एवढंच जाणतो आम्ही...

Submitted by manya_joshi on 27 May, 2008 - 10:31

ही मातीची सुबक पणती, ती तांब्याची ईवलीशी दिवली
ही चकचकीत पितळी समई, ती चांदीची राजस निरांजनी
हा खानदानी लामणदिवा, तो धीरगंभीर नंदादिप...
आपल्या सोयीसाठी आम्हाला चांगलेच "बनवले" तुम्ही,
बेगडी प्रतिष्ठा लावून आमच्यात भेदभावही केले तुम्ही,
पण खरं सांगू ?
प्रकाशासाठी सतत तेवत राहणं, एवढंच जाणतो आम्ही.

तेलाची वात लावू की शुध्द तुपाची ?
हा प्रश्न फक्त तुम्हालाच पडत असतो,
व्यवहारीक कसोट्यांवर काम साधणं
हा तर तुमचा गुणधर्म असतो,
तरीही उत्तम गुणवत्तेनं प्रकाश देणं
हा आमचा गुणधर्म पाळतो आम्ही
कारण खरं सांगू ?
प्रकाशासाठी सतत तेवत राहणं, एवढंच जाणतो आम्ही.

दिव्याखाली अंधार असतो एवढंच तुम्हाला दिसतं,
प्रकाशाचे किरण किती दूरवर पोहोचले,
याकडे कुणाचं लक्ष असतं ?
उजेडाकडे पाठ फिरवून, अंधार शोधणार्‍या वृत्तीलाही
निरर्थक प्रकाश देतो आम्ही,
कारण खरं सांगू ?
प्रकाशासाठी सतत तेवत राहणं, एवढंच जाणतो आम्ही.

खोट्या प्रतिष्ठेसाठी आत्मसन्मानाची बली देतं कुणी,
कार्यसिध्दीसाठी स्वाभिमानही गहाण टाकतं कुणी,
समृध्दीच्या आशेनं मनःशांतीची होळी पेटवतं कुणी,
इथं स्वाभिमानानं तेवणारी आत्मतेजाची धग
सदैव उरात बाळगतो आम्ही,
कारण खरं सांगू ?
प्रकाशासाठी सतत तेवत राहणं, फक्त एवढंच जाणतो आम्ही.

...... मन्या जोशी

गुलमोहर: 

चान्गल्या कविताना वा वा म्हणणं हेही जाणतो आम्ही....

मन्या, मस्तच!

जागोमोहनप्यारे, येडाकाखुळा, अज्ञात, पल्ली, मराठी वाचक....
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मन्या, सुरेख...... अतिशय वेगळा विषय...आवडली Happy

दिव्याखाली अंधार असतो एवढंच तुम्हाला दिसतं,
प्रकाशाचे किरण किती दूरवर पोहोचले,
याकडे कुणाचं लक्ष असतं ?
छानच लिहीतो की.
जी कविता मला आवडते ... ती नेमकी तुझीच असते.

मनःपूर्वक धन्यवाद !!! जयावी..... सुभाष वाघ..... चिनु.....