हाफ कुजबुज - क्रमश: मारके - भाग : २६

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुजबुज

२१ ऑक्टोबर २०१०

नमस्कार वाचकहो,

टायटल बघून दचकू नका. कुजबुजची "धार वाही" कादंबरी दररोज मायबोलीवर प्रकाशीत करण्याचा आमचा अजिबात मानस नाही. पण गेल्या काही अंकाच्या प्रकाशना नंतर "अंक फार लहान वाटला" "मॅटर ज..रा कमी वाटतेय" अशी तक्रार काही वाचकांनी केली होती. त्याला घाबरून यावेळी आम्ही विचारपूर्वक हे शिर्षक दिले आहे जेणे करून यावेळी पण कुजबुज मधे मॅटर कमी वाटल्यास हाफ प्लेट आहे म्हणत वेळ मारून नेता येईल.

"दारू पितांना आपण शेंगदाणे बचक भर खातो पण काजू मात्र चवीने एक एक उचलून खातो, तशाच आपल्या साहित्यिक रचना पण एक एक वेचून टाकाव्या" असा सल्ला श्री. टण्या यांनी एकेठिकाणी दिला. खरे म्हणजे मोजके काजुबुज प्रकाशित करण्यामागे आमचाही कायम तोच विचार असतो. मात्र सध्याचे हितगुजवरचे गोडगोड वातावरण पाहता काजू दिल्यास त्याची लगेच काजूकतली होईल या भितीने प्रस्तुत कुजबुजीतून केवळ खवट शेंगदाणे देण्याचा आमचा इरादा आहे.
(श्री. टण्या यांना एक अनाहूत सल्ला : दारू पितांना मूळ उद्देश दारू पिणे असतो काजू वा शेंगदाणे चवीने खाणे हा नाही. त्यामुळे आपले लिखाण दारू सारखी झिंग चढवणारे असावे याकडेच लेखकाने जास्त लक्ष दिले पाहीजे.)

********************************************

हितगुज चाळणी केन्द्र

हितगुजवर येत असलेल्या साहित्य दळणाचा दर्जा उत्तम रहावा म्हणून यापुढे काही दिवस सर्व दळण 'हितगुज चाळणी केन्द्रातून' बारकाईने चाळणी लावून अ‍ॅडमिन यांनी तपासल्यावरच बाजारात विक्रीसाठी येऊ शकेल. गद्य, पद्य, छायाचित्र वगैरे सर्व प्रकारच्या पिठांमधे अश्लिल टोके किंवा पोरकिडे सापडल्यास ते वेगळे निवडण्याची विशेष सोय या केन्द्रा मध्ये करण्यात आली असल्याचे कळते. उत्तम प्रतिचे धान्य देण्यासाठी योजिलेल्या या उपायामुळे साजूक वरणभातासाठी प्रसिद्ध असलेली मायबोली आपली कीर्ती यापुढेही अशीच टिकवून ठेवेल असे वाटते.
(हितगुजवर काही अश्लिल कविता आल्यामुळे चाळणी केन्द्राचा उपाय अ‍ॅडमीन यांनी योजिला असे काही हितगुजकरांना वाटते पण आमच्या वार्ताहराने काढलेल्या महिती नुसार प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. चंदन यांनी अतुल्य भारत या आपल्या चित्रमालिकेमधे पुढील भाग खजुराहो वर टाकण्याचे जाहीर केल्यामुळे मा. अ‍ॅडमीन यांनी चाळणी केन्द्र योजना अमलात आणल्याचे समजते.)

********************************************

मायबोलीकर आणि त्यांचे देव

'व्यक्ति तितके देव' ह्या आपल्या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प "मायबोलीकर आणि त्यांचे देव" श्री. आस्चिग हे लवकरच मायबोलीवर सादर करणार आहेत. मायबोलीकर, त्यांचे देव आणि त्यांच्या उपासना पद्धती यावर केलेले आपले संशोधन यामधे त्यांनी मांडले आहे. त्यांच्या मुळ लेखातील काही भाग आम्ही कुजबुज वाचकांसाठी प्रकाशीत करित आहोत.

मायबोली धर्मात प्रामुख्याने ४ प्रकारचे पंथ दिसतात. प्रत्येक पंथाचे आपापले देव आहेत आणि त्या त्या देवांची ते निरनिराळ्या प्रकारे उपासना करतात. एका देवाची पुजा करणारे सामान्यत: इतर देवतांना पुजतांना दिसत नाही. (अपवाद क्र. २ चा)

१. बेफॅक्ल : हा तुलनेने नुकताच स्थापन झालेला पंथ असून सर्वात कट्टरपंथीय म्हणून यांची गणना होते. दिवसभर आपल्या देवाचा अखंड जप, दिवसातून किमान ५ वेळा देवस्तुतीच्या आरत्या म्हणणे, आपल्या देवाने लिहिलेल्या पोथ्या उघडून अहमहिकेने त्यांचे वाचन करणे, देवावर आणि इतर भक्तांवर स्तुतीपर कवने रचणे. आणि महत्वाचे म्हणजे "गोडाचा नैवेद्य" करून तो देवाला दाखवणे आणि मग त्याचे ईतर भक्तांमधे वाटप करणे. या धर्माच्या एक साध्वी तर तोंडावर साखरपाकात बुडवलेले पांढरे कापड लावून फिरतात जेणेकरून आपल्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द शर्करामिश्रीत होऊन बाहेर पडेल व दुसर्याचे मन दुखावणार नाही.

स्पोफॅक्ल : या पंथातील लोकांचे अनेक निरनिराळे देवी-देवता आहे. प्रत्येक देवाच्या हातात काहीना काही आयुधे असतात (जसे की बॅट, बॉल, रॅकेट ई.). हिंदू धर्मात जसे एकच व्यक्ती अनेक देव पूजते तसे इथे देखील एका खेळाच्या देवाबरोबर दुसर्या खेळातील देवाची पूजा केलेली चालते. सतत जपजाप्य, आरती करणे वगैरे गोष्टी यांना विशेष आवडत नाही पण देवभक्ति उफाळून आली की हे लोक लगेच देवस्तुतीचा एक गौरवपर लेख लिहून काढतात. स्पोफॅक्ल च्या लोकांची काही आणखीन लक्षणे म्हणजे हे लोक क्रिस्त धर्मियांप्रमाणे आपल्या देवाला बरेचदा "GOD" म्हणून संबोधतात. आपल्या प्रोफाईल मधे आपल्या देवाचा फोटो आवर्जून लावणे, समान आयुधे हातात असलेल्या देवतांमधे श्रेष्ठ कोण यावरून वाद घालणे हे या भक्तांना विशेष करून आवडते. आवश्यक तेव्हा आपला देव काहीतरी "चमत्कार" करून दाखवेल या गोष्टीवर देखील यांची अढळ श्रद्धा असते.

३. स्लाफॅक्ल : पुण्यातील पुणेकर या ठिकाणी स्थापन झालेल्या या पंथातील लोक स्लार्टीदेवाला मानतात. यांचा देव सध्या अदृश्यावस्थेत असल्याने मधुनच एखाद्या मायबोलीकरा मधे देवाचा अवतार झाल्यासारखे यातील काही काही भक्तांना वाटत असते.
तुकोबा जसे विठ्ठलाला "विठू, विठ्या" असे प्रेमाने बोलवायचे तसेच यांचे भक्त गण स्लार्टीदेवाला प्रेमाने "म्हातारा" म्हणून संबोधतात. अर्थात "म्हातारा" म्हणजे "ज्ञानी" हेच यातून त्यांना अधोरेखीत करायचे असते.
या पंथाची उपासना पद्धती मात्र थोडी वेगळी आहे. आपल्या देवाची आठवण काढत अश्रू ढाळायचे आणि त्याचे सुविचार एकत्रित करून ते पुपुवर पोस्ट करायचे यात अनेक भक्तगण धन्यता मानतात.

४. पाक्ल : हा पंथ पार्ले येथे अस्तित्वात असून अनेक भक्तगण अमेरिकास्थित आहेत. हे लोक एकाही मायबोलीकर देवाला मानत नाहीत. किंबहुना या पंथातील प्रत्येक जण स्वतःला सर्वज्ञ समजत असल्याने जो तो आपापल्या परीने देवत्वाला पोहोचल्यागत गुरुमंत्र देत असतो. नाही म्हणायला येथे सुरू असलेले सतत खाण्याबद्दल बोलणे बघता "अन्नपुर्णा" देवी वर यांची श्रद्धा असावी असे वाटते. दररोज घरी शिजवलेल्या अथवा विकत आणलेल्या अन्नाच्या याद्या प्रसिद्ध करणे आणि तो (नैवेद्य समजून) कसा हादडला याची वर्णने पोस्ट करणे हा यांचा दिनक्रम असतो.

******************************************

मायबोलीवर एक विषय सुरू झाला की तो भरकटत कुठून कुठे जाइल हे कधीच कुणाला सांगता येणार नाही. असाच हा नुकताच घडलेला
"एक अविस्मरणीय संवाद" (खालच्या या प्रगल्भ संवादात, संवाद 'शालेय' वाटू नये म्हणून कोण म्हणाले त्याचे नाव मुद्दामच टाकले नाहीये याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

"तिकडे वाचलात का किस्सा? जंगलात वाघ बघायला गेलेले सगळे..गाडी बंद पडली आणि अचानक समोर वाघ आला. नवरा आणि मित्र म्हणे पटकन गाडीत जाऊन बसले एकट्या बायका पोरांना टाकून. शोभतं का खरच हे असं वागणं? नशीब तरी वाघ काहीएक नं करता नुसता एक कटाक्ष टाकून निघून गेला!"

"कायत्रीच एक एक तर्‍हा अन काय! पुढे कायतर गाडीने पेट घेतला आणि गाडीच आकाशात उंच उडाली."

"पण ट्रीपला जातांना पुरुषमाणूस सोबत हवं वगैरे हट्टच सोडून द्यायला हवेत बायकांनी. बिनधास्त गाडी निकालके जानेका. वाघ दिसल्याच्या भीतीबरोबर नवरा पळपुटा निघाल्याचा वैताग नको. फिकर नॉट! सोबत हवीच असेल तर मला बोलवा."

"आकडा प्लीज!"

"कुठली गाडी होती? टाटांचीच असणार!! मी नुकतेच "कोणती गाडी घ्यावी" वर लिहिलेले या बाबतीत स्वदेशीच्या मागे लागू नये!!"

"हे पहा टाटांना नावे ठेवण्याची काहीएक गरज नाहीये. टाटा घराण्याने फार मोठे योगदान दिले आहे या देशासाठी. मी नुकताच "रतन टाटा - एक आधुनिक कर्मयोगी" या नावाचा लेख लिहिलाय तो बघा."

"बघितला बघितला. सगळी विकी वरची माहिती निव्वळ अनुवाद करून टाकली आहे आणि म्हणे लेख लिहिला!"

"अहो टिकोजीराव स्वत: लिहून दाखवा मग निदान चार ओळी सलग. लोकांची उणीदुणी काढायला हमखास पुढे दिसता फक्त."

"अरे ए काय झ......."

"अश्लिल अश्लिल... अ‍ॅडमिन इकडे लक्ष द्या जरा... इथे लोक वाट्टेल ते बोलू लागलेत."

"लेका कान वाजू लागलेत का तुझे? "काय झगडा चाल्लाय?" म्हटलं तर त्यात अश्लिल काय?"

"लेका म्हणून शिवी घालतोस साल्या. सायबर क्राईमची केस टाकतो तुझ्यावर मग बघच तू!!"

"अय्या किती गोड भांडताय तुम्ही सगळे. भांडण हाही एक मानसोपचाराचाच भाग असतो. मनं मोकळी होतात त्याने."

"आकडा... आ क डा!!"

"विषयाला धरून बोला लोखो."

"आझाद सिनेमात धर्मेंद्रने वाघाबरोबर फायटिंग केली होती. फायटींग सुरू असतांना खुद्द वाघाला सुद्धा तो "कुत्ते कमीने" म्हणून शिवी घालतो. त्याच सिनेमात हेमामालिनीच्या साड्या फारर्रच सुरेख होत्या."

"जबरदस्त किस्स्सा आहे कान्हा किसलीचा. गेले अनेक दिवस कादंबरी साठी विषय डोक्यात होताच हे वाचून विचारांना चालना मिळाली. तेव्हा येत आहे लवकरच माझी नविन कादंबरी "कान्हा किस्ड ली" भारतीय कान्हा आणि चायनीज ली यांची जंगल प्रेमकहाणी."

"वाघांच्या हल्ल्यांना बळी पडणार्‍यातशेतकर्‍यांची संख्या सर्वात जास्त आहे. पण शहरी लोकांना अनुभव आला की लगेच पेपरात गाजावाजा होतो!"

"असाच एक किस्सा माझ्या आतेबहिणीच्या चुलत दीरांबाबत घडला होता. फक्त वाघाच्या जागी वाघीण होती इतकाच काय तो फरक. बाईऽऽगं!! अजुनही आठवलं की अंगावर काटा येतो."

"बाप्रे खरच वाचलेच म्हणायचे ते. तुमच्या आतेबहिणीच्या चुलत दिरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!"

"पण मी म्हणतो समोर वाघ आहे का वाघीण हे अशा प्रसंगी ओळखले तरी कसे हो त्यांनी? काय कुंकू लावले होते का मंगळसुत्र घातले होते तिने म्हणून वाघीण आहे कळलं??"

"हेच....हेच!!संताप येतो खरच!! कधी बदलणार ही मेन्टॅलीटी???? ओ भाऊ मंगळसुत्र आणि कुंकवाच्या जाचक प्रथांचे दिवस संपलेत!! आपल्या बुरसटलेल्या कोषातून बाहेर या एकदा. वाघीणीला कुंकू लावायला निघालेत!!!"

"आकडा... आकडा.. आकडा!! आहे तरी कशावरून सुरू आहे हे सगळे?"

"खरं म्हणजे वाघाला याची देही याची डोळा पाहणे हा अनुभवण्यासारखा एक्सपिरीयन्स असतो. माझ्या मित्राबरोबर आफ्रिकेतल्या जंगलात हिंडत असतांना आम्हाला आफ्रिकन बाभळीच्या झाडाखाली एक वाघिण आपल्या बछड्याला दूध पाजतांना दिसली. वाघिणीचे गर्भारपण अतिशय त्रासाचे असते........."

"बरंका...शिवाजीने लहानपणी वाघिणीचे दूध प्यायले होते म्हणून मोठेपणी ते इतके शूरवीर झाले असे मला कुठेतरी वाचल्याचे आठवते."

"महाराजांचा एकेरी उल्लेख! पुन्हा कराल तर जीभ हासडून टाकीन!! अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे ते."

" ओ लहानपणचा किस्सा आहे तो! तेव्हा शिवाजी महाराज व्हायचे होते ते"

"वाघिणीच्या दूधाचे मसाला दूध कसे बनवायचे कुणी सांगेल का मला? आज कोजागिरी आहे."

"कोजागिरीच्या सर्वांना शुभेच्छा!!"

"येथील काही अनावश्यक प्रतिसाद उडवण्यात आले आहे. तसेच याविषयावर पुरेशी चर्चा झाली आहे त्यामुळे हा बातमी फलक आता बंद करण्यात येत आहे. - अ‍ॅडमिन"

********************************************
काय झाले त्या बीबीवर? अ‍ॅडमिननी जे उडवले त्याचे कुणाकडे स्क्रीनशॉटस आहेत का?

आकडा प्लीज!

(संवाद दुसर्‍या बीबीवर अखंड चालू......)

*********************************************

पुढील वर्षापर्यंत....... क्रमश:

* ही कुजबुज प्रकाशीत करतांना आम्हाला स्वाती आंबोळे उर्फ (सल्लागार) बाई यांची मोलाची मदत झाली. त्यांच्या या मदतीची परतफेड आम्ही पुढच्या कुजबुज अंकात नक्कीच करू.

प्रकार: 
शब्दखुणा: 

हवे.. तडका थोडा कमी वाटतोय.. पण गेल्यावेळेपेक्षा नक्कीच झणझणीत आहे.... आणि प्रकाशित पण इतक्या योग्य वेळेला केलय की सोमवारी जनता आकडा मागणारच..

दिप्स, सायो, धन्यवाद हं , म्हणजे ना... मला किनई आत्ता काय वाट्तय ना, ते नेमक शब्दात नाहि मांडता येत, पण एक आधार मिळाल्या सारख वाटल, खरच खूप खूप आधार मिळाल्यासारख वाटल :(.

हवाहवाई,
हा भाग देखिल सुरेख. वाचुन खुप मजा आली.
मनातला एक कोपरा जिंकलात आज तुम्ही. तुमच्या मेंदूत आंबवलेले विचार खावुन खावुन एका मर्यादेनंतर एक तरल भावावस्था येते. आणि मग हसण्याची परीसिमा गाठली जाते. आता झोपेतही हसत राहीन असे वाटते. Proud

रच्याकने.. बेंबीचा देठ कुठे असतो. ए.भा.प्र.

बेंबीचा देठ कुठे असतो>>>>> ते सुद्धा असामींनी वर म्हंटलय त्या प्रमाणे ती कोणाची आहे त्यावर अवलंबून आहे.

नेहमीप्रमाणेच कुजबुज अगदी खुसखुशीत झालीये. Rofl

१. बेफॅक्ल : हा तुलनेने नुकताच स्थापन झालेला पंथ असून सर्वात कट्टरपंथीय म्हणून यांची गणना होते. दिवसभर आपल्या देवाचा अखंड जप, दिवसातून किमान ५ वेळा देवस्तुतीच्या आरत्या म्हणणे, आपल्या देवाने लिहिलेल्या पोथ्या उघडून अहमहिकेने त्यांचे वाचन करणे, देवावर आणि इतर भक्तांवर स्तुतीपर कवने रचणे. आणि महत्वाचे म्हणजे "गोडाचा नैवेद्य" करून तो देवाला दाखवणे आणि मग त्याचे ईतर भक्तांमधे वाटप करणे. या धर्माच्या एक साध्वी तर तोंडावर साखरपाकात बुडवलेले पांढरे कापड लावून फिरतात जेणेकरून आपल्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द शर्करामिश्रीत होऊन बाहेर पडेल व दुसर्याचे मन दुखावणार नाही. >>>>>>>>एकदा जोटाझापा Biggrin

जबरीच.. नेहेमीप्रमाणे.. संवाद म्हणजे तर कळसच होता. जुन्या कुजबुजा गतस्मृतींना उजाळा देण्यासाठी टाक... जुन्या म्हणजे अगदी सुरुवातीच्या..

मला सगळ्यात आवडले ते हे वाक्य
>>>> "येथील काही अनावश्यक प्रतिसाद उडवण्यात आले आहे. तसेच याविषयावर पुरेशी चर्चा झाली आहे त्यामुळे हा बातमी फलक आता बंद करण्यात येत आहे. - अ‍ॅडमिन" <<<<<

मात्र सध्याचे हितगुजवरचे गोडगोड वातावरण पाहता काजू दिल्यास त्याची लगेच काजूकतली होईल या भितीने प्रस्तुत कुजबुजीतून केवळ खवट शेंगदाणे देण्याचा आमचा इरादा आहे.
या धर्माच्या एक साध्वी तर तोंडावर साखरपाकात बुडवलेले पांढरे कापड लावून फिरतात जेणेकरून आपल्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द शर्करामिश्रीत होऊन बाहेर पडेल व दुसर्याचे मन दुखावणार नाही.
Rofl
अशक्य हसलोय Rofl

एच एच, आपले निरिक्षण अतुलनीय आहे. अख्खा लेख प्रचंड आवडला..... कुजबुजीतून केवळ खवट शेंगदाणे देण्याचा आपला हेतू निश्चितच साध्य झालेला आहे. Happy

<<या धर्माच्या एक साध्वी तर तोंडावर साखरपाकात बुडवलेले पांढरे कापड लावून फिरतात जेणेकरून आपल्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द शर्करामिश्रीत होऊन बाहेर पडेल व दुसर्याचे मन दुखावणार नाही. <<< अशक्य हसले!! Rofl Rofl

<<हाफ कुजबूज.. मारके .. क्रमश: एव्हढी तूफान तर.. बोल्ड डंक कसली नशीळी.. असेल <<,
सुकी.... Rofl

हह...आता लिहायला घ्याच 'बोल्ड डंक'!! Lol

लय भारी लिवता राव. मायबोलीवर लोक ग्रामीण ढंगात गप्पा मारतात. कट्यावर, गप्पागोष्टत खेचतात त्याचा अनुल्लेख बरा नव्ह.

मस्त पुढचा भाग लवकर टाका हं. मी वाट पाहत्ये.

त्या अविस्मरणीय मध्ये मला वाघाचेच वागणे सर्वात संयत व समजुतदार वाट्ले.

Pages