ड्यूड

Submitted by षड्जपंचम on 18 November, 2010 - 14:58

काही दिवसांपूर्वी 'Hey dude!', 'Hi dude!' अशी काही वाकये माझ्या कानावर सारखी पडत असायची,.. अजूनही पडतात ... मला कळायचे नाही की ही 'dude' भानगड काय आहे? हा 'dude' असतो कसा ? करतो काय? मला का लोक 'dude' म्हणत नाहीत? ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी 'dude' म्हणल्या जाणाऱ्या लोकांवर जरा लक्ष ठेवले... काही गोष्टी लक्षात आल्या ... ज्या आल्या त्या लिहाव्याश्या वाटल्या ...

पहिले म्हणजे Dude आपण कसे दिसतो ह्या गोष्टीची फार काळजी घेतो.. नेहमी branded कपडे वापरतो...कपड्या वरचा brand सगळ्या लोकांना दिसणे ही त्याच्या दृष्टीने आवश्यक बाब असते .. तो नेहमी shoppers stop, lifestyle अशाच दुकानातून कपडे घेतो.. नेहमी brand च्या भाषेतच बोलतो.. तो कधी कधी लक्ष्मी रोड वर पण खोट्या दाढ़ी मिशा लावून जात असावा... कारण तिथे तो कुणाला दिसला तर त्याचे dude त्व धोक्यात येऊ शकते ..तो कोल्हापुरी चप्पल, कुड़ता- पायजामा आशा टाकाऊ मालाचा वास सुध्धा अंगाला लागू देत नाही.. असले काही धारण करणाऱ्या व्यक्तीला तो 'चीप' म्हणून संबोधतो .. मेसेज प्रिंट नसलेल्या टी शर्ट कड़े तो ' बुजुर्गों के शौक की चीज' म्हणून पाहतो.. जर मेसेज प्रिंट नसेल तर अतर्क्य रंग संगतीतील ठिगळे तर शर्ट वर हवीतच !

त्याला पशुपक्ष्यांबद्दल खास प्रेम असावे असे मला वाटते ... कारण बोकडाची दाढ़ी , सिंहाची आयाळ आशा बऱ्याचश्या गोष्टी त्याच्या अंगावर दिसत असतात.

आता त्याचे खाणे ... 'हा काय खातो म्हणून ह्याला dude म्हणतात अणि मला नाही?' असा कधीकधी प्रश्न डोक्यात येत असेल तर सांगतो.. dude बनायचे असेल तर मिसळ, वडा पाव हे शब्द हिब्रू च्या डिक्शनरी तून आले आहेत असा चेहरा करावा लागतो... dude ला नेहमी बर्गर , हॉट डॉग , पिझ्झा असले पदार्थ आहारात लागतात .. ह्यातला हॉट डॉग हा पदार्थ कुत्र्यापसून बनवतात असा माझा एक समज होता .. तो नंतर दूर झाला.. ( नशीब मी हा प्रश्न कुठल्या dude ला विचारला नाही..) बर हे सगळ खाल्ल्यावर त्याला कुठले तरी सॉफ्ट ड्रिंक हवे असते.. खासकरून त्याला रेड बुल वगैरे भारदस्त नाव असणारी ड्रिंक्स हवी असतात ... लस्सी वगैरे पेयांना तो सेरेलाक, ग्राइप वॉटर सामान मानतो.. त्याचे आवडते पदार्थ ज्य़ा हॉटेल मधे मिळत नाहीत तेथे त्याला नेले तर तो 'हे हॉटेल माझ्या लेवल चे नाही' हे शंभर वेळा बोलून दाखवेल.. मैकडोनाल्ड अणि कैफे कॉफ़ी डे एवढीच क्षुधा पूर्तीची ठिकाणे असतात आणि बाकी ठिकाणी जेवणात घुशी, पाली इ. मारण्याचे औषध घालतात अशा अविर्भावात त्याचे बोलणे असते..

त्याला मैत्रिणी असतील किंवा नसतीलही. पण एक असली dude कधीही म्हणत नाही कि 'I don't have a girlfriend'... त्याला गर्ल फ्रेंड समजा नसलीच तर तो सांगतो कि 'मैं बहुत सारी लड़कियों के साथ घूमा हूँ ... लेकिन कोई भी मेरे टाइप की नाही थी'... आता ह्या मेरे टाईप ची जगातल्या कुठल्याही भाषेत व्याख्या करणे कठीण आहे.... बाकी dudes पण त्याला 'Ya! Right Maa'n' असा दुजोरा देतात.. तर काय .. प्रत्येक dude हा 'different' असतो .. ('वेगळा' हा शब्द वापरून मी अखिल भारतीय Dudes चा अपमान करणार नाही ..).. अशाच एका दुडे च्या फोन मध्ये मला खूप मुलींचे नंबर दिसले .. माझ्या dude संशोधनाचा भाग म्हणून मी त्यातले एक दोन त्याच्या नकळत डायल केले.. पलीकडून 'हा नंबर अस्तित्वात नाही' असा संदेश आला .. म्हणून मी नाद सोडून दिला ..

Dude चे आणि एक वैशिष्ट्य म्हणजे तो नेहमी dudes च्या ग्रूप मध्येच वावरतो.. 'चीप' लोकांमध्ये गेल्यास आपल्या dude त्वाला हानी पोहोचेल अशी भीती कदाचित त्याला वाटत असावी.. त्याला त्याचे मित्र सुध्धा Dude असावे लागतात ...Dude लोकांची टोपण नावे सुध्धा त्यांना शोभणारी अशीच असतात ... 'अरे सम्या, भडव्या काय करतोयस हे ??' अशी हाक मारल्यावर सम्या ला कमीपणा येण्याची शक्यता असते.. 'what the **** Sam! Wot the crap yo are doin!' असे काहीतरी कुणी म्हणाले कि सम्याला आपलेपणा जाणवू लागतो... Dude हा सर्वार्थाने Dude असतो... त्याला दुसरे काही विशेषण देणे म्हणजे त्याच्या Dude त्वाचा अपमान आहे. Dude ला सगळे non-Dudes 'चीप, बकवास' वाटणे आवश्यक आहे.. त्यांच्याकडे क्षुद्र नजरेने किंवा कपाळावर आठ्या आणून न पहिल्यास अश्या Dude ला त्यांच्या कॅम्यूनिटी तून वाळीत टाकले जाईल का असे वाटत असावे..

Dude च्या आवडी निवडी वरून सुध्धा त्याचे Dude त्व सिद्ध होत असते... तो नेहमी मैडोना, एमिनेम, मायकेल जाक्सन वगैरे भाषेत बोलतो.. गल्ली बोळातल्या रॉक band ची नावे सुध्धा त्याला माहित असतात .. लता, किशोर वगैरे त्याला देशाला मागे नेणारे लोक वाटतात ... त्यांची गाणी ऐकणार्यांना तो अंकल आणि ऑन्टी म्हणतो.. शास्त्रीय संगीत तर त्याच्यासाठी चेष्टेला पात्र ठरणारी गोष्ट असते.. 'वा ! शुध्द मध्यमावर काय सम घेतली!' वगैरे वाक्ये त्याला कळत नाहीत.. त्याला एवढंच कळत कि काहीतरी 'crap' बडबड चालली आहे.. मी असेच माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीबरोबर दुकानात गेलो होतो.. आमच्या दोघांचे बोलणे चालू होते .. आम्ही आपले आपापल्या नादात .. एका गायकाचा जोगकंस आणि तोडी किती सुंदर आहेत असा विषय चालला होता.. मधेच माझी जरा बाजूला नजर गेली .. तर एक dude आमच्याकडे जोगकंस आणि तोडी ही पिशाच्च हडळीची नावे असावीत आणि हे लोक चेटूक करत असावेत अशा नजरेने पाहत होता!!

अशी आणखीही काही dude लक्षणे सांगता येतील.. भारत हा कसा 'country without any future' आहे वगैरे बोलताना तो आढळेल .. rap वगैरे म्युझिक भारतात जास्त ऐकले न गेल्याने देशाची किती हानी झाली आहे वगैरे आक्रमकपणे सांगेल .. यंग जनरेशन ला इथे भविष्य नाही इत्यादी बरीचशी बडबड करेल .. नेहमी fashion, superbikes इत्यादी वरील मासिके वाचेल... मराठी पेपर वगैरे गोष्टींना तो अस्पृश्य आणि 'small town public' च्या गोष्टी समजेल.. मल्टी प्लेक्स ला तिकीट मिळाले नाही तर सिनेमाला जाणार नाही.. इंटरनेट वर chat करताना नेहमी स्पेशल short form वाल्या भाषेत बोलेल इत्यादी इत्यादी इत्यादी ...

Dude च्या अशा सगळ्या खास गोष्टी त्याला आम लोकांपेक्षा विशेष बनवत असल्या तरी काही गोष्टी त्याच्या सामन्यांगत असतात .. उदा. dude लोक सर्वसामान्यांगत क्रिकेट आवडीने पाहतात .. चौकार षटकाराची मजा लुटतात .. चर्चा करतात .. चालताना ठेच वगैरे लागली तर 'आई ग ' म्हणूनच ओरडतात ... 'ओह नो! ओह माय मदर! ' म्हणत नाहीत.. अशाच काही इतर गोष्टी.. तर सांगायचे काय.. काही कॉमन गोष्टी त्यांच्यामध्ये असतात .. ( ह्या वाक्याबद्दल मी सर्व dudes ची माफी मागतो)..

dudes ची सर्व लक्षणे सांगणे अवघड आहे... त्यासाठी मला dude बनावे लागेल.. मी dude बनण्याचा प्रयत्न केलाही होता... मी ४-५ ठिकाणी ठिगळे असलेला एक T shirt आणि एक low-waist जीन्स विकत घेतली ... ती मी वापरलीही .. दुकानाच्या ट्रायल रूम मध्ये .. त्यानंतर काही मला ते dude त्व अंगावर पेलवेना.. मी बऱ्याच वेळा विचार केला कि उद्या dude बनायचे..पण त्याची अवस्था दुकानातल्या ' आज रोख कल उधार' गत झाली.... शेवटी माझ्या ध्यानात आले कि dude बनणे काही माझ्या नशिबात नाही..

हल्ली मी dude बनण्याचा आणि त्याच्यावरच्या संशोधनाचा असे दोन्ही नाद सोडून दिले आहेत.. फक्त सर्व dude लोकांना एकाच म्हणावे वाटते... 'Heyyy dudes.. frgv this cheap prsn for writin this crap article!'

गुलमोहर: 

Hey dude! मस्त जमलंय! आवडले.
'वा ! शुध्द मध्यमावर काय सम घेतली!' वगैरे वाक्ये त्याला कळत नाहीत.. त्याला एवढंच कळत कि काहीतरी 'crap' बडबड चालली आहे.. Lol

मधेच माझी जरा बाजूला नजर गेली .. तर एक dude आमच्याकडे जोगकंस आणि तोडी ही पिशाच्च हडळीची नावे असावीत आणि हे लोक चेटूक करत असावेत अशा नजरेने पाहत होता!! >>> tuphan haslo yaa vakyala. mastad likha hai!!!

मस्त Biggrin

मस्त मजा आली.......

एक सूचवू का ? नावात ते षड्ज पाहिजे >>
एक्झॅटली. मी ही तेच लिहिणार होते. Happy

Biggrin
ड्यूड्स्चे अजून एक विशेष, हे लोक क्रिकेट पहात जरी असले तरी ते कधीच कबूल करीत नाहीत, यांच्या आवडीचे खेळ म्हणजे फुटबॉल आणि काररेसिंग. त्यातही ब्राझील, पुर्तगाल इ. देशांच्या संघापेक्षा माद्रीद-म्युनिकच्या कुठल्यातरी 'क्लब'चे आपण कसे भक्त आहोत हे सांगण्यात हयात घालवतात, पोल पोजिशन म्हंजे काय असे विचारल्यास हे हबकतात पण रेसिंगमधल्या ड्रायव्हर्सची वंशावळी यांना पाठ असते.

मस्त लेख.. Happy
अरे काय विचारता...'Boys are dudes and girls are dudettes.. Uhoh
इति माझी आठ वर्षाची भाची! ऐतेन..

Biggrin

ड्युडची आणखी विशेष, ड्युड गळ्यातल्या माळा हातात घालून फिरतात. ड्युडला गिटारचा गि अन व्हॉयलिनचा व्ही कळत नाही तरी पाठीवर लावून फिरतात. ड्युडला विट्टी दांडू म्हणजे पांडू खेळ वाटतात. एक्सबॉक्स मात्र हप्त्याने घेऊन हाताळतात. ड्युडला उच्च अनुकरणाची भलतीच हौस. ड्युड म्हणजे उच्चवर्णीयांच्या चालीरीतीचे डोहाळे लागलेला गरोदर पुरूष.

खुसखुशीत लेख !!
<<त्यांच्याकडे क्षुद्र नजरेने किंवा कपाळावर आठ्या आणून न पहिल्यास अश्या Dude ला त्यांच्या कॅम्यूनिटी तून वाळीत टाकले जाईल का असे वाटत असावे.. << Lol
अगदी अगदी... जसे काही तेच पाश्चात्य देशात जन्माला येण्यासाठी कसे लायक होते(चुकून इकडे आले) आणि बाकीचे म्हणजे कःपदार्थ!!!

<<ड्युड म्हणजे उच्चवर्णीयांच्या चालीरीतीचे डोहाळे लागलेला गरोदर पुरूष.<<सुक्या... Proud
सुक्या, गळ्यातल्या माळांबरोबरच केसांच्या बटांमधे मणी!
आणखी एक... चालण्याची स्टाईल आणि सर्वांगावरचे टॅटू!!!

वा वा वा वा.......... काय लिहिलय वा,.........पण dude असण काही वाइट नाही पण तुम्ही मात्र dude होण्याचा प्रयत्न करु नका........ आपण आपली सतार वा(खा)जवलेली बरी ......कसे?

सर्वांना उद्देशून ...

षड्जपञ्चम च लिहायच होत पण मल मोठा ष लिहिता आला नाही.. ज्यावेळी profile तयार केली त्यावेळी .. आता कसे काय बदलणार? तेवढे समजून घ्या Happy Happy

लक्षणे उत्तम वर्णिली आहेत. असे अनेक ड्यूडस आहेत माझ्या मित्रमंडळींमध्ये. त्यांच्यामुळे ग्रुप कसा रंगीबेरंगी होतो! फक्त चुकूनमाकून अशा ड्यूड्सचे लग्न वगैरे झाले की त्यांची दांडी गुल् !! सगळ्या ड्यूडगिरीची सव्याज भरपाई करायला लागते!! Proud

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ...

Gajaratai ->
>>> पण dude असण काही वाइट नाही

dude असण नक्कीच काही वाइट नाही.. मी फक्त काही स्वभाव विशेष सांगितले ... dude लोक रागावतील म्हणून माफीही मागितली आहे शेवटी.. Happy Happy

मस्त आहे Happy

असे अनेक ड्यूड्स मग ऑनसाईट वर किंवा प्रोजेक्ट वर येथे येतात आणि येथेही ते वेगळेच दिसतात. कारण तेथे मॉल्स मधे घेतलेले ब्रॅन्ड्स येथे प्रचलित असतातच असे नाही.

काही काळापुर्वी हे सगळे डयुड्स एन्टायसर, एलिमिनेटर अस्ल्या बाइक्स चालवायचे. ड्युडपणा सिद्ध करण्यासाठी पायात बर्मुडा, कानात हेड्फोन्स, बाइकवर स्वार, हातात सिगरेट, मागे गर्ल्फ्रेंड (ती ही ड्युडेट, ड्यु-डेट नाही Biggrin ) इ. लवाजमा पाहिजेच!
अजून एक म्हणजे हे सगळे पहाटेच्या वेळी देखील एमिनेम, लिंकीनपार्क पासून ते थेट बॅकस्ट्रीट बॉइज पर्यंत काहीही (इंग्रजी) ऐकायचे. Biggrin
आमच्या कॉलेज हॉस्टेलात बरेच नमुने होते Biggrin

Pages