गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग ६

Submitted by बेफ़िकीर on 2 November, 2010 - 07:27

One who is better informed can take better decisions.

कधीतरी डॅडनी बोलता बोलता उच्चारलेले हे वाक्य मोनाला आज दुपारी बारा वाजता आठवले. जतीनचा फोन आणि सिवाच्या इमेल्सचा परिणाम तर होताच, पण रात्री वाटलेली भीती, रात्रीचे जागरण आणि सकाळी उशीरा आलेली जाग या सर्वांचा एकत्रित परिणाम चेहर्‍यावर दिसत होता. त्यातच आत्ता हाही फोन येऊन गेला. इरफान अब्दुल्लाह! म्हणे आत्ता भेटुयात! शेवटी मोनाने त्याला घरीच दुपारी अडीच वाजता लंचला बोलावले. अजून थोडा वेळ पडावे की काय असा विचार सतत येत होता मनात! पण सतत तो दूर सारत मोना कडक चहा घेत बसली होती. इतक्या दुपारी चहा घ्यावासा वाटण्याचे कारण मनावर आलेला प्रचंड ताण!

बहुतेक, डॅडना .... हेतूपुरस्पर संपवले होते. याचा विचार आला की ओक्साबोक्शी रडावेसे वाटत होते. पण कुणासमोर रडणार? कुणी आपले नाहीच तर? एकही नातेवाईक नसावा पुण्यात?

मोनाने जवळचे, लांबचे सगळे नातेवाईक आठवून पाहिले. अनेक परदेशात होते. सुबोधच्या आई वडिलांना, म्हणजे स्वतःच्या काका काकूंना तर ती भेटलीही नव्हती. आणि जतीन आणि सुबोध तिला कधीच आपले वाटलेले नव्हते. त्यात काल रात्रीपासून तर त्यांचा समावेश सरळ सरळ शत्रूपक्षात झालेलाच होता.

आपणच! आपल्याला आधार द्यायला आपणच आहोत फक्त! नो वन एल्स! काही अपेक्षाच करायची नाही कुणाकडून! फर्गेट इट! कशाला हवाय आधार?

आपल्याकडे आत्ता असलेली माहिती आपल्याला नाहीच आहे असा समज असणार्‍यांना धडा शिकवणे यासाठी तरी आपल्याला गुप्ता हेलिक्समध्ये राहिलेच पाहिजे. आणि आत्ता या क्षणी आपल्याकडे प्रचंड गुप्त माहिती आहे. प्रचंड!

प्रश्न असा आहे की इरफानशी कसे डील करायचे? कारण इमिजिएट भेडसावणारा प्रश्न तोच आहे.

मोनाने सगळे विचार दूर सारले.

शामाने तोवर आंघोळीची तयारी केलेली होती.

भल्या मोठ्या टबमध्ये प्रवेश करताना त्या पाण्याच्या स्पर्शाने मोनाला खूपच फ्रेश जाणीव झाली. मस्त सुगंध येत होता जेलचा! रिमोटने टी.व्ही. ऑन करून शांतपणे मोना पडून राहिली.

पाणी! पाणी तिला फार फार आवडायचे! कितीही तास आणि कितीही वेळा पाण्यात बसून राहायला तयार असायची ती! समुद्र असो, तळे असो, नदी असो वा बंगल्यातील हा प्रचंड टब! टी.व्ही वर कोणतेतरी कंटाळवाणे कार्यक्रम लागले होते. ते बंद करून शेवटी तिने डोळे मिटून घेतले. सर्व शरीरावर आता पाण्याच्या सुगंधी लहरी फिरत होत्या. मस्त टेंपरेचर होतं पाण्याचं! बाहेरच पडू नये असे वाटत होते. अचानक तिला आठवण झाली. लतिकाला इन्टरकॉमवरून तिने दोन माणसांचे जेवण तयार करायला सांगीतले. शुद्ध शाकाहारी! कमीतकमी तीन भाज्या, त्यातल्या निदान दोन हिरव्या! फुलके, सॅलड, रायता, आमटी आणि दही! श्रीखंडाचे डबे बरेच होते घरात! आईसक्रीमही भरपूर होते. डेझर्टचा काही प्रश्नच नव्हता. आणि आत्ता स्वतःसाठी टोमॅटो ज्यूस!

आता विचार करायला ती मोकळी झाली. नो डिस्टर्बन्स! एक्स्पेट शामा! जी बाथरूमला अ‍ॅटॅच्ड असलेल्या वॉर्डरोबरूममध्ये बसून तिथला टी.व्ही बघत होती. आणि मधले दार लावल्यानंतर ही भली मोठी बाथरूम बाहेरच्या जगापासून पूर्णतः स्वतंत्र झालेली होती.

मोनालिसाने एकेक व्यक्ती विचारात घ्यायला सुरुवात केली. सुबोध, जतीन, लोहिया अंकल आणि अर्देशीर अंकल! इरफान अब्दुल्लाह! सायरा, पराग, गोरे, शर्वरी! जोशी, बिंद्रा, भसीन आणि मेहरा!

सुप्रीम कमांडमध्ये आज अस्तित्वात असलेल्या प्रत्येकाचे आयुष्य सरळ सरळ डॅडनिच उभे केल्याचे समजलेले होते. सुबोध, जतीन, लोहिया आणि अर्देशीर या चौघांचे! नक्कीच, आपल्या डॅडच्या महाप्रचंड इस्टेटीमुळे त्याना त्यांचा हेवा वाटत असणार! हे साम्राज्य स्वतःच्या खिशात घालण्यासाठी ते आतुर असणार! या हेव्यातूनच त्यांची एकमेकांशी मैत्री झालेली असणार! सरळ आहे. ही मैत्री मित्रत्वाच्या अधिष्ठानावर नसून वाईट हेतूमुळे निर्माण झालेली आहे म्हंटल्यावर टिकणारी मैत्री नसणार!

अर्थात, ही सगळी आपली गृहीते आहेत. हे सर्व जण आजही बिझिनेसमध्ये तितकाच रस दाखवत आहेत. तितकेच झोकून दिल्याप्रमाणे वागत आहेत. लोहिया अंकल तर मुंबई ऑफीसमधून रात्री साडे आठला घरी जायला निघतात. अर्देशीर सर ऑफीसला आले की सात सात वाजेस्तोवर बसतात. सुबोध सतत फिरत असतो देशभर! जतीनने मार्केट व्यवस्थित सांभाळलेले आहे. गोची काहीतरी वेगळीच आहे. या सगळ्यांना हा बिझिनेस व्यवस्थित चालायला हवा आहेच, पण बहुतेक... तो त्यांचा स्वतःचा म्हणून हवा आहे.. डॅडचा नाही. याचा अर्थच असा, की आपण आत्ता ज्या टबमध्ये आहोत, त्याच्यातही आपल्याला बुडवून मारण्याची त्यांना इच्छा होऊ शकते. शत्रूत्व काहीच नाही. फक्त प्रगतीमधील अडथळा! बिझिनेसेसही सेन्टिमेन्ट्सवर चालतात! बिझिनेस काय? देशही चालतात! इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर... संपूर्ण देशाला त्या मानसिक धक्यातून सावरायला राजीव गांधींच्या चेहर्‍यावरचे निर्मळ हास्य पुरेसे ठरले होते. स्वतःची आई निवर्तलेली असूनही राजीव गांधी या माणसाने त्या क्षणी धीर दाखवला. राजकारणाचा काहीही प्रत्यक्ष अनुभव नसताना पंतप्रधान करण्यात आले त्यांना! देशाच्या सेन्टिमेन्ट्स गुंतलेल्या होत्या त्या सर्व प्रकारात! परिणामतः, पुढच्याच लोकसभा निवडणूकीत कधी नव्हे इतके घवघवीत यश मिळाले पक्षाला! विरोधी पक्षाला किती सीट्स? दोन! अडवानी आणि वाजपेयी! देशाच्या भावना गुंतलेल्या होत्या.

अगदी छोट्या स्केलवर जर बोलायचे झाले, तर आपला प्रवेश काहीसा असाच आहे. आज हेलिक्सच्या स्टाफच्या दृष्टीने आपण जरी सर्व दृष्टीने अननुभवी असलो तरीही आज आपण त्यांच्यासाठी डॅडच आहोत. आपल्याकडे ते मोहन गुप्तांची मुलगी याच दृष्टीने बघणार! बिझिनेसही सेन्टिमेन्ट्सवरच चालणार आणि वाढणार! आपले काही झाले तर सुबोध सोडून गुप्ता घराण्यापैकी कुणीच नसेल हेलिक्समध्ये! आणि सुबोध तर कामगारांमध्ये पहिल्यापासूनच अप्रिय आहे. म्हणजेच, हा मोठा वृक्ष काहीसा डळमळीत होणार! आणि त्याचाच फायदा घेऊन ही कंपनी एक तर बुडवून हे चौघे लाभ तरी उठवणार किंवा मग ही कंपनी व्यवस्थित चालवून त्यातून स्वतः नवकोट नारायण होणार!

या सर्व प्रकरणात आपली नेमकी भूमिका काय असायला हवी? आपण डॅडच्याच भूमिकेला पुढे रेटणे कितपत आवश्यक आहे? आपले डॅड म्हणजे काही ऐतिहासिक व्यक्तीमत्व नव्हे की ज्यांनी दाखवलेलाच मार्ग आपण अंगीकारायला हवा! आपण अमेरिकेत जाऊन आरामात राहू शकतो. अमेरिकेतील काही अती श्रीमंत माणसांमध्ये गणना होण्याइतका पैसा आज आपल्याकडे आहे. आपण निदान पहिल्या दहा हजारात तरी येऊच तिथल्या! मग आपण इथे का गुंततो आहोत? का इतक्या विषारी वातावरणात आपण राहायचे? आपल्यासमोर आपले वैयक्तीक आयुष्य आहे. डॅडच्या शत्रूंना नेस्तनाबूत करणे हे काही आपले एकमेव ध्येय असू शकत नाही.

डॅड स्वतःही कधी आपल्याला म्हणालेले नाहीत. की हे सगळे नंतर तुला पाहायचे आहे. इन फॅक्ट त्यांनी आपल्याला तसूभरही ट्रेनिंग दिलेले नाही. त्यांचा कधी हेतूच नव्हता की आपण या उद्योगाकडे पाहावे. मग त्यांचे प्लॅनिंग होते तरी काय? त्यांच्या दृष्टीने त्यांचा वारसदार कोण होता? या चौघांपैकी कुणि असणे शक्यच नाही. मग आता आणखीन कोण आहे?

आपल्या लग्नाबाबतही काहीच का बोलायचे नाहीत डॅड! थट्टेत सुद्धा! आपण काय करावे असे त्यांना अभिप्रेत असावे? हवे तितके दिवस इथे राहायचे आणि लग्न झाले की निघून जायचे इतकेच?

लग्न! आपण लग्न का केले नाही? आपले वय पंचवीस आहे. मुली साधारण बावीसाव्या वर्षापर्यंत लग्न करून सासरी जातातही. आपल्याही सर्व क्लासमेट्स गेल्या सासरी! आपला विषय निघाला की सगळ्या म्हणायच्या! अगं ही राणी आहे राणी! हिला काय आपल्या सारखं लग्न करायची गरज थोडीच आहे?

खरच, युवराज्ञीच होतो आणि आहोत आपण!

आपल्याला एक मुलगाही कधी आवडला नाही. इतकेच काय, डॅडनी नुसता उल्लेखही केला नाही की मोना आता तुझे लग्न करायचे आहे. असे का? कोणत्या बापाला वाटणार नाही की आपली मुलगी संसाराला लागावी वेळेवर? त्यांच्या तोलामोलाची कित्येक घराणी भारतात असतील. जातपात आणि धर्माचा प्रश्नच उद्भवणे शक्य नव्हते. मग असे का?

डॅडनी त्यांना आपल्याबद्दल काय वाटते किंवा आपल्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे कुठेही लिहून ठेवले नसेल? बघायला हवे. डॅडचे संपूर्ण कपाट काढून पाहिले पाहिजे.

तेही ठीक आहे.. पण... आपल्याला नेमके काय वाटते आहे? अगदी मनापासून???

जावेसे वाटतेय सगळे सोडून? कुठेतरी मस्त आरामात आयुष्य काढायची इच्छा होती आहे? हेलिक्सच्या व्यापातून एकदाचे बाहेर पडावेसे वाटत आहे??

सुगंधी होत असलेल्या रोमारोमाने जणू सळसळता ध्वनी प्रकट केला...

.... नाही..... नाही..... त्रिवार नाही....

आपल्या धमन्यांमधून रक्त वाहते एका महान उद्योगपतीचे... एका... अचाट साम्राज्य स्थापन करू शकणार्‍या पुरुषाचे.... आपण मोना गुप्ता नाहीत... आपण आहोत मोहन गुप्तांची मुलगी...

... आणि... आजपासून.. या क्षणापासून... जगाला ते समजायला लागेल...

शामाने मगाशीच आणून ठेवलेला टोमॅटो ज्यूस संपला तशी मोना भानावर आली...

तेवढ्यातच खालून फोन आला... साहेब आले आहेत भेटायला...

तो इरफान असणार हे मोनाला माहीत होते... पण आता.. मोहन गुप्तांच्याच मुलीसारखे वागणे अत्यावश्यक होते... बिझिनेसमधला पहिला धडा आपोआपच शिकली मोना... रक्तातच होते म्हणा ते... दुसर्‍याला आपण अत्यंत महत्वाची व्यक्ती वाटणे... हे अत्यावश्यक असते... आणि तितकेच आवश्यक असते ते हे... की दुसरा आपल्याला तितका महत्वाचा वाटत नाही... हे त्याला सतत वाटवत राहाणे...

तब्बल पंधरा मिनीटे मोना टबमधे उगाचच बसून राहिली. शेवटी ताटकळणार्‍या शामाने आत डोकावून 'मॅडम, एक साहेब आलेत खाली' असे स्वत:हून सांगीतले तेव्हा उठली. हू केअर्स? आला तर बसूदेत! ही नीड्स गुप्ता हेलिक्स... गुप्ता हेलिक्स डझन्ट नीड हिम..

शामाची फिकीर न करता मोनाने अजून काही काळ शॉवरखाली काढला. निवांत आवरून ती खाली पोचली तेव्हा इरफानला येऊन पाऊण तास झालेला होता आणि त्याच्या देहबोलीवरून मोनालिसाला समजलेले होते ... की एक म्हणजे तो अत्यंत वैतागलेला आहे आणि दुसरे म्हणजे.. इतका वैतागूनही तो आपल्याकडे पाहून कोणतीही नाराजी व्यक्त करत नाही आहे...

मोना - .... हाय...

इरफान - हल्लो.... हाऊ आर यू????

मोना - व्हेरी वेल...

इरफान - कुणीतरी म्हणाले बरे नाही म्हणून ऑफीसमध्ये गेला नाहीत??

मोना - ... आय वॉज बिझी... एनीवेज... कॅन वुई डिस्कस द प्रपोजल नाऊ??

मोनाच्या या प्रश्नाने इरफानला मनात खूप संताप आला खरे तर! महिना नाही झाला एम डी होऊन, गिअर्समधले ओ का ठो समजत नाही आणि आपल्यासमोर थाट दाखवतीय! म्हणे मी बिझी होते. ही काय करत होती? एक तरी प्रपोजल इव्हॅल्यूएट करता येल का? आणि मुख्य म्हणजे... आपल्याशी अगदी प्रोफेशनल वागायला चाललीय... मग ऑफीसमध्येच भेटायचेस ना? इथे कशाला बोलावले? म्हणे कॅन वुई डिस्कस??

इरफान - शुअर... तर मी तुम्हाला म्हणालो होतो.. की मी तुम्हाला त्या मेल्स दाखवू शकत नाही.. पण शेवटी ते तुमचे वडीलच होते.. त्यामुळे प्रोफेशनल मॅनर्स जराश्या गुंडाळून मी काही करस्पॉन्डन्स आणला आहे तुम्हाला दाखवायला.. यू मे लाईक टू सी दिज मेल्स??

मोनाने अजिबात इच्छा नसल्याप्रमाणे आणि इतर अनेक महत्वाची कामे असल्यावर जसा चेहरा करतात तसा चेहरा करून ती फाईल हातात घेतली...

दहा मिनिटे ती 'फारच अभ्यासपूर्ण वाचन करत आहे' अशा आविर्भावात त्या मेल्स वाचत होती. या सर्व मेल्स तिने आदल्याच रात्री वाचलेल्या आहेत हे इरफानला समजले असते तर त्याचा पांडबा झाला असता हे तिला माहीत होते. मात्र मोहन गुप्तांनी इरफानला लिहीलेली शेवटची, 'तू विश्वास गमावलेला आहेस' ही मेल त्यात अर्थातच नव्हती. दहा मिनिटांनी मोनाने त्या मेल्स बाजूला ठेवल्या आणि इरफानकडे अत्यंत रिकाम्या चेहर्‍याने पाहिले.

इरफान - सो.. धिस इज व्हॉट इट इज...

मोना - हं... ओके...

इरफान - तर... देन हाऊ डू वुई गो अबाऊट... ??

मोना - म्हणजे??

इरफान - आता लॅन्ड वगैरे फायनल झालेली आहे.. लॅन्डचे पेमेंट आणि बॅन्क प्रपोजल या महत्वाच्या बाबींच्या मागे लागायला हवे...

मोना - एक मिनिट... हे प्रपोजल डॅड तुमच्याशी डिस्कस करत होते हे मान्य आहे.. इन फॅक्ट डॅडचा हा इमेल आयडीही मला आजच समजला.. मात्र... आय अ‍ॅम नॉट इन्टरेस्टेड इन धिस कोलॅबोरेशन...

जागच्याजागी तीन ताड उडायचा राहिला होता इरफान! मूर्ख आहे का वस्ताद आहे ही? हिचा बाप कोलॅबोरेशन करायला आतूर होता हे सरळ दिसतंय! आणि त्याच्या पदावर येऊन धड महिना झाला नाही आणि ही म्हणते या प्रपोजलमध्ये इन्टरेस्ट नाही??

इरफान - आय... आय डिडन्ट गेट यू... यू मीन...

मोना - हो ... म्हणजे.. मला व्यक्तीशः या प्रस्तावात काही रसच नाही आहे...

इरफान - का??

मोना - एक्स्क्यूज मी? ... आय... आय अ‍ॅम शुअर आय डोन्ट नीड टू अ‍ॅन्सर धिस क्वेश्चन??

संवादाने भलतेच वळण घेतलेले पाहून इरफान भयंकर निराश झाला होता. ते त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.

इरफान - ओह... सॉरी.. आय मीन.. आय डिडन्ट मीन दॅट...

मोना - .. इट्स ओके...

इरफान - पण.. म्हणजे.. गोष्टी या स्टेजला गेल्यानंतर असा डिसीजन घेण्यामागची भूमिका समजू शकेल का मला??

मोना - वेल.. अगेन.. आय डोन्ट थिन्क आय नीड टू एक्स्प्लेन दॅट.. बट.. डॅड तुमच्याशी इतके बोलले होते... तर तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही तशी... या कोलॅबोरेशनमध्ये तुमचा सहभाग फक्त तांत्रिक सहाय्यापुरता आहे....

इरफान - तांत्रिकच कोलॅबोरेशन आहे...

मोना - एक मिनिट... लेट मी फिनिश....

इरफान - सॉरी.......

मोना - हे तंत्रज्ञान आम्हीही आणू शकतो...

आत्ता इरफानला समजले. मुलगी मुर्खच आहे. वस्ताद वगैरे नाही.

इरफान - सॉरी... पण मला मध्ये बोलायलाच हवे आहे...

मोना - बोला...

इरफान - आपण हे तंत्रज्ञात आणू शकता हे खरे असले तरीही आज आय सी च्या नावाला महत्व आहे... आय सी ने भारतातील एलेकॉन, ग्रीव्ह्ज आणि सिम्प्लेक्स या तीन कंपन्यांचे सेट अप पाहिलेले आहेत त्याच बरोबर गुप्ता हेलिक्सचाही! त्या तीनही कंपन्यांनी आम्हाला सहकार्य करायची तयारी दाखवण्याचे मुळ कारणच हे आहे की आम्ही जगभरात सर्वोत्कृष्ट गिअर्स बनवणारे म्हणून प्रसिद्ध आहोत.. जगातील मार्केटच्या एक दशांश भाग एकट्या आय सी कडे आहे... जगभरात आमची विविध कंपन्यांशी कोलॅबोरेशन्स ऑलरेडी झालेली आहेत.. अशामध्ये .. आम्हाला भारतातील ऑटो सेक्टर खुणावत असल्यामुळे आधी आम्ही इथे स्वतःच येणार होतो... पण उगाच स्पर्धा वाढवण्यापेक्षा एक कोलेबॉरेशन केले तर दोन्ही पार्ट्यांचा फायदा होतो हा आजवरचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही हा प्रस्ताव मांडला.. म्स्टर गुप्तांनी यात अत्यंत रुची दाखवण्याचे कारणच हे होते की आय सी चे नावच इतके प्रभवशाली आहे की नावावर बिझिनेस मिळतात... जसे गुप्तासाहेबांच्या नावावर आज गुप्ता हेलिक्स आहे तसेच आयसीचेही आहे. आम्हाला तुम्ही प्रस्ताव नाकारलात तर इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तुम्हाला जगप्रसिद्ध अशा कंपन्यांचे फारसे पर्याय उपलब्ध नसावेत असा माझा अंदाज आहे. खरे तर ग्रीव्ह्ज आणि एलेकॉन यांनी स्वतःहून आमच्याकडे तशी विचारणा केल्यामुळेच आमच्या डोळ्यात भारतातील मार्केट भरले. हे जे मी सांगत आहे ते तुमच्यावर प्रभाव पडावा म्हणून नसून वास्तव सांगत आहे. तसेच, तुमच्याकडे इतर सर्व रेंज उपलब्ध असल्यामुळे आम्ही तुमच्याशी फक्त क्राऊन अ‍ॅन्ड पिनियन डिफरन्शीअल गिअर्सबाबतच करार करणार आहोत.. यातून खरे तर तुमचे प्रॉफिट्स प्रचंड वाढणार आहेत... असे गिअर्स बनवणार्‍या आत्ता स्थानिक पातळिवर दोनच कंपन्या आहेत.. पुण्याचीच ग्रीव्ह्ज आणि कलकत्याची एलेकॉन... मात्र त्यांना आमच्या नावाखातर आमच्याशी करार करायची इच्छा आहे... म्हणून मी म्हणतो... असा तडकाफडकी निर्णय घेण्याआधी एकदा हवे तर तुमच्या पार्टनर्सशीही बोलून घ्या... मोनालिसा ... या प्रस्तावावर गुप्तासाहेबांबरोबर मीही खूप काम केले होते... आपण असा निर्णय घेण्यामुळे मला व्यक्तीशः खूप निराश झाल्यासारखे वाटेल.. मात्र... केवळ मी निराश होऊ नये म्हणून मी तुम्हाला आग्रह करत नसून हा प्रस्ताव खरोखरच उत्तम आहे हे माहीत आहे म्हणून आग्रह करत आहे...

लतिकाने प्लेन ताकाचे ग्लासेस समोर आणून ठेवले. जेवण तयार असल्याचेही सांगीतले.

मोना - हॅव बटरमिल्क...

इरफान - थॅन्क्स..

दोघे जेवायला आत गेले. जेवतानाही मोना त्याला फक्त 'हे घे, ते घे' इतकेच म्हणत होती. जेवण झाल्यावर पुन्हा बाहेर येऊन बसल्यावर इरफानने 'आता जायला हवे मला' असे वाक्य उच्चारले तेव्हा मोना म्हणाली...

मोना - तुम्हाला एवढे सगळे माहीत आहे तर... आणखीन एक माहिती मला हवी आहे...

इरफान - येस??

मोना - डॅडनी हे सगळे पार्टनर्सपासून का लपवले???

इरफान - ओह... ते मला माहीत नाही.. पण.. बहुधा त्यांना.. स्वतंत्रपणे हे करायचे होते...

मोना - ओके...

इरफान - म्हणून म्हणतोय... हे त्यांचे स्वप्नही होते... आपण..

मोना - मी विचार करते...

हस्तांदोलन करून इरफान बाहेर पडला आणि मोनाने मस्त झोप काढायची ठरवली. पण घड्याळात पाहिले आणि... ताडकन नवीन नियुक्त केलेल्या संजय नावाच्या ड्रायव्हरला हाक मारली.

मुंबईला निघायलाच हवे होते. साडे तीन वाजले होते. साडे चारला निघाले की सात वाजता सुबोधच्या घरी पोचू. आज सगळे घरच्या लोकांसारखेच लोक जेवायला असल्यामुळे मोनाने खरे तर पार्टीसाठी असलेल्या पंजाबी सूट्सच्या भल्यामोठ्या कप्यातून चार पाच सूट्स बाहेर काढून पाहिले.. पण.. मग अचानक तिने विचार केला... शी हॅड टू लूक लाईक अ बॉस टू...

.... हे लांबसडक केस?? हे आता कापुन टाकूयात... बॉयकट विल बी फाईन.. मॅक्सिमम शोल्डर कट... आय मस्ट गेट रिड ऑफ लॉन्ग हेअर... मैत्रीणी किती जळायच्या आपल्यावर... केस लांब असल्यामुळे....

बट... टूडे?? टूडे व्हॉट शॅल आय वेअर??

सारी?? अंहं.... वेळ जाईल..

सो व्हॉट?? गुप्ता हेलिक्से'स एम डी मस्ट बी सो बिझी दॅट शी मस्ट गेट लेट... हा हा हा हा!

जवळपास तासभर शामाच्या मदतीने मोनालिसा स्वतःचे आवरत होती. सायराच्या जागी आता कुणाला तरी नेमायलाच हवे होते. ही शामा होती एक तर वयाने जास्त आणि अडाणी! हिला काय त्रास द्यायचा उगाच??

साडेचारच्या ऐवजी साडेपाच वाजता कोरेगाव पार्कच्या एरियातून एस क्लास मर्सिडीझ बाहेर पडली तेव्हा...

.... अकरा हजार रुपयांची साडी नेसून गुप्ता हेलिक्सची वेगात बुद्धीमान होणारी सम्राज्ञी... आजच्या मीटिंगमध्ये काय करायचे याचा संपूर्ण प्लॅन मनात केव्हाच आखून खिडकीतून बाहेर पाहात होती...

===============================================

"देअर इज अ गाय... कॉल्ड इरफान ऑर समथिन्ग... फ्रॉम आय सी गिअर्स... वॉन्ट्स टू मेक कोलॅबोरेशन विथ अस... आय सेड व्हॉट नॉन्सेन्स... "

अर्देशीर, लोहिया, जतीन आणि सुबोध यांच्या हातातील ग्लासेसवर आपला ग्लास किणकिणवून चीअर्सची आरोळी दुमदुमल्यानंतर दहा मिनिटांनी अचानक मोनाने हे वाक्य टाकले.

बर्‍यापैकी हादरलेच सगळे!

आपणच प्लॉट केलेल्या माणसाला मोहन स्वतःचा गुप्त मित्र समजत होता आणि आय सीच्या कोलॅबोरेशनमागे लागला होता हे या अल्लड मुलीला माहीतच नसल्यामुळे हिने हे विधान केलेले आहे हे लक्षात आल्यामुळे अर्देशीर तर थबकलेच होते. आज दुपारीच इरफानचा लोहियांना फोनही आला होता मोनाशी त्याची भेट झाल्यानंतर! दुपारच्या भेटीत काय झाले ते या चौघांनाही माहीत होते. प्रश्न इतकाच होता की मोहन गुप्तांनी ते सिक्रेट ठेवले म्हणून ही पण ठेवणार असेल तर आपण स्वतःहून कसे बोलणार??

मात्र आता सगळ्यांनाच एक स्टॅन्ड घ्यायला लागणार होता. सगळ्यांच्या दृष्टीने मोना अत्यंत मूर्ख होती.

आत्ता तरी असाच स्टॅन्ड घ्यावा लागणार होता की ही साली एक नवीनच बातमी आहे की?

अर्देशीर - आय सी?? यू गॉट अ‍ॅन ऑफर फ्रॉम आय सी???

मोना - ऑफर?? आय डोन्ट नो.. डॅड वॉज प्रॉबेबली टॉकिन्ग टू देम...

अर्देशीर - लोहिया?? मोहन बोलला होता तुला??

लोहिया - छे?? बट.... आय सी... आय सी इज.. आय मीन.. एक्स्ट्रीमली रेप्युटेड......

अर्देशीर - आय नो दॅट... आय मीन... मोनालिसा?? काय म्हणाला तो माणूस???

मोना - कसले तरी डिफरन्शीअल गिअर्स का काय ते बनवायला टेक्निकल कोलॅबोरेशन करणार म्हणत होता... आय थिन्क डॅड हॅड गॉन मच अहेड इन दॅट मॅटर.... कारण त्याने काही इमेल्सही दाखवल्या... तुम्हाला कुणाला त्यांनी सांगीतलेच नव्हते असे तो म्हणत होता... मला काही ते पटले नाही.. मी का म्हणून विचारले तर म्हणे डॅडना काहीतरी स्वतंत्रपणे करायचे असावे म्हणे... असे कसे करतील डॅड?? ... आणि मला तरी त्यात लपवण्यासारखे काहीही वाटत नाही... अंकल.. एनी आयडिया व्हाय डॅड वुड हॅव नॉट टोल्ड यू ऑल अबाऊट दॅट??

लोहिया - वेल... अ‍ॅक्च्युअली मला एक दोनदा म्हणाले होते ते... की काहीतरी कोलॅबोरेशनबाबत चर्चा चाललेली आहे... पण... आमच्या तिघांमध्ये असा दंडक होता की... जोपर्यंत.. मोहन आम्हाला काही सांगत नाहीत तोपर्यंत ते काम ते स्वतःच हॅन्डल करणार असायचे आणि आम्ही त्यात पडायचे नसायचे... अ‍ॅक्च्युअली... गुप्ता हेलिक्सच्याही अनेक बाबतीत असे झालेले आहे... याचे कारण असे असायचे की ही नेव्हर वॉन्टेड टू मेक अस टू बिझी इन एव्हरीथिन्ग... ही वॉन्टेड अस टू फोकस ऑन द कोअर बिझिनेस... नाहीतर मग प्रायॉरिटीजचा गोंधळ होतो... शेवटी आपले जे ब्रेड बटर आहे त्याची काळजी सर्वात महत्वाची...

मोना - मी म्हणाले त्या माणसाला... विचार करते म्हणून...

अर्देशीर - बेटा?? विचार कसला?? इफ आय सी इज जॉइनिंग हॅन्ड्स इट इज अवर मोस्ट इम्पॉर्टन्ट स्टेप इन बिझिनेस...

मोना - ओह... मला काही माहीतच नाही आहे... आय शुड हॅव डायरेक्टेड हिम टू यू....

अर्देशीर - नो नो... पण... कोणत्या पातळीपर्यंत डिस्कशन झालेलं होतं???

मोना - मी नीट वाचलंही नाही ते... काहीतरी चाकणला जागा ठरवत होते बहुधा...

अर्देशीर - प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे काही अंदाज???

मोना - खरं सांगू का अंकल?? मी त्या माणसाला तितकं सिरियसली घेतलंच नाही... पण बोलता बोलता तो म्हणून गेला... काहीतरी एकशे तीस कोटी वगैरे...

लोहिया - दॅट्स व्हेरी स्मॉल... मग हरकत काय आहे अर्देशीर???

अर्देशीर - हरकत??? मी तर म्हणतो आत्ता त्याला फोन लावून उद्याची वेळ मागायला हवी.. मला सांग मोना.. मोहन या प्रस्तावाला फॉर होता ना???

मोना - असं दिसतंय खरं... पण.. ज्या अर्थी त्यांनी ते तुम्हाला सांगीतलं नाही त्या अर्थी त्यांचं खरच काही ठरलं होतं की नव्हतं ते समजत नाही मला...

अर्देशीर - नाही नाही.. तसं नाही.. तो भारतात आहे की गेला??

मोना - मी विचारलं नाही... पण बहुधा असावा...

अर्देशीर - नंबर आहे???

मोना - घरी आहे त्याचं कार्ड... सुबोध.. घरचा नंबर लावून दे ना जरा....

सुबोध - शुअर...

मोनाने घरी कुणालातरी इरफानचा नंबर वगैरे विचारण्याचं नाटक केलं. लगेच तो नंबर अर्देशीरांना दिला...

अर्देशीरांनी इरफानशी प्राथमिक बोलणी केल्यासारखी दाखवून उद्याची वेळ ठरवलीही!

आणि आता सुबोधकडच्या पार्टीला प्रचंड उन्माद मिळाला.

जतीन आणि सुबोध फारच खुष झाले होते. मधूनच लहानपणची आठवण असल्यामुळे जतीन मोनाची थट्टा करून म्हणत होता...

"या ध्यानाने आय सी ला दिलं असतं हाकलून..."

ब्लॅक लेबलचा दुसरा पेग चालू असल्यामुळे मोनानेही जरा 'मूड'मध्ये असल्याप्रमाणे फुरंगटून वगैरे 'मलाही लहानपणच्या तुझ्या खोडसाळ स्वभावाची आठवण आहे' हे सिद्ध करून दाखवलं!

अर्देशीर आणि लोहिया मात्र इरफानबरोबर काय काय बोलायचं यावर चर्चा करत होते आणि मोनाचे खरे तर संपूर्ण लक्ष त्यांच्याच बोलण्याकडे होते पण ती ते दाखवत नव्हती.

जवळपास बारा पंधरा मिनिटांनी अर्देशीर आणि लोहिया पुन्हा ग्रूपमध्ये आले.

लोहिया - बेटा.. वुई हॅव डिसायडेड टू गो अहेड.. कारण आपल्याला इतकी सुवर्णसंधी पुन्हा लाभेल की नाही माहीत नाही...

मोना - अंकल.. मला त्यातलं फारसं समजत नाही.. पण मला इतकंच कळतंय की एक रेप्युटेड कंपनी आपल्याशी सहकार्य करायला तयार आहे आणि डॅडनाही ते करायची इच्छा होती... तुम्हालाही सगळ्यांना तेच वाटतंय.. अर्थातच आपण सर्वांनी ते करायला हवंच.. कारण ते खूप महत्वाचं ठरेल.. होय ना??

लोहिया - अर्थात... बेटा... त्यासाठी ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्याबाबत मी तुझ्याशी आत्ताच बोलतो... कारण आता तू रात्री परत पुण्याला जाशील.. आता समोरासमोर सगळेच आहोत तर आत्ताच ते ठरवलेले चांगले...

मोना - ... येस अकल???

लोहिया - हे पहा.. आपल्याला... बेसिकली.. गुप्ता हेलिक्सवर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही आहे.. मात्र... या १३० कोईच्या प्रोजेक्टमध्ये बॅन्कचे फंडिंग साधारण ९५ ते १०५ कोटींचे होईल.. बाकीचे डिपॉझिट्स आपल्याला रेडी करायला हवीत... त्या दृष्टीने निर्णय घ्यायला पाहिजेत आज...

मोना - ... राईट अंकल...

लोहिया - त्यामुळे.. गुप्ता हेलिक्समधून काही पैसा आपल्याला तिकडे डायरेक्ट करावा लागेल...

मोना - .. अच्छा...

लोहिया - साधारण.. वीस ते पंचवीस कोटी...

मोना - ठीक आहे...

लोहिया - .. तर... अशा सर्व ट्रॅन्झॅक्शन्समध्ये तुझा रोल मोठा राहील...

मोना - .... माझा??? .... का???

लोहिया - एक तर तू पुण्यात आहेस... कंपनीच्या सर्वोच्च पदावर आहेस... आपल्या कंपनीचा बॅन्केसमोर असलेला चेहरा तूच आहेस...

मोना - अंकल..

मोनाचा खूपसा बावरलेला चेहरा पाहून लोहियांना खरे तर मनातून उकळ्या फुटत होत्या. सगळ्यांनाच! पण आत्ता चेहरे अगदी मोनालिसाला प्रचंड आधार देणारे करावे लागणारच होते.

मोना - अंकल.. मी काय म्हणते?? ...कॅन.. कॅन आय बी.. अवे फ्रॉम ऑल धिस???

खूप मोठ्ठी उडी मारावीशी वाटत असावी आनंदाने.. पण प्रसंगाचे गांभीर्य माहीत असल्याने मारता येत नसावी तसे चार चेहरे होते मोनाच्या आजूबाजूला....

लोहिया - म्हणजे???

मोना - मी तर उलटं वेगळंच म्हणतीय....

लोहिया - काय???

मोना - मला.. गुप्ता हेलिक्सचाच बिझिनेस अजून नीटसा समजला नाही आहे... माझं.. म्हणजे मला असं वाटतंय की... आय सी बरोबरचा प्रस्ताव अर्देशीर सरांनी इन्डिव्हिज्युअली हॅन्डल करावा... म्हणजे.. गुप्ता ऐवजी... अर्देशीर यांनी स्वतः एक स्वतंत्र कोलॅबोरेशन करावे.. सुरुवातीच्या फंडिंगसाठी हेलिक्सचे त्यांचे शेअर्स आणि हेलिक्सकडचे कॅपिटल असे वापरावे... नंतर नंतर हेलिक्सचे कॅपिटल त्यांनी परत करावे जमेल तसे... या सगळ्याचे कारण काय आहे माहीत आहे का? एक नाही.... अनेक कारणे आहेत.. अर्देशीर सरांचा अफाट अनुभव आज हेलिक्समध्ये वापरलाच जात नाही आहे.. कारण हेलिक्सचा बिझिनेस स्थिरावलेला आहे... ते उगीचच त्रास करून घेत असतात.. दुसरे म्हणजे.... समजा हेलिक्सला त्या कोलॅबोरेशनमध्ये घतलेले पैसे नको असतील तर हेलिक्सचाही शेअर राहीलच की त्यात?? प्रॉफिट्स शेअर होतीलच... तिसरे म्हणजे... अर्देशीर हेलिक्सच्या मार्गदर्शनासाठी कायम उपलब्ध असतीलच... आणि... सर्वात महत्वाचे म्हणजे... मला... मला डॅडचे एक ... खूप जुने पत्र मिळाले अंकल.. खरे तर ते पत्र मिळालेच नसते मला... पण.. डॅड गेल्यावर मी त्यांचे सर्व जुनाट सामानही काढले त्यात मिळाले.. ... त्यांनी.. बहुतेक ते सुबोधच्या बाबांना... म्हणजे माझ्या काकांना लिहीले होते... त्यावर त्यांची सही होती पण.. हेलिक्सचा स्टॅम्प नव्हता.. त्यांनी लिहीले होते.. अर्देशीर आणि लोहिया जीवापाड मेहनत करून उभा करत असलेला हा बिझिनेस मी माझ्या मुलीला एकटीला देणे मला शोभायचे नाही.. आय अ‍ॅम सॉरी सुबोध.. हे मी सांगीतले नसतेही कदाचित.. त्यात डॅड पुढे म्हणाले होते... सुबोधला मी फार तर माझ्या एखाद्या नवीन बिझिनेसचा हेड करेन... पण.. बिझिनेसचे तीन भाग होणारच.. अर्देशीर.. लोहिया .... आणि गुप्ता... त्यामुळेच... मी निम्मा भाग वडिलांच्या इच्छेप्रमाणे तुला देऊ शकत नाही.. मी कायद्यानेही तो तुला देऊ शकत नाही.... कारण त्यांच्याकडेही शेअर्स आहेतच... अर्थात... माझा अर्धा भाग मी तुला जरूर देऊ शकतो...पण... सुबोधने स्वतःला प्रूव्ह केले तरच... आणि सुबोधला स्वतःचे पोटेन्शिअल प्रूव्ह करता यावे म्हणून मी त्याला सुरुवातीला माझ्या बिझिनेसमध्ये घेईन... सुबोध... काकांचे आणि डॅडचे काही झाले असले तरीही आपल्या दोघांमध्ये त्याचे पडसाद नको हं यायला? ... आपले एकमेकांवर प्रेम आहे तसेच असूदेत... लोहिया अंकल... डॅडची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून.. तुम्ही किंवा अर्देशीर सर हे कोलॅबोरेशन स्वतंत्ररीत्या हॅन्डल करावेत असे मला वाटते... मात्र... हेलिक्सला आत्ता तुमची नितांत गरज आहे... आणि अर्देशीर सर थोडेसे फ्री आहेत... म्हणून त्यांनी ते हॅन्डल करावे असे मी म्हणाले... प्लीज.. करेक्ट मी इफ आय म रॉन्ग....

छप्पर फाडके याचा अर्थ आज समजला चौघांना! मात्र ते दाखवता येत नव्हतं हा प्रॉब्लेम होता.

त्या चौघांचा प्लॅन वेगळाच होता. इरफान हा अर्देशीरांच्या जवळचा कुणीतरी होता. तो आय सी मध्ये स्वतःच्या गुणवत्तेवर लागला हे खरे असले तरीही अर्देशीरांशी त्याचे संबंध जवळचे असल्यामुळे हेलिक्समध्ये इरफानची लुडबुड होऊ शकली. नेमका तो एशियन विन्गला आल्यामुळे ते आणखीनच शक्य झाले.

पाच जणांनी केलेला प्लॅन फार भयंकर होता. जवळपास एकशे तीस कोटीच्या या प्रस्तावात बॅन्केचा भाग १०० कोटींच्या आसपास असणार होता. तीस एक कोटी गुप्तांनी त्यात स्वतःचे ओतायचे होते. म्हणजे एक तर हेलिक्समधून किंवा शेअर्स विकीन! शेअर्स त्यांनी कधीच विकले नसते. म्हणजेच हेलिक्समधून! तसे करताना अर्देशीर आणि लोहियांनी खूप मानसिक आधार द्यायचा होता गुप्तांना! आणि मग जागा, इमारत व मशीनरी हे सगळे व्हायला जवळपास एक वर्ष गेलं असतं! कारखाना सुरू व्हायला साधारण दिड वर्ष! तोपर्यंत आय सी ने फार स्मूथ स्टॅन्ड घ्यायचा! आय सी ची पॉलिसी जरी एकटा इरफान ठरवू शकत नसला तरी केवळ कागदोपत्री आणि सेफ अशी अ‍ॅग्रीमेन्ट्स करणे त्यला निश्चीतच शक्य होते. पैसा सगळाच हेलिक्सचा असणार होता.

आणि कारखाना सुरू व्हायच्या आधी सर्व ऑटॉ वाल्यांना इरफान आणि हेलिक्सच्या स्टाफने स्वतः भेटून प्रोजेक्शन्स घ्यायची होती. आणि उत्पादन सुरू झाल्यानंतर दर्जाबाबत हजारो कारणे दाखवून केवळ चार, सहा महिन्यात कोलॅबोरेशन गुंडाळायचे होते.

हे सगळे करणे इरफानला शक्य नव्हते. त्यामुळे बरेचसे कागद जवळपास फायनल स्वरुपाचेच करायचे ठरले होते.

कोल्बोरेशन गुंडाळल्यानंतर त्याची आय सी जाहिरात करणार होती भारतभर! गुप्ता हेलिक्सने कसे दजाहीन काम केले याची! आपोआपच, क्राऊन अ‍ॅन्ड पिनिअन डिफरन्शीअलचा बिझिनेस गुप्ताला मिळणे बोंबलणार होते. आणि एकशे तीस कोटी उरावर घेतल्यानंतर गुप्तांना एक तर हार्ट अ‍ॅटॅक तरी आला असता किंवा त्यांनी आत्महत्या तरी केली असती किंवा रस्त्यावर तरी आले असते.

हे सगळे मोनाला माहीतच नव्हते. तिला इतकेच समजत होते की अर्देशीर आणि लोहिया इरफानला आधीपासुनच ओळखतात कारण त्यांचा फोटो आपल्याकडे आहे आणि इरफान विश्वासघात करणार होता हे डॅडना माहीत होते. त्यामुळे तिने यातून अंगच काढून घेण्याचा अत्यंत सुयोग्य निर्णय घेतानाही त्यात भावनिकतेवर आणि स्वतःचे महत्व कमी करून ते दुसर्‍याला चिकटवून एक अत्यंत भयानक गोची करून ठेवलेली होती.

आणि त्या गोचीत अर्देशीरांसारखा याच धंद्यात काळ्याचे अक्षरशः पांढरे केलेला माणूसही अडकत आहे याची चिन्हे दिसत होती.

कारण! जर अर्देशीर यांनी स्वतंत्रपणे कंपनी काढली आणि त्याच्या सुरुवातीच्या फंडिंगमध्ये हेलिक्सचा वाटा असला तर त्यांनी ती कंपनी आणि ते कोलॅबोरेशन बोंबलवू दिलेच कशाला असते? त्यांनी तर उलट त्या संधीचे सोन्यापेक्षाही काहीतरी मौल्यवान करून दाखवले असते. हेलिक्सचे पैसे फटाफटा फिटवून सर्व प्रॉफिट स्वतःच्या घशात घालायचा हेतूच असता त्यांचा!

आणि नेमके तेच लोहिया, जतीन आणि सुबोधच्या मनात येत होते. हे असे झाले तर बहारच येईल! कारण अर्देशीर यांना आपल्याला काही ना काही प्रॉफिट द्यावाच लागेल. आणि तिकडचीही चांदी, इकडचीही चांदी आणि एवढे सगळे करून परत मोनालिसा नवीन असल्यामुळे आपल्याच नियंत्रणात! व्वा!

अर्देशीर - बेटा... तू इतकी लहान असूनही असे विचार करतेस यातच मोहनचे रक्त तुझ्यात आहे हे दिसते.. पण.. मला माफ कर बेटा.. माझे आता वय होत आहे... मला इतके सगळे सोसणार नाही.. या तरुण पोरांनी करायला हवे हे सगळे...

सुबोध - अंकल.. हे शक्य नाही.. तुम्ही असताना आम्ही त्यात हात घालणे योग्य नाही.. हे तुम्हाला केलेच पाहिजे...

लोहिया - अर्देशीर... मोहन यांचे स्वप्न म्हणून तरी???

पुन्हा ती महाकाय खोली आनंदाच्या आरोळ्यांनी दुमदुमली. आता मोनालिसा म्हणजे सगळ्यांची फेव्हरिट झालेली होती.

बर्‍याच गोष्टी ठरल्या.

अर्देशीर यांनी सध्या हेलिक्समधले त्यांचे शेअर्स मोनालाच मार्केट व्हॅल्यूला विकायचे आणि त्यातून उभ्या राहणार्‍या जवळपास साडे सात कोटींची रक्कम बॅन्केला डिपॉझिट द्यायची. कंपनीचे नाव अर्देशीर आय सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असे काहीतरी होऊ शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानंतर मोनाने हेलिक्समधला पैसा, जवळपास बावीस कोटी, नवीन कंपनीकडे वळवायचे. कंपनीला प्रॉफिट मिळू लागला की त्यातून हेलिक्सचा पैसा आपोआप वसूल व्हायला लागणार होता. चाकणची मोहन गुप्तांनी ठरवलेली जागा एकदा जतीन बघणार आणि फायनल करणार! सुबोध आता जर्मनी आणि सिंगापूरच्या सगळ्या ट्रीप्स करणार. कोलॅबोरेशन पुढे ढकलण्याची प्रोसेस त्याच्याकडे! आणि लोहिया... संपूर्ण लक्ष हेलिक्सवर गुंतवणार!

आहाहाहा! स्वप्नेच स्वप्ने!

सिवाशी ठरलेली भेट मोनाने सरळ रद्द केली दुसर्‍या दिवशी पुण्यात येऊन!

एका आठवड्यात अर्देशीरांचे शेअर्स पुन्हा स्वगृही परत आले. मोनालिसा... शी वॉज इव्हन स्ट्रॉन्गर नाऊ.. दॅन हर डॅड हिमसेल्फ...

अर्देशीरांचा पी. ए. झालेला गोरे बघतच बसला समोरच्या पत्रव्यवहाराकडे!

या शेअर्सच्या बदल्यात मिळालेली प्रचंड रक्कम बरीचशी अर्देशीरांनी सेन्ट्रल बॅन्क ऑफ ईंडियामध्ये अर्देशीर इन्जिनीयर्स नावाने खाते उघडून डिपॉझिट केली. त्यातही, त्यातील पावणे दोन कोटी त्यांना टॅक्स द्यावा लागला. हा टॅक्स वाचावा म्हणून काही शासकीय प्रकल्पांमध्ये इन्व्हेस्ट करावे लागणार होते. पण जर टॅक्स पे केला तर 'अर्देशीर आय सी प्रा. लिमिटेड'ला कोणत्यातरी झोनमध्ये दाखवून टॅक्समध्ये काहीतरी सवलत मिळेल असे सल्लागाराने अधिकार्‍यांकडून वदवून घेतले होते. त्याचा परिणाम म्हणून सगळा टॅक्स भरून टाकलेला होत.

आता पंधरा दिवस झाले होते. प्रश्न राहिला होता हेलिक्सने बॅन्केत उरलेले पैसे भरायचा! तिकडे सुबोध एकदा सिंगापूरला तर एकदा सरळ आय सी जर्मनीला जाऊन थडकून आला होता. जतीन चाकणच्या जागेचा व्यवहार करण्यात गुंतलेला होता. लोहिया फुल्ल स्विंगने हेलिक्स पुढे नेत होते.

मेहरा जगातील सर्व मशीन मॅन्यूफॅक्चरर्स बसल्या बसल्याच पिंजून काढत होते. त्यातून त्यांनी मशीन्सचे एक बेस्ट कॉम्बिनेशन सादर केले होते अर्देशीरांना! त्यातील बहुतेक मशीन्स ओकुहामा जपानची होती.

यावेळेस मात्र अर्देशीरांनी ओकुहामाशी डिस्कशन्स चालू केली. याच कंपनीचे रेप्युट खराब आहे असे सांगून त्यांची मशीन्स नाकारून हेलिक्समध्ये शेव्हिंग मशीन्स आणली होती त्यांनी! स्वतःच्या वेळेस मात्र बरोबर ओकुहामा आठवली. ओकुहामानेही अत्यंत चांगला प्रतिसादही दिला.

सोमानी कन्स्ट्रक्शनने आराखडा आणि ऑफर सादर केली. त्या चाकणच्या जागेवर जी फॅक्टरी बांधायची होती तिला जवळपास साडे आठ कोटी रुपये लागणार होते. तिकडे जतीनने जागेसाठी अडीच कोटी रुपये फायनल केले.

आलेल्या साडेसात कोटींपैकी पावणे दोन कोटी टॅक्स, अडीच कोटी जागा आणि एक कोटी सोमानीवाल्यांना दिलेसुद्धा एका महिन्यात अर्देशीरांनी!

इरफानसारखा आनंदी माणूस भूतलावर नसेल! मोनालिसा पाहता पाहता फसलेली होती. इतकेच काय तर अर्देशीरांच्याच हातात नवा बिझिनेस जाणार असल्यामुळे तो आता जॉब सोडून कायमचे इंडियात यायचे स्वप्न पाहू लागला होता. त्याला अर्देशीर हाय पोस्टवर नेमणार होते.

आणि मोनालिसा???

आज बरोब्बर सदतिसाव्या दिवशी ती लोहियांशी बोलत होती फोनवर...

मोना - लिसन टू मी अंकल.. आय थिन्क.. दॅट कुड बी डिलेड अ बिट.. बट.. धिस इज अ प्लॅटिनम अपॉर्च्युनिटी फॉर यू अ‍ॅन्ड मी...

लोहिया -अ अय डू अ‍ॅग्री बेटा... बट... आय मीन... इट विल बी लाइक.. यु नो?? चीटिंग...

मोना - व्हॉट चीटिंग अंकल?? ... वुई आर नॉट हार्मिन्ग दॅट प्लॅन अ‍ॅट ऑल...

लोहिया - नो नो... वुई शूड गो अ‍ॅज पर व्हॉट हॅज बीन अ‍ॅग्रीड बेटा... अ‍ॅन्ड वुई अल्सो नीड टू डिस्कस विथ अर्देशीर ना??

मोना - आय विल टेल हिम... बट टेल मी वन थिन्ग... इफ ही अ‍ॅग्रीज.. देन... आर यू विथ मी??

लोहिया - सी... इफ ही अ‍ॅग्रीज.. देन आय मस्ट टेल यू दॅट धिस इज अ रिअल रिअल रिअल बेस्ट अपॉर्च्युनिटी....

मोना - ओके देन... आय'ल टेल हिम... आय'ल कन्व्हिन्स हिम अंकल...

लोहिया - नो नो.. आय अ‍ॅम स्टार्टिंग फ्रॉम मुंबई राईट नाऊ.. वुई विल डिस्कस धिस अ‍ॅट यूवर प्लेस धिस इव्हिनिन्ग...

'त्या' दिवशी जेव्हा ती मुंबईला निघाली होती.. तेव्हाच तिच्या मनात ते होते.... स्पेनच्या डॅनलाईन इक्विपमेंट्सशी डॅडचा झालेला 'इमेल्स-व्यवहार' तिने पाहिलेला होता आणि त्यांच्याशी नवीन व्यवहार चालूही केला होता...

आणि गेल्या सदतीस दिवसांमध्ये त्यांचे तीन लोक भारतात येऊन तिला भेटून गेलेले होते...

.... गुप्ता हेलिक्सबरोबर त्यांचे एक कोलॅबोरेशन करण्याचे ठरलेले होते... क्लीनिंग इक्विपमेन्ट्स बनवण्याचे... मोठमोठ्या प्लॅन्ट्समध्ये लागणारी मशीन्स होती ती... स्वच्छता करण्याची.. रस्त्यवरून फिरवली की रस्ते स्वच्छ! विशाखापट्टणम स्टील प्लॅन्टशीही मोनाचे बोलणे झाले होते... त्यांनी अशी तीन मशीन्स घेण्यात रस दाखवलेला होता... कारण त्यामुळे प्रचंड मॅनपॉवर सेव्ह होणार होती...

आणि हे सगळे तिने त्या चौघांना न सांगताच ठरवलेले होते...

... त्यादिवशी तिच्या घरात डिनरला सगळे जमले. अर्देशीरांना हे सगळे मुंबईहून फोनवरच लोहियांनी सांगीतलेले असल्याने ते हादरलेलेही होते आणि भयानक चिडलेलेही होते... मात्र आत्ताही त्यांचा चेहरा 'जणू रक्तातच गुप्ता हेलिक्स आहे' असाच होता...

जॅक डॅनियल्सचे तीन पेग भरले गेले...

... आज सायराला खास सर्व्हिस मॅनेज करण्यासाठी बंगल्यावर बोलावले होते मोनाने... त्यात आणखीन एक हेतूही होता... मॅडम आपल्या किती पुढे पोचलेल्या आहेत हे तिला एकदा समजायलाच हवे होते.. बंगल्यात राहून, इथलंच खाऊन ती डॅडशी प्रामाणिक नव्हती... याचा मोनाला भयानक राग होता खरे तर...

लोहिया - बेटा... व्हॉट इज ऑल धिस????????

मोना - प्लीज अंकल.. ट्रस्ट मी.. धिस इज फॉर एव्हरीवन्स बेनिफिट...

अर्देशीर - हाऊ ऑल धिस स्टार्टेड बट??

मोना - डॅड हॅड डिस्कस्ड विथ देम... दे अ‍ॅप्रोच्ड अगेन... आय सेड डॅड पास्ड अवे... पण.. त्यांनी प्रेझेंटेशन दिले.. भारतातील नवीन उदयास येत असलेल्या कायद्याप्रमाणे अशी मशीन्स जर असली तर ते फारच उपयोगी पडणार आहे हे स्पष्ट दिसते आहे...

अर्देशीर - नो नो.. बट... आय मीन.. व्हाय डिड यू नॉट कन्सल्ट अस???

मोना - कन्सल्टच करतीय अंकल.. त्या आधी मी फक्त अभ्यास केला त्याचा...

अर्देशीर - देन यू मस्ट नो.. दॅट वुई हॅव गॉन अहेड विथ आय सी... दॅट इज अवर फिल्ड अल्सो... दोज क्लीनिंग इक्विपमेंट्स आर नॉट अवर काईंड ऑफ बिझिनेस... अ‍ॅन्ड मोस्ट ईंपॉर्टन्टली... व्हॉट इस ऑल धिस सडनली?? आय मीन.. द न्यू कंपनी विल बी इन सूप....

मोना - नो अंकल.. फक्त सहा महिने...

अर्देशीर - मोना...

आता अर्देशीरांचा आवाज चढलेला होता.

मोना - लोहिया अंकल.. तुम्ही सांगा... अर्देशीर सरांचे आपण यात काही नुकसान करतो आहोत का??

लोहिया - जरी ते नुकसान नसले ना बेटा...

खटकन अर्देशीरांनी लोहियांकडे पाहिले..

लोहिया - तरीही जे ठरले आहे ते ठरले आहे ना?? हे मध्येच कसे काय आले??

अर्देशीर - नुकसान नाही म्हणजे काय??

लोहिया - एक मिनिट अर्देशीर.. मी तिला सांगतोय ना??

मोना - वन गिअरब्क्स गिव्ह्ज अस अ‍ॅव्हरेज वन अ‍ॅन्ड हाफ लॅख मार्क अप.. वन क्लीनिंग इक्विपमेन्ट विल गिव्ह अस फाईव्ह अ‍ॅन्ड अ हाफ लॅख प्रॉफिट ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज.. नाऊ टेल मी... व्हॉट इज राईट फ्रॉम बिझिनेस पॉईंट ऑफ व्हिव्ह??

अर्देशीर - एक सेकंद... तुला हे समजत नाही आहे का? की आय सी बरोबर आपण किती पुढे गेलेलो आहोत??

मोना - नाही पण आपण त्यांना कोलॅबोरेशन फीचा पहिला हप्ता देऊयात ना?? माझं इतकंच म्हणणं आहे की बांधकाम फक्त सहा महिने पुढे न्यायचं आहे...

अर्देशीर - का पण?? आय मीन?? ही तुझी जी डॅनलाईनची आयडिया आहे ती नाही का पुढच्या फायनान्शिअल इयरमध्ये बघता येत?? आणि आत्ता अर्जन्सी कशाची आहे हे समजत नाही का तुला?? हे बघ! तू अजून लहान आहेस... यू डोन्ट सीम टू अन्डरस्टॅन्ड द प्रायॉरिटीज... आय सी इज अवर टॉपमोस्ट अर्जन्सी...

मोना - नो.. आय डोन्ट थिन्क सो...

मोनाचा तो अवतार दोघांनाही नवीनच होता. त्या स्वरात अधिकार होता. आणि तो सहन न होणाराच असणार होता अर्थातच!

अर्देशीर - मोनालिसा... आय... आय अ‍ॅम सरप्राईझ्ड... हाऊ कॅन यू डू धिस?? आय मीन... आपण आत्ता कोणत्या वळणावर पोचलो आहोत...

मोना - तुम्ही माझं पूर्ण ऐकून घेतलंत आणि काही वेळ विचार केलात तर तुम्हालाही पटेल.. पण... जरा त्रयस्थपणे विचार करणे मात्र आवश्यक आहे... डॅनलाईन थांबू शकत नाही आहे कारण त्यांना इथून इतरांच्या एकंदर सहा ऑफर्स गेलेल्या आहेत... आपली ऑफर सर्वात बेस्ट आहे...

अर्देशीर - तू ती ऑफरही डिस्कस केलेली नाहीस करायच्या आधी...

मोना - ऑफर डॅडनीच दिली होती त्यांना...

अर्देशीर - लोहिया.. मोहन नेव्हर युझ्ड टू डिस्कस ऑल दिज थिन्ग्ज...

लोहिया - एक मिनिट... हिचं आधी मला ऐकुदेत...

मोना - तर ती ऑफर सगळ्यात चांगली वाटली त्यांना... आणि त्याची फी म्हणून आणि इतर कामे, जसे जागा, बांधकाम वगैरेसाठी आपल्याला पुढील सहा महिन्यात किमान सोळा कोटी रुपये लागणार आहेत... हे आत्ता या क्षणी फक्त आणि फक्त हेलिक्समधूनच येऊ शकतात... माझे किंवा लोहिया अंकलचे शेअर्स विकून त्यापेक्षा बरीच जास्त रक्कम येईल.. पण... शेअर्स कुणीच विकणे शक्य नाही....

अर्देशीर - मी नाही विकले??

मोना - अंकल तुम्ही ते मलाच विकलेत.. आणि ते तुम्हीही अशाच एका नव्या प्रपोजलसाठी विकले आहेत... आणि ते प्रपोजल अजूनही तितकेच व्हॅलीड आहे...

अर्देशीर - धिस इस शीअर नॉन्सेन्स...

मोना - हाऊ इज धिस नॉन्सेन्स??? लोहिया अंकल.. मला एका बिझिनेसमनच्या दृष्टीकोनातून सांगा... आय सी च्या नव्या प्लॅन्टमध्ये बावीस कोटी गुंतवणे आणि डॅनलाईनच्या नवीन प्लॅन्टमध्ये फक्त सोळाच कोटी गुंतवणे... आणि आय सी प्लॅन्टमधून वीस टक्के प्रॉफीट म्हणजे वर्षाला साधारण बारा कोटी मिळणे आणि डॅनलाईनमधून एकाच वर्षात साठ ते पासष्ट कोटी मिळणे यातील सेन्सिबल काय आहे???

लोहिया - ...................... डॅनलाईन...

अर्देशीर आता अक्षरशः धक्का बसून आणि खुनशीपणे लोहियांकडे पाहात होते...

अर्देशीर - असं??? डॅनलाईन?? ओक्के... फाईन... मग ... माझाही एक प्रस्ताव आहे... माझे सगळे शेअर्स मला परत द्या.. आणि डॅनलाईनच्या युनिटमधून द्या...

मोना - असं कसं?? फर्स्ट ऑफ ऑल समवन शूड बी रेडी टू सेल यूवर शेअर्स बॅक टू यू...

अर्देशीर - म्हणजे काय???

मोना - मी तुमचे घेतलेले शर तुम्हाला विकायला नकोत का पुन्हा??

लोहिया - बेटा.. असं कसं बोलतेस???

मोना - अंकल.. मगाचपासून इतके रिजिडली वागतायत अर्देशीर सर... मी काय त्यांचे वाईट पाहते का?? ते माझ्या वडिलांसारखे आहेत... तुम्हीही... मला सांगा... हेलिक्स - डॅनलाईन च्या प्रस्तावात माझे काय चुकले?? एवढे करूनही मी शब्दाला जागतीय... आय सी च्या प्रस्तावात ठरल्याप्रमाणे मी सगळे बावीस कोटी घालणार आहे... फक्त मला थोडा अजून वेळ हवाय... सहा महिने...

मोना आता हुकुमी मुसमुसू लागली होती. अर्देशीर आता आणखीनच चिडले होते.

अर्देशीर - सहा महिने ते का थांबतील????

मोना - कारण आपण त्यांची फी भरणार आहोत रेग्युलर...

अर्देशीर - सो व्हॉट??? त्यातून... मला काय मिळणार???

मोना - बघितलंत अंकल??? ... ही वॉज... ही वॉज थिन्किन्ग अबाउट हिज ओन थिन्ग्ज... मी तुम्हाला हेच म्हणत होते मगाचपासून.. का नाही सहा महिने तुम्ही थांबू शकत?? ज्या हेलिक्ससाठी आजवर तुम्ही रक्त आटवलंत.. त्या हेलिक्सने तुम्हालाही सगळे काही दिलेच ना?? मग त्या हेलिक्सच्या प्रगतीसाथी फक्त सहा महिने का नाही थांबत??

लोहियांना आता डॅनलाईनमधून त्यांना स्वतःला मिळू शकणारा फायदा दिसू लागला होता. त्यातहि अर्देशीर नाहीच त्या इक्वेशनमध्ये! त्यांच्यातील स्वार्थ आता पूर्ण जागा झाला होता.

लोहिया - अर्देशीर... हे आपल्या सगळ्यांच्याच भल्याचं आहे...

अर्देशीर - द हेल विथ सगळ्यांचं भलं... यू गाईज आर ... यू आर... वन.... एक आहात तुम्ही दोघेही... अ‍ॅन्ड यू वॉन्ट टू गेट रिड ऑफ मी... मला मारून टाकायचंय तुम्हाला...

जॅक डॅनियल्सचे तीन पेग्ज आणि विरुद्ध जाणारी परिस्थिती यामुळे अर्देशीर अक्षरशः ऑफ झाले.

या वयातही ते कर्कश्शपणे किंचाळत होते. सर्व्हीस देणारी सायरा हबकून या संवादाकडे बघत होती.

आणि अर्देशीरांच्या वरताण लोहिय ओरडले.

लोहिया - मी तुमचे वाईट पाहतो?? हजार वेळा वाचवलं मी तुम्हाला हेलिक्समध्ये...

हे वाक्य मात्र नको होतं बोलायला... कारण त्या दोघांमधील दरी एकदम उघडीच पडली. हा मोनाचा पहिलाच, पण खूप खूप मोठा विजय होता...

अर्देशीर संतापातिरेकाने उठून ताडताड पाय आपटत निघून गेले होते... मोना चेहरा हातात लपवून हमसून हमसून रडल्याचा अभिनय करत होती.... आणि लोहिया भकास नजरेनी पाहात होते...

अर्देशीर... गेली पस्तीस वर्षे असलेला मित्र... गुप्ताची सगळी इस्टेट हडप करण्याच्या कामात आपल्या खांद्याला खांदा लावून उभा राहणारा.. प्रत्येक क्षणी... सगळी वर्षे आज एका क्षणात नष्ट झाल्यासारखी वाटत होती... आणि लक्षात हेही येत होतं.. की सहा महिन्यांनी जर मोनाने हेलिक्सचा पैसा आय सी कडे वळवायला पुन्हा काही कारणाने नकार दिला... तर ....

.. अर्देशीर ... रस्त्यावर येणार होते... रस्त्यावर...

रात्री बारा वाजता लोहिया निघून गेले मुंबईला...

सायरा तिथेच राहिली होती....

.... आणि तिला एक गोष्ट समजत नव्हती... ज्या मुलीच्या, मोनाच्या बेडरूममध्ये आपल्याला कोणत्याही वेळेला प्रवेश असायचा.. ती आज आतून घट्ट दार लावून का झोपली असावी???

मोना झोपलीच नव्हती..... बॉयकट केल्यावर आपण अधिक शार्प दिसतो हे खरे आहे का हे ती पालथी पडून समोरच्या आरश्यात तपासत होती... अशी कॉम्प्लिमेन्ट आजच सायराने मगाशी दिली होती... शामा देत असलेला मसाज मोनालिसाला आवडत असला तरीही... आज तिला तो आवश्यक मात्र वाटत नव्हता...

शामाला तिने जायला सांगीतले आणि डॅडचा पी.सी., जो आता तिच्या रूममध्ये शिफ्ट झाला होता त्यावर तिने इन्टरनेट कनेक्शन ऑन केले...

मोनाबेटि१९८० .. युझरनेम टाकले...

डूनॉटट्राय - पासवर्ड लिहीला..

मेल कंपोज करायला घेतली... टू सिवा...

'हाय.. सॉरी आय कुड नॉट मीट यू अ‍ॅट ऑल ड्युरिंग लास्ट अल्मोस्ट फॉर्टी फाईव्ह डेज.. अ‍ॅन्ड... नाऊ आय हॅव डिसायडेड टू हॅन्डल इट मायसेल्फ.. आय डू नॉट रिक्वायर यूवर सर्व्हिसेस नाऊ.. सेन्डिन्ग यूवर फायनल 'टोकन' पेमेन्ट टुमॉरो.. इन पर्सन....थॅन्क्स अ‍ॅन्ड बाय...'

'सिवा' या 'पुरुषाची' मदत न घेताच तिने अर्देशीर हा प्रचंड मोठा पत्ता कट केला होता...

तेवढ्यात इन्टरकॉम वाजला...

सायरा - मॅम... मे आय गो टू बेड??

मोना - नो... कम हिअर... आय वॉन्ट टू टॉक टू यू....

नखशिखांत हादरलेली सायरा जेव्हा जिना चढत होती.... तेव्हा मोनालिसा गुप्ता.. स्वत:च्या बेडखाली असलेला टेपरेकोर्डर ऑन करत होती...

गुलमोहर: 

जी ए कुलकर्णींची कथा वाचल्यावर अस सुन्न व्हायला व्हायच...प्रचंड वेग आणि कथानकावर उत्तम पकड...मस्त बेफिकीर...

ह्या कथेचे आत्तापर्यंतचे भाग आवडले. त्रुटी असल्यातरी फ्लो आहे त्यामुळे चलेगा.

* त्रुटी म्हणजे एकदम महत्वाची मिटिंग चालू असताना हुकमी मुसमुसने वगैरे. कार्पोरेट वल्ड मधील स्त्रिया अशा मुसमुसतील असे वाटत नाही. (अगदी नवीन असल्या तरी). अशा ढोबळ चुका आपण नक्कीच नीट कराव्यात, कथेला आणखी चांगला फ्लो येईल. (म्हणजे वाचताना छ्या, असे काय होते का? का ही ही अशी प्रतिक्रिया रडण्यावरुन येऊन बाकी सगळ चांगलं लिहलेल वाया जाईल. )

ऑफकोर्स मी समिक्षक वा जाणकार अजिबात नाही .

सर्वांचे आभार!

'मी अजूनही अपरिपक्व, अननुभवी व अत्यंत भावनिक मुलगी आहे' हे सिद्ध व्हावे म्हणून मोनालिसा तशी रडली असे म्हणायचे होते, बहुधा पुरेसे स्पष्ट करता आले नसावे मला! असे केल्यातून लोहिया आणि अर्देशीर बेसावध राहतील हा हेतू होता.

-'बेफिकीर'!

बेफिकिर, बॉस... काय वाटतय सांगु.... एखादा सस्पेंस पिंक्चर पाहातोय. काय सहि विकेट काढ्लो मोना ने, आत्ता आर्देशिर रस्त्यावर.... राहिला फ्कत लोहिया.... बाकिचे काय.. जिथे आर्देशिर ला झोपवला तिथे हे सुबोध, जतिन चिल्लर आहेत.

पण... मोनाला सिवा हा हवाच आहे, त्याचि हेल्प हि गरजेचिच आहे, एकटा माणुस कुठे कुठे लक्ष देणार? आणि तेहि आत्त्ताच आर्देशिर... ईतका मोठा शत्रु झालेला असतांना.

जियो बॉस. Happy

मला राहून राहून मीनाची आठवण होते आहे... अशीच श्रूड, शार्प, स्मार्ट आणि शत्रूंमधे आपापसात फूट पाडून चाल खेळणारी ती होती आणि मोनाही तशीच आहे... पण ही कथा कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या इतक्या टेक्निकॅलिटीज उलगडतेय, त्या मात्र सगळ्याच्या सगळ्या समजून घेण्यात मी असमर्थ आहे... ही कथा खरंच समजायला अवघड आहे. त्यामुळे खुप हळूहळू वाचतेय... सहजसोपं आणि इतकं अवघड असं दोन्ही तुम्ही लिहू शकता, हे त्यानिमित्ताने समजलं...

परेशशी सहमत... मोनाने सगळंच काम स्वत:च्या अंगावर घ्यायची काय गरज? एकटीनेच लढणे कितपत शक्य आहे तिला? अर्थात तिच्या स्वभावानुसार तिने नक्कीच काहीतरी प्लॅन आखला असणार आणि ह्या डिटेक्टिव्हची तिला काहीच गरज उरलेली नसणार... की डिटेक्टिव्हवरसुद्धा संशय आहे तिचा??? गुंतागुंत वाढत चालली आहे.... Uhoh

हा भाग आवडला. वेगवान होता एकदम.

फक्त ते आणखी उशीर झाला तर ते अर्देशीर एकदम रस्त्यावर का येतील कळाले नाही. अश्या स्पिन ऑफ्स काढतात तेव्हा काहीतरी लीगल कॉन्ट्रॅक्ट होतच असेल की. हा केवळ वाचताना येणारा प्रश्न. कथेच्या फ्लो मधे त्याने काहीही अडत नाही.

एकूणच कथेचा प्लॉट अतिशय सुंदररीत्या कॉप्लिकेटेड झालाय. मोना ने दिलेले शह-काटशह अतिशयच जबरदस्त आहेत. (आणि हे सुचणं म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे). तुम्ही तिच्या मनाचा गोंधळही तितकाच छान रंगवलाय आणि मग त्यातूनच तिचे ठाम निर्णय घेणे - यामुळे एकदम तिच्यात मुळात कुठेतरी आतवर असणारे आणि हळूहळू वर येत असलेले स्ट्राँग व्यक्तीमत्त्व अधिकच ठळकपणे उठून दिसतयं......

बेफिकीरजी, यावर एक छान मालिका होऊ शकते पण त्या जुन्या मालिकांसारखी - ठराविक एपिसोड्स मध्ये संपणारी .......