“मिठावरच्या कराची कहाणी आणि The Great Hedge of India”

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 October, 2010 - 11:28

काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपुर्वी म्हणु हवं तर, सकाळी सकाळी आशिषचा फोन आला. आशिष माझा शाळेत असल्यापासुनचा मित्र, सद्ध्या साहेब लंटनला असत्यात. प्रचंड उत्साही माणुस, वाचनाचं भयंकर वेड. सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास म्हणजे त्यावेळी तिथे बहुदा सकाळचे सहा वगैरे वाजलेले असणार. मी चाट पडलो, च्यायला हा माणुस एवढ्या लवकर कसा काय उठला? त्यापेक्षाही मोठा धक्का वाट बघत होता माझी....

"अबे विशल्या, झोपलोच नाही बे काल रात्री."

"का बे आश्या, नवीन पुस्तक मिळ्ळं की काय तुला?" आश्या रात्रभर जागतोय म्हणजे दुसरे काही कारण असुच शकत नाही.

"येस राजे, भन्नाट पुस्तक हातात पडलं काल. रात्रभर बसुन वाचून काढलं. तिथे मिळालं तर बघ. नाव आहे " The Great Hedge of India" लेखक आहे "Roy Moxham". वाचुन काढ.

आता आली का पंचाईत. आमचं इंग्रजी वाचन फार फार चेतन भगत वाचण्याच्या लायकीचं आणि हा माणुस चक्क रॉय मॉक्...मॉक्स...मॉक्सहॅम की काय (कसलं अवघड नाव, उच्चारतानाच फेफे उडतेय) नावाच्या लेखकाचं पुस्तक वाचायला सांगतोय. पण आश्याला नाही म्हणायचं म्हणजे स्वतःचीच लायकी काढुन घ्यायची, त्यापेक्षा "बरं, बघतो मिळालं इथे कुठे तर! म्हणुन रिकामा झालो. साहेबांनी फोन ठेवला. मी विसरून गेलो. दोन आठवड्यापुर्वी परत आश्याचा फोन...

"वाचलंस का बे?"

आता मात्र ठरवलं, गंभीरपणे शोधायला हवं आणि शोधायला लागलो तर मॉक्सहॅम साहेब आमच्या बेलापूरच्या लायब्ररीतच सापडले. म्हणलं चला विकत घेण्याचा खर्च वाचला. ते पुस्तक आणि डिक्शनरी जवळजवळ ठेवून वाचायला बसलो,. माझ्याही नकळत कसा त्यात गुंतत गेलो कळालेच नाही. एका ब्रिटीश भटक्या संशोधनाने भारतात येवुन घेतलेला , आता अस्तित्वात नसलेल्या एका अचाट गोष्टीचा शोध हा या पुस्तकाचा विषय आणि पुस्तक वाचताना मिळत गेलेली गोर्‍या साहेबाच्या या अचाट आणि अफाट करणीची माहिती थक्क करुन टाकत गेली. तेव्हाच ठरवलं यावर लिहायलाच हवं. (पुस्तक विकत घेण्याचा विचारही तेव्हाच पक्का झाला मनात.)

यावर लिहायचं म्हणल्यावर दोन वेळा पुस्तक वाचून काढलं आणि लक्षात आलं की याचं भाषांतर करणं ’अपने बस का रोग नही’. साहजिकच मग आधी गुगल आणि तिथुन विकिपिडीया कडे मोहरा वळवला. अपेक्षेप्रमाणे तिथे भरपुर आणि सोप्या शब्दातली माहिती हातात आली. आता मला तिचं मराठीकरण करणं सोपं होतं.

"The Great Hedge of India"


मुळात 'हेज' या इंग्रजी शब्दाला मराठी पर्याय शोधण्यापासुन आमची सुरूवात होती. आपण घराभोवती बोगनवेल किंवा तत्सम वनस्पतींचे जे दाट कुंपण उभे करतो त्याला बहुदा इंग्रजीमध्ये हेज म्हणत असावेत. कारण गुगलमध्ये हेज म्हणुन सर्च दिल्यावर अशीच चित्रे गुगलने मला दिली. नेमका एक दिवस मंदारचा फोन आला (जोशांचा नव्हे) माझा जुना मित्र, तो नागपुरचा आहे. त्याला विचारले तर म्हणाला, "भाऊ, त्याला बागड म्हणतात ना बेSSS!"

बागड

या फ़ोटोवरुन काहीच अंदाज येत नाही ना, असं काय विशेष मग या बागडीमध्ये.
ठिक्कै, पुढचे फ़ोटो बघितल्यावर येइल कल्पना ....

"बागड" भन्नाटच शब्द आहे नाही. अर्थात जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती यापेक्षाही भन्नाट आहे, अचाट आहे , अफाट आहे. जर मी तुम्हाला सांगितले की अशी जवळजवळ १४२९ मैल (म्हणजे साधारण २३०० किमी) लांबीची बागड भारतात उभी केली होती, ती सुद्धा जवळपास १२ फुट उंचीची (३.७ मिटर) आणि जवळपास तेवढ्याच रुंदीची....., तर तुम्ही मला वेड्यातच काढाल. पण हे सत्य आहे, अशी २३०० किमी लांब आणि १२ फुट उंचीची बागड एकेकाळी भारतात अस्तित्वात होती.

खालील फोटो बागड या प्रकाराचा प्रत्यक्ष अनुभव देवू शकतील

बागडीचे खरेखुरे फ़ोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण या फ़ोटोवरून ’बागड’ या शब्दाचे स्वरुप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवु शकेल.

आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल? हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल. ही बागड त्यावेळच्या इनलँड कस्टम्स लाईन (Inland Customs Line) चा एक हिस्सा होती. त्याकाळी १८०३ साली ब्रिटीशांनी भारतातील मिठाचे स्मगलींग रोखण्यासाठी आणि मिठाच्या वाहतुकीवर टॅक्स आकारण्यासाठी म्हणुन तत्कालिन पंजाबपासुन (मुलतान :आताचे पाकिस्तान) ते थेट ओरीसा प्रांतातील सोनापूर या गावापर्यंत ही इनलॅंड कस्टम्स लाईन उभी केली होती. एकुण २५०० मैल (४००० किमी) लांबीची ही कस्टम्स लाईन म्हणजे भारतीयांच्या हक्कांवर आणि मुक्त व्यापार नीतीवर लागलेल्या बंधनाचे अवाढव्य असे मुर्त स्वरुप होते. त्या काळी या कस्टम्स लाईनची चीनच्या भिंतीशी देखील तुलना केली गेली. मिठाची चोरी करणार्‍या तस्करांना रोखण्यासाठी म्हणुन ब्रिटीशांनी ही कस्टम्स लाईन डेव्हलप केली. १८७२ पर्यंत इनलँड कस्टम्स डिपार्टमेंटने कस्टम ऑफिसर्स, जमादार आणि गस्त घालणारे सामान्य रक्षक असे जवळपास १४००० च्या आसपास लोक या कस्टम्स लाईन्सच्या संरक्षणासाठी म्हणुन तैनात केले होते. सन १८७९ मध्ये मिठाच्या आंतरदेशीय आयात्-निर्यातीवर टॅक्स लावला गेला जो सन १९४६ पर्यंत लागु होता. हाच मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची ती जगप्रसिद्ध दांडी यात्रा काढली होती जिचा उल्लेख पुढे येइलच.

१८२३ मधील भारताचा नकाशा (आताच्या पाकिस्तानसह)

सन १७८० मध्ये तत्कालिन इस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल सर वॉरन हेस्टिंग्ज याने भारतातील मुख्य मिठ उत्पादकांना बंगालमध्ये कंपनीच्या नियंत्रणाखाली एकत्रित आणले. त्यामुळे तोपर्यंत मीठाच्या आयात्-निर्यातीवर असलेला ०.३ रुपये प्रति ३७ किलोचा कर थेट ३.२५ रुपये प्रती ३७ किलो (३७ किलो= एक मौंड/माउंड) इतका वाढला आणि त्यातून कंपनीला अगदी सन १७८४-८५ साली जवळपास ६२ लाख ५७ हजार चारशे सत्तर रुपयाची (त्या काळचे) निव्वळ करप्राप्ती झाली. त्यावेळच्या चलन दरानुसार हा कर म्हणजे दरडोइ साधारण २ रुपये प्रतीवर्ष (त्यावेळच्या मजुरांचा दोन महिन्याचा पगार) एवढा होता. मिठावर टॅक्स इतर प्रांतातही होते, पण बंगालमध्ये तो उच्चतम होता. साहजिकच हा टॅक्स वाचवण्यासाठी त्याची तस्करी, चोरी असे प्रकार सुरू झाले. बंगालच्या आसपासच्या राज्यातुन मिठ तस्करीच्या मार्गाने बंगालमध्ये आयात केले जावु लागले. त्यामुळे ब्रिटीशांच्या सरकारी मिठाच्या धंद्यावर, त्याच्या उत्पन्नावर प्रचंड प्रमाणात परिणाम झाला. हा परिणाम रोखण्यासाठी, या खजिन्याचे रक्षण करण्यासाठी, त्याकाळी मग मिठाच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी व मिठ तस्करांना रोखण्यासाठी हि ४००० किमी लांबीच्या आंतरदेशीय सीमा रेषेची कल्पना अस्तित्वात आली. त्याकाळी ही कस्टम्स लाईन ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीच्या अखत्यारीत होती. नंतर १८५७ च्या बंडानंतर जेव्हा इंग्लंडच्या राणीच्या हातात सत्ता गेली तेव्हा ब्रिटीश सरकारने या कस्टम्स लाईन ची जबाबदारी आपल्या ताब्यात घेतली. या लाइनची एकुण लांबी तत्कालीन लंडन ते इस्तंबुल एवढ्या अंतराची होती.

वरील फ़ोटोत दाखवलेला हिरवा पट्टा म्हणजे ती विलक्षण बागड आहे. या फ़ोटोत तिच्या आकाराची, लांबीची प्रत्यक्ष कल्पना येते.

१८०३ मध्ये पंजाबपासुन ते थेट ओरिसापर्यंत ही कस्टम्स लाईन उभी करण्यात आली. दर २५ किमीवर कस्टम ऑफीसेस उभारण्यात आली. गस्ती सैनिक, कस्टम अधिकारी व हजारो मजुर या कामासाठी नेमण्यात आले. तत्कालीन पंजाबमधील तारबेला (मुलतान)पासुन ते ओरीसामधील सोनापूरपर्यंत पसरलेली कस्टम्स लाईन म्हणजे ब्रिटीशांच्या दुरदृष्टीचे आणि व्यवहारी, व्यापारी वृत्तीचे एक विलक्षण उदाहरण होते.

असो आपल्या लेखाचा विषय हा नाहीये, आपल्या लेखाचा विषय आहे तो या कस्टम लाईनचा हिस्सा असलेली जवळपास २३०० किमी लांबीची दाट वनस्पतींपासुन बनवलेली आणि १२ फुट उंचीची घनदाट, लांबच्या लांब बागड. नक्की साल नाही सांगता येणार आता पण साधारण १८४० च्या सुरुवातीला ही बागड उभारण्यास सुरूवात झाली असावी. १८६८ पर्यंत जवळ जवळ २९० किमी लांबीच्या बागडीची निर्मीती पुर्ण झाली होती. या बागडीत त्यावेळी सुक्या वनस्पतींचा म्हणजे काटेरी झाडे, वेली यांचा समावेश असे आणि त्यामुळे या बागडीला तेव्हा पांढर्‍या मुंग्या, (वाळवी), उंदीर, आग, वादळ, नैसर्गिक क्षय ई. कारणांमुळे विनाशाची भीती होतीच.

तत्कालिन आंतर्देशीय कस्टम्स कमिशनर अ‍ॅलन ऑक्टेव्हिअन ह्युम यांनी मांडलेल्या अंदाजानुसार साधारण एक मैल लांबीची सुक्या वनस्पतीपासुन उभारण्यात आलेली बागड तयार करण्यासाठी २५० टन सुकलेल्या वनस्पती, काटेरी झाडे, वेली असे सामान लागत असे. आणि ते किमान ५-१० किमी अंतरावरून वाहून आणावे लागत असे. आणि दरवर्षी किमान अर्ध्याहुन अधीक वनस्पती, काटे-कुटे बदलावे लागत. या सगळ्या गोष्टी आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ यावर होणारा खर्च अफाटच होता. त्यामुळे जिवंत बागडीच्या कल्पनेला साकार रुप आले. म्हणजे केवळ काटे-कुटे, सुकलेल्या वनस्पती यांचे कुंपण उभे करण्यापेक्षा तिथे हिरव्या वनस्पतींची लागवड करण्याचा (रोपणी) विचार केला गेला.

अ‍ॅलन ऑक्टेव्हिअन ह्युम

१८६९ च्या सुरुवातीस जिवंत बागडीच्या लागवडीसाठी सर ह्युम यांनी वेगवेगळ्या काटेरी वनस्पतींची प्रायोगिक तत्त्वावर (कस्टम्स लाईन्सवर) लागवड करण्यास सुरूवात केली. त्यात सुरूवातीला भारतीय जातीची बोर, बाभुळ, करवंद अशा अनेक काटेरी झाडांची लागवड करण्यात आली.

जिथे इतर काहीच उगवत नसे अशा ठिकाणी बांबुची रोपे लावण्यात आली. जिथे जमीन खराब होती किंवा लागवडीच्या दृष्टीने कमी दर्जाची होती, तेथली माती खणून काढून तिथे चांगली माती टाकण्यात आली. या बागडीला नियमीत पाणीपुरवठा करण्यासाठी पावसाचे पाणी साठवण्यासाठी विहीरी बांधण्यात आल्या, आजुबाजुच्या खाड्यांचे पाणीदेखील बागडीसाठी म्हणुन वळवण्यात आले आणि त्याचबरोबर बागडीच्या पुर्ण लांबीएवढी पक्की सडक बांधून काढण्यात आली. उत्तरेतील सिंधू नदीच्या तीरावरील लाय्याहपासुन ते बुर्‍हाणपुरापर्यंत हि जिवंत बागड उभी करण्यात आली होती.

सन १८७० मध्ये सर अ‍ॅलन ह्युम यांच्याकडुन सर्व सुत्रे पुढील सहा वर्षाकरता जी.एच्.एम. बॅटन यांचाकडे गेली. बॅटनने बागडीची लांबी वाढवण्याचे कार्य आपल्या हातात घेतले. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षात बागड आणखी १११.२५ मैल लांबवण्यात आली. बॅटनने आणखी एक महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे जिथे जिवंत बागडीची लागवड करणे शक्य नव्हते तिथे त्याने पक्के दगडी बांधकाम (भिंती) उभारल्या किंवा खोल असे खंदक बांधुन घेतले. ज्यामुळे १८७३ च्या दरम्यान आग्रा आणि दिल्ली यांच्या मधला भाग जवळ जवळ अभेद्य बनला होता. त्यानंतर बागडीची रचना (जागा) थोडीशी हलवुन ती नव्याने निर्माण झालेल्या आग्रा कालव्याच्या किनार्‍याने पुढे वाढवण्यात आली. सन १८७८. बॅटनच्या नंतर डब्लु. एस. हल्से यांनी बागडीच्या शेवटच्या टप्प्याचे काम जवळपास पुर्णत्वास नेले. या काळापर्यंत बागड तिच्या पुर्ण आकारास पोहोचली होती. या वेळेपर्यंत या पुर्ण वाढ झालेल्या बागडीची लांबी जवळजवळ १८०० मैल इतकी वाढली होती. हे काम असेच पुढे चालु राहीले. कस्टम लाईन आणि बागडीच्या रक्षणासाठी (देखभालीसाठी म्हणु हवे तर) खुप मोठ्या संख्येने मनुष्यबळाची आवश्यकता होती. या कामावरील वरीष्ठ अधिकारी सोडले तर इतर बहुतांश कर्मचारी हे भारतीयच होते. १८६९ मध्ये सरकारने जवळपास १४,००० लोकांची नियुक्ती या कामासाठी केली होती. इथेही ब्रिटीश अधिकार्‍यांनी आपले डोके चालवले होते. बागडीच्या भारतीय कर्मचार्‍यापैकी ४२% एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी हे मुस्लीम होते. त्यांना जाणीवपुर्वक त्यांच्या राहत्या जागेपासुन दुर अंतरावरील ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते जेणेकरून आजुबाजुच्या लोकांत त्याची फारशी लोकप्रियता वाढून त्याचा गैरवापर होवु नये. आजुबाजुच्या खेड्यातील लोकांशी सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी खेडुतांना या सीमेवरुन दोन पौंड मिठ मोफत (कुठलाही कर न आकारता) घेवुन जाण्याची मुभा देण्यात आली होती.

हे काम करण्यासाठी लोक उत्सुक असत कारण या कामासाठी त्यावेळच्या निर्धारीत पगारापेक्षा खुप जास्त असा पगार दिला जात असे. रक्षकांना रुपये पाच (५.००) प्रति माह आणि माळी लोकांना रुपये तीन (३.००) प्रति माह. पण सुरूवातीला या कर्मचार्‍यांना आपली कुटूंबे बरोबर बाळगण्याची परवानगी नव्हती. त्यांना घरे ही पुरवली जात नसत, ती त्यांनी आपापल्या खर्चाने माती, लाकुड यांच्या साह्याने बांधुन घ्यावी लागत. १८६८ मध्ये कस्टम्स खात्याने त्यांना आपली कुटुंबे बरोबर आणण्याची परवानगी दिली. हे कर्मचारी १२-१२ तासांच्या दोन समान पाळ्यांमध्ये काम करत. बागडीची पर्यायाने कस्टम्स लाईनची देखभाल आणि गस्त ही मुख्य कामे होती.

अधिकारी वर्ग मात्र मुख्यत्वे करुन ब्रिटीशच असे. खरेतर ब्रिटीशांनी भारतीयांना या पोस्टसाठी आकर्षित करण्याचे खुप प्रयत्न केले. पण या उच्च नेमणुकीसाठी उच्च दर्जाचे इंग्रजी बोलता येणे ही महत्त्वाची अट असल्याकारणाने त्यात ते अयशस्वी ठरले. कारण चांगले इंग्रजी येणार्‍यांना त्या काळात इतर नोकर्‍यात इथल्यापेक्षाही जास्त पैसा मिळत होता. प्रत्येक अधिकार्‍याच्या हाताखाली किमान १०० माणसे आणि ११० ते ३० मैलाच्या कस्टम्स लाईनची जबाबदारी असे, त्यामुळे काम अतिषय कष्टाचे आणि कठीण होते. विशेष म्हणजे अशा ठिकाणी तो अधिकारी हा एकटाच ब्रिटीश असे, दुसर्‍या एखाद्या ब्रिटीश व्यक्तीला भेटण्यासाठी त्याला त्याच्या अखत्यारीतील भाग ओलांडून जावा लागत असे. अशा कठीण परिस्थितीत ब्रिटीश अधिकारी त्यावेळी काम करत, खरे खोटे तेच जाणोत पण ते जर खरे असेल तर मग मनापासुन दाद द्याविशी वाटते आणि म्हणावसं वाटतं "उगीच नाही ब्रिटीशांनी अर्ध्या जगावर राज्य केलं!"

खरेतर बरेचसे ब्रिटीश अधिकारी ही कस्टम लाईन आणि अर्थातच बागडही नष्ट करायच्या विचाराचे होते. कारण तिच्यामुळे भारतीय उपखंडातील मुक्त व्यापारव्यवस्थेला तसेच पर्यंटनाला मोठ्या प्रमाणावर बाधा येत होती. ही सीमा रेषा खासकरून मिठ आणि साखर यांच्या आयात निर्यातीवर कर आकारण्यासाठी उभी करण्यात आलेली होती. साखरेवर तर उत्पन्नाच्या १०% इतका प्रचंड कर लावण्यात येत असे. पण त्या दरम्यानही भ्रष्टाचार आणि मनमानीपणाचा रोग या बागडीलाही होताच. बागड आणि सीमा रेषेवर तैनात अधिकारी मनमानी कारभार करत. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला होता. १८५७ च्या बंडाच्या दरम्यान काही ठिकाणी बागड तसेच सीमा अधिकार्‍यांच्या छावण्या जाळण्यातही आल्या होत्या. पण या सीमारेषेवर (बागडीवर) मिळणारे कराचे प्रचंड उत्पन्न इतर कुठल्याही समस्येकडे डोळेझाक करायला लावण्यास समर्थ होते. हि बागड तसेच सीमारेषा पुर्णपणे नष्ट करण्यापुर्वी भारतातील मिठाच्या सर्व उत्पादनावर ताबा मिळवण्याचा ब्रिटीश सरकारचा प्रयत्न होता.जेणेकरुन मिठाच्या उत्पादनावरच कर लावता आला असता.

लॉर्ड मायो आणि लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या कारकिर्दीत ही सीमा रेषा आणि बागडीचे अस्तित्व संपवण्याच्या कामाला वेग आला. नंतर लॉर्ड लिटन यांनी लागु केलेल्या कायद्यानुसार मिठावरील टॅक्स बर्‍यापैकी कमी करण्यात आला. बंगालमध्ये २.९० रुपये आणि शेष भारतात २.५० रुपये इतका. तत्कालीन सरकारचे भारतातील अर्थमंत्री सर जॉन स्ट्रॅशे यांच्या प्रयत्नांना यश येवून सन १८८० मध्ये मिठाच्या आयातीवरचा कर रद्द करण्यात आला आणि मुक्त व्यापाराला चालना मिळाली, ज्याचा फायदा मिठाची तस्करी नष्ट होण्यात झाला. सन १८८२ मध्ये लॉर्ड रिपन यांनी संपुर्ण भारतासाठी एकच दर लागु केला तो म्हणजे रुपये दोन (२.००) प्रति मौंड (३७ किलो). ज्यामुळे सरकारला जवळजवळ १.२ दशलक्ष रुपये दरसाल एवढे नुकसान सहन करावे लागले.

यामुळे मिठाच्या तस्करीला मात्र पुर्णपणे आळा बसला. म्हणजे गंमत बघा ज्या कारणासाठी बागड आणि एवढी विस्तृत सीमा रेषा उभी करण्यात आली होती, त्याच कारणाने ती नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली. जे तस्कर सीमा विभागातर्फे पकडले गेले त्यांना आठ रुपये (८.००) एवढा प्रचंड दंड आकारण्यात आला आणि जे तेवढा दंड भरु शकत नव्हते त्यांना सहा आठवड्याची कैद भोगावी लागली. म्हणजे व्यापारी ब्रिटीशांनी त्यातूनही पैसा कमावला. ब्राव्हो....! १८६८ पासुन १८७८ पर्यंत दहा हजाराच्या आसपास लोक तस्करीच्या आरोपाखाली पकडले गेले. लाच देवुन किई जण निसटले असतील त्यांची संख्या अनुत्तरीतच आहे. तस्करीचे अनेक प्रकार त्या काळात हाताळले गेले. सुरुवातीच्या काळात उंटावर किंवा घोड्यांवर मीठ लादुन शस्त्रांच्या जोरावर सीमा रेषा जबरदस्तीने ओलांडली जात असे. नंतर सीमा अधिकार्‍यांच्या भ्रष्ट वृत्तीचा फायदा घेवून लाच वगैरे देवुन करमुक्त भागातून मिठाची तस्करी करण्यात येत असे.

१८८८ साली चांदीच्या घसरलेल्या भावामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मिठावरचा टॅक्स परत २.५० रुपये प्रति मौंड इतका वाढवण्यात आला. मिठावरचा कर हे आता ब्रिटीश सरकारसाठी निव्वळ कमाईचे साधन बनले ज्याने १९३० सालच्या मिठ सत्याग्रह आंदोलनाला प्रेरणा दिली. महात्मा गांधींनी या मिठाच्या करामुळे आपली असहकाराची चळवळ चालु केली. १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधींनी जवळ जवळ ८०,००० जनतेच्या साथीने अहमदाबादपासुन ३२० किमी अंतरावर असलेल्या दांडी या मिठाचे उत्पादन होणार्‍या समुद्रकिनार्‍यावरील खेड्यात ब्रिटीशांचा मिठाचा कायदा मोडत मिठ सत्याग्रहाची सुरूवात केली.

दांडीयात्रा : बापुंचा मिठ सत्याग्रह

बापुंची हि यात्रा भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत दांडीयात्रा म्हणुन लोकप्रिय झाली. या मिठ सत्याग्रहाने जरी मिठावरील टॅक्स कमी अथवा रद्द करण्यात अपयश आले असले तरी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा दिला. असहकाराचा नवा मंत्र दिला. शेवटी १९४६ च्या ऑक्टोबर महिन्यात भारताच्या पं. जवाहरलाल नेहरुंच्या नेतृत्वाखालील तत्कालिन हंगामी सरकारने मिठावरील कर पुर्णपणे रद्द केली. खर्‍या अर्थाने आंतरदेशीय सीमा रेषा त्याचवेळी नष्ट झाली असे मानता येइल.

रॉय मॉक्सहॅम :

इतक्या मोठ्या प्रमाणावर उभारली गेलेली असुनही या सीमारेषेचे किंवा बागडीचे वर्णन तत्कालीन इतिहासात किंवा ब्रिटीश अहवालातही आढळत नाही. १९ व्या शतकात, एक ब्रिटीश लायब्ररीयन कम Conservator रॉय मॉक्सहॅम याच्या वाचनात एकदा भारतातील या अवाढव्य बागडीची माहिती आली आणि रॉयने स्वतःला भारतातील या बागडीच्या संशोधनात वाहुन घेतले. या साठी रॉयने भारताच्या एकुण तीन फेर्‍या केल्या. प्रत्येक वेळी तो जवळपास ३-४ महिने भारतात राहीला. भारताच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या अवस्थेत, पडेल त्या परिस्थितीते भटकला. पहिल्या दोन दौर्‍यात त्याला या बागडीच्या सद्ध्याच्या अवस्थेबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. मुळात अशी काही गोष्ट अस्तित्वात होती हेच इथे कुणाला माहीत नव्हते. त्याच्या तिसर्‍या आणि शेवटच्या फेरीत मात्र रॉयला एक वृद्ध व्यक्ती भेटली जिने तिच्या तरुणपणात एका व्यक्तीला कस्टम्स लाईनबद्दल बोलताना ऐकले होते. तेवढ्याशा सुतावरुन रॉयने अक्षरशः स्वर्ग गाठला आणि त्या व्यक्तीला शोधुन काढले आणि शेवटी आता अस्तित्वात नसलेल्या कस्टम लाईन उर्फ सीमारेषेची जागा शोधुन काढली. त्यावेळी तिथे फक्त एक लांबपर्यंत पसरलेला उंचवटाच उरला होता. अखेरीस रॉयने आपल्या या संशोधनाची जगावेगळी कहाणी लिहून काढली आणि त्यामुळे जगाला कळाले की अशी काही अद्वितीय गोष्ट ब्रिटीशांनी भारतात उभी केली होती. अर्थातच त्यामागची काळी बाजुही उजेडात आली.

रॉय, तुझे प्रयत्न आणि जिद्द यामुळे ब्रिटीशांनी भारतीयांवर केलेल्या एवढ्या मोठ्या अन्याय, अत्याचाराची ही कहाणी उघडकीस आली. तुझे शतशः आभार. पण त्या बरोबरच ब्रिटीशांच्या कल्पकतेलाही मनापासुन सलाम.

संदर्भ : द ग्रेट इंडीयन हेज : विकीपिडिया

तळटिप : पुस्तकातील उतार्‍यांचे भाषांतर करणे मलातरी शक्य नसल्याने मी विकीपिडियाचा आधार घेतला. त्यातही बर्‍याच चुका झाल्या असण्याची शक्यता आहे. सुचनांचे आणि वाचकांना या संदर्भात असलेल्या अन्य माहितीचे मनापासुन स्वागत. बाकी विस्तृत माहिती वरील दुव्यावर उपलब्ध आहेच.

विशाल कुलकर्णी.

गुलमोहर: 

शाबास , हा रॉय, आशिष, अन तू तिघांचेही विशेष आभार. अन्यथा आपल्याच देशातल्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. खूप वेगळा विषय.

शप्पथ ! हे माहितीच नव्हते. कोठेच वाचनात आले नव्हते. आता हे पुस्तक वाचलेच पाहिजे मिळवून. धन्स रे माहिती शेअर केल्याबद्दल Happy

फारच भारी फंडा होता की हा... म्हणजे जर हे चुकूनही तसेच राहिले असते तर काहीतरी विचित्रच भारत तयार होण्याची शक्यता होती..

तत्कालीन सरकारचे भारतातील अर्थमंत्री सर जॉन स्ट्रॅशे यांच्या प्रयत्नांना यश येवून सन १९८० मध्ये मिठाच्या आयातीवरचा कर रद्द करण्यात आला>>. हे १८९० तरी असेल किंवा १८८० तरी.. १८८० च असावे बहुतेक..

British India's Finance Minister, Sir John Strachey, subsequently led a review of the tax system and his recommendations, implemented by Lord Lytton, resulted in the increase of the salt tax in Madras, Bombay and northern India to 2.5 rupees per maund and a reduction in Bengal to 2.9 rupees.[47] The small difference between the tax bands made smuggling uneconomical, and allowed for the abandonment of the Inland Customs Line on 1 April 1879.[47] Strachey's tax reforms continued and he brought an end to import duties and almost complete free trade to India by 1880 .

ते १८८० च आहे हिम्स Happy
धन्स मित्रहो Wink

विशालराव, वा छान माहिती! तर ही बागड नष्ट होण्याचे नेमके कारण काय? तस्करी थांबली म्हणुन का ब्रिटीशांनी ती स्वतः उध्वस्त केली?

छान माहिती. पण एवढी झाडी नष्टच केली एकदम. की नामोनिषाण नाही राहिलं. कुणी कधी काही एकलं पण नाही या बागडी बद्दल ?

रॉय, तुझे प्रयत्न आणि जिद्द यामुळे ब्रिटीशांनी भारतीयांवर केलेल्या एवढ्या मोठ्या अन्याय, अत्याचाराची ही कहाणी उघडकीस आली. तुझे शतशः आभार. >>> तुमचे पण माहिती आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल....

भारी हा .... १९८० चुकुन टंकल्या गेलय, ते १८८० असाव. बाकी सगळी माहिती नविनच आहे ...

आशिषचेही अभिनंदन !!!

विदे,बदल केलाय, ती टायपो होती. सगळ्यांचे आभार.
गौतम, त्याची कारणे पण लिहीनच सद्ध्या थोडा इतर कामात व्यस्त आहे. दुपारी किंवा संध्याकाळी वेळ काढून लिहीन. तोपर्यंत हवे असल्यास विकीच्या दुव्यावर पाहा तिथे सर्व कारणे दिली आहेत.
सर्वांचे मनःपूर्वक आभार !

@फुलपाखरू,
झाडी नष्टच केली गेली, कारण कर जवळाजवळ रद्दच करून टाकल्यावर तिची अडचणच होवू लागली होती. त्यामुळे देश दोन भागात विभागला गेला होता. मुक्त व्यापार व्यवस्था आणि पर्यटन ला अडथळा येवु लागला. त्यात कर रद्द केल्याने मिळणारे उत्पन्न बंद झाले आणि बागडीच्या देखभालीसाठी, रक्षणासाठी लागणारा खर्च ब्रिटीश सरकारला परवडेनासा झाला त्यामुळे कदाचित त्यांनी सर्व बागड उध्वस्त केली होती. अर्थातच ब्रिटीशांनी भारतातील सामान्य जनतेवर केलेल्या अन्यायाचाही तो खुप मोठा पुरावा होता, कदाचित त्यामुळेही तो त्यांनी नष्ट केला असावा. Happy

सही आहे लेख!! Happy
काही महिन्यांपूर्वी याबद्द्लच 'लोकसत्ता' मधे लेख वाचलेला आठवतो आहे.
याच प्रचंड चिकाटीने ब्रिटीशांनी भारतात कितीतरी प्रचंड गोष्टींची निर्मीती केली.

विशाल.. मस्तच रे. हे पुस्तक वाचायलाच हवं. इतका अभ्यास अन इतकी छान माहीती तुझ्याकडूनच वाचायला मिळावी रे मित्रा... Happy

याच प्रचंड चिकाटीने ब्रिटीशांनी भारतात कितीतरी प्रचंड गोष्टींची निर्मीती केली. << अगदी खरं आहे रे आगाऊ, त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रेल्वे सुविधा, बहुसंख्य हिल स्टेशनचा विकास .. आज भारतीय रेल्वे रोजगार उपलब्धी मधे नं एक आहे.

विशालजी, सुंदर लेखाबद्दल व माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
"मिठाचा सत्याग्रह" म्हणजे गांधीजीनी ब्रिटिशाना अवघड जागी काढलेला चिमटाच होता म्हणायचा!
मिठाची तस्करी रोखण्यासाठी ब्रिटीशानी दाखवलेली जागरुगता व केलेली उपाययोजना यांची सोन्याच्या तस्करीबाबत [ज्याच्यामुळे काळ्या पैशांची समांतर अर्थव्यवस्था अस्तित्वात आली ] नंतर आपल्या शासनाने केलेल्या ढीसाळपणाशी तुलना केल्याशिवाय राहवत नाही !

Pages