नियती

Submitted by snehajawale123 on 21 May, 2008 - 02:39

रस्त्यावरून जाणारी एक एशियाड बस. रस्त्याच्या दुतर्फा सुंदर हिरवीगार शेतं, बहरलेली झाडं आणि एकदम पावसाळी वातावरण. खिडकीच्या कडेला बसून हे बघण्याची मजा काही औरच असते ना. शोना अशीच खिडकीबाहेर पहात होती. काही कामानिमित्त ती सांगलीला चालली होती. ह्या अशा वातावरणात तिला नेहमीच आल्हाददायक वाटत असे. एकदम प्रसन्न, बस्स.... अस्संच प्रवास करत राहावं. मधूनच पावसाची झिरीप यायची आणि तिच्या चेह-यावर काही शिंतोडे उडवून जायची. आणि मग शोनाला बाहेर पडण्याचा मोह व्हायचा. आता चालत्या बसमधून कसे उतरणार? मग हा उनाड पाऊस परत येऊन वाकूल्या दाखवून निघून जायचा.

शोनाकडे एकच अडकवायची सुटसुटीत बॅग होती.अगदी एक-दोन दिवसांचे सामान बसेल एवढीच मोठी. सांगलीत तिच्या जिवलग मैत्रीणीच्या घरी राहाण्याचा तिचा बेत होता. खूप वर्षांनी त्या भेटणार होत्या. त्याच विचारांमधे गुंतत गुंतत तिचा कधी डोळा लागला तेच कळाले नाही तिला.

करकचून ब्रेकचा आवाज ऐकून ती धडपडत उठली. पहाते तर गाडी सांगली स्थानकावर उभी होती. गाडीतून सर्व प्रवासी उतरले होते. ती एकटीच होती बसमधे. खिडकीतून बाहेर पहाते तर बरीच संध्याकाळ झाली होती. आजूबाजूला पहावे तर तिची बॅग कुठेही सापडेना तिला.
ती पळत पळत बसमधून खाली उतरली आणि चौकशी खिडकीकडे गेली. तिथे एक इसम बसला होता. तीला पहाताच तो म्हणाला, "बोला मॅडम.".
ती म्हणाली, "मी आत्ताच मुंबई-सांगली गाडीतून आले. माझ्याजवळ माझी एक बॅग होती. ती आता सापडत नाहीये."
"कशी होती तुमची बॅग? "
"ती आकाशी रंगाची होती. हवाई असे लिहिले होते त्यावर. एका दिवसाचे कपडे, मोबाईल आणि माझे पैसे सगळे होते त्यात."
"अहो बाई, मग अशी बॅग वा-यावर नाही सोडून द्यायची. नाही सापडली तर काय करणार तुम्ही?"
"तुम्हाला सापडली का अशी बॅग?"
"मी काय सगळ्यांच्या सामानावर लक्ष ठेवत बसू का? असे बरे नाही बघा. स्वत:च्या वस्तु स्वत: सांभाळायच्या. हरवल्यावर मग यंत्रणेला दोष देऊ नये. आम्हाला काय काम धंदे नाहीत काय?"
शोना चिडलीच. म्हणाली,"अहो साहेब, मुद्द्याचे बोला. मला सामान कुठे मिळेल?"
"बघा नाही सापडली तर पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार द्या. सामान मिळेल याची काही खात्री नाही."
"तुम्ही सांगणार आहात की नाही?"
"बरं, शेजारच्या खोलीत काही पिशव्या आहेत. त्यात तुमची बॅग आहे का पहा."
शोना मनात म्हणाली ,"हे सरळ सांगता आले असते."
शेजारी एक छोटीशी अडगळीची खोली होती. तिथे काही सामान अस्ताव्यस्त पडले होते. पण अखेर सगळे सामान धुंडाळून तिची बॅग काही सापडली नाही.
आता मात्र तिला रडू कोसळले. या अनोळखी शहरात कुठे जाईल ती? ना पैसा, ना मोबाईल. तिला तिच्या मैत्रिणीच्या घराचा पत्ता किंवा नंबर काहीच लक्षात नव्हते. परत मुंबईला फोन करावा तर पैसे नव्हते. ती खोली बाहेर आली. बाहेरच्या बाकावर बराच वेळ बसून राहीली. काय करावं ते तिला समजेना. दोन्ही हात चेह-यावर घेऊन ती हळू हळू रडू लागली. तसा थोडा थोडा पाऊसही यायला लागला. जणू तिच्या दु:खात तिला साथ द्यायला. येणारी जाणारी माणसे तिच्याकडे बघत जात होती. पण ती काहीही समजण्याच्या मन:स्थितीत नव्हती. या अगोदर असे काही घडले नव्हते तिच्याबरोबर.
तेवढ्यात तिचे लक्ष त्या खोलीच्या दाराच्या दुस-या बाजूला असणा-या बाकड्याकडे गेले आणि तिच्या आनंदाला पारावार राहीला नाही. त्या बाकाखाली एक पिशवी होती. आकाशी रंगाची आणि हवाई लिहिलेली. ती चटकन उठून गेली आणि चैन उघडून आतले सामान तपासून पाहू लागली. उघडताना तिच्या मनात आले की नक्किच चोराने आतलं सामान लंपास करून बॅग सोडून दिली असेल. पण आत पाहावे तर तिचे सगळे सामान त्यातच होते. तिची मनी पर्स, त्यातले पैसे,तिचे कपडे, काही पुस्तके..अगदी जसेच्या तसे.तिला एकदम हायसं वाटलं. पण मोबाईल काही केल्या सापडेना.
आणि त्या सामानात तिला काही अनोळखी सामानही मिळाले. जे तिचे नव्हते.
तेवढ्यात समोरून चौकशी खिडकीवाला इसम येत होता.
"मिळालं वाटतं सामान."
"हो"
"जाता जाता सामान मिळल्याची नोंद करुन जा."
सही करून शोना निघाली. तिच्या डोक्यातून हे विचार जाईनात. हे सामान कोणाचे आहे? माझ्या बॅग मधे कुठून आले? कोणी ठेवले? का ठेवले?
तिला तिच्या सामानात काही हजाराच्या नोटा, एक सुंदर तलम कापडाचा नक्षीकाम केलेला एक सलवार कमीझ, एक सूंदरसा हि-यांचा सेट आणि अजून बरेच काही. खूप महाग वस्तू होत्या या.
तशीच बॅग घेऊन ती स्टेशनबाहेर आली. नानात-हेचे विचार येत होते मनात. काय चालले आहे हे सगळे?

******************************************************
स्टेशनबाहेर पडताच ती डावीकडे जाणा-या रस्त्यावरुन सरळ चालू लागली. हे सगळे स्वप्नच वाटत होते. तिने स्वत:लाच चिमटा काढून पाहिले.

"आई ग....नाही हे स्वप्न नाही. मग हे असे का घडतय?"

चालता चालता ती एका सुनसान रस्त्यावर आली. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार शेतं वा-यावर डोलत होती. एवढं सुखद वातावरण ..पण शोनाच्या चालण्याचा वेग वाढू लागला. चालता चालता थबकली.

"मी नक्की जातेय कूठे?"

रस्त्याच्या कडेला वडाच्या पारावर ती बसली. बॅग उघडली आणि एक एक सामान न्याहाळू लागली. खूप महाग सामान होतं ते. " एवढे किमती सामान कोणी असे सोडुन का जाईल?"

तिच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले.

" हे सामान कुणा स्मगलरचे तर नसेल ना? आता माझा पाठलाग करत तो येयील. मला जिवानिशी तर मारणार नाही ना? "

"बापरे कोण माणूस असेल हा.... नक्किच भयानक असेल..आणि त्याला मीच का बरे सापडले.? आता ही रिस्क घेऊन फ़िरणे शक्य नाही. हे सामान इथेच झाडाखाली सोडून निघून गेलेलं बरं. हम्म जाताना ह्यातले थोडेफ़ार पैसे घरी जाण्यासाठी वापरु."

"पण ह्या पैश्याच्या मागावर पोलिस असतील तर ते नोटांची सिरीज नक्कीच पकडतील. की सरळ पोलिसांकडे जावं?"

" नको नको नस्ते उद्योग मागे लागतील एकतर अनोळखी शहर आणि त्यात पोलिसांनी जर चौकशीसाठी पोलिसचौकीत ठेवले तर? उगाच आईला इकडे बोलवायला लागेल. बिचारी आधीच आजारी असते आणि त्यात अजून भर पडेल."

शोना तिच्या आईबरोबर मुंबईला राहायला होती. त्यांना मुंबईत येऊन दोनच वर्षे झाली होती. वडिलांच्या सावलीपासून ती लहानपणापासूनच वंचित होती. आईने खुप कष्टाने तिला वाढवले शिकवले होते. आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती आणि शोनाला आपल्या आईला कुठल्याही प्रकारे त्रास द्यायचा नव्हता.

संधिप्रकाश सरून अंधार पडू लागला होता. त्या मोकळ्या रस्त्यावर एक चिटपाखरू ही नव्हते. मधुनच एखादी गाडी भुरकन निघून जायची. आता मात्र शोनाला भिती वाटू लागली. कुठे जावे ? काय करावे?

तेवढ्यात एक ट्रक मोठ्यांदा हॉर्न वाजवत गेला आणि शोनाच्या सामानातून कंप जाणवू लागला. एका फोनची बेल ही ऐकू येऊ लागली.

" ओह ..मी कशी विसरले? " तो सामानातला मोबाईल वाजत होता.शोनाच्या काळजात धस्सं झालं. " कोणाचा फोन असेल? " सामान उघडून तिने तो मोबाईल बाहेर काढला. त्याच्या स्क्रीनवर एक नंबर झळकत होता.

" उचलू की नकॊ.. नकोच उचलायला."

फोन वाजायचा बंद झाला. शोनाच्या चेह-यावर हसू आले.

"अरे कसे विसरले मी? हा मोबाईल.. आता मी घरी फोन करून निताचा पत्ता विचारून घेते आईला. मग तिच्या घरी जाईन मी."

ती घरचा नंबर दाबू लागली आणि परत फोन वाजू लागला.

परत " उचलू की नकॊ..?"

तिने तो फोन उचलून कानाला लावला. आणि एक मोठी काळी गाडी तिच्या समोर येऊन उभी राहीली. तिचा दरवाजा उघडला. फोनमधून आवाज आला

" शोना...."

*******************************************************
"शोना.... गाडीत बस.."

"हो! हो! हा तोच ओळखीचा आवाज आहे."

शोना चूपचाप गाडीत जाऊन बसली.

कोणाचा होता हा आवाज की शोना काहीही विचार न करता गाडीत बसली. गाडी संथ गतीने चालत होती. गाडीमधील ए.सी. चालू होता. पण शोनाच्या कपाळावर घामाचे थेंब दिसत होते. तिची चलबिचल चालली होती.

"गाडीत बसून ठीक केले की नाही.हे सगळे सामान फ़ेकून मी गेले असते तरी चालले असते. आता पुढे काय होणार? आणि तो इथे कसा काय आला?"

"तो त्याचाच आवाज होता. तसाच भारदस्त आणि दडपण वाढवणारा. इतक्या दिवसांनी हा कुठून आला आणि असे का वागत आहे? काय हवे आहे त्याला माझ्याकडून?"

शोना त्याच्याबद्दल विचार करू लागली. तीची आणि त्याची ओळख एक वर्षापूर्वी कोकणात झाली होती. शोना कंपनी ट्रीपच्या निमित्ताने कोकणात गेली होती. दोन दिवसांची सहल होती आणि सगळे खुप खूश होते. ते मूंबईहून रात्री निघाले होते.पहाटे कोकणला पोह्चून ताजे तवाने होऊन ते फ़िरायला बाहेर पडले. शोनाही आपल्या मैत्रीणींसोबत तिथल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत होती.

मस्त नारळी-पोफ़ळीच्या बागा आणि प्रदूषणरहीत हवा. सगळ्यांना ही हवा अशीच साठवून परत न्यावीशी वाटत होती. शोनाला असा निसर्ग नेहमीच आवडत असे. अगदी घरच्या सारखे वाटले तिला. जशी सुंदरता अवतीभवती होती तशीच तिथली माणसे ही सालस होती. शोनाच्या रेसॉर्टमधे छोटे छोटे कौलरू घरे होती. ती ह्या सगळ्या ओफ़ीसमधील मंडळींना दिली होती. एक इवलेसे गावच वाटत होते ते. त्या ठिकाणाच्या मागेच समूद्रकिनारा होता. घरात असताना देखील लाटांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. जसा काही तो स्वत:कडे बोलवत आहे. शोना तिच्या मैत्रीणीबरोबर, सरोजबरोबर राहायला होती. दोघी साधारण एकाच वयाच्या होत्या. म्हणून दोघींचे खुप पटायचे. दोघी सारख्या एकत्र असायच्या आणि सारखे सारखे हसायच्या. दोघींच्या जोडीला सगळे सीता-गीता म्हणायचे. दोघीही त्या रूममधे अस्वस्थ झाल्या होत्या. कधी एकदा समूद्राकडे जाऊ असे झाले होते त्यांना. पण..बाकीचे सगळे सिनिअर मेंबर बरोबर असताना ह्या दोघींना लाटांमधे जाता आले नसते.

सरोज म्हणाली,"शोना,आपण एक काम करू शकतो.हे सगळेजण जमा होत आहेत तो पर्यंत समूद्राकडे जाऊन येऊ. जवळच आहे."

"पण आपल्याला कोणी जाऊ देणार नाही."

" सांगायची काय गरज आहे? लगेच जाऊन अर्ध्या तासात येऊ परत. आपण लहान आहोत का आता? आपण स्वत:ची काळजी घेऊ शकतो."

शोनाच्या मनाला हे पटले नाही. पण एकीकडे तिची समुद्राकडे जाण्याची ओढ काही कमी होईना आणि शेवटी दोघींनीही कोणालाही न सांगता जायचे ठरवले.

चोरपावलांनी रूमबाहेर येऊन त्या सागराकडे जाऊ लागल्या. समूद्रावरून थंडगार वारे येत होते.प्रसन्न वातावरण आणि समॊर घोंगावणा-या लाटा. शोनाला सगळे स्वप्नच वाटत होते.

"सरोज , तुला पोहता येते का?" शोनाने विचारले.

"हो, मी चांगली पोहते."

दोघी हातात हात घालून समूद्रकिनारी चालू लागल्या. समुद्राची मऊ वाळू पायाला गुदगुल्या करत होती.सकाळी जास्त कोणी समूद्रकिनारी नव्हते. समूद्राची लाट आली की त्यांच्या पायाला स्पर्श करून जात होती. दोघींनी थोडेसे पाण्यात जायचे ठरवले. त्या अजून थोडे समूद्रात शिरून उभ्या राहील्या. जसजशी लाट येत होती, तसतशी त्यांच्या पायाखालची वाळू त्यांना आत खेचत होती. ती वेळ ओहोटीची होती आणि अशा वेळी अजून पाण्यात जाणे धोक्याचे होते. त्या दोघींना ही तेवढी समज नव्हती. अजुन लाटा अंगावर झेलण्याच्या नादात दोघी कमरे एवढ्या पाण्यात शिरल्या.

तेवढ्यात कसा कोण जाणे, सरोजचा पाय सरकला आणि ती समुद्राच्या पाण्यात घसरली. सरोजला पाण्यात खेचली जाताना पाहून शोना घाबरली. ती ही पाण्यात जाऊन सरोजला वर आणण्याचा प्रयत्न करू लागली. आणि शोनाचाही पाय सरकला.

दोघीही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्या. एकमेकींना सावरू लागल्या पण समूद्रात खेचल्या जाऊ लागल्या.दोघींनी ही मदतीसाठी ओरडायला सुरूवात केली.

किना-यावर दूरवर एक इसम पोहत होता. तो या दोघींची हाक ऐकून मदतीसाठी धावून आला. तो पाण्यात शिरला आणि दोघींच्या जवळ जवळ जाऊ लागला. जवळ पोहोचताच त्याने दोघींनाही त्याला पकडायला सांगीतले आणि पाणी आत खेचत असतानाही प्रवाहाविरुद्ध दोघींना तो खेचू लागला. किना-यावर पोहोचताच क्षणी त्याला खूप धाप लागली होती.

पाण्याबाहेर येता क्षणीच शोनाला भोवळ आली. तो पर्यंत किना-यावरच्या गर्दीने एक ऍम्ब्यूलन्स बोलावली होती. शोनाला आणि तिच्या मैत्रीणीला त्यात घालून हॉस्पिटलमधे नेण्यात आले. आणि दोघींनाही त्या दिवशी खूप बोलणी ऐकावी लागली.

हा प्रसंग आठवला आणि शोनाच्या चेह-यावर हसू आले. हिच त्याची पहिली ओळख. त्या दोघींना वाचवणारा इसम तोच होता.

"पण तो असा अचानक कसा आला आणि माझ्या प्राणदात्याला आता माझ्याकडून काय अपेक्षित आहे?"

अन परत शोनाच्या हातातील मोबाईल वाजू लागला.

*******************************************************
मोबाईलच्या आवाजाने शोना भानावर आली. फोन त्याचाच होता.

"शोना, धन्यवाद तू माझ्या विनंतीला मान देऊन गाडीत बसलीस. घाबरू नकोस. इकडे पोहोचलीस की तुला सर्व सांगेन."

ती काही बोलणार तेवढ्यात फोन बंद झाला. त्याच्या बोलण्याने ती जरा सावरली. "अजुन ही किती सालसपणे बोलतो."

पहिल्या भेटीत शोना त्याला पाहू ही शकली नव्हती. शोना आणि सरोज किना-यावर आल्यावर बेशुद्ध झाल्या होत्या. दोघीना होस्पिटल मधे नेण्यात आले तेव्हा हा इसम - देवेन देखील दोघीबरोबर हॉस्पिटलमधे गेला. दोघी शुद्धीवर येई पर्यंत तो निघून गेला होता. त्यांच्या कंपनीतील इतर जणांनी त्याच्याबद्दल तिला सांगितले आणि त्याचा मोबाईल नंबर दिला. त्या दिवशी तिने संध्याकाळी आभार मानण्यासाठी त्याला फोन लावला.

"हॅलो, कॅन आय स्पिक विथ मिस्टर देवेन?"

"येस, स्पिकींग."

"आय एम शोना स्पिकींग."

"ओह, येस. बोला. आता तुमची तब्येत कशी आहे?"

एकदम अस्खलीत मराठीत त्याने उत्तर दिले.

"तुम्ही काल जे उपकार माझ्यावर केलेत त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. खरच तुम्ही नसता तर आज मी हा दिवस पाहू शकले नसते. आता मी या उपकाराची परतफेड कशी करू?"

देवेन थोडासा हसला आणि म्हणाला,"असे बोलून मला फार मोठे बनवू नका. उपकार कसले त्यात. देवाच्या कॄपेने मी तिथे हजर होतो. मानायचे असतील तर देवाचे आभार माना."

"हा तुमचा विनय आहे. या उपकाराची परतफेड नक्कीच करायची आहे मला. तुम्ही मला भेटू शकाल का?"

"जशी तुमची इच्छा. पण मी कोकण सोडून घरी निघालो आहे आज. तुम्हाला भेटू शकणार नाही. आणि राहीली उपकाराची परतफेड. जर नशीबात असेल तर परत आपली भेट होईल अशी आशा करू.तेव्हा नक्की माझी अट पुर्ण करा."

"हो नक्की. तुम्ही माझे जिवनदाता आहात. तुमची परतफेड मी नक्की करेन."

नंतर अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तिने फोन ठेवून दिला. देवेन एक व्यावसायिक होता. त्याचा इम्पॉर्ट-एक्सपॉर्टचा व्यवसाय होता. आवाजावरून साधारण ३०-३५ वर्षांचा असावा असे वाटत होते. त्याचे कुटूंब गुजरात मधे स्थायिक होते आणि कामानिमित्त हा नेहमी इतर देशांच्या सफ़रीवर जात असे.

देवेनचा आवाज मोठा विनयशील होता. त्याला भेटून धन्यवाद व्यक्त करता आले नाही म्हणून शोनाला खूप वाईट वाटले. परत कधीतरी भेट होइल याच आशेवर ती होती.

आणि पुढील भेट अशी अनपेक्षितपणे घडेल असे वाटले नव्हते.

"आता देवेनचे काय म्हणणे आहे आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून काय मागेल तो?"

"त्या सामानाचा काय अर्थ आहे?"

देवेन भेटेपर्यंत या प्रश्नांची उत्तरे मिळणे शक्य नव्हते.

गाडी एका बंगल्यासमोर थांबली. गाडीच्या ड्रायव्हरने गाडीचा दरवाजा उघडून तिला बाहेर येण्याची विनंती केली. शोना गाडीतून उतरली तेव्हा दारवानाने तिला त्याच्या सोबत येण्याचा इशारा केला. ती त्याच्या मागोमाग चालत होती. तो खूप मोठा बंगला होता. दरवानाने तिला तळमजल्यावरील एका दिवाणखान्यात बसवले आणि "सर येतील. तो पर्यंत बसा." असे सांगून तो निघून गेला. त्या खोलीतील प्रत्येक वस्तू पुरातनकालीन वाटत होती. एका म्युझीयम मधे असावे तसे सूंदर नमूने होते. शोनाचे कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नव्हते. तिचे डोळे दरवाज्यावर खिळले होते.

कोणाचीतरी चाहूल लागली तशी शोना खुर्चीत सावरून बसली. एक हसतमूख गॄहस्थ दिवाणखान्यात आला. साधारण सहा फूट उंची असलेला, साधारण शरीरयष्टी असलेला हा युवक देवेन होता.

"वेलकम शोना...वेलकम."

त्याने स्वागत केले. शोना कसनूसे हसली. कसे व्यक्त व्हावे तिला कळत नव्हते.

"तुम्ही मला इथे का बोलावले आहे?"

"आपण मागे जेव्हा फोनवर बोललो होतो तेव्हा पुन्हा भेटू असे म्हटलो होतो. आज मीच नशिबाला वळवून आपली भेट घडवून आणली."

"ते ठिक आहे. पण मला फोन करून ही मला भेटू शकला असता आपण. हे असे करावे असे का वाटले तुम्हाला?"

"ओह... मला अश्या एडव्हेंचरस गोष्टी करायला आवडतात.त्यामूळे जगण्यात मजा येते असे मला वाटते."

" एडव्हेंचरस???.. त्या सामानाचा अर्थ काय आहे? नाविन्यपुर्ण काहीतरी करण्याच्या नादात तुम्ही आजूबाजूच्या लोकांनाही असाच त्रास देता का?"

"मी तुला घाबरवले असेल तर मला माफ कर शोना. माझा असा प्रयत्न नव्हता."

"ठीक आहे. तुमचे काय म्हणणे आहे मला लवकर सांगा म्हणजे मी घरी जाऊ शकेन."

"जशी तुझी मर्जी. पण तू थकून आली आहेस. जरा फ्रेश होऊन मग आपण बोलूया का?"

"नाही. आताच बोला."

"बरं, मागे तू म्हणाली होतीस की उपकाराची परतफेड करायची आहे. मी आज काही तुझ्याकडे मागितले तर देशील का?"

"हो मला आठवते आहे. तुमच्यामुळेच मी आज हे जग पाहू शकत आहे. मी काही खूप श्रीमंत नाही आहे.बोला तुमची काय अपेक्षा आहे?"

शोनाच्या मनात चलबिचल वाढू लागली. देवेन काय मागेल?

*****************************************************
"देवेन काय मागेल? माझ्याकडे अस काय आहे जे त्याला हवे आहे? मी त्याला काय देऊ शकते?" एक ना दोन हजार प्रश्न शोनाच्या मनात घोळू लागले. देवेनच्या शब्दांकडे लक्ष देऊन ऐकू लागली.
" तुला प्रश्न पडला असेल ना? काय हवे आहे याला?

देवेन मोठ्यांदा हसला. शोनाला त्यात एक राक्षसीपणा वाटला.

"शोना ह्या सगळ्या वस्तू तुझ्या होतील. जे तुला सामानात मिळाले ते आणि बरेच काही. पण एका अटीवर"

"माझ्याशी लग्न करशील?"

देवेन ची मागणी ऐकून शोना चपापली. थोडेसे गोंधळून ती काही बोलणार तेवढ्यात तोच म्हणाला.

"मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच तू मला आवडली होतीस. पण पुढे भेटण्याचा योगच नाही आला."

"पण.." शोना म्हणाली.

"एक मिनिट ...मला पुर्ण बोलू दे."

"कोकणातून परत आल्यावर माझ्या डोळ्यासमोर फ़क्त तुझाच चेहरा होता. तुझ्याशिवाय मला दुसरे काही सुचत नव्हते. मग मी मूंबईला आलो. तुझ्या कंपनीचे नाव मला माहित होते. ती कुठे आहे ते शोधून काढले. तिथून तुझ्या घराचा पत्ता ही मिळाला मला."

"माफ कर माझ्या एवढ्या धिटाईबद्दल."

"गेले सहा महीने मी तुझा पाठलाग करत आहे. तुझ्याशी बोलण्याचे मनात आले पण कोणत्या कारणाने तुला भेटावे ते मला कळेना."

"म्हणून अश्याप्रकारे मनस्ताप द्यायचा असे ठरवलेत क?"

"मला वाटलेच तू हा प्रश्न विचारणार म्हणून. मी जे काही केले ते फ़क्त आपल्या भेटीत काहीतरी वेगळेपणा असावा यासाठी. तुला घाबरवण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता."

"मी तुला खुप सुखात ठेवेन. माझ्याकडील सगळ्या वस्तू, सुखसोयी तुझ्याच असतील. तुझा कोणतही शब्द मी जमीनीवर पडू देणार नाही. तुझ्या आयुष्याचे सोने होईल."

"खरे तर मीच पावन होईन जर तू माझ्या आयुष्यात आलीस तर."

"मी तुम्हाला ओळखतही नाही आणि मी हो कशी म्हणू? मला तुमच्याशी लग्न करायची बिल्कूल इच्छा नाही."

"शोना, नेहमी जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तीला स्विकारावे, ती व्यक्ती तुम्हाला खूप सुखी ठेवते."

देवेनच्या डोळ्यात खरेपणा दिसत होता. पण शोना काहीही समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. डोकं जड झालं होतं. ती शांत बसली होती.

"तुला वेळ हवा असेल तर मी जरूर देईन. आज तू या वाड्यातच रहा. खूप रात्र झाली आहे आता. आपण जेऊन घेऊ या."

दोघे डिनर टेबल कडे गेले. जेवण करताना शोना एक शब्दही बोलली नाही. देवेनच्या डोळ्यांना डोळे ही देववत नव्हते तीला. थोडेसे जेवल्यावर देवेनने एका नोकराला बोलावून शोनाच्या राहाण्याची सोय पाहूण्यांच्या खोलीत करायला सांगीतले.

शोना त्याच्या मागोमाग निघाली.

तिचे डोके बधीर झाले होते. एकाहून एक अनपेक्षित घटना घडत होत्या आणि शोनाला काहीच मार्ग सापडत नव्हता.

थकलेल्या शरीराने ती बिछान्यावर आडवी झाली. पण झोप येईना. येईलही कशी? अशा अनोळखी व्यक्तीच्या अनोळखी घरी अचानक येऊन कोणाला शांत झोप लागेल?

डोळे मिटले की सगळे प्रसंग डोळ्यापुढे येत होते. ते सामान हरवणे, परत मिळणे, त्यातले अनोळखी सामान, ती काळी गाडी आणि अकस्मात भेटलेला हा प्राणदाता.

देवेन....तसा फ़ारसा वाईट व्यक्ती नाही. पण मी त्याला ओळखत देखिल नाही. असा कसा मी त्याच्यावर विश्वास ठेऊ.

एखादी व्यक्ती माझा एवढा पाठलाग का करेल? जर हे प्रेम नाही तर मग माझ्याकडून अपेक्षा ठेवण्यासारखे काहीच नाहिये.

असे म्हटले जाते की जो प्रेम करतो त्याला स्विकारावे मग जास्त सुखात जिवन जाते. तसे माझ्या जिवनात कोणीही खास नाही मग मी देवेन चा स्विकार का करू नये?

देवेन सुखवस्तू कुटूंबातला असल्याने माझेही पुढचे आयुष्य ऐशो-आरामात जाईल. आईला ही व्यवस्थित सांभाळता येयील.

शोनाच्या मनातले विचार असे बदलू लागले आणि शेवटी तिने देवेनचे प्रेम स्विकारायचे ठरवले.

दुस-या दिवशी शोना सकाळी उठली. फ़्रेश होऊन परत त्या दिवाणखान्यात गेली. तिथे देवेन नाश्त्यासाठी तिची वाट पाहात होता.

नाश्ता करता करता देवेनने पुन्हा शोनाला विचारले आणि ह्यावेळेस मात्र शोनाने होकार दिला.

देवेन त्या दिवशी खूप खूश होता. त्याने शोनाच्या आईला बोलवून घेतले. आणि गुजरातहून त्याच्या आजोबांनाही बोलावले. देवेन आणि देवेनचे आजोबा एवढाच परिवार होता. त्यांची वडिलोपर्जित भरपूर संपत्ती होती. दोघांचे लग्न खुप थाटामाटात झाले. शोना खूश होती कारण शोनाच्या आईला देवेन जावई म्हणून खुप आवडला.

इकडे देवेन खूश होता कारण त्याच्या आजोबांना जशी सून हवी होती तशीच मिळाली.

दोघांचे नविन जिवन सुरू झाले. अगदी नजर न लागो एवढे सुख मिळाले होते शोनाला. पण शोनाच्या संसाराला नजर लागणार होती.

*******************************************************
शोनाचे एकदम व्यवस्थित चालले होते. देवेन तिची खूप काळजी घ्यायचा. त्याचे आजोबा गुजरातला परत गेले आणि शोना - देवेन दोघेच मुंबईतील त्यांच्या बंगल्यावर रहत होते. आलिशान घर, नोकर चाकर आणि ऐशोआरामात शोनाचे दिवस जात होते.
एके दिवशी शोना मार्केटमधे सामान आणायला गेली.जवळच्या अपना बझार मधे ती शिरली आणि आठवून आठवून सामान घेत होती. शोनाला ग्रोसरी शॉप मधे असे नवीन नवीन वस्तू बघत वेळ घालवणे आवडायचे. ती एका वस्तूबद्दल तिथल्या सहाय्यकाला विचारत होती आणि तोच समोरून देवेनसारखी व्यक्ती गेल्याचा भास झाला तीला.
"असे कसे झाले? देवेन तर इंदोरला गेला आहे. आणि दोन दिवसांनी परत येणार आहे. हा ईसम कोण आहे?"
ती व्यक्ती एकदम गायब झाली. शोनाची नजर त्या दुकानाच्या प्रत्येक कोप-यात तीला शोधू लागली. तोच ती व्यक्ती पाठमोरी दिसली. शोना त्या व्यक्तीजवळ गेली आणि म्हणाली, "एक्सक्यूज मी."
ती व्यक्ती मागे वळाली आणि शोनाचे डोळे विस्फारले. तो देवेनच होता.
"देवेन तू कधी परत आलास? आणि इथे काय करत आहेस?" शोनाने आश्चर्याच्या धक्क्यातून सावरत हसत हसत त्याला विचारले.
पण देवेनच्या डोळ्यात एकदम अनोळखी भाव होते.
"सॉरी मॅडम. मी तुम्हाला ओळखले नाही. तुम्ही मला ओळखता का? आणि हे देवेन कोण आहेत?"
"असे काय करतोस देवेन? मला नाही का ओळखलेस? मी शोना.तुझी पत्नी."
"माफ करा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी देवेन नाही."
शोना त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला ओळखायचा प्रयत्न करत होती. पण त्या डोळ्यांमधे खूप परकेपणा होता.
शोना मागे फिरली. असे कसे होईल? तिचे डोळे एवढा धोका खाऊ शकणार नाहीत. पटकन घरी जाऊन देवेनला फोन करायचा तीने विचार केला.
"हॅलो देवेन."
"हाई, कशी आहेस? कसा काय फोन केलास? मला एवढे मीस केलेस का?"
"देवेन तू कुठे आहेस?"
"इंदोरला. का ग?"
"मला आज हुबेहूब तुझ्यासारखा माणूस दिसला अपना बझार मधे. त्याला पाहून माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना."
"काय सांगतेस?"
"हो रे."
"म्हणजे तो माझ्यासारखाच दिसत होता का? असाच का?"
शोना दचकून मागे वळाली आणि देवेन तिच्या मागेच उभा होता.
शोनाच्या चेह-यावरचे भाव बदलले. थोडे आश्चर्य, थोडा राग आणि थोडा आनंद असे संमिश्र भाव होते.
देवेन मोठ्यामोठ्याने हसू लागला.
"का वागलास असा तु?"
"अग गंमत शोना. आयुष्यात अशी आश्चर्य असावीत माणसाच्या. आयूष्य खेळकर बनतं."
"तो तुच होतास आणि किती परकेपणा वाटत होता तुझ्या डोळ्यात."
"अगा वेडाबाई, माझ्यासारखाच दुसरा व्यक्ती नाहिये या जगात."
मिस्किल हसत देवेन म्हणाला, "मास्टरपीस सिर्फ एक ही बनता है।".
शोनाही देवेनसोबत हसू लागली.
ही होती पहीली झलक देवेनच्या स्वभावाची. त्याला लोकांवरती निरनिराळ्या क्लूप्त्या लढवून घाबरवायची सवय होती.
त्याचा आवडता टाईमपास होता तो.
शोनाला या स्वभावाची आता आता ओळख होऊ लागली होती.
******************************************************
रविवारचा दिवस होता. शोना आणि देवेन दोघेही सुटटी असल्याने आरामात घरी होते. टिव्हीवर गाण्याचे कार्यक्रम चालू होते. देवेन हॉलमधे बसून ते पहात होता आणि शोना स्वयंपाक घरात नाश्ता बनवत होती. देवेन कधीपासून शोनाला बाहेर बोलावत होता पण शोना कामात व्यस्त होती.
"शोना अग ये ना. छान कार्यक्रम आहे बघ ना जरा माझ्या बरोबर बसून."
शोना तिच्याच कामात व्यस्त होती. तिला ऐकू गेले नाही.
तेवढ्यात टिव्हीचा आवाज बंद झाला आणि पाठोपाठ देवेनची किंकाळी ऐकू आली.
"शोना......"
ते ऐकून शोनाच्या हातातले भांडे जमीनीवर पडले आणि ती धडपड ती हॉलच्या दिशेने धावली. रूममधे येईपर्यंत तिच्या जिवात जिव नव्हता.टिव्ही बंद होता आणि देवेन तिथे नव्हता.
"देवेन....देवेन..." शोना त्याला हाका मारू लागली. प्रत्येक खोलीत पाहिले. देवेन कुठेच नव्हता. आता फ़क्त गॅलरीमधे पहायचं बाकी होतं.धडधडत्या हॄदयाने शोना गॅलरीकडे धावली.
गॅलरीमधून खाली वाकून बघत असतानाच शोनाच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवली.
शोनाने झटक्यात मागे वळुन पाहीले आणि समोर देवेन नेहमीचं मिस्किल हास्य घेऊन उभा होता.
"तुला काय वाटले मी इथून पडून मेलो की काय?"
देवेनच्या अश्या वागण्याचा शोनाला खूप राग आला.
ती फणका-याने आतल्या खोलीत निघून गेली. देवेनही तिच्या मागे मागे खोलीत आला.
आणि शोनाच्या त्याच्या गळ्यात पडून अक्षरश: रडली.
"देवेन तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत रे. अशी जिवघेणी थटटा यापुढे कधीही माझ्याबरोबर करू नकोस."
"ए वेडाबाई अशी काय रडतेस. कधी कधी गंमत करतो ग मी."
शोनाने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि तो पुढे काही बोलू शकला नाही.
*******************************************************
विकएंडला काय करायचे? देवेन - शोना दोघेही विचार करत होते.ब-याच चर्चा करून त्यांनी शेवटी ट्रेकींगला जायचे ठरवले.
शोना आणि देवेन दोघेही ट्रेकींगला गेले.सकाळी सकाळी उठून दोघांनीही डोंगर चढायला सुरू केले. उन थोडे वर येईपर्यंत जमेल तेवढे वर चढण्याचा त्यांचा प्लान होता. अगदी सुरळीतपणे दोघेही वर चढत होते आणि देवेनला पुन्हा एकदा शोनाची खोड काढायाची हूक्की आली. नेहमी प्रमाणे जरासे मागे राहून त्याने शोना.... अशी हाक मारली. तशी शोनाने दचकून मागे वळून पाहीले. आणि तिला दिसले देवेनचे मिस्किल डोळे. तिने डोळे मोठे करून त्याला शांत रहाण्याचा इशारा केला.देवेन हसू लागला आणी तिथेच थांबला.
शोना पुढे चालू लागली.
तोच "शोना....." अशी मोठी किंकाळी ऐकू आली. शोनाला वाटले देवेन नेहमीप्रमाणे तिला फसवायचा प्रयत्न करतोय. तिने वळूनही पाहिले नाही आणि चालू लागली.
मनात म्हणत होती, "आता येशील माझ्यामागे पळत पळत. ह्या वेळेस मी घाबरणार नाही. तुला जेवढी थटटा करायची आहे तेवढी कर."
थोडावेळ पुढे चालल्यावरही देवेन येईना. शोनाने मागे वळुन पाहिले. त्याचा काहीच मागमूस नव्हता.
शोनाच्या डोक्यावर आकाश कोसळले जणू. ती मागे धावली. थोडी पुढे आली आणि तिला देवेन दिसला.
.
.
.
पटपट चालण्याच्या नादात पाय सरकून तो पडला आणि त्याचे डोके तिथल्या दगडाला लागले होते.
तो निपचीत पडून होता.
शोना त्याच्याकडे धावली. त्याला कवेत घेऊन रडू लागली. तो थंड होता.
आता देवेनने नाही नियतीने थटटा केली होती शोनाबरोबर.
शोना रडत होती आणि तिला फक्त नियतीचे क्रूर हास्य ऐकू येत होते.

************************समाप्त********************

गुलमोहर: 

आता देवेनने नाही नियतीने थटटा केली होती शोनाबरोबर.
.....

शेवट वाचल्यावर वाटले की लेखकाने ही वाचकान्ची थट्टा केली आहे!! पहिला भाग अप्रतिम... पण पुढचे वळ्ण आणि शेवट मात्र थट्टा केल्यासारखा वाटतो.

एखादा हिंदी चित्रपट पहात आहे की काय असे वाटले....

कथा हि कादंबरी विभागामधे????

धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल.
मी ही कथा कादंबरी विभागात टाकल्याबद्दल माफी मागते.
हा माझा पहिला प्रयत्न आह. बर्याच चुका असतील.
मी माफी मागते. हि कथा इथून काढून टाकेन.

Happy
धन्यवाद,
स्नेहा

खरतर हे कादंबरी मेटीरियलच आहे पण घाई केल्यामुळे जरा गडबड झाल्ये.

स्नेहा, प्रयत्नं चांगला आहे गं. कथाच आहे ही. देवेनचे 'खेळ' छान दाखवले आहेस. मला तरी वाचताना सुरुवातीला, हा देवेन पुढे काहीतरी जबरा गडबड करणार असं वाटलं होतं. पण शेवटापर्यंत कथा सरळमार्गीच राहिली आहे.

लिही गं. अजून लिही.

कथा फारच चान आहे. पन खुप घई झालि. आनि शेवथ हि खुप लवकर झाला. अजुन पुडे वाचयला मिळलि अस्ति तर मजा आलि असति.

माफ करा टाईपिग अजुन जमत नाहि.

तुम्हि सगळे खुप छान आहात.

माझ्या पहिल्या प्रयत्नाला तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद.

जमले तर ह्या कथेला एक वेगळे बळण देण्याचा प्रयत्न करेन.
Happy

एखाद्याने आचानक

समजत नाही काय बोलु ते.

नमस्कार दीपली,

तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला कळाले नाही.

स्नेहा, आवडली ग कथा!! पन कादंबरी नाय बा वाटत ही. रंगविली आहेस छान.