शेतकर्‍याची पाणी लावून हजामत.

Submitted by अभय आर्वीकर on 14 October, 2010 - 11:40

शेतकर्‍याची पाणी लावून हजामत.

अस्मानी संकट

यावर्षी विदर्भात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. मागील काही वर्षे दडी मारून बसलेला पाऊस यंदा असा काही बरसला की मागचा-पुढचा बॅकलॉगच भरून काढला. कोरड्या दुष्काळाची जागा ओल्या दुष्काळाने घेतली. तसा कोरडा दुष्काळ परवडतो कारण त्याचे चटके बिगरशेतकर्‍यांनाही बसतात. शेतकर्‍यांचीही हजामत "बिनपाण्याने" होत असल्याने थोडंफ़ार बोंबलायला निमित्त मिळते, आणि कोरड्या दुष्काळाचे चटके बसलेच असल्याने ऐकणारालाही सहानुभूती दर्शवाविशी वाटते.

पण ओल्यादुष्काळाचे मात्र गणितच निराळे. शेतकर्‍याची हजामत "पाणी लावून" होत असल्याने बोंबलायला निमित्तच उरत नाही. ऐकणारालाही "यंदा भरपूर पाऊस पडलाय ना? यांना आणखी काय हवे?" असे वाटून शेतकर्‍यांना आता बोंबलायची सवयच झाली किंवा शेतीत कष्ट करायची यांची तयारीच नाही, असे वाटायला लागते. असे विचार व्यक्त करणारामध्ये सामान्य माणसेच नसतात तर कृषीतज्ज्ञ, विचारवंत, पुढारी, व्यावसायीक, कर्मचारीही असतात. शेतीला गरजेपेक्षा जास्त पाऊस झाला तर किती हानीकारक असते हे त्यांना ठाऊकच नसते.

यंदाच्या अतीपावसाने जे करायचे तेच केले. पुरेशी उघडझाप न दिल्याने आंतरमशागती करताच आल्या नाहीत. सोयाबिनसारखे पिक कमी अंतरावर पेरायचे असते, त्यामुळे डवरण करताच आले नाही. कपाशी लागवडीचे अंतर तुलनेने मोठे असते त्यामुळे कपाशी पिकाला जास्त डवरणीची गरज असते. पाऊस मुक्काम ठोकून बसल्याने, पुरेसा वाफ़सा न आल्याने डवरणंच दुष्कर झाले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि तणकावसाने शेतीचा ताबा घेतला. पिक एक फ़ूट आणि तृण-गवत तीन फ़ूट असे शिवारात चित्र तयार झाले. आता मनुष्यबळाच्या आधाराने निंदण-खुरपण करण्याशिवाय इलाजच उरला नाही परंतू एवढे प्रचंड मनुष्यबळ आणायचे कोठून? मजूर कमी आणि काम जास्त म्हटल्यावर "मागणी-पुरवठ्याचा सिद्धांत" लागू झाला आणि स्त्रीमजूरीचे दर पन्नास रुपयावरून दोनशे रुपये आणि पुरूषमजूरीचे दर सत्तर-अंशी रुपयावरून तीनशे रुपये असे वाढलेत. म्हणजे जवळ जवळ तिप्पट-चौपट वाढलेत.

शेतात घातलेले शेणखते-सेंद्रिय खते एकतर पावसाने वाहून गेलेत किंवा तणांनीच खाऊन टाकले. रासायनिक खते सततच्या पावसाने विरघळून जमिनीत खोलवर झिरपून झाडांच्या मुळाच्या आवाक्याबाहेर लांबखोल निघून गेले. फ़वारण्या करताच आल्या नाहीत. उत्साही कर्तबगार शेतकर्‍यांनी फ़वारण्या करण्याचा प्रयत्न केला तर त्या फ़वारण्या पावसाने धुवून टाकल्या आणि शेतकर्‍यांच्या उत्साह-कर्तबगारीला पालथे पाडले.
अशा परिस्थितीत समाधानकारक उत्पन्न येणार कसे?

सुलतानी संकट

शेती उत्पन्नाच्या शासकिय आकडेवार्‍या फ़सव्या आणि दिशाभूल करणार्‍या आहेत. ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता नाही, सोयाबिनच्या भावात मंदी आहे. चीन,पाकिस्तान या देशात कापसाचे पिक मोठ्या प्रमाणावर बुडाल्याने व अमेरिकेतील कापूस उत्पादक मका किंवा तत्सम पिकाकडे वळल्याने कापसाला यंदा बरे भाव मिळण्याची संधी निर्माण झाली आहे, किमान कापसाला जरी बरे बाजारभाव मिळालेत तर नापिकी असूनही काही अंशी खर्च भरून निघण्याची शक्यता आहे.परंतु कृत्रीमरित्या कापसाचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार निर्यातशुल्क वाढविण्याची किंवा कापूस निर्यातबंदी करण्याच्या विचारात आहे. कारण स्पष्ट आहे की, कापडमिल मालक या देशातल्या पुढार्‍यांना "घेऊन-देऊन" चालवतात, निवडणुकी साठी, पक्ष चालविण्यासाठी निधी देतात. त्यामुळे कापडमिलमालकांचे हितसंबध जोपासने केंद्र सरकारचे अधिकृत धोरण झाले आहे.

शेतकरी मात्र यापैकी काहीच देऊ शकत नाही. शेतकरी मतदानसुद्धा जातीपातीच्या आधारावर करतो. त्यामुळे शेतकर्‍यांचा दबावगट निर्माण होत नाही. त्यामुळेच पुढार्‍यांचे फ़ावते. शेतकर्‍यावर कितीही अन्याय केलेत तरी त्याच्या जातीचा माणुस उभा ठेवला की तो जातीच्या आधारावर मतदान करून आपल्याच पक्षाला बहूमत मिळवून देतो, त्याची चिंताच का करावी, असे साधेसोपे गृहितक या देशातल्या पुढार्‍यांनी आजपर्यंत राबविले आणि यापुढेही ते असेच सूरू राहिल असे दिसते.

गंगाधर मुटे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगवेगळ्या देशात असलेल्या माबोकरांनी त्या देशात सध्या कापसाचे भाव काय आहेत, हे माहिती घेऊन लिहिले तर बरे होईल.

ऐकणारालाही "यंदा भरपूर पाऊस पडलाय ना? यांना आणखी काय हवे?" असे वाटून शेतकर्‍यांना आता बोंबलायची सवयच झाली किंवा शेतीत कष्ट करायची यांची तयारीच नाही, असे वाटायला लागते. असे विचार व्यक्त करणारामध्ये सामान्य माणसेच नसतात तर कृषीतज्ज्ञ, विचारवंत, पुढारी, व्यावसायीक, कर्मचारीही असतात
मुटेजी,
शेतकर्‍याच्या एकेका दु:खाला तुम्ही वाचा फोडली आहे..
ओला दुष्काळ म्हणजे 'तोंड दाबुन बुक्क्याचा मार' असाच अनुभव वाटतो !
हाता- तोंडाला आलेला पिकाचा घास अशा अति पावसाकडुन हिरावुन घेतला जातो
अशा कितीतरी गोष्टी शेतकरी नशीबाचे भोग,कुठल्यातरी देवीची कृपा-अवकृपा म्हणुन मानुन दिवस पुढे ढकलतो ..

आयला, माझ हे सलग दुसर वर्षे हे पीक जाण्याच Sad जेवढ बी पेरल तितका सुद्धा दाणा मिळाला नाहीये Sad यावर्षी सुरवातीस लावणि आगोदरच इतका पाऊस पडला की शेतात दोन पुरुष उन्चीची घळ पडुन माती वाहून गेली, जेवढे राहिले त्यात लावणी केली तर नन्तर पाऊसच नाही!
होत असही!
[तरी असो, मला शेततळ्याकरता सरकारी सहाय्य घ्या असा आग्रह होतोय, पण मी ते करणार नाही!
कारण सरळ आहे, "जातीपातीच्या" राजकारणात कुजलेल्या सरकारी अनुदान्/भुविकासचे कर्ज वगैरे लफड्यात अडकून मला माझे स्वातन्त्र्य गमवायचे नाहीये!
शिवाय "शेतकर्‍यान्करता" दोन अश्रू ढाळावेत असे वाटले तरी त्यान्चे दुसरे रुपडेही तितकेसे भुषणावह नाहिये, किमान माझ्या अनुभवाप्रमाणे तरी! यावर्षी तर बरेच जळजळीत अनुभव आलेत. पिकात रानडुकरे नाचलीहेत्,नास केलाय वगैरे गावात शिरल्यापासुनच्या बातम्या, प्रत्यक्षात जागेवर बघितल्यावर, डुकरे नव्हेत तर गुरान्नी कोपरा साफ केलाय हे कळले! आता शहरी असलो तरी डुक्करान्नी केलेला नास, अन गुरान्नी बरोबर कडेचा कोपरा - वरच्यावर खाल्लेल पीक यातिल फरक कळतो आम्हास! पण रानडुक्करे जसे शेजारी तसे गुर चारणारे शेतकरीही आमचेच (देश)बान्धव, नै का? त्यातुन सगळेच उन्दराला मान्जर साक्षी याप्रमाणे! कोणच कुणाचे नाव सान्गणार नाही, शेवटी आळ रानडुक्करान्वर! असो. रानडुक्करे असोत वा माणसे, यावरही मात करणारच! ]

<<माझ हे सलग दुसर वर्षे हे पीक जाण्याच. जेवढ बी पेरल तितका सुद्धा दाणा मिळाला नाहीये>>
लिंबुटिम्बुजी अभिनंदन. एका चटक्याची अनुभूती प्राप्त केल्याबद्दल. Lol

अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊन आपण शेतीत "अनुभवसंपन्न" व्हावे, अशा शुभेच्छा देऊ? Happy

<<शिवाय "शेतकर्‍यान्करता" दोन अश्रू ढाळावेत असे वाटले तरी त्यान्चे दुसरे रुपडेही तितकेसे भुषणावह नाहिये,>>
<< पण रानडुक्करे जसे शेजारी तसे गुर चारणारे शेतकरीही आमचेच (देश)बान्धव, नै का? त्यातुन सगळेच उन्दराला मान्जर साक्षी याप्रमाणे! >>

त्यान्चे (शेतकर्‍यांचे) दुसरे रुपडेही तितकेसे भुषणावह नाहिये, हे खरेय. पण हे केवळ शेतकर्‍यालाच लागू होते असे नव्हे. लूटणारे लुटारू, गरिबाच्या टाळूवरचे लोणी खाणारे पुढारी, गरीबांसाठीच्या योजना फस्त करणारे कर्मचारी, प्रशासकिय अधिकारी, हे सुद्धा एकमेकांचे देशबांधवचं की.....!

शिवाय जिच्यावर बलात्कार होतो, तिच्यावर बलात्कार करणारा पण तिचा देशबांधवच की.....!!

या खालील बातमीवरुन हेच सिद्ध होतं कि सरकार,त्यांच्या संस्था या शेतकर्‍यांच्यासाठी नेहमीच किती तत्पर असतात कि त्यांच नेहमी अक्षम्य दुर्लक्ष होत ?
शेती संशोधनावरती केला जात असलेला सरकारचा बराच पैसा हा वाया जात नाही का ?

http://www.esakal.com/esakal/20100423/4982965023842538301.htm

आपले माननीय कृषीमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ऊस उत्पादकांनी एकत्र येऊ नये आणि कोणत्याही संघटनेच्या माध्यमातून आपण कष्ट करून पिकवलेल्या उसाला योग्य दर मागण्याचा प्रयत्नही करू नये,कारखान दर जो दर देतील तो दर गप्प गुमान घ्यावा
शेतकर्‍यांच्या हक्कावर सरळ सरळ गदाच आणली जात आहे ..
http://72.78.249.107/esakal/20101102/5645843321061212609.htm

गंगाधर, बिगरशेतकर्‍यांच्या लक्षातही येत नाहीत या बाबी. भरपूर पाऊस झालाय ना, आता काय ? असाच दृष्टीकोन असतो. हे सत्य खरेच झणझणीत अंजन आहे.