तगरी

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

Tabernaemontana citrifolia
\
\
tagar.jpg

\
\

असे काहितरी कठिण नाव वाचून काहिच कळणार नाही, पण वरचा फ़ोटो बघून, हि तर आपली तगरी, अशी ओळख्न सहज पटेल.

माझ्या लहानपणीच्या बर्‍याच आठवणी या झाडाशी निगडित आहेत.
आमच्या वाड्यात एक मोठे वाढलेले तगरीचे झाड होते. मोठे म्हणजे किती मोठे, तर चक्क दोन मीटर वगैरे वाढलेले. त्याचे खोड चांगले मनगटा एवढे जाड होते. आणि शेजारच्या काकुंच्या कोंबड्या, आमच्या पकडापकडीतून वाचण्यासाठी उडुन त्या खोडावर जाऊन बसायच्या. एवढे मोठे तगरीचे झाड, उडणार्‍या कोंबड्या आणि त्याना पकडणारे आम्ही, सगळेच आता नवलाचे वाटतेय.

या मोठ्या झाडाला फ़ारशी फ़ूले यायची नाहीत. पण बाकि भरपूर फ़ुलणारी तगरीचीच अनेक झाडे आजूबाजूला होती.

तसे जाई जुईचे वेल पण होते, पण त्यांचे फ़ुलणे मोजून मापून. शिवाय, काहि मोसमातच. त्यांच्या कळ्यांवर ताई लोकांचा हक्क. आम्हाला कोण हात लावू देणार त्या कळ्याना. त्या मानाने तगरीची फ़ुले वर्षभर आणि मुबलकही. मुक्या कळ्यांचे हार गजरे करुन आम्ही खेळत असू.
जरा जास्त थंडी पडली किंवा पाऊस पडला, कि तगरीच्या कळ्या लवकर उमलत नाहीत. त्यांचा मोदकासारखा आकार होतो, आणि आमच्या खेळातल्या गणपतिबाप्पाला त्याचा नेवैद्य चालायचा.

पुर्वी फ़ुलांची परडी असायची. ( आता कळकट प्लॅष्टिकची पिशवी असते ) सकाळी उठुन त्यात फ़ूले भरून आणणे हा एक आवडता उद्योग असायचा, आणि ती परडी भरुन देण्याची जबाबदारी कायम तगरीचीच असे.

तगरीचा रंग कसा छान शुभ्र. पाच पाकळ्या आणि त्याही एका दिशेने वळलेल्या. तगरीचे चार पाकळ्यांचे फ़ूल मी लहानपणी एकदोनदाच बघितले असेन. त्यावेळी ते स्वस्तिक म्हणुन सगळ्या वाड्याभर मी मिरवले होते.

तगरीचे झाड साधारण छत्रीसारखे अर्धगोल फोफावते. त्यावर हि चांदण्यासारखी फ़ुले, गोव्यातील देवळातल्या नाचवायच्या छत्रीची आठवण करून देतात.
\
\
tagard.jpg

\
\
तगरीची थोरली बहिण म्हणजे डबल तगरी. हिचे फ़ुल, पान, देठ सगळेच जाड. एकेरी तगरीची पाने आडवी पसरणार तर हिची उभी राहणार. पण हिरवाई मात्र, धाकटीकडे जास्त.

तगरीला फ़ळ आलेले मात्र मी कधी बघितले नाही.
आपले देवघर सजवणारी हि साधीशी तगरी, आलीय मात्र वेस्ट ईंडिजमधून. तसे याला मिलवूड असेही नाव आहे. ते अर्थातच या झाडाच्या चिकामूळे.

विषय: 
प्रकार: 

दिनेश, ह्या झाडाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

माझ्या आवडीचे झाड आहे हे, पण मी त्याला तगर म्हणत नाही. आंबोलीला तगरीला अनंत म्हणतात आणि अनंताला चटकचांदणी.

तगर म्हटले की काहिच येत नाही डोळ्यासमोर, पण अनंत म्हटले की झाडावर आणि झाडाखाली अनंत फुले असे चित्र लगेच येते डोळ्यासमोर.

चांदण्याच्या आकाराच्या आणि चटकदार दिसणा-या अनंताच्या फुलाला चटकचांदणी हेच नाव जास्त शोभते असे मला वाटते. शिवाय इथे मुंबईत अनंत कुठे फुलतो अनंत फुलांनी? दोनचार फुले आली तरी खुप झाले. माझ्याकडे एक अनंत आहे त्याला एकच नवसाचे फुल आले. त्याच्या नंतर फक्त कळ्याच. बिचा-या फुल होण्याआधीच हुतात्मा होतात. तुमच्या सल्ल्याप्रमाणे कटींग वगैर्रे सगळे केले, पण काही फायदा नाही. आता पण आल्यात कळ्या, पण फुलाचा अजुन पत्ता नाही.

कोकणात मात्र अनंत फुललेला पाहिला अनंत फुलांनी. अगदी तगरीचीच आठवण करुन देणारा वाटला.

मला डबल तगर पण आवडते. इतका पांढरा शुभ्र रंग दिसत नाही दुसरीकडे.

साधना.

गोव्यात पण हिला अनंतच म्हणतात. आणि डबल तगरीला घोडेअनंत.
हि मात्र कुठेही रुजते, भरभरून फूलतेही.
आता कळ्या आल्यात म्हणजे पावसात नक्कीच फूलेल.

दिनेश, खूप दिवसानंतर येणे झाले तुमच्या पानावर. तगर माझीही पण प्रिय आहे. घरी देवाला हार करण्याचे काम फक्त माझे असायचे. मग तगर प्राजक्त कण्हेर जास्वन्द आणि कधीकधी गुलाब माझ्या परडीत यायचे. ह्यालाच अनंत म्हणतात का.. हे आज कळले. काहीकाही तगरीची पाने फारच पिवळत आणि निस्तेज दिसतात आणि त्यांना येणारी फुलेही लहान असतात. माझ्या घरी जे तगर होते त्याचा रंग काळसर हिरवा आणि फुले मोठी असतं. मंदसा वास यायचा पहाटे. मला झाडांचा छंद जोपासायला मिळत नाही ह्याचे मला खरचं नेहमी दु:ख होते. झाडांच्या संगतीत तासंतास जात.

मला आठवते त्याप्रमाणे तगरीला वास नसतो. (हिलाच बुटकी असे पण म्हणतात का ?) डबल तगरी सुवासीक असते ना ?

तसेच अनंत म्हणून वेगळी फुले असलेले झाड पाहिले होते लहान असताना.

मराठवाड्यात ह्याला स्वस्तीकाचे झाड म्हणुनच ओळखले जाते. आमच्या घरी दोन आहेत. अगदी ८ ते १० फुट वाढलेले. खुप फुल येतात त्याला.

एकदा या झाडाची बाबांनी छाटनी केली आणि मग आम्ही एका फांदीत एक पितळेची अंगठी टाकली. तिला काही दिवस काढलीच नाही. ती आत पक्की बसली. लहानपणी त्या अंगठीकडे पाहण्याचा एक छंदच जडला होता. घर सोडले तेंव्हा ती अंगठी परत एकदा शेवटची पाहिली होती मी आणि बहिणीने हे अजून आठवते. नंतर परत एक दोनदा त्याच घरी गेलो होतो खास अंगठीला आणि तगरीला भेट द्यायला.

वा वा वा....मला तगर खुप आवडते. तगर म्हंटले कि आठवतो गणेशोत्सव आणि शेजारच्या चव्हाणकाकु. त्यांच्या दारात आहे छान तगर. मला गणपतीसाठी तगरीचे हार करायला फार आवडायचे. (पण माझ्या ताया आणि त्यांच्या मैत्रिणी दुर्वा तोडायला पाठवायच्या कायम ;))

मी आजही तगरीचा हार करते रोज सकाळी देवासाठी. हल्ली तगरीच्या कळ्यांचे गजरेही दिसतात बायकांच्या डोक्यात. मला वाटते मोग-यापेक्षा जास्त वेळ ताजे राहतात ते, पण मोग-यासारखे माळल्यावर फुलत मात्र नाही.

तगरीला वास मात्र येत नाही. साध्या आणि डबल तगरीलाही. (दिनेश - हो ना?)

बी - तगरीमध्ये वेरीगेटेड वरायटी पण आहे. त्याची पाने थोडी हिरवी आणि बरीचशी पांढरी असतात, फुले मात्र खुपच कमी येतात त्याला. मी गार्डन बॉर्डरसाठी त्याचा वापर झालेला पाहिला आहे.

साधना.

तगरीला अगदी जरासा वास येतो. मुंबईत खास करुन गणपतिच्या दिवसात तगरीचे अगदी मोगर्‍यासारखे दिसणारे गजरे बाजारात येतात. मला वाटते काहि खास प्रकारे त्या कळ्या उमलवत असावेत. त्या दिवसात फुलाना सोन्याचे भाव असतात. तगरीची खास शोभेची जात आहे. पाने हिरवीपिवळी असतात पण फुले कमी.

बी, सिंगापुरला तगरीसारखीच फुले येणारे पण जरा वेगळे झाड मी बघितले होते. तो जंगल ट्रेल आहे ना त्याच्या आजूबाजूला. त्याला जांभळासारखी फळे पण आली होती, पण ते झाड ना तगरीचे होते ना जांभळाचे.
तूझ्या अंगठीसारख्या अगदी छोट्या आठवणी असतात ना झाडाशी निगडीत. मोठेपणी खुप छळतात त्या. म्हणून तर ही हिरवी सोबत जपायची असते ना.

दिनेश, तुम्ही म्हणता ते झाड मी इथे खूपदा पाहील आहे. रोजच पाहतो. तगरीचा जर सुगंध हवा असेल तर पहाटे तिच्या जवळ जावं. अगदी मंद मंद सुगंध दरवळत राहतो. गौरी गणपतीच्या दिवसात तगर आणि कण्हेरीचे हार करायचे काम माझ्याचकडे असायचे. मधे मधे मी तगरीचेच पान पण दुमडून तगरीत ओवायचो.

खरचं तगरीचं आणि लहानपणाचं जवळचं नातं आहे. तेंव्हा प्रत्येक घरात तगर, कण्हेर, जास्वंद असायचीच.
काही वास काही गाणी भूतकाळात घेऊन जातात आपल्याला. त्यातीलच एक तगरीचा मंद वास.
गणपतीत गोकर्णाची फुले येत. तेंव्हा मी एक तगरीचे फूल देठातून सुइ घालून व एक गोकर्णाचे फूल तसेच ओवून
तगरीच्या पाकळ्यांखाली गोकर्णाचे देठ दडवून हार करीत असे. हा हार फार सुंदर दिसतो. एखाद्या नेकलेससारखा.
हार करताना तगरीची देठे अर्धी तोडायची म्हणजे हार मूर्तीवर बरोबर बसतो.
वरच्या बाजूस तगरीची पांढरी फुले आपल्याकडे तोंड करून व त्याच्याखाली गोकर्णाची निळी ओळ.

व्वा, छानच फोटो आहेत. आणी लिखाणही. मी तगरीची १०,१२ फुट वाढलेली झाडं पाहीली आहेत. डबल तगर तर छानच दिसते. तशीच डबल कण्हेरही छान दिसते. त्याचे गुच्छतर लांबून गुलाबासारखे वाटतात.
परडी भरायची जबाबदारी तगरीची , अगदी खरं पावसाळ्यात सकाळी प्राजक्त आणि संध्याकाळी गुलबक्षी असते मदतीला.

तगरीचे काही औषधी उपयोग माहीती आहेत का? मी काही ऐकले नाहीत अजून.

तगरीचा बाकी काही उपयोग मला आढळला नाही. भरपूर फूले येतात म्हणूनच लावत असावेत. तगरीला तसे फार पाणी द्यावे लागते असेहि नाही. ती तशीही तग धरु शकते.
साध्या तगरीत, मला नेहमी पाकळ्या एकाच दिशेने वळलेल्या दिसल्या. चुकूनही दुसर्‍या बाजूला वळलेल्या दिसल्या नाहीत. मोठ्या तगरीचे मात्र काहि उपप्रकार गोव्यात दिसले. म्हणजे रंग तोच पण फूलांचा आकार थोडा वेगवेगळा.

दिनेश तुम्ही कुटला क्यामेरा वापरता?

फोटो नेहमी सारखेच अप्रतिम,
दिनेश तुम्ही कुटला क्यामेरा वापरता?

दिनेशदा,
मला हे झाड चांदणीचे म्हणूनच परिचित आहे. तुमची लेखनमाला छान चालली आहे.
फोटो आणि माहिती छानच.