कोलंबीची उडदमेथी

Submitted by शैलजा on 24 November, 2010 - 23:19
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो कोलंबी, २ कांदे, २ वाटी खोबरे, ७ -८ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा तांदूळ, १ चमचा धने, ७- ८ काळे मिरे, १ चमचा मोहरी, सुपारीएवढी चिंच, मीठ, साधारण २ -३ चमचे हळद, २ मोठे चमचे तेल.

क्रमवार पाककृती: 

कोलंबी विकत घेताना शिळी वा खूप वास येणारी अशी घेऊ नये, शिळी कोलंबी निस्तेज दिसते आणि मऊ पडलेलीही असते. कोलंबीचे वरील कवच काढून, डोके व मधील काळा दोरा काढून ती साफ करुन घ्यावी, व तिला मीठ लावून ठेवावे. कवच काढून टाकल्यावर, अगोदर भरपूर वाटणारी कोलंबी, अगदी एवढीशी दिसायला लागते! Happy जरी कवच काढलेली विकत आणली, तरी घरी आणल्यावर तिच्यातील दोरा मात्र काढायला विसरु नये.

कांदे कापून घ्यावेत. ह्यातील थोडासा चिरलेला कांदा बाजूला काढून ठेवावा व उरलेल्या चिरलेल्या कांद्याचे २ भाग करावेत.

वाटण १: १ भाग चिरलेला कांदा व १ वाटी खोबरे, लाल मिरच्या, २ चमचे हळद व चिंच हे एकत्र करुन वाटावे.

वाटण २: उरलेला भाग चिरलेला कांदा, उरलेल्या खोबर्‍या आणि धण्यांसकट तेलावर परतून घ्यावा. हे बाजूला उतरवून, त्याच तव्यावर थोड्या तेलात १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा तांदूळ, १ चमचा धने, ७- ८ काळे मिरे, १ चमचा मोहरी हे सारे एकत्र परतून घ्यावे. हे सारे एकत्र वाटावे. वाटण बा़जूला काढून, मिक्सरमध्ये थोडे पाणी घालावे व हे वाटणाचे राहिलेले पाणी उडदामेथीत घालण्याकरता ठेवावे.

मीठ लावलेली कोलंबी स्वच्छ धुवून घ्यावी.

एका पातेल्यात राहिलेला कांदा तेलावर परतून घ्यावा व परतताना त्यावर ४ -४ उडीद डाळीचे व मेथीचे दाणे घालावेत. परतून झाले की त्यावर वाटण क्र १ घालावे.

उकळी आली की त्यात कोलंबी घालावी. कोलंबी शिजली की वाटण क्र २ घालावे व चवीनुसार मीठ घालावे. वाटण क्र २ चे पाणीही ह्या उडदामेथीत घालावे, चांगली उकळी काढावी व उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

कर्ली ह्या माशाचीही अशाच प्रकारे उडदमेथी बनवता येते.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक. आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलु, नुसती पाकॄ वाचुनच तोंपासु Happy
फोटु टाकला असतास तर कीबोर्ड नक्कीच भिजला असता Proud

बांगड्याची पहिली आहे मि. कोलंबिची करण्याचा विचारच केला नव्हता. मस्तच रेसेपी. टिपीकल गोवन. या विकेंडला.

हो रीमा, बांगड्याची करतात गं. तिची बहुतेक आहे माबोवर पाकृ. नसली तर टाकेन. ही करुन सांग कशी झाली ते. Happy
>>कीबोर्ड नक्कीच भिजला असत>>>> Proud

मधील काळा दोरा काढून ती साफ करुन घ्यावी, >> हे खूप महत्वाचे, नाहीतर पोटाला त्रास होऊ शकतो.

शैलु, कोळंबी मोठी घ्यावी की लहान चालेल ?

शैलजा मस्त आहे गं रेसिपी. मी गोव्याची ही स्पेशॅलिटी खुपदा ऐकलीय पण खाल्ली किंवा केली कधीच नाही. आता करुन पाहेन आणि कळवेन.

शैलु, कोळंबी मोठी घ्यावी की लहान चालेल

मोठी कोलंबी तळुन खा ना... उगाच कालवणात कशाला?? मी कालवणाला नेहमी बारीक आणि मोठी तळायला ठेवते. Happy दोन्ही आनंद घ्यायचे Happy

भ्रमा, लहान कोलंबी साफ करायला कठीण, वेळ खूप जातो. मी आळशीपणा करुन मोठी वा निदान मध्यम आकारातलीच घेते. Happy पण लहान कोलंबीचे लोणचे? अहाहा!! Happy
साधना, जरुर.

वाटण क्र. २ फारच इन्टरेस्टींग आहे. मी मासे घरी करत नाही (बाहेर खाते फक्त), त्यामुळे हे वाटण कोणत्या शाकाहारी पदार्थात वापरता येईल? मस्त वाटत आहे..

रच्याकने, शैलजा, रेग्युलरली मासे खात असल्यामुळे, तुझी त्वचा इतकी तुकतुकीत आहे का? मस्त ग्लो आहे तिला Happy

>>हे वाटण कोणत्या शाकाहारी पदार्थात वापरता येईल>> कैरीची उडदमेथी करतात गं. त्यात वापरता येतं. त्याची रेसिपी टाकेन वेगळी.
>>रेग्युलरली मासे खात असल्यामुळे >> अय्या, इश्श वगैरे! Blush

शैलजा एकदम मस्त रेसिपी. ही मालवणी पद्धत आहे ना ? अजुन मसला प्रॉन्स हा प्रकारही आहे. त्यात गरम मसाले आख्खे घालतात आणि कांदा खोबर्‍याचे वाटण असते.

मीठ लावलेली कोलंबी स्वच्छ धूवून घ्यावी.

हे अस का ? आम्ही धुवुन मग सगळ लावतो.

जागू, उडदमेथी बनवायची ही कारवारी पद्धत. गोव्याकडेही हीच साधारण. उडदमेथी ही कारवार, गोव्याच्या बाजूला अधिक.

>>मीठ लावलेली कोलंबी स्वच्छ धूवून घ्यावी. >>हे अस का ? आम्ही धुवुन मग सगळ लावतो. >> मासे, कोलंबी ह्यांना एक वास असतो, तो जाण्यासाठी मीठ, चिंचेचा कोळ हे वापरायचे. हे लावून धुतले की मग मासळी एकदम स्वच्छ होते, वास रहात नाही, म्हणून.

फोटो????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????