सायुच्या गोष्टी: घरातलं इंद्रधनुष्य

Submitted by सावली on 1 December, 2010 - 20:35

"बाबा इंद्रधनुष्य करून दाखवा ना. प्लीज. मी कधी बघितलंच नाहीये. प्लीज ना बाबा." सायु सकाळपासून बाबांच्या मागेच लागली होती.

"अगं, इंद्रधनुष्य असं घरी कसं करणार?" आज्जीने मुद्दामून हसतच विचारलं.

"अग आज्जी काल आई धनुकल्याची गोष्ट सांगत होती ना, तेव्हा बाबा म्हणाले मी दाखवीन तुला इंद्रधनुष्य. आणि आत्ता दाखवायला सांगतेय तर बाबा लक्षच देत नाहीयेत." सायुने आज्जी कडे तक्रार केली.

इतक्यात बाबा आलेच आंघोळ करून बाहेर. "काय गं पिल्लू कशाला गाल फुगवून बसलीयेस?"

"हं तुम्ही लक्षच देत नाही बाबा. मला इंद्रधनुष्य करून दाखवा ना."

"हो गं नक्की दाखवणार आहे. पण आत्ता नाही तीन दिवसांनी शनिवार आहेना? तेव्हा मला सुट्टी असते त्या दिवशी दाखवतो. चालेल ना?"

आनंदाने सायु एकदम उड्याच मारायला लागली. "नक्की बरं का बाबा. मी श्रीया आणि सुरभीला पण बोलावणार आहे बघायला."

"बरं, बरं संध्याकाळी बोलाव त्यांना ५ वाजता."

श्रीया आणि सुरभी या सायुच्या बालवाडीतल्या मैत्रिणी . या दोघी बरोबर आणखीनही दोनचार जण येणार हे बाबा आणि आई दोघांनाही ठाऊक होतं.

त्यानंतर रोज सकाळी उठल्यावर सायुचा पहिला प्रश्न "आज कुठला वार?" आज शनिवार नाही अजून शनिवार यायला वेळ आहे अस ऐकलं कि जरा हिरमुसली होऊनच उठायची ती. खरतरं उठायचच नसायचं तिला. पण आई ऑफिसला जायच्या आधी तयारी करून आईबरोबर शाळेत जायला लागायचं. त्यामुळे लवकर न उठून चालायचं नाही.

शेवटी एकदाचा शनिवार आला. "आज शनिवार आहे हो" अस आज्जीने सांगितल्यावर सायु अगदी टुणकन उडी मारून उठली. आणि धावत बाबांच्या समोर जाऊन "आज शनिवार आज शनिवार" अस म्हणत नाचायला लागली.

आता कधी एकदा संध्याकाळ होते अस झालं होत तिला. दुपारचं जेवणखाण अगदी शहाण्यासारख करून एक झोप सुद्धा काढली चक्क तिने.

चार वाजता श्रीया, सुरभी आल्याच पण बरोबर तन्मय निखिल आणि निरंजनीहि आले. आल्या आल्या सुरभी ने धावत घरात जाऊन कुठे इंद्रधनुष्य दिसतंय का ते बघून घेतलं. आईने मस्तपैकी इडल्या केल्या होत्या सगळ्यांसाठी. त्या भराभरा खाऊन मुलं सायुच्या बाबांची वाट बघत होती. पण बाबा मात्र अजून तसेच सगळ्यांबरोबर गप्पा मारत बसले होते.

"बाबा इंद्रधनुष्य?" सायुने आपली नाराजी दाखवलीच थोड्यावेळाने.

"हो गं सायु. ५ वाजता दाखवणार मी. त्या आधी दिसणार नाही ते."

आता मात्र मुलांची उत्सुकता अगदी शिगेला पोचली. आई, आज्जी, आजोबा मात्र खुसुखुसू हसतच होते.

५ वाजायला आले तसे बाबा उठले आणि गाडीच्या गॅरेजजवळ गेले. सायुच घर म्हणजे सोसायटीमध्ये असलेल्या बंगल्याच्या कॉलनीमधला एक बंगला होता, त्यामुळे त्यांच स्वतंत्र गॅरेज होतं. तिथे संध्याकाळच्या सोनेरी उन्हात सगळ्यांच्या लांब लांब सावल्या दिसायला लागल्या होत्या. त्या सावल्यात खेळण्याचा खेळ मुलांनी सुरु केला. इतक्यात बाबांनी गाडी धुवायचा पाईप काढून गाडी धुवायची तयारी सुरु केली.

अजूनही मुलांना काहीच कळत नव्हतं. सायुने नळ चालू केल्यावर मग पाईप मधून जोरात पाण्याचा फवारा उडायला लागला. आणि बघतात तर काय? त्या फवारयाच्या एकाबाजूला सुंदर सात रंगांची एक कमान दिसायला लागली होती.

"बाबा इंद्रधनुष्य!!!" अस म्हणून सायु नाचायलाच लागली. बाकीचे मित्र मैत्रिणी सुद्धा तिच्याबरोबर नाचत , मधेच सात रंगाच्या कमानीत हात घालून धमाल करायला लागले.

तेवढ्यात बाबा म्हणाले कळलं का तुम्हाला कस आलं इंद्रधनुष्य ते?

"पाण्यातून उन गेल्यामुळे ना काका?" निरंजनीने विचारले.

बरोब्बर! पाण्याच्या थेंबातून प्रकाश गेला कि पांढरा प्रकाश सात रंगात त्याचे डीफ्रॅक्शन होते आणि मग इंद्रधनुष्य दिसते. कुठले कुठले रंग आहेत पहा बरं.

तेवढ्यात सायुच्या आईने ता ना पि हि नी पा जा अशी रंगाच्या नावाची गम्मतसुद्धा सांगितली. आता मुलांनी पण वेगवेगळया प्रकारे पाईपमधून पाणी उडवून कसे रंग दिसतात ते पाहिले, आणि सूर्यास्त होईपर्यंत तिथेच मस्त खेळत राहिले.

आणि दुसऱ्या दिवशी शाळेतल्या इतर मित्र मैत्रीणीना हि गम्मत कधी एकदा सांगतो असे सगळ्यांना झाले होते.

त्यादिवशी रात्री झोपायच्या वेळी जेव्हा बाबा सायुला थोपटत होते तेव्हा मात्र सायुने बाबांना एक गोड पापी दिली आणि थॅंक्यू म्हटले. मग झोपण्यासाठी डोळे मिटले तर तिला सारखे इंद्रधनुष्यच दिसत होते.

न रहावून डोळे उघडून तिने बाबांना विचारले "बाबा इंद्र धनुष्य विमानातून कसं दिसतं हो?"

---------------------
या गोष्टी इथे हि वाचता येतील
http://gammatgoshti.blogspot.com/

गुलमोहर: 

गोड गोष्ट. Happy

मी लहानपणी घरात जिथे कवडसा पडेल तिथे पाण्याने भरलेलं एक उथळ भांडे आणि त्यात बुडेल असा एक छोटासा आरसा ठेवायचे.. इंद्रधनुष्याचे सात रंग हजर. Happy

रुनी, मंजिरी, अरुंधती,चिंगी,कविता, वर्षा,शैलजा,अखी धन्यवाद Happy

कित्ती गोड Happy

लहानपणी गॅदरींग मधे एक कार्यक्रम केला होता.. त्यात "ता ना पि हि नी पा जा... साता मध्ये मी राजा" अस गाण होत. त्यात प्रत्येक रंग आणि तो रंग कसा ग्रेट आहे ..त्याच वर्णन होतं.. मी हिरवा रंग होते Happy आईने मस्त हिरवा परकर पोलका शिवला होता.. अस आई सांगते... मल आनाही आठवत .. फार वर्ष झाली Proud