गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग १६

Submitted by बेफ़िकीर on 24 November, 2010 - 01:51

जयपूर पॅलेस!

एखाद्या सम्राटाच्या राजमहालासारख्या या हॉटेलमध्ये रेजिना मोनालिसाची पाठ थोपटत होता. रात्रीचे अकरा वाजलेले होते. मोनालिसा हमसून हमसून रडत होती. आज चार दिवसांनी एक स्वतंत्र श्वास तरी घेता आला होता तिला!

तो दिवस तिला आत्ताही आठवला.

सकाळी अकरा ते मध्यरात्री दिड! आंघोळ नाही की जेवण नाही! एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे तिला कायद्याला सामोरे जावे लागले होते.

गुन्हा एकच! बॅन केलेले ड्रग बाळगण्याचा!

हेलिक्समध्ये पत्ताही लागू न देता या चौकशीला तोंड देणे आणि त्यातही रेजिनासमोर हा सगळा अपमान होणे यामुळे मोनालिसा अक्षरशः उद्ध्वस्त झाली होती.

या गोळ्या आल्याच कशा? पण शामताप्रसाद श्रीवास्तवांशी तुमचा संबंधच काय? असला तरी या गोळ्यांचे काय करणार होतात तुम्ही? पुण्यातील लॅबलाच द्यायच्या होत्या तर तसे कागदपत्र का नाही आहेत बरोबर? आणि या गोळ्यांची तपासणी व्हावी हा तुमचा उद्देश आहेच कशासाठी? ज्याने या गोळ्या तुम्हाला दिल्या तो तुमचा कोण आहे? हे डिसूझा तुमचे कोण आहेत? तेही यात सामील आहेत का? पुण्याला जायचे होते आणि पुण्याच्या फ्लाईटचे तिकीटही होते तर ते रद्द करून तुम्ही इथेच, दिल्लीतच का थांबलात? किती रुपयांना विकत घेतल्यात या गोळ्या? आणखीन किती गोळ्या आहेत अशा? त्या माणसाकडे किती आहेत?

फक्त प्यायचे पाणी, तेही घशाला ओलावा मिळावा म्हणून, सोडले तर तिला काहीही कन्झ्युम करायची इच्छा होत नव्ह्ती दिवसभर! सहा सहा जण समोर बसून चौकशी करतायत! आधीच रात्रभर जागरण झालेले! त्यात चार दिवस प्रवास! टेन्शन! रडत रडतच उत्तरे देत होती ती! रेजिनाने तिचा परिचय व्यवस्थित दिलेला असल्याने आणि सर्व कागदपत्रे दाखवलेली असल्याने इतकेच झाले होते की अती उच्च पातळीवरच्या अधिकार्‍यांची नियुक्ती झालेली होती चौकशीला! त्यामुळे किरकोळ लोकांना सामोरे जायला लागत नव्हते. दोन महिला अधिकारी आणि चार वरिष्ठ अधिकारी तिला भंडावून सोडत होते. रेजिनाची चौकशी वेगळीच चाललेली होती. त्यातून हेही निष्पन्न झालेले होते की दोघांचे लग्न झालेले नाही मात्र एकाच स्विटमध्ये रात्रभर होते. ही गोष्ट धड एक्स्प्लेन करण्यासारखीही नव्हती आणि लपवण्यासारखीही! कारण रेजिना तिच्या रूममध्ये रात्रभर असल्याच्या कित्येक खुणा तिच्या रूममध्ये होत्या. त्याचे रिस्ट वॉच टीपॉयवर होते, कंगवा होता, बरेच काय काय!

त्या दिवशी दुपारी चार वाजता सर्व अधिकार्‍यांसमोर तिने मान्य केले की या गोळ्या मिळाव्यात म्हणूनच ती मनालीला गेली होती. रणजीतकडून तिने या गोळ्या घेतल्या. या गोळ्या तिला तपासणीसाठी पुण्यातील लॅबमध्ये द्यायच्या होत्या. पण रणजीतकडे या गोळ्या मिळतीलच याची शाश्वती नसल्याने तिने त्या लॅबला आधी काहीच सांगीतलेले नव्हते. तपासणीमागचा तिचा उद्देश इतकाच होता की तिचे वडील या गोळ्यांच्या वापरामुळे गेले की काय हे समजणार होते. आणि तसे असल्यास ती वडिलांच्या मृत्यूची केस री ओपन करणार होती.

हे मान्य करताना पार बरेलीपासूनचा इतिहास तिला सांगावा लागला होता. रणजीतने बालपणी केलेल्या दोन खुनांचा उल्लेख मात्र टाळला होता तिने! मात्र श्रीवास्तव व गुप्ता घराण्यात निर्माण झालेली तेढ, त्यानंतर गुप्ता भावांमधील तेढ आणि आईचा संशयास्पद मृत्यू या सर्व बाबी सांगाव्या लागल्या होत्या.

हे मान्य करताना अर्थातच सुबोधचा उल्लेख वारंवार आला आणि दिल्ली पोलिसांनी त्याला ताबडतोब दिल्लीला बोलावूनही घेतले होते. मात्र तेवढ्यातच सायंकाळी साडे पाचच्या सुमारास एक फोन आला आणि चौकशी अचानक थंडावली. गोळ्या जप्त करण्यात आल्या आणि लीगल केसचे केलेले कागद होल्ड करण्यात आले. थंडावलेली असली तरी चौकशी बंद झलेली नव्हतीच!

मोनालिसाला एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तिच्याबरोबर दोन महिला अधिकारीही तिथे होत्या. रेजिना कुठे होता हे मोनाला सांगीतलेलेही नव्हते.

दुसर्‍या दिवशी पुन्हा भंडावून सोडणारी चौकशी! नंतर हळूच चौकशीतील तीव्रता आश्चर्यकारकरीत्या टप्याटप्याने कमी होत जाणे! मग फॉर्म केलेल्या लीगल केसच्या स्वरुपावर तिच्याचसमोर सर्व अधिकार्‍यांची चर्चा! ते पाहून मग तिने सौम्यातील सौम्य स्वरुपाचा आरोप ठेवायची विनंती करणे! अर्थातच, त्याची किंमत द्यायची तयारी ठेवणे! आणि मग 'अननोईंगली पझेसिंग हार्मफुल ड्रग्ज' असा काहीसा विचित्र आरोप ठेवून दंड वगैरे घेणे!

त्यातच सुबोध समोर येणे! त्याच्याशी कित्येक महिन्यांनंतर डील करावे लागणे! तेही इतक्या अधिकार्‍यांसमोर! कारण दोघांना एकत्र प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणे! त्यातून इतर काही निष्पन्न होत नाही ना हे तपासणे!

आणि अत्यंत अपमानास्पदरीत्या दुसर्‍या दिवशी कुठेही जायला स्वातंत्र्य मिळणे! पेपरमध्ये काहीही येऊ नये यासाठी रेजिनाने यशस्वी आटापिटा केलेला असणे!

अपमान, अपमान आणि नुसता अपमान! एकावर एक अपमान सगळे!

हेलिक्सच्या बिझिनेसपासून तर ती योजने दूर होती मनाने त्या दोन दिवसांमध्ये! बाहेर पडल्यानंतर अर्थातच लोहियांच्या सतराशे साठ प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली होती. ती सिंगापूरला नसून मनालीला होती हे तिलाच सांगावे लागल्यामुळे तर ती खचलीच होती. त्यांना जे काही खोटे सांगायचे ते सांगीतले तरीही तिला माहीत होते की त्यांना सगळे समजलेले होते. अपमान!

पराकोटीचा अपमान झाला होता. लोहिया आणि कंपनीला हे सगळे समजले आहे आणि आपण आता सरळ खुल्या मैदानात आलेलो आहोत आणि असुरक्षित आहोत ही भावना इतकी दुखावणारी होती की मोना दिल्लीहून पुण्याला गेलीच नव्हती. सरळ जयपुरला आली होती. स्वतचा नंबर तिने मधुमती आणि शिल्पा या दोघींनाच दिलेला होता. पण कसे काय कुणास ठाऊक, त्या नंबरवर आता तिला लोहियांचेही फोन येऊ लागले होते. सरळ होते, शिल्पाने बावळटासारखा त्यांना नंबर दिलेला असणार! अर्थात, इतके सगळे झाल्यानंतर लोहियांना न सांगता कुठेतरी राहणे हे मुळीच शोभणारे नव्हते. त्यामुळे ती त्यांच्या प्रत्येक आपुलकीने केल्यासारखे दाखवलेल्या फोनवर 'मी ठीक आहे, मला जरा शांत बसूदेत' इतकेच नम्रपणे बोलत होती. त्यातच रावीचे मेसेजेस आल्याचे शिल्पाचे फोन येऊ लागले होते. म्हणजे जडेजांकडेही सगळे समजलेले होते तर! नुसता विध्वंस झाला होता सगळा!

रेजिना आणि आपण एकाच रूममद्ये होतो हेही लोहिया आणि कंपनीला कळलेले असणार या विचाराने तर ती खलासच झालेली होती. तोंड दाखवायलाच जागा राहिलेली नव्हती आता! पुण्याला जाऊन करायचे काय?

रेजिनाबरोबर आपण ती रात्र घालवली हे सुबोधला दिल्लीत आल्याआल्याच समजलेले होते. डिपार्टमेंटकडून! त्यामुळे बेइज्जत झालेली मोनालिसा जयपूर पॅलेसच्या त्या भल्यामोठ्या स्विटमध्ये एकटीच असूनही उशीत तोंड खूपसून बसत होती सतत!

पण असे किती दिवस बसणार? दोन दिवस झाल्यानंतर तर चक्क एक फोन जोशीचा आला! नशीब की त्याने तो फोन शिल्पाच्याच टेबलवरून केलेला होता. शिल्पाने त्याला नंबर दिलेला नाही हे समजल्यावर काहीसे शांत झालेल्या मोनालिसाने नंतर शिल्पाला प्रचंड झापले. लोहियासाहेबांना आणि इतरांना नंबर का दिला म्हणुन! शिल्पाने शपथेवर सांगीतले की तिने दिलेला नव्हता. मग हे काम कुणाचे असणार हे काही मोनाला समजत नव्हते.

त्यातच नवीनच एक समजले. मोनालिसावरची केस संपूर्णतः सौम्य करण्याचे काम अर्देशीरांनी केलेले होते. जखमेवर तिखट मीठ चोळले गेले. अर्देशीरांचे शासनदरबारात असलेले अफाट कॉन्टॅक्ट्स या बाबतीत कामाला आले होते.

काही झाले तरीही एक तरुण वयाची स्त्री होती ती! तिच्यादृष्टीने सर्व काही आता उद्ध्वस्त झालेले होते. स्वाभिमानाने तोंड दाखवणे आता अशक्य झालेले होते. कुणालाच!

सुबोध, जतीन आणि अर्देशीरांचे तोंड पाहायला लागणारच नव्हते. पण लोहियांसमोर आणि जडेजांसमोर मान वर करण्याचीही हिम्मत होणार नव्हती. रेजिना या चार दिवसांमध्ये दूर गेला होता. त्याचा नेमका काय गैरसमज झालेला होता हे मोनाला समजत नव्हते. खरे तर आत्ता, या क्षणी तिला त्याच्या आधाराची अत्यंत गरज होती. पण त्याचा एकही मेसेज नव्हता शिल्पाकडे! तो असा का वागतो आहे हे तिला समजत नव्हते. त्याच्या आठवणींनी व तो येत नसल्यामुळे आलेल्या संतापाने ती पुन्हा पुन्हा रडत होती. या स्विटचे पेमेंट तिने हेलिक्समधून करायला सांगीतले होते शिल्पाला!

मात्र आता खरच शांतपणे विचार करण्याची आणि स्वतःला कलेक्ट करण्याची गरज होती.

आज सकाळी मोनालिसा चक्क जीममध्ये जाऊन आली. त्यानंतर स्विमिंगही केले तिने! मग आवरून ब्रेकफास्ट घेतला. आणि मग 'व्यत्यय नको' अशी पाटी दारावर लटकवून आणि रिसेप्शनमध्ये तोच मेसेज ठेवून ती बसली स्विटमधल्या टेबलखुर्चीवर!

आज तिला पहिल्यांदाच एक सिगारेट ओढावीशी वाटली. रेजिनाच्या ओठांना येणार्‍या रॉथमन्सचा दर्प तिला आत्ता आठवला. सुरुवातीला नकोसा होणारा तो दर्प हळूहळू तिला आवडू लागलेला होता. त्यात एक पुरुषीपणा होता. तिने स्वतःसाठी काही सिगारेट्स मागवल्या. त्यातली पहिली पेटवून झुरका मारला तेव्हा डोळ्यात पाणी आले. तशीच विझवून टाकून दिली तिने! पण का कुणास ठाऊक, थोडे हलकेही वाटले. मग जवळपास वीस मिनिटांनी तिने पुन्हा एक सिगारेट पेटवली. यावेळेस अधिकच हलके वाटले.

आता ती मागे रेलून बसली आणि शांतपणे विचार करू लागली.

It was time to study the entire story once again and find out the new path.

मिस एम एम गुप्ता! नजर शुन्यात रोखून बसल्या होत्या.

काय काय झाले? कसे झाले?

हं! आपले ते पाचगणीचे लाईफ! कसलाही त्रास नव्हता आपल्याला! कोणतीही जबाबदारी नाही, काहीही नाही. फक्त महिन्यातून दोन वेळा डॅडना भेटायचो आपण! आणि त्यांच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा आपल्या आयुष्यातील अमूल्य ठेवा होता तेव्हा! आई आपल्याला आठवणेही शक्य नव्हते आणि तिची अनुपस्थिती जाणवायचीही नाही आयुष्यातील! जतीन आपल्याला चिडवून बेजार करायचा! सुबोध इथे नसायचाच! आपले आयुष्य म्हणजे फक्त शिक्षण, रावीसारख्या आणखीन दोन मैत्रिणी, डॅड, जतीन आणि श्रीमंती!

अर्देशीर आणि लोहिया आपले किती कौतुक करायचे! लाडके होतो आपण त्यांचे!

मग शिक्षण संपवून आपण पुण्यात आलो. हळूहळू आपल्याला श्रीमंतीत आराम करत बसण्याची सवय झाली. एकेक मैत्रिणीचे लग्न होत असताना आपल्याला कधीही असे वाटले नाही की आपल्याला लग्न करण्याची काहीही गरज आहे. आश्चर्य म्हणजे डॅडनाही कधी त्याची निकड वगैरे भासलीच नाही. करेल तेव्हा करेल असा त्यांचा दृष्टिकोन होता. रावीशी भांडण झाले आणि अबोला सुरू झाला. तिचे लग्न त्याच जडेजांच्या घरात झले आहे जे फारुख ऑटोचे डायरेक्टर आहेत हे आपल्या खिजगणतीतही नव्हते. तिचे नावही घ्यायला नको वाटायचे तेव्हा!

काय जीवन होते ते! उशीरा उठायचे, जीमला जायचे, तिथून घरी, मग नाश्ता, मग पार्लर, मग घरी येऊन आराम, जेवण, पुन्हा आराम, काहीही हवे ते करायचे, संध्याकाळी पूना क्लब किवा बोट क्लबमध्ये जाऊन बसायचे, बीअर, तकिला आणि थाटामाटातील जेवणे आणि झोप!

बास! काहीही नाही! अक्षराने कधी डॅड म्हणाले नाहीत की बेटा तू असा का वेळ वाया घालवत आहेस? हेलिक्सचे काम शिकून घे! अंहं! कधीच नाही! त्यांना कदाचित ते अभिप्रेतही नसावे.

आपल्याला कधीही कोणताही मुलगा आवडला नाही. आवडला नाही म्हणजे आवडावा असा कुणी भेटलाच नाही. आपल्याला हेलिक्समध्ये गिअर्स बनतात या व्यतिरिक्त कशाचीही माहिती नव्हती. जतीन, सुबोध, लोहिया अंकल आणि अर्देशीर सर हे चौघे बर्‍याचवेळा घरी येतात आणि डॅडबरोबर डिनर घेतात इतकेच आपल्याला माहीत होते. सायरा ही त्या डिनरमध्ये सर्व्हीस देणारी व घराच्याबरोबरच डॅडचीही काळजी घेणारी एक स्त्री आहे इतकेच आपल्याला माहीत होते.

आणि मग डॅडचा मृत्यू! कोसळलोच आपण! इतका अकस्मात, इतका अविश्वसनीय मृत्यू! काहीच कळेना! अर्देशीर सर आणि लोहिया अकल आपल्याला धीर देत होते. जतीनच्या खांद्यावर डोके ठेवून किती रडलो होतो आपण! सुबोधने केले सगळे डॅडचे! एक दिवस हेलिक्स बंद हेवली होती अर्देशीर सरांनी!

आणि मग ते भयानक रिकामपण! काही दिशाच नाही जीवनाला! करणार काय? जुन्या मैत्रिणी संसारात रमलेल्या, हेलिक्सबद्दल आपल्याला ओ की ठो कळत नाही आणि बंगल्यावर राहिले तर डॅडचे नसणे सतत जाणवत राहणे! किती प्रयत्न केले आपण मन रमवायचे! नाहीच रमले मन!

उदास! सगळे आयुष्यच उदास झालेले होते. काय वाटले कुणास ठाऊक त्या दिवशी! ज्या दिवशी लोहिया अंकलनी सांगीतले.

"बेटा, मुंबईला ये, एम डी ठरवण्यासाठी फॉर्मल मीटिंग आहे... तुला काही त्रास घ्यायची आवश्यकत नाही, आम्ही सगळे सुरळीत मार्गाला लावू.. "

आपल्याला असे का वाटले नक्की? की आपण ते पद स्वतःकडे घ्यावे?

काहीतरी स्मेल आला होता. ते सगळे ज्या प्रकारे चाललेले होते त्यात आपल्याला गृहीत धरले जात होते. आणि ते गृहीत धरले जाणे असह्य होत होते आपल्याला! गुप्तांची मुलगी आपले म्हणणे मान्य करणारच असा काहीसा दर्प होता त्या मीटिंगला! आणि मुख्य म्हणजे.. एक खूप काहीतरी घाई होती ते सगळे आवरण्यात! सगळेच घाई करत होते. त्यामुळे आपण मध्ये बोललो. आणि कुणाला काही बोलताच येईना त्यावर!

हं! हाच सगळ्यात मोठा टप्पा होता! इथेच आपण पराकोटीचे सावध व्हायला हवे होते. आपण एक वरिष्ठ पद फक्त मागायला हवे होते. लीडर व्हायला नको होते. कारण तसे झाल्यामुळे चौघेच्या चैघे आपल्या विरुद्ध पार्टीत गेले. कुणीच आपल्या बाजूचे नाही.

मग तो नालायक गोरे! आपला पी ए म्हणून वावरणे! त्यातच शेव्हिंग मशीन्सच्या खरेदीत आपल्याला आलेला संशय! मुख्य म्हणजे त्या प्रकरणावर संशय घेण्याइतके आपण स्वतःला पात्र समजणे व ती आपली जबाबदारी समजणे! मग मेहरांनी आपल्याला अनेक चांगले सल्ले देणे! भसीनकडून मागवलेला सगळा डेटा आपण घरी घेऊन जाणे! जतीन आणि सायराबाबत समजणे! शर्वरी आणि सुबोधबाबत समजणे! गोरे आधी अर्देशीरांचा पी ए होता हे समजणे! त्यातच पराग हा ड्रायव्हर कॉन्व्हेन्ट एज्युकेटेड असून त्याला लोहियांनी मुंबईहून बंगल्यावर पोस्ट केला आहे हे लक्षात येणे!

त्यानंतर आपण डोकेदुखीचे नाटक करून सायराला रात्री दवाखान्यात पाठवल्यानंतर तिच्या खोलीची झडती घेणे... त्यात आपल्याला मोनाबेटी१९८० हे युझरनेम सापडणे!

त्यातच इरफान अब्दुल्लाहने आपल्याला विचारणे! ते प्रख्यात चित्र तुमचे आहे वाटते?? त्या रात्री आपण ड्रिंक घेऊन आरश्यात पाहात असताना आपल्याला इरफान, अर्देशीर सर आणि लोहिया अंकलचा एकत्र फोटो दिसणे! त्या फोटोवर डू नॉट ट्राय हा पासवर्ड मिळणे! मग डॅडचे सगळे रेडिफ अकाऊंट ओपन करू शकल्यामुळे आपल्याला मागच्या अनेक गोष्टी समजणे व त्यातून एक गोष्ट निश्चीत होणे! की सिवाला नियुक्त केले याचा अर्थच डॅडचा या चौकडीवर काडिचाही विश्वास नव्हता, उलट त्यांना ते शत्रूच समजत होते.

वेस्टर्न कोलफिल्ड्सची ऑर्डर जाणे, त्याचे खापर फुटल्यामुळे मेहरा भडकणे, त्यानंतर एलेकॉन, सिम्प्लेक्स आणि रॅडिकॉनबरोबर आपण ठरवलेल्या गो स्लो पॉलिसीमुळे मोठे नुकसान होणे, लोहिया अंकल पुन्हा सक्रीय होणे व आपली डिसीजन पॉवर जाणे, त्यानंतर इरफानच्या प्रपोजलवर अर्देशीरांनी स्वतंत्ररीत्या विचार करावा ही आपली कल्पना त्या सर्वांना फार आवडणे आणि ऐन वेळेस आपण डॅनलाईनला पुढे करून अर्देशीरांचा पत्ताच कट करणे, त्यांचे शेअर्सही आपल्याच नावावर जमा होणे, त्यानंतर सिमला ट्रीप, सुबोध तिकडेच यायला निघाल्याचे समजल्यावर आपण घाईघाईत पुण्याला निघणे, तेवढ्यात डॅनलाईन हातातून गेले असल्याचे व अर्देशीर सरांना मिळाले असल्याचे आपल्याला समजणे, जतीन आणि सुबोधची हकालपट्टी, लोहियांना आपण सिमल्याला गेलो असल्याचे समजणे, हे सगळे होत असताना रेजिना आपल्या आयुष्यात येणे, सायरा लोहियांपासून प्रेग्नंट असल्याचे समजणे, डॅनलाईन आपण आपल्या हुषारीवर मिळवणे, स्पेनच्या ट्रीपमध्ये रेजिनाची आणि आपली अधिक जवळीक होणे, नाना सावंतला आपण आपल्याच बेधडक प्रवृत्तीने मोडून काढणे, सगळे ही प्रगती अवाक होऊन बघत असतानाच शर्वरीचा राजीनामा, सिवाची भेट, त्याला आपण कॉल्स ट्रॅक करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देणे, डॅनलाईनच्या पहिल्या वीस मशीन्सच्या लॉटला ऑर्डर्स मिळणे, ही अद्भुत कामगीरी आपण पार पाडत असतानाच नाशिकच्या ताजमध्ये आपल्याला समजणे की सायरा गेली, त्यानंतर आपण मनालीला जाणे, रणजीतशी भेट होणे, मागचा संपूर्ण इतिहास समजणे, इन्स्पेक्टर जगमोहनही भ्रष्टच आहे हे कळणे, सूड घेण्याची भावना तीव्र होणे, बझट यामहाभयंकर गोळ्या आपण मिळवणे आणि नंतर वाढदिवस साजरा करत असतानाच.. ती भयंकर चौकशी... आणि त्यानंतर रेजिनाचा एक कॉलही नाही... अर्देशीर सरांनी आपल्याला वाचवणे.. वगैरे वगैरे!

आता नीट एकेका गोष्टीवर प्रामाणिकपणे स्वतःलाच उत्तरे देऊयात!

आपण हेलिक्सच्या सर्वोच्च पदावर असणे यात काही गैर आहे?

होय, गिअर्सचा शुन्य अनुभव असताना आपण ते धाडस केले! मात्र, तो अनुभव घेतला तर आपण एकमेव अशी व्यक्ती आहोत की जी सर्वार्थाने हेलिक्सच्या सर्वोच्चपदी असायला हवी. म्हणजेच, आत्ता आपण त्या पदावर असण्यात काहीही गैर नाही. बिझिनेस आणि ऑपरेशन्स मात्र तातडीने शिकायला हवीत.

शेव्हिंग मशीन्सना महिंद्राचा बिझिनेस मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील राहणे यात काही गैर आहे? शक्यच नाही.

डॅडच्या इमेल्स तपासल्यानंतर आणि सिवा ही व्यक्ती इन्ट्रोड्यूस झाल्यानंतर लोहिया चौकडीबाबत आपल्या मनात आकस निर्माण होणे व त्यांना नेस्तनाबूत करण्याची इच्छा आपल्या मनात मूळ धरणे यात काही गैर आहे?

होय! संतप्रवृत्तीचे व्हायचे असेल तरच गैर आहे. माणूस म्हणून जगायचे असेल आणि डॅडची हेलिक्स पुढे न्यायची असेल तर हे असले नालायक शत्रू नष्ट करणे यात काहीही गैर नाही.

सायरा, पराग आणि गोरेच्या बदल्या! काहीही गैर नाही. आपण सुरक्षित राहणे ही आपली केव्हाही टॉप प्रायॉरिटी असणारच!

सिमल्याला झालेली उस्ताद आणि जगमोहनची भेट! त्यात काय गैर आहे? आपल्याला ते हॉटेल सहज दिसले म्हणून तिथे गेलो आपण! उस्तादच्या आईमुळे समजले की आपल्या आईचा आणि तिच्या नवर्‍याचा खून झाला होता. जगमोहनवर विश्वास ठेवला आपण!

डॅनलाईन अक्कलहुषारीवर मिळवणे यात काही गैर आहे?

छे! उलट तो तर मानाचा तुरा आहे आपल्या मुकुटातला! अर्देशीर सर पूर्ण नामोहरम झाले त्या रात्री आपल्यासमोर!

सिवाला भेटण्यात काही गैर आहे?

अजिबात नाही. आपले डॅड ज्या अर्थी त्याला नियुक्त करत होते त्या अर्थीच ते आपल्याहीसाठी बेनिफिशिअल आहेच! आपण पहिल्यांदा आपली सुरक्षा पाहिलीच पाहिजे!

शामा आणि सायरा वर्षानुवर्षे भ्रष्ट वागत आहेत हे माहीत असूनही अक्कलहुषारीने सायराला आपल्याकडे वळवणे यात काही गैर आहे?

मुळीच नाही. उलट त्यामुळे आपण लोहियांना चांगले अंधारात ठेवत होतो. हे लोहिया डॅडच्या जीवावर उठले होते. जीवावर कसले उठले होते? मारलेच त्यांनी डॅडना! आता अगदी आपली आपुलकीने चौकशी करतायत! त्यांनाही समजले असेल की आपल्याला समजले आहे की त्यांनी डॅडना मारले. हरामखोर माणसे आहेत सगळी! मात्र याचाच दुसरा अर्थ असा की आपण आता पूर्णतः असुरक्षित आहोत. ते आपलाही बळी घ्यायला टपलेले असणार!

रेजिनाल्डोशी आपली असलेली रिलेशन्स!

काय गैर आहे यात? का नसावीत? लग्न हाच शिक्का का असायला हवा प्रेमाला? प्रेम? प्रेम आहे का पण खरच? असतं तर तो आपल्याला सोडून असा तिकडे राहिलाच नसता. एकही मेसेज नाही आहे त्याचा!

आपण त्याच्याशी असलेले आपले बॉस सबऑर्डिनेट हे नाते स्वत:च नष्ट केले. जबाबदारी आपलीच आहे. काय चुकले आपले त्यात? हेलिक्सच्या एम डी ला भावना नसाव्यात? आणि तो काय वाईट आहे? चांगला आहे स्वभवाने, मिश्कील आहे, सतत हासवतो आइ इतके सगळे करून परफॉर्मन्स बेस्ट! त्यात पुन्हा कामाच्या वेळेला अजिबात जवळीक करत नाही. त्याने मनात आणले असते तर आपली केव्हाच बदनामी केली असती त्याने! केली नाही. याचाच अर्थ तो सभ्य आहे. पुन्हा, हेलिक्सच्या बिझिनेसमध्ये, केवळ गिअर्सचा अनुभव आहे म्हणून कधीही नाक खुपसत नाही. हे केवढे मोठे श्रेय आहे! नाहीतर एखादा हेलिक्समध्येही घुसला असता! आणि डोक्यावर बसू शकला असता. पण रेजिना ढुंकून बघत नाही गिअर्समध्ये! वयाची दहा वर्षे गिअर्स विकूनसुद्धा!

आपला वाढदिवस आपल्याही लक्षात नव्हता! पण त्याने लक्षात ठेवला!

मिस एम एम गुप्ता... तुमची आजवर एकच चूक झालेली आहे.. ती म्हणजे काँपीटिटर्सबरोबर जी 'गो स्लो' पॉलिसी ठरवली होतीत ती!

बाकी तुमचे काहीही चुकलेले नाही. बझट बाळगणे हा गुन्हा असेल! पण आपण बझटचा वापर केलेला नाह. तो वापर करणारे लोहिया, अर्देशीर, जतीन आणि मुख्य म्हणजे सुबोध हे आपल्यापेक्षा हीन दर्जाचे आहेत. आपण ती नुसतीच बाळगली होती.

आपण जर फारसे चुकलोच नाही आहोत तर आपण का घाबरतोय? आपण का असे समजतोय की आपली बदनामी झाली रेजिनाबरोबर राहिल्याचे लोहियांना समजल्यामुले! जो माणूस गर्भवती सायराला मारून टाकतो, तेही त्याचाच स्वतःचा अंश तिच्यात वाढत असताना, त्याच्या समोर आपली बदनामी कशी काय होईल? आणि मुळात रेजिनाच्या बाबतीत आपण कुणालाही अ‍ॅन्सरेबलच कुठे आहोत? अजिबातच नाही आहोत!

हे सगळे करताना आपण पुरुषांच्या जीवावर किती जगलो? छे! उलट आपल्याच जीवावर कित्येक पुरुषांचे संसार होत आहेत आज! कित्येक पुरुष देशोधडीला लागले आहेत. अर्देशीर, जतीन, सुबोध, नाना सावंत!

चीअर अप डार्लिंग! चीअर अप!

आमुलाग्र बदल झाला होता आत्ता तिच्यात! तो तिच्या स्वरांमध्ये रिसेप्शनिस्टलाही जाणवला! तिने कार्ल्सबर्ग ही तिची आवडती बीअर मागवली होती.

आणि अर्धी बाटली संपलेली असतानाच मेसेज मिळाला!

One Mr Ricoh wants to see you.

वॉव्ह! धडधडत्या छातीवर हात ठेवून मोना स्विटच्या दाराकडे वळली. दोनच मिनिटात आला तो लिफ्टने वर!

आत आला आणि मोनाने सरळ मिठीच मारली त्याला!

She had got bach her love....

मात्र आता एक झाले! अत्यंत आवडता, आपलासा असा आधार प्राप्त झाल्यावर तिच्यातील परिपक्व स्त्री सुट्टीवर गेली. आणि मोना हमसून हमसून रडायला लागली. रेजिना तिला थोपटत होता.

रेजिना - मोनालिसा... गैरसमज करून घेऊ नकोस... पण... योग्य वाटत असल्यास... मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे...

आयुष्यात पहिल्यांदा हे असे प्रपोजल! तेही अशा मानसिक अवस्थेत असताना! कसे रिअ‍ॅक्ट व्हावे तेच समजत नव्हते मोनाला! दोनच क्षण तिने रेजिनाच्या डोळ्यात बघण्यात घालवले. आणि तिसर्‍या क्षणी तिचे ओठ रेजिनाच्या ओठांवर टेकलेले होते. नेहमी रेजिना बेभान व्हायचा, पण आज बेभान झाली होती मोना!

मात्र आवेग कमी झाल्यावर ती म्हणाली...

"आत्ता नाही... ती वेळ येणार आहे... मी आणणारच आहे... पण.. तोपर्यंत आपण आपली मैत्री मात्र ठेवायचीच.. कुणालाही घाबरण्याचे कारण नाही.. मी आता खूप सावरलेले आहे.. आणि मुख्य म्हणजे... गिअर्समधे दादा असलेल्याशी लग्न करून मोनालिसाने हेलिक्स सावरली हा ठपका मला अजिबात नको आहे माझ्यावर... आशा आहे की तुला हे समजेल..."

अर्थातच समजले होते रेजिनाला! फक्त त्याने मान डोलावण्याऐवजी तिच्या ओठांवर आपले दात रोवले...

.... कॉर्पोरेट वॉरमध्ये भिजलेले एक प्रेमी युगूल जयपूर पॅलेसमध्ये प्रणयात गुंगलेले होते...

===============================================

फारुख ऑटोच्या जडेजांच्या चेहर्‍यावर एक मिश्कील हास्याची लकेर उमटली होती. मोनालिसाने आज त्यांना मीटिंगबाबत विचारले होते. प्रश्न हा होता की जायचे कुणी कुणाकडे? मोनाला फारुख ऑटोमध्ये येणे हा एक प्रकारचा अपमान वाटत होता. आणि जडेजांना हेलिक्समध्ये जाणे!

तरीही, जडेजा म्हणाले... "मी येतो तिकडे"

त्याचे कारण तसेच होते. महिंद्राची नवी गाडी अचानक फेज आऊट करण्यात येणार होती. आणि या कालावधीत इतर सर्व ऑटो मॅन्यूफॅक्चरर्स अधिक अ‍ॅक्युरेट असलेल्या शेव्हन गिअर्सकडे वळलेले होते.

परिणामतः, हेलिक्सची शेव्हिंग मशीन्स बंद पडलेली होती. लोहियांनी विचित्र अ‍ॅग्रीमेन्ट केलेले होते फारुखशी! ही मशीन्स फक्त फारुखसाठीच चालतील असे! ही शुद्ध फसवणूक होती हेलिक्सची! आणि गेले सात दिवस मशीन्स बंद आहेत हे स्वतःच्या केबीनमध्ये आल्याआल्याच मोनालिसाला समजले होते. काय नालायकपणा! इतकी महत्वाची बातमी फोन करून देत नाहीत मला! फोन केला तर काय विचारतात? मोनाबेटी?? कशी आहेस? नीट राहा... लवकर ये... कामात मन रमव...

वा वा! काय पण आपुलकी आहे.

एकेकाला बघतेच आता!

मोनालिसा सरसावलेली होती.

लोहियांचा फोनही आला होता. जडेजांशी काय बोलणार आहेस म्हणून! अर्थातच, नम्रपणेच विचारत होते ते! पण तरीही भोचकपणा करतच होते. कारण त्यात त्यांचे पितळ उघडे पडणार होते म्हणून!

जडेजा आले. नेहमीच्याच त्यांच्या रुबाबात येऊन बसले.

पाठोपाठ, बोलावणे आल्यामुळे जोशीही येऊन बसला.

मोना - येस मिस्टर जडेजा... हाऊ आर यू??

जडेजा - व्हेरी वेल..

मोना - हं! .. तर आमची मशीन्स आता बंद आहेत...

जडेजा - होय... दुर्दैवाने नवीन मशीन्सचे जॉब्ज लागतात हल्ली...

मोना - हं... मग आता या मशीन्सचे काय करणार आहात तुम्ही???

जडेजा - आम्ही काय करणार?? रिक्वायरमेन्ट आली तर घेऊ जॉब्ज..

मोना - नाही पण नाही आली तर काय करणार??

जडेजा - आता आम्ही काय करणार त्या मशीन्सचे? मशीन्स तुमची...

मोना - पण तुमच्यासाठी डेडिकेटेड आहेत...

जडेजा - आहेत ना... मी कुठे नाही म्हणतोय.. पण ऑर्डर्सच नाहीत तर काय करणार...

मोना - आम्हाला मिनिमम पेमेंट करत राहा... इन्टरेस्ट कॉस्ट इतपत...

जडेजा - कोण आम्ही??

मोना - हं...

जडेजा - का??

मोना - का म्हणजे?? अ‍ॅग्रीमेन्टप्रमाणे मशीन्स तुम्हाला डेडिकेट केलेली आहेत.. त्याची कॉस्ट आम्ही कशी बेअर करायची??

जडेजा - एक मिनिट... आपलं डिस्कशन जरा दुसरीकडेच चाललेले आहे.. मिस गुप्ता... अ‍ॅग्रीमेन्टमध्ये असा काहीही क्लॉज नाही की ऑर्डर्स फेज आउट झाल्या तर मशीन्सची फायनान्स कॉस्ट आम्ही बेअर करायची....

मोना - जोशी? असा क्लॉज नाही आहे???

जोशी - अं.. नाहीये मॅडम...

मोना - ठीक आहे... मिस्टर जडेजा... असा क्लॉज आता अ‍ॅड करायचा आहे... काय म्हणता तुम्ही??

जडेजा - आता कसा काय अ‍ॅड करायचा?.. आता तुमची मशीन्स बंद झाली म्हणून तुम्ही हा क्लॉज अ‍ॅड करायचा म्हणताय... आम्हाला प्रत्येक जॉब दोन दोन दिवस उशीरा मिळायचा, तीन वेळा अडीच टक्याच्यावर रिजेक्शन गेले होते, हे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही फेस करायचोच ना??

मोना - एक मिनिट... लेट्स नॉट गेट इनटू दॅट.. असा क्लॉज अ‍ॅड करायला आणि पार्टली तरी इन्टरेस्ट कॉस्ट बेअर करायला फारुख ऑटो तयार आहे का??

जडेजा - धिस इज अनहर्ड ऑफ... काहीतरी काय??

मोना - ओके... मग आम्हाला दोन महिन्यात जागा खाली करून द्या फारुख ऑटोची...

आपल्याला सत्काराला स्टेजवर बोलवावे आणि स्टेजवर गेल्यावर कुणीतरी सत्कार करायच्या ऐवजी खण्णकन कानाखाली वाजवावी तसा चेहरा झाला जडेजांचा...

मोनाने पुर्वीची अ‍ॅग्रीमेन्ट्स नीट वाचलेली होती... फारुख ऑटो हे भूत उभे करताना अर्देशीर आणि लोहियांनी डॅडना पटवून हेलिक्सच्या नावावर असलेला एक प्लॉट लीजवर त्यांना दिलेला होता. ते अ‍ॅग्रीमेन्ट पाच वर्षांचे होते आणि आता सात वर्षे झालेली होती. फारुख जरी हेलिक्सला नियमीत भाडे देत असले तरीही अ‍ॅग्रीमेन्ट रिनिवच करायचे राहून गेलेले होते. आणि स्पॅन संपून दोन वर्षे उलटून गेलेली होती.

जडेजा - म्हणजे????

मोना - आम्हाला जागा परत हवी आहे...

जडेजा - का??

जडेजांना कल्पनाच नव्हती की ही मुलगी अशी ओरडू शकत असेल! आपल्या सुनेची मैत्रीण आणि मोहन गुप्तांची गिअर्समध्ये 'ढ' असलेली मुलगी इतक्याच ओळखी होत्या त्यांच्या तिच्याशी! त्यामुळे कायम रुबाबातच वावरायचे. अ‍ॅन्यूअल डे लाही ते व्ही आय पी विभागात होते, कस्टमर्स विभागात नाही.

जागा 'का' परत हवी आहे हा अत्यंत चुकीचा प्रश्न त्यांनी विचारला होता... चुकीच्या वेळी... आणि चुकीच्या माणसाला..

मोना घशाच्या शिरा ताणून ओरडली....

मोना - मिस्टर जडेजा.. आय वॉन्ट दॅट लॅन्ड बॅक...आय डोन्ट हॅव टू गिव्ह एनी एक्स्प्लनेशन टू एनीवन... इज दॅट अन्डरस्टूड???

जोशी तर हादरून थंडच झाला होता. तिकडे छोट्या केबीनमध्ये असलेली शिल्पाही दचकून इकडेच बघत होती.

आणि जडेजा???

सगळा रुबाब क्षणार्धात उतरला होता. जागा परत दिल्यावर फारुख कसे चालणार? त्याचदिवशी बंद करावे लागेल! म्हणजे संपलोच की आपण...

अत्यंत समजावणीच्या सौम्य आवाजात आता ते बापाची वगैरे भूमिका स्वतःकडे घेत म्हणाले...

जडेजा - बेटा... लिसन टू मी...

मोना - यू कान्ट कॉल मी लाईक दॅट...

आधीच्यापेक्षा तिचा आवाज आत्ता मोठा होता. आता जडेजांना राग आलेला होता. पण दगडाखाली हात सापडलेला होता.

जडेजा - आम्ही नियमीत रेन्ट पे करतोय...

मोना - ते उपकार नाही आहेत... यू आर युझिंग द लॅन्ड...

जडेजा - पण अशा का रागावताय?? आपण अ‍ॅग्रीमेन्ट रिनिव करू शकतो...

मोना - हेल विथ द अ‍ॅग्रीमेन्ट... आय वॉन्ट द लॅन्ड बॅक...

जडेजा - तुम्ही लोहियांशी बोलला आहात का???

मोना - तुम्ही कुणाशी बोलताय हे तुम्हाला समजतंय का?? लोहिया रिपोर्ट्स टू मी...

जडेजा - पण का ही स्टेप घेताय??? आमचा बिझिनेस बंद होईल

मोना - अरे? आमची मशीन्स बंद होणार आहेत हे माहीत असून तुम्ही अ‍ॅग्रीमेन्ट साईन करून स्वतःला मशिन्स डेडिकेट करून घेताय.. आणि ती बंद पडल्यावर हात झटकताय...

जडेजा - पण ही तुलनाच चुकीची आहे..

मोना - मी बरोबर आहे तेच बोलण्याला बांधील नाहीच आहे पण...

जडेजा - म्हणजे काय? ... आम्ही शेव्हिंग मशीन्सचे इन्टरेस्ट बेअर करू हवे तर...

मोना - ती वेळ मगाशीच गेली...

जडेजा - हे असे... असे डिसीजन्स घ्यायचे नसतात बिझिनेसमध्ये... तुमचंही नुकसान आहे लॅन्ड पडून राहिली तर....

मोना - मला नुकसानच करायचंय हेलिक्सचं... आता काय??

जडेजा - मी लोहियांशी बोलतो...

मोना - कुणाशीही बोला.. तीन दिवसात कागद व्हायला पाहिजेत.. दोन महिन्यात स्थलांतर...

जडेजा - आमच्या मार्केटमध्ये कमिटमेन्ट्स आहेत....

मोना - त्या देण्यापुर्वी जागेचे अ‍ॅग्रीमेन्ट नको का करायला???

जडेजा - आय थिंक यू आर मिसगाईडेड.. फारुखने हजार वेळा हात दिलाय हेलिक्सला मदतीचा... तुमची मुळातच बंद असलेली मशीन्स आमच्यामुळेच चालू झाली...

मोना - त्यासाठी धन्यवाद... आम्ही दोन वर्षे जागा तुमच्याकडेच ठेवली... आता ती परत घेतो आहोत...

जडेजा - यू... यू आर..

मोना - आय अ‍ॅम द हेड ऑफ हेलिक्स...

विदीर्ण चेहर्‍याने जडेजा बाहेर उठून जात होते तेव्हा मागे जोशीला उद्देशून मोनाने उद्गारलेले वाक्य त्यांना भयंकर झोंबले..

"जोशी.. असल्या ब्लफर्सशी अ‍ॅग्रीमेन्ट करताना तुम्ही मशीन्स डेडिकेट कशी काय करता?? ही बाब तुमचा जॉब जाण्याइतपत मोठी आहे हे तुम्हाला समजत नाही का??"

ब्लफर्स!

हे विशेषण ऐकून जडेजांनी कृद्ध डोळ्यांनी मागे वळून पाहिले.

जडेजा - तुझे वडील असते तर त्यांनी तुला सांगीतले असते... फारुख ऑटो काय चीज आहे ते...

मोना - मला सांगीतलेले होते त्यांनी... दुसर्‍याच्या जीवावर बिझिनेस करणार्‍या कर्तृत्वशुन्य लोकांची कंपनी आहे ती असे...

जॉब राहतोय की जातोय या चिंतेत हादरलेला जोशी जडेजांच्या पाठोपाठ बाहेर पडला तेव्हा शिल्पाला मोनालिसाचा कॉल गेला होता...

"कॉल साहनी..."

लीगलच्या साहनीला दहा मिनिटांनंतर डोक्यात प्रकाश पडला. फारुखच्या जमीनीचे पेपर्स बनवायचे आहेत. संपली फारुख! निदान वर्षभर तरी संपलीच! साहनी स्वतःच हादरला होता तर जडेजांचे काय झाले असेल!

मोनाने तीन पक्षी जखमी केले होते. जडेजांचा उदरनिर्वाह, लोहियांना फारुखमधून मिळनारा प्रॉफितचा काही भाग आणि अर्देशीर सरांना मिळणारा उर्वरीत भाग!

.......
.....
अचंबीत झाला होता प्रत्येक जण!

मॅडम?? इथे??

बिंद्राला बरोबर घेऊन मोनालिसा थेट शॉपमध्ये घुसली होती. रटाळ कामाने कंटाळलेल्या वर्कर्सच्या हालचालींमध्ये ते पाहूनच भीतीयुक्त वेगाची सळसळ निर्माण झाली.

या कशा काय इथे आज?

मोना आधी शॉपमध्ये गेली होती. पण शेव्हिंग मशीन्सवरचे पहिले आऊटपुट वगैरे साजरे करताना नारळ फोडण्यासाठी!

आजचा मूडच वेगळा होता.

थॉमस, जो नवीन युनियनचा लीडर होता, तो ताबडतोब मोनाला जॉईन झाला. त्या पाठोपाठ त्य शिफ्टचा हेड मुळे धावत आला. प्रत्येक वर्करचे डोके आता मशीनमध्ये होते.

गप्पाटप्पा बंद, हास्यविनोद बंद!

बिंद्रा एकेक मशीनची माहिती देत होता मोनाला!

आश्चर्य म्हणजे मोना प्रत्येक वर्करला नाव विचारत होती. अजिबात स्मितहास्य मात्र नव्हते तिच्या चेहर्‍यावर! करारी भाव होते! एक प्रकारचे शक्तीप्रदर्शनच होते हे!

पीटरची मात्र तिने हासून चौकशी केली. त्याच्या मुलीने तिला सायकल शिकवली होती लहानपणी! पीटरला कोण अभिमान वाटला स्वतःचा! सगळे जळफळून पीटरकडे बघत होते. अगदी थॉमससुद्धा! आणि मुळेला तर समजलेच नव्हते की मॅडम पीटरशी का बोलल्या! मोना चार मशीन्स ओलांडून पुढे गेली तरी पीटरच्या चेहर्‍यावरचे हास्य मावळत नव्हते.

वाघ नावाचा वर्कर हॉबिंग मशीन अत्यंत लालित्यपूर्ण पद्धतीने चालवत होता. त्याच्या स्किलचे कौतुक करून मोना पुढे सरकली. सगळी मशीन्स कसली कसली आहेत हे तिला आज समजत होते.

पाण्याचा फक्त एकच कूलर होता! मोनाने ताबडतोब मुळेला आणखीन एका कूलरचे प्रपोजल सबमिट करायला सांगीतले. थॉमस खूप खुष झाला. इतक्या उकाड्यात वर्कर्स कसे काय काम करतात हेच मोनाला समजत नव्हते. शेव्हिंग मशीन्स आणि ग्राइंडिंग मशीन्स मात्र एसीमध्ये होती. त्यामुळे तिथले वर्कर्स आनंदात असायचे!

कूलरबरोबरच मोनाने मोठ्या चार पंख्यांचेही प्रपोजल द्यायला सांगीतले. तोपर्यंत सिंघ धावत आला आणि मोनाला जोईन झाला. तो संपूर्ण हेलिक्सच्या प्रॉडक्शनचा हेड होता. तो मुंबईला गेलेला असल्याने मोनाने बिंद्राला बोलावले होते. पण तेवढ्यात सिंघ परत आला आणि ताबडतोब मोनाला जॉईन झाला.

चहा किती वेळा सर्व्ह होतो विचारले मोनाने! तर समजले की दोन वेळा! तिथल्यातिथे मोनाने ते दुप्पट करून टाकले. आज ती एवढी खुषीत वगैरे मुळीच नव्हती. पण आदरयुक्त प्रेम प्राप्त व्हावे यासाठी ती हे सगळे करत होती.

चक्क एक बाई होती एका मशीनवर! असेल पन्नाशीची! मोना तिच्याकडे मुद्दाम गेली. मुळेकडून समजले की एक वर्कर गेला त्याची ही पत्नी आहे. भसीनसाहेबांनी उदारपणे या बाईचे अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅप्रूव्ह केले आणि तिला कामावर ठेवले. मोनाला भसीनचा अभिमान वाटला. त्या बाईची बरीच चौकशी केली मोनाने! केव्हाही लागले तर शिल्पाकडे मदत मागा असे सांगून ठेवले. त्या बाईला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.

नंतर मोनाने आणखीन काही निराधार महिलांना कामावर घेता येत असेल तर घ्या असेही सिंगला सांगीतले.

तेथून मोना जशी मेसकडे वळली तसा सिंग शॉपमध्ये परत गेला आणि मागून भसीन धावत आला आणि तो मोनाला जॉईन झाला. आता बिंद्रानेही जायला हरकत नव्हती पण आदर म्हणून बिंद्रा मोनाच्या बरोबरच चालत होता.

मेस फारशी आवडली नाही मोनाला! तिने अनेक सूचना केल्या. तसेच, त्या बाईला कामावर ठेवल्याबद्दल भसीनचे अभिनंदनही केले. मेसमध्ये आमुलाग्र बदल करायला हेवत व त्याची लिस्ट घेऊन माझ्याकडे य असे भसीनला सांगून ती वर्कर्स कॅन्टीनकडे वळली.

संपूर्ण हेलिक्स आज अभिमानाने आपल्या उदार अंतरकरणाच्या लीडरकडे पाहात होती. कॅन्टीनबाबतही अनेक सुचना केल्या तिने भसीनला!

ती जाईल त्या रस्त्यातले लोक आदराने बाजूला जाऊन थांबत होते. आपण इतके महत्वाचे आहोत आणि आपल्याबद्दल इतका आदर आहे हे मोनाला नव्यानेच समजत होते आज!

आता बिंद्राचे साम्राज्य असलेला भाग आला! डिझाईन अ‍ॅन्ड टुलिंग डिपार्टमेन्ट! भसीन आता जागेवर गेला होता. बिंद्रा सगळी माहिती इतकी छान सांगत होता की मोनाला तो त्या जागी परफेक्ट माणूस आहे हे लक्षात आले.

सगळीकडेच ती एर्गोनॉमिकली सुटसुटीत होईल असे बदल सुचवत होती. ते सगळ्यांना पसंतही पडल्याचे जाणवत होते.

पर्चेस अ‍ॅन्ड लॉजिस्टिक्स! मेहरांच्या केबीनमध्ये अचानक मोना आली तसे ते उठून उभेच राहिले. त्यांनी डिपार्टमेंटच्या प्रत्येकाचा परिचय करून दिला. स्पेशल स्किल्स सांगीतली. सगळ्यांना मॅडमना भेटल्याचा अभिमान वाटत होता. प्रत्येकाच्या बायकोला आज संध्याकाळी समजणार होते. आपल्या नवर्‍याशी चक्क मॅडम बोलल्या!

मोनाने मनात ठरवले होते. आठवड्यातून दोन ठराविक दिवशी राउंडला यायचेच!

तिथून सेल्सला गेली वरात! आता मेहराही जॉईन झालेले होते. त्यांच्या पातळीवरील अधिकार्‍यांमध्ये ते सगळ्यात वरिष्ठ होते त्यामुळे!

हादरलेला जोशी ती वरात पाहून अधिकच हादरला! धावत बाहेर आला. तिथून आत घेऊन गेला मोनाला! तेथेही सगळ्यांशी परिचय झाला. कोणत्याही कंपनीतील एम डी असे सगळ्यांशी वगैरे बोलत नाही कधीही! मोनाने ही कृती करण्यामागचा उद्देश एकमेव होता. आपले अस्तित्व सगळ्यांच्या मनावर ठसवणे आणि त्यांना याची जाणीव देणे की एम डी लाही गिअर्समधले नॉलेज आहेच!

एच आर मध्ये ती गेलीच नाही. कारण एच आर एकदम सुपर्ब होते हे तिला माहीत होते आणि भसीनशी बोलणेही झालेलेच होते. मात्र रिसेप्शनमधला डॅडचा फोटो पाहून तिला क्षणभर फार वाईट वाटले. तो ग्रे कलरचा सूट त्यांनी घेतला होता तेव्हा मोना त्यांना म्हणाली होती..

"डॅड.. यू आर लुकिंग लाईक अ हिरो....."

तिथून ती पुन्हा आपल्या केबीनमध्ये आली. शेजारचे केबीन लोहियांसाठी होते. त्यापलीकडचे अर्देशीरांसाठी! दोन्ही रिकामीच असायची. लोहिया कधी आले तर तिथे बसायचे!

आजचा दिवस तर पार पाडलेलाच होता.

विचारमग्न चेहर्‍याने मोना घरी परत आली. अजून लोहियांचा फोन कसा नाही आला हे तिला कळत नव्हते.

येईल तेव्हा काय बोलायचे हे तिने ठरवून ठेवलेले होते.

आरशासमोर बसून मोना मागे उभे राहिलेल्या मधुमतीकडून हेड मसाज घेत असताना.... मोना विचार करत होती... आपण लोहिया अ‍ॅन्ड कंपनीला हेड ऑन घेतलेले आहे... धिस इज डॅडलाईक...

त्याच क्षणी मोनाच्या गाऊनच्या स्ट्रॅप्स खाली करत...

... उत्स्फुर्तपणे मधुमती उद्गारली...

"मॅडम... हल्ली तुम्ही खूप छान दिसता... आधीपेक्षाही...."

बरेच दिवसांपासून दाबून टाकलेला तो विचार आज प्रकर्षाने उफाळून आला मोनाच्या मनात....

'मिस एम एम गुप्ता... दोन महिने झाले.. पिरियड्स आलेले नाहीत ...'

गुलमोहर: 

सुपर्ब !! आपण क्रूपया स्क्रिनप्ले रायटर म्हणून प्रयत्न करावा ही नम्र विनंती कारण चांगल्या स्क्रिनप्ले रायटरची वानवा आहे. शुभेछा !

बापरे, काय डेंजर बाई आहे हि, काय कोललाय जडेजाला, नाद खुळा. :), जाम टरकलि जोशि चि, आता लोहिया, आर्देशिर काय करतिल?

मोना राऊंड ला गेलि हे खरच खुप चांगले आहे, मि तर म्हणतो अस प्रत्येक employer ने केले पाहिजे, कारण वर्कर्स काम करतच असतात, गरज अस्ते ति माणुसकिचि, आपुलकिचि. आता मॅडम येऊन त्या बाईला भेटुन गेल्या, त्या बाईला किति बरे वाटल असेल.

हा भाग मस्तच, आणि आज मला ३ भाग वाचायला मिळालेत, काय आनंद आहे सांगु.

जियो बेफिकिर, खुप छान लिहिलत, पण आजचि पंच लाईन (लास्ट लाईन) धक्का न देणारि, ऊस्तुकता न ताणनारि होति. (हे आपल माझ मत). तुमचि मानसिकता मि समजु शकतो.

मी दर वेळी प्रतिसाद देत नाहीये, पण प्रत्येक भाग अत्यंत उत्कंठतेने वाचत असते. केवळ अप्रतिम ....

सुनिल जोग न प्रचंड अनुमोदन !!>>> माझेही.... Happy

जबरदस्त!!! मोनाच्या हुशारीची चमक पदोपदी दिसतेय... जडेजांना मस्त धडा शिकवला पोरीने... प्राऊड ऑफ यु, गर्ल... Happy

मोना एका कंपनीची एक 'चांगली' एम. डी. आहे, हे तिच्या कृतींवरुन दिसून येते. परेशला अनुमोदन! ती अशी राऊंडला गेली त्यामुळे तिच्याविषयीचा लोकांचा आदर नक्कीच वाढला असेल. चांगली स्टेप होती ती. मुळातच मोना ही एक माणुसकी असणारी व्यक्ती असल्याने तिला अशा गोष्टी सुचल्या, यात नवल नाही... त्यात मुद्दाम ठरवून आणि आपण किती चांगले आहोत याचा आव आणण्यासाठी तिने काही केले असेल, असे वाटत नाही.

रेजिनाने मोनाला लग्नाची मागणी अगदी योग्य वेळी घातली, हे छानच झाले... ती आता त्याचं बाळ कॅरी करणार आहे ना! मस्त मस्त गोड गोड न्युज Happy एवढ्या लहान वयात फार सोसले तिने... आता तिच्या आयुष्यात भरपूर सुख येवो....पण राहून राहून हाच विचार मनात येतो, तो तिला फसवत तर नाहीये ना? तसे नसू देत, तसे नसू देत, तसे नसू देत!!!

बेफिकीर,
खुप छान चलु आहे कथा. जबरदस्त वेग आणि खुपच उतार चढाव आहेत मोना च्या आयुश्यात. डावपेच रन्गत आहेत. पण सगळ एकाच side ने वाचयला मिळतय. oopsition camp मधे मोनाच्या डाव पेचांवर काय प्रतिक्रिया येत आहेत. किंवा ती अडचणित येते तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, हे समजत नाहिये. ते लोक देखिल मुरलेले आहेत. थोडा तिकड्च्या camp cha perspective दिला तर बरे होइल अस वाटते.
हे आपल माझ observation. मी काहि फार जाणकार नाहि.

Apart from that. You are going through a lot in personal life. Please know that you and your family is in thoughts and prayers of lot of readers here.
Thank you

शिरीन

हे बझट्चे पोलिसांना कोणी कळवले हा सस्पेन्स आजुन बाकी आहे.
कादंबरी छानच आहे. अर्देशीरांनी तिला कशी काय मदत केली हेही गुढच.
आजुनही जतीन, आणि अर्देशीर यांच्या वडिलांच्या म्रुत्युत direct involvement निश्चित नाही तरी
त्यांना ती गुन्हेगार का समजते हे कळले नाही.
खुपच छान! सस्पेन्स वाढतो आहे.

शिरीन | 24 November, 2010 - 11:07
बेफिकीर,
खुप छान चलु आहे कथा. जबरदस्त वेग आणि खुपच उतार चढाव आहेत मोना च्या आयुश्यात. डावपेच रन्गत आहेत. पण सगळ एकाच side ने वाचयला मिळतय. oopsition camp मधे मोनाच्या डाव पेचांवर काय प्रतिक्रिया येत आहेत. किंवा ती अडचणित येते तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, हे समजत नाहिये.
>>

हो पण शिरीन opsition camp मध्ये खरे कोण आहेत हे तरी कुठे ठाउक उदा
१) रेजिना
२) जडेजा
३) लोहिया
४) अर्देशीर
५) जतीन
६) सुबोध
यातले काही पात्र चांगले पण असु शकतात, म्हणजे त्यांचा मोनाच्या वडिलांना विरोध असेल
पण कंपनीचे हितचिंतक ते असु शकतील. लोहिया त्यातल्या त्यात नक्की गुंतलेले जाणवतात, सायराच्या
प्रसंगामुळे, सुबोधही बझट प्रकरणामुळे काही प्रमाणात सहभागी आहे पण बाकीचे आजुन खात्रिलायक
शत्रु वा मित्र नाहीत. ही suspense कादंबरी आहे म्हणुन असे होत असेल.

अर्देशीरानी मोनाला वाचवल असणार कारण त्यामुळे मोहन गुप्तांच्या खुनाला बळकटी आली असती आणि मृत्यूचे खरे कारण उघडकीस आले असते. तसेच मला वाटते मधुमती आणि शिल्पा यांच्या गोळ्यांबद्दल गप्पा झाल्या असाव्यात, आणि जसा शिल्पाने फोन नंबर सांगितला तसाच अनावधानाने (किंवा कोणालातरी सामील झाल्यामुळे) गोळ्यांबद्दल सांगितले असावेत.

बेफिकीर मस्तच.
फक्त एकच. मोनाने जर सिवा ला हाइएर केल आहे ना? मग त्याच्याकडुन इन्फो का घेत नाही.

सानी मला वाटत रेजीना चांगला माणुस नाही आहे. मागे कुठेतरी बेफिकीरजिंनी अस मेन्शनच मला आठवत आहे.

बेफिकिरजी,
१५ वा १६ वा भाग फार वेगवान.

शॉप फ्लोर वर येऊन सगळ्या वर्कर्स बरोबर रॅपो एस्टॅब्लिश करायचा भाग फार आवडला.

<<'मिस एम एम गुप्ता... दोन महिने झाले.. पिरियड्स आलेले नाहीत ...'>> हे व्हायला नको होतं.

एव्ह्ढी शिकले सवरलेली मुलगी आणि प्रणय without protection, यह बात कुछ हजम नही हो रही है.

पुलेशु. Happy

"चक्क एक बाई होती एका मशीनवर! असेल पन्नाशीची! " टेक्निकल नोलेज होत पन्नाशीच्या बाईला? ते सुधा लेथ मशिन प्रोफिशिएन्टली चालविण्या इतक...?
डायजेस्ट होण थोड कथिण आहे.

<<टेक्निकल नोलेज होत पन्नाशीच्या बाईला? ते सुधा लेथ मशिन प्रोफिशिएन्टली चालविण्या इतक...?>>

का नाही, परिच्छेदा (paragraph) मध्ये असे कोठेच म्हंट्ले नाही कि ती बाई लेथ मशिन ऑपरेट करत होती. ड्रिलींग मशिन असेल, किंवा काही अनस्किल्ड जॉब असेल.

No Hard Feelings Please.

सानी मला वाटत रेजीना चांगला माणुस नाही आहे. मागे कुठेतरी बेफिकीरजिंनी अस मेन्शनच मला आठवत आहे.>>> हो का रिमा??? Uhoh मला नाही आठवत रेजिनाविषयी काही लिहिल्याचे... त्याच्या व्यक्तिगत आयुष्याविषयीसुद्धा काहीच लिहिल्याचं आठवत नाहीये... गुढच आहे सगळं... Uhoh

मला वाटत रेजीना चांगला माणूस आहे . पण जर का त्याने मोनाचा विश्वासघात केला तर मला वाटते की मोनापेक्षा मीच कोसळेन

Pages