ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग २०

Submitted by बेफ़िकीर on 19 October, 2010 - 02:15

" ए... अरे.. तो ठोंबरे कुठेय??? हां... रूमवर ये लेका... वडील आलेत तुझे..."

मध्यरात्री एक वाजता फुल्ल चढलेल्या दिल्याच्या ग्रूपला होस्टेलवरच्या एका मुलाने अंधारात धावत धावत येऊन हे वाक्य ऐकवले तेव्हा चौघेही कंप्लीट टाईट झालेले होते. त्या मुलाला वन्याने 'जा जा, तू हो पुढे, आम्ही येतो' असे सांगून हाकून लावले अन मग त्याही परिस्थितीत चर्चा सुरू झाली...

अशोक - आदरणीय आत्मानंद ... तुमचे तितकेच आदरणीय तीर्थरूप मागचा पुढचा कोणताही सुगावा न लागू देता अचानक प्रकटले आहेत व आपण सर्व जण मद्य प्राशन करून गॅसच्या फुग्यांप्रमाणे तरंगू लागलो आहोत... तेव्हा आता तुमचे 'जालन्याचे सुप्रसिद्ध बौद्धिक' ही एकच बाब कामी येईल असे वाटते.

आत्मा - बाबा आले?? असे कसे आले??

अशोक - ते विचार, आचार व हालचाल या सर्व पातळ्यांवर स्वतंत्र असल्यामुळे ते आले... आपल्या दृष्टीने ते आले इतकेच महत्वाचे आहे...

वनदास - भिकारचो*... उठा... मुक्ताफळं काय उधळताय?? आपली चौघांची तासतील ते...

अशोक - या अशा सम्राटपद मिळाल्याची भावना निर्माण झालेल्या अवस्थेत त्यांच्यासमोर जायचं???

दिल्या - आत्म्या भ**... आधी सांगायचं नाहीस का?? बुवा येणार म्हणून....

आत्मा - बुवा?? कोण बुवा?? बाबा आलेत का बुवा आलेत???

अशोक - पापात्म्या... तुझ्या जन्मदात्याला अख्खा महाराष्ट्र बुवा म्हणून ओळखतो बरं चिलटा???

आत्मा - आता मी काय करू???

वन्या - तू काय हिंदी पिक्चरची हिरॉईनेस का?? दिवस गेल्यानंतर प्रेमात ठुकरावली गेलेली??

आत्मा - लामखडे... तुम्ही उपाय करायच्या ऐवजी रुग्णाच्या नितंबांवर नुसत्याच सुया टोचत आहात....

अशोक - आता असे उल्लेख काही काळापुरते मनाच्या खोल गाभार्‍यात दडवायचे बरं??

दिल्या - अरे पण याच्या बापाला फेस कसा करायचा??

अशोक - फेस करण्यासाठी वस्तू, पाणी व एक बुळबुळीत साबण आवश्यक असतो...

वन्या - तुम्हाला ***ना सिरियसनेस नाही.. अरे ते येऊन थांबलेत तिकडे...

आत्मा - बाबांसमोर जायचे साहस आता या कृश देहात राहिलेले नाही...

वन्या - मग झोप इथेच... आम्ही जातो आमचे देह घेऊन त्यांच्याशी बोलायला ... ओ .. बिल द्या...

आत्मा - एक काम करा....

अशोक - बोला कीर्तनकार... बोला.. तुम्ही बोलायचं... आम्ही ऐकायचं...

आत्मा - त्यांना सांगा... आत्मा जालन्याला गेला....

अशोक - हो? फारच छान! का गेला म्हणे???

आत्मा - त्यांनाच भेटायला...

अशोक - छान! आणि त्यांनी घरी फोन लावला आणि त्यांना कळले की आपण तेथे प्रकट झालेला नाही आहात की मग आम्ही काय करायचे???

वन्या - ए अरे चला???

दिल्या - याचं थोबाड धुवा आधी.. एक वेळ आपण प्यायली हे चालू शकेल.. ह्याचं कसं चालेल??

अशोक - आत्मानंद?? तोंडावर जलाचे हबके मारून परिस्थितीत काहीसा फरक करा बरं??

आत्मा - खरंच बाबा आलेत??

दिल्या - तुझ्यायला तुझ्या... इथे आमची लागलीय अन हा काय विचारतोय पाहिलं का???

आत्मा - मला... मला एक स्मॉल द्या....

अशोक - आपल्या बहुधा मस्तकात प्रकाश पडला नसावा... ज्यांच्या घिसाडघाईमुळे आपल्याला हा मानवी योनीतील जन्म मिळाला ते बुवा ठोंबरे वसतीगृहात येऊन दहा मिनिटे इतका कालावधी झालेला आहे...

आत्मा - त्यां.. त्यांच्याशीच बोलण्याचे धाडस व्हावे म्हणून मी एक स्मॉल घेणार आहे...

चक्क घेतला आत्म्याने स्मॉल! बघतच बसले सगळे! बाकीचे तिघे स्वतःच्या तोंडावर हबके मारून घेताना, चुळा भरताना आणि भरपूर बडीशेप खाताना आत्मानंद निवांत स्मॉलचे घुटके घेत बसला होता. नंतर मात्र दिल्याने अक्षरशः त्याच्या खुर्चीवर लाथ घातली आणि घाबरून आत्मा उठला आणि सगळ्यांबरोबर चालू लागला.

बुवा पायरीवर बसून होते. हे चौघे जवळ आल्यावर ते काहीसे काळजीने आणि काहीसे आनंदाने उठून उभे राहिले. वनदास पुढे झाला. आज त्यानेच इतरांपेक्षा कमी प्यायलेली असल्याने त्याने पहिल्यांदा बुवांना वाकून नमस्कार केला. मग ते पाहून हळूच चुटपुटता नमस्कार अशोकने केला तेव्हाच बुवांना पहिल्यांदा वास आला. दिल्याचे धाडस होईना! पण रीत म्हणून त्यानेही नमस्कार केला तेव्हा बुवांना कळून चुकले. हे तिघेही प्यायलेले आहेत. कोणत्या सहवासात राहतो आपला आत्मू!

आत्मू? आत्मू काही नमस्कार करेना! वन्याने त्याला एक दोनदा चिमटे काढून शेवटी मोठ्याने सांगीतले.

"आत्मानंद, बाबांना नमस्कार नाही केलास तू..."

आत्मा - मी नमस्कार केला तर तुमचे पाय बाटतील बाबा...

खूप वे़ळ! कितीतरी क्षण बुवा आत्म्याकडे नुसते पाहात होते. खिळून! त्यांच्यात पाच, सात फुटांचे अंतर होते. बाकीची पोरे हबकलेली होती.

बुवांना खरा प्रकार लक्षात यायला काही क्षण लागले. नंतर मात्र त्यांच्या मेंदूत अक्षरशः चमका निघाल्या चमका! अत्यंत हृदयद्रावक आणि पिळवटून टाकणार्‍या स्वरात त्या पवित्र बापाने विचारले...

बुवा - आत्मू... तू... तू प्यायलास???

खोटे बोलण्याची गरजच आत्म्याने संपवली होती. साधी गोष्ट होती. दारू ही सिगारेटसारखी नसतेच! की जिचा वास फक्त तोंडातूनच यावा! दारूचा वास हा पोटातूनच येतो. तो एक पूर्ण झोप झाली तरीही तोंडावर राहू शकतो. 'काळ जाणे' हा एकच उपाय असतो तो वास जायला! बडिशेप खाऊन आणि चुळा भरून काहीही होत नाही.

बुवा - प्यायलेला आहेस तू????

बुवांचे ते शब्द वसतीगृहाच्या शांततेला अभद्र तडा देऊन गेले.

बाकीचे तिघे माना खाली घालून उभे होते. बुवांच्या डोळ्यांमधून अंगार बरसत होता. आणि आत्मा त्याच्या चष्म्याच्या आतल्या बटबटीत डोळ्यांनी शांतपणे बापाकडे पाहात उभा होता.

दिल्या - काका... रूमवर चला... इथे... सगळे जागे होतील...

चौघेही रूमवर आले तेव्हाही बुवा खिळल्यासारखे आपल्या पुत्राकडे पाहून आग वर्षवत होते डोळ्यांमधून!

शेवटी तेही आले.

आले आणि एका पलंगावर बसले. वनदासने हळूच दार लोटून घेतले. बुवा अत्यंत तीव्र स्वरात संतापाने पण घुसमटलेल्या आवाजात बोलू लागले.

बुवा - नालायकांनो... तुमच्या घरी शिकवण मिळाली नाही तुम्हाला?? की या वयातच काय, आयुष्यात कधीही मद्य प्राशन करू नये?? घरी कोण कोण आहे तुमच्या सगळ्यांच्या?? हा मुलगा तोच ना?? ज्याच्या मातु:श्रींना आम्ही भेटलो तो?? त्यांना माहीत आहे का तू पितोस ते?? शिकायला येता की व्यसने करायला?? लाज लज्जा शरम काहीही नाही?? लायकी तरी आहे का तुमची मद्य प्यायची?? एक पैसा कमवायची अक्कल आहे?? आई वडिलांनी संस्कार केले की केलेच नाहीत?? काय रे?? तुला विचारतोय मी... नाव काय तुझं???

वन्या - वनदास लामखडे...

बुवा - अच्छा तूच नाही का तो कविता करणारा?? आणि हा पवार असेल.. चित्रं काढणारा.. तुमच्या दोघांच्या घरी माहीत आहे?? तुम्ही हे असलं सगळं करत असता ते?? शी:???? दिलीप?? आईंना माहीत आहे?? तू पितोस ते???

तिघांनी माना खाली घातल्या. आत्मा अजूनही शांतपणे वडिलांकडे बघत होता.

बुवा - माझा मुलगा इतका बिघडायला... तुम्हीच कारणीभूत आहात तुम्हीच... आमच्याकडे स्नान झाल्याशिवाय बाहेरच्या कक्षात पायही न ठेवण्याचे संस्कार आणि सोवळे आहे! संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या कीर्तनांचे कार्यक्रम झालेले आहेत त्या बुवा ठोंबरेंच्या मुलाला व्यसनाधीन करून तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या आईवडिलांचे नाक काप कापले आहेत.. ज्या हेतूने त्यांनी तुम्हाला जन्माला घातले, शिकायला इथे पाठवले, त्या सर्वांचा तुम्ही अपमान केलेला आहेत... विद्यार्थीदशेत असताना असली थेरं करून तुम्ही मानवजन्माची थट्टा केलेली आहेत.. जनावरांसारखे वागत आहात आणि तसे वागता वागता... माझ्या...

बुवांच्या डोळ्यात पाण्याचे थेंब दिसले.

बुवा - ... तसे वागता वागता.. माझ्या आत्मूलाही... पार... पार बिघडवून टाकलात रे.... आत्मू... तू कसा असा झालास?? तुला पहिला घोट घेताना माझी आठवण आली नाही?? आई, आजी, आजोबा, कुणाचीही आठवण आली नाही??? तुझ्या घशाखाली तो थेंब उतरलाच कसा?? चल.. चल आत्मू चल.. तुला मी इथे ठेवणार नाही... कारण तू आहेस एक चांगल्या संस्कारांचा मुलगा... या.. या असल्या वातावरणात ठेवून मला माझ्या मुलाला वाया घालवायचे नाही... जालन्याला जाऊ.. तेथून मी पुन्हा इथे येतो... प्राचार्यांना भेटतो... धनकवडी परिसरात एखादा कक्ष घेऊ भाड्याने.. तेथून येत जा.. तुझी सायकल आणून ठेवू इथे... पण... या.. या तिघांच्या सहवसात एक क्षण मी तुला राहू देणार नाही... ऊठ आत्मा... आवर... पिशवीत सामान भर...

आत्मा जागचा न हालता फक्त आपल्याकडे पाहतो आहे याचे भान बुवांना दोन तीन क्षणांमध्येच आले.

बुवा - आत्मू?????

आत्मा - बाबा... तुम्ही विश्राम करा... सकाळच्या गाडीने जा.. मी.. मी कुठेही येणार नाही आहे..

केवळ दोनच क्षण! आणि.... खाड! बुवा ठोंबरे मारू शकतील याचा कुणालाच अंदाज नव्हता. आत्म्याचा चष्मा खाली पडला होता. गालावर होणार्‍या वेदनांपेक्षा त्याच्या मानसिक वेदना अधिक होत्या. आजवर बाबांचा एकही फटका न खावा लागलेल्या आत्मूला आज सर्वांदेखत एक जोरदार बसली होती.

शांतपणे आत्म्याने चष्मा उचलला. एका बाजूची काच फुटली होती. दुसरी काच शाबूत होती. गालावर बोटे उठली होती. दचकलेले तिघे बुवांच्या त्या अवताराकडे पाहात होते. आणि बुवा संतापाने थरथरत उभे होते.

बुवा - तू?? तू मला उत्तर देतोस?? बापाला?? यासाठी तुला जन्माला घातला?? तुला व्यसन लागले आहे?? आणि... आणि त्याचे तू समर्थन करत आहेस?? व्यसन सोडावे लागू नये म्हणून घरी यायला तू नकार देतो आहेस?? लाज वाटते मला लाज! तू माझा मुलगा आहेस याची... माझ्या पोटी जन्माला आलास याची.. आत्मानंद.. तू आज बापाला उलट उत्तर दिलंस??

आत्मा - बाबा.. खाली बसा.. मी जे बोलतो ते ऐकून घ्या...

बुवा - एक शब्द ऐकायचा नाही आहे मला... आज तुझे थोबाड फोडणार आहे मी...

पुन्हा आत्म्याकडे धावलेल्या बुवांना दिलीपने मधे येऊन विनंतीपुर्वक अडवले. हे होस्टेल आहे अन इथे असे काही झाले तर मोठे प्रकरण होईल हेही सांगीतले.

तब्बल दहा मिनीटे... तब्बल दहा मिनीटे विस्फारलेल्या डोळ्यांनी बुवा ठोंबरे आत्मानंदकडे निश्चलपणे पाहात होते. आणि आत्मा मान खाली घालून बसला होता. बाकीचे तिघेही चुळबुळत होते.

बुवा - आत्मा... हे... हे सगळं कसं झालं??? तू... असा कसा झालास???

आत्मा - सांगतो बाबा... सगळं सांगतो.... बसा....

मान खाली घालून आत्म्याने दिलेले हे उत्तर ऐकून बुवा हादरलेच! आत्मा तसाच बसून धीरगंभीर आवाजात बोलू लागला.

"भारत पाकिस्तानच्या युद्धातील कथा सांगायचात ना लहानपणी... की बंदुक, हॅन्डबॉम्ब, काडतुसे, खंजीर आणि काय काय शस्त्रे अस्त्रे घेऊन सैनिक सीमेवर जायचे... आणि... समोरून आपल्या प्रदेशात येणार्‍या आपल्या शत्रूचा नायनाट करायला ती सर्व शस्त्रे वापरायचे... पण... पण काही वेळा अशी परिस्थिती निर्माण व्हायची... की..

.... कोणतेच शस्त्र उपयोगी पडायचे नाही... कारण... कारण आपल्याला समोरून हल्ला होईल असे वाटत असताना तो डावीकडून, उजवीकडून किंवा चक्क मागूनही व्हायचा.. काही कळायच्या आतच सैनिकांना प्राण गमववे लागायचे... कारण... एवढ्या घनदाट प्रदेशात.. नेमके आपण कुठे पोचलो आहोत आणि आपली आधीची अन आत्ताची दिशा कोणती आहे हेच समजेनासे व्हायचे... आणि... सैनिक चुकून उलट बाजूलाच यायला लागायचे... आणि मग... मागून हल्ला व्हायचा... काही कळायच्या आतच... प्रेतांचा खच पडायचा... मग... मग दुसरी कोणतीतरी तुकडी दुसर्‍या कोणत्यातरी सीमेच्या भागात सरशी करत असायची.. बरेच दिवसांनी समजायचे... भारत जिंकला की पाकिस्तान... अर्थात... कुणीही जिंकले तरीही... हानि दोघांचीही तितकीच व्हायची....

मी पण सीमेवर आलो बाबा.. वसतीगृह ही सीमा आहे सीमा... दोन देशांमधली... एक देश आपला... एक... एक या जगाचा... आणि मधे ही सीमा... हे वसतीगृह... हे महाविद्यालय... हा कक्ष क्रमांक २१४...

या सीमेवर येताना माणूस अनेक शस्त्रे बरोबर घेऊन येतो... व्यसनांबाबतचा दृष्टिकोन, मित्रांबाबतचा दृष्टिकोन, नीती-अनीती बाबतचा दृष्टिकोन, अभ्यासातील व वागणुकीतील नियमीतपणाबाबतचा दृष्टिकोन, घरचे संस्कार, घरचे प्रेम, घरच्या खाण्याची गोडी.... ही ती शस्त्रे!

इथे तुमचा शत्रू असतो तो एकच नसतो... अनेक शत्रू असतात... संपूर्ण नवीन जीवन, नवीन माणसे, नवीन चालीरीती, व्यसने, थट्टामस्करी, भांडणे, मारामार्‍या, शिवीगाळ, नीतीची घसरण, अभ्यासाकडे दुर्लक्ष, दादागिरी, बरेच शत्रू असतात...

या सर्वांशी आपले दृष्टिकोन, आपले संस्कार लढू लागतात... या युद्धात एखादा जिंकतो... एखादा हारतो... जो जिंकतो तो .. तोही पुढे जगाच्या शाळेत जातो आणि जो हारतो तोही... त्या शाळेत आपल्याकडची शस्त्रे फार वेगळीच असतात... पण तो भागच निराळा आहे.. विषय आहे इथल्या लढाईचा... भारत पाकिस्तान यापैकी कुणीही जिंकले तरी हानि दोन्हीकडची होते बाबा.. पण.. इथल्या लढाईत जर आपण जिंकलो.. तर आपली हानि होत नाही... आपली हानि फक्त आपण हारलो तर होते... आणि खरी गंमत ऐकायचीय का बाबा?? खरी गंमत ही असते की आपली हानि झाली आहे असे हारलेल्याला कधीच वाटत नाही.... तसे वाटते फक्त त्याला ती शस्त्रे देऊन लढायला पाठवणार्‍यांना...

प्रश्न असा आहे... की हे असे का होते?? का होते मुळातच हे सगळे? असे लढायला का पाठवावे लागते? अशीच शस्त्रे का दिली जातात? या हारण्याला हारणे आणि जिंकण्याला जिंकणेच का समजले जाते... आणि मुख्य म्हणजे जो जिंकला आहे तो... नक्की काय जिंकतो?? .. पुढील शाळेत... जगाच्या शाळेतही तो जिंकेलच यासाठी कोणती शस्त्रे उरतात त्याच्याकडे...

मान्य आहे बाबा.. फार फार व्रतस्थ राहून तुम्ही आजवरचे आयुष्य व्यतीत केलेत... पण... माझ्यासारख्या वयात तुम्ही... या लढाईत उतरला होतात का?? असाल किंवा नसाल.. पण असलाच तर.. त्यावेळेस माझ्यावेळेस असलेली आकर्षणे होती का??

आज.. आज राहणीमान वाढलेले आहे.. भारतात संगणक युग येणार असे म्हणत आहेत.. लोकांकडे पैसे आहेत.. टी.व्ही. बघता येतो... जगात काय चालले आहे ते इथे बसून कळते... हिंदी चित्रपटांमधून नीतीच्या आजवरच्या कल्पनांना जोरदार तडाखे मारणार्‍या अभिनेत्री नीतीच्या आणि प्रेमसंबंधांच्या नवीन व्याख्या ठरवत आहेत...

या परिस्थितीत बुवा ठोंबरेंच्या सोवळ्याच्या संस्कारांमधील एक १८ वर्षांचा मुलगा जेव्हा वसतीगृहात राहायला येतो.. तेव्हा... त्या कक्षात राहात असलेले इतर सहाध्यायी... हे त्याच्यासाठी आणि तो त्यांच्यासाठी.. पूर्णतः भिन्न पार्श्वभूमी व संस्कारांमधून आलेले असतात.. मगाशी तुम्ही या तिघांना विचारलंत.. आई वडिलांनी शिकवले नाही? व्यसने करू नयेत म्हणून?? तुम्हाला माहीत आहे?? या सगळ्यांच्या आई वडिलांनी या सगळ्यांनाही तेच शिकवले आहे जे तुम्ही मला शिकवले आहेत.. पण... ते तिघे एक अक्षर तुमच्यासमोर बोलले नाहीत.. त्यांच्या आई वडिलांबद्दल आणि त्यांनी केलेल्या / न केलेल्या संस्कारांबद्दल अनुदार उद्गार तुम्ही काढत असताना त्यांच्या धमन्यांमधील रक्त त्वेषाने उसळले असेल बाबा... पण.. आत्मानंद ठोंबरेचे हे वडील आहेत.. या एकाच गोष्टीमुळे .. ते तुम्हाला आदर देऊन नुसते बसून राहिले..

लढाई बाजूलाच राहिली की... तर तुम्ही मला जी शस्त्रे देऊन येथे पाठवलेत ना बाबा?? ती कुचकामी मुळीच नव्हती.. मुळीच कुचकामी नव्हती.. त्यांना चांगली धार होती.. शत्रू कोण आहे आणि कुठे आहे हेही अतिशय व्यवस्थित ज्ञात होते... जिंकायला कसलीच अडचण नव्हती बाबा... फक्त... फक्त या तुकडीला.. म्हणजे मला एकट्याला.. एकही नेता नव्हता.. सेनानी नव्हता.. हे तिघेही माझ्याच वयाचे होते.. मोठे असते तरीही फरक पडला नसता.. कारण.. त्यांचा माझ्यावर हक्क काहीच नव्हता... हक्क होता तो तुमचा.. आईचा.. आजी आजोबांचा.. आणि.. त्यातले कुणीच इथे नव्हते... मला... मला कुणाशी कसे केव्हा आणि कधी लढायचे हे माहीत असूनही... 'का' लढायचे हे सांगायला आता कुणीही उरलेले नव्हते.. लक्षात घ्या बाबा.. मुळात या शत्रूंशी... मी 'का' लढायचे.. हे सतत पटवून द्यायला.. मला इथे कुणीही उरलेले नव्हते...

व्वा! काय पण समर्थन करत आहे मी असे म्हणाल तुम्ही बाबा.. पण.. हे समर्थन नाही आहे... नेमके कोणत्या वयापर्यंत आई वडिलांच्या संस्कारांचे प्रत्यक्ष छत्र मुलांना आवश्यक असते याबाबत नेमकेपणाने जरी काहीच म्हणता येणे शक्य नसले तरीही... आणि मतदानाचा अधिकार एकवीसवरून अठरावर आणण्यात येणार आहे अशा बातम्या पसरत असूनही मी ठामपणाने सांगतो बाबा... अठरा वर्षाचा मुलगा जर अत्यंत कडक वातावरणातून अत्यंत स्वतंत्र वातावरणात आला... तर त्याला दिलेली नेहमीचीच शस्त्रे कुचकामी ठरू शकतात... कारण.. अशा परिस्थितीत ... जर तुमच्या निकषांप्रमाणे मी व्यवस्थित वागायचे असेल... तर त्याला सतत दिशा दाखवणारा सेनानी आवश्यक असतो...

कारण काय ते सांगू?? तुम्हाला ऐकताना क्लेष होतील.. पण.. दिड पावणे दोन वर्षे येथे राहून मी.. खूप परिपक्व होत चाललो आहे बाबा.. त्यामुळे.. आधीच तुमची माफी मागून मग पुढचे बोलतो.. कारण काय आहे ते सांगू???

जर पहिल्या वेळेलाच 'तरुण वयातील शिक्षिकांना पाहण्याचा तरुण विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन टारगटपणाचा असू शकतो' या शत्रूवर मात केली नाही.. तर तो फोफावतो बाबा.. तो शत्रू फोफावतो... आणि.. ही बरोबरची.. घरून आणलेली शस्त्रे.. येथे लढणार्‍याला बुळचट ठरवतात.. हास्यास्पद ठरवतात.. मला एक सांगा बाबा.. ज्या वेळेस एका शिक्षिकेवर एका सहाध्यायीने केलेले आंबट मतप्रदर्शन ऐकून मी असे म्हणालो की त्या आपल्या शिक्षिका आहेत व आईच्या आणि गुरूच्या स्थानी आहेत... त्या वेळेस संपूर्ण महाविद्यालय जर मला हसत असेल... तर... मग मी कसा जगणार?? चोवीस तास बारा महिने तुम्ही तर माझ्यावतीने लढायला येथे नसणार?? मग?? मग मी कसे जगायचे?? सतत स्वतःची अवहेलना, निंदा, थट्टा सहन करून कसेबसे टिकायचा प्रयत्न करायचा की... या रंगात आपला रंग मिसळून टाकायचा??

मला सांगा बाबा.. अत्यंत सुरक्षित वातावरणात लहानपण गेलेले तुम्ही आहात असे मला आजवरच्या माहितीतून समजले आहे... पण जर... तुमच्या संस्कारांची, सवयींची, धार्मिकतेची, सोवळ्याची पावलोपावली थट्टा करणारे वातावरण तुम्हाला जबरदस्तीने सोसायला लावले असते तर... आजी आणि आजोबांनी तुमच्याजवळ दिलेल्या शस्त्रांची धार.. किती दिवस पुरली असती बाबा?? तेही .. तेही वयाच्या फक्त अठराव्या वर्षी???

म्हणून काय वसतीगृहात पाठवायचेच नाही मुलांना?? अत्यंत नैसर्गीकपणे हाच प्रश्न मनात येईल कोणाच्याही... जरूर पाठवायला हवे... पण त्यावेळेस... ऐकून कदाचित विचित्र वाटेल बाबा तुम्हाला.. पण.. उदाहरण सांगून संपल्यानंतर कदाचित मला काय म्हणायचे आहे ते पटू शकेल.. माफ करा... पण पुन्हा एक विचित्र उल्लेख करणार आहे.. की पाल्यांना वसतीगृहात पाठवताना पालकांचा दृष्टीकोन कसा असावा याबाबत..

कुत्रे असतात ना बाबा?? कुत्रे?? त्यांना पिल्ले होतात.. एकदम पाच, सहा.. त्यातील एखादे पिल्लू काही वेळा आई खाऊन टाकते असे ऐकले आहे.. असेलही.. बाकीची पिल्ले आईचे दूध पिऊन जगत असतात.. त्यांचे जग तेव्हा फक्त दूध पिणे इतकेच असते... मग हळूहळू मोठी झाल्यावर ती दुडुदुडु धावायला लागतात.. मग फारच गोंडस दिसतात... मग.. आणखीन मोठी होत असताना... त्यातील एखादे पिल्लू ट्रकखाली येऊन मरते.. ती बिचारी कुत्री बराच वेळ तेथे विलाप करत बसते अन कावळे जमा झाल्यानंतर निघून जाते... तिच्या दृष्टीने आता जी काही तीन चार पिल्ले उरलेली असतात.. ती इतरत्र फिरून स्वतःचे अन्न शोधायच्या पातळीची झालेली असतात... आणि.. आपापली उपजीविका म्हणण्यापेक्षा अन्न मिळवताना काहीच कालावधीत सर्व पिल्ले इतकी मोठी होतात... की... त्यांच्यात आणि त्यांच्या आई वडिलांचे नाते आई वडील व पिल्लू असे असेलच असे माणसाला वाटू नये...

.. बाबा.. अन्न कसे शोधावे, कुठे शोधावे... याचे प्रशिक्षण देऊन झाल्यानंतर कुत्रा आणि कुत्री पिल्लांवर कोणतेही नियंत्रण ठेवत नाहीत... ते नियंत्रण इतक्या कमी पातळीला जाते की कित्येकदा आई व मुलाचेच संबंधही येतात.. पण...

... पण.. मानव योनीतील पिल्ले?? ... तीही आपल्या संस्कृतीतील??? त्यांना किती स्वातंत्र्य मिळते वैचारिक?? दादाशी असे बोला, आजीला नमस्कार करा, ताईला मारायचे नाही, आई ला असे म्हणा, काकांना तसे म्हणा..

वयाच्या पहिल्या वर्षापासून, म्हणजे जेव्हा संस्कार करण्याचे वय होते त्या वयापासून.. आई वडील फक्त संस्कारच करत राहतात बाबा... आणि त्या संस्कार करण्यातील तीव्रता इतकी पराकोटीला पोचते... की लग्न होऊन दोन दोन मुले झालेल्या आपल्या मुलांनाही आई वडील... शिकवतच राहतात... वसतीगृहात पाल्याला पाठवताना पालकांचा दृष्टिकोन असा असावा?? की ज्याचे वय आडनिडे आहे.. त्याच्याकडे आपण पैसे देऊन त्याला एका संपूर्ण नवीन जगात पाठवतो आहोत.. तेथेही त्याने आपण दाखवलेल्याच मार्गावर चालावे?? असा का असावा म्हणे दृष्टिकोन?? मी एक वेगळा माणूस नाही?? मी म्हणजे फक्त कुणाचा तरी मुलगा?? मी म्हणजे फक्त त्रिवेणीचा दादा??

पहिले म्हणजे.. आपलाच दृष्टिकोन बरोबर आहे ही भूमिका कितपत योग्य आहे हाच एक मोठा विषय आहे... पण.. असे एक मुलगा आपल्या वडिलांना म्हणू शकत नाही हे मला माहीतही आहे...

पण... इथे आल्यानंतर मी इथे जे विश्व पाहिले ना बाबा?? त्या विश्वात तुम्ही मला दिलेल्या विचारांच्या शिदोरीवर जगणे अशक्य होते... इथे पावलापावलाला शेरेबाजी होती विद्यार्थिनीवर.. त्यामुळे त्यांच्यात मला त्रिवेणी दिसणे बंद झाले... तुमच्या शिदोरीतील, शस्त्रांच्या भात्यामधील सर्वात मोठे शस्त्र त्या दिवशी कुचकामी ठरले... हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे बाबा.. जेथे भारतभरातून विद्यार्थी आलेले आहेत.. एका वेळेस साडे तीन हजार विद्यार्थी असतात येथे... प्रत्येकाची कौटुंबिक, भावनिक, आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमी सर्वतया भिन्न.. आणि इतक्या वैविध्यात जेव्हा एक अठरा वर्षांचा मुलगा एकटा राहतो ना... तेव्हा त्याला फक्त त्याचे संस्कार पुढे नेऊ शकत नाहीत.. पुढे कसले... टिकवूही शकत नाहीत...

मी जर माझ्या होत असलेल्या थट्टेला घाबरून रडलो असतो ना बाबा.. तर वसतीगृहात प्रवेश घेतल्याच्या पुढच्याच महिन्यात तुमचा आत्मू महाविद्यालयाचे शिक्षण सोडून घरी येऊन बसलेला दिसला असता तुम्हाला..

मी इथे का टिकलो माहीत आहे?? मी माझी थट्टा होणे हे माझे शस्त्र बनवले.. त्याचवेळेस मी अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतो हे सिद्ध करून 'थट्टेस पात्र असणे' या शस्त्राचा आवाका अन धार वाढवली.. आज केव्हाही माझी थट्टा होते ना बाबा? तेव्हा त्या मुलाला माहीत असते... आत्मानंद ठोंबरेला माहीत आहे की आपण त्याची थट्टा करत आहोत आणि तोही ते न चिडता, उलट स्वतःहून स्वीकारत आहे.. मी चिडलो, रडलो असतो तर परत घरीच आलो असतो बाबा... आणि सगळ्यात महत्वाचे...

.. माझी थट्टा कशावरून होते माहीत आहे??

.... माहीत आहे??? ... माझी थट्टा होते ती... बुवा ठोंबरे या सेनानीने .. वसतीगृह या शत्रूदेशाही लढायला स्वतःच्या सैनिकाला दिलेल्या ... गैरलागू, धार नसलेल्या व काळाच्या ओघात बिनकामाच्या ठरलेल्या शस्त्रांवरून....

आणि आत्मानंद ठोंबरे... हे सर्व किवा यातील एक अक्षरही घरी न कळवता.. स्वतःच्या मनाला होत असलेला कोणताही त्रास.. कोणत्याही वेदना सेनानीला न सांगता इथे टिकून राहतो... तो स्वतःच युद्धभूमीवर निर्माण केलेल्या शस्त्रांवर.. मात्र वाईट बाब ही आहे बाबा.. की त्यावेळेस तो त्या सेनानिच्या दृष्टीने मात्र... लढाई हारलेला तरी असतो किंवा शत्रूपक्षाला सामील तरी झालेला असतो...

... बाबा.. मी मद्य सोडणार नाही... तुम्ही हवा तो निर्णय घ्या....."

मध्यरात्रीचे दोन वाजले होते. रूम नंबर २१४ मध्ये पूर्ण जाग होती. दारूचा वास भरून राहिला होता. त्यात तीन आत्मे होते आत्मानंदचे विचार ऐकून हादरलेले.. एक आत्मा होता स्वतः आत्मानंद.. आणि शेवटचा आत्मा होता अत्यंत शुद्ध... ज्याला या विचारांच्या स्थळी एक क्षणही राहण्याची इच्छा उरलेली नव्हती...

बुवा - आत्मानंद.. मी निघतो आहे.. मला सोडायला कुणीही यायचे नाही.. महाविद्यालयाचा रस्ता ओलांडला की एखाद दोन रिक्षा असतात.. आत्मू... आजपासून मी तुला माझ्या विचारांमधून मुक्त केलेले आहे.. तू केव्हाही घरी ये... कितीही वर्षे राहा... मी एका अक्षराने प्रश्न विचारणार नाही... मात्र... आजपासून... तुझा वैयक्तीक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी किंवा... आयुष्यात कशाहीसाठी होणारा खर्च... बुवा ठोंबरे करणार नाही... मला माझा स्वकष्टार्जित पैसा मदिरेवर उडवलेला आवडणार नाही.. यापुढे... आर्थिक आघाडी तुझी तू सांभाळ... मात्र... घरी केव्हाही व कितीही वर्षे... जन्मभरही राहू शकतोस माझ्या पैशांनी...

सातार्‍याला रात्री झालेले कीर्तन आटोपून जालन्याला जाण्याआधी आपल्या आत्मूची गाठ घ्यावी या उद्देशाने अचानक एक वाजता वसतीगृहात आलेले बुवा ठोंबरे... सव्वा दोन वाजता पाण्याचा एक घोटही न घेता.. पुन्हा शिवाजीनगर बसस्टॅन्डवर जाणार्‍या रिक्षेत बसले होते....

जगाच्या शाळेत.... ओल्ड मंक लार्जचा कथानायक.. एकटा राहिला होता आज्.... अगदी एकटा...

गुलमोहर: 

नेहमीप्रमाणे छान....

मुळात त्याने(आत्मा)....बापाला स्प्ष्टीकरण देणेच चुकीचे आहे अस मलाही वाटतय....
त्याचे आजवरचे सन्स्कार मोडीत निघाल्यासारखे वाटतात.....मान्य आहे....कही अन्शी चुका होतातही....पण मुळात स्वतत्र्याचा स्वैराचार होता कामा नाही...पण त्याच्या बाबतित तेच घडलय...

हे ही खरय..... काही का असेना पण दारूमुळे ......एखादी गोष्ट पेलण्याची ताकद येत असणार...आणे मि ही हे ऐकीवात आहे की दारू पिणारे लोक हे खुप बिनधास्त असतात्.....डेरर...
आणी पिल्यानन्तरच त्याना आपली बाजु मान्डता येते हे ही तितकेच खर आहे...आणि म्हणुन बहुतेक आत्म्याने ही आपली बाजु(गोष्टीची दुसरी बाजु) यशस्वीरीत्या मान्ड्ली असावी.......

त्याप्रमाणे बेफिकीरजींमधे कुठलाही विचार गळी उतरवण्याचे सामर्थ्य आहे...अनुमोदन

सावरी

मुळात त्याने(आत्मा)....बापाला स्प्ष्टीकरण देणेच चुकीचे आहे अस मलाही वाटतय....
त्याचे आजवरचे सन्स्कार मोडीत निघाल्यासारखे वाटतात.....>>>> अगदी बरोबर सावरी... म्हणूनच त्याचे सगळे स्पष्टीकरण केविलवाणे वाटतेय...आणि शेवटी वडिल रागारागात निघून गेले, त्याच्या खर्चाची जबाबदारीपण सोडून दिली, यातच सर्व काही आलं...आता यातून आत्म्यात सकारात्मक बदल घडो हीच सदिच्छा!

१०० % छान. फार बिघडला आत्मा. आता वाट आहे बेफिकिर त्याला आणखी बिघडु देणार का महेशसारखा? की नीट ताळ्यावर आणणार याची. त्यान्चा मानसपुत्र आहे.

एसेमेस करा एसेमेस. आत्मा अब और क्या करेगा, और कितना बिगडेगा, क्या सकारात्मक बदल घडेंगा या नही. Uhoh हाफतिक्टांचा बाजार च्यायला. अरे त्यांचा मानसपुत्र आहे ना, तर त्यांना लिहू देत. तुम्ही पायजे तर वेगळी काड्म्बरी लिवा. अख्खा काडंब्री विभाग सूना पडलाय. एकही फुलतिकिट फिरकायला म्हणत नाही इकडे. हीच सारे जमतील हाफतिकिटे आलटून पालटून प्रतिसाद द्यायला. च्यामारि तो नंबर गेम्बंद झाला तर हा एसेमेस गेम. त्रास तरी किटी भोगावा माणसाने? Sad जल्ला कालजी कराचा स्वभाव. काय करू?

पण तुमचे रोजचे लिखाण म्हणजे मला कसे वाटते, सांगू?? ते डॉक्टर सांगतात ना, रोज रात्री एक बदाम पाण्यात भीजवून ठेवून सकाळी तो खावा त्याने बुद्धी तल्लख होते, त्या बदामासारखे तुमचे हे कथा-भाग आहेत. रात्रभर तुमच्या मेंदूत भीजवलेले विचार सकाळी आम्ही खातो आणि दिवसेंदिवस आमची विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागायला लागली आहे, हे आताशा जाणवायला लागले आहे...

<< नक्की काय चाल्लय इथे : ?
लेखनशैली, कथा अवाडण्यापर्यंत ठिक आहे पण फॅनक्लब काय, या विचित्र उपमा काय, कठिण आहे ! Uhoh

मला आवडला हा भाग............ आनि खालिल प्रतिसाद....

रोज रात्री एक बदाम पाण्यात भीजवून ठेवून सकाळी तो खावा त्याने बुद्धी तल्लख होते, त्या बदामासारखे तुमचे हे कथा-भाग आहेत. रात्रभर तुमच्या मेंदूत भीजवलेले विचार सकाळी आम्ही खातो आणि दिवसेंदिवस आमची विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागायला लागली आहे, हे आताशा जाणवायला लागले आहे...................

>>पण फक्त १८-१९ वर्षाच्या आत्मानंदच्या तोंडी एवढे गहन आणी परिपक्व विचार आणी तेही मद्यधुंद अवस्थेत मलातरी जरासे अस्थानी वाटताहेत.

सहमत.

हा भाग नाही आवडला Sad
आत्म्याने त्याच्या वडिलांना दिलेले लेक्चर नाही आवडले. मद्यधुंद असला तरी आत्म्याने असे करणे योग्य नाही, हे माझे मत.

Pages