच्याकडे...

मोना - आत्ता कारणे विचारत नाही आहे... आत्ता फक्त फॅक्ट्स हवे आहेत... दिवसभर मीटिंग आहे...

आवंढा गिळून जोशी पुढे सुरू झाला.

जोशी - उरलेल्या एकवीसपैकी सोळा गिअरबॉक्सेस आपण खरोखरच लेट बनवल्या. त्याचे कारण ...

मोनाने खाडकन वर पाहिले. जोशीने मान खाली घातली...

जोशी - आणि उरलेल्या पाच गिअरबॉक्सेसपैकी दोनचे मटेरिअल स्पेशल होते आणि तीनचे डिझाईन नवीन! ....

मोना - ओव्हर कमिट करण्याची परवानगी कुणी दिली तुम्हाला???

जोशी - सॉरी मॅडम... मी ते खरे तर कंपनीच्याच इन्टरेस्टमध्ये केले होते...

मोना - प्लीज अ‍ॅन्सर व्हॉट आय आस्क यू.. तुम्ही परवानगी घेतली होतीत माझी???

जोशी - ... नाही...

मोना - का???

जोशी - .. सरांना माहीत होते...

मोनाने लोहियांकडे पाहिलेही नाही. लोहियांनी उघडलेले तोंड ते काही बोलायच्या आतच मोनाने बंद पाडले. कारण तिने पुढचा प्रश्न विचारला होता जोशीला!

मोना - अंकलना माहीत आहे असे म्हणून तुम्ही मार्केटमद्ये काहीही करू शकता?? अंकलना तेवढे एकच काम आहे की प्रत्येक डिटेल्स तपासणे? तुम्हाला समजत नाही की आपण इतक्या फास्ट डिलीव्हर करू शकत नाही? डिड यू स्पीक टू सिंघ ऑर मेहरा?? की आपण इतक्या अर्जंट डिलीव्हरीज कमिट केलेल्या आहेत तर अ‍ॅज अ स्पेशल केस त्या ऑर्डर एक्झिक्युट करायला हव्यात म्हणून???

जोशी - हो मॅडम.. सिंग आणि मेहरासाहेबांना मी सांगीतलेले होते...

मधेच सिंघने तोंड उघडले आणि मोनाने हात दाखवून त्याला गप्प केले.

मोना - सिंघ किंवा मेहरांनी तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला??

जोशीने मान खाली घातली.

मोना - व्हॉट आय अ‍ॅम आस्किंग यू??

जोशी - म्हणजे... व्हर्बलीच हो म्हणाले ते...

आता पुन्हा सिंगने तोंड उघडले.

मोना - सिंग मी तुम्हाला बोलायची परवानगी दिल्यावर बोला...

खाडकन सिंग गप्प बसला.

जोशी - डिस्कस झालेले होते....

मोना - हायलाईट केलेत गेल्या कॉम मीटिंगमध्ये???

जोशी - .. नाही केले...

मोना - तुम्ही कस्टमर्सना अशक्य आश्वासने देता... ते इन्टरनली व्हर्बली डिस्कस करता... आणि कॉम मीटिंगमध्ये तो टॉपिक रेजही करत नाही... व्हॉट डु यू एक्स्पेक्ट फ्रॉम द ऑपरेशन्स?? दे कॅन डू द मॅजिक फॉर यू???

जोशी - पण तशा गिअरबॉक्सेस तीनच होत्या...

मोना - म्हणजे तुम्हाला काय म्हणायचेय की तुमची चूक बारा टक्केच होती... बाकी अठ्याऐंशी टक्के इतरांची चूक आहे म्हणून तुम्हाला काही बोलायचे नाही???

जोशी - नाही नाही.. तसं नाही मॅडम...

मोना - त्या गिअरबॉक्सेस सप्लाय झाल्या??

जोशी - दोन झाल्या.. एक राहिलीय...

मोना - कुणाच्या होत्या??

जोशी - बोकारो स्टील...

मोना - अजून एक राहिलीय?? ती कधी द्यायची होती???

जोशी - .... दोन महिन्यापुर्वी???

मोना - अच्छा.. म्हणजे अर्जंट कमिट करून आपल्याला दोन महिने लागले सप्लाय करायला.. वा वा!

जोशी - .....

मोना - म्हणजे ज्यांनी या गोष्टी प्रोअ‍ॅक्टिव्हली सतत तपासायला पाहिजेत ते 'समर्थन' करणार्‍या स्लाईड्स पाठवत बसतात इमेलवर...अं?? की असे झाले म्हणून उशीर झाला तसे झाले म्हणून उशीर झाला.. वर म्हणायला मोकळे... माझ्यामुळे फक्त तीनच गिअरबॉक्सेस उशीरा गेलेल्या आहेत... इज धिस रिस्पॉन्सिबल अ‍ॅक्ट अ‍ॅट ऑल???

जोशी - .....

मोना - मला दाखवा बरं एखादी तरी इमेल तुम्ही कुणाला केलेली की या गिअरबॉक्सेस अशा अशा आधीच द्याव्या लागणार आहेत म्हणून...

जोशी - अ‍ॅक्च्युअली मी प्रत्येक महिन्याच्या डिस्पॅच प्लॅनमध्ये घेत आलोय त्या...

मोना - करस्पॉन्डन्स काय आहे???

जोशी - म्हणजे.. तशी इमेल नाही केली.. पण प्लॅनमध्ये आहेतच सुरुवातीपासून...

मोना - म्हणजे तुमचं म्हणणं आहे की प्लॅनमध्ये घेतलं की पुढचं सगळं करायला सिंग जबाबदार... अं??

जोशी - ... सॉरी...

मोना - सो यू मीन वन्स यू से सॉरी... हे पत्र 'सेल' परत मागवेल..

जोशीने मान खाली घातली. रेजिनाला आजच समजत होते की मोनालिसा काय प्रकरण आहे. पुढच्या गिअरबॉक्सेसचा अजून विचारही सुरू झालेला नव्हता.

मोना - तुम्ही कमिटमेन्ट कशाच्या जीवावर देता??

जोशी - ....

मोना - सांगा ना?? हातात असलेल्या ऑर्डर्स आणि प्रॉडक्शन आणि प्लॅनिंग या दोन्हीचा अ‍ॅक्सेप्टन्स.. याच दोन गोष्टीम्च्या जीवावर ना???

जोशीने होकारार्थी मान हालवली.

मोना - मग हातात असलेल्या ऑर्डर्स तुम्हालाच माहीत असतात आणि प्रॉडक्शनचा क्लीअरन्स सिंग आणि फार तर मेहरा देणार... तो मिळाला होता का तुम्हाला???

जोशी - ... अ‍ॅक्च्युअल... सिंगने सांगीतले की इतक्या लवकर त्या बनणार नाहीत...

मोना - आणि हेही तुम्ही अंकलना सांगीतलेत???

आता लोहिया एकदम अ‍ॅलर्ट झाले.

जोशी काय उत्तर देतो यावर सगळे अवलंबून होते आता!

जोशी - .... .. हो... हो मॅडम....

मोना उसळलीच!

मोना - अंकल?? डिड यू नो धिस???

आता आली का पंचाईत?? उल्लेख तर 'अकल' असा करतीय! पव विचारतीय मात्र जाब!

लोहिया - बोलला होतास तू माझ्याशी??

जोशी - ... हो सर...

लोहिया - बट दॅट्स नॉट ऑल जोशी.. मी सतरा आघाड्यांवर लढतो.. तू 'सेल'ला कळवलंस का की डिलीव्हरी डेट मेन्टेन करता येत नाही आहे म्हणून..

जोशी - .. कळवलं सर...

लोहिया - मग काय झालं??

जोशी - ते म्हणाले कॅन्सल करा...

लोहिया - मग?

जोशी - मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं की असं असं झाल्यामुळे उशीर झाला.. मग दोन अ‍ॅक्सेप्ट केल्या त्यांनी.. आता तिसरी मात्र घ्यायला तयार नाही आहेत...

मोना - व्हॅल्यू काय आहे??

जोशी - चवदा लाख...

मोना - एकाची...

जोशी - .. हो मॅडम....

मोना - म्हणजे अठ्ठावीस लाखांच्या अ‍ॅक्सेप्ट केल्या आणि चवदा लाख आपण सोसायचे???

जोशी - मॅडम.. अ‍ॅक्च्युअली... त्या आधीच्या गिअरबॉक्सेसची प्राईस त्यांनी कमी करून घेतली...

मोना - काय??? .. किती????

जोशी - तेरा साठला घेतल्या..

मोना - जोशी ऐंशी हजार घालवलेत तुम्ही???

आज जोशीचे काही खरे नव्हते. मात्र ८०००० घालवणे हा आरोप अप्रत्यक्षरीत्या लोहियांवर होता.

आता मात्र मोनाने लोहियांच्या कल्पनेत नसेल ती भूमिका घेतली.

मोना - अंकल.. हे तुम्हाला माहीत होतं??

लोहिया - अं.. म्हणजे.. आय थॉट इट नीड्स टू बी डन टू कीप द कस्टमर...

मोना - बट अ‍ॅट लॉस???

लोहिया - लॉस नाहीये... मार्कअप अ‍ॅफेक्ट झाला..

मोना - जोशी.. यापुढे प्रत्येक गोष्ट हायलाईट व्हायला पाहिजे आणि मला त्याची कॉपी पाहिजे... मी क्लीअरन्स दिल्याशिवाय काहीही होता कामा नये...

अत्यानंदाने उडी मारावीशी वाटत होती जोशीला! बहुतेक जॉब वाचलेला होता.

मात त्या प्रक्रियेत संपूर्ण कॉन्फरन्सला लक्षात आले होते. लोहियांचा ऑपरेशनवरचा अधिकार गेला. लोहियांनाही हे जाणवले. पण आत्ता फारच परिपक्वपणे वागावे लागणार होते. एकदम मोनाशी वाद घालणे योग्य होणार नव्हते. त्यांनी पुस्ती जोडली आणि सावरून घेतले.

लोहिया - एक्झॅक्टली.. कारण मी एक तर सारखा मुंबई पुणे मुंबई करतो आणि महिन्यातून दोन वेळा फॉरीनला जातो.. नेहमी माझे लक्ष राहीलच असे नाही.. मॅडमना कॉपी द्यायलाच पाहिजे यापुढे...

जोशीने 'फाशी रद्द झालेल्या' कैद्याप्रमाणे मान जोरजोरात होकारार्थी हालवली.

आता सिंगकडे पाहिले मोनाने! आधीच तिच्या मूडमुळे सगळे हादरलेले होते. सिंगने आता शरीराची ढाल केलेली होती.

मोना - सिंग... त्या गिअरबॉक्सेस स्पेशल केस म्हणून बनू शकत नव्हत्या???

सिंग - अं?? ... नाही मॅडम...

मोना - का?? मेहरा?? आपली लायसेन्स्ड कपॅसिटी किती आहे???

हा प्रश्न पुढे आपल्यालाच सोसवा लागणार आहे हे माहीत नसलेल्या मेहरांनी तत्परतेने उत्तर दिले..

मेहरा - चार लाख गिअर्सचे हॉबींग...

मोना - आणि इन्स्टॉल्ड??

मेहरा - साधारण तेवढीच.. तीन नव्वद वगैरे... काही मशीन्स डाऊन वगैरे असतात म्हणून...

मोना -आणि ऑपरेटिंग कपॅसिटी??

मेहरा - ऑपरेटिंग साधारण तीन लाख...

मोना - सिंग?? गेल्या दोन महिन्यात किती गिअर्स हॉब झाले??

आता ही प्रश्नावली कुठे येत आहे ते सिंगला समजले.

सिंग - अं... एक मिनीट...

मोना - हे फिंगरटीपवर पाहिजे तुमच्या...

सिंग - बावीस.. सत्तर... अं.. हे एकुणपन्नास... एकंदर चार लाख ऐंशी हजाराच्या आसपास...

मोना - सहा लाखापैकी चार ऐशीच कपॅसिटी वापरली आणि तरीही या ऑर्डर्स जमल्या नाहीत??

सिंग - नाही नाही... ही हॉबिंगची कपेसिटी आहे मॅडम... या गिअरबॉक्सेसना ग्राइन्डिन्गपण होते...

मोना - त्याची किती आहे??

सिंग - ग्राइन्डिन्ग मशीन्स लोडेड आहेत ना दोन्ही???

मोना - क पॅ सि टी कि ती आ हे???

सिंग - नव्वद हजार....

मोना - बोथ पुट टुगेदर???

सिंग - होय...

मोना - म्हणजे तुम्ही गेल्या दोन महिन्यात एक लाख ऐंशी हजार गिअर्स ग्राइन्ड केलेत???

सिंग - अं?? .... ग्राइन्ड ना??... एक मिनीट.. .. हां... एक सव्वीस... एक सव्वीस केले...

मोना - बाकीचे चौसष्ट??

सिंग - मटेरिअलच नव्हते...

मोना - या गिअरबॉक्सेसचे होते ना??

सिंग - यांचे होते.. पण त्या कॅन्सलेशनमध्ये अडकत होत्या..

तारस्वरात किंचाळली मोनालिसा!

मोना - यू अ‍ॅन्सर व्हॉट आय अ‍ॅम आस्किंग... या गिअरबॉक्सेसचे मटेरिअल तुमच्या डोळ्यासमोर होते की नव्हते???

विदीर्ण चेहर्‍याने सिंग 'हो' म्हणाला..

मोना - मग प्रोसेस का केले नाही?? कॅन्सलेशन कन्फर्म झालेले होते जोशींकडून???

सिंग - ....

मोना - डिड यू गेट अ‍ॅन इमेल फ्रॉम सेल्स सेयिंग डोन्ट प्रोसेस धिस??

सिंगने नकारार्थी मान हालवली..

मोना - मग समोर मटेरिअल असताना आणि मशीन कपॅसिटी फ्री असताना तुम्हाला काय नारळ फोडायचा होता मुहुर्ताचा???

सिंगची अवस्था जोशीपेक्षा वाईट होईल हा अंदाज कुणालाच नव्हता.

सिंग - अ‍ॅक्च्युअली... माझे अन जोशीचे डिस्कशन सारखे होत होते त्यावर...

मोना - डिस्कस्ड डिस्कस्ड डिस्कस्ड! व्हॉट स्टॉप्स यू फ्रॉम राईटिंग डाऊन द थिंग्ज??? व्हाय वॉज आय नॉट इन्फॉर्म्ड?? मला का सांगीतले नाही?? गेल्या महिन्यातल्या कॉम मीटिंगमध्ये का डिस्कस झाले नाही हे?? काय केलेत तुम्ही सगळ्यांनी गेल्या कॉम मीटिंगमध्ये?? तुमच्या अन जोशींच्या डिस्कशनवर हेलिक्स चालणार आहे?? व्हर्बलच सगळे ठेवायचे असेल तर 'सेल'लाही फोन करून सांगा! म्हणाव हे पत्र आम्ही वाचलं.. आता हे पत्र तुम्ही रद्द करा... डिस्कस करत होतो म्हणे... हा लॉस तुमच्या त्या डिस्कशनमुळेच झालेला आहे... म्हणजे मशीन्स एकीकडे हाफ लोडेड ठेवली... त्यांची फायनान्स कॉस्ट आपण बेअर करत बसणार... ती बेअर करावी लागू नये म्हणून काय करता येईल याचा विचार करण्यासाठी समित्या नेमणार... त्या समित्यांचा खर्च त्या फायनान्स कॉस्ट इतकाच होणार... आणि शेवटी मशीन हातात आहे, मटेरिअल हातात आहे आणि आपण म्हणणार एखादवेळेस ही ऑर्डर कॅन्सलही होईल... नकोच प्रोसेस करायला... स्पेअर पार्ट्स म्हणून पुढे मागे ती ऑर्डर मिळेल हा विचारही तुमच्या दोघांच्या डोक्यात आला नाही?? मटेरिअल अंगावर, मशीन्स गंजतायत आणि 'सेल' ब्लॅकलिस्ट करतंय... काय चाललंय काय???

रेजिनालाही घाम फुटलेला होता. लोहियांचे तर थोबाडच बघण्यासारखे झाले होते. त्यांनी अगदी अशाच मीटिंगमध्ये तिच्या गो स्लो पॉलिसीवर अप्रत्यक्ष टीका करून चार्ज मिळवला होता. आज त्याची सव्याज परतफेड होणार होती.

मोना - मला लेखी समर्थन हवे आहे या बाबीचे.. दोघांकडुनही स्वतंत्रपणे...

रेजिना सोडून सगळ्यांना आठवले. मागे असेच समर्थन जतीन आणि सुबोधकडून मागीतले होते. दोघांनाही हाकलूनही दिलेले होते. पांढरे फटक्क पडले जोशी आणि सिंगचे चेहरे!

मोना - तीन महत्वाच्या गिअरबॉक्सेस आपण टाईमपास करता करता घालवतो??दोन गिअरबॉक्सेसचे मटेरिअल स्पेशल होते म्हणजे काय??

मेहरांना आपण इतक्या अचानक ओढले जाऊ याची कल्पनाह नव्हती.

मेहरा - को.. णते मटेरिअल??

मोना - जोशी म्हणतायत तीन गिअरबॉक्सेस त्यांनी घालवल्या, सोळा सिंगने घालवल्या, उरलेल्या पाचपैकी तीनचा डिझाईनचा प्रश्न होता आणि दोनचे मटेरिअल स्पेशल होते...

मेहरा - हां हां.. प्रोसेस्ड होते...

मोना - काय प्रोसेस होती.. ???

मेहरा - क्वेन्च्ड स्टील पाहिजे होते...

मोना - इतके हार्ड अ‍ॅन्ड ब्रिटल?? कुठे लागते??

मेहरा - स्क्रॅप प्रोसेसिंग..

मोना - मग??

मेहरा - आले आहे ते...

मोना - कधी हवे होते??

मेहरा - यांना ऑक्टोबरमधे हवे होते...

मोना - आणि आले डिसेंबरमध्ये...

मेहरांनाही हाच टोन ऐकावा लागेल असे मात्र लोहियांनाही वाटलेले नव्हते. रेजिना तर बघतच बसला होता मोनाकडे!

मेहरा - उशीर झाला नसता खरे तर तसा.. पण आपलंच फोर्जिंग्जचं लोड इतकं होतं...

मोना - मिस्टर मेहरा.. फोर्जिग आणि क्वेन्चिन्ग वेगळ्या प्रोसेसेस आहेत ना???

मेहरा - हो पण सप्लायर एकच आहे...

मोना - म्हणजे तो एक तर फोर्जिंग बनवतो नाहीतर ही हिट ट्रिटमेन्ट करतो स्टीलवर... एकच काहीतरी..

मेहरांची मान खटकन खाली गेली.

मोना - वुई डू हॅव रिझन्स फॉर एव्हरीथिंग अं???

मेहरा - ......

मोना - काय म्हणाला तो तुम्हाला?? क्वेन्चिग केले नाही त्याबाबत...

मेहरा - अं??... नाही म्हणजे...

मोना - म्हणजे 'सेल'चे पत्र आल्यावर आपण एकदमच सगळे कामाला लागलो...

आता मेहराही भडकले.

मेहरा - मिस गुप्ता... एखादवेळेस डिले होऊ शकतो...

मोना - एखादवेळेसच 'सेल'चे पत्र येते आयुष्यात.. रोज येत असते तर जोशींनीच हॅन्डल केले असते 'सेल'ला!

मेहरा सोलला जातोय याचा आनंद मानावा की आपलीही धडगत नाही याचे दु:ख हे लोहियांना समजत नव्हते. आज मीटिंगला येईपर्यंत त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला होता. अर्देशीर आणि एलेकॉनचे दासप्रकाश या दोघांनी गेमा करून 'सेल'मधल्या लोकांना पैसे चारून हेलिक्सला हे पत्र पाठवलेले होते. आता 'सेल'चाच ऑफटेक गेला की हेलिक्स अक्षरशः गुडघ्यावर वाकून इतरांकडून ऑर्डर्ससाठी झगडायला लागणार होती. अगदी फारुख ऑटोसमोरही! त्याचा परिणाम कॉस्ट कटिंगवर झाला की वर्कर्समध्ये असंतोष पसरणार होता. ते झाले की मग लोहिया नाना सावंतला संप करण्यासाठी लाच देणार होते. संप झाला काय आणि नाही झाला काय! हेलिक्सची अवस्था अफगाणिस्तानात असलेल्या बुद्धाच्या मूर्तीसारखी होणार होती. या दरम्यान लोहिया वर्कफोर्ससमोर अप्रत्यक्षरीत्या अशी इमेज निर्माण करणार होते की या मूर्ख स्त्रीमुळे हेलिक्स डबघाईला आली. मग पैसे देऊन आणलेल्या लोकांची तिच्या घरासमोर निदर्शने! मग पडीक शेअर्स मोनालिसा मार्केटमध्ये काढायला निघाली असती. त्यातच रेजिना आणि तिच्या रिलेशन्सबाबत बदनामी! त्यातच दिल्लीतील बझट बाळगण्याची केस पुन्हा वर आणने! आणि मग...

... मग एक दिवस वैतागलेल्या मोनालिसा मोहन गुप्तांची आत्महत्या.. !!

अर्थातच, फसवून 'बझट' घातली जाणार...! आणि 'आत्महत्या' असे प्रोजेक्ट केले जाणार! स्वतःच बझट खाल्ली तिने!

नुसतेच मारले असते तर फारच मोठी केस होईल हे चौघांनाही माहीत होते. कारण गुप्ता तसेच गेले. ही पण तशीच गेली. हे काय बरोबर नाही.

मग अर्देशीर दिमाखात हेलिक्सला येणार.. मग जतीन आणि सुबोधही येणार.. रिकोह डिसूझा यांना हाकलून देण्यात येणार!

हे सगळे होण्यासाठी अनेक घटक फेव्हरेबल असणे जरी आवश्यक असले तरी महत्वाचा घटक होते ते पत्रच! ते मात्र व्यवस्थित मॅनेज झालेले होते. जोशींसारख्या चार दोन जणांची नोकरी गेली तर बिघडत नव्हतेच! एकदा 'सेल'ने ब्लॅकलिस्ट केले की धंदा तीन ते चार महिन्यातच वीस टक्यांवर येणार होता. या कालावधीत मोनाच्या अकार्यक्षम नेतृत्वाला एक्स्पोज करण्याच्या हजारो संधी मिळणार होत्या. लोहिया मात्र तिला कायम धीरच देणार होते. मात्र अनेकांकरवी तिला हेच ऐकवणार होते. 'मोहन गुप्ता असते तर असे झालेच नसते'.

या सर्व गोष्टींबाबत मोनालिसा अनभिज्ञ होती. तिच्यादृष्टीने 'ते' पत्र ही खरीखुरी बाब होती. आणि आत्ता ती मेहरांसकट सगळ्यांवर बरसत होती.

आणि लोहियांना याची कल्पना नव्हती की खरी समस्या पुढेच येणार होती. ते अपले एकेकाला झापलेले जात पाहून दुसर्‍यांदाच मोनाचा तो अवतार बघत होते. आधी एकदा जडेजांना झापलेले असताना पाहिलेला होता त्यांनी तो!

मोना - मिस्टर मेहरा... त्या टिकेकर फोर्जला आपण किती पेमेंट आजच्या घडीला द्यायचे आहे??? अंदाजे??

मेहरा - नॉर्मली आऊटस्टँडिन्ग एक कोटी चाळीस लाखाच्या घरात असते...

मोना - फक्त??

मेहरा - होय..

मोना - थांबवा त्यांचं पेमेंट..

मेहरा - ..... ओके...

मोना - थांबवू शकाल ना??

मेहरा - हो हो?? थांबवीन की... फक्त....

मोना - .. येस???

मेहरा - म्हणजे... तेही मटेरिअल थांबवायचे नाहीतर...

मोना - वा? वा वा! हे तुम्हीच बोलताय! अं?? त्यांच्यामुळे आपण इथे ब्लॅकलिस्ट होतोय... त्यांनी मटेरिअल वेळेवर न दिल्यामुळे.. आणि ते पुढचे मटेरिअल थांबवतील याची आपल्याला भीती... किती सप्लायर्स आहेत आपल्याकडे??

मेहरा - पॉलिसीप्रमाणे तीन आहेत...

मोना - मग दुसरे दोघे देणार नाहीत??

मेहरा - त्यांची कपॅसिटी जरा कमी पडते...

मोना - मग मोठ्या कपॅसिटीचे सप्लायर्स का नाही आहेत???

मेहरा - लांब आहेत ते... एक दिल्लीला आणि दुसरा बेळगाव...

मोना - सो व्हॉट???

मेहरा - त्यात पुन्हा सेन्ट्रल सेल्स टॅक्स पडतो..

मोना - हो पण धंदा चालवायचा का टॅक्सची अन अंतराची भीती बाळगायची??

मेहरांनी मान खालीघातली. टिकेकर फोर्जबरोबरचे संबंध अतिशय चांगले होते आजवरचे! दिड कोटीचे पेमेंट थांबवल्यावर स्ट्रेसेस येणार होत्या. आइ मुख्य म्हणजे क्वेन्च्ड स्टील उशीरा देण्यात त्यांचा काहीच दोष नव्हता. दोष होता मेहरांच्या टीमचा! योग्य फॉलो अप न करणे हा!

मोना - टिकेकरचे पेमेंट थांबवा...

मेहरा - अ‍ॅक्च्युअली... चूक पर्चेसची आहे मिस गुप्ता...

मोना - म्हणजे... म्हणजे तुमच्या डिपार्टमेन्टची...

मेहरा - ..... होय... इत इज माय मिसटेक...

मोना - मग आता??? टिकेकरांना पैसे देऊन नमते घ्यायचे का??

मेहरा - नमते घेण्याचा प्रश्न नाही.. त्यांनी आपण सागीतलं तेव्हा मटेरिअल दिलं....

मोना - मग आपण डिसेंबरमध्ये सांगीतलं... असं म्हणताय???

मेहरा - नोव्हेंबर एन्डला....

मोना - का???

मेहरा - सी देअर वॉज नो कम्युनिक अ‍ॅट ऑल अबाऊट धिस ऑर्डर... ती फक्त प्रॉडक्शन प्लॅनमध्ये होती एवढेच... पण तसे इन्डेन्ट्सही येत नव्हते...

मोना - इन्डेन्ट्सची वाट बघून आपण किती रकमेचा पर्चेस करतो???

पुन्हा मेहरांचा चेहरा खाली गेला.

मोना - इट्स अ फेल्युअर... नथिंग एल्स... जस्ट अ फेल्युअर...

मेहरा - ... आय.... आय अ‍ॅडमिट...

मोना - डिझाईनमुळे अडलेल्या मशीन्सची काय कहाणी आहे बिंद्रा???

बिंद्राच्या पुढे शम्मा ठेवण्यात आली आता मुशायर्‍याची!

बिंद्रा - डिझाईन्स म्युच्युअली अ‍ॅग्रीच मागच्या महिन्यात झाली...

मोना - मग त्यात आपली काय चूक???

बिंद्रा - काहीच नाही... खरोखरच काही नाही...

मोना - जोशी??? हे टेक अप केलेत सेलशी???

जोशी - केले मॅडम.... त्या तीन मशीन्सबाबत ते अ‍ॅग्री करत आहेत...

मोना - आता झालि आहेत डिझाईन्स फायनल???

बिंद्रा - हो हो.. झाली. बॅचमध्येही आलंय मटेरिअल प्रोसेसला...

मोना - हं... आता ती सोळा मशीन्स जी प्रॉडक्शनमुळे डिले झाली त्यांची काय कथ आहे नेमकी???

सिंगने या बाबीवर खूप अभ्यास करून स्वतःचे असे मुद्दे तयार ठेवले होते. त्याने लगेच स्लाईड वगैरेच घातली प्रोजेक्टरमध्ये!

सिंग - मॅडम.. यात दिसतंय त्या प्रमाणे.. ८१ % ईन्डेन्ट्स पर्चेस्ने डिले केलेले आहेत... प्रोसेस करायला काहीयेतच नाही वेळेवर...

मोना - तुम्ही इथे पाच वर्षे तरी आहात ना???

हडबडलेल्या सिंगने होकारार्थी मान हालवली. सिनियर जी एम ला कुणी असे विचारेल हे त्याला नवीन होते.

मोना - मग पर्चेसकडून हा अशा प्रकारचा उशीर पहिल्यांदाच झाला का??

सिंगला यावर 'हो' म्हणावे तर आजवर अटेन्ड केलेल्या सर्व कॉम मीटिंग्ज आठवत होत्या ज्यात त्याने छाती फुटेस्तोवर पर्चेसवर उशीर करण्याची खापरे फोडलेली होती. नाही म्हणावे तर काय होणार ते त्याला माहीत होतं! पण आत्ता खरेच बोलायला लागणार होते.

सिंग - नाही...

मोना - मग तुम्ही प्रिपेअर्ड का नव्हतात??

याच्यावर काय उत्तर देणार??

मोना - काहीतरी अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यासारखे आज सांगताय शांतपणे की मटेरिअल वेळेवर आले नाही... मग याबाबत कॉम मीटिंगमध्ये काय डिस्कशन झाले मागच्या वेळेस???

आता लोहियांना मधे पडणे भाग होते. कारण मागची मीटिंग त्यांनी हेड केलेली होती.

लोहिया - धिस इज रिअली सरप्राईझिंग.. मटेरिअल वेळेवर न येणे ही एक्स्क्युज किती दिवस देणार आहेस तू सिंग?? तू तुझे इन्डेन्ट्स तर एक महिना आधीच पाठवू शकतोस ना???

आत्ता मध्येच मेहरांनी तोंड उघडले.

मेहरा - यांचे इन्डेन्ट्स दिड दिड महिना आधी येतात मिस्टर लोहिया.. आम्हाला काय आधी आणायचे अन काय नंतर तेच समजेनासे होते...

लोहिया - यू प्लीज टॉक व्हेन आय आस्क यू समथिंग...

मेहरांचा आज पुन्हा अपमान केला लोहियांनी!

सिंग - मी सेफर साईड म्हणून आधीच देतो इन्डेन्ट्स...

मोना - म्हणजे ऑक्टोबरमध्ये करायच्या असलेल्या डिस्पॅचला दोन महिने प्रोसेस टाईम लागत असेल तर तुम्ही ऑगस्टला लागणारे मटेरिअल जूनमध्येच इन्डेन्ट करता... हो ना???

सिंगने पुन्हा मान डोलावली...

मोना - मग या मटेरिअलचाच का गोंधळ झाला???

सिंग - आलंच नाही मटेरिअल...

पुन्हा दुर्गावतार धारण करून मोना ओरडायला लागली.

मोना - यू ऑल आर गिव्हिंग चाइल्डिश एक्स्क्युजेस??? हाऊ कॅन यू अ‍ॅफोर्ड टू बी सो ब्युरोक्रॅटिक आय मीन?? मेहरांनी मटेरिअल आणले नाही तर सिंग शांत बसणार, जोशींनी इमेल लिहीली नाही तर गांगुली पैसे रिलीज करणार नाहीत... काय चाललंय काय?? काम काय स्वतःहून तुमच्याकडे चालत येणार आहे??? आय मीन यू ऑल आर सो सिनियर... एक डॅड काय गेले.. नुसता बाजार झालाय सगळा??? यू डोन्ट फील लाईक इन्फॉर्मिन्ग द मॅनेजमेन्ट अल्सो?? आपल्यकडे आपण एप्रेन्टिस घेतो तो देतो तशी उत्तरे देता तुम्ही सगळे?? मला यांनी सांगीतलंच नाही, ते आलंच नाही, हे झालंच नाही??? आं?? पगार झाला नाही एक महिना तर सतरा प्रश्न येतील ना मनात?? मग मेहरांनी मटेरिअल आणले नाही तर कॉम मीटिंगमध्ये बोंबाबोंब करायला हवी हे सांगायला मोनालिसा यायला पाहिजे की काय इथे??? वर्षानुवर्षे इथे राहून तुम्हाला जबाबदारी समजत नाही कुणालाही???

मोनाने दोन गेमा केल्या होत्या. 'मोहन गुप्ता गेल्यावर बाजार झाला आहे' हे नमूद करून लोहियांनाही अप्रत्यक्षरीत्या जबाबदार बनवून टाकले होते. आणि 'मी इथे यायला पाहिजे का' हे विचारून तर लोहियांचे कानच पकडले होते. त्यांनी मात्र चेहरा अगदी 'मलाही तेच म्हणायचंय' स्वरुपाचा ठेवलेला होता. कारण इतर काही चॉईसच नव्हता त्यांना! आपणच अ‍ॅरेंज केलेले 'सेल'चे पत्र आपल्यावरच बूमरॅन्ग होईल याची त्यांना कल्पना नव्हती असे नाही. पण ते इतके थोबाडावर आपटेल असे मात्र वाटले नव्हते. आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहिलेला होता. हे असे कसे काय झाले याचे नुसते रिकन्सिएलेशनच अजून चालू होते. 'सेल'बाबत करायचे काय याचा विचार करण्यासाठी ही मीटिंग होती. पण मोनाच्या तोफेपुढे सर्व गिअर्समधले दादा पुरुष गर्भगळीत झालेले होते.

मोना - 'सेल' आपल्याला ब्लॅकलिस्ट करेल आणि तसे झाले तर काय होईल याचा अंदाज येऊ शकत नाही तुम्हा लोकांना?? इथे बसून मला स्लाइड्स दाखवता??? असे झाले अन तसे झाले?? टिकेकरांचा दोष नाही सांगताना जीभ अडखळत नाही?? डिलीव्हरी ओव्हर कमिट करताना आपल्या कंपनीत काय आणि किती वेळात बनते हे माहीत नसते?? चूक होऊ शकते सांगताना काही वाटत नाही???

खरे तर कंपनीत इतके घालून पाडून बोलले जात नाही. पण हे शक्तीप्रदर्शन लोहियांसाठी होते. आणि ते लोहियांवर प्रभावही पाडतच होते.

मोना - एका आठवड्याच्या आत 'सेल'ने हे पत्र रिव्हर्स केले नाही तर पुट यूवर पेपर्स ऑल ऑफ यू... धिस इज लास्ट थिंग आय वॉन्ट टू टेल यू गाईज...

मोनाच्या चेहर्‍याकडे नुसते पाहणेही कुणाला शक्य नव्हते आत्ता या क्षणी! लोहियांना 'आपल्याला बोलण्यासाठी ओठ आणि जीभ आहे' हेही धड आठवत नसावे.

मिनिटभराच्या गॅपनंतर मोनाने पुन्हा सुरुवात केली.

मोना - जोशी... आत्ता हातात किती गिअरबॉक्सेसच्या ऑर्डर्स आहेत 'सेल'च्या??

जोशी - ... अं... आत्ता बावीस आहेत...

मोना - आणि प्रोसेसमध्ये किती आहेत त्यातल्या???

जोशी - सोळा...

मोना - त्यांची एग्रीड डिलीव्हरी कधी आहे??

जोशी - दहा बॉक्सेस जानेवारीमध्ये, सहा फेब्रुवारी फर्स्ट वीक...

मोना - कसल्या गिअरबॉक्सेस आहेत त्या??

जोशी - तीन ग्राऊंड, बाकी टफन्ड....

मोना - मटेरिअल???

जोशी - आहे अ‍ॅव्हेलेबल..

मोना - अ‍ॅप्लिकेशन काय आहे??

जोशी - ओएचटी क्रेनच्या बर्‍याचशा आहेत आणि तीन अल्टरनेटर जनरेटर याच्याबरोबर लावायच्या आहेत..

मोना - रेजिना.. या किती महत्वाच्या असतात???

रेजिनाल्डो डिसूझा हे व्यक्तीमत्व मीटिंगला येऊन बसल्याने आधीच मेहरांसकट सगळेच दबावाखाली होते. एलेकॉन गाजवणारा माणूस इथे आहे आणि आपण जे बोलतो आहोत ते सगळे त्याला नुसते समजतच असणार असे नाही तर त्याच्याकडे कित्येक गोष्टींना उत्तम उत्तरे असतील हे सगळ्यांना ठाऊक होते. त्यात त्याचे ते गप्प बसणे तर फारच ऑड वाटत होते. पण आता मोनाने त्याला चर्चेत सहभागी केले.

रेजिना - वेल.. क्रेनच्या गिअरबॉक्सेस महत्वाच्या आहेतच.. कारण मूव्हमेन्ट अ‍ॅफेक्ट होते... पण त्याहूनही त्या ग्राउंड गिअरबॉक्सेस अधिक क्रिटिकल असणार ...

रेजिनाला हा प्रश्न विचारण्यात आल्याने लोहिया दुखावले गेले होते. पण जोशीला मात्र रेजिनासमोर फारच प्रेशर आले होते.

मोना - ओक्के... जोशी... कोणकोणत्या प्लॅन्ट्सच्या आहेत??

जोशी - अं?? बोकारो.. वैझॅग... भिलाई आणि सेलम...

मोना - हं.. यांच्याशिवाय डब्ल्यू आय पी किती आहे??

डब्ल्यू आय पी म्हणजे वर्क इन प्रोसेस! त्यात रॉ मटेरिअलपासून स्टॉकमध्ये असलेल्या मात्र एक्साईज स्टोअरमध्ये ट्रान्स्फर न झालेल्या फिनिश्ड प्रॉडक्टपर्यंतचे सर्व मटेरिअल येते! मोनाने 'सेल'च्या त्या बावीस गिअरबॉक्सेसच्या ऑर्डरशिवाय किती मटेरिअल आहे असे विचारले होते... त्याचा अर्थ असा होता की ज्या ऑर्डर्स नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये फायनल झालेल्या होत्या आणि ज्यांची डिलीव्हरी फेब्रूवारीच्याही पुढे होती त्यांचे रॉ मटेरिअल आधीच आलेले असणार होते. खरे तर असे मटेरिअल आणणे ही मोठी कॉस्ट असते. पण धंद्याचा अंदाज असला तर पुढील संभाव्य प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी काही मटेरिअल सतत ऑर्डर करत राहावे लागले. ते मॅक्सिमम किती असावे याबाबत व्हॅल्यूचे एक लिमिट बहुतेक मॅनेजमेन्ट्सनी ठरवलेले असते कारण त्या लिमिटबाहेरचा पर्चेस, अर्थातच अ‍ॅडिशनल इन्व्हेन्टरी ही कॅशफ्लो डिस्टर्ब करते. प्रॉफिट्सवर परिणामही होतो. भांडवल अडकून पडते. हेलिक्समध्ये दोन कोटींची टोटल इन्व्हेन्टरी नॉर्मली ठेवायचे. ऑर्डर्स एक्झिक्युट करताना 'मटेरिअलच नाही' अशी परिस्थितीही उद्भवू नये व 'अती मटेरिअल झाले आहे' अशी परिस्थितीही उद्भवू नये हा मेहरांचा जॉब होता.

मेहरा - म्हणजे 'सेल'ची इन्व्हेन्टरी की टोटल???

मोना - 'सेल'ची...

मेहरा - ... अं... तीन अकरा....

मोना - तीन कोटी अकरा लाख???

मेहरा - ... हं..

मोना - का???

मेहरा - ... म्हणजे... आहेत ऑर्डर्स...

मोना - हो पण दोन कोटींचे लिमिट आहे ना??

मेहरा - हो... पण यावेळेस आपल्याला जरा जास्त मटेरिअल घ्यावे लागले...

मोना - का??

मेहरा - ऑर्डर्स घेतल्या यांनी...

मोना - जोशी?? बियॉन्ड फेब्रुवारी किती ऑर्डर्स आहेत???

जोशी - एकतीस..

मोना - एकतीस इज नॉट समथिंग एक्सेप्शनल???

मेहरा - हो ... पण आपल्याला स्वस्तात मिळालं...

मोना - म्हणजे??

मेहरा - एकदम तिप्पट क्वान्टिटी घेतली तर एक टक्का डिस्काऊंट होतं..

मोना - म्हणजे किती झाले?? ट्रान्स्लेटेड टू रुपीज??

मेहरा - अं.. झाले की... एक लाख वीस हजार..

मोना - आणि पुढच्या महिन्यात स्टील दोन टक्यांनी स्वस्त झालं तर????

मिस मोनालिसा गुप्ता... !!!

अत्यंत करेक्ट आणि जहरी क्वेश्चनिंग होत आज त्यांचं!

मेहरा खटकन खाली पेपर्सकडे बघू लागलेले होते. फक्त आणि फक्त रेजिनाच्या चेहर्‍यावर अजिबात जाणवणार नाही असं स्माईल होतं! त्याने मनातल्या मनात मोनाला अ‍ॅप्रिशिएट केलेलं होतं!

मोना - म्हणजे स्टील उतरलं तर दोन लाख चाळीस हजाराचा फायदा झाला असता त्याला मुकावे लागेल... होय ना??

मेहरा - स्टील आत्ता नाही उतरणार???

मोना - आपल्यपैकी कुणाचा कंट्रोल आहे त्या बाबीवर??

पुन्हा मेहरा खाली बघू लागले. आणि त्याचक्षणी गांगुली, म्हणजे फायनान्सचा हेड, याला समजले की तो या मीटिंगमध्ये का होता.

मोना - मिस्टर गांगुली... तुम्ही कसे काय फन्ड्स रिलीज केलेत?? लिमिटच्या बाहेर?

गडबडलेला गांगुली एकदम अ‍ॅलर्ट झाला.

गांगुली - नाही.. म्हणजे.. व्हाऊचर्स लिमिटमधलीच होती...

मोना - अच्छा.. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही फक्त व्हाऊचर्स लिमिटमध्ये आहेत की नाही तेवढंच पाहणार आहात...

गांगुलीने ओव्हरऑल व्हिव्ह घ्यायला हवा होता. तो चुकीचे बोलून गेला होता.

मोना - आय वॉन्ट रिटन एक्स्प्लनेशन ऑन धिस.. फंड्स कसे काय हवे तसे रिलीज झाले याचे...

आता लोहिया गडबडले. कारण मोनाच्या अ‍ॅब्सेन्समध्ये सह्या त्यांनी केल्या होत्या. आणि मेहरांनी सांगीतल्याप्रमाणे त्यांनी गडबडीत सह्या केलेल्या होत्या. अक्कल जरी मेहरांची असली तरी एप्रूव्हल्स लोहियांची होती.

लोहिया - आय हॅव साईन्ड द व्हाऊचर्स दॅट यू यूझ्ड टू सेन्ड टू मी मेहरा???

मेहरा - शुअर मिस्टर लोहिया... माय डिसीजन वॉज अ बिट रिस्की..

मोना - वॉज?? अजूनही रिस्कीच आहे तो.. स्टील अजूनही वाढू शकेल.. मिस्टर गांगुली.. बाय द एन्ड ऑफ द डे या नॉन कॉम्प्लायन्सचे एक्स्प्लनेशन पाठवा मला...

गांगुली - येस्स... येस्स मॅडम.. नक्की...

मोना - आणि यानंतर लिमिटबाहेर इन्व्हेन्टरी होता कामा नये...

गांगुली - नाही नाही... नेव्हर...

गांगुलीच्या जीवात जीव आला. 'यापुढे' म्हणजे निदान 'पुढे' तो पिक्चरमध्ये तरी होता.

मोना - सो.. जन्टलमेन.. नऊ लेट मी हिअर व्हॉट सोल्युशन्स यू हॅव टू धिस सिच्युएशन...

आत्ता कुठे खरी मीटिंग चालू झाली होती. लोहिया आता जरासे तरारले. कारण मोना या बाबत काय करणार हे महत्वाचे होते. आत्तापर्यंत नुसतेच चुका काढणे आणि झापणे चालले होते.

मोना - बिंद्रा.. तुमचं काय म्हणणं आहे??

बिंद्रा - माझ्यामते त्यांना जाऊन केस एक्स्प्लेन करू.. आणि पत्र परत घ्यायला सांगू.. आपलं आजवरचं रेकॉर्ड एकदम प्रूव्हन आहे...

मोना - हं... मेहरा???

मेहरा - वेल.. माझ्यामते हे लेटर मुद्दाम पाठवण्यात आलेलं आहे...

चक्रावलीच मोना! रेजिना मात्र जमीनीकडे पाहात बसला होता. मगाचपासून त्याच्या मनात अगदी हाच विचार येत होता.

मोना - म्हणजे काय???

मेहरा - ते कुणीतरी 'सेल'कडून मुद्दाम लिहवून घेतल्यासारखं वाटतंय मला...

मोना - कशावरून???

मेहरा - आजवर त्यांच्या कित्येक ऑर्डर्स डिले झालेल्या आहेत... तुम्हालाही आठवत असेल की वेस्टर्न कोलफिल्ड्सची ऑर्डर फक्त कॅन्सल झालेली होती... ब्लॅक लिस्ट तेव्हाही झालो नव्हतो आपण..

मीटिंग चालू झाल्यापासून पहिल्यांदाच मोनाला मेहरांबद्दल वाईट वाटलं! किती बोललो या माणसाला आपण! आपल्याच भल्याचे सल्ले कायम दिले आहेत त्याने! आणि आजही असा काही मुद्दा काढला आहे की विचारांची दिशाच बदलावी.

लोहिया मात्र हादरलेले होते मनातून!

मोना - कोण असेल असं???

मेहरा - वेल.. आय डोन्ट नो... कुणीतरी लाचखाऊ अधिकारी पोचला असेल वर... त्याने केले असेल हे...

मोना - पण तुमचं सोल्युशन काय आहे???

मेहरा - त्या माणसाला बहुधा सॅटिस्फाय करावे लागेल असे वाटते...

मोना - हं... अंकल?? व्हॉट डू यू से???

लोहिया - मोना... काहीवेळा त्यांना खरोखरच प्रॉब्लेम्सही येतात... आपल्याला हे पत्र फारच गंभीरपणे घ्यायला हवं आहे... अर्थात, मेहरा म्हणतात तसं असलं तर सोप्पं आहे.. पण मला तरी असे वाटते आहे की आपण 'सेल'ला आजवर टेकन फॉर ग्रॅन्टेड ट्रीट केले हे चुकलेच... त्यांच्या डिलीव्हरीज मेन्टेन करायलाच हव्या होत्या...

मोना - रेजिना???

आपल्यानंतर शेवटचं मत रेजिनाला विचारण्यात आलं हा खरे तर लोहियांना अपमान वाटला. पण आत्ताची वेळ तो अपमान व्यक्त करण्याची नव्हती.

रेजिना - आय अ‍ॅग्री टू मिस्टर मेहरा अ‍ॅक्च्युअली... इतका काही सिरियस प्रॉब्लेम वाटत नाही मला तो...

मोना - सो?? ... द सोल्यूशन???

रेजिना - कुणालातरी दिल्लीला जाऊन 'सेल'ला भेटावे लागेल... इफ यू थिंक अ‍ॅप्रोप्रिएट.. इव्हन आय कॅन गो अ‍ॅन्ड मीट देम...

मोना - गो अहेड....

तिळपापड झाला होता लोहियांचा! आपल्याला डावलून डिसूझाला पाठवतीय लेकाची! आपली गरजही लागत नाही हिला??? आणि उद्या काही कारणाने या डिसूझाला जर यश मिळालेच तर हेलिक्सचा अख्खा वर्कफोर्स कायम त्याच्या उपकारात राहणार...

लोहिया - मला असे वाटते की सुरुवातीला डिसूझांना जाऊदेत... मग बघतो मी काही जरूर भासली तर...

मोना आणि रेजिना दोघांनीही आदरपुर्वक माना डोलावल्या. मात्र लोहियांबाबत रेजिनाच्या मनात आकस निर्माण झाला. साडे तीनशे कोटीच्या हेलिक्सचा जॉईंट एम डी आपल्याला, एलेकॉनला नंबर वनवर नेणार्‍या रिकोहला कमी लेखतो???

इगो! सगळ्यांच्याच मनातील इगो उफाळून आला होता. मात्र कुणालाही हे माहीत नव्हते की मिस एम एम गुप्ता या संकटाला एक संधी मानत आहेत.

मीटिंग संपल्यानंतर आपापल्या जागी जाण्यासाठी उठलेल्या तमाम ग्रूपपैकी एक जोशीच असा होता, ज्याच्या डोळ्यात पाणी आले होते. सगळ्यांना सोल्यूशन्स विचारली पण आपण आयुष्यभर सेल्स पाहून आपल्यालाच विचारले नाही यामुळे त्या प्रामाणिक माणसाला फार वाईट वाटले होते. पण मोनालिसा वाईट कधीच नव्हती. तिने ते पाणी पाहिलेसुद्धा नव्हते. पण आधीच ठरवल्याप्रमाणे तिने जोशीला सगळ्यांसमोरच हाक मारली.

मोना - मिस्टर जोशी... झाले ते झाले.. वाईट संकट आले आहे... तुमचा आधार हवाच आहे हेलिक्सला.. मिस्टर रेजिनांबरोबर तुम्हीही निघा आजच्या फ्लाईटने दिल्लीला... हं?? आणि जिंकून या... डोन्ट वरी... कुणाचाही जॉब घेण्याइतकी मी वाईट नाही...

शेवटी लिमिटेड कंपनी असली तरीही एक कुटुंबच होते ते मोठे!

जोशीच्या रक्तातून जणू आभारांचे तुषार उडाले. अत्यानंदाने आणि अत्यादराने त्याने सर्वांसमोर मान डोलावून डोळे पुसले. तो क्षण पाहून मात्र गांगुली, सिंग आणि मेहरांनाही बरे वाटले. मोनालिसा कुणाचाच जॉब घेणार नव्हती. एका नवीन उभारीने सगळे डिस्पर्स झाले. 'सेल'ला ते पत्र रिव्हर्स घ्यायलाच लावावे हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता आत्ता.... दोनच माणसे सोडून.... रत्नाकर लोहिया....

...... आणि .... मिस. एम. एम. गुप्ता हरसेल्फ...

पण बाकीच्यांच्या मते... ही एवढीशी मुलगी आज जणू... प्रत्येकाची आईच झालेली होती... चूक केली की रागावणारी... पण नंतर प्रेमाने थोपटणारी.. मोहन गुप्ता असायला हवे होते आज..

===========================================

हायलॅन्ड पार्क!

साडे तीन पेग्ज झाले तरी थेंबही प्यायल्यासारखा वाटत नव्हता लोहियांना! चढतच नव्हती.

आणि हंड्रेड पायपर्सचा दुसरा पेग संपवत असलेल्या रेजिनाला 'आपण आपले संपूर्ण आयुष्य गिअर्स विकले असे नसून आपण ते वाया घालवले' अशी जाणीव होत होती.

समोर बसलेल्या मोनाच्या डोळ्यात मात्र तुरळक पाणी होते आणि अत्यंत म्लान चेहरा करून डॅडची आवडती ब्लॅक लेबल सिप करत होती.

ओबेरॉय शेरेटन!

याच रेस्टॉरंटच्या खालच्या कोणत्यातरी स्विटमध्ये एका रात्री लोहियांनी सायराचा पहिल्यांदा उपभोग घेतला असेल याची आठवण येत असूनही मोनाने मुद्दाम चेहरा म्लान ठेवलेला होता.

कुणी बोलतच नव्हतं! कारण दहा मिनिटांपुर्वीच बोलणं संपलेलं होतं! आणि मिस एम एम गुप्तांचा आत्ताचा अभिनय पाहिला असता तर अमिताभ बच्चनने हात जोडून नमस्कार केला असता तिला!

लोहिया - इट्स ओके बेटा... व्हाय आर यू क्रायिंग???

मोनाने एकदम उठून लोहियांपाशी जात त्यांच्या खांद्यावर डोके टेकवले आणि काही काळ मूक रूदन केले. लोहियांना सगळ्यांसमोर आत्ता तिला थोपटावेच लागत होते. रेजिना बघत बसला होता दोघांकडे निर्जीवपणे!

मोना - तुम्ही म्हणजे डॅडच होतात अंकल.. माझ्यासाठी आणि हेलिक्ससाठी...

लोहिया - आय नो .. आय नो बेटा... याच लोकांसाठी मी वाट्टेल ते केलेले आहे एकेकाळी...

मोना - अर्थात.. तुम्ही कुठे लांब नाही चाललेला आहात.. हेलिक्स तुमचेच आहे... आणि तुम्हीही हेलिक्सचेच आहात..

लोहिया - खरं आहे...

काही मिनिटांनी लोहिया उठले..

लोहिया - मी निघतो बेटा... उद्या परवा पुण्यात येईन.. मग भेटूच... हं???

मोनाने मान डोलावली.. लोहिया गेल्यावर मोना टेरेसच्या कठड्यापाशी गेली. तब्बल पाच मिनिटांनी खोल खाली पोर्चमध्ये एक मर्सिडीझ आलेली दिसली. ती दारासमोर थांबली. दारात उभे असलेले लोहिया गाडीत बसले आणि गाडी निघाली.... आणि मोनाने मागे वळून रेजिनाकडे पाहिले.

रेजिनाने कोपरापासून हात जोडत तिला नमस्कार केला आणि... खदाखदा हासत मोनालिसाने ब्लॅक लेबलचा पेग हातात घेऊन 'चीअर्स' म्हंटले..

रेजिना - मला आता जरा नीट समजेल का?? आपण काय काय केलेत ते???

मोना - नक्कीच... पण इथे उघड्यावर???

रेजिना - ओह... पण स्विटमध्ये जाण्यात तुला धोका आहे....

मोना - खरे तर तो धोका हवासा आहे... पण...

रेजिना - पण??

मोना - पण आज नको....

रेजिना - का??

मोना - कारण आज मला तुला एक गोष्ट सिद्ध करून दाखवायचीय... आणि ती करून दाखवल्यावर तुझा मूड जाणार आहे...

रेजिना - कोणती गोष्ट???

मोना - आठवतंय?? सिंगापूरला असताना तू म्हणाला होतास... मोहन गुप्ता असते तर त्यांनी तुला हेलिक्सला खेचला असता आणि लोहियांना डॅनलाईनला टाकले असते...??

रेजिना - हो... ... मग????

मोना - तुला हेलिक्सला न घेताच मी आज बाजी मारली... तुलाही विजय मिळाला नाही....आणि त्या लोहियालाही...

रेजिना - मोना... तू हर्ट झाली होतीस?? ... आय अ‍ॅम... आय अ‍ॅम सॉरी मोनालिसा....

मोना - यू शुड बी रिकोह... आज कडवटपणा नको म्हंटले तरीही... एक गोष्ट लक्षात ठेव... काही कारणाने बायका एखाद्या गोष्टीत पडत नसतात एवढंच... पण पडल्या तर पुरुषांना जमणार नाहीत अशा गोष्टी त्या करू शकतात... तेव्हा बायकांना कमी लेखून कमेंट पास करताना... निदान यापुढे तरी काळजी घे...

रेजिना पाच मिनिटे अपमानीत होऊन समोरच्या टेबलकडे फक्त पाहात बसला होता. आणि मोनाला अजिबात वाईट वाटत नव्हते.

रेजिनाला मात्र फारच बोचत होते ते वाक्य! त्या दिवशी प्रणय आटोपता घेतल्यानंतर तिच्या भावविश्वाची त्याने थट्टा केलेली होती. आणि तिच्या स्त्रीत्वाचा अपमानही! त्या एकाच वाक्यात! 'शोभतेस हो मोहन गुप्तांची मुलगी, ते असते तर त्यांनी मला डॅनलाईनला कुजवलाच नसता...' या वाक्याने! आणि ते मोनाने लक्षात ठेवावे आणि या प्रसंगी आपल्याला ऐकवावे याचे त्याला वाईट वाटत होते. पण काय चूक होते? त्याने त्या तशा वेळी तिला ऐकवले होते. तिने या अशा वेळी!

पण नेमके झाले काय ते मोनाने पुढच्या पंधरा मिनिटात त्याला ऐकवले. खरे तर ते 'असे असे' होईल याची तिला अजिबात शाश्वती नव्हती. कारण खेळ होता सरकारी कंपनीशी! पण मोहन गुप्तांच्या मुलीला ही असली आव्हाने काय वाटणार??

रेजिना आणि जोशी दिल्लीला गेले तसा घरी येऊन मोनाने खूप विचार केला आणि रात्री चक्क दहा वाजता मोहंतींच्या घरी फोन लावला.

मोहंती! हेलिक्सच्या अ‍ॅन्युअल डे ला आलेली 'सेल'ची मोठी हस्ती! आता ते कॉर्पोरेट ऑफीसमध्ये डेप्युटी डायरेक्टर या पदावर होते. आणि मोनाच्या माहितीप्रमाणे ते 'अर्देशीर चेन'मध्ये नव्हतेही आणि बरेच वरचे अधिकारीही होते. एक क्लीन अधिकारी!

मोनाने त्यांना कहाणी ऐकवली. एक स्त्री, तेही एका कंपनीची हेड या वेळेस घरी फोन करते हे पाहून मोहंतींनीही सगळे पेशंटली ऐकून घेतले. अवाकच झालेले होते ते! हेलिक्सला असे पत्र गेलेच कसे?? मोनाच्या खास विनंतीवरून त्यांनी पंधरा मिनिटे दिल्लीतल्या दिल्लीत काही टेलिफोन कॉल्स करून तिला पुन्हा पावणे अकराला फोन केला. त्यात त्यांनी सांगीतले. केस संशयास्पद आहे. फारच डिफॉल्ट झाला तर असे पत्र पाठवले जाते. हे पत्र पाठवण्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे.

त्यानंतर मोनाने त्यांना सकाळी पुन्हा फोन केला. अजून रेजिना आणि जोशी 'सेल'मध्ये पोचलेलेही असणार नव्हते. कारण ते दिल्लीलाच पोचले होते काल संध्याकाळी!

या फोनवर मात्र मोनाने काही प्रमाणात मोहन गुप्ता, ती स्वतः आणि लोहिया तसेच अर्देशीर या नात्यांमधील काही क्लिष्टता किंचित प्रमाणात ऐकवल्या. आणखीनच अवाक झालेल्या मोहन गुप्तांनी ते पत्र रिव्हर्स घ्यायचे असेल तर अ‍ॅप्लिकेशन द्या आणि मी सही करेन असे आश्वासन दिले.

पण मोना ती मोनाच!

लोहिया हे मोहंतींचे मित्र आहेत हे तिला माहीत होते. रेजिनाचा पहिला फोन येईपर्यंत ती थांबली. दोन तासांनी रेजिनाचा फोन आला. सत्यनारायण नावाचा एक जी एम त्यांना आतच बोलावत नव्हता. मोना मनातल्या मनात हासली. तिने तिसरा फोन लावला मोहंतींना!

लोहियांनी कॅश घेऊन दोन माणसे सत्यनारायण यांच्याकडे पाठवली आहेत आमची! बेधडक सांगून टाकले मोनाने! भडकलेच मोहंती! मोनालाच बोलले. मोनाने एकदम कांगावा केला. 'मला हेच तर लोहियांचं आवडत नाही म्हणून तर मी स्वतःच तुम्हाला कळवतीय गैरसमज होऊ नयेत म्हणून' असे वर सांगीतले. मोहंतींची तोफ आता वळली. त्यांनी फोनवर मोनाशी बोलताना लोहियांवरच तोंडसुख घेतले. वर 'त्या दोघांना आता मीच बोलावतो' असे सांगीतले.

मोना शांतपणे घरात बसून राहिली.

तासाभराने रेजिनाचा फोन आला.

'मोहंती वैझागहून इथे आलेत हे मला माहीतच नव्हते. त्यांनी आम्हालाच झापले. आणि घालवून दिले. झाले काय आहे तेच कळत नाही आहे.'

त्यावर मोनाने दोघांनाही तिथून निघून यायला सांगीतले पुण्याला! चक्रावलेला रेजिना जोशीला घेऊन बाहेर पडला.

आणि तासाभराने इमेल आली.

'The letter of black listing was sent through oversight. Please confirm per return that M/s Helix are going ahead with the planned dispatches. Also, we would like to mention that we would not be interested in dealing with Mr Lohiya, Mr D'souza and Mr Joshi from your organisation'

'फॉर अ‍ॅन्ड न बिहाफ ऑफ द प्रेसिडेन्ट ऑफ इन्डिया' अशी मोहर लावून टेन्डर डॉक्युमेन्ट्स काढणार्‍या 'सेल'मधील अनेक अधिकार्‍यांना पहिल्यांदाच बघायला मिळाले की 'एखाद्या कंपनीतील कोणाशी डील करायचे' हेही ठरवले गेले.

आणि आजच्या ओबेरॉयच्या मीटिंगमध्ये मोनालिसाने जबाबदार्‍यांची विभागणी उरकलीही होती.

डॅनलाईन इन्डिया - रेजिनाल्डो डिसूझा

इन्टर ट्रॅक्टर इन्डिया - रत्नाकर लोहिया

हेलिक्स - मोनालिसा गुप्ता

रेजिना सुसाट वेगाने जात असलेल्या आलिशान गाडीतून पुण्याला निघालेला होता. लोहिया केव्हाच घरी गेलेले होते.

ओबेरॉयच्या टेरेसवरून मुंबईची हळूहळू हालणारी गर्दी बघत मोनालिसा मनात विचार करत होती.

'दोन तीनच स्टेप्स' राहिलेल्या आहेत. नकाशा तर केव्हाच जुळला. एक नको असलेला मोठा तुकडा आपण आधीच फेकला होता. दोन किरकोळ नको असलेले तुकडेही फेकले आपण! आणि आज एक सर्वात मोठा नको असलेला तुकडा हालवला आहे.

चला... स्विटमध्ये जाऊन निवांत झोपू! वाईट इतकंच वाटतंय की या प्रक्रियेत रेजिनाचे मन मात्र दुखावले गेले. त्याला कधीही खुष करता येईल. पुरुषी अहंकार आहे. तो निवायला वेळ लागणारच! पण डॅड.. मी खेळलेली खेळी कशी वाटली हो तुम्हाला??

आदराने मान तुकवून काचेचे दार उघडून उभ्या राहिलेल्या वेटरच्या अभिवादनाचा स्वीकार करून मोनालिसा लिफ्टकडे निघाली तेव्हा...

... आकाशातून मोहन गुप्तांचा तळमळणारा आत्मा नक्कीच आनंदाने हासून पोरीच्या पाठीवरून हात फिरवत होता....

तेवढ्यात मागून दुसरा वेटर धावत आला...

"मॅडम... ये रहगया था आपका..."

मोनालिसाने गोंधळून ते लेदरचे पाकीट हातात घेतले.

लोहिया????

चुकून राहिले असेल! क्रेडिट कार्ड्स आहेत सगळी.

शांतपणे स्विटमध्ये येऊन चेंज वगैरे करून मग तिने टीव्ही लावला आणि आरामात ते पाकीट उघडले.

चार क्रेडिट कार्ड्स, एक लायसेन्स, पासपोर्ट, हेलिक्सची अनेक बिझिनेस कार्ड्स आणि फोन नंबर्सची एक डायरी...

बाकी काही बघण्यासारखे नव्हतेच.... त्या डायरीशिवाय...

आणि डायरीच्या एकोणिसाव्या पानावर गेल्यावर तिला जाणवले...

..... संपूर्ण अंगातून विजेचा प्रवाहच जणू वाहात आहे... स्पीचलेस... स्टॅन्डस्टिल.. एखादा पुतळाच जणू...

.... फार फार गाफील होती ती.....

मूर्ख होती...... मोहन गुप्तांचा आत्मा प्रेमाने नक्कीच हासत नसणार होता... तुच्छतेने हासत असणार होता आभाळातून...

चक्कर यायची बाकी राहिली होती मोनालिसाला...

त्या पानावर ते नाव होते... आणि त्याच्यापुढे लिहीलेले होते...

रुपीज सेव्हन्टी थाउझंड पेड ऑन थर्ड ऑक्टोबर 2006

ते नांव होते....... सिवा.... !!!!!!

गुलमोहर: 

आणखीनच अवाक झालेल्या मोहन गुप्तांनी ते पत्र रिव्हर्स घ्यायचे असेल तर अ‍ॅप्लिकेशन द्या आणि मी सही करेन असे आश्वासन दिले. ....

ईथे मोहंती पाहीजे होते....

बाकी काय बोलणार बेफिकीरजी....मोनाची अफलातून खेळी...लाजवाब....

अरे सही!
आम्हा सर्वान्नाच तुम्ही गाफिल गाठलेत.
याचा अर्थ तो हॉटेल्चा फोन लोहियांना सिवाचा होता.
Inventory चे पटले. starbucks मध्ये इन्वेन्टरीत अशी रिस्क घेउन फाय्दा केल्यावर एकाला फायर केले होते.

'The letter of black listing was sent through oversight. Please confirm per return that M/s Helix are going ahead with the planned dispatches. Also, we would like to mention that we would not be interested in dealing with Mr Lohiya, Mr D'souza and Mr Joshi from your organisation'

डोळ्यात पाणी आणलं हो....जसे काही मीच हेलिक्स ला वाचवलं असावं असा असिम आनंद झाला.
मोना ला सलाम.. तुम्हाला सलाम..

नाद.... बेफिकिरजी, मोनाचा मिटिंग नधला अवतार, रुद्र अवतार अत्यंत भावला, जाम टरकवल तिने सगळ्यांना, मजा आलि. पण तिला जेव्हा समजल किंवा वाटल मेहरांना आपण ऊगचच बोललो, तिने मिटिंग संपल्यावर त्यांना तसे बोलुन दाखवायचे होते होते, जोशी ला दिल्लि ला पाठवले हे त्यायल्या त्यात बरे केले.

एका ठिकाणि मिहन गुप्ता एवजि मोहंति हवे आहे असे मला वाटते,

मोना ने सिवा ला जसे ट्रिट केले(म्हणजे, काम देणे आणि नंतर आता तुझि गरज नाहि म्हणुन सांगणे), त्याचा तिला पश्याताप नक्किच होत असेल, कारण किति केले तरि सिवा हा प्रामाणिक माणुस आहे, ज्या ने ज्या कामासाठि पैसा दिला ते काम त्याने मन लावुन करणारच, आता पहायचे आहे कि, मोना पुढे काय करते, किंवा सिवा किति चांगला माणुस आहे कारण...... त्याच्या बोलण्यातुन खुपदा जाणवल कि मोहन गुप्तांचे त्याच्यावर खुप ऊपकार आहेत.

अजुन एक, ति(मोना) सगळ्यांना तुच्छ लेखते हे काहि बरोबर नहि, तिने रेजिनालाहि हि असे ट्रिट करावे???? मोना एक तडफदार व्यक्तिमत्व आहे, जिला कोणाचिहि गरज नाहि, पण यशाच्या अतुच्य शिखराव आपण पोहचलो, खुप शिखरे पादाक्रांत केलि.... तरि ते सुख/आनंद शेअर/सेलिब्रेट करायला कोणितरि हवेच ना???? कि एकटच जगातच आणि एकटच मरायच???

प्लिज पुढ्चा भाग लवकर लिहा.... आत्ता धिर धरवत नाहि, खुप ऊस्तुकता लागलि आहे.

मस्तं मस्तं....एकदम छान जमलाय्...
थंडी छान पडली आहे...त्यामुळे.. मोना black label घेते म्हणल्यावर मला "J" feel झालं.. Happy
keep it up....good going..

-Siva...oh Sorry..Parikshit Happy

प्लिज पुढ्चा भाग लवकर लिहा.... आत्ता धिर धरवत नाहि, खुप ऊस्तुकता लागलि आहे >> लवकर लिहा.......................

या फोनवर मात्र मोनाने काही प्रमाणात मोहन गुप्ता, ती स्वतः आणि लोहिया तसेच अर्देशीर या नात्यांमधील काही क्लिष्टता किंचित प्रमाणात ऐकवल्या. आणखीनच अवाक झालेल्या मोहन गुप्तांनी ते पत्र रिव्हर्स घ्यायचे असेल तर अ‍ॅप्लिकेशन द्या आणि मी सही करेन असे आश्वासन दिले. >> तिथे मोहंती पाहिजे ना?

व्वा.. सह्हीच.. गुंगून जायला होतं..
बेफिकीर जी धन्यवाद, तुमच्यामुळे मराठी कादंबर्‍या वाचायची सवय लागली Happy

आणखीनच अवाक झालेल्या मोहन गुप्तांनी ते पत्र रिव्हर्स घ्यायचे असेल तर अ‍ॅप्लिकेशन द्या आणि मी सही करेन असे आश्वासन दिले. >> तुम्हाला मोहंती म्हणायचं होतं का?

बेफिकीरजी,
बोर्ड रुम वॉर छान वाटली. हे असच असतं, कही पे निगाहें, कही पे निशाना.
गांगुली, मेहरा, जोशी ईत्यादीं वर निगाहें आणि लोहियां वर निशाना.

<<ते नांव होते....... सिवा.... !!!!<<>>
हे होणारचं होतं, आणि मोना ला ह्याची जरा कल्पना असेलही, कारण पाचगणी भेटीत मोनाने सिवा चे कार्यपध्दती माहित करुन घेतली होती, तिने बहुतेक विचारले ही होते सिवा ला ह्या बद्दल कि ती कोणा वर नजर ठेवत आहे जर तेच व्यक्ति तुझा क्लायंट असेल तर तु ते इन्फोरमेशन मला देशील का, तेव्हा सिवा नी सांगितलं होतं कि ते सेपरेट केस असणार आणि त्या क्लायंट चे इनफोरमेशन नाही पास करणार.

असं वाटतं ही कथा कधी संपुच नये (Hats off to your writing), पण मग नंतर असं वाटतं, नो मोना शुड टेक रिवेंज फ्रॉम दोझ xxxxxx

पु ले शु

Also, we would like to mention that we would not be interested in dealing with Mr Lohiya, Mr D'souza and Mr Joshi from your organisation'

ईस धीस डबल क्रॉस विथ रेजिना ???