सोनमोहर... नि आकाशकंदील

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काही वर्षांपुर्वी मी बिशानमधे रहायचो. फेब्रुवारी महिन्याच्या एका संध्याकाळी मी मेरीमाउंट भागात फिरायला गेलो. विनय साने सिंगापुरात असताना त्याच्याकडे 'तुझं आहे तुजपाशी' ह्या नाटकाच्या कित्येक तालमी सानेंच्या घरी होत असतं. त्या निमित्ताने मेरीमाउंटला येणे व्हायचे. केवढा मोठ्ठा होता नाटकाचा तो वर्ग! ते मेरीमाउंटच्या जवळपासचं रहायचे. पण त्यावेळी कधीचं माझी नजर या परिसरतल्या निसर्गावर गेली नव्हती. असे कसे घडले? मी मलाचं शभंरवेळा हा प्रश्न विचारला. 'बहवा' हा वृक्ष सिंगापुरात फुलतो तो काळ फेब्रुवारी आणि नाटक बसवायचा काळ असायचा 'मे' ते 'ऑगस्ट' हे महिने. फक्त फुले हेच खरे या झाडाचे सौदर्य. पाने-खोड-फांद्या-डहाळी पाहून कुणाला त्यात काही खास वाटणार नाही. जशी जास्वंदाची कातरलेली काळसर पाने पाहून वाटतं, गुलाबाची टप्पोर्‍या कळीच्या देठाला काट्यांनिशी असलेली लालसर रंगाची पाने पाहून वाटतं, बिट्टीच्या झाडांची अनुकुचीदार लांबलांब पाने पाहून वाटतं. पानांच सौदर्य बहाव्याला नाही पण फुले अगदी केवळ! भारताच्या एका तिकिटावर बहव्याची फुले आहेत. हिंदीमधे बहव्याला 'अमलताश' म्हणतात. मराठीमधे आणखी एक नाव आहे - सोनमोहर! बहव्याच्या फुलांचा रंग सोनपिवळा असतो. काळोख जरी झरत असला तरी बहवा मात्र आपले तेज ओघळत असतो. तो काळोखात विलिन होऊन जात नाही! बहव्याच्या फुलांचे घड इतके सुंदर असतात दिसायला की ज्याला ते दिसलेत तो नक्कीच बहव्याच्या प्रेमात पडला असे समजावे! ते सोनपिवळे घड वार्‍यावर हिंदकळताना पहात राहणे हे माझ्या आवडीचे झाले आहे. पण त्यासाठी फेब्रुवारी महिन्याची वाट मला पहावी लागते आणि इतकी वाट पहावी लागते म्हणूनचं तर तो मला आणखी आवडतो. असा सहजासहजी बारोमास माझ्या नजरेसमोर तो फुललेला असता तर कदाचित जीव विटला असता. बहव्याच्या फुलांचे घड एकदा मी तोडले आणि घरी येऊन त्याचे झुंबर केले. अर्थात ते छताला अडकवून ठेवले.

यावेळी मी दिवाळीचा अगदी यथेच्छ आनंद लुटला. अर्थात मी खूप काही केलं असे नाही. फक्त सहज मिळेलं ..सहज घेता येईल त्या त्या गोष्टींचा आनंद घेतला. रोजच्या रोज लिल-ईंडियाला माझी वारी असायची. रोज काहीतरी मिळायचं. वेगळा आनंद, वेगळा उन्माद जाणवायचा. विविध कलेचे दर्शन घडता तिथल्या तिथेच जीव विरघळून जायचा. नकोशा वाटणार्‍या गर्दीत मन हरखून जायचे. घरी पाय परतायला तयार नसतं. इतके वर्ष हे आपल्याला कसं नाही दिसलं! बहुतेक ती नजर तेंव्हा नव्हती हेच एकमेव उत्तर असावं याला. यावेळी मी एक आकाशकंदील विकत आणला. घरी तो कुठे टांगावा असा विचार करता दोन दिवस उलटून गेले पण त्याला जागा मिळाली नाही. बाहेर घरात कुठेच त्याला सोयीची जागा मिळाली नाही. बॅगेत तो पडून राहिला. त्याच्या टोकदार कडा दुमडून गेल्यात. वरची चमकी निघायला सुरवात झाली. आतमधला जाड कागद वाकायला लागला. आपण कशाला आकाशकंदिल विकत घेतला असे वाटले. मग उशिराने लक्षात आले की आकाशकंदील लावायला एक होल्डर आणि एक बल्ब पण लागतो. हे सर्व घरात नव्हते. ऐन दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी मी खालच्या चिनी मंदीराच्या आवारातून केळीची पाच पाने आणायला गेलो त्यावेळी दुकानातून होल्डर आणि बल्ब विकत आणला. तरी प्रश्न होताचं आकाशकंदिल कुठे लावायचा. मग विचार करुन पाठ भिंतीला टेकली तेंव्हा वर एक हुक दिसली झोपायच्या खोलीत. ती दिव्यामुळे लपलेली होती. मग तिलाचं तो आकाशकंदील अडकवला. १५ फुट वायरीपैकी फक्त २ फुट वायर लागली. उरलेली वायर रेंगाळत राहीली.

एखादी गोष्ट जगाला दाखवायला आतल्याआत आपली एक तडफड सुरु असते. माझी देखील अशीच तडफड होती की बाहेर आकाशकंदील लावावा. आमच्या चाळीत कुणाचा आकाशकंदील कसा असेल यावर काही जण ठरवत त्यांच्या कसा असावा. काहीजण तेच तेच आकाशदिवे दरवर्षी लावतं. तर काही जण दरवेळी नवीन फॅशनेबल आकाशकंदील विकत आणत. प्रत्येकाची ऐपत आणि उत्साह हा वेगळा असतोच शेवटी. घरी देखील आपण आकशकंदील बनवू शकतो हे मला खूप उशिरा माझ्या पुणे-मुंबईकर मित्रांकडून शिकायला मिळाले. आता दिवाळी संपली तरी कित्येक दिवस हा बेडरुममधे लावलेला आकाशकंदील निघणार नाही. बाकीचे सर्व दिवे मालवून तो एक दिवा फक्त लावला की वेगवेगळ्या नक्षत्रांची उधळन माझ्या अंथरुणावर होते. हिरव्या लाल निळ्या जांभळ्या गुलाबी पिवळ्या चंदेरी केवढ्या तरी रंगाच्या तारका... चांदण्या त्यातून थेट माझ्यावर नाना रंगांची बरसात करीत असतात. चांदण्यात पाय सोडून मला ऐसपैस बसता येतं. हव्या तेवड्याच प्रकाशात वाचन करता येतं. बाहेरच्या जगाला हा आकाशकंदील दाखवण्याच्या आनंद जरी मला नाही लाभला तरी सगळी तडफड विसरून यावेळी मला आतल्याआत आनंद झाला आहे. अगदी असाचं आनंद मला फेब्रुवारी महिन्यात हिंदाळणारा सोनमोहर पाहून होत असतो. शुभ-दिवाळी!

sonmohar.jpg

- बी

प्रकार: 

बहवा....तुमच्या लेखाने मला ती शाळेतली कविता आठवली.
'' आला शिशिर संपत पानगळती सरली
ऋतूराजाची चाहूल झाडावेलींना लागली !"
त्यात एक ओळ होती....' बाहव्याने येथे तेथे सोनतोरण बांधिले '
पूर्ण कविता कुणाला माहीत असेल तर प्लीज टाका.
बी, विषयांतराबद्दल माफी. लेख छान झालाय.
थोबाडपुस्तक Biggrin Biggrin

रुणुझुणु, ही कविता पद्मा गोळेंची आहे. मला वाटलं ही फक्त चारोळी आहे. शोधून तुला देईन.

सर्वांचे धन्यवाद.

दिनेशदा, परत या...

बी छान लिहिलं आहे.
बहावा माझं पण आवडतं झाड Happy उन्हाळ्याचा सगळा ताप घालवुन टाकणार्‍या यादीत गुलमोहोर, आंबे, आणि कलिंगडा बरोबर याचं पण नाव आहे.

छान लिहिलय. पण सोनमोहोर म्हणजे बहावा नाही. पेल्टोफोरमला सोनमोहोर असा शब्द आहे. पेल्टोफोरमची फुलं मोहोरासारखी आल्यासारखी पानापानांमधून फुलतात. बहाव्याच्या सुवर्णमाळा असतात.

कस्लं मस्त लिहिलय.... बहावा माझ्या आवडत्या झाडांपैकी एक........... मी पांढरा आणि गुलाबीही पाहिलाय.. अर्थात पिवळा क्लासच दिसतो.... उन्हाळ्यात रस्त्याने जाताना मी शोधत असते चहुबाजुला याची झाडे.

पण सोनमोहोर या नावाने मी दुस-याच कोणालातरी ओळखते Happy मला वाटते कॉपरपॉडट्री ला इथे सोनमोहोर नावाने ओळखतात. वर लिहिलेला पेल्टोफोरम म्हणजेच कॉपरपॉडट्री. त्याला पिवळ्या फुलांचे तुरे लागतात आणि मग रस्त्यावर पिवळी बिछायत पसरते. ही बिछायत पसरली की रस्त्यावरुन जाताना मुद्दाम फुलांवर पाय पडणार नाही असे बघत उड्या मारत जाणे हा दुसरा आवडता छंद Happy

बहावा भारतीय असल्याने त्याला नव्याने नाव द्यायची गरज पडली असेल असे वाटत नाही.
पेल्टोफेरम किंवा कॉपर शिल्ड ट्री यालाच पीतमोहोर म्हणतात.
पण तो आपल्याकडे भरपूर लावला असला तरी तो आपल्या मातीत अजून रुळलेला नाही.
शेजारीशेजारी चार झाडे असली, तरी ती सहसा एकावेळी फूलत नाहीत. शिवाय त्याचे काही औषधी उपयोग पण नाहीत. बहाव्याचे मात्र आहेत.