तो.पा.सु की नाही ?

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 November, 2010 - 05:02

चिंच दिसली की लहानपण डोळ्यासमोरुन गेल्याशिवाय राहत नाही. ही चिंच पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असे फार क्वचीतच आढळतील. मी लहान असताना भरपुर चिंचा खायचे. शेताच्या बांधावर जाऊन झाडावर दगड माडून चिंचा पाडायच्या आणि तिथेच झाडाखाली बसुन घरुन पुडीत बांधून आणलेला मिठ मसाला लावुन खायचा हे उद्योग बर्‍याचदा चालायचे. असे खाउन मन नाही भरायच तेंव्हा त्याच चिंचा घरी नेउन परत त्याची चटनी बनवायची आणि खायची. गोबोळी चिंचा शोधायलाही मजा यायची. चिंच हलवायला खास माणूस यायचा तेंव्हा मग त्या पिकलेल्या चिंचेत एखादी गाबोळी चिंच मिळाली की खुप आनंद व्हायचा. पिकलेल्या चिंचा आई-आजी घरात ठेवायच्या आणि संध्याकाळी फोडत बसायच्या आणि फोडून त्याचे जाड्या मिठात मिसळून गोळे करायच्या तेंव्हा त्यातही जाउन हात मारायचे. मग मात्र आई ओरडायची. अग किती चिंचा खातेस ? जास्त आंबट खाउ नकोस, आत्ता मजा वाटते खायला वय झाल की त्रास होईल. आणि आता तेवढ वय न होताही खरच मला संधीवाताचा त्रास होतो मधुन मधुन आणि आईचे ते शब्द आठवतात. पण आईला आता हे सांगण्याची हिंमत होत नाही. आई अजुनही ह्या चिंचा फोडत असते वय झालय तरी पण मी वय न होताही चिंचा खाण बंद केलय. (दु:खी बाहुली). फक्त जेवणातल्या काही पदार्थात तेही खुप कमी प्रमाणात चिंच घालते.
ह्यात चिंचेचा दोष काहीच नाही. माझ्या हट्टिपणाचा आणि कंट्रोलही नही होताचा आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही हे आई हजारवेळा सांगुनही मी तिच्यापासुन चोरून खायचे कधी कधी.

Chinch.JPGChinch1.JPG

ह्या फुलांवरून हेही आठवत की चिंचा पाडून झाल्या की एखाद महिन्यातच लगेच दुसरी फुले येतात मग ती फुले आणि झाडाचा कोवळा पालाही मी खायचे. आणि झाडाला नुकतीच पकडलेली चिंच तर मला खुपच आवडायची.

Chinch2.JPG

हे पाहुन तुमच्याही काही लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील त्या आपण शेअर करुया.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कॉलेजच्या कॅम्पस मधे चिंचेचे झाड होते ...लई जोमाने पाडत होतो चिंचा .... शिपायाने पकडले ..बदडत बदडत प्रिंसिपॉल कडे नेले ...चिंचा राहिल्या शिव्या मात्र खायला मिळाल्या ...

ह्या असल्या आठवणी जाग्या केल्या बद्दल Angry

Proud

जागू मला तर या वयातही चिंचेचा मोह आवरत नाही. आणि आहारात चिंच असावीच, त्याने किडनी स्टोनचा त्रास व्हायची शक्यता कमी होते.
अरेबिक लोक तर त्याला तमार्-ए-हिंद म्हणजे भारतीय खजूर म्हणतात. त्याचेच पुढे टॅमरिंड झाले.

टॅमरिंड Happy मनोरंजक माहिती
प्रगो Proud
चिंचा आपण सर्वांनीच खाल्ली लहानपणी..तुझ्या सारखीच जागू Happy
आमच्या शाळेच्या रस्त्यावर मोठमोठाली झाडे रांगेत लागलेली होती. आमचा सायकल रिक्षावाला लांब बांबूच्या टोकावर एक तारेचा हुक बनवून अडकवत असे आणी आमच्यासाठी शेकड्यांनी चिंचा तोडून सीट खालच्या पोकळीत भरून ठेवत असे .. स्लर्प!!!!!!
चिंचेमधला अजून एक प्रकार होता 'विलायती इमली' म्हणत असू आम्ही.. हिन्दीत तिकडे जलेबी म्हणायचे. जिलेबी सारखीच वेटोळी असत या चिंचेला. चवीला गोड असे. वरूअन हिरवी ,जाड साल असे. आतला गर कधी पांढरा तर कधी लाल रंगाचा असे. आत चिंचोके तसेच पण लहान आकाराचे असत.
दिनेश दा बहुतेक अजून प्रकाश टाकू शकतील या प्रकारावर Happy

वर्षू, ती विलायती चिंच खरी चिंच नाही. ती झाडे मस्कत मधे पण खुप आहेत.
थायलंड मधे गोड चिंच पिकते (आता ती भारतातही मिळते.) आपल्या चिंचेसारखीच पण चवीला गोड.

आशा भोसले आवाज टिकावा म्हणून अजिबात चिंच खात नाही, तर लहानपणी लता, कच्च्या चिंचा शेकोटीत भाजून खात असे. (यावरून काय तो बोध घ्यावा.)

वर्षू ति विलायती चिंचेची झाड अजुन आहेत समुद्रकिनारी जाताना. आम्ही लहान असताना सगळी भावंड मिळून दर सुट्टीत समुद्रावर जायचो. तेंव्हा बर्‍याचदा ह्या चिंचा खायला जायचो. पण खुप कमी मिळायच्या कारण आधीच त्या लोकांनी ओरबडलेल्या असायच्या अगदी कोवळ्या सुद्धा.

भ्रमर Lol

अखि, नुतन, रुपाली धन्स.

दिनेशदा चांगली माहीती सांगितलीत. ह्या जन्मी तरी मला आता स्टोन होणार नाही अस वाटत. Lol

दिनेशदा अजुन आठवण झाली शेकोटी वरुन. चिंचेचे चिंचोके आम्ही थंडीत जेंव्हा सकाळी शेकोटी पेटवायचो तेंव्हा त्यात त्या भाजुन खायचो. खुप चाळा असायचा तेंव्हा हे चिंचोके खायचा. अजुनही चव तोंडावर आहे ती. पण त्याही चांगल्या नसतात जास्त अस आई सांगायची.

गोड चिंचही आहे आईकडे. ती पिकल्यावरच गोड लागते. ती तर खायला मजाच यायची.

आई गं, फोटो बघताना आणि तू लिहिलेलें वाचतानाच दात आंबायला लागले ना, जागू! Proud

चिंचे भोवती बालपणीच्या खूप आठवणी आहेत. चिंचेच्या झाडांविषयीच्या पण! Wink

पंजाबी लोकात चिंच खात नाहीत (पण पनीर, कोबी खुप खातात) म्हणून त्यांच्याकडे स्टोन्सचे (आणि अनिमियाचेपण) प्रमाण जास्त असते. याउलट तामिळ लोकांत, भरपूर चिंच खातात, म्हणून त्यांच्याकडे स्टोन्सच्या केसेस जास्त नसतात.

या चिंचेबाबत नलिनी ने एक मजेदार आठवण लिहिली होती. चिंचेच्या पोकळ सालीत, दूध भरुन त्या साली भिंतीला टेकून उभ्या करुन ठेवायच्या. थोड्याच वेळात त्या दूधाचे घट्ट दही होते.

ओ रिअली.. चिन्चेच्या सालीत दूध ... अमेझिन्ग..
दिनेश दा ..धन्यवाद.. खूप छान माहिती मिळाली..
थायलॅण्ड च्या चिंचापण खूप खाल्ल्यात .. गोड असतात अगदी Happy

आई ग्ग... चिंचा ..... य्म्म्म्म्म्म्म्म

मला गाभुळलेल्या चिंचा भयानक आवडतात... देशात आले की खाते भरपुर.... Happy

आणि लाल चिंच. आतून लाल असते. लहान असताना आम्ही त्यानी ओठ रंगवायचो. लिपस्टीक लावायला द्यायची नाही न आई. Happy

स.प. मधे असताना बाहेर गाडीवर बसणार्या आजीन्कडे चिन्चा, ति़खट-मीठ लावलेली कैरी, काकडी ह्या गोष्टीन्चा असन्ख्य वेळा आस्वाद घेतलाय..त्याची आठवण करून दिलीत..खूप खूप धन्यवाद जागूताई.. Happy

>>>अहाहा चिंचा. पूर्वीही खायचे. अजूनही खूप चिंचा खाते. Happy
चोरून/ ओरडा खाऊन खाण्यात मज्जा.>>>
रैना, अगदी अगदी..आई ने स्वयपाकासाठी चिन्चेचा गोळा आणून दिलाय..आमटी/भाजीत घालताना कधीतरी पटकन थोडीशी तोन्डात टाकते..नवरा आसपास असेल तर डोक्याला हात लावतो.. Proud

चिंचा खाऊन संधिवाताचा त्रास होऊ शकतो तसंच चिंचा खाऊन किडनी स्टोन टाळता येऊ शकतो, ह्या दोन्ही माहित्या नवीन आहेत माझ्याकरता.

जागु, खरंच तों.पा.सु.
टॅमरींड...ह्म्म्म, असा आहे तर ह्या शब्दाचा उगम.
<< चोरून/ ओरडा खाऊन खाण्यात मज्जा.>> अगदी,अगदी !

माझ्या लहानपणी नेरुळ हे एक गाव होतं.... नव्या मुंबईत फक्त वाशी विकसित झालेलं होतं.... तर नेरुळ हे ठाणे बेलापूर रोडवरील एक टुमदार गाव होतं. गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दुपारी २.०० ते ३ . ०० जेवणाची सुट्टी असायची. एकदा आम्ही ४-५ मित्र नाक्यावरच्या चिंचेवर चिंचा पाडायला गेलो...... सगळ्या चिंचा कच्च्या होत्या.... आम्ही पाडून तश्याच मिठ लावून दात आंबेपर्यंत खाल्ल्या. खाताना वेळेचे भानच उरले नाही. शाळेची ३.०० ची घंटा वाजल्यावर पळत आलो. ..... वर्गात जाईपर्यंत ३.१५----- ३.२० झाले होते. गुरुजींनी पहिले तर सगळ्यांच्या २-२ छड्या मारल्या. कुठे होत्या विचारल्यावर मी ''चिंचा खात होतो'' असं सांगीतलं...... भालचंद्र नावाच्या मित्राने ह्याहि पुढे जावून्,खूप पिकलेल्या चिंचा होत्या.... आम्हाला त्यामुळे वेळेचं भान राहिलं नाही वगैरे कथा पुढे रेटली,जेणेकरुन गुरुजींना आम्ही प्रामाणिक वाटू व अजून शिक्षा होणे वाचेल्,हा हेतू....... झालं भलतंच...... गुरुजींनी भाल्याला थोड्या चिंचा त्यांच्यासाठी आणायला पाठवलं.
भाल्याला काय करावं सुचेना.... तेव्हा पठ्ठ्याने कच्च्या चिंचा चूलीत भाजल्या आणि पिकलेल्या सांगून गुरुजींना आणून दिल्या.

आजही हा प्रसंग आठवून आम्ही खूप हसतो. Happy

जागू, आमच्या घरी आई-आजी असे आंबट चिंबट काही (जसे कैर्‍या, राय आवळे, चिंचा, बोरं, मैना इ.इ.) प्रकार सर्दी-खोकला होईल, आम्ही आजारी पडू म्हणून फारसे खाऊ द्यायच्या नाहीत. पण आमच्या शाळेत चिंचेचे झाड होते मोठ्ठे. चांगले उंचच उंच. त्याच्या चिंचा फांद्या वाकवून, काठीने वगैरे काढायला लागायच्या, किंवा झाडावर चढायला लागायचे. झाडाच्या फांद्यांना लगडलेल्या चिंचा दिसल्या की तोंडाला जाम पाणी सुटायचे. शाळेतले आमचे एक शिपाई काका होते (त्यांना आम्ही कायम त्यांच्या नावानेच हाक मारली!), त्यांच्याकडे सगळ्या विद्यार्थिनी त्या झाडाच्या चिंचा काढून देण्यासाठी हट्ट करायच्या! मला तर आठवतंय, आम्ही शिपाईकाकांच्या दोन्ही हातांना अक्षरशः लोंबकळायचो, हात-पाय आपटायचो.... अगदी घरात हट्ट केल्यासारखे. शिवाय त्यांच्या खिशातही अनेकदा आमच्यासाठी चिंच आवळ्यांचा खाऊ ठेवलेला असायचा. तो देखील हवा असायचाच! ते आम्हाला रागवायचे, म्हणायचे, तुम्ही पोरी आजारी पडलात तर मोठ्या बाई (मुख्याध्यापिका) मला रागवतील इ.इ. पण आम्ही मुली कुठे ऐकतोय त्यांचं! आमचा हट्ट भुणभुण चालूच! शेवटी आमचा ससेमिरा संपावा म्हणून का होईना आमच्या चिमुकल्या हातांमध्ये दोन-दोन चिंचांची बुटुके, दोन-तीन राय आवळे पडत असत. काय तो खजिना मिळाल्याचा आनंद होई! मग मधल्या डबा खायच्या सुट्टीत एकतर इतर मुलींना टुकटुक करत ''दशरथनं दिलीए मला चिंच'' करत चिंचा खाणं होई किंवा स्कर्टच्या खिशात ठेवलेली चिंच तासाला लपून छपून खाल्ली जात असे!! (हो, आणि त्याबरोबर मीठ असलं तर सोनेपे सुहागा.... ते मीठ आम्हाला फुकट द्यावं म्हणून शाळेसमोर आवळे चिंचा विकणार्‍या बाईच्या डोक्याला जाम कटकट करायचो, किंवा कधी तिच्याकडून काही विकत घेतले तर सोबत येणारे मीठ वहीच्या कागदात नीट गुंडाळून जपून वापरायचो!)

पुढे दशरथ रिटायर झाल्यावर शाळेसमोर चिंचांची व तत्सम सर्व आंबट चिंबट रानमेव्याची पाटी घेऊन काही बायका बसायच्या त्यांच्याकडे माझा मोर्चा वळला. मग तो खाऊ विकत घेण्यासाठी पहार्‍यावरच्या शिपायाला मधल्या सुट्टीत बाहेर सोडण्याविषयी गळ घालणे, भंडावून सोडणे इ. प्रकार होत. बरं, एकटी-दुकटी मुलगी असेल तर परवानगी मिळणारच नाही हे माहीत असल्यामुळे तीन-चार जणी तरी गळ घालायला हजर असत. मग बर्‍याच वाटाघाटींनंतर तो शिपाई आम्हाला दोन मिनिटात यायची ताकीद देई. आपण जर दोन मिनिटात परत गेलो नाही तर आपल्याला शाळेत परत घेणार नाहीत ही भीती असायची आमच्या मनात. Proud

शाळा सुटली की त्या बायका जर माल शिल्लक असेल तर तशाच बसलेल्या दिसायच्या तिथे. मग पुन्हा त्यांच्याशी घासाघीस, हुज्जत. जास्तीत जास्त बोरे, चिंचा इ. पदरी कसे पडतील ह्यासाठी सर्व मेहनत. मग खरेदी झाली की ती चिंच तश्शीच न धूता खात खात घरी चालत यायचे. घरी पोचेपर्यंत तोंड आंबट ढाण झालेले असायचे. दात पुरते आंबून गेलेले. आणि हात चिकट झालेले. चिंच हिरवी - पांढरी असेल तर घरी कोणाला कळायचे नाही. पण गाभुळलेली चिंच असेल तर दातांच्या स्थितीवरून घरात सुगावा लागायचा. तो तसा लागू नये म्हणून आजी/ आईने गाठायच्या आत वॉशबेसिनवर जाऊन खळाखळा चुळा भरायचे. तरीही त्यांना कळायचेच! कसे ते माहीत नाही. बहुतेक माझ्या चेहर्‍यावर लिहिलेले असायचे तसे!! Lol

पण जगुतै.....चिन्चेचे फटू कोणी घेतले आहे???????ते सान्ग आधी...

भटकत असताना... चिंचा......... आवळे.......... कैर्‍या........ करवन्दे....यान्चि झाडे शोधुन काढ्णे आणी त्याना त्रास देणे म्हणजेआमचा आवड्ता उद्योग.......

जागु.. चिंचांबरोबर त्यांच्या एका आंबट भावाची प्रकर्षाने आठवण झाली बघ.. 'करवंदं' च्च्च्च... लहानपणी घराजवळच्या रानात.. म्हंजे खरंखुरं रान नाही.. अनडेवलप भागांत करवंदाची जाळी असत.. तिथे घुसून करवंदांचा खजिना लुटत असू.. न धुता, तशीच फ्रॉकला पुसून मट्ट करत असू.. त्या चिकट चिकाचीपण कधी भीती वाटली नाय.. आता आपल्या पोरांना ,काहीही न धुता खाऊ देऊ का आपण ?? Wink

जागु, खरंच तों.पा.सु.

मुग्धा अगं मी पण आमटी/भाजीत घालताना कधीतरी पटकन थोडीशी चिंच तोन्डात टाकते......

लहान असताना आई चिंच चेचुन त्यात गुळ आनि मीठ घालुन ठेवायची ती असा गोळा करुन ठेवायचा अवकाश मग मीच त्याच फडशा पडत असे. Happy

Pages