मनोरंजनाचे घेतले व्रत - १: ऋषिकेश मुखर्जी

Submitted by मंदार-जोशी on 21 October, 2010 - 09:15

हिंदी चित्रपटसृष्टी मोठी करण्यात ज्या अनेक गुणी बंगाली कलावंतांचा सिंहाचा वाटा आहे त्यातलंच एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे ऋषिकेश मुखर्जी.

मी त्यांचा पहिला बघितलेला चित्रपट म्हणजे गोलमाल. मग आनंद, नरम गरम, रंग बिरंगी वगैरे चित्रपट बघण्यात आले. लहानपणी ज्याला त्यावेळी दूरदर्शन संच उर्फ टी.व्ही. म्हणत आणि कालांतराने ज्याचा इडीयट बॉक्स झाला तो नुकताच घरी आलेला होता. त्यावेळेला रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर लागणारा हिंदी सिनेमा हे मुख्य आकर्षण होतं. सिनेमा बघायचा, हसायचं किंवा रडायचं, नट-नट्यांच कौतुक करायचं एवढंच त्या काळी समजत होतं. दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार वगैरे शब्द डोक्यावरून जायचे. सिनेमा या माध्यमाची जाण आल्यावर जेष्ठांच्या सल्ल्याने जरा डोळसपणे चित्रपट पाहू लागलो आणि पुन्हा नव्याने जेव्हा हे चित्रपट पाहिले तेव्हा उत्सुकता चाळवली गेली की अतिशय साध्या साध्या गोष्टी इतक्या मनोरंजक पद्धतीने सादर करणारा हा 'दिग्दर्शक' आहे तरी कोण? अर्थातच मग चित्रपट बघण्याची सुरवात श्रेयनामावली नीट बघण्यापासून झाली आणि या जादूगाराचे नाव समजलं.

मूळचे कलकत्त्याचे असलेल्या मुखर्जी यांनी सुरवातीला पोटापाण्याच्या सोयीसाठी काही काळ प्राध्यापकी केली. पण चित्रपटक्षेत्रात नाव कमवायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. आजच्यासारखेच त्याकाळीही अनेक तरूण आवड आहे, गती आहे म्हणून या बेभरवशाच्या आणि तूलनेने स्थिरता नसलेल्या धंद्यात उडी मारत तशी त्यांनीही मारली ती बी. एन. सरकार यांच्या कलकत्ता मधल्याच न्यु थियेटर्स मध्ये कॅमेरामनची नोकरी पत्करुन. काही काळ कॅमेरामन म्हणून काम केल्यावर त्यांनी त्याच ठिकाणी संपादनकौशल्य आत्मसात केलं, ते कैंचीदा म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्या काळच्या प्रख्यात सिनेसंपादक सुबोध मित्तर यांच्याकडे. अखेर ते ज्या संधीची वाट बघत होते ती संधी चालून आली. त्यांचा बिमल रॉय यांच्या सिद्धहस्त मार्गदर्शनाखाली सहाय्यक दिग्दर्शक या नात्याने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश झाला.

दिलीप कुमार, किशोर कुमार, केष्टो मुखर्जी, सुचित्रा सेन, उशा किरण, दुर्गा खोटे या आणि अशा अनेक कलाकारांचा भरणा असलेला मुसाफिर (१९५७) हा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर 'आपटला' असला, तरी त्यांच्या दिग्दर्शनकौशल्याला त्यांच्या दुसर्‍या चित्रपटाने, म्हणजेच राज कपूर नायक असलेला अनाडी (१९५९) या सिनेमानेच लोकमान्यता लाभली. अनाडी प्रचंड लोकप्रिय झाला आणि त्याने प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचीही वाहवा मिळवली. त्या वर्षीचा उत्कृष्ठ दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांचेच गुरू बिमल रॉय यांनी पटकावला, पण अनाडी सिनेमाला व त्याच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या कलावंतांना मिळून असे पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. या धवल यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

दु:खांत किंवा गंभीर सिनेमा म्हणजे एक तर अडीच-तीन तास प्रेक्षकाला धो धो किंवा मुळुमुळु - ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार - रडवायचं किंवा प्रेक्षकाला लांsssब चेहरा करून बसायला भाग पाडायचं या त्याकाळच्या (आणि कमी-अधिक प्रमाणात आजच्याही) चित्रपटीय प्रथेला म्हणा किंवा समजाला म्हणा, मुखर्जी यांचे चित्रपट म्हणजे सणसणीत अपवाद ठरले. 'प्रेक्षकांची करमणूक' या बाबतीत कुठेही कमी न पडता गंभीर प्रकृती असलेल्या विषयांचे ताकदीने सादरीकरण हे मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाचे वैशिष्ठ्य.

सत्यकाम या चित्रपटात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर उद्भवलेल्या एकंदर सामाजिक परिस्थितीने आपल्या आदर्शांच्या झालेल्या ठिकर्‍या आणि मूल्यांची पदोपदी चाललेली चेष्टा-अपमान पाहून व्यथित झालेल्या तरुणाची कथा, त्यांच्या अत्युत्तम कलाकृतींमध्ये गणल्या गेलेल्या आनंद या सिनेमातील कर्करोगग्रस्त तरुणाची वेदना, बावर्ची मधील विस्कटत चाललेल्या एकत्र कुटुंबाला एकत्रच ठेवण्यासाठी चाललेली घरातल्या 'नोकराची' धडपड, नमक हराम मधील कामगारवर्गाचा संघर्ष, अभिमान मधल्या पती-पत्नीं मध्ये पुरुषी अहंकारामुळे झालेला बेबनाव असे अत्यंत गंभीर प्रकृती असलेल्या विषयांचे प्रभावीपणे सादरीकरण करून मुखर्जी यांनी ते चित्रपट तितकेच मनोरंजकही होतील याची पुरेपूर काळजी घेतली.

अशोक कुमार आणि संजीव कुमारच्या अभिनयानं नटलेला आशीर्वाद, धर्मेंद्रचा अनुपमा, बलराज सहानी अभिनीत अनुराधा यासारखे वेगळे चित्रपटही सरळ सरळ धंदेवाईक सिनेमांमध्ये मोडणारे नसले तरीही ते अजूनही तितक्याच आवडीने बघितले जातात. सत्यकाम आणि अनुपमा बघण्याआधी मी प्रामुख्याने धर्मेंद्रचे मारधाडपटच जास्त बघितले असल्यानं या चित्रपटांमधला त्याचा तूलनेनं नियंत्रित आणि संयत अभिनय मनाला अतिशय भावला. या दोन्ही चित्रपटांच्या बाबतीतली आणखी एक गोष्ट म्हणजे धर्मेंद्रचा सशक्त अभिनय बघून ज्याला इंग्रजीत director's actor म्हणतात नक्की काय ते नेमकं समजलं. 'अनुराधा'ला तर १९६१ साली उत्कृष्ठ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, तर जर्मनी मधल्या गोल्डन बेअर पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं होतं.

कितीही मोठा नट असो, फारशा चौकशा न करता त्यांच्या चित्रपटात काम करायला नेहमीच उत्सुक असे. राज कपूर, देव आनंद, धर्मेंद्र, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या त्याकाळच्या 'स्टार' अभिनेत्यांबरोबर त्यांनी एका पेक्षा एक सरस चित्रपट दिले. त्यापैकी अमिताभने त्यांच्याकडे सर्वाधिक चित्रपट केले. मुखर्जींची जादू अशी, की आपल्या सुपरस्टार पदाचा जराही अभिमान न बाळगता अमिताभने त्यांच्या अनेक चित्रपटात अगदी छोट्या म्हणजेच २-३ मिनिटांच्या पाहुण्या भूमिकाही केल्या. आठवा: गोलमाल चित्रपटातल्या 'सपने में देखा सपना' या गाण्यात अमोल पालेकर सुपरस्टार झाल्यावर भाव घसरलेला, फुटपाथवर बसलेला निराश अमिताभ.

चित्रपटाची कथा आणि विषय कुठलाही असला तरी ऋषिकेश मुखर्जी यांचे बहुतेक सगळे चित्रपट निखळ कौटुंबिक करमणूक म्हणूनच ओळखले जातात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या चित्रपटातील साधेपणा व त्यांनी माणसांचे आपापसातले नातेसंबंध यांचे अत्यंत तरलतेने पडद्यावर केलेले सादरीकरण. मुखर्जी यांना साध्या प्रसंगांची पडद्यावर मांडणी करणं जास्त कठीण आहे हे ठाऊक असूनही ते अशाच आव्हानात्मक विषयांमध्ये अधिक रस घेत. त्यांच्या चित्रपटांमधून दिल्या जाणार्‍या संदेशांची कटूता मनोरंजनरूपी साखरेच्या गोड वेष्टनात गुंडाळूनच दिली गेली पाहीजे याकडे त्यांचा कटाक्ष असे. इंग्रजीत जे रचना तत्व (design principle) म्हणून वापरलं जातं ते K.I.S.S. म्हणजेच Keep it Simple, Stupid या तत्वाचा अनेक दिग्गज समीक्षकांच्या मते हिंदी चित्रपटांमध्ये मुखर्जी यांच्या इतका उपयोग कुणीच केला नसेल.

मुखर्जी यांचे सुरवातीचे चित्रपट हे विचारप्रवर्तक, सामाजिक किंवा गंभीर कथा असणारे असले, तरी त्यांच्या कारकीर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात त्यांनी त्याबरोबरच अनेक विनोदी आणि करमणूकप्रधान चित्रपटांची मालिकाच सादर केली.

विनोदी लिखाणाच्या एका विशिष्ठ शैलीला मी वुडहाऊस शैली असं म्हणतो. पी. जी. वुडहाऊस यांच्या गोष्टी वाचताना हळू हळू वातावरणनिर्मिती होऊन एका क्षणी फिसकन हसू येतं किंवा हास्यस्फोट होतो तसं काही लेखकांच्या लेखनातून आपल्याला दिसतं. या शैलीचं वैशिष्ठ्य असं की विनोदनिर्मितीसाठी काही ओढून ताणून विशेष प्रयत्न केले गेले आहेत असं वाटत नाही. कथेतल्या पात्रांच्या संवादांमधून आणि कथा जशी उलगडते त्यामधून जी स्वाभाविक आणि सहज वातावरणनिर्मिती होते त्याचा ह्या हास्यस्फोटात महत्त्वाचा वाटा असतो. या प्रकारच्या विनोदांनी सभ्यपणाबरोबरच सुसंस्कृतपणाही जपल्याने त्यांचा सगळ्या कुटुंबाबरोबर आनंद घेता येतो. हीच शैली चित्रपटांसारख्या वेगळ्या माध्यमातही आपल्याला दिसते.

मुखर्जी हे याच शैलीचे हिंदी चित्रपटांमधले समर्थ सादरकर्ते. काही सन्माननीय अपवाद वगळता आजचे तथाकथित विनोदी चित्रपट बघितले तर प्रेक्षकांकडून हशा वसूल करायला आचकट-विचकट हावभाव, विचित्र अंगविक्षेप, किंवा सरळ सरळ घाणेरडी भाषा यांचाच प्रामुख्याने आधार घेतलेला आढळतो. मध्यमवर्गाची नाडी अचूक ओळखलेल्या मुखर्जी यांनी चुपके-चुपके, गोलमाल, नरम-गरम, रंग बिरंगी या त्यांच्या विनोदी चित्रपटांमध्ये कुठेही असले प्रकार तर वापरले नाहीतच पण द्वैअर्थी किंवा अश्लील संवादांना जवळजवळ पूर्णपणे फाटा देऊन सकस व अभिरूचीपूर्ण विनोदनिर्मिती केली. शिवाय नायक हा एक तर 'बस्ती में रहने वाला' अत्यंत गरीब किंवा मग महाल सदृश्य बंगल्यात राहणारा गर्भश्रीमंत" अशा टोकाच्या प्रकारांच्या वाट्याला क्वचितच जाऊन, मध्यमवर्गाचे यथार्थ दर्शन घडवले.

गोलमाल हा नर्मविनोदी संवादांची पखरण असलेला चित्रपट तर इतका लोकप्रिय झाला, की सलग एका चित्रपटगृहात पाच वर्ष धो धो चालणारा सिनेमा अशी ज्याची ख्याती त्या शोले या अफाट लोकाश्रय लाभलेल्या सिनेमासमोरही त्याने तिकीटबारीवर दणक्यात धंदा केला. रूढ अर्थाने 'हीरो' या संकल्पनेत न बसणार्‍या अमोल पालेकर सारख्या अभिनेत्यालाही या चित्रपटाने हिंदीत चांगलीच लोकप्रियता मिळाली, तसंच उत्पल दत्त यांच्या सारख्या मातब्बर अभिनेत्याने चरित्र अभिनेताही कशाप्रकारे उत्कृष्ठ दर्जाचा विनोदी अभिनय करू शकतो हे दाखवून दिलं.

ह्याच दोन कलाकरांना घेऊन कुठेही तोचतोचपणा न जाणवू देता त्यांनी नरम गरम व रंगबिरंगी हे धमाल चित्रपट सादर केले. चुपके चुपके या चित्रपटात तर त्यांनी धमालच उडवून दिली. तो पर्यंत 'अँग्री यंग मॅन' आणि अ‍ॅक्शन हीरो म्हणून मान्यता पावलेल्या अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांनी या चित्रपटात असरानी, ओमप्रकाश व केष्टो मुखर्जी यांच्यासारख्या नावाजलेल्या विनोदी अभिनेत्यांच्या तोडीस तोड विनोदी अभिनय केला, याचं श्रेय अर्थातच मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाला जातं.

दिग्दर्शनाबरोबरच गाण्यांच्या नितांतसुंदर चित्रिकरणामध्येही त्यांनी प्राविण्य मिळवलं होतं. गुड्डी चित्रपटातलं 'हम को मन की शक्ती देना' तसंच आनंद मधील 'कहीं दूर जब दिन ढल जाए' ही दोनच उदाहरणं आपल्याला याची ग्वाही देण्यास पुरेशी आहेत. कुठेही गाणी 'घातली आहेत' असं वाटत नाही. कथानकाचा एक भाग होऊनच ती चित्रपटात येतात. हे कसब माझ्या मते तरी त्यांच्या व्यतिरिक्त फक्त विजय आनंद उर्फ गोल्डी ला साधलं होतं.

दूरदर्शनचा प्रभाव वाढू लागल्यावर मुखर्जी यांनी तलाश, हम हिंदुस्तानी, धूप छांव, रिश्ते आणि उजाले की ओर यासारख्या मालिकांद्वारे छोट्या पडद्यावरही आपला ठसा उमटवला. त्यांनी सेन्सॉर बोर्ड व एन.एफ.डी.सी या दोन संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे १९९८ साली आलेला अनिल कपूर व जूही चावला या जोडीचा झूठ बोले कौवा काटे.

अशा प्रतिभावंत कलावंताला चित्रपटक्षेत्रातल्या कामगिरीसाठी असलेला सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला नसता तरच नवल होतं. त्यांना या पुरस्काराने १९९९ साली गौरवण्यात आलं. त्यांना २००१ साली चित्रपटक्षेत्रातल्या कामगिरी बद्दल पद्म विभूषण हा देशाचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान देण्यात आला.

ऋषिकेश मुखर्जी हे फक्त उत्कृष्ठ दिग्दर्शकच नव्हे, तर एक सहृदय 'बॉस'ही होते याचं एक उदाहरण मंजू सिंग यांनी एका मुलाखतीत दिलं होतं. गोलमाल चित्रपटात अमोल पालेकर यांच्या धाकट्या अविवाहीत बहिणीची भूमिका साकारणार्‍या मंजू सिंग या प्रत्यक्षात दोन मुलींची आई होत्या. या गोष्टीची जाणीव असलेले मुखर्जी इतर जेष्ठ कलाकारांना सरळ सांगत, "मी हिचा सहभाग असलेली दृश्ये आधी चित्रीत करणार आहे म्हणजे तिला लवकर घरी जाता येईल."

रोमँटिक दृश्ये आणि पती-पत्नींमधले नाते यांचे सुंदररित्या चित्रिकरण करणार्‍या मुखर्जी यांची पत्नी मात्र त्यांच्या आधी ३० वर्ष हे जग सोडून त्यांना एकटं करून गेल्या. त्यांचा एक मुलगा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दम्याचा तीव्र झटका येऊन मरण पावला. त्यांना तीन मुलीही आहेत. प्राणीप्रेमी असलेले मुखर्जी आपल्या बांद्र्याच्या सदनिकेत आपल्या काही पाळीव कुत्र्यांच्या आणि क्वचित भेट देणार्‍या एखाद्या मांजराच्या सहवासात राहत. मुले आणि नातेवाईक येऊन्-जाऊन असले, तरी ते आपल्या आयुष्याची शेवटची काही वर्ष घरात एकटेच होते - सोबत असलीच तर हेच पाळीव प्राणी व काही नोकर यांची.

"ये दुनिया एक रंगमंच है और हम सब उसमे काम करनेवाली कठपुतलीयां है" असा काहीसा संवाद आनंद या सिनेमात आहे. मूत्रपिंडाचा विकार बळावल्याने या रंगमंचाला ऋषिकेश मुखर्जी नामक कठपुतलीने आपले इहलोकीचे कर्तव्य संपवून २७ ऑगस्ट २००६ रोजी राम राम ठोकला.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भः आंतरजालावरील अनेक संकेतस्थळं व माझे चित्रपटप्रेम.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
दुसरा लेख: मनोरंजनाचे घेतले व्रत - २ | विजय आनंद उर्फ गोल्डी
तिसरा लेखः मनोरंजनाचे घेतले व्रत - ३: अशोक कुमार उर्फ दादामुनी
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित.

गुलमोहर: 

माझ्या याआधीच्या लेखात अनेक त्रुटी होत्या असं मला जाणवलं. शिवाय आशु आणि Fortyniner यांनी दिलेल्या सूचनांचा विचार केला. त्यातली एक म्हणजे अगदीच नुसती माहिती असा तो लेख वाटत होता, पर्सनल टच चा अभाव जाणवत होता. शिवाय लेख लहानही होता.

संपादित करून पुन्हा टाकतोय. सर्वांना आवडेल ही आशा.

अच्छा हे मला माहीती नव्हत...
बरं झाल सांगितलास....सॉरी हा...
आम्हाला पत्रकारीतेत तेवढे एकच शिकवलेले.

मंदार, अजून लेख वाचला नाही पण आवडीच्या विषयाबद्दल आणि माणसाबद्दल लिहिलं आहेस, त्यामुळे नक्की वाचणार.
पण त्याही पूर्वी "मनोरंजनाचा धंदा" हे शीर्षक बदलून 'व्रत' हा शब्द वापरल्याबद्दल धन्यवाद.
खरं तर त्या आधीच्या लेखाचं शीर्षकच इतकं खटकलं विशेषतः हृषिकेष मुखर्जी सारख्या व्यक्तीमत्वाबद्दल... की कदाचित म्हणूनच हा लेख काल वाचवला गेला नसावा माझ्याच्यानी !
आज तो 'व्रत' शब्द पाहिला आणि बरं वाटलं हे सांगण्यासाठी ही पोस्ट Happy

लेख अजूनही फुलवता आला असता असं माझं मत. पण इतक्या गुणी दिग्दर्शकाबद्दल जितकं लिहिलं आहे तितकंही वाचायला आवडलंच Happy सदाबहार / evergreen आहेत त्यांचे चित्रपट.

@ प्रयोग,
बर्‍याच काळानंतर मायबोलीवर आपली पोस्ट वाचून आनंद झाला.
आपल्या पोस्टी अभ्यासपूर्ण असतात त्यामुळे आपली प्रतिक्रिया/टीका/विश्लेशण वाचायला आवडते.

आपली मुखर्जींबद्दलची पोस्ट एकदम मान्य. मला मुखर्जी जसे भावले तसे लिहीले आहे, आणि इतरही लोक काही अभ्यास/माहितीपूर्ण पोस्टी टाकतील त्याही वाचून ज्ञानात भर पडेलच. आपणही लिहीत रहावे ही विनंती.

@ महेश
हा लेख नवीन लेखन म्हणून पुन्हा नव्याने टाकला आहे.

छान लिहीलायस मंदार. माझे ही अत्यंत आवडते दिग्दर्शक
प्रयोग म्हणतोय तस खूबसूरत, झूठी आणि किसीसे ना कहना यांचा उल्लेख हवा होता.

छान लेख Happy
हृषिदा आणि बासु चॅटर्जी यांची त्या काळी असलेल्या निकोप स्पर्धेमुळे खरोखर मनाला विरंगुळा देणारे चित्रपट निर्माण झाले.

@ स्मिता
धन्स गं.
तुझं अगदी बरोबर आहे. पण अगं मग लेख खूपच मोठा झाला असता. मुखर्जी यांचे चित्रपट म्हणजे हिरे आहेत. त्यातले कुठले लेखात निवडावे हा प्रश्नच होता. म्हणून जे अनेकदा पाहिले होते आणि जसे सुचतील तसे टाकले आहेत. पुढच्या एखाद्या लेखात हे नक्की लक्षात ठेवेन. Happy

@ प्रयोग

लेखात पुन्हा आवश्यक बदल केला आहे. तरी तू आणि स्मिता म्हणाली तसं काही चित्रपटांचा उल्लेख करायचं राहून गेलं आहे, पण त्याचं कारण मी दिलं आहेच वर Happy

ऋषिदांचे सर्व पिक्चर्स हलके फुलके तरल आणि निखळ मनोरंजन देणारे असतात... मला ''झूठ बोले'' जरा कमी आवडला होता. Happy

लेखात केलेला आवश्यक बदल, मागच्या लेखांवर आलेल्या प्रतिसादांमुळे तर नाही ना ? Proud

सहज जाता जाता, मागच्या लेखाचे संदर्भ कुठून घेतलेत ते शोधून काढणार्‍याला धन्यवाद द्यायचे राह्यलेत हो Happy

डॉक्टर, मलाही तो सिनेमा आवडला नव्हता. कदाचित ऋषिदांना अभिप्रेत असणारा विनोदी अभिनय अनिल कपूरला जमला नसावा. अर्थात अनिल कपूर सारख्या उत्तम अभिनेत्याबद्दल असं विधान करणं धाडसाचंच आहे म्हणा, पण त्याची विनोदी अभिनयाची शैली खूप वेगळी आहे. त्याला बहुतेक 'मोकळं सोडावं' लागतं. त्यामुळे त्याचा थोडा गोंधळ झाला असावा. अर्थात हे माझं मत.

हा चित्रपट न चालणं याची कारणं/विश्लेषण इथले जाणकार करतील ही आशा Happy

मंदार जोशी नमस्कार,
मला मेल पाठवून मुखर्जींचा लेख वाचायला सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सांगितल नसतं तर
कदाचित वचायला उशीर झाला असता.कारण माझी सध्या फक्त शोधाशोधच चालली आहे.
तसे करताना एखादा लेख किंवा कविता जे कांही समोर येइल ते वाचायाच आणि प्रतिसाद द्यायचा असं
चालु आहे. मी जुना लेख वाचला नाही.पण आत्ताचा लेख एकदा छान. मुखर्जी (मी त्यांचे नांव लिहित नाहीये
कारण त्यांच्या नावाचे पहिले अक्षर लिहायला जमत नाहीये. कसे लिहायचे ते मला पहावे लागेल.) हे
माझे अतिशय आवडते दिग्दर्श्क. मी त्यांचे सगळे चित्रपट पुन्हा पुन्हा पहिलेत. फक्त खुबसुरत असलेला
खुबसुरत चित्रपटाचा उल्लेख करयला हवा होता. अजुन खूप लिहायच आहे पण नंतर लिहिन. धन्यवाद.

खूप सुरेख लेख लिहिला आहेस मंदार.

गोलमाल तर मी कितीही वेळा बघू शकते. तुझ्या यादीत काही बघायचे राहून गेलेले सिनेमे दिसत आहेत. आता बघतेच Happy

अतिशय सुंदर लेख... मंदार. Happy

गोलमाल तर मी कितीही वेळा बघू शकते. मितानला अनुमोदन!!! ऋषिदांचे वरच्या लिस्ट मधले सगळे चित्रपट मी पाहिले नाहीत, पण जे काही पाहिले, त्यातून आनंद, दु:ख, विनोद यांच्या मिश्रणातून तयार झालेली निर्मळ आणि नितांतसुंदर कलाकृती पाहिल्याचं समाधान मिळालं... आणि पुन्हा पुन्हा पाहिले, तरी कंटाळा येणार नाही असेच हे चित्रपट आहेत...

मंदार, असेच छान छान माहितीपूर्ण लेख लिहित रहा...त्यासाठी तुला शुभेच्छा! Happy

सुंदर लेख ! मी त्यांचे बहुतेक सिनेमे पाहिले आहेत व लेख वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. धन्यवाद.
"मुसाफिर" वास्तविक तीन कथांची गुंफण होती व आपल्या पहिल्याच चित्रपटात असा प्रयोग करणं हे खरंच धार्ष्ट्याचं व कौतुकास्पद. सत्यजित रे यानीही " कापुरूष, महापुरूष" या बंगाली सिनेमात दोन गोष्टी सादर करण्याचा प्रयोग केला होता पण तो साफ फसला होता [त्यातल्या "कापुरूष"चं कथानक हृदयस्पर्शी व सादरीकरण अप्रतिम असूनही ] !

Pages